Wednesday 25 November 2015

पर्याय २०१३: चरित्र अभिनेता: वृद्धत्वाचा ‘फिल्मी’ रंग

('पर्याय ' च्या २०१३ च्या वृद्धत्व विशेषांकातला हा माझा दुसरा लेख ! हिंदी सिनेमातल्या काही चरित्र अभिनेत्यांच्या काही भूमिकांचा धावता आढावा घेणारा !) 

तसं पाहिलं तर प्रत्येक हिंदी सिनेमात कुठले ना कुठले वृद्ध character असतेच. त्यामुळे हिंदी सिनेमा आणि वृद्धहा एक न संपणारा विषय आहे! शिवाय त्यात प्रत्येकाची आवड-निवडही वेगवेगळी असणार! एखाद्या सिनेमाचा इथे उल्लेख झाला नाही तर कोणाला वाटू शकतं - ‘‘अरे? तो सिनेमा का नाही? किंवा तसाच आणखी एक होता... त्याचा समावेश करायला हरकत नव्हती.’’ या विषयाचा एवढा मोठा आवाका आणि त्यात व्यक्तिसापेक्षता म्हणून या विषयाची मांडणी करताना एक मधला मार्ग काढलाय. त्याला पळवाटच म्हणा ना! हिंदी सिनेमांचा विचार करण्याऐवजी वृद्ध भूमिका साकारणार्‍या काही कलावंतांविषयी बोलून आपण त्याद्वारे या विषयावर थोडा फार प्रकाश टाकूया ! अर्थात या लेखाचा उद्देश केवळ ते सिनेमे आठवून त्या सिनेमांशी निगडीत आपल्या चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देऊन एक स्मरणरंजन करता यावे एवढा माफकच आहे. हा काही कोणा अभ्यासू सिने-पत्रकाराचा शोध-निबंध नव्हे किंवा सिनेमाबद्दल मांडलेला समीक्षात्मक  विचारही नव्हे! हिंदी सिनेमांची आवड एवढंच काय ते या लेखाचे भांडवल!

हिंदी सिनेमात बहुतांशी वृद्ध characters हे कथानकाचे हिरो म्हणून नव्हे तर कथा पुढे नेण्यास सहायक अशा स्वरूपाचेच असतात. पण यातही खूप विविधता आढळून येते. म्हणजेच अशा चरित्र भूमिकांमध्येही गंभीर, विनोदी, खल/कपटी अशा अनेक छटा दिसून येतात. काही काही अभिनेते हे खरं तर कसलेले असूनही त्यांच्यावर एकाच प्रकारच्या भूमिकांचा शिक्का बसला. उदाहरणार्थ - कन्हैय्यालाल! उत्तर भारतातील ग्रामीण पार्श्‍वभूमीची कथा, त्यात सावकार किंवा मुन्शीची कपटी, बेरकी भूमिका म्हटली की कन्हैय्यालालच आठवतात. त्यांचा तो खास आवाज, ग्रामीण बाज आणि डोळ्यांतील रंगेलपणा! नायिकेच्या वाईटावर टपलेला हा इसम अगदी वात आणे. 
कन्हैय्यालाल -मदर इंडिया 
या प्रकारच्या भूमिकेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी मदर इंडियासिनेमात साकारलेला सुखीलाला! राधा (नर्गिस)च्या आयुष्यात आलेल्या संकटांच्या मालिकांचं आणि त्यांनी दिलेल्या सामन्याचं चित्रण असलेल्या या सिनेमात कन्हैय्यालालने छळ कपटाने अडाणी/अशिक्षित शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या सावकाराची भूमिका अप्रतिमपणे केली होती. मदर इंडियाअशी larger than life उपाधि मिळण्यासाठी राधाने वाईटाशी केलेला संघर्ष दाखविणे गरजेचे होते. हा वाईटपणा या सिनेमात कन्हैय्यालालने पुरेपूर वठविला.

काही कलावंत तसे भाग्यवान! त्यांच्यावर एकाच प्रकारच्या भूमिका करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे त्यांनी चरित्र भूमिकेच्या चौकटीत राहूनही वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यापैकीच काहींचा हा धावता आढावा -
१) पृथ्वीराज कपूर -
मुलगा राजकपूर बरोबर आवाराचित्रपटात वडिलांची भूमिका तर सुप्रसिद्ध मुगल-ए-आझममध्ये अकबर बादशाहची! 1971 मध्ये प्रदर्शित कल-आज-कलसिनेमात मुलगा राज व नातू रणधीर कपूर बरोबर विनोदी अंगाची भूमिका केली होती. बलदंड शरीरयष्टी, धारदार नाक, पल्लेदार आवाज या वैशिष्ट्यांसह त्यांनी साकारलेला अकबर अजरामर होता.

२) डेव्हिड -

गुटगुटीत शरीरयष्टी, डोक्याला  टक्कल, गोल चेहरा, गुबगुबीत गाल, छान, निर्व्याज, मिष्किल, प्रसन्न हसू या शारीरिक गुणधर्मांमुळे कोणालाही आपले लाडके काका/मामा वाटणार्‍या डेव्हिड यांनी कित्येक सिनेमात तशाच प्रकारच्या निर्मळ, फ्रेंडली भूमिका केल्या. हृषिकेश मुखर्जींच्या अनेक सिनेमांत त्यांनी चांगली छाप पाडली उदा. - अनुपमा, सत्यकाम, अभिमान, चुपके-चुपके, खूबसूरत, इत्यादी. तसेच बासू चटर्जींच्या बातों बातों मेंमध्ये व खट्टा-मीठामध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. रोजच्या जगण्यांतल्या हलक्या -फुलक्या  प्रसंगांत मार्ग दाखविण्याची, विसंगतीत संगत लावण्याची त्यांची सहज भूमिका कथेला सफळ-संपूर्ण करण्यास मदतच करे. 
आठवा - चुपके-चुुपकेमध्ये जिज्जाजींना हरविण्यासाठीच्या परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र)च्या कटातहिरिरीने भाग घेणारे हरिपतभैय्या उर्फ डेव्हिड!

३) मनमोहनकृष्ण -
मनमोहनकृष्ण 
कित्येक सिनेमात नायिकेच्या गरीब, असहाय्य बापाची करुण भूमिका करणारे मनमोहनकृष्ण धूल का फूलमध्ये मात्र अब्दुल रशीद ह्या नंदा-राजेंद्रकुमार यांच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचा सांभाळ करणार्‍या ठसठशीत भूमिकेत दिसले. शिवाय बीस साल बादमध्ये तर ते चक्क नकारात्मक भूमिकेतही होते.




४) बलराज सहानी -
वक्तसिनेमात अचला सचदेवला उद्देशून ए मेरी जोहराजबींअसे रोमँटिक गाणे म्हणणारा बलराज साहनी, नंतर काळाच्या आघातामुळे विखुरलेल्या आपल्या परिवारासाठी झुरतो. ही स्थित्यंतरं बलराज सहानीच्या सहजसुंदर अभिनयाने जिवंत झाली होती.





५) धुमाळ -
पूर्वीच्या सिनेमांचा एक ठरलेला साचा होता. मुख्य कथेला उपकथानक जोडलं जाई. यामुळे सिनेमात गंभीर प्रसंगानंतर एक comic relief प्राप्त होई. मेहमूद-शुभा खोटे किंवा जॉनी वॉकर अशा उपकथानकांत हमखास असायचे. यांच्याच जोडीला असायचे धुमाळ! लौकिक अर्थाने शरीरयष्टी, चेहरेपट्टी सर्वसाधारण असली तरी विनोदाचे अंग आणि टायमिंग जबरदस्त होते. त्यामुळे छोट्याशा भूमिकांतूनही ते आपली छाप पाडून जात.

6) प्राण -

नायकाला अगदी जेरीस आणणार्‍या खलनायकी भूमिका करणारे, आपला आवाजच दरारा निर्माण करण्यासाठी पुरेसा असणारे प्राण केवळ नकारात्मक भूमिकांसाठीच नाही तर काही उत्कृष्ट चरित्र भूमिकांसाठीही लक्षात राहतात. त्यातील प्रमुख म्हणजे उपकारसिनेमातील त्यांची मलंग चाचाही भूमिका! या भूमिकेमुळे त्यांच्या कारकीर्दीला एक वेगळे वळण मिळाले. परिचयसिनेमात त्यांनी मिलिटरी शिस्तीच्या आजोबांची छान भूमिका केली होती. यात त्यांच्या मुलाची भूमिका संजीवकुमार यांनी केली होती. या मुलाबरोबर न पटल्यामुळे त्याच्याबद्दलच नव्हे, तर त्यामुळेच नातवंडांबद्दलही मनात अढी बाळगणारा वरून कठोर पण आतून नरम असा विविध छटा असलेला आजोबा प्राण यांनी साकारला. प्राण आणि अशोक कुमार या जोडीने मिळून 27 सिनेमे केले. यात व्हिटोरिया नं. 203’ यात या दोघांचं विनोदाचं ट्युनिंग चांगलं आहे. दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारेहे दोघांवर चित्रीत झालेले गाणे खूप गाजले होते.

7) अशोक कुमार -
                                     
खरं तर अशोक कुमार यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय चरित्र भूमिका केल्या. पण वृद्ध character आणि ज्यामुळे कथेला महत्त्वपूर्ण वळण मिळाले, अशा प्रकारची भूमिका त्यांनी बासू चॅटर्जी दिग्दर्शित छोटी सी बातया सिनेमात केली होती. यात त्यांनी कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग हे अजब नाव असलेली व्यक्तिरेखा साकारली. नायक अरुण (अमोल पालेकर) नायिका प्रभा (विद्या सिन्हा)च्या प्रेमात तर आहे पण तिला थेट विचारण्याचं धाडस त्याच्यात नाही. त्यातच नागेश (असरानी) हा प्रभाचा मित्र त्याच्या वेगवेगळ्या (आणि काही बाह्य) गुणांमुळे तिच्यावर impression मारतो. अरुणचा नागेशपुढे निभाव लागत नाही. आता अशा पराभूत मनस्थितीत अरुण कर्नलकडे जातो. लष्करच्या शिस्तीचे धडे गिरवलेले कर्नल मग अरुणला उभं राहणं/चालणं/बोलणं इथपासून ते नागेशवर डाव उलटविण्याचे धडे देतात. अरुण त्यात यशस्वी होतो हे वेगळे सांगायला नकोच! कर्नलच्या वेगळ्या मिशा, हातात सिगार, बोलण्यात जरब, रंगीबेरंगी शर्ट आणि मार्मिक बोलणं अशा नेहमीपेक्षा वेगळ्याच get-up मधून अशोक कुमार यात मजा आणतात.
याच बासू चॅटर्जींच्या खट्टा-मीठाया सिनेमात अशोक कुमार यांनी एका पारशी विधुराची भूमिका केली होती. निवृत्तीनंतरच्या काळात साथ-संगत करणारी जोडीदार हवी म्हणून स्वत:ची तीन मुलं असतानाही हा विधुर पर्ल पद्मसी (जिलाही आधीच्या लग्नापासूनची मुलं आहेतच)शी लग्न करायचं ठरवतो. दोघांच्या या निर्णयाला त्यांच्या मुलांकडून विरोध होतो. पण तरीही या निर्णयानंतर दोन्ही घरं एकमेकांशी कशाप्रकारे जुळवून घेतात याची खट्टा-मीठाही नर्म विनोदी शैलीतली कहाणी!
खूबसूरतमध्येही अशोक कुमार यांची भूमिका संस्मरणीय होती.

8) उत्पल दत्त -
हृषिकेश मुखर्जींच्या काही सिनेमांचा विषय एखादा पूर्वग्रह बाळगून तो अगदी जिवापाड जपणार्‍या काही व्यक्तींभोवती फिरतो. हे पूर्वग्रह अगदी काही मोठे किंवा आध्यात्मिक तत्त्वं वगैरे नसतात. तर या व्यक्ती एखाद्या छोट्याशा गोष्टीतून जगाकडे बघतात आणि सगळ्यांनीही तसंच वागावं अशी अपेक्षा करतात. उत्पल दत्त या हरहुन्नरी बंगाली कलाकाराने मुखर्जींच्या दोन सिनेमांत अशाप्रकारची भूमिका केली होती. ते दोन सिनेमे म्हणजे गोलमालआणि नरम-गरम’. मिशा बाळगणारा माणूसच खरा आणि बिनमिशांची माणसं ही खोटारडी असतात असा पूर्वग्रह ठामपणाने बाळगणार्‍या भवानीशंकर प्रसादची भूमिका गोलमालमध्ये उत्पल दत्त यांनी केली होती. यात होणारे गोंधळ आणि त्यातून वाट काढणारा हिरो अमोल पालेकर हा सगळाच प्रवास हसून हसून पुरेवाट आणणारा होता. उत्पल दत्त यांची इ...श्म्हणण्याची लकब, अमोल पालेकरचं बिंग (खरं तर मिशी) गळून पडल्यानंतर दत्त यांनी अमोल पालेकरचा केलेला पाठलाग, त्यानंतर ओमप्रकाश बरोबर पोलीस चौकीतला प्रसंग हा सगळा climax लाजवाबच! कितीही वेळा पाहिला तरी हा सिनेमा तेवढाच ताजा आणि मनोरंजक वाटतो हेच या सिनेमाचं यश आहे.

9) ए.के. हंगल -
या विषयावरचा लेख ए.के. हंगल यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुणीतरी मागे म्हटलं होतं - हंगल सारखी माणसं वृद्ध होऊनच जन्मली की काय?! आपल्या दिसण्यातल्या मर्यादा अभिनयाने भरून काढण्याची किमया साधलेले हंगल कितीतरी भूमिका जगले. काही सिनेमांत जर ते एक-दोन सीनमध्येच दिसत. उदा. दीवारमधला एक प्रसंग, ज्यात रवी (शशीकपूर) एक पाव चोरणार्‍या मुलाच्या पायात गोळी घालतो आणि नंतर त्याच्या घरी जातो. त्याचे वडील- ए.के. हंगल हे तत्त्वनिष्ठ शिक्षक असतात. नोकरी नसते. गरिबीमुळे अन्नाची भ्रांत असते तरी ते आपली तत्त्वं सोडत नाहीत. आपला स्मग्लर भाऊ विजय (अमिताभ बच्चन) याला पकडण्याच्या लढ्याला पाठबळ देणारा हा बोलका प्रसंग! 
https://www.google.co.in/url?sa=i&rct=j&q=&esrc=s&source=images&cd=&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj1g4Dy7qvJAhVCGY4KHWHfAqYQjhwIBQ&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DBXSZdAp0aMM&psig=AFQjCNHtIdOqr3u6IJ4GMFfiBrG6u6mnjg&ust=1448550613198892
किंवा हंगल यांची शोलेमधली अंध रहीम चाचा ही भूमिका अजरामर आहे. शोलेमध्ये जसे अजूनही गब्बर, ठाकूर, जय-वीरू लक्षात राहतात, तशीच ही छोटी पात्रेही! आपला मुलगा गमावला असला तरी चाचा जय-वीरूने रामगढमध्येच रहावं असंच म्हणतात आणि अल्लाकडे प्रार्थना करताना विचारणार की अशाप्रकारे गावावर कुर्बान होण्यासाठी अजून काही मुलं का नाही दिली? असं म्हणतात. या छोट्या प्रसंगातूनही चाचांचा ताठ कणा हंगल यांनी सुंदरप्रकारे दाखविला आहे.
अभिमान, आँधी, चितचोर, नमकहराम इत्यादी कितीतरी चित्रपटांतून हंगल यांनी केलेल्या लक्षणीय भूमिका गाजल्या.
शौकीन 

बासू चॅटर्जी यांच्या शौकीनया चित्रपटात अशोक कुमार, उत्पल दत्त आणि हंगल या तीन दिग्गजांनी एकत्र काम केले होते. म्हटले तर कास्टिंगमध्येच सिनेमाने बाजी मारली होती. त्यात गोव्याची पार्श्‍वभूमी, आर.डी. बर्मन यांचे संगीत आणि मिथुन चक्रवर्ती-रती अग्निहोत्री यांची तरुण जोडी! आपल्या नेहमीच्याच boring आयुष्यात थोडासा बदल घडविण्यासाठी हे तिघे म्हातारे गोव्याला जातात आणि रती अग्निहोत्रीवर प्रत्येकजण आपल्या परीने impression मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांना माहित नसते की ती म्हणजे त्यांना गोव्याला मुद्दाम आलेल्या ड्रायव्हर (मिथुन)ची प्रेमिका आहे. वृद्धांचे हे flirting चे प्रयत्न हास्याचे फवारे निर्माण करतात. वृद्धत्व म्हणजे फक्त निराशा, आजार किंवा इतर करुण भावना नाही, तर वृद्धत्व चक्क enjoy ही करता येऊ शकते हे अधोरेखित करणारा हा चित्रपट! या तीन मित्रांमधील camaraderie ही खूप छान!

10) ओमप्रकाश -
यांच्याही उल्लेखाशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. ओमप्रकाश यांनीही विविध छटा असलेल्या अनेक भूमिकांतून आपला ठसा उमटविला आहे. आँधीसिनेमातले ते अस्सल, राजकारणात मुरलेले फिसर होते तर चुपके-चुपकेमध्ये माणसाला वासाने ओळखण्याचा दावा करणारे जिज्जाजी! शराबीया तशा अलिकडच्या सिनेमात अमिताभचा सांभाळ करणार्‍या मुन्शीजींची भूमिकाही सरस होती. पडोसनमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून उभा राहिलेला राजपूत मामा सिनेमातील इतर विनोदी नटांच्या भाऊगर्दीत आपली ओळख राखतो. बुढ्ढा मिल गयाहा सिनेमा तर त्यांच्याभोवती फिरणारा एक रहस्यपट होता.

एवढ्या चरित्र नायकांबद्दल लिहिलं तर अशा भूमिका नायिकांच्या वाट्याला आल्याच असतील असा विचार येणं साहजिक आहे. परंतु तो खरंच एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाता-जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की दुर्गा खोटे (अभिमान, बॉबी, बावर्ची, बिदाई), ललिता पवार (अनाडी, जंगली, प्रोफेसर), निरुपा रॉय (दीवार, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर), अचला सचदेव (वक्त), कामिनी कौशल (उपकार), दीना पाठक (गोलमाल, खूबसूरत) यांनी महत्त्वपूर्ण व वैविध्यपूर्ण भूमिका केल्या.

प्रतिथयशी नटांमध्ये मला वाटतं संजीवकुमार हा एक असा कलाकार होता, ज्याने खूप तरुण वयात वृद्ध characters साकारले. विचित्र विरोधाभास हा की जरी त्यांनी अनेक वृद्धांच्या भूमिका केल्या तरी त्यांचे मृत्युसमयी वय होते फक्त 47!
संजीवकुमार-मौसम 

 ‘कोशिशमधील मूक-बधिर पिता, ‘मौसममधला डॉक्टर, ‘परिचयमधला प्राणचा मुलगा, ‘आँधीमधील सुचित्रा सेनचा नवरा असे गुलजार दिग्दर्शित चार सिनेमांत त्यांनी वृद्ध व्यक्तिरेखा केल्या. त्याचबरोबर त्रिशूल, शोले, आलाप, जानी दुश्मन, बीवी ओ बीवी या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

हिंदी सिनेमात वृद्धत्वाच्या समस्यांचं काही वेळा सरधोपटपणे सादरीकरण झाले आहे. हिंदी चित्रपटांचे काही ठराविक ठोकताळे असतात. मुलं (आणि अर्थातच सुना) आई-वडिलांकडे नीट लक्ष देत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांना उतारवयात अनेक दु:ख झेलावी लागतात. कित्येकदा त्या दोघांची फारकत मुलांच्या स्वार्थापोटी केली जाते. त्यांना नीट जेवायलाही दिलं जात नाही. त्यांचे अगदी हाल हाल होतात. असे मेलोड्रामाटिक प्रसंग काही सिनेमांत असतात. बागबानहे त्याचे मूर्तिमंत उदाहरण! पोटची मुलं नीट सांभाळत नाहीत पण बाहेरचा/कुठलंही नातं नसलेला मुलगा मात्र आदरपूर्वक त्या आई-वडिलांची काळजी घेतो, हा आणखी एक cliché !
वृद्धाश्रम आणि तिथली माणसं हा विषय घेऊन अलिकडच्या काळात दोन सिनेमे आले होते. एक होता- 2002 चा शरारत’ (अभिषेक बच्चन, अमरीश पुरी व इतर) आणि दुसरा लगे रहो मुन्नाभाई’! परंतु लगे रहोमध्ये सिनेमा नंतर गांधीगिरीच्या ट्रॅकवर जातो. त्यामुळे वृद्धाश्रम हा विषय एवढा मध्यवर्ती राहत नाही. तर शरारतची मूळ कल्पना चांगली असूनही सदोष हाताळणीमुळे तो एवढा प्रभावी ठरला नाही.

या पार्श्‍वभूमीवर वृद्धापकाळातील मन:स्थिती, त्या काळात निर्माण होणार्‍या समस्या, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि या समस्यांवरचे उत्तर या सर्वांवर प्रकाशझोत टाकणारा, बर्‍यापैकी वास्तववादी चित्र उभं करणारा - सारांशहा महेश भट दिग्दर्शित चित्रपट उठून दिसतो. महेश भटच्या कारकीर्दीतल्या सुरुवातीच्या काळाचा हा सिनेमा तसेच अनुपम खेरचा तर हा पदार्पणाचा सिनेमा! कुठेही अतिरंजित हाताळणी नाही आणि अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी आणि नकारात्मक भूमिकेतल्या निळू फुले यांचा संयत अभिनय यामुळे हा चित्रपट एक वेगळी उंची गाठतो. तत्त्वनिष्ठ हेडमास्तर आणि त्यांनी देवभोळी बायको या प्रधान दांपत्याभोवती हा सिनेमा फिरतो. अमेरिकेला शिकायला गेलेल्या त्यांच्या मुलाचा खून होऊन तीन महिने होऊन गेलेले असले तरी दोघांना अजूनही हे वास्तव स्वीकारणे जड जाते. पार्वती (रोहिणी हट्टंगडी) या श्रद्धेवर जगत असते की त्या मुलाचा पुन्हा जन्म होऊन तो त्यांच्याकडेच येणार आहे. तर तो अजूनही आहे असंच समजून प्रधान (अनुपम खेर) त्याला पत्र लिहितात आणि मग त्यांच्या लक्षात येतं. मुलाच्या अस्थी अमेरिकेहून भारतात आल्यावर त्या कस्टम विभागातून ताब्यात घेण्यासाठी भ्रष्ट व्यवस्थेचा सामना करावा लागल्यांनतर त्या अस्थी विसर्जनाची पूजा पार्वती करते (हेडमास्तर नास्तिक असतात). मुलगा हा म्हातारपणाची काठी म्हणण्याच्या वयात मुलाच्या वियोगाचा दु:खाचा डोंगर दोघांवर हा असा पुन्हा कोसळतो. त्याच्या राखेचा काही अंश हातात घेऊन प्रधान भकासपणे एकटेच बागेत खेळणार्‍या मुलांकडे बघतात आणि ती राख तिथल्या मातीत मिसळते.
https://www.youtube.com/watch?v=z1yH5aCu_L8

मुलाच्या पश्‍चात महागाईच्या काळात गुजराण व्हावी म्हणून निवृत्तीनंतरही प्रधान यांना नोकरी करणे क्रमप्राप्त ठरते. शिवाय स्वत:च्या घरी ते एक पेइंग गेस्ट सुजाता (सोनी राझदान) ही ठेवतात. मात्र नोकरीच्या ठिकाणी भेटलेल्या आपल्या मुलाच्या मित्रासाठी प्रधान त्या नोकरीवर पाणी सोडतात. तिथून घरी परत येताना दंगलीत सापडून त्यांना गुंडांकडून मारहाण होते, त्यांचे पैसे चोरले जातात. परिस्थितीपुढे हतबल झाल्यामुळे जगण्याची इच्छा संपून जाते आणि म्हणून दोघेही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. आणि अचानक अशावेळी दोघांनाही जगण्याचा एक उद्देश सापडतो. पेइंग गेस्ट सुजाताच्या पोटी विवाहबाह्य संबंधातून जन्माला येणार्‍या मुलाच्या रूपाने! आणि या उद्देशासाठी दोघेही स्वत:ला आपापल्या परीने झोकून देतात. अगदी राजकीय शक्तीच्या दबावालाही न झुकता! यातून पार्वतीला वाटतं की आपल्याच घरात आपलाच मुलगा पुन्हा जन्माला येणार आहे. पण नंतर प्रधान सुजाताला पुण्याला पाठवून देतात आणि पार्वतीला आपल्या मुलाच्या निधनाचं खर्‍या अर्थाने closure मिळवून देतात. एकमेकांच्या साथीतच जीवनाचा सारांश सामावला आहे असं म्हणून दोघेही नव्याने आयुष्याची सुरुवात करतात. बागेत फिरायला जातात. तिथे मुलाची राख विखुरलेल्या ठिकाणी नाजूक फुलांचा ताटवा बहरलेला असतो. आत्महत्या करण्यासाठी धाडस लागतं असं म्हणणारे प्रधान जगण्यासाठी, आयुष्याशी लढण्यासाठी धाडस लागतं इथपर्यंतचा प्रवास जगतात. जीवन प्रवाही आहे असा सकारात्मक संदेश देऊन सिनेमा संपतो. व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत राहूनही एक उत्कट, नितांतसुंदर अनुभव देणारा हा सारांश’! आपली देहबोली, अभिनय आणि आवाज याद्वारे वृद्ध characters (वयाने तेवढे वृद्ध नसताना) साकारणारे अनुपम खेर आणि रोहिणी हट्टंगडी! आणि परिस्थितीशी यथाशक्ती लढण्यातच जगण्याचे सार्थक आहेे हा एक positive message यामुळे हा चित्रपट मनाला स्पर्शून जातो. एक हुरहूर निर्माण करतो!

1 comment:

Mugdha said...

खुप छान आढावा सर्व अभिनेत्याचा! सगळे रोल्स असे डोळ्यासमोरून गेले! बॉलिवूड प्रेमींना हे सगळे नक्की आठवणार! Didn't know Pran and Ashok Kumar had acted in 27 films together!! Hats off to your research!!