भावगीतातील वैभवशाली असे 'वसंत पर्व' लता आणि वसंत प्रभू या जोडीच्या गाण्यांमधून दिसते. बऱ्याच अंशी पी. सावळाराम यांचे शब्द, त्यावर प्रभूंनी केलेले लता यांच्या आवाजाचे कोंदण असा छान त्रिवेणी संगम या गाण्यातून दिसून येतो. स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित व सोप्या शब्दांत भाव पोचवणारी ही गाणी म्हणूनच लोकप्रिय झाली. 'लेक लाडकी या घरची' हे लग्न ठरलेल्या मुलीच्या मनातील भाव व्यक्त करणारे गाणे, 'गंगा यमुना डोळ्यात उभ्या का' असं लग्न झालेल्या मुलीला निरोप देतानाचे गाणे किंवा 'बाळा होऊ कशी उतराई' हे एका आईने व्यक्त केलेली भावना दर्शवणारे गाणे ! सर्वसामान्य आयुष्यातील हे महत्त्वाचे टप्पे ! सहज ओठावर रूळतील असे शब्द, कमीतकमी वाद्यमेळ आणि लता मंगेशकर यांचा तो बहरत्या काळातला आवाज! यामुळे अशाप्रकारची अनेक प्रासादिक गाणी जन्माला आली. लोकांना ती आपलीशी वाटली आणि त्या काळी रेडिओ व्यतिरिक्त फारसे इतर माध्यम नसताना देखील ती खूप लोकप्रिय झाली. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, सी. रामचंद्र, वसंत देसाई, वसंत पवार यासारख्या संगीतकारांच्या ऐन बहराच्या काळात यामुळेच वसंत प्रभू आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करू शकले ! त्यांच्या गाण्यांची ही लिंक देत आहे. ही ऑडिओ लिंक आहे. चक्क रेडिओच आहे हा . त्यामुळे नोस्टाल्जियाचा ही आनंद !
Wednesday, 25 September 2013
' लता-वसंत' पर्व
Monday, 16 September 2013
तुम्ही 'कास' ला (प्लीज) जाऊ नका. . ...
काल कास पठारावर फुलं पहायला गेलो होतो. याआधी आम्ही २०१० साली गेलो होतो त्यानंतर ठरवलं की इतक्यात काही परत जायचं नाही. आता ३ वर्षांनी गेल्यावर पुन्हा हेच वाटतंय ! म्हणजे फुलं नव्हती म्हणून असं म्हणतोय का - तर नाही. . . रग्गड फुलं पाहिली . . . अगदी डोळे भरून ! नयनरम्य/नयनमनोहर/नेत्रसुखद वगैरे सगळी विशेषणं अनुभवली. . . पण . . . तिथे पोचेपर्यंतचा प्रवास . . . ती गाड्यांची भीषण गर्दी. तो भयाण ट्राफिक जाम . . काहींचे भयंकर ड्रायव्हिंग. . सगळं भयानक होतं. . . तिथे जी काही व्यवस्था होती ती या गर्दीमुळे पार कोलमडून गेली. आम्हांला वाटलं की गणेशोत्सव आहे . . . लोकं गणपतीत दंग असतील. . त्यामुळे कासला कोण जाईल ? पण आमच्यासारखाच स्मार्ट विचार करणारे हजारो लोक होते. आता आपल्याकडे गर्दी म्हणजे हौशे/गवशे /नवशे असतात. ते इथेही पाहायला मिळाले-
१) एक हिरो फुलांच्या ताटव्यात आपला पृष्ठभाग टेकवून, उसेन बोल्टची जग जिंकल्याची पोझ देत फोटो काढून घेत होते.
२) एक आजोबा हातात रानहळदीचे फूल मशाल घेतल्याप्रमाणे मिरवत होते. त्यांचा फोटो काढताहेत म्हटल्यावर लगबगीने आजीसुद्धा त्यांच्याकडची फुलं घेऊन फोटोत येत्या झाल्या .
३) कानामागे सुतार लोक पेन्सिल लावतात तशी फुलं लावून कुणी हिंडत होते.
आम्ही फुलावर पाय पडू नये म्हणून इतके काळजीपूर्वक, खाली मान घालून चालत होतो . . . पण बाकीचे अगदी निवांत जात होते . . . बेधडक आमच्या हृदयाचा ठोका चुकवत . . . फुलं पायदळी तुडवत !
४) एका लहान मुलीला तिच्या आई-वडिलांनी शिक्षा म्हणून उपाशी ठेवले होते कि काय माहित नाही पण ती चक्क फुलं खात होती. आई शप्पथ ! अजिबात खोटं नाहीये हे !
५) चॉकलेटचे wrappers, प्लास्टिक पिशव्या,बाटल्या सगळं काही सगळीकडे पसरलेलं होतं . .
६) जिथे नो पार्किंग झोन होता तिथेच शेकडो गाड्या लावून शांतपणे लोक फुलं बघायला निघून जात होते. नियमांची ऐशीतैशी त्या ! जिथे प्रवेश निषिद्ध होता तिथे मुद्दाम जात होते . .
हे सगळं आजूबाजूला घडत असताना, त्यामुळे चिडचिड होत असताना डोळ्यांना सुखावणारी फुलं आणि अंगाला/ मनाला ताजातवाना करणारा आल्हाददायक, गार वारा असं मात्र छान रसायन होतं. . . पार्किंग पासून पठारापर्यंत चालत जाण्याचा शीण या वाऱ्याने कुठल्याकुठे पळाला. . . कास तलाव, तिथले हिरवे डोंगर, उतरलेले ढग. . प्रसन्न वाटलं!
ही सोनकीची फुलं !
आणि हा लाल तेरडा ! याचं शास्त्रीय नाव - Impatiens oppositifolia ! Impatiens हे जर अधीर या अर्थाने नाव असेल तर ते अगदी समर्पक आहे. . . उमलण्यासाठी अधीर . . जिथे जागा मिळेल तिथे येण्यासाठी अधीर . . . क्षणभंगुर आयुष्यात स्वतः आनंद घेत . . दुसऱ्यालाही तो देण्यासाठी !
मराठीत काही नावं खूप छान वाटतात- आता याच फुलाचं पाहा- याचं नाव आहे सीतेची आसवं! या फुलावरील पांढरा ठिपका अश्रू सारखा दिसतो म्हणून हे नाव दिले असावे.इथे तेरड्याच्या बरोबरीने ही फुले दिसत आहेत-
ही पांढरी फुलं आहेत- Eriocaulon sedgwickii. . . .
तेरड्याचा लाल रंग, सोनकीचा पिवळा, सीतेची आसवं निळसर
जांभळी आणि या सगळ्याचा समतोल साधणारा पांढरा रंग !
हे असं vanilla ice cream उधळलेलं पाहूनच कदाचित त्या मुलीला ही फुलं खावीशी वाटली असतील !
या पिवळ्या फुलांना कावळा म्हणतात! एका लाजऱ्या आणि साजऱ्या फुलाला कावळा का बरं म्हणत असावेत कोण जाणे?
या छान तुर्रेदार फुलांचं नावही भारदस्त आहे- Pogostemon deccanensis !
या झुडपांना फुलं नाहीत. कारण फुलं येणं ही यांची सप्त-वार्षिक योजना आहे . आम्ही २०१० मध्ये आलो होतो तेव्हा याची फुलं होती .म्हणजे आता पुन्हा भेट २०१७ ?हेच ते (टोपली ) कारवी !
या नाजूक फांदीच्या आणि फुलांच्या झाडाचं नाव बहुदा-Oldenlandia corymbosa आहे -
हे ही त्याच प्रकारचं । पण तेच नसावं ! हे चिंचुर्डी आहे का?-
हा फुलांचा आडवा दांडा म्हणजे बहुदा-Peristylus densus असावा -
आणि ही रानहळद !-
तर ही आणि अशी आणखी काही फुलं पाहायला मिळाली.
कास पठार हे युनेस्को घोषित World Natural Heritage site आहे त्यामुळे त्याचे जतन व्हावे या साठी खरोखरच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वर्तमानपत्रात याची सालाबादप्रमाणे फोटोरूपी
जाहिरात आलीच नाही तरी या गर्दीला थोडा आळा बसेल. तिथे न जाणं हाच त्यावरचा सर्वोत्तम संवर्धनाचा मार्ग आहे असं मला वाटतं. आपण न जाऊन गर्दी थोडीच कमी होणार आहे असाही विचार येऊ शकतो मनात! पण तरीही मी अगदी कळकळीची विनंती करतो की तुम्ही तिथे जाऊ नका आणि अशाप्रकारे हे कासचं नाजूक सौंदर्य आपण पुढच्या पिढीसाठी राखून ठेऊया ! तुम्ही जाऊ नये म्हणून तर तुम्हांला ही सफर घडवली !
(आम्हीही २०१३ सालानंतर परत गेलेलो नाही !)
(आम्हीही २०१३ सालानंतर परत गेलेलो नाही !)
(फोटोग्राफर- वृंदा पुसाळकर, स्मृती पुसाळकर )
व फुलांच्या नावासाठी संदर्भ - Flowers of Kas हे श्रीकांत इंगळहळ्ळीकर लिखित पुस्तक)
Wednesday, 11 September 2013
स्मरण विनोबा भावे यांचे
'भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती
भूक नसतानाही खाणे म्हणजे विकृती आणि
भुकेल्यांना खायला घालणे ही संस्कृती !'
या वाक्यामुळे पहिल्यांदा मला विनोबा भावे कळले. ते नक्कीच हाडाचे शिक्षक असावेत असे वाटले कारण इतक्या नेमक्या शब्दात आणि सहज सोप्या शैलीत त्यांनी किती छान विचार मांडले आहेत !
या नंतर माझ्या वाचनात 'गीता प्रवचने' हे त्यांचे पुस्तक आले.
भगवद गीतेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की ती महर्षी व्यासांनी सांगितली आणि गणपतीने लिहून घेतली. आधुनिक काळात हेच उदाहरण वापरायचे झाले तर हीच गीता धुळ्याच्या तुरुंगात विनोबा भाव्यांनी सांगितली आणि साने गुरुजींनी ती लिहून काढली ! २१ फेब्रुवारी १९३२ ते १९ जून १९३२ या ४ महिन्यांच्या काळात अतिशय रसाळ, ओघवत्या भाषेत गीतेचे सार वेगवेगळे दृष्टांत देऊन विनोबा भावे यांनी मांडले आहे. अन्यथा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भगवद गीता म्हणजे काय हे कधीच कळले नसते.(अजूनही ती किती कळली आहे माहित नाही !) सर्वसामान्य माणसांना समजेल अशी भाषा, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या प्रसंगातून, उदाहरणांमधून गीतेतील संकल्पना स्पष्ट होत जातील अशी शैली! वाचकाशी संवाद साधत मांडलेला विचार यामुळे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते.
नंतर 'ज्ञान ते सांगतो पुन्हा' हे विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांवर आधारित पुस्तक वाचले. पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.
अहिंसा, सर्वोदय, लोकशाही, शिक्षण इ. विविध विषयांवर विनोबा अतिशय सुस्पष्टपणे लिहितात.हे सर्व विचार मांडताना कुठेही क्लिष्टता दिसून येत नाही. उलट कमीत कमी शब्दात, उदाहरणांसह त्या त्या विषयावरील आपली मते ते मांडतात. उदा- 'हिंदू' या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात- हिंदू शब्दाच्या निरुक्ती मधून हिंदूची व्याख्या करता येऊ शकेल. पुढे जाऊन ते निरुक्तीचाही अर्थ सांगतात. निरुक्ती आध्यात्मिक असते. चिंतनाच्या सुलभतेसाठी शब्दावर आधारित ती एक उपकारक कल्पना असते. यातून ते हिंदू या शब्दाची निरुक्ती करतात- हिंसेने ज्याचे चित्त दुभंगते, दु:खी होते त्याला हिंदू म्हणतात. या व्याख्येत हिंदूंच्या सहिष्णुतेचा आणि हिंदूंच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा व्यापक अर्थ सामावलेला आहे.तसंच त्यांनी मोक्ष या शब्दाचीही निरुक्ती सांगितली आहे तीही अतिशय सुंदर आहे- मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष ! ते म्हणतात की हिंदू धर्म हा मुळातच मानवधर्म आहे. म्हणून त्याचा कोणताही एक धर्मग्रंथ नाही, कोणी संस्थापक नाही किंवा कोणताही पंथ नाही.
विनोबा भावे यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान विषयक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर चिंतन केलं आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यातल्या अनेक व्यावहारिक समस्या/प्रश्नांवर आचरणात आणता येतील असे तोडगे सांगितले आहेत. महात्मा गांधी यांच्या सर्वोदय, स्वदेशी, ग्रामस्वराज्य अहिंसा, या सारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा त्यांनी विस्तारच केला आहे.
विनोबा यांचे विचार कालसुसंगत आहेत. सध्याच्या काळातही ते लागू होतात. याचं या पुस्तकातलं एक उदाहरण देता येईल. ते म्हणतात - 'समाज आज त्रिदोषांनी पीडित आहे. माणसाचे स्वास्थ्य जर सुधारायचे असेल तर ह्या त्रिदोषांचे निवारण करावे लागेल. अन्यथा स्वस्थ माणसांचा स्वस्थ समाज निर्माण होऊ शकणार नाही. हे त्रिदोष कोणते? पहिला- पोषणाचा अभाव, दुसरा स्वैराचार/असंयम आणि तिसरा हवा-पाण्याचे प्रदूषण !'
विनोबा यांचे विचार कालसुसंगत आहेत. सध्याच्या काळातही ते लागू होतात. याचं या पुस्तकातलं एक उदाहरण देता येईल. ते म्हणतात - 'समाज आज त्रिदोषांनी पीडित आहे. माणसाचे स्वास्थ्य जर सुधारायचे असेल तर ह्या त्रिदोषांचे निवारण करावे लागेल. अन्यथा स्वस्थ माणसांचा स्वस्थ समाज निर्माण होऊ शकणार नाही. हे त्रिदोष कोणते? पहिला- पोषणाचा अभाव, दुसरा स्वैराचार/असंयम आणि तिसरा हवा-पाण्याचे प्रदूषण !'
विनोबांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचं एकाच शब्दात सार काढायचं झालं तर मला वाटतं तो शब्द करुणा असेल- अपार करुणा ! पण ही करुणा भाबडी नाही, तिच्या मागे एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि केवळ मानव समूहाचंच नव्हे तर अवघ्या सृष्टीच्या व्यापक हिताचा विचार त्यात सामावलेला आहे.
आम्ही लहान मुलांच्या होमिओपथिक उपचारांसाठी वावोशी या पेण रस्त्यावरील गावांत नियमितपणे जात असतो. वावोशीतल्या आनंदवर्धिनी ट्रस्टच्या टिळक परिवाराकडून विनोबा भावे यांच्या गागोदे या जन्मगावाविषयी ऐकले होते. गागोदे हे वावोशीच्या पुढे काही किलोमीटरवर आहे. आम्ही एकदा तिथे जाऊन आलो. एक अतिशय साधे खेडेगाव ! इथे जन्मलेली व्यक्ती राष्ट्रसंत झाली पण त्याचे फारसे काही अप्रूप गावात असावे असे वाटले नाही.विनोबा भावे यांच्या घरात त्यांच्या वापरातील वस्तूंचे एक छोटेखानी संग्रहालय करण्यात आले आहे. घरालगतच्या दुसऱ्या बैठ्या घरात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचे फोटो मांडण्यात आले आहेत. पण ते घर आणि बैठं संग्रहालय म्हणजे अगदी जीर्णावस्थेतील इमारती होत्या. त्याची कोणी खूप काही निगा राखत असेल असं वाटलं नाही. आमच्याबरोबर एक सर्वोदयी कार्यकर्ता होता. तो इमाने इतबारे सर्वोदय वाचनालय आजिवली या खेड्यात चालवतो. त्याच्या या उपक्रमाला इथल्या पंचक्रोशीत कितपत प्रतिसाद असेल असा प्रश्न आम्हांला पडला. पण तो काही नाउमेद झालाय असं वाटलं नाही. विनोबा भाव्यांचं कार्य अशा खेड्यांत पुढे नेणारा तो कदाचित शेवटच्या शिलेदारांपैकी एक असावा असं वाटलं.
मला विनोबा यांच्या 'भूदान' या चळवळीबद्दल नेहमीच आश्चर्य वाटतं. सध्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडलेल्या आणि स्वतःच्या सोडून इतरांच्या जागेतही अतिक्रमण करण्याच्या काळांत तर हे अगदी ठळकपणे जाणवतं- त्या काळी लोकांनी आपल्या जमिनी दान कशा केल्या असतील? या मागे नेमकं काय आणि कसं घडलं असेल ? १९५१ ते पुढची तेरा वर्षे भूदान चळवळीतून सुमारे साडे सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूदान म्हणून मिळाली . यासाठी विनोबा गावोगावी जाउन लोकांशी कशा प्रकारे संवाद साधत होते? या चळवळीने काय साधलं? आणि आता या चळवळीकडे वस्तुनिष्ठपणे कसं बघायचं? याचं काही documentation कुठे उपलब्ध आहे का ? असल्यास ते मला वाचायला नक्की आवडेल. (ता.क.-मला अलिकडेच कळलं आहे की साधना प्रकाशन ने या भूदान चळवळीचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे - अवघी भूमी जगदीशाची. लेखक आहेत पराग चोळकर. पुस्तक अजून वाचलं नाही पण वाचायची खूपच इच्छा आहे.)
मला विनोबा यांच्या 'भूदान' या चळवळीबद्दल नेहमीच आश्चर्य वाटतं. सध्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडलेल्या आणि स्वतःच्या सोडून इतरांच्या जागेतही अतिक्रमण करण्याच्या काळांत तर हे अगदी ठळकपणे जाणवतं- त्या काळी लोकांनी आपल्या जमिनी दान कशा केल्या असतील? या मागे नेमकं काय आणि कसं घडलं असेल ? १९५१ ते पुढची तेरा वर्षे भूदान चळवळीतून सुमारे साडे सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूदान म्हणून मिळाली . यासाठी विनोबा गावोगावी जाउन लोकांशी कशा प्रकारे संवाद साधत होते? या चळवळीने काय साधलं? आणि आता या चळवळीकडे वस्तुनिष्ठपणे कसं बघायचं? याचं काही documentation कुठे उपलब्ध आहे का ? असल्यास ते मला वाचायला नक्की आवडेल. (ता.क.-मला अलिकडेच कळलं आहे की साधना प्रकाशन ने या भूदान चळवळीचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे - अवघी भूमी जगदीशाची. लेखक आहेत पराग चोळकर. पुस्तक अजून वाचलं नाही पण वाचायची खूपच इच्छा आहे.)
राष्ट्रसंत म्हणून नावाजलेले मात्र तरीही आणीबाणीचे समर्थन केल्यामुळे उगीचच बदनाम झालेले, भूदान चळवळीचे प्रवर्तक, आद्य सत्याग्रही अशी विनोबा भाव्यांची अन्य काही वैशिष्ट्ये ! आज ११ सप्टेंबर ह्या त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण !
विनोबा भावे यांच्या विषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या नावाने चालवल्या जात असलेल्या काही संकेतस्थळांना अवश्य भेट द्या . इथे त्यांचे समग्र साहित्य/विचारही वाचायला मिळतील. संकेतस्थळांची लिंक येथे देत आहे-