Wednesday, 12 August 2020

आठवण आईची !



मागच्या आठवड्यात सकाळीच सोनचाफ्याचा मंद सुवास घरातच आला. त्या वासाचा माग काढत गेलो तर आमच्या समोरच्या बिल्डिंगच्या मागे एक मोठं झाड दिसलं. तिथून आमच्या घरापर्यंत वास येत होता. आम्ही पण आमच्या बिल्डिंगच्या मागे सोनचाफ्याचं एक झाड लावलंय. त्याला मात्र फुलं आलेली दिसली नाहीत. 

आमच्या या चाफ्याच्या झाडाचा किस्सा सांगण्यासारखा आहे. साधारण १२-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या आणि समोरच्या बिल्डिंगच्या मागे मधोमध महापालिकेने ठेवलेली एक मोठी कचराकुंडी होती. आठवड्यातून एकदा कधीतरी महापालिकेचा ट्रक येऊन त्या कुंडीतला कचरा घेऊन जाई. तोपर्यंत कचऱ्याने ती कुंडी ओसंडून वाहत असे. भरीतभर त्यात भटके कुत्रे येऊन कचरा उचकटून टाकत. लोकसुद्धा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. त्या कचऱ्याचा एरवीही आणि विशेषतः पावसाळ्यात घाण वास येई. आम्ही तळ मजल्यात राहत असल्यामुळे या सगळ्याचा त्रास आम्हांलाच जास्त होई. आम्ही याबद्दल सोसायटीत तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 

यावर एक उपाय म्हणून आमच्या आईने सुचवलं की या कचराकुंडीजवळ आपण एक चाफ्याचं झाड लावू. पुढेमागे फुलं आली कि निदान त्या कचऱ्याची दुर्गंधी तरी कमी होईल. खरं तर सुरवातीला आईच्या या कल्पनेला आम्ही फारसं गांभीर्यानं घेतलंच नाही. पण मग तिनेच जवळच्या नर्सरीमधून चाफ्याचं रोप आणून आमच्या सोसायटीच्या माळ्याकरवी  ते रोप आमच्या घरामागे लावलं. ते तिथे रुजलं. हळूहळू मोठं होऊ लागलं. साधारण पुरुषभर उंचीचं झाल्यानंतर त्याची वाढ खुंटल्यासारखी झाली. मग आईनेच पुन्हा सोसायटीच्या माळ्याला बोलवून झाडाच्या फांद्या कापल्या. नंतर झाड वाढलं पण त्याला फुलं काही आली नाहीत. 

कालांतराने महापालिकेने कचरा विल्हेवाटाची वेगळी पद्धत काढल्यामुळे  आमच्यामागची कचराकुंडी हटली. ज्या कारणासाठी चाफ्याचं झाड लावलं होतं ते कारण हटलं तरी ते झाड रेलेव्हंट राहिलं. मागची कचराकुंडी गेल्यानंतर उपलब्ध झालेली मोकळी जागा गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरली जाऊ लागली. गाड्या वळवताना हे चाफ्याचं झाड मध्ये येतं या सबबीखाली सोसायटी ते तोडते की काय असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं झालं नाही. नंतर 'आले सोसायटीच्या मना' म्हणून आमच्या मागच्या मोकळ्या जागेत शहाबादी फरश्या बसवण्यात आल्या. त्याही अशा 'एन्ड टू एन्ड' की झाडाभोवती थोडीसुद्धा माती ठेवली गेली नाही. पावसाचं पाणी मातीत झिरपण्याची सोयही ठेवली गेली नाही. 

पण एखाद्याची जगण्याची उर्मी, तग धरण्याची चिकाटी खूप तीव्र असते तशी या झाडाची असावी. या सर्व प्रतिकूलतेवर मात करत एके दिवशी हे झाड फुलांनी बहरलं. ती फुलं बघताना आईला झालेला आनंद, तिचा हसरा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. 

चाफ्याच्या फुलांचा दिखावा/बडेजाव नसतो. बऱ्याचदा त्यांचा तुम्हांला आधी वास येतो आणि मग तुम्हांला ती हिरव्या पानांच्या आड लपलेली सापडतात. कित्येकदा झाडावर फळं दिसल्यावर मग लक्षात येतं की झाडाला फुलं आली होती ! सोनचाफ्याचा फुलांचा रंग सुंदर असला तरी बहाव्यासारखा तुमचं लांबूनही लक्ष वेधून घेणारा पिवळा धमक नसतो. या चाफ्याच्या फुलांच्या वासांवर आधारित मी एक 'कविता' केली होती. कविता कसली ! नुसतं ट ला ट जोडणं ते ! पण आईला त्याचं केवढं कौतुक! मला त्या कवितेच्या प्रिंट आऊट घ्यायला सांगितल्या आणि आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना ती कौतुकाने कविता वाचून दाखवत असे ! 

आजच आईला जाऊन दोन महिने झाले. आणि आज सकाळी आमचं चाफ्याचं झाड फुलांनी बहरलेलं दिसलं. त्या फुलांमध्ये आज एक वेगळीच शांतता, कृतकृत्यता  मला दिसून आली !

17 comments:

  1. खूप छान लिहिलं आहे. ही आठवण माहीत नव्हती. फूल सहजा दिसत नाही आणि खूप वर येतात. मला कित्तेक दिवस लक्षात पण आले नव्हते की तुमच्या मागे ५ सोनचाफ्या ची झाडे आहेत म्हणून.मला पण सोनचाफा खूप आवडतो म्हणून मी झाड लावले आहे. ७-८ फुले आली. नंतर काही आली नाही.

    ReplyDelete
  2. वाचून छान वाटल. पुष्पा आत्यांचा चेहेरा डोळ्यासमोर आला.

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहेस!! कचऱ्याच्या दुर्गांधावर चांगला उपाय शोधला पुष्पा आत्यानी!

    ReplyDelete
  4. Khup sundar lihile aahes. Tu kelelya varnane aai cha hasara chehara dolyansamor aala.

    ReplyDelete
  5. खूपच छान लिहिलंयस

    ReplyDelete
  6. Beautifully written! The description is so vivid that I could picture the whole scene including Tai Atya's face when she saw the flowers... Am looking forward to your next piece.

    ReplyDelete
  7. Very nicely written Rajesh. We could visualise the story & the emotions that you all must be having for that tree & the Chafa flowers. Aamchi Taiatya ashich Chafyachya fulansarkhi hoti. Shant, nirmal aani sarvatra alhad dayak sugandh pasaravnari.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  9. तुमचे लिखाण उत्कृष्ठ आहे.
    सहजसुंदरता आहे.
    काश्मीर वरील लेख ही आवडले.
    तुमच्या आईंना भावसुमनांजली.
    असेच लिहीत राहा.

    अनिल शहापूरकर

    ReplyDelete
  10. ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल मनापासून आभार!

    ReplyDelete
  11. वाह खूपच छान लिहिलय . काकूच्या चेहरा नजरे समोर आला. त्यांना सगळ्यांचच कौतुक होत. त्यांचा सहवास ही चाफ्या फुलासारखा सुगंधित होता..

    ReplyDelete
  12. अप्रतिम लिहील आहेस राजेश! पुष्पाताई आल्या प्रसंगातून कसलीही कुरकुर न करता कसा मार्ग काढीत त्याच हे बोलक उदाहरण आहे. सकारात्मकता त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या स्मृतीला माझा नमस्कार.

    ReplyDelete