१
हे पट्टेरी तरस(Striped Hyena. Scientific name- Hyaena hyaena) आहे. लौकिक अर्थाने ना याचं रूप आकर्षक आहे ना रंग! पण निसर्ग साखळीत याचं महत्त्वाचं स्थान आहे. एक तर हा scavenger प्राणी आहे. म्हणजेच मृत प्राणी किंवा इतर प्राण्यांनी मारून अर्धवट खाल्लेले प्राणी हा खातो आणि निसर्गात एक प्रकारे सफाईचं काम करतो. शिवाय हा शिकारही करतो. विशेषतः गवताळ प्रदेशातील चिंकारा वगैरे प्राण्यांची शिकार करून हा त्या प्राण्यांची संख्या आटोक्यात ठेवतो. गवताळ प्रदेशात तर याचं स्थान खूपच वरचं आहे. इथे याचे स्पर्धक मुख्यतः लांडगे हेच आहेत. उत्तर आफ्रिका, पूर्व आफ्रिका, मध्य-पूर्व आशिया,मध्य आशिया, दक्षिण रशिया,जॉर्जिया, अझरबैजान आणि भारतीय उपखंड इतक्या विस्तीर्ण प्रदेशात तो आढळतो. जरी हा अतिशय चिवट, निशाचर प्राणी असला तरी आता यांची संख्या हळूहळू कमी होत आहे आणि IUCN (International Union for Conservation of Nature) ने याचे वर्गीकरण जवळपास धोक्यात (Near Threatened) असं केलं आहे.नैसर्गिक अधिवास कमी होणे आणि त्यामुळे भक्ष्यांची संख्या कमी होणे ही तरसांची संख्या कमी होण्यामागची मुख्य कारणं आहेत.
तरसाचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा उंच असतात. त्यामुळे त्याच्या शरीराचा आकार देखील थोडा विचित्र दिसतो. डोकं मोठं, चेहरा छोटा आणि उंच आणि टोकदार कान, आखूड शेपूट असं याचं रूप ! नर मादीपेक्षा आकार आणि वजनाने मोठा असतो. रंग असा की गवताळ प्रदेशात पूर्णपणे मिसळून जाणारा. याची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. त्यामानाने नजर आणि श्रवणशक्ती कमकुवत असते.जंगलं तसंच डोंगराळ प्रदेशातील कुरणांमध्ये याचा वावर असतो आणि तिथल्या गुहांमध्ये हा राहतो. नर आणि मादी दोघेही मिळून आपल्या पिल्लांचं संगोपन करतात.
आम्हांला याच पट्टेरी तरसाची आणि त्याच्या कुटुंबाची वर वर्णन केलेली विविध रूपं अगदी जवळून आणि अतिशय निवांतपणे बघायला मिळाली. सुमारे तासभर त्याने आम्हांला दर्शन दिलं, त्याचाच हा फोटो रूपी ब्लॉग!
२
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी भिगवणजवळील कडबनवाडी इथे माझा मित्र आणि उत्कृष्ट फोटोग्राफर डॉ सुश्रुत बडवे, मी आणि आमचे अनुभवी गाईड आणि सारथी उमेश सल्ले गेलो होतो. हवेत चांगलीच थंडी होती. मात्र सफारीच्या सुरवातीलाच दोन लांडगे दिसल्यामुळे आमचा उत्साह वाढला होता आणि आता पुढे आणखी काय बघायला मिळणार याची उत्कंठा वाढलेली होती. आणि अचानक एका छोट्याशा टेकडीच्या मध्यावर एका गुहेबाहेर आम्हांला हे तरसाचे कुटुंब दिसलं. आम्ही जिथे होतो त्याच्यापुढे एक छोटीशी दरी आणि पलीकडे त्यांची गुहा होती. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात सुरक्षित अंतर होतं. म्हणूनच कदाचित ते तसे निवांत होते. पण तरीही सावध होते.

कारण नाही म्हटलं तरी आमच्यासकट तिथे ७-८ गाड्या सहज होत्या. अगदी एकमेकांना खेटून! त्यापैकी काही तर ओपन जिप्सी होत्या. त्यामधून माणसं उभी राहिलेली होती. आम्ही जसे त्यांच्याकडे बघत होतो तसे त्यांच्या नजरेतून आमच्या कडे बघितलं तर किंवा आमचा आणि त्यांचा एक ड्रोन शॉट घेतला असता तर या सगळ्या गाड्यांची रांग, आमची चांगल्यात चांगला फोटो मिळवण्याच्या दृष्टीने चाललेली लगबग, आमचा थोडाफार गलका आणि जवळपास प्रत्येकाच्याच कॅमेरारूपी तोफा हेच दृश्य दिसलं असतं! पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यात आणि त्या तरस कुटुंबात व्यवस्थित अंतर असल्यामुळे आम्हांलाही चांगले फोटो मिळाले आणि त्यांनाही आमचा तसा काही त्रास झाला नाही.
आमच्याबरोबर कडबनवाडीमधला एक स्थानिक गाईड देखील होता. (वन खात्याच्या नियमाप्रमाणे तो बरोबर असणं बंधनकारक असतं.) त्याच्या म्हणण्यानुसार या कुटुंबातील पिल्लांचं प्रथमच दर्शन झालं आहे. त्यांचं वय साधारण ३-४ महिने तरी असावं. पिल्लं एवढी मोठी होऊनही ती पहिल्यांदा दिसत होती म्हणजे एका दुर्मिळ अनुभवाचे आम्ही साक्षीदार होतो. थंडीतल्या एका आळशी सकाळी एक आश्वस्त, निवांत कुटुंब बघायला मिळालं.तिथे एक फॅमिली पोर्ट्रेट नकळतच तयार झालं म्हणा ना!
या फोटोतही एक प्रकारे समतोल आपसूकच साधला गेला आहे. पिल्लू, नर, पिल्लू आणि मादी अशा क्रमाने जणू अगदी ते ठरवून बसल्यासारखे बसले होते.
नर एका पिल्लाला चाटत होता.. या स्पर्शातून एकमेकांमधील बॉण्डिंग दिसून येत होतं.
या फोटोत त्यांची गुहा स्पष्ट दिसत आहे.
आई मुलाला 'स्वच्छतेचे धडे' (त्याच्या मनाविरुद्ध?) देत आहे.
काही वेळानंतर एक पिल्लू आपल्या पालकांपासून थोडं लांब सकाळच्या कोवळ्या उन्हात जाऊन बसलं. आपलं अंग खाजवत बसलं.
नंतर या पिल्लाजवळ नर आला. आणि त्यांच्यात कुठलंसं 'नॉन व्हर्बल कम्युनिकेशन' झालं. नराने या पिल्लाला 'स्वच्छतेचे धडे' दिले !आणि त्या पिल्लानेही ते एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे ऐकून घेतले!
यानंतर जे घडलं तो माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. एक humbling experience असं म्हटलं तरी चालेल.
३
नंतर ते पिल्लू थोडं आणखी लांब गेलं आणि गवतात लपवून ठेवलेल्या शिकारीकडे गेलं. शिकार बहुदा ताजीच होती. तरसाचं पिल्लू मग ती शिकार तोंडांत घेऊन उचकटू लागलं.
त्याच्यासाठी हा सगळा भविष्य काळात स्वतंत्रपणे शिकार करून ती राखणे, इतर प्राण्यांपासून सुरक्षितपणे लपवून ठेवणे आणि ती कशी खाणे याचं ते प्रशिक्षणच असावं ! कदाचित शिकार कशी करायची याचंही प्रशिक्षण काल दिलं गेलं असेल. तरसाचं वैशिष्ट्य म्हणजे ते हाडं तोडून खाण्यात पटाईत आहे. त्याचं डेमो या पिल्लाने आम्हांला दिलं.
आम्ही लांब असल्याने कोणत्या प्राण्याची शिकार आहे हे लगेच लक्षात आलं नाही .पण नंतर लक्षात आलं की ते एक चिंकाऱ्याचं पाडस होतं! एक पिल्लू जगावं यासाठी दुसऱ्या पिल्लाचा बळी गेला!
अर्थात इथे मानवी भावभावनांची फूटपट्टी लावण्यात काही अर्थ नाही. हा निसर्ग आहे आणि इथे Survival of the fittest! हा नियम आहे. 'जीवो जीवस्य जीवनम्!' हा इथला स्थायीभाव आहे. हे सगळं माहित असलं तरी याकडे एका वस्तुनिष्ठ निरीक्षकाच्या भूमिकेतून बघणं सुरूवातीला थोडं जडच गेलं. त्या कोवळ्या चिंकाऱ्याचं निष्प्राण लटकणारं डोकं डोळ्यापुढे नंतरही येतच राहिलं.
अर्थात नामशेष होण्याचा धोका असणाऱ्या तरस या प्राण्याचं एक स्वस्थ आणि सुरक्षित कुटुंब बघण्याचा आनंदही यात होताच. अशा संमिश्र भावना मनात येत असताना मी समोरचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाच्या उदरात या अशा असंख्य कहाण्या दररोज लिहिल्या जातात आणि पुसल्याही जातात याचीही जाणीव यानिमित्ताने झाली!