Tuesday, 8 September 2026

आमची इंग्लंडवारी :भाग १० : केंब्रिज !

१ 


मागच्या ब्लॉगमध्ये मी इंग्लंडमध्ये इतिहासाकडे बघायचा दृष्टिकोन याविषयी लिहिलं होतं तेव्हा त्यात असं म्हटलं होतं की इंग्रज भावनेपेक्षा बुद्धीला महत्त्व देतात. या स्वभावगुणाचं एक कारण म्हणजे इंग्रजांनी शिक्षण आणि संशोधनाला दिलेलं प्राधान्य हे असावं . इंग्लंडमध्ये म्हणूनच ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या दोन प्रतिष्ठित आणि जगविख्यात विद्यापीठं आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्थापना १०९६ साली झाली तर केंब्रिज १२०९ साली स्थापित झालं. जगातील कोणत्याही विद्यापीठाचा दर्जा ठरवताना त्याची तुलना ऑक्सफर्ड वा केंब्रिजशी केली जाते इतकी या विद्यापीठांची उच्च गुणवत्ता आहे आणि यांचा रास्त दबदबा आहे. एवढी जुनी विद्यापीठं असल्याने त्यांचा शतकानुशतकांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. जगभरात झालेल्या आणि होत असलेल्या प्रामुख्याने शास्त्रीय, आर्थिक आणि साहित्यिक क्षेत्रांतील प्रगतीमध्ये या विद्यापीठांचा महत्त्वाचा वाटा आहे असं निश्चितच म्हणता येईल. इंग्लंडची एक महत्त्वपूर्ण ओळख असलेल्या या विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाला तरी  भेट देणं आमच्या या इंग्लंड भेटीत आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे आमची एक दिवसाची केंब्रिज ट्रिप झाली. लंडनला राहून आम्ही केंब्रिज ला गेलो. लंडनच्या उत्तरेला सुमारे ९० किमी अंतरावर केंब्रिज आहे. आम्ही गेलो त्यादिवशी गाड्यांचा काहीतरी गोंधळ झाला होता याचा मी मागे उल्लेख केला आहेच. त्यामुळे आमचं फारसं काही नुकसान झालं नाही. फक्त एवढंच झालं की आम्हांला किंग्ज क्रॉस( या स्टेशनचे प्लॅटफॉर्म बघून आपल्या मुंबईच्या CSMT स्टेशनची खूप आठवण झाली) ला गाडी मिळाली नाही . त्याऐवजी त्याला लागूनच असलेल्या सेंट पँनक्रास या स्टेशन वरून गाडी घ्यावी लागली. तसंच आमची गाडी stopping, नव्हे..., calling at all stations होती. त्यामुळे आम्हांला तिथे पोचायला १०-१५ मिनिटं उशीर झाला इतकंच! पण प्रवासात तिथले स्थानिक लोक मात्र या दिरंगाईला (त्यांच्या सभ्य चौकटीत बसेल इतक्याच आणि मोजक्याच शब्दांत) नावं ठेवत होते !

२ 

केंब्रिज रेल्वे स्टेशन पासून थोडं अंतर बसने आणि नंतर पायी असा प्रवास करत पंटिंग(Punting) जिथे करतात तिथे पोचायचं होतं. एका ठराविक ठिकाणानंतर वाहनांना मर्यादित प्रवेश आहे त्यामुळे आपल्याला पुढे चालत जावं लागतं. वाटेत अशा सुंदर इमारती लागल्या-

यात डावीकडे केंब्रिज सिनेटची इमारत आहे तर उजवीकडे दिसतंय ते Gonville and Caius College आहे. याच कॉलेजचा थोडासा जवळून काढलेला फोटो-
 
या कॉलेजची स्थापना १३४८ साली असून ते केंब्रिज मधील सर्वात जुन्या कॉलेजांमधलं चौथं आहे. 

नंतर दिसलं ते किंग्ज कॉलेज चॅपल -

आणि किंग्ज कॉलेजचं हे मोहक प्रवेशद्वार -
१४४१ साली सहाव्या हेन्रीने या कॉलेजची स्थापना केली. इथे शिकलेल्या सुप्रसिद्ध लोकांमधील काहींची नावं - John Maynard Keynes (अर्थतज्ज्ञ), Alan Turing( गणितज्ज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ), सलमान रश्दी (लेखक), रॉबर्ट वॉलपोल (इंग्लंडचे पहिले पंतप्रधान) इ. 
अरुंद छोट्या गल्ल्यांमधून चालून आम्ही पंटिंगच्या ठिकाणी पोचलो. मात्र तिथे नावाडी यायला वेळ होता. म्हणून तिथल्या माणसाने आम्हांला सांगितलं की तेवढ्या वेळात तुम्ही Wren Library बघून या. आणि आम्ही एका अद्भुत दुनियेची सफर,  थोडा वेळ का असेना, पण करून आलो. 


३ 

Wren Library ही ट्रिनिटी कॉलेजची लायब्ररी आहे. 
 

 
या फोटोत लायब्ररीची मागची बाजू दिसत आहे. (आपल्याला पुढच्या बाजूने जायला परवानगी नाही.) 

या लायब्ररीची स्थापना १६९५ साली झाली . हिची रचना सर क्रिस्तोफर व्रेन यांनी केली होती म्हणून लायब्ररीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. व्रेन हे वास्तुविशारद, खगोलशास्त्रज्ञ, गणिती आणि भौतिकशास्त्रज्ञ असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व! सेंट पॉल कॅथेड्रल, माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये उल्लेख असलेली रॉयल ऑबझर्व्हेटरी यासारख्या इमारतींची रचना त्यांचीच! गंमत म्हणजे स्वतः व्रेन शिकले मात्र ऑक्सफर्डला ! 
या लायब्ररीचे काही फोटो- 

 

 

या लायब्ररीत अतिशय मौल्यवान वस्तूंचं जतन करण्यात आलं आहे. यात-
 
 
सर आयझॅक न्यूटन यांची चालण्याची लाकडी काठी, त्यांनी वापरलेला लोलक, त्यांच्या 'Principia Mathematica' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं पुस्तक(१६८७), एवढंच नाही तर त्यांच्या केसाची एक बट देखील ठेवण्यात आली आहे. 
उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेल्या 'On the origin of the species'(१८५९) या पुस्तकाची प्रत इथे आहे. 

 

कवी, लेखक आणि नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी म्हणजेच १६२३ साली त्यांच्या ३६ नाटकांचा एकत्रित संग्रह (याला The First Folio असं म्हणतात ) प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथही इथे आहे. 
 
 

आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे या दिग्गजांच्या मांदियाळीत आपल्या एका भारतीय माणसाच्या वस्तू देखील आहेत. ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध गणिती श्रीनिवास रामानुजन! त्यांच्या हस्ताक्षरातील नोट्स इथे बघून अभिमानाने उर भरून आला.- 
 
 

४

अशा भारलेल्या मन:स्थितीत आम्ही पंटिंग ला गेलो. पंटिंग हा एक बोटिंगचाच प्रकार आहे. यातील नाव चपटी आणि लांबीला जास्त आणि रुंदीला कमी अशी असते. या नावेला Punt असं म्हणतात आणि त्यातून केलेल्या प्रवासाला Punting ! केंब्रिज मधून वाहणाऱ्या कॅम नदीत हे केलं जातं. साधारण १५ फुटी उंच लाकडी बांबू वापरून नावाडी नाव हाकतो. केंब्रिजला जाऊन पंटिंग करणं हा एक अतिशय लोकप्रिय आणि भन्नाट प्रकार आहे. आपला नावाडी हाच आपला गाईड असतो आणि तो आपल्याला नावेतून जात असताना केंब्रिजचा वैभवशाली इतिहास आणि वेगवेगळ्या कॉलेजांची माहिती पुरवत असतो. हा आमचा नावाडी -जॉन !
 
साधारण पन्नाशीच्या पुढचा असावा. वाटेत लागणाऱ्या अनेक इमारतींची अतिशय उत्साहाने आणि रंजक पद्धतीने माहिती देत होता. शिवाय आमच्या सततच्या प्रश्नांना उत्तरंही !
 
ही सुंदर इमारत आहे सेंट जॉन्स कॉलेजची. याची स्थापना १५११ साली झाली. ट्रिनिटी कॉलेजनंतर केंब्रिज मधील सर्वात श्रीमंत कॉलेज आहे. इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल १२ नोबेल पारितोषिकं मिळवली आहेत. शिवाय या कॉलेजमधून शिकलेल्या नामांकित विद्यार्थ्यांमध्ये कवी विल्यम वर्डस्वर्थ देखील आहे. ( The Lake District मध्ये 'भेटलेल्या' वर्डस्वर्थचं  पुन्हा एकदा स्मरण झालं! शिवाय इथेच आपले भूतपूर्व पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह देखील शिकले होते. 
ट्रिनिटी कॉलेज बद्दल बोलताना जॉन म्हणाला की भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इथे शिकले. तसंच श्रीनिवास रामानुजन आणि अमर्त्य सेन देखील! इथल्या विद्यार्थ्यांना तब्बल ३४ नोबेल पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या दोन विद्यापीठांमधील स्पर्धांबाबत तो म्हणाला की ऑक्सफर्ड जुनं आहे हे मान्य आहे. पण नोबेल पारितोषिकं जिंकण्यात केंब्रिज ऑक्सफर्डपेक्षा खूपच  पुढे आहे.  
नावेतून जात असताना किनाऱ्यावर अशी मोठाली झाडं दिसली-


 
हीच ती Willow ची झाडं (यांचा पुढे उल्लेख होईलच!) 

वाटेत वेगवेगळे पूलही लागत होते-
 
हा १७६५ साली बांधलेला ट्रिनिटी कॉलेज पूल !

तर हा क्वीन्स कॉलेजच्या दोन्ही बाजूंना जोडणारा मॅथेमॅटिकल पूल! १७४९ साली हा बांधण्यात आला. याचं वैशिष्ट्य म्हणजे तो दिसतो कमानीसारखा पण तो सरळ लाकडी पट्ट्यांचा वापर करून बांधला आहे. त्या काळाच्या दृष्टीने प्रगत अशा अभियांत्रिकी संकल्पनेचा वापर करून हा पूल बांधल्याने त्याचं मॅथेमॅटिकल पूल असं नाव झालं असावं.  
 

दुसऱ्या महायुद्धात केंब्रिजला फारशी झळ बसली नव्हती. याचं कारण देताना जॉन म्हणाला की जर्मनी आणि इंग्लंडमध्ये एक अलिखित वा गुप्त करार झाला होता ज्यामध्ये जर्मनी केंब्रिज वर बॉम्ब टाकणार नाही आणि त्या बदल्यात इंग्लंड जर्मनीमधल्या हायडलबर्ग विद्यापीठावर बॉम्ब टाकणार नाही असं ठरवण्यात आलं. (याची सत्यता पडताळता येत नाही हे नंतर शोध घेता समजलं)
 
हा व्हिक्टोरिया राणीचा  आवडता पूल -Bridge of Sighs. हा सेंट जॉन्स ला जोडणारा पूल आहे. 

इतका उद्बोधक प्रवास संपूच नये असं वाटत होतं. पण साधारण पाऊण तासात आम्ही परतलो. जॉनला भारतात यायची इच्छा होती. त्याला विशेषतः काश्मीरला जायचं होतं. तिथे जाणं सुरक्षित आहे का असं त्यानं आम्हांला विचारलं. आम्ही सांगितलं की आम्ही काश्मीरला जाऊन आलो आहोत आणि तिथे जायला काही हरकत नाही. त्यावरून तो आश्वस्त झाला असावा. आम्हांला बाहेर पडताना तो हिंदीत म्हणाला- फिर मिलेंगे !


५
 
केंब्रिज मधील आणखी दोन आकर्षणं म्हणजे -
 
हे Time eater Clock. २००८ साली याचं शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी उदघाटन केलं होतं.टेलर लायब्ररीच्या बाहेर हे घड्याळ आहे.  एक मोठ्या आकाराचा यांत्रिक टोळ या घडाळ्यावर बसवण्यात आला आहे. हा जसा काळ पुढे सरकतो तसा जबडा उघडतो आणि बंद करतो-म्हणजेच वेळ हे त्याचं आवडीचं खाद्य आहे! 
तर दुसरं आकर्षण आहे- 
 
ट्रिनिटी कॉलेजमध्ये न्यूटन शिकत असताना(१६६१) जिथे राहायचा त्या खोलीबाहेर लावण्यात आलेलं हे सफरचंदाचं झाड!त्याने ज्या झाडाचं सफरचंद पडताना बघून गुरुत्त्वाकर्षणाचा शोध लावला त्याचंच हे झाड भाऊबंद आहे.

केंब्रिजमध्ये सगळीकडे पर्यटकांची गर्दी होती. काही शाळा कॉलेजचीही तिथे ट्रीपही आली होती. एकूणच तरुणांचा उत्साह आणि जल्लोष असणारं प्रफुल्लित वातावरण होतं. आमच्या या ट्रीपची सांगता आम्ही केंब्रिज मधल्याच Dishoom या भारतीय हॉटेलमध्ये जेवून केली. 

६ 
पु ल देशपांडे यांनी 'अपूर्वाई' पुस्तकात केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विषयी खूप छान लिहिलं आहे. त्यापैकी दोन उतारे मी केंब्रिज मध्ये वाचले. एकात willow trees चा उल्लेख आहे. हे दोन उतारे देऊन या ब्लॉगची सांगता करत आहे. 


                                                                                                                                                          (क्रमश:)


 




3 comments:

Mugdha said...

छान वर्णन नेहेमी प्रमाणे! केंब्रिज मध्ये जाऊन आल्याचा अनुभव इतरांनाही येईल नक्कीच!
पु. ल. देशपांड्यांच्या अपूर्वाई मधील उतारे वाचन ही कल्पना खूपच छान! त्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे आपली iterinery आणि कोणते उतारे वाचायचे हा अभ्यास पण जबरदस्त!!

Unknown said...

हा मात्र फारच माहितीप्रद लेख वाटला. मस्त.
शिवाय काही भारतीय या विद्यापीठाचे स्नातक होते हेही आनंददायी होतं. पं. नेहरू, रामानुजन, मनमोहन सिंग इत्यादी...
न्युटनची काठी वगैरे वाचून आश्चर्य वाटले. आपण जतन करण्यात फार "ढ" आहोत किंवा बेपर्वा आहोत हे सांगताना मला लाजही वाटते आणि वाईटही वाटतं. खरंच पिकतं तेथे विकत नाही यातलाच प्रकार आहे. तीनशेहून अधिक वर्षांपूर्वीच्या न्यूटनची काठी, शेक्सपिअरची खोली वगैरे आजही बघायला मिळते हे आश्चर्य आहे.
स्वामी विवेकानंद या जगज्जेत्या व्यक्तीमत्त्वाला संगीतात खूप गती आणि रूची होती ही माहिती त्यांचं अधिकृत चरित्र आणि काही लेख वाचताना समजलं होतं. त्यांनी त्यांचे संगीताबद्दलचे काही विचार आणि काही अशीच मौलिक मतं लिहीलेलं एक पुस्तक आता नामशेष झाल्याचं वाचून खूप चरफडलो होतो. भारतीय औदासिन्याचा बळी असं मी या घटनेचं वर्णन करतो. असो.
जर्मनी आणि इंग्लंड यांनी केंब्रिज आणि हायडलबर्ग साठी केलेलं साटंलोटं वाचून रणजित देसाई यांच्या 'स्वामी' कादंबरीतील एका ऐतिहासिक प्रसंगाचं स्मरण झालं. आणि त्याला पुष्टी देणारे पुरावे देसायांनी अभ्यासल्याचं नमूद केलं आहे. हैदर अली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी एका प्रसंगी युद्ध टाळून मैत्री करायचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या भेटीत माधवरावांच्या उमद्या वागणुकीमुळे प्रभावित होऊन हैदरने त्यांना मैत्रीची आठवण म्हणून काही मागण्याची विनंती केली. तेव्हा माधवराव म्हणाले, "एका मोहिमेवर असताना आम्ही वाट वाकडी करून अजिंठा, वेरूळ येथील लेणी बघितली आणि देहभान हरपलं. यदाकदाचित आपल्या मैत्रीत दुरावा येऊन युध्दप्रसंग झाला तर कृपा करून या स्थळाला आणि तेथील शिल्पाला धक्का लावू नये." यावर हैदरने आनंदातिशयाने माधवरावांचा हात हातात घेऊन तसे करण्याची कबुली दिली.
असो. पुढे इतिहासात काय घडले कोणी घडवले माहिती नाही पण आपण भग्न अजिंठा वेरूळ बघतो. पण माधवराव पेशव्यांच्या त्या मागणीची आठवण मला तुझ्या लेखातला केंब्रिज-हायडलबर्ग बचाव आंदोलन भाग वाचून ताजी झाली.
बाकी लेख अप्रतिम!!!

Shreepad SM Gandhi

Unknown said...

अजून एक सांगायचं राहिलं. Mathematical bridge चा फोटो बघून एकदा सचिन इनामदारने व्हॉट्सअपवर पोस्ट केलेल्या एका छोड्या व्हिडीओची आठवण झाली. मला वाटतं फक्त सहा का नऊ काड्या वापरून पूल बांधायचं तंत्र त्या व्हिडीओत दाखवलं होतं. ते इतकं आवडलं की मी चॉपस्टिक्स वापरून तसं करून बघितलन आणि ते खूप छान जमलं होतं...मी सचिनवर जाम खुश झालो होतो. 😀

Shreepad SM Gandhi