Wednesday, 10 April 2013

अरे आव्वाज कुणाचा ?



आम्ही एका तथाकथित उच्चभ्रू सोसायटीत राहतो.  बहुतांशी पहाटे किंवा सकाळच्या वेळेत आम्हांला वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाने जाग आल्याचं अनुभवायला मिळालेलं आहे.एरवी मात्र आम्हांला साथ करणारे आवाज खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे  सध्या आम्ही एखाद्या चाळीत राहात असल्यासारखं आम्हांला वाटू लागलंय … 
आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक एकत्र कुटुंब राह्ते. २ परिवारांची मिळून ४-५ लहान मुले आहेत. त्यापैकी कुठले न कुठले रडते, चिडते, ओरडते… त्या मुलांना वाढवायचे म्हणजे त्या आयांचे आवाजही खणखणीत असावे लागणार ! मुलांच्या आवाजावर आवाज चढवून दिवस/रात्र या बायका ओरडत असतात. . . काही वेळा वड्याचे ( की वड्यांचे ?) तेल वांग्यांवर निघते की काय असे वाटते. .

त्यांच्या शेजारी एक डॉक्टर राहतात. त्यांच्या फोनला बहुतेक नेटवर्क नसावे. नेहमी बाल्कनीमध्ये येउन ते बोलत असतात. विषय बऱ्याच वेळा मेडिकल नसतो. यांचं वैशिष्ट्य म्हणजे फोनवर बोलताना ज्या व्यक्तीशी 
ते बोलत असतात ती व्यक्ती समोर असल्याप्रमाणे हातवारे करून ते बोलतात. . . "अरे. . . तुला सांगतो तो डावीकडचा कप्पा उघड. . . " हे सांगताना त्यांच्या डाव्या हाताने ते स्वतः तो कप्पा उघडल्याचा आविर्भाव करतात. ." हं . . . हं तिथेच आहे ते " असं म्हणताना ते अंगुलीनिर्देश करून दाखवतात. आता आपल्या कल्पनाशक्तीला ताण . . . नेमकं काय असेल ? काही काळं -बेरं ? एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरचे बोलणे असे चोरून ऐकणे शिष्टाचाराला धरून नसल्यामुळे मी पुढचं संभाषण काही ऐकत नाही !

याच डॉक्टरांनी त्यांच्या घराचं renovation करून एक खोली वाढवून घेतली. हे अर्थातच अनधिकृत होतं ! पण ते डॉक्टरांनी केलं असल्यामुळे त्याला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं! मग एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे हे खोली वाढवण्याचे लोण आजूबाजूला सगळीकडेच पसरलं. आमच्या शेजारच्या बाईंचे माहेरचे आडनाव बहुतेक -'लकडा'वाला किंवा 'धोशा'वाला होते. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला मला अशीच खोली वाढवून हवी अशी गळ घातली. सीतेने रामाकडे नाही का-'मज आणुनी द्या हो हरीण अयोध्यानाथा' अशी प्रेमळ मागणी केली होती? आता जिथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला सीतेचे मन मोडता आले नाही तिथे आपल्यासारख्या मर्त्य माणसांचे काय ? मग काय. . . आमच्या शेजारी एक राजवाडाच उभा राहिला. आपण नेहमी चीन/ अमेरिका यांच्या विस्तारवादी धोरणांवर टीका करत असतो . पण यामागची प्रोसेस काय असते याचा कोणी विचार केला आहे का? त्याचा अभ्यास करायला तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. हेच आमचे सख्खे शेजारी. . . घरापुढच्या मोकळ्या जागेत आधी गाड्या लावायच्या. . . मग नंतर तिथे कुंड्या आणून बाउंडरी आखायची . . . झाली ती तुमचीच जागा! नंतर फक्त तिथे फरशी घालायची! बस्स ! त्यावर बंगला बांधला तरी कोण येतंय तोडायला?

आता आमच्याकडे झालं काय की समोरचे, मागचे, शेजारचे असे सगळेच flats renovate होऊ लागले . देशाच्या आर्थिक विकासात यामुळे भरच पडली ! एक राष्ट्रीय नवनिर्माणाचे युगच अवतरले ! या बरोबर आले आवाज ! तोडणे-फोडणे, नंतर कटिंग, ड्रिलिंग इ. इ. . . . असं म्हणतात की लहान मूल ३२ वेगवेगळ्या प्रकारे रडते आणि आईला ते नेमके कुठल्या कारणाने रडते ते बरोबर समजते. आमच्याकडे एवढी कामं चालू असतात की आता आम्ही अगदी सहजपणे घरबसल्या सांगू शकतो. . . आता बांधकामाची कुठली स्टेज आहे ते ! एखादा दिवस कुठलाही आवाज नसेल तर आम्हाला सुचत नाही. . अगदी शोककळा पसरते आमच्या आजूबाजूला. . .

कधी कधी तुम्हांला वाटते की दुपारी थोडा वेळ आराम करावा. . . . छान गाणी ऐकावी, पुस्तक वाचावे . . . डुलकी काढावी . . . . . तेवढ्यात- " टमाटे … कोबी … वाटाणे आले " असं म्हणत आमचा गोपाळभैय्या येतो. हा भैय्या 'भैय्या' नसून मराठीच आहे . . .    पण इथल्या बायकांनी त्याचे असे नामकरण केले आहे. मग त्याच्या भोवती या सगळ्या भगिनी जमतात आणि त्यांचा निवांत गप्पा मारण्याचा/कम भाजी घेण्याचा कार्यक्रम चालू होतो. एक बाई पहिल्या मजल्यावर राह्ते. तिथून तिला खरं तर याच्याकडे काय भाजी आहे ते दिसत असतं . . . तरीही हमखास ती काय भाजी आहे असं विचारते आणि मग हा सगळी यादी सांगतो. बाईंचा निर्णय काही होत नाही. मग हाच विचारतो - फुलवर दू क्या ? तशी ही सांगते -मेरे ' उनको ' फुलवर पसंद नही. . . ( वा ! तो उनको क्या पसंद है - दुधी भोपळा ?) आणि खरंच ती त्याला दुधी भोपळा द्यायला सांगते ! या भाजीवाल्याची खासियत म्हणजे याला कोणी पैसे देताना मी तरी पाहिलेले नाही. . . याच्या खात्यात घर बसल्या ऑन-लाइन पैसे जमा करतात काय या बायका कोण जाणे!

सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. आमच्यावर राहणाऱ्या घरातून  ' टॉक-टॉक-टॉक' असा प्लास्टिक चेंडूचा आवाज 
रात्री सुमारे ११ वाजता येऊ लागतो. . . . त्यावेळी त्यांच्या ६-७ वीतल्या मुलाच्या अंगात सचिन तेंडुलकर संचारतो. . . . पण तुम्ही काही करू शकत नाही . . . उद्या खरंच तो दुसरा तेंडुलकर झाला आणि त्याने आत्मचरित्र लिहिले तर त्यात माझा व्हिलन म्हणून उल्लेख व्हायचा ! टॉक-टॉक हा चेंडूचा नसून घड्याळ्याच्या काट्याचा आवाज आहे असं समजून मी झोपायचा प्रयत्न करतो !

1 comment: