Tuesday, 21 May 2013

मानसीच्या सत्कारानिमित्त राजकीय पुढारयाचे भाषण !!!

(आमची मैत्रीण मानसी हुलसूरकर (इ. बारावी),मागच्या वर्षी स्कॉलरशिप मिळवून जर्मनीला गेली होती त्यावेळी मी हे लिहिले होते.) 
कल्पना करा.... मानसी जर्मनीला जातेय म्हणून तिचा एक जंगी सत्कार होतोय आणि या कार्यक्रमाला एक राजकीय पुढारी आणि त्यांचे सेक्रेटरी येतात. असे कार्यक्रम म्हणजे पुढाऱ्यांसाठी पर्वणीच असते हे वेगळे सांगायला नकोच ! तर या नेत्याने काय भाषण केलं, कशी फटकेबाजी केली याचा हा सविस्तर वृत्तांत-

सर्व उपस्थित माननीय बंधू आणि भगिनींनो,
आज या ठिकाणी आपण मानसीताई जर्मन या ठिकाणी जाणार म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी जमलो आहोत..    मला या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला कारण ठिकठिकाणी फ्लेक्स लागले आहेत. त्यात माझा फोटो १० फूट आणि मानसीताई यांचा फोटो अर्धा फूट लागला आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांचे सारखे फोन येऊ लागले- मनासारखा राजा आणि राजासारखे मन असलेले, आमचे मार्गदर्शक.. आमचे आधार कार्ड... सॉरी.. आमचे आधारस्तंभ.. आम्हाला न सांगता जर्मनला चालले? असं कसं ? त्यांची समजूत काढता काढता इकडे यायला उशीर झाला..असो.

आज आपल्यात आमच्या मंडळी नाहीत......म्हणजे तशा त्या आहेत... पण हितं नाहीत.. त्या असत्या तर त्यांनी मानसीताईना परदेश प्रवासाचे सल्ले दिले असते.. पण त्या सारख्या म्हणत होत्या.. किती उकाडा हाये पुण्यात ! म्हणून त्यानला कांद्याचे भाव का पडतात या समस्येचा अभ्यास करण्यासाठी न्यूझीलंडला पाठवला.. म्हणजे तिकडे त्या बी खूष आणि इकडे... असो..

मानसीताई जर्मनला चालल्या हे बेस झालं. त्यानला आमच्या शुभेच्छा हायेतच.. पण नुसत्या कोरड्या शुभेच्छा नाहीत हा.. आमच्या त्यांच्या कडून खुप- खुप अपेक्षा बी हायेत... खुद्द शिवाजी महाराजांनी म्हटलंय - करावे पर्यटन... (सेक्रेटरी नेत्याच्या कानात पुटपुटतात- अहो ते करावे देशाटन असं आहे आणि ते शिवाजी महाराजांनी नाही ...सेक्रेटरीचे बोलणे मध्येच तोडून नेते माईक चालू असताना नेते बोलतात-) काय बिघडलं आम्ही महाराज म्हटलं तर? आमच्या प्रत्येक भाषणात एकदातरी त्यांचा उल्लेख येणारच! आम्ही पुढे काय म्हणतो ते महत्त्वाचे! हां... तर (सेक्रेटरी कडे छद्मीपणाने बघत)- करावे देशाटन... आणि शिकावे मलेरियाचे उच्चाटन ! (सेक्रेटरीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा) नेते सेक्रेटरी कडे बघत म्हणतात- नाय नाय आम्ही काय बी चुकीचं बोललो नाय..म्हणजे असं- तुम्ही देश सोडा.. पण जिथं जाल तिथं देशाचा विचार सोडू नका.. आपले प्रश्न, आपल्या समस्या एक वेळ देशात राहून समजणार न्हाईत.. पण देशाबाहेर गेल्यावर कळतील. आपल्याकडे समस्या तरी किती? एवढी वर्षं झाली, सगळ्यांनी गप्पी मासे पाळले.. पण हिवताप गेला का? न्हाई ना? हां ...तेच म्हणतो.. तर त्याचा अभ्यास करा.. टन- टन गहू का सडतो? महाराष्ट्रात दुष्काळ का पडला? प्रश्न तरी किती? आत्ता परवाच आमीरखान कडून कळलं- स्त्री भ्रूण हत्या का काय ते.. आम्हाला माहीतच नव्हतं ! पण असं कसं होईल? आमचा पक्ष एवढा महिलाभिमुख, आम्ही एवढे महिलाप्रिय नेते तरी हे असं? तर याचा अभ्यास झाला पाहिजे..

मानसीताई जर्मन या ठिकाणी जाताहेत.. त्यांचा आदर्श ठेउन आणखी काही महिला जातील. नाही.. चांगलंच हाये ते.. मी तर म्हणल अशा हजारो- लाखो महिलांनी जावं.. मागे मीच म्हणालो होतो- एक मुलगी शिकल तर देश शिकल... तसंच हाये हे- एक मुलगी देश सोडल तर आख्खा देश देश सोडल... तुम्ही म्हणाल हे कसं ? अहो ...मुली जातील.. तर त्यांच्या मागं मागं पोरं बी जातीलच ना? एवढ्या मुली जातात तरी कुठं हे बघायला? मग पोरं तिथं गेल्यावर त्यांची काळजी घ्यायला आम्हाला बी जावंच लागनार.. आपल्या सांस्कृतिक परंपरा तिथं कोण बघणार? दहीहंडी झाली, गणपती झाला, नवरात्रीचं तोरण हाये.. हे सगळं कोण बघणार? त्यासाठी जर्मन मध्ये आमच्या पक्षाची शाखा झाली पाहिजेले...सगळ्या पक्षांची गावोगावी शाखा आहे.. पण जर्मन मध्ये हाये का कोणाची? 

तर माझी मानसीताई यानला विनंती आहे की त्यांनी तिथं जावं आणि (सेक्रेटरीना विचारतात -कोण हो ते त्यांचे प्रमुख- Anjelo Mathews ? सॉरी ते तर आईपीएलचं बेनं हाये ... मंग अंजेलिना जोली ?.. सॉरी सॉरी .. ती तर हिरवीण ना ) हां तर कोणीतरी मरकळ बाई हायेत त्यानला भेटावं आणि आमच्या पक्षाची तिथं शाखा काढता येईल का हे विचारावं...
मानसीताई यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो.. आज मला बहुमोल सल्ला देण्यासाठी इथे बोलावलं म्हणून आभार मानतो.. हां .. मानसीताई यांना परीक्षेत घवघवीत यश मिळाले..... (सेक्रेटरी म्हणतात-अहो रिझल्ट लागायचाय अजून) का तुम्ही सारखे मला मधेच अडवता? आता ज्या ताई जर्मनला चालल्या त्यानला मार्क भेटणारच ना चांगले? मग? तर त्यांचे अभिनंदन! आणि मी माझे दोन शब्द संपवतो.. जय हिंद.. जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment