(मंगळवार २० ऑगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर लिहिलेला हा ब्लॉग... )
मंगळवारच्या घटनेनंतर मनात आलेल्या तीव्र आणि विविध भावना आता थोड्या प्रमाणात निवळण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आणि याचबरोबर मनात येताहेत जुन्या आठवणी ! एखाद्या चल -चित्राप्रमाणे पण काही वेळा संगती न लागणाऱ्या, आठवणी येत आहेत . . . .
मंगळवारच्या घटनेनंतर मनात आलेल्या तीव्र आणि विविध भावना आता थोड्या प्रमाणात निवळण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आणि याचबरोबर मनात येताहेत जुन्या आठवणी ! एखाद्या चल -चित्राप्रमाणे पण काही वेळा संगती न लागणाऱ्या, आठवणी येत आहेत . . . .
या आठवणी आहेत मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काही काळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जोडलो गेलो होतो त्या काळाच्या ! साधारणपणे १९८७पासून ते १९९० पर्यंतचा हा काळ असेल. म्हणजे सध्या जसं २४ तास टीव्हीचं बोम्बारडिंग असतं तसं तेव्हा नव्हतं . . ना मोबाईल . . . ना इंटरनेट. . . पण त्या कॉलेज काळातील वयाला अनुसरून bubbling energy मात्र निश्चित होती . प्रत्येकजण आपापल्या स्वभाव आणि शरीर धर्माप्रमाणे कुठल्या न कुठल्या उपक्रमात सहभागी व्हायचा. संगीत/नृत्य हे छंद असोत किंवा मग गिर्यारोहण, खेळ, व्यायामशाळा असे शारीरिक क्षमता जोपासण्याचे प्रकार असोत. . . त्यात आम्ही शरीर आणि मन दोन्ही दृष्ट्या जडत्वाकडे झुकणारे असल्यामुळे शारीरिक कष्ट जिथे होणार असतील त्यापासून अंमळ लांबच राहिलो ! माझी आई आणि माझा मित्र निखिल शाह- जे दोघेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद होते- त्यांच्यामुळे मीही या गोष्टीत रस घेऊ लागलो . आणि हळूहळू हे काम आवडू लागलं. ते विचार पटू लागले. आणि या कामात मजाही येऊ लागली. आपण काहीतरी छान समाजोपयोगी काम करत आहोत, ज्यामुळे समाजात काहीतरी बदल होणार आहे अशी भावना त्यावेळी असे. .. . .
आणि ही कामं होतीही तशी. . .
बिबवेवाडीत तेव्हा एक 'चष्मे-उतारो बाबा' आला होता. अगदी पुण्यासारख्या शहरात राहून हा चष्मा आणि डोळ्यांचे विकार दूर करण्याचा दावा करे. समितीने त्याच्या विरोधात आंदोलन केले. आम्ही तो बिबवेवाडीत जिथे उतरला होता तिथे गेलो होतो- आधी आम्ही पेशंट असल्याचा बनाव करून. आणि नंतर उघडपणाने परंतु शांतपणे, कुठलीही दमदाटी न करता त्याच्याशी बोललो होतो. वर्तमानपत्रात या आंदोलनाला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि त्या बाबाला पळ काढावा लागला होता. . . .
निर्मलादेवींच्या विरोधातील निदर्शनेही आठवतात . . . काय त्यांचा डामडौल ! त्यांचे परदेशी अनुयायी . . . त्यांचे ते सिंहासनावर एखाद्या राणी प्रमाणे बसणे ! निर्मलादेवींचे एड्स पासून थेट कॅन्सर पर्यंत सर्व आजार कुंडलिनी जागृती मुळे पूर्ण बरे करण्याचे ते पोकळ दावे ! त्यांच्या भाषणातून त्यांनी अं.नि .स ला दिलेले धमकी वजा इशारे . . . आम्ही त्यांच्या त्या सार्वजनिक कुंडलिनी जागृतीच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. त्यांच्या त्या सर्व कवायती केल्या. . . पण खरं सांगतो, कुंडलिनी जागृती तर सोडाच, काहीही वेगळं वाटलं नाही.
जनमताचा रेटा कसा असतो आणि त्यापुढे अं.नि .स ची ताकद किती तुटपुंजी असते याचाही अनुभव आम्ही वाकडला हनुमान जयंतीच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या एका अघोरी प्रथेच्या निमित्ताने घेतला होता. तेव्हा वाकड हे एक खेडं होतं . आतासारखं कॉन्क्रीटचं जंगल नव्हतं. तिथे एक प्रथा होती. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एका घराण्यातील एका पुरुषाच्या पाठीत लोखंडी आकडा घालून त्याला उंच खांबावर लटकावले जाई . (अजून हे चालते का हे माहित नाही) ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी समितीतर्फे आम्ही काही कार्यकर्ते (तेव्हाचे कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बोरकर यांच्यासह) गेलो होतो. या प्रथेविरोधात वर्तमानपत्रात खूप काही छापून आले होते. वातावरण तापले होते. आम्ही फार तर २०-२२ लोक असू आणि तिथे पंचक्रोशीतून हजारो माणसं जमली होती. तिथले सरपंच आले आणि आम्हांला त्यांनी शांत शब्दात पण स्पष्टपणे सांगितले की याला विरोध करू नये. आणि संख्येच्या जोरापुढे आमचे काही चालले नसतेच. तेव्हा आम्ही माघारी फ़िरलो.
समिती मध्ये सहभागी होणारे बरेचसे तरुण आणि काही डॉ बोरकरांसारखे मध्यमवयीन तर माझी आई किंवा मिसेस प्रधान यांच्यासारखेही काही सभासद होते. पण निखिल शाह, शुभांगी शाह, शरद शाह, मिलिंद जोशी, मनोज जोशी, सुनित करंदीकर, उज्ज्वला परांजपे, प्रकाश घाटपांडे, मिलिंद देशमुख, तानाजी खिलारे, मंगला पराते, निलिमा भाले, माधव गोखले असा एक छान, उत्साही ग्रुप होता. त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतले. आणि मग या ग्रुपला भेटणे, चर्चा, गप्पा असे चालू झाले. मी सगळ्यात उशिरा आलो आणि तसे माझे काम फारच मर्यादित होते. म्हणजे अगदी गर्दी वाढविण्याएवढेच. . . एकदा फक्त आम्ही पुणे ते सासवड असा सायकल प्रवास केला होता. वाटेत ४-५ गावी थांबून पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, गाणी असा कार्यक्रम होता. त्यात मी ग्रुप मध्ये - देवकीनंदन गोपाला या सिनेमातले संत गाडगेबाबा यांचे भारूड - ' घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला ' म्हटले होते. एवढाच काय तो माझा सक्रिय सहभाग होता. पण आत कुठे तरी या विचारांचा परिणाम होत होता जो अजूनही टिकला आहे.
आता विचार करता मला असे वाटते की या सर्व काळातला परमोच्च क्षण कुठला असेल तर तो डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर शुभांगी/शरद शाह यांच्या घरी झालेल्या एका मीटिंगचा. . . किंबहुना मीटिंग काय झाली हेही मला आठवत नाही. पण आठवते ते त्यांचे अत्यंत साधे रूप, विचारांचा स्पष्टपणा आणि मुद्देसूद बोलणे. . कुठलाही अभिनिवेश नाही. . . शिवाय अतिशय फोकस असलेला विचार. . . त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की आदर वाटायचाच पण ते accessible ही वाटायचे. या मीटिंग नंतर सहज गप्पा-गप्पांतून गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि डॉ. दाभोलकरांच्या उपस्थितीमध्ये अस्मादिकांना देखील गाण्याची संधी मिळाली ! ' तरूण आहे रात्र अजुनी', ' लाजून हासणे' ते 'सागरा प्राण तळमळला' पर्यंत गाणी झाली. ती त्यांनाही बहुदा आवडली असावीत. रात्री उशिरापर्यंत रंगलेली ही मैफल अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे !
एका अतिशय साध्या पण मनस्वी अशा सामाजिक कार्य कर्त्याशी निगडित होऊन त्यांच्याबरोबर चार पाउले चालण्याचे भाग्य लाभले तर तो आयुष्यभरासाठी एक आठवण बनून रहातो .या लेखातून असा मनमोकळा संवाद साधून आम्हालाही या अनुभवाशी जोडल्याबद्दल धन्यवाद. सदानंद चावरे
ReplyDeleteमस्त रे राजेश. जुन्या आठवणींना उजाळा.
ReplyDeleteछान सर, हाही पैलू कळला तुमचा. दाभोळकर सरांना जवळून पाहणे हा एक जबरदस्त अनुभव.
ReplyDelete