पूर्वी Reader's Digest या मासिकात 'All in a Day's work' या स्वरूपाचं सदर यायचं.
(आता ते सदर आहे की नाही माहित नाही) रोजच्या कामात घडणारे प्रासंगिक विनोद त्यात दिले जात. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि माझ्या रोजच्या कामात काही मजेशीर प्रसंग घडत असतात . अगदी Reader's Digest मध्ये सांगतात त्याचप्रकारे ! अशाच काही प्रसंगाविषयी सांगण्यासाठी हा लेख !
मात्र सुरुवातीलाच एक डिसक्लेमर देतो - विशेषतः हे लिखाण माझे काही पेशंट वाचण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी- हे जे काही मी लिहिलंय त्यातले पेशंट तुम्ही नाही. आणि तरीही तुम्हांला यात काही साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा आणि हलके घ्यावे. यातून कोणाला दुखवायचा अजिबात हेतू नाही.पेशंट खरं तर आजाराने, त्यांच्या आयुष्यातल्या समस्यांनी त्रस्त असतात. त्यांच्या आजाराला कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या दुखण्याची चेष्टा करण्याचा इथे हेतू नाही. परंतु नकळतपणे काही विसंगती घडत जातात आणि त्याची गंमत वाटते. म्हणून हे लिहावेसे वाटले.
एक होमिओपॅथीचा डॉक्टर म्हणून जे काही कारणे अपेक्षित असते त्या व्यतिरिक्त इतरही काही छोट्या छोट्या भूमिका मी निभावत असतो. यात मी आणि दुसरे पात्र माझा दवाखाना असते. पेशंटच्या दृष्टीने माझा दवाखाना हा केवळ दवाखाना नसून आणखी बरंच काही असतो. यातून काही मजेशीर गोष्टी घडत असतात. उदा-
१) काहींना माझा दवाखाना हे मोफत वाचनालय वाटतं. वेटिंग रूम मध्ये ठेवलेली मासिके अत्यंत गंभीरपणे ते वाचत असतात. काही पेशंट तर आपले दवाखान्यातले काम झाले तरी बराच वेळ अंक वाचत बसतात. कोण म्हणतो की आपली वाचनाची आवड सध्या कमी झाली आहे? अर्थात याला मीही खत-पाणी घालत असतो. 'साधना', 'अनुभव', 'मिळून साऱ्या जणी' सारखी मराठी तर 'आउटलुक' किंवा 'The Caravan' सारखी इंग्रजी नियतकालिके दवाखान्यात वाचायला उपलब्ध असतात आणि तसे ताजेच अंक असतात. एकदा एक पेशंट आपल्या ५-६ वर्षांच्या मुलीला 'साधना' च्या मुखपृष्ठावरील चित्र दाखवून गोष्ट सांगितल्या सारखे बोलत होते- "हे आजोबा कोण आहेत माहित आहे का? हे आहेत मोहन धारिया आजोबा ! तुला माहित आहे का.. यांनी किनई खूप मोठं काम केलंय" ती मुलगी बिचारी काहीही न कळूनही कळल्यासारखी मान डोलवत होती. समाजवाद अजूनही इतक्या ग्रास रूट पातळीवर आहे हे पाहून मला अगदी भरून आलं. ते मला म्हणाले-"डॉक्टर हा अंक मी घरी घेऊन जाऊ का? हिला मी त्यांची सगळी गोष्ट सांगतो." चला ! म्हणजे पुढच्या पिढीत ही रुजणार समाजवाद ! एवढ्या प्रामाणिकपणे विचारल्यावर मी नाही कशाला म्हणतोय! इथे कितीतरी अंक असे न विचारता नेले जातात. आमच्या ओळखीच्या एक मावशी त्यांचे वाचून झाल्यावर मला 'अनुभव' आणि 'मिळून साऱ्या जणी' चे अंक देत असतात.त्या नेहमी मला म्हणतात- "हे घे राजेश, तुझ्या पेशंटनी पळवून नेण्यासाठीचे अंक!" काही पेशंट वेगळीच शक्कल लढवतात- आमच्या होमिओपॅथीविषयक दिवाळी अंक 'पर्याय' मधून बरोब्बर त्यांना उपयोगी वाटणारी पाने फाडून घेऊन जातात. अंक जागच्या जागी सुरक्षित! तेव्हा अशा पेशंटच्या तुलनेत हा पेशंट मला अदबीने विचारत होता तर मी नाही कसे म्हणणार ? आणि खरंच तो पेशंट समाजवादी असावा.कारण पुढच्याच आठवड्यात त्यांनी अंक चक्क परत केला! आणि वर म्हणाले-"इतर कोणाला वाचायला हवा असेल तर उपयोगी पडेल!"
२) नोटांचे विनिमय केंद्र- नाही ! मी काही डॉलरमध्ये फी आकारत नाही! इथे विनिमय या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला म्हणजे डॉक्टरांच्या फीची अगदी फुटकळ रक्कम असली तरी त्यांना एकदम २ हजाराची नोट द्यायची! वर हे ही सांगणारे/सांगणाऱ्या असतात -"पहिल्यांदा तुमच्याकडेच आले. आता पैसे सुट्टे झाल्यावर पुढच्या खरेदीला जाणार!" म्हणजे आपण यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा करून द्यायचा ! दुसरा प्रकार म्हणजे फाटक्या, जीर्ण, चिकटपट्टी लावलेल्या, कुबट वास असलेल्या, रंगपंचमीचा /पानाचा लाल रंग लागलेल्या, थोडक्यात काय की इतरत्र कुठेही न खपू शकलेल्या नोटा डॉक्टरांकडे द्यायच्या. त्यांच्याकडे सहज खपतात! देताना ते इतक्या बेमालूमपणे देतात की आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. काही वेळा असं वाटतं की आपण गाफील राहावं म्हणून फी देताना पेशंट उगाचच नाही नाही त्या विषयावर गूळ काढत बसतात आणि आपलं लक्ष नाही असं पाहून हातचलाखीने अशा नोटा खपवतात.
३) मोफत दूरध्वनी केंद्र - हे आता मोबाईलच्या जमान्यात थोडं कमी झालं आहे. तरीही क्वचित एखादा पेशंट म्हणतो- "डॉक्टरसाब, क्या मैं आपका फोन इस्तमाल कर सकता हूँ ?मेरा फोन मैं घर पे भूल आया हूँ " आणि मग ते आपल्या बायकोशी फारसं काही महत्त्वाचं नसलेलं बोलण्यासाठी माझा लँडलाईन फोन वापरतात. (म्हणजे -आता मी इथे आहे… नंतर तिथे जाईन आणि मग घरी येईन... येताना कुठला मासा आणू .. वगैरे )
४) काही पेशंटना माझा दवाखाना एक टप्पा वाटतो. म्हणजे कुठून कुठून खरेदी वगैरे करून यायचं आणि 'जरा विसावू या वळणावर ' तसं आपलं येता जाता दवाखान्यात यायचं! एकदा तर केटरिंगचा व्यवसाय असलेल्या एका पेशंटने माझ्या दवाखान्यात शेगडी, कढई, झारे असलं काय काय सामान आणलं आणि लटक्या अजीजीनं म्हणाल्या- "हे मी जरा इथे ठेवते. माझा भाऊ येऊन घेऊन जाईल. आत्ता तो नेमका घरी नाहीये.सॉरी हं तुम्हांला थोडा त्रास देतेय." मी माफकपणे विरोध करत म्हटलं -" अहो पण ते लवकर घेऊन जातील ना ? नाहीतर लोकांचा गैरसमज व्हायचा की डॉक्टरांनी केटरिंगचा नवा जोडधंदा चालू केला की काय !" यावर त्या नुसत्या हसल्या आणि चक्क निघून गेल्या ! पुढे त्यांचा तो भाऊ येईपर्यंत माझा जीव मात्र टांगणीला !
५) संकेत मीलनाचा -
पहिला फोन- "हॅलो आई, अगं मी डॉक्टर पुसाळकरांकडे आहे. येईन मी घरी इथलं झालं की !"
दुसरा फोन -"हॅलो... अमित ... अरे मी पुसाळकरांकडे आहे (फरक लक्षात घ्या- डॉक्टर शब्द गाळला आहे !) तू इकडेच ये … "
अच्छा ! म्हणजे माझ्याकडे येण्याच्या सबबीखाली काहीतरी वेगळंच शिजतंय! माझा दवाखाना हे असं भेटण्याचं ठिकाण होतंय ! अशा प्रकारे भेटून पुढे (त्याच मुलाशी) लग्न केलेल्या मुलीने कधी आत्मचरित्र लिहिलं तर कदाचित माझा त्यात कृतज्ञतेने उल्लेख होईल की- "घरून आमच्या प्रेमाला जेव्हा विरुद्ध होत होता तेव्हा डॉक्टर पुसाळकरांचा दवाखाना हा आम्हांला एकमेव आधार होता"- अशी आपली भाबडी आशा मला आहे !
पेशंटचीही काही खासियत असते. त्यांच्या काही सवयी असतात. मुख्य सवय म्हणजे डॉक्टरशी बोलताना उगीचच इंग्रजी शब्दांचा वापर करायचा . आता अस्मादिक मराठी आहेत हे आमच्या आडनावावरून सहज लक्षात यावे. त्यामुळे गरज नसताना कशाला इंग्रजी वापरावं? म्हणजे पेशंटनी अशक्तपणाला weaknessपणा म्हणणं, डोक्याला headache झालाय म्हणणं किंवा इन्सुलिनला इन्शुरन्स म्हणणं याचीही आता सवय झाली आहे. पण त्याही पुढे जाणारे पेशंट असतात- एकदा असाच एक पेशंट पहिल्यांदाच आला आणि म्हणाला-" डॉक्टर, मला सर्दीचा त्रास आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून स्टेटमेंट घ्यायची आहे !" दोन क्षण मला कळलंच नाही. स्टेटमेंट द्यायला मी राजकीय नेता नाही वा तो पत्रकार नाही. किंवा जबानी द्यायला मी कुठला विटनेस नाही. मग लक्षात आलं. त्याला ट्रीटमेंट म्हणायचं होतं ! "हा...सर्दीसाठी तुम्हांला ट्रीटमेंट हवी आहे का?"
"हो.. तेच ते... स्टेटमेंट !" (आपला हेका सोडायचा नाही!)
'क्रोसीन'च्या गोळीला 'केरोसीन'ची गोळी म्हणणारे काही पेशंट पाहिले आहेत. पण एका पेशंटची सर कोणालाच येणार नाही असं इंग्रजी त्याने फाडलं ! मला म्हणाला- "डॉक्टर, मला external jealousy होतेय!"
"काय?" " कुठे?"
असं विचारल्यावर त्याने गळ्याचा भाग दाखवला. साहेबांना तिथे नायट्यासारखे फोड आले होते आणि तिथे खाज येत होती आणि आग होत होती. सरळ तसं सांगावं ना? जळजळ/ आग होणे यासाठी उगाच jealousy आणि बाहेरून त्रास होतो म्हणून external jealousy असं इंग्रजी भाषेला योगदान कशाला द्यायचं?
होमिओपॅथिक डॉक्टरांना पेशंटच्या त्रासासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात. पेशंट त्या त्रासांचं जेवढं वर्णन करेल तेवढं आमच्या दृष्टीने औषध निवडण्याला मदतच होते. याचा काही वेळा पेशंट खूप वेगळाच अर्थ घेतात आणि आऊट ऑफ द वे जाऊन कुठल्याही गोष्टीचं(विचारलेलं नसतानाही) 'रसभरीत' वर्णन करतात. त्यांना वाटतं की ते डॉक्टरांना खूप काही मौलिक माहिती पुरवत आहेत! काही लोक तर आणखी पुढे जातात. त्यांना एक वरदान लाभलेलं असतं. क्लिनिक मध्ये येतात आणि मोठ्या आवाजात हुकमी ढेकर देतात. क्लिनिकमधील काचा अगदी दहीहंडी किंवा गणपतीच्या वेळच्या स्पीकरच्या भिंतींनी जशा हादरतात किंवा व्हायब्रेट होतात तसंच काहीसं ! आणि मग हे शांतपणे म्हणतात- "डॉक्टर .. काहीतरी करा हो तुम्ही ! .. अशा ढेकरा मला दिवसभर येतात! " म्हणजे आम्हांला न मागता लाईव्ह डेमो ! (तरी बरंय आणखी कशाचा डेमो नाही देत ते !)
होमिओपॅथीचे डॉक्टर फॅमिली डॉक्टरची भूमिका निभावत असतात. अलीकडच्या काळात कुटुंबाचा आकार लहान झालाय. त्यामुळे घरात वडीलधारी मंडळी कमी झालेली आहेत. लहान मुलांचे लाड जास्त आणि त्यांना शिस्त कमी अशी काही घरांमध्ये स्थिती असते. त्यामुळे आमच्यासारख्या डॉक्टरांकडे मुलांच्या आया घेऊन येतात. उद्देश आम्ही त्या मुलांना धाक दाखवावा हा असतो. पण त्यातून आमचं एक प्रकारे तक्रार निवारण केंद्र होतं. आणि बहुतांश आयांची एकच तक्रार- "डॉक्टर हा काही खातच नाही हो!" एक आई तर म्हणाली- "वॉचमन झाला, पोलीस झाला पण काही उपयोग नाही. शेवटी तुमच्याकडे घेऊन आले आहे. कोणाचं ऐकतच नाही. चांगलं मोठं इंजेक्शन द्या त्याला!" बाप रे ! म्हणजे पोलीस आणि वॉचमन यांच्या लाईनीत डॉक्टर ! आणि त्या मुलालाही माहित असतं या डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे काही नसतं ! फक्त गोड गोळ्या मिळतात. त्यामुळे तो एकदम चिल मध्ये असतो! काही आया म्हणतात- "अगदी घरभर फिरवतो हो खाण्यासाठी ! त्याच्या मागे मागे जाऊन भरवावं लागत!पार दमवतो तो मला !" पण कित्येकदा हे लक्षात आलेलं असतं की अशी मागे लागून भरवावं लागणारी मुलं चांगली गुटगुटीत असतात आणि आया देखील त्यांच्यामागे धावून अजिबात बारीक झालेल्या नसतात !
काही वेळा मात्र मुलांचं खाणं ही एक वरवरची समस्या असते. त्या मागचे काही वेगळेच धागेदोरे सापडतात. अशीच एका सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातली आई तिच्या आठवी- नववीतल्या मुलाला घेऊन आली होती. (बऱ्याच वेळा दिसतं की ही तक्रार सांगायला आईच येते.) तक्रार नेहमीचीच- मुलगा जेवत नाही. पालेभाज्या खात नाही वगैरे. तर अचानक मुलगा आईच्या वसकन अंगावर धावून गेला-
"ए ... असं कुठे आहे? खातो मी हं भाज्या! तूच करत नाहीस पालेभाज्या तुला पित्त होतं म्हणून!" त्या मुलाचा आवेश, बोलण्याची पद्धत सेम टू सेम त्याच्या बाबांसारखी! त्यामुळे आई एकदम गप्पच ...तक्रार करायला ती आलेली असते पण इथे डाव तिच्यावरच उलटतो म्हणून खजील होऊन गप्प! अगदी अशीच ती नवऱ्यापुढेही गप्प होत असणार ! यांच्या घरी साधारण काय वातावरण असेल याची एक छोटीशी झलक माझ्यासमोर सादर झाली. म्हणजे बाबा या व्यक्तिरेखेला दवाखान्यात येण्याचे कष्टही पडलेले नसतात.पण मुलाच्या रूपाने मात्र ते हजर झालेले असतात ! आई तोंडघशी पडलेली असते, मुलाचा विजयी आविर्भाव झालेला असतो आणि आपण मात्र अवाक झालेलो असतो !
This comment has been removed by the author.
ReplyDeletePart 1 of 2
ReplyDeleteधमाल...
जसजशा ऑनलाईन गोष्टी वाढत चालल्या आहेत तसं थेट संवाद कमी होऊन फटाफट 'चॅट' वाढत चालले आहेत...डॉक्टरांच्या दवाखान्यात वेटिंग किंवा ओ पी डी मध्ये खरंच चांगलं वाचन झालंय...तू जे वर किस्से कथन केले आहेत ते सगळे आगाऊपणे (इथे हा शब्द आगाऊपणा याचे बहुवचन अशा अर्थाने घेण्यांत यावा) मी केले आहेत फक्त पानं फाडून नेणे एवढं एक सोडून...Not Good...ज्या कुणाला एखादं काही हवं असेल तर डॉक्टरांना विचारा ना...मला नाही वाटत कुठला डॉक्टर कमीत कमी झेरॉक्स काढायला परवानगी नाकारेल...असो...आधी लक्ष्मी रस्ता आणि आता भांडारकर रस्त्यावर दवाखाना चालवणारे प्रसिद्ध दंत वैद्य पिता पुत्र डॉ. राम आणि परेश काळे यांच्या दवाखान्यामध्ये मला थांबायला कधीच कंटाळा आला नाही (जेव्हा दात दुखत असेल तेव्हा मात्रं मेरा नंबर कब आयेगा असंच वाटणार ना ??? ... :)) पण काही ऋणानुबंध म्हणा किंवा आणि काही पण माझ्या या "काळ्यां"बरोबर वय वर्षं सहा पासून आजपर्यंत भेटी होत आल्या आहेत...आणि तिथे असणाऱ्या वाचन साहित्यातून मी पुष्कळ फुले वेचली...अगदी दातांची काळजी, स्कॅन्डीनेव्हियातली पर्यटन स्थळे, व्यापारातल्या खाचाखोचा, अमेरिका आणि भारत इथले विविध क्षेत्रांतले संशोधन आणि फरक, यूरोप मधले केक आणि बिस्किटे, आशियाई देशातलं राहणीमान, भगवदगीतेबद्दल डॉ. राम काळे यांचे विचार इथपासून मॅरिलिन मन्रो हिची 'मापं', मार्लन ब्रँडो याची लफडी, रशियन 'सुंदरींबद्दल' जगभर असलेले कुतूहल, गॉडफादर कादंबरीवर उठलेली वादळं अशा प्रचंड वैविध्य असलेले विषय मी इथल्या ओ पी डी मध्ये चावले / वाचले (इथे दोन्हीचा अर्थ एकंच होईल)...आणि काम झाल्यावर सुद्धा मी तिथे इतर पेशंटांना जागेची अडचण होत नसल्यास वाचत बसून आनंद घेतला आहे...तसेच आमचे दुसरे एक फॅमिली डॉक्टर असलेले (कै.) डॉक्टर भट, शनिवार पेठ...जिवंत ज्ञानभांडार... त्यांच्याकडचं साहित्य वाचून अभिरुची विकसित व्हायला खूप मोलाचा हातभार लागला...
तू डॉक्टर असल्याने तुझी स्वतःची बाकीची निरीक्षणं वाचून मजा आली. आमचे खूप जुने कौटुंबिक मित्र श्री. व. दा. भट एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत (आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल इथे काही चर्चा करणार नाहीये)...त्यांनी तर त्यांच्या कचेरीमध्ये प्रत्येक पुस्तकाच्या आवरणावर एक कागद चिकटवला आहे ज्याच्यावर विनंतीवजा सूचना छापलेली मी बघितली आहे "कृपया हे पुस्तक इथून चोरून नेऊ नये किंवा काही पाने फाडू नयेत. आपल्याला हवे असल्यास खुशाल माझ्याकडे मागून घ्या...मी देईन..."पुण्यामध्ये सगळी धमाल माणसे असायची...Cosmopolitanisation च्या नांवाखाली पुण्याचा म्हणून जो एक 'घास' होता तो आता कधीच गिळला गेला आहे कधीच परत न येण्यासाठी… 2 minutes silence मध्ये उभा राहतो त्याबद्द्ल दुःख व्यक्त करण्यासाठी…अरे मी इतका भावनाविवश का होतोय तुझ्या इतक्या विनोदी लेखावर प्रतिक्रिया देताना...छे: छे: बॅक टू द पॉईंट
External Jealousy हा शब्द वापरणाऱ्याला माझ्यातर्फे जोरदार टाळ्या दे...मला आणि माझ्या मुलीला आता हे external jealousy प्रकरण खूप दिवस हसवणार अगदी नक्की
तुझं एक वाक्यं
ReplyDelete" ..... पण कित्येकदा हे लक्षात आलेलं असतं की अशी मागे लागून भरवावं लागणारी मुलं चांगली गुटगुटीत असतात आणि आया देखील त्यांच्यामागे धावून अजिबात बारीक झालेल्या नसतात ......" – Absolute truth!!!
या वाक्यावरून तेनालीराम ची एक मला आवडणारी गोष्ट आठवली...शक्य तितक्या थोडक्यात सांगतो...राजा कृष्णदेवराय याची इच्छा होती की मी एक पूर्णपणे संतुष्ट मांजर बघू इच्छितो...संतुष्ट म्हणजे मी तिच्या समोर दुधाचं भांडं धरलं तर तिने ते न पीता तोंड फिरवलं पाहिजे आणि ते मांजर तब्येतीने सुदृढ दिसले पाहिजे... झालं…लगेच ५ जणांना एक एक पिल्लू भेट दिले गेले...तेनालीरामने पण एक पिल्लू घेतले...त्या पिल्लांना दुधाची कमतरता पडू नये म्हणून पिल्लांसोबत एक दुभती गाय सुद्धा देण्यात आली (राजाच तो...त्याला काय कमी आहे...?)...एक तोळा सोन्यावर एक तोळा चांदी फ्री असं काहीतरी पुण्यात मध्ये एका सोनार पेढीने ऑफर दिली होती...इथे मात्रं राजाने एक तोळा चांदीवर एक किलो सोनं फ्री दिल्यासारखं एक 'मनी'च्या पिल्लासोबत एक अख्खी दुभती गाय देऊन टाकली...असो…
एक महिन्यानंतर राजाने ज्यांना 'मनी' भेट केली होती त्यांना Reporting करायला बोलावलं... फक्त तेनाली कडची 'माऊ' चांगली गुबगुबीत आणि संतुष्ट धष्टपुष्ट दिसत होती...बाकीची चार पिल्ले मात्रं अशक्त मरतुकडी होती...
सगळ्या specimen समोर जेव्हा दुधाच्या बशा ठेवल्या तेव्हा त्या इतर चार हाडकुळ्या पिल्लांनी लगेच फुर्रर करत कोजागिरी पौर्णिमा असल्यागत दुग्धपान करायला सुरुवात केली...पण तेनालीकडच्या Mrs. Healthy माऊ काकूंनी मात्रं त्या बशीकडे तोंड फिरवून (आणि आपला पार्श्वभाग दाखवून) तेनालीच्या मांडीवर आनंदाने बसकण मारली
राजाने तेनालीला स्पष्टीकरण विचारले...तो म्हणाला "मी त्या पिल्लासामोर पहिल्यापासून एकदम गरमागरम अगदी कडकडीत दूध ठेवायचो...त्यामुळे त्याने जीभ दुधात घातली की भाजायची...आठवड्याभरात पिल्लाला साक्षात्कार झाला की "या" पदार्थापासून चार हात (बाकी मांजराच्या चार 'अवयवांपैकी' हात कुठले आणि पाय कुठले मला कोणी सांगेल काय?) लांबच राहणे ठीक...साला माझी जीभ भाजून निघते या पांढऱ्या पदार्थामुळे"...तेनाली पुढे सांगतां झाला की त्यानंतर त्याला नैसर्गिकरित्या असलेले उंदराचे आकर्षण (Can I call it mouse hormone??) जागृत होऊन त्या पिल्लाने माझ्या घरातील उंदरांना मारून पार्टी करायला सुरुवात केली...एकदा चटक लागल्यावर मग काय विचारता? माझ्या घरातले उंदीर आठ दिवसात 'अल्लाला' प्यारे होऊन बहात्तर अप्सरांचा उपभोग घ्यायला गेले…कर्णोपकर्णी ही बातमी गेल्यावर काही शेजाऱ्यांनी आपल्या घरच्या मूषकापत्ती वर उतारा म्हणून आमच्या “मनी-ताईंना” रीतसर मागणी घातली...मी पण त्यांना 'Lease' वर ‘Service’ देऊ लागलो…उंदीर पकडायच्या सर्कशीमुळे त्यांच्यामागे धावताना व्यायाम होऊन मग उंदराचा भरपेट चौरस आहार घेतल्याने आमची 'माऊ' गुबगुबीत झाली...आळस म्हणजे काय हे तिला कधीच समजलं नाही त्यामुळे "ऑल्वेज ऑन द गो"...राजाने खुश होऊन तेनालीला पुरस्कार दिला पण विचारले अरे मग मी दिलेल्या दुभत्या गायीचे तू काय केलेस ? विकलीस का काय...? त्यांवर तेनू हसून म्हणाला "गोमातेला विकेन कसा? माझ्या बायकोने रोज तिचे दूध काढून आमच्या बाळाला आणि मला दूध, दही, लोणी, तूप असा रतीब घालून आम्हाला पण संतुष्ट केले…घर कसं आमचं सध्या गोकुळासारखं झालं आहे…या तुम्ही एकदा गेट टुगेदर करूया राणी वहिनींसोबत… हा:हा:हा:”
श्रीपाद रावांनी अख्खा ब्लॉग लिहीलाय अभिप्राय देताना..।।well written Doctor saheb...
ReplyDeleteअफलातून कॉमेंट श्रीपाद ! खरंच सतीश म्हणतो तसं या कॉमेंटचाच एक वेगळा ब्लॉग होऊ शकेल! खूप छान वाटलं तुझी कॉमेंट वाचून!
ReplyDeleteनिरीक्षण मस्त आहे सर
ReplyDelete