Friday, 26 February 2016

(जर्मन ) भाषा पाहावी शिकून . . . (भाग १)



     
                           १
२०११ ते २०१४ या काळात माझा मित्र विवेक गोवंडे याने घेतलेल्या पुढाकाराने आणि दुसरा मित्र सदानंद चावरे याच्या बरोबरीने मी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचा जर्मन भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.(सर्टिफिकेट कोर्स ते ऍडव्हान्स डिप्लोमा) पोटापाण्याची दैनंदिन कामं सांभाळून आम्ही हे केलं. या शिकण्याचा अर्थार्जनासाठी उपयोग करावा असं काही डोक्यात ठेवून आम्ही शिकलो नाही. अर्थात भाषांतराचं काम मिळालं असतं तर ते आम्ही केलंही असतं.पण ते मिळेल अशी काही आमची अपेक्षा नव्हती कारण या क्षेत्रात आम्ही तसे खूपच उशीरा आलो.म्हणजे माझ्या वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी मी जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. त्यामुळे भाषांतर हा अगदीच नवीन व्यवसाय इतक्या उशीरा निवडणे (आधीचा सोडून) हे शक्यच  नव्हते. मला भाषा कितपत येते  हे मला या निमित्ताने तपासून घेता आले.(निष्कर्ष हाच निघाला की फार काही येत नाही !) तीन वर्षांचा हा काळ अतिशय आनंदात गेला. कितीतरी नवीन माणसं भेटली. परिचय झाला. काहींशी मैत्रीही झाली. मधल्या अनेक वर्षांच्या खंडानंतर कॉलेजची ती उत्फुल्ल धमाल पुन्हा अनुभवता आली. किंबहुना पदवीचं शिक्षण घेताना ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या इथे करायला मिळाल्या.माझी स्वत:शी नव्याने ओळख झाली. भाषा शिकणं तर झालंच, त्याचबरोबर एका  नवीन संस्कृतीचा (नाट्य,साहित्य,संगीत,चित्रपट,खाद्य इ मधून) परिचय झाला. आपल्यापेक्षा वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या वातावरणात, वेगळ्या परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना थोडंसं समजून घेण्याचा एकूण अनुभव खरोखर समृद्ध करणारा होता. हा थ्रीलिंग प्रवास शब्दांकित करण्याचा हा छोटासा प्रयत्न. . . 

                                                                     २
सर्टिफिकेट कोर्सच्या प्रवेशासाठी दहावी पास असणं एवढी एकच पूर्व अट होती. तो काही प्रश्न नव्हता ! पण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी तसं माझी दहावीची मार्कशीट शोधण्यापासून सुरुवात करावी लागली. दहावीच्या मार्कांचा पुढच्या आयुष्यात कधी उपयोग होऊ शकेल असं कधी वाटलंच नव्हतं.शेवटी कुठेतरी कोपऱ्यात जीर्ण अवस्थेत ती सापडली.Admission साठी कागदपत्र  दाखवताना केवळ दहावीचे मार्क कमी होते म्हणूनच नव्हे तर ती जवळजवळ फाटकी मार्कशीट होती म्हणूनही थोडीशी लाज वाटत होती. सुदैवाने माझे मार्क आड आले नाहीत. पण कौंटरवरच्या जमीर कांबळे सरांनी फ्रेंडली सूचना दिली- 'या मार्कलिस्ट ला laminate करा.' आता त्यांना कुठे सांगणार की माझी मार्कलिस्ट हा मागच्या शतकातला उत्खनन करून बाहेर काढलेला ऐतिहासिक दस्तऐवज आहे ! तर अशा रीतीने सर्टिफिकेट कोर्सला मला प्रवेश मिळाला आणि या प्रवासाची सुरुवात झाली. . . 

                                                                     ३

'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात मुन्ना मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला जातो आणि तो वर्गात शिरताच सगळे उभं राहून - Good Morning Sir ! असं म्हणतात. आपलीही तशीच अवस्था होऊ नये म्हणून पहिल्या दिवशी आम्ही तसे लवकरच वर्गात पोचलो. मुन्ना सारखं झालं नाही पण लवकर जाऊनही शेवटच्या रांगेत जागा मिळाली. आजूबाजूला फुल्ल कल्ला चालू होता. एकंदरीत उत्साहाचे वातावरण होतं. भाषेचा कोर्स असूनही मुलांची संख्या लक्षणीय होती. सगळे मिळून आम्ही ७०-८० जण तर सहज होतो. यथावकाश वर्गावर दोन मॅडम आल्या. आमच्या batch ला शिकवणाऱ्या- ऋचा फोंडगे आणि मृण्मयी शिवापूरकर. त्यापैकी ऋचा मॅडमच आमच्याशी बोलत होत्या. पहिलाच दिवस असल्यामुळे त्या इंग्लिश मध्ये बोलत होत्या. प्रत्येकाने आपले नाव आणि व्यवसाय सांगून आपली ओळख करून द्यावी असं त्यांनी सांगितलं. त्या ओळखींमधून कळत गेलं की या वर्गात केवढी विविधता होती ! कोणी इंजिनियर होतं तर कोणी डॉक्टर। कोणी नुकतंच दहावीतून अकरावीत गेलं होतं. कोणी आर्किटेक्ट होतं तर कोणी गृहिणी ! वयोगटही म्हणूनच वय वर्षे १६ ते ४२ असा होता.एकंदरीत वेगवेगळी पार्श्वभूमि असलेला आमचा वर्ग जर्मन भाषा शिकणार होता.आमच्यासारख्या बऱ्याच जणांचा  कुठलीही भाषा शिकण्याचा संबंध सुटूनही अनेक वर्षं लोटली होती.  बरं भाषा शिकण्याची कारणंही  वेगवेगळी होती. इंजिनियर लोकांना त्यांच्या कामासाठी उपयोग होईल म्हणून शिकायचं होतं… काही जणींना भाषांतरकार व्हायचं होतं तर काही फक्त एक छंद म्हणून शिकायला आले होते. सगळ्यांची जर्मन भाषेची शून्यापासून सुरुवात होती असंही नाही. कोणी जर्मन मध्ये बी.ए. करत होतं तर कोणी Max Mueller Bhavanचे आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले कोर्स करत होतं. अशा इतक्या भिन्न प्रकृतीच्या आणि खूप कमी समान धागे असणाऱ्या लोकांना  भाषा आणि तीही परकीय भाषा शिकवणं हे खरोखरच अवघड काम असणार ! अर्थात तेव्हा ते तितकं जाणवलं नाही. आमच्यात समानता होती किंवा common ground होतं आमच्या अभ्यासक्रमासाठीचं पुस्तक- Moment Mal भाग १ (याचाच दुसरा भाग आम्हांला डिप्लोमासाठी होता) याच्याच आधारे आम्ही जर्मन शिकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेवटच्या रांगेत बसल्यामुळे आजूबाजूला खूप गलका जाणवला होता. म्हणून ठरवलं होतं की यानंतर पुढेच बसायचं. नंतरच्या तासाला पहिली रांग रिकामीच होती. मग जणू अलिखित नियमच बनून गेला की आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढेच बसायचं. आमचीही याला ना नव्हतीच ! पण याचं कारण मात्र आम्हांला वर्षाच्या शेवटच्या लेक्चरमध्ये समजलं. आम्ही पुढे बसल्यामुळे मॅडम आम्हांलाच प्रश्न विचारत. त्यामुळे मागे बसणाऱ्या मुलांसाठी आम्ही फुटबॉलमध्ये असते तशी संरक्षक भिंत होतो ! एकंदरीत तो दोन्ही बाजूंच्या सोयीचा मामला होता ! 
                                                                                                                    (क्रमश:)

1 comment:

  1. अरेच्चा...अगदी असा नाही पण यासम अनुभव मी पण घेतला.
    आर. डी. बर्मन आणि रामकृष्ण विवेकानंद जीवन चरित्र (यांचा एकमेकांना सोबत तसा काही संबंध नाही, असलाच तर फक्त इतका दोन्ही पश्चिम बांग्ला भूमीशी संबंधित आहेत) या दोन बाबींशी माझा संबंध लवकर आल्यामुळे बांग्ला भाषेचं आकर्षण होतंच. शिवाय बॉलिवूड संगीतामधली बांग्ला लॉबी आपला आब राखून होती. म्हणून ती भाषा आवडत होती पण समजत नव्हती. त्यांतच इंजिनिअरिंग झाल्यानंतर दहा वर्षांनी भुवनेश्वर येथील एका सरकारी संस्थेने एकदा वर्तमान पत्रांत जाहिरात दिलेली वाचण्यात आली. ती अशी की ओरिया, बांग्ला आणि आसामी भाषांचे पत्रद्वारा कोर्सेस ती संस्था घेणार होती. मूल्य फक्त दोनशे पन्नास रूपये. पण एकावेळी एकच भाषा घेणे बंधनकारक होते. मी विचार केला तसं आपलं व्यावसायिक इंजिनिअरिंग शिक्षण तर पूर्ण झालंय. आता कुठे आपल्याला मैदान मारायचं आहे मग जरा तणावमुक्त शिक्षणाचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे? म्हणून मी लगेच अडीचशे रूपयांचा डीडी रजिस्टर्ड पोस्टाने रवाना केला (UPI नसतानाचे ते दिवस 😀)
    दर दोन महिन्याला एक पुस्तक येणार होते. ते वापरून शिकून घेऊन शेवटी दिलेली प्रश्न पत्रिका सोडवून पाठवायची. ती पूर्ण केली पुढचा धडा. सहा पैकी पांच प्रश्न पत्रिका सोडवल्यानंतर मला साईटवर जावे लागल्याने ते सहावं प्रकरण राहून गेलं. पण मजा आली मात्र. यामुळे मला तेव्हा बांग्ला चांगली वाचता येऊ लागली होती. अर्थात कोणी फाडफाड बोलू लागलं की डोक्यावरून जायचं. पण 'लगान' मधले ब्रिटिश ज्या छापाचं हिन्दी बोलतात त्यापेक्षा सुध्दा बंडल बांग्ला बोलता येण्याइतपत माझी मजल गेली होती. वाचायला तर पुष्कळ भरभर यायचं. बोलताना मात्र चांगलीच दांडी उडायची. असो. 😁

    श्रीपाद मे. गांधी

    ReplyDelete