Saturday, 5 March 2016

(जर्मन ) भाषा पहावी शिकून . . . (भाग ३)


                                                                १
बाकी कुठला नाही तरी माझ्यात एक जर्मन गुणविशेष आहे- मी वेळ पाळणारा माणूस आहे. त्यामुळे मी सगळीकडे वेळेच्या आधीच जाऊन पोचतो. तसंच या कोर्स साठीही पोचत होतो. लेक्चर सुरु व्हायला थोडा वेळ असायचा. आणि मग त्या वेळेत हळूहळू वर्गातल्या इतरांशी परिचय होऊ लागला. सुरुवातीला थोडासा संकोच होता . की आमच्या वयाचा दरारा . .की आम्ही डॉक्टर असल्याची एक (उगाचच) आदरयुक्त भीती? माहित नाही. खरं तर आमच्या डॉक्टरकीची तथाकथित झूल आम्ही वर्गाबाहेर काढूनच कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच वर्गात शिरायचो.पण एकदा ओळख झाल्यावर मात्र यातलं काहीच आड आलं नाही आणि छान मैत्री झाली. आधी फोन नंबर घेतले गेले, मग फेसबुक रिक्वेस्ट केली गेली. यातनं निसर्ग,मानसी, संजय,सौमित्र  या आमच्यापेक्षा खूप लहान तर वर्गात आमच्या शेजारी बसणाऱ्या आणि साधारण वयाने आमच्याच आगे मागे असणाऱ्या स्वप्ना, शिल्पा, पल्लवी, सीमा, सुप्रिया अशा वर्गमित्र-मैत्रिणींशी ओळख वाढली. पण यात सुरुवातीलाच एक वेगळा पेच निर्माण झाला, ज्याचा विचार मी कधीच केला नव्हता. निसर्गने मला विचारले-"मी तुम्हांला काय म्हणू?" अरेच्चा ! हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी त्याला म्हटलं- " काहीही म्हण..अगदी नुसतं राजेश म्हणालास तरी चालेल. पण काका म्हणू नकोस प्लीज !" (मला त्या झी च्या 'हम पांच' मालिकेची आठवण झाली. त्यात एक पूजा नावाचं पात्र असतं. तिला कोणी आण्टी म्हटलेलं चालत नसे!) नुसतं राजेश म्हणणं हे निसर्गला पटणं जड गेलं असावं. म्हणून मग आम्ही मधला मार्ग काढला. ते सगळेच आम्हांला डॉक्टर म्हणू लागले. आमच्या शिक्षिकांनाही हा पेच जाणवला होता की काय माहित नाही.कारण दोघीही आमच्यापेक्षा लहानच होत्या. (ऋचा मॅडमच्या बाबतीत एक गंमतशीर योगायोग सांगता येईल. त्यांचा नवरा म्हणजे आमचा शाळकरी मित्र मनोज फोंडगे! दुनिया गोल आहे म्हणतात ते असं !)

                                                                 २

भाषेची ओळख आणखी चांगल्या प्रकारे व्हावी या दृष्टीने इथे दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याला Februar Fest (फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेला उत्सव या अर्थाने) असे म्हटले जात असले तरी याची सुरुवात डिसेंबरपासूनच होते.वर्गात एक दिवस जर्मन पाककला दिवस साजरा केला जातो.(Kochtag). नंतर वेगवेगळ्या वर्गांनी केलेल्या जर्मन पाककृतींवर आधारित स्पर्धाही घेतली जाते. या स्पर्धेला जर्मन परीक्षक असतात. ते केलेल्या पदार्थांची चव घेतात शिवाय तुम्हांला त्यांना पदार्थ कसा केला(सामुग्री सह) हे सगळं जर्मन मध्ये बोलून सांगावे लागते. आम्ही वर्गात सगळ्यांनी मिळून Kartoffelsalat आणि Obstsalat असे दोन पदार्थ केले होते. खूप धमाल केली होती तेव्हा. 
या Fest मध्येच extempore भाषणाची एक स्पर्धा होती. ऐनवेळी दिलेल्या विषयावर जर्मनमध्ये बोलायचं अशी ती स्पर्धा. मी नाव दिलं (शिक्षिकांच्या आग्रहाखातर) खरं पण मनात धाकधूक होती. सगळ्यांसमोर जर्मनमध्ये कशाला एरवीसुद्धा बोलताना दडपण येतं! पण एकदा ठरवलं होतं ना की काही न लाजता, भीडभाड न बाळगता मजा घ्यायची! आणि खरंच मजा आली. थोडंसं बोलताही आलं.तसंच आम्ही जर्मन ग्रुप साँग मध्येही भाग घेतला. आमच्यासाठी मृण्मयी मॅडमनी एक छान गाणं शोधलं होतं. (Der Postbote klingelt was bringt er mir) त्याची त्या आमच्याकडून practice ही करून घेत.  जर्मन व्याकरणातल्या Wechsel Preposition वर आधारित हे गाणं होतं. त्यात मानसी आणि संजयने मायमिंग केलं आणि आमच्या १०-१२ जणांच्या ग्रुपने ते म्हटलं होतं. आमच्यादृष्टीने गाणं चांगलं बसलं होतं पण आम्हांला बक्षीस नाही मिळालं तरी ते गाणं डोक्यात एकदम पक्कं झालं.
                                                                ३
याच Fest चा एक भाग म्हणून एक एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. सर्टिफिकेटचेच आमचे १४-१५ वर्ग होते. त्यामुळे तशी चांगली स्पर्धा होण्याची शक्यता होती. साधारण १५-२० मिनिटांचे नाटक जर्मन भाषेत सादर करणे अपेक्षित होते. आधी यात भाग घेऊ नये असं वाटत होतं. किती ठिकाणी (उगाचच) मिरवायचं असं वाटायचं. आधी आमच्या वर्गातून आणखी कोणीतरी नाटक लिहिणार होतं. पण ते कशामुळे माहित नाही वेळेत लिहिलं गेलं नाही. आम्हांला आमच्या पुस्तकाव्यतिरिक्त सरावासाठी काही उतारे मृण्मयी मॅडमनी दिले होते. त्यातले बरेचसे विनोदी होते. माझा एक गैरसमज होता की जर्मन लोकं खूप गंभीर असतात. त्यांना विनोदाचे वावडे असते. तो गैरसमज मोडीत काढणारे ते उतारे होते. त्यात भाषेतल्या गमतीजमती होत्या, त्यांच्या स्वभावावर मार्मिक टिपण्णी होती. नर्मविनोदी शैली होती. मला वाटतं जर्मन लोकांना गडगडाटी हास्याचे किंवा विनोदाचे वावडे असावे पण खुसखुशीत विनोदाला त्यांची ना नसावी ! तर अशा काही उताऱ्यांना जोडून, त्यात एक गोष्ट घालून एक कट-पेस्ट नाटक मी तयार केले. त्यातही continuity आणायला आणि नाटक जर्मन लोकांचे वाटावे या करता आणि अर्थातच व्याकरण आणि इतर गोष्टींसाठी मृण्मयी मॅडम यांनी खूप मदत केली. नाटकात  निसर्ग, विवेक, संजय मी हे तर होतोच पण त्याबरोबरच आदित्य, ऋजुता आणि सुप्रिया हे पण होते. ऋजुता जर्मन मध्ये बी ए करत होती आणि तिचे जर्मन उच्चार खूप छान होते. तिला नाटकात एक मोठे स्वगत होते. ते ती अगदी सहज म्हणत असे. सगळ्यात कमाल केली ती सुप्रियाने. खरं तर त्या लांब कल्याणीनगरहून येत. पण नियमित येत. घरचं दोन मुलांचं करून येत आणि उत्साहाने नाटकात सहभाग घेत. नाटक नवविवाहित जोडप्याच्या प्रेमळ समज-गैरसमजावर आधारित होतं. यात मुख्य भूमिका संजय आणि ऋजुता यांनी केली होती. नाटकात आम्ही काही क्लूप्त्या केल्या होत्या. त्यात कलाकारांचा curtain call होता  आणि Das Ende (The End) ची अक्षरं प्रत्येकाच्या हातात होती. नाटकात मध्येमध्ये मोझार्टचे पीसेस होते.एकूण नाटक जमून आलं असावं. बक्षीस मिळावं या साठी हा खटाटोप नव्हताच. नाटक लिहिण्यापासून ते बसवण्यापर्यंतची आणि सादर करण्यापर्यंतची प्रक्रिया खूप काही शिकवून गेली, आनंद देऊन गेली आणि जुन्या कॉलेजच्या दिवसांची आठवणही यामुळे झाली. नाटकासाठी आमच्या दोन्ही शिक्षिकांचे मार्गदर्शन आम्हांला उपयुक्त ठरले.   
नाटकाला पहिलं बक्षीस मिळालं. मग याचा प्रयोग बाल शिक्षण शाळेच्या ऑडीटोरीयम मध्ये जर्मन पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला. तसं बघितलं तर हे सगळं खूपच छोटं होतं. आता विचार करता ते आणखी छोटं वाटतं. त्यात खरंच असं जग जिंकल्यासारखं काही नव्हतं. एवढंच होतं की आम्ही उत्साहाने हे सगळं केलं. याने अभ्यासक्रमाशिवाय भाषा कशी असते याचा एक छोटासा अंदाज बांधता आला. पण हे नाटक हा काही आमच्या शिकण्याचा परमोच्च क्षण होता का? कदाचित नाही… 
                                                                                                                                   (क्रमश:)

No comments:

Post a Comment