Tuesday, 12 December 2017

सिनेमा आणि आठवणी २

सिनेमा आणि आठवणी २
आता आठवलं तर असं लक्षात येतंय की माझी मोठी बहीण (मुग्धा) आणि मी -आम्ही खूप सिनेमे पाहिले आहेत. आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे काही तद्दन बेकार सिनेमेही पाहिले आहेत. पण यामुळेच की काय माहीत नाही. आम्हांला प्रत्येक सिनेमात काही ना काही चांगलं दिसतंच ! आणि माझी अशी थेअरी आहे की सिनेमात काम करणाऱ्या जवळपास सगळ्या नट्या दिसायला छानच आहेत( त्याला कदाचित प्रिया राजवंश हा एकमेव अपवाद असू शकेल !) असो. थोडं विषयांतर झालं.
सिनेमे आणि ते पाहिल्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींकडे पुन्हा वळतो-
१. माझ्या उभ्या आयुष्यात हे मी एकदाच अनुभवलं आहे. तुमच्या बाबतीत किती वेळा असं घडलंय ते मला जरूर सांगा. पुण्यातल्या वसंत टॉकीजमध्ये मी ऋषी कपूर- जयाप्रदाचा 'सरगम' पिक्चर पाहिला होता. आणि सिनेमात कुठलंही गाणं सुरु झालं की एक अभूतपूर्व प्रकार घडे. अचानक सगळीकडून लोकं पैसे फेकू लागत. अक्षरश: पाऊस !त्यातल्या त्यात 'डफलीवाले' या गाण्याला मला वाटतं सगळ्यांत जास्त पैसे फेकले गेले असतील. सिनेमातली गाणी आवडतात, त्यावर टाळ्या शिट्ट्या पडतात हे माहित होतं. पण पैसे पडलेले मी पहिल्यांदाच पाहिलं. या सगळ्या चिल्लर-नाण्यांचं पुढे काय झालं किंवा यात नेमकं कोण मालामाल झालं हे ही कधी कळलं नाही.

२. ऋषी कपूरच्याच आणखी एका सिनेमाची आठवण आहे. मला वाटतं ते १९८०-८१ साल असावं. माझ्या आते-बहिणीची(सौ उषाताई) मंगळागौर आमच्या घरी करण्यात आली होती. आणि त्यासाठी मी शाळेतून लवकर घरी आलो होतो... खास परवानगी काढून. आमच्या क्लास टीचरांनी अर्थातच नाखुशीनेच परवानगी दिली होती. त्यांना खरा कार्यक्रम काय होता हे कळलं असतं तर ती मला कधीही मिळू शकली नसती. आमच्या आईने मंगळागौरीचा एक वेगळाच कार्यक्रम ठेवला होता. तो म्हणजे आमच्या घरी प्रोजेक्टर वर सिनेमा दाखवण्याचा ! ती जिथे नोकरी करत होती( B J मेडिकल कॉलेज, PSM dept शी संलग्न एक NGO) तिथे श्री जहागिरदार म्हणून एक गृहस्थ होते. त्यांचं तिथे फिल्म स्क्रिनिंग करणे हेच काम होतं. त्यांच्याकडून हा सगळा योग जुळवून आणला. घरच्या हॉलच्या भिंतीवर सगळ्यांनी मिळून आम्ही 'खेल खेल में' हा पिक्चर पाहिला. ( आता हाच सिनेमा का? याला काही उत्तर नाही. याचीच रिळं मिळाली म्हणून असेल !) मला हे खूप थ्रिलिंग वाटत होतं. म्हणजे थिएटर मध्ये जो प्रोजेक्टर बघत आलो त्या प्रोजेक्टरच्या अगदी शेजारी बसून मी सिनेमा बघत होतो. नुसती धमाल होती! शिवाय सिनेमातला तो देवकुमार-जो व्हिलन वाटे पण नंतर त्याचं रहस्य कळतं - तो येतो तेव्हाचं पार्शवसंगीत, किंवा एकूणच सगळाच सिनेमा अगदी जवळून बघायचा अनुभव वेगळाच होता.

३. आम्हांला आमच्या शाळेनेही काही सिनेमे दाखवले. शाळेच्या पटांगणात, जिथे आम्ही एरवी बोअरिंग पी टी च्या कवायती करत होतो, तिथेच आम्ही गॅदरींगच्या काळात आणि तेही रात्रीच्या वेळी, सिनेमेही पाहिले. (पांढऱ्या पडद्यावर !) एक मात्र आहे. सिनेमे खूप चांगले होते असं नाही. उदा- 'चरस' 'यादों की बारात' वगैरे.. पण याने आम्हांला आलेल्या मजेत तसूभरही कमी आली नाही !

                                                                                                                                                                       

४. कॉलेजच्या काळात घडलेला हा प्रसंग आहे. आमचा १४-१५ जणांचा मित्र- मैत्रिणींचा ग्रुप होता. पण आम्हां ४-५ जणांना सोडून बाकीचे सगळे निलायम थिएटरला पिक्चर बघायला गेले. गोष्ट तशी छोटी होती. पण तेव्हा आम्हांला ती खटकली होती. मग आम्ही ठरवलं की ते सगळे ज्या सिनेमाला गेले होते त्याच सिनेमाला आपणही जायचं. अगदी खुन्नस घेऊन! आणि त्यांना इंटरव्हलला मुद्दाम भेटायचं. आम्ही चौघे थिएटरवर पोचलो खरे पण चौघांच्या तिकिटाचे पैसे आमच्याकडे होते की नाही हे पाहिलंच नव्हतं. मग अगदी चिल्लर नाणी वगैरे काढून जेमतेम ते पैसे भरले. पिक्चर कुठला? तर अनिल कपूरचा डबल रोल असलेला 'किशन कन्हैय्या'! इंटरव्हलला सगळ्यांना भेटलो वगैरे... सिनेमा इतका OTT ( Over The Top) होता की काही विचारायची सोय नाही! त्यामुळे 'त्या' ग्रुप मधला आमचा एक मित्र आणि आम्ही चौघे क्लायमॅक्सची १५-२० मिनिटं उरलेली असताना सिनेमा सोडून निघून आलो ! (अर्थात सिनेमा बघण्याचा मूळ हेतू साध्य झाला होताच!)

                                                                                                                                                 .... (क्रमश:)

No comments:

Post a Comment