Tuesday, 26 December 2017

वाढदिवसाच्या शुभेच्छा संजीव फडतरे !


(या प्रसंगातील व्यक्ती खऱ्या आहेत परंतु प्रसंग काल्पनिक आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही)

संजीव फडतरे
हे आहे 'ABP न्यूज नेटवर्क' आणि तुम्ही पाहात आहात 'ABP माझा'... उघडा डोळे बघा नीट... 

अश्विन बापट(थंडीत आपण आपले हात एकमेकांवर घासतो तसं घासत) : नमस्कार! मी अश्विन बापट... सकाळच्या सातच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. एक नजर आताच्या मुख्य घडामोडींकडे.. बघूया हेडलाईन्स... 
राजीव खांडेकर(मुख्य संपादक)(त्यांच्या नाकातल्या आवाजात अश्विन बापटांना मध्येच तोडतात ): अरे... अश्विन... हेडलाईन्सकडे वळण्याआधी पुण्याहून एक आगळीवेगळी बातमी येत आहे.तर आपण आता आपल्या पुण्याच्या वार्ताहराकडे थेट जाऊया... बघूया काय ब्रेकिंग न्यूज आहे... 
आता स्क्रीनवर पुण्याचे  रिपोर्टर मंदार गोंजारी दिसतात... अतिशय उत्साहात आणि तार 
स्वरात बोलतात.. 
मंदार गोंजारी: अश्विन आणि राजीव सर... पुणेकर जे आहेत ते नेहमीच टिंगलीचा विषय बनतात. मग त्यांच्या स्वभावाचा विषय असेल किंवा पुणेरी पाट्या असतील... पण आज मी तुम्हांला पुणेकरांचं एक एकदम वेगळं रूप दाखवणार आहे... मी आत्ता उभा आहे पुण्यातील कल्पक सोसायटीमध्ये... आणि जर कॅमेरा पॅन केला तर तुम्हांला इथल्या माहोलचा अंदाज येईल... (कॅमेरा सगळीकडे फिरतो) तर आता तुम्ही पाहताय की पुण्याच्या सकाळच्या थंडीतसुद्धा इथे केवढी गर्दी जमली आहे. पण गर्दी असली तरी गोंधळ नाहीये...लोकं छान रांगेत उभी आहेत... रांग खूप लांबपर्यंत गेलेली आहे.  सगळे जे आहेत ते एकदम आनंदात दिसत आहेत...लोकं आहेत ती ग्रुप जो आहे तो करून उभी आहेत... प्रत्येक ग्रुपच्या हातात फ्लेक्सचे बॅनर आहेत... त्यावर त्या ग्रुपचं नाव दिसतंय... त्या ग्रुपचा लोगो दिसतोय... तर आता आपण यातल्या काही लोकांशी बोलूया... हा पहिला ग्रुप... यातल्या फ्लेक्स बॅनरवर लिहिलंय- 'कटारिया हाफ चडडी १९८५ तर्फे संजीवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !' या ग्रुप मध्ये सुमारे ५० लोकं दिसतायत. प्रत्येकाकडे काही ना काही प्रेझेंट आहे. कोणाच्या हातात केक जो आहे तो दिसतोय तर कोणाकडे बुके... कोणाकडे डिकॅथलॉन मधल्या स्पोर्ट ऍक्सेसरीज.. कोण आहेत संजीव? ही एवढी गर्दी त्यांच्यासाठी का जमली आहे? ते आता आपण जाणून घेऊया. बोलूया या कटारिया ग्रुप मधल्याच एका मित्राशी... 
मंदार गोंजारी: तुमचं नाव?
राजेश मेहता: राजेश मेहता 
मंदार गोंजारी: आज इकडे हे सगळं काय आहे? तुम्ही सगळे इथे कशासाठी जमला आहात?
राजेश मेहता( त्याच्या सॉफ्ट आवाजात) : आम्ही सगळे संजीवचे शाळेतले मित्र आहोत आणि(थोडंसं त्रासिकपणे- रिपोर्टरला वाचताही येत नाही का असे भाव चेहऱ्यावर !)आम्ही का जमलो आहोत ते या बॅनरवर लिहिलं आहे... आज आमचा सगळ्यांचा जिवलग मित्र संजीव फडतरे याचा वाढदिवस आहे. आमच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी आमच्या पाठीशी असणारा, चेष्टा-मस्करी करणारा पण नेहमीच मैत्रीला मानणारा, जपणारा असा आमचा हा मित्र ! त्याला शुभेच्छा द्यायला आम्ही जमलोय. फक्त आम्हीच नाही तर आमच्या शाळेतले सर- जोशी सर, घाणेकर सर हे पण आलेले आहेत... एवढंच नाही तर आजच्या वाढदिवसासाठी दुबईवरून आमचा मित्र अतुल ओझा आणि कॅनडावरून यतीन पेंढारकरही आलेले आहेत... 
(कटारिया मधले सगळे मित्र- 3 Cheers for Sanjeev... Hip Hip Hurray... असं म्हणून आसमंत दणाणून सोडतात.) 
मंदार गोंजारी: तर तुम्ही बघितलं की श्री संजीव फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सगळे किती उत्साहाने इथे आले आहेत. कटारियाच्या या ग्रुपच्या मागे अनेक ग्रुप्स आहेत- इथे Whistling Wilds आहे... Life Begins after 40s आहे... ट्रेकिंगचा ग्रुप आह ... प्रत्येक जण श्री फडतरे यांना शुभेच्छा द्यायला आलेला आहे. पुढे Diamond Watch Co चे लोक आहेत त्यांच्या मागे अखिल तुळशीबाग व्यापारी संघटनेचे लोक आहेत... त्यांच्यामागे अखिल पुणे व्यापारी संघटनेचे लोकं आहेत... कितीतरी क्रीडासंघटनेचे ग्रुप्स आहेत... एखाद्या राजकारण्याला लाजवेल इतका जनसंपर्क श्री संजीव फडतरे यांचा दिसतोय... (अचानक लगबग वाढते. गलका होतो) राजकारण्यांचं नाव घेताच इथे दस्तुरखुद्द पुण्याचे पालकमंत्री आलेले आहेत. (मंदार धावत धावत त्यांच्याकडे  जातात  आणि दमछाक झालेल्या आवाजातच त्यांना विचारतात)
मंदार गोंजारी: हे सगळं... वातावरण... बघून तुम्हांला नेमकं काय ... वाटतंय?
पालकमंत्री:सर्वप्रथम...(छोटा pause) आज...(मोठा pause) याठिकाणी .... मी माननीय श्री संजीवरावजी फडतरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो... इथली गर्दी... इथे जमलेला जनसमुदाय बघून खरं तर मला श्री फडतरे साहेबांचा हेवाच वाटतोय... किती वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे जमली आहेत... ते ही उत्स्फूर्तपणे... केवढ्या प्रेमाने इथे आले आहेत सगळे.. त्यांचा जनसंपर्क किती मोठा आहे... नाहीतर आम्हांला आमच्या सभांसाठी लोकांना किती कष्ट घेऊन बोलवावं लागतं आणि तरीही लोकं येतील याची काही खात्री देता येत नाही!(मिष्किलपणे हसतात !)  आज या निमित्ताने मी श्री फडतरे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या मागे एवढे समर्थक आहेत तर त्यांनी सक्रिय राजकारणात यावं ... त्यांच्यासारख्या चांगल्या लोकांची आम्हांला नेहमीच गरज असते. असंही २०१९ आता फार लांब नाही... पुण्यात विधानसभेसाठी त्यांनी विचार करायला काहीच हरकत नाही... अर्थात हे माझं वैयक्तिक.... 
मंदार गोंजारी:( पालकमंत्र्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत बोलणं सुरु करतात. पालकमंत्री अवाक!आणि अर्थातच फ्रेमच्या बाहेर!): तर अश्विन, इथे मी एक ब्रेकिंग न्यूज देऊ शकतो... जी फक्त ABP माझा कडेच तुम्ही बघू शकताय... पुण्याच्या पालकमंत्र्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार नक्की केलाय... 
अश्विन बापट(स्टुडिओमधून) : नक्कीच मंदार ही एक मोठी बातमी आहे  आजची... त्यावर आपण दिवसभर चर्चा करणारच आहोत... खरं तर एक ब्रेक घेण्याची वेळ केव्हाच होऊन गेली आहे पण आपण एक अतिशय वेगळी अशी बातमी बघतोय... एक आगळावेगळा वाढदिवस सोहळा याचि देहि याची डोळा पाहतोय... तेव्हा ब्रेक न घेता आपण असाच कार्यक्रम सुरु ठेवूया... मंदार तू इतका वेळ आमच्याशी बोलतोयस... तुझ्यामागे मला काही मांडव दिसतायत..खाण्याचे स्टॉल दिसतायत. तिथे नेमकं काय चाललंय? 
मंदार गोंजारी: हो अश्विन... बरोबर आहे तुझं... हे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. मला असं कळलंय की श्री संजीव फडतरे फूडी आहेत. ते नेहमीच नवनवीन हॉटेल्समध्ये जात असतात. आणि त्यांची हॉटेल मालकांबरोबर छान मैत्रीही आहे. म्हणूनच आज सगळ्या हॉटेल्सनी इथे स्टॉल्स टाकले आहेत. 'नागब्रम्हा', 'अण्णाज इडली' इथून दाक्षिणात्य पदार्थ, 'सुशील'चे पोहे, विजय टॉकीजजवळचा पिठलं वडापाव, पुण्यातल्या सर्व नामवंत मिसळी इथपासून ते निलेश थोरपे यांचा 'अहिल्याज थाळी' या मांसाहारी पदार्थांचा स्टॉलही इथे आहे. कोणीही या आणि कितीही खा असा आजचा कार्यक्रम आहे ! आणि हे सगळे आपणहून आलेले आहेत श्री फडतरे यांना शुभेच्छा द्यायला... 
अश्विन बापट: मंदार... तू म्हणतोयस सगळे शुभेच्छा द्यायला आलेले आहेत... पण ज्यांचा आज वाढदिवस आहे.. म्हणजेच आजची उत्सवमूर्ती आहे तरी कुठे? 
मंदार गोंजारी: अश्विन... मी सुद्धा खूप प्रयत्न करतोय श्री. फडतरे साहेबांपर्यंत पोचण्याचा...  पण या गर्दीमुळे मला काही ते जमत नाहीये...आता शेवटचा प्रयत्न करून बघतो...
(मग कॅमेरामनसह धावत धावत संजीवच्या घरी गर्दीतून वाट काढत जातात. घरी नमन आणि ऋतुजा फोनवरून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. तर सपना आलेल्या लोकांशी बोलत असते)
मंदार गोंजारी (सपनाशी बोलतात) : नमस्कार... मी 'ABP माझा' चा रिपोर्टर.. मला श्री. संजीव फडतरेंना भेटायचं आहे.. त्यांचं अभिनंदन करायचं आहे... मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलंय... आता प्रत्यक्ष भेटायचंय... बोलवा ना त्यांना... कुठे आतल्या रूममध्ये आहेत का ते? 
सपना: कोण.... संजू? संजू इथे नाहीये... 
मंदार गोंजारी(प्रचंड धक्का बसलेल्या आवाजात): काय? ते इथे नाहीत? मग कुठे आहेत?
सपना:आज एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे याचा त्याला कालच अंदाज आला होता. अशा गोष्टींमुळे तो अगदी संकोचतो. म्हणून तो आणि त्याचे काही मित्र  काल रात्रीच  पुण्याबाहेर गेले आहेत पक्षीनिरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी... कुठे गेले आहेत हे खरं तर मला माहित आहे. पण मी तुम्हांला सांगणार नाही.... नाही तर तुम्ही लोक तिकडेही जाल त्याच्यामागे... 
मंदार गोंजारी(आवाजात थोडी निराशा)ज्या व्यक्तीचा असा वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा होतोय ती व्यक्ती मात्र पुण्याबाहेर गेलेली आहे. एक हुरहूर लावणारी ही गोष्ट आहे...तर मी मंदार गोंजारी तुम्हांला आता 'ABP माझा'च्या स्टुडिओकडे परत नेतोय...
अश्विन बापट: धन्यवाद मंदार... तुझ्या या सविस्तर रिपोर्टींग बद्दल! खरंच श्री. फडतरे यांच्याशी आपल्याला बोलायला मिळालं असतं तर नक्कीच ते सर्व प्रेक्षकांना आवडलं असतं... पण पुन्हा कधीतरी ! आता मात्र खरोखरच ब्रेक घेऊया... तुम्ही कुठेही जाऊ नका.. पाहत राहा फक्त 'ABP माझा'...  




No comments:

Post a Comment