Friday, 16 March 2018

चव रेंगाळत राहील असा 'गुलाबजाम'....

हे म्हणजे खरं तर वरातीमागून घोडे होतंय.. पण काय करणार? आमच्या घरी बारावीच्या परीक्षेमुळे कर्फ्यु ऑर्डर होती... बारावीच्या परीक्षेचं ग्रहण सुटल्यावर दुसऱ्याच दिवशी आम्ही 'गुलाबजाम' पाहिला.. एव्हाना सगळ्यांनी तो पाहिला असेलच ! पण तरीही सिनेमा बघून त्याबद्दल मला काय वाटलं ते लिहावंसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच !  

सचिन कुंडलकरांचे याआधी मी 'निरोप', 'हॅपी जर्नी' आणि 'राजवाडे अँड सन्स' हे तीनच सिनेमे पाहिले आहेत. तिन्ही सिनेमी मला आवडले होते . मला ते look wise पण खूप आवडले होते. 'गुलाबजाम' हा खाद्य पदार्थ हा प्रमुख धागा असलेला सिनेमा कसा दिसेल याची म्हणूनच मला खूप उत्सुकता होती. पाककलेच्या पुस्तकातच बेमालूम मिश्रण केलेल्या  आगळ्या श्रेयनामावलीपासूनच सिनेमाने पकड घ्यायला सुरुवात केली. सिनेमा दृक-श्राव्य माध्यम आहे पण कुठल्याही खाद्यपदार्थाचा परिपूर्ण अनुभव आपण आपल्या पंचेंद्रियांनी घेत असतो. म्हणूनच त्याचा वास आणि स्वादही तेवढाच महत्त्वाचा ! 'गुलाबजाम'च्या दिग्दर्शक(अर्थातच सचिन कुंडलकर), फूड डिझायनर (सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट) आणि सिनेमॅटोग्राफर (मिलिंद जोग) यांचं यश म्हटलं पाहिजे की त्यांनी सर्व पदार्थ इतके सुंदर पेश केले आहेत की ते बघूनसुद्धा आपल्याला त्यांचा दरवळ यावा आणि ते  खात असल्याचा अनुभव यावा ! अहो साधी ढोबळी मिरचीची पीठ पेरलेली भाजी असो वा शेवग्याची आमटी, शेवई यंत्रातून बाहेर येणारी शेवई, कांदा भजी, सुरळीची वडी असो वा साग्रसंगीत पारंपरिक मराठी जेवण वा अगदी मासेसुद्धा ...  सगळं इतकं छान दिसतं की बस्स ! सिनेमाचं नावच 'गुलाबजाम' असल्यामुळे ते तर मस्तच दिसतात. विशेषतः  गुलाबजाम पाकात पडत असताना त्याचा नाजूक रव आणि त्या पाकात त्याचा तरंग उमटणं हे तर केवळ अप्रतिम ! माझ्यामते बऱ्याच वेळा खाद्यपदार्थ करताना आणि ते झालेले दाखवताना वर कॅमेरा ठेवून चित्रण करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचं छान सादरीकरण झालंय. 

संपूर्ण सिनेमात खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. पण म्हणून त्याच्यातच फक्त फील-गुड फॅक्टर आहे असं नाही. सिनेमात आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) राधा( सोनाली कुलकर्णी)ने बनवलेले गुलाबजाम खाऊन नॉस्टॅलजिक होतो. त्याला थेट त्याचं लहानपण आणि त्याची आई आठवते. 'गुलाबजाम' बघून आपणही अशा खाद्यपदार्थ आणि त्यांच्याशी जोडले गेलेले अनुभव यांच्या आठवणींमध्ये रमू लागतो आणि आपला हा प्रवास सिनेमा संपल्यावरसुद्धा सुरूच राहतो. माझ्याही खाण्याशी संबंधित असंख्य आठवणी आहेत. त्या सांगत बसणं म्हणजे अगदीच विषयांतर होईल . पण एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. एकदा लहानपणी मी माझे काका-काकू आणि चुलत भावंडांबरोबर नगर-शिर्डी असे फिरायला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस... दिवसभर वेळी अवेळी खाणं, उन्हात प्रवास आणि वणवण झाली होती. संध्याकाळी बाभूळगाव मध्ये काकांच्या ओळखीच्यांकडे रात्रीचं राहायला उतरलो होतो. आम्ही जिथे राहिलो नावही आता आठवत नाही पण त्या माऊलीने केलेल्या गरम गरम वरण भाताची चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. असा वरण भात मी आजपर्यंत कधीच खाल्लेला नाही. तर या सिनेमामुळे अशा आठवणींना उजाळा मिळाला. 

सिनेमा जरी राधा आणि आदित्य यांच्या नात्याबद्दलचा असला तरी त्यांना जोडणारा धागा स्वयंपाकाचा आहे. आणि या स्वयंपाकाबद्दल खुसखुशीत संवादातून लेखक-संवादलेखक(सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक) खूप काही सांगून जातात. म्हणजे अगदी स्वयंपाक करणे म्हणजे किराणा भुसार आणण्यापासून ते भांडी घासणे इथपर्यंत सगळं आलं पाहिजे ते  स्वयंपाक करताना हात स्वच्छ धुतले पाहिजेत इथपासून ते स्वयंपाक करताना आपण आपला अंश त्यात मिसळा पाहिजे म्हणजे त्या पदार्थाला चव येते यासारखे संवाद स्वयंपाक या कलेबद्दल भाष्य करतात. 

सिनेमाचा गाभा हा राधा आणि आदित्य यांचं नातं आहे. गुरु-शिष्य अशा प्रकारे सुरु झालेलं नातं नंतर खुलत जातं, बहरत जातं आणि दोघांनाही त्यांच्यातल्या स्व ची जाणीव करून समृद्ध करतं. या नात्यात मैत्री आहे, निखळ प्रेम आहे आणि आहे care ही  ! कुठल्याही नात्याचं लेबल लावता न येणारं हे नातं छान उलगडत जातं. म्हणूनच शेवटच्या प्रसंगात आदित्यने राधासाठी गुलाबजाम करणं ही गुरु कडून शिकलेली कला गुरूला गुरुदक्षिणा स्वरूपात परत देणं इतकाच मर्यादित अर्थ वाटत नाही. तर विशुद्ध प्रेमापोटी एका सर्जक मनाने गुलाबजामच्या रूपात मागे ठेवलेली ती एक आठवण वाटते. 

सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही सुरेख काम केलंय. आदित्य आणि राधा या व्यक्तिरेखा या दोघांना डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या होत्या की काय माहित नाही इतकं चपखल काम केलंय त्यांनी! दोघांनीही त्या व्यक्तिरेखांचे वेगवेगळे कंगोरे छान सादर केले आहेत. रेणुका शहाणे, रोहित हळदीकर,समर नखाते आणि चिन्मय उदगीरकर यांचे कॅमिओही छान! रुक्मिणीबाईचं काम करणाऱ्या शमीम पठाण मजा आणतात. 

मी  पुणेकर आहे. त्यामुळे सगळंच कसं चांगलं म्हणणार? सिनेमातल्या काही गोष्टी मला खटकल्या. मुख्य म्हणजे त्याची लांबी- उत्तरार्ध लांबल्यासारखा वाटतो. डायल अ शेफ चे काही प्रसंग कमी करता आले असते असं मला वाटलं . शिवाय प्रत्येक व्यक्तिरेखेला( वाड्यातल्या घराबाहेर बसलेल्या म्हाताऱ्या माणसासकट) तिच्या लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेण्याची खरोखरच गरज होती का?तसंच खासकरून रोहित हळदीकरांबरोबरच्या संवादांवेळी जाणवलं- त्यात काही वेळा प्रेक्षकाला त्यांची फक्त पाठ दिसते आणि संवाद ऐकू येतात. हे थोडंसं बरोबर नाही वाटलं. 

पण एकूण चव बराच काळ रेंगाळत राहील असा 'गुलाबजाम' खूप छान आहे आणि अजूनपर्यंत ज्यांनी तो पहिला नाही त्यांनी तो जरूर बघावा...  

No comments:

Post a Comment