Saturday 9 March 2019

अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास ! भाग १


२३ फेब्रुवारीला २०१९ आमच्या शाळेच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर सिंगापूर येथे राहणाऱ्या माझ्या अतुल बिवलकर या मित्राने संत अमृतराय यांच्या कटाव वृत्तामधील 'आनंदे वंदावा गणनायक' ही गणेश स्तुतीची ऑडिओ क्लिप पोस्ट केली. या आधीही ही क्लिप ऐकली होती. सुप्रसिद्ध संगीत अभ्यासक डॉ अशोक रानडे यांचं या कटाव वृत्ताबद्दलचं निवेदन आणि प्रत्यक्ष संगीतरचना अशी ती क्लिप आहे.निवेदनात डॉ रानडे यांनी त्यांच्या खास शैलीत अमृतराय यांच्याबद्दल नेमक्या शब्दात माहिती दिली आहे. तसेच कटाव वृत्त म्हणजे अलीकडच्या रॅप संगीताच्या जवळ जाणारा प्रकार आहे आणि ते गाण्यासाठी अतिशय अवघड आहे हे देखील सांगितलं आहे. कारण त्यातले शब्द भराभर उच्चारले पाहिजेत आणि ते बरोबर उच्चारले पाहिजेत. ही गणेश स्तुती म्हणण्यासाठी एकाग्र व्हावंच लागतं आणि त्याची लय अशी आहे की दम श्वासाची परीक्षाच आहे ! म्हणूनच ही संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं संगीत डॉ अशोक रानडे यांचंच आहे. 
डॉ अशोक रानडे 

ती ऐकणं हा खूप छान अनुभव होता. पण या गणेश वर्णनाचे शब्द फारसे काही कळले नाहीत कारण ते जुन्या काळचे अवघड शब्द आणि एका विशिष्ट लयीत केलेलं उच्चारण असल्यामुळे माझ्यासारख्याला समजायला आणि लक्षात ठेवायला अवघडच गेलं. पण हीच अडचण इतरही काही जणांना जाणवली असावी. कारण शाळेच्या ग्रुपवर त्या रचनेच्या शब्दांविषयी विचारणा झाली. पण कुणालाच त्याची माहिती नव्हती. इथून एका मनोरंजक प्रवासाची सुरुवात झाली आणि त्याचा शेवट आज होऊन ते शब्द मला मिळाले त्याचीच ही कथा !

 शब्द मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्थातच गुगल शरण गेलो ! विकिपीडियावर अमृतराय यांची माहिती
संत अमृतराय 
मिळाली(जन्म- १७ मार्च  १६९८ - मृत्यू १७५३). त्यांच्या जीवनकार्याचा माहिती मिळाली. पण या गणेश वर्णनाबद्दल काहीच हाती लागलं नाही. दुसऱ्या एका लिंकद्वारे 'केतकर ज्ञानकोश' मधील अमृतराय यांच्या साहित्यविषयक बऱ्यापैकी सविस्तर वाचायला मिळालं. त्यात त्यांनी अमृतराय यांच्या भाषेविषयी उदाहरण देताना 'सुदामचरित्रांतील जेवण' मधला एक भाग दिला आहे. अतिशय वेगळ्या प्रकारची नादमय भाषा आहे ती ! पण जे हवं होतं ते नाहीच मिळालं. असंच शोधता शोधता अमृतराय यांच्या 'अजि मी ब्रम्ह पाहिले' चे शब्द गवसले ! मला ही रचना त्यांची आहे हे देखील माहित नव्हतं ! जयजयवंती रागातली आशा भोसले यांनी गायलेली आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदर रचना या नवीन संदर्भासह ऐकताना आणखी आवडली.
https://www.youtube.com/watch?v=qQTxZx5sF1I

२३ फेब्रुवारीलाच योगायोगाने माझ्या संगीताच्या एका व्हॉट्सअँप ग्रुपवर हीच ऑडिओ क्लिप कोणीतरी पोस्ट केली. पण तिथेही त्याच्या शब्दांविषयी कोणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थोडं निराश झाल्यासारखं झालं. पण त्याच ग्रुपवर हे कळलं की ही गणेश स्तुती 'कला गणेश' या २ सीडीच्या संचातली आहे आणि गायक कलाकार आहेत- सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, प्राची दुबळे, समीर दुबळे, हर्षा बोडस इ. मग पुन्हा एकदा त्या गणेश वर्णनाचे शब्द मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या. कारण या गायक कलाकारांपैकी प्राची दुबळे आणि समीर दुबळे माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि त्यांच्या फेसबुक पोस्टवर माझा क्वचित प्रसंगी त्यांच्याशी संवादही झालेला आहे. अर्थात ही अगदीच जुजबी ओळख आहे याची कल्पना होतीच. पण मनात आलं की त्यांना विचारायला काय हरकत आहे? फार फार तर ते उत्तर देणार नाहीत किंवा माहित नाही असं सांगतील. म्हणून दोघांना इनबॉक्स मध्ये या रचनेविषयी विचारलं. आश्चर्य म्हणजे दोघांनीही तत्परतेने उत्तर दिलं. समीर दुबळे यांनी ते शब्द मिळवायचा प्रयत्न करतो असं सांगितलं तर प्राची दुबळे या तेलंगण मध्ये होत्या तरीही तिथून त्यांनी या जुन्या रेकॉर्डिंगच्या वेळच्या सह-कलाकारांना विचारून सांगते असं कळवलं.
यानंतर मध्ये एक आठवडा गेला. माझ्या मनातून हा विषय मागे पडू लागला. पुन्हा पुन्हा या मोठ्या कलाकारांना विचारून त्रास देणे मला प्रशस्त वाटले नाही. आणि सुखद धक्का म्हणजे अचानक ३ मार्चला प्राची दुबळे यांचा मेसेंजरवर मेसेज आला. त्यात त्यांनी डॉ चैतन्य कुंटे यांच्याकडे ते शब्द असतील आणि ते हिराबागजवळ असलेल्या डॉ अशोक रानडे आर्काइव्ज या केंद्रात मिळतील असं सांगितलं. तसंच या रचनेबद्दल डॉ कुंटे यांचा एक मेसेज ही दिला.तो मेसेज असा होता-
'सध्या व्हॉट्सअँपवर 'गणेश जन्माचे जुने दुर्मिळ रेकॉर्डिंग' म्हणून एका कटावाचे ध्वनिमुद्रण खूप फिरवले जातेय. मात्र त्याविषयी योग्य माहिती वा तपशील सोबत दिले जात नाहीयेत. म्हणून हे टिपण देत आहे -
१) हा कटाव 'गणेश जन्मा'चा नसून श्रीगणेशाच्या रूपलावण्याचे वर्णन करणारा आहे.
२) ज्येष्ठ संगीतज्ज्ञ, गायक व संगीतकार स्व. डॉ. अशोक दा. रानडे यांची संकल्पना, संगीतदिग्दर्शन व निरूपण असलेल्या 'कलागणेश' ह्या कार्यक्रमात हा कटाव सादर झाला होता.
३) १७व्या शतकातील मराठी कीर्तनकार कवी अमृतराय यांचे हे काव्य डॉ. अशोक दा. रानडे ह्यांनीच संगीतबद्ध केले आहे. ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना १४ मात्रांच्या आडाचौतालात निबद्ध आहे.
४) सदर ध्वनिमुद्रण श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित 'कलागणेश' ह्या २ सीडीजच्या संचातील आहे.
५) 'आनंदे वंदावा' ह्या चरणापूर्वी जे सुंदर निरूपण आहे, ते स्वतः डॉ. रानडे यांचे आहे.
६) रचनेचे गायन त्यांचे शिष्य सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, समीर व प्राची दुबळे, हर्षा भावे इ. गायकांनी केले आहे.
मकरंद कुंडले, नीला सोहोनी, राजेंद्र भावे, कृष्णा मुसळे, हरी बागडे आणि शेखर खांबेटे ह्या वादक कलाकारांची पोषक साथसंगत आहे.
- डॉ. चैतन्य कुंटे
(डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज, पुणे) '
आता हे शब्द मिळवणं आणखी सोपं झालं असं मला वाटलं कारण हे केंद्र माझ्या रोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर होते. 
शेवटी आज(८ मार्च २०१९)  मी तिथे संध्याकाळी गेलो. तिथे 'कला गणेश'  सीडींबद्दल विचारलं. तिथे अतिशय छान आणि व्यवस्थित माहिती मिळाली. पण कळलं की त्या सीडी सध्या उपलब्ध नाहीत आणि इतक्यात मिळतील असंही नाही. पुढे मागे डॉ रानडे यांच्या नावाने असलेल्या वेब साईटवर त्यातल्या रचना ऐकता येतील. पुन्हा एकदा पदरी निराशा पडणार असं वाटलं. तरी मी तिथल्या स्टाफना विचारलं- "मला त्या कटाव वृत्ताचे शब्द हवे आहेत. ते मिळतील का?" त्यांना वाटलं की मला ती क्लिप हवी आहे.
तिथल्या बाजूच्याच एका टेबलावर १-२ मुली आणि एक बाई काहीतरी वाचत बसले होते. त्यातलीच एक तरुण मुलगी माझं सगळं बोलणं ऐकत होती. तिने मग आपणहून मला विचारलं- "तुम्हांला काय हवंय?" मी म्हणालो- "ती क्लिप आहे माझ्याकडे... मला त्याचे शब्द हवे आहेत". आणि त्या मुलीने तिच्या पर्स मधून एक कागद काढून मला हसत हसत सहजपणे दिला आणि म्हणाली- "हे घ्या त्याचे शब्द !" माझा विश्वासच बसेना ! मी लगेच त्याचा फोटो काढून घेतला. तिथल्या बाकीच्यांना पण या मुलीकडे कसे काय शब्द याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा तिने सांगितलं- 'मी रेवा नातूंकडे गाणं शिकतेय आणि सध्या त्यांच्याकडे हेच शिकवत आहेत आणि डॉ कुंटे सरांकडून याच रचनेचे शब्द मिळाले !"
यात आणखी एक गंमत म्हणजे डॉ रेवा नातू या माझ्या शाळेतल्या आणखी एका मित्राची (डॉ अभिजित नातू) ची बायको ! म्हणजे मी जर अभिजितलाच विचारलं असतं तर मला हे शब्द मिळालेेही असते कदाचित! पण हा उत्कंठावर्धक प्रवास झाला नसता!
गणेश वर्णनाचे शब्द मिळाल्यामुळे मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता ! त्या आनंदात त्या मुलीचे आभार मानले. पण गोडी अपूर्णतेची थोडीशी राहिलीच ! मला चुटपुट लागून राहिली की त्या मुलीचं नाव विचारायचं राहूनच गेलं !  खरं तर ते विचारायचं कसं याचा मला खूप संकोचही वाटला.
मात्र एक छोटीशी गोष्ट खूप छान अनुभव आणि समाधान देऊन गेली.जगात खूप  चांगली माणसं असतात याचा पुन्हा प्रत्यय आला ! .. 


तर आता या गणेश स्तुतीचे शब्द देत आहे -

ओम . . . . . 
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक 

सा - 
रुंड मथन करि जननी जनक निज रुंड मालधर 
       अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय विनय 
       विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि शुंड सरळ मुनी 
       धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु विकट तुंड गण 
       पुंडरीक मणी हार प्रलंबित 

रे -    कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल 
        श्रुतीयुगी गंडस्थळी अळी  चंद्रखंडरघर गुणगण मंडित 
        किर्ती अखंडित खंड दुरित चय पंडित गामिनी 
        तांडव करि जो पदमभवांडी मंडलाकृती चंड पराक्रम 

रे -    विदण्ड खंडन विपक्ष दंडन स्वभक्त मंडन सुखात मुनिवर 
        सकल चराचर पावन करीनिज प्रसाद देवून पुरवी मनोरथ 
         विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. 

 -    परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती 
         कलीकाल कापती परनिर्दाळण करित समरी जो 

ग -    पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ 
         कटन कर वाल स्मरण ते सप्तताल करि 
म-     नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ 
         वाले वाकी पदी फुंफुंफु करि नागबंध कटि 

म'-   लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले 
          किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र घंटिका दणदणदणदण 

प -     उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती 
          धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु 

 -     धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ 
          थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा 
          सप्तस्वर मुखी भेद आलापित 

ध-      स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती 
          गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि 

नि-     प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी 
          सादर समुदायसवे आयकतो.... 

आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक.....    

माझ्याकडे या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक होता. त्याचा व्हिडिओ माझा मित्र श्रीधर अय्यर याने करून दिला आहे. त्यामुळे हे गणेश वर्णन आता इथे ऐकणं शक्य आहे.. 
https://www.youtube.com/watch?v=PAruU5DrF48

60 comments:

  1. Shreepad SM Gandhi9 March 2019 at 14:41

    तुझ्या संशोधक वृत्तीला नमस्कार असो...:)
    सगळा प्रवास अगदी वाचनीय झाला आहे...आवडलं बर्याच जणांना पण व्हॉट्सऍप वरच्या इतर गोष्टींसारखंच दोन तीन दिवसांत विस्मृतीत पण काही अंशी जातंय असं वाटतंय तोपर्यंत तुझा पुढचा टप्पा वाचायला मिळाला...खूप आभार...या सगळ्या गोष्टींंना एकदा छंद म्हणून स्वीकारल्यानंतर त्या मिळवताना झालेल्या कष्टांना आपण किती सहजतेने गंमत समजत़ जातो...I think this is passion and being passionate about something may be termed as hobby...सहज आठवलं...मला सह्या गोळा करायचा छंद होता आणि अजूनही अल्प प्रमाणांत आहे...ही प्रत्येक सही मिळवताना आलेले अनुभव मला आजही आठवल्यावर आनंद देतात...मोठी व्यक्तिमत्त्व कधीकधी कसे वागतात हे आठवायला मजेशीर वाटतं...असो...अतुल एकदा ग्रुपवर बोलला होता ना keep up the jindadili...खरंय..हा उद्योग स्वतः पुरताच करायचा हे एकदा नक्की झालं की मग कोण प्रतिसाद देतं का नाही याचं काहीच वाटेनासं होतं...पण कुणी असली जिंदादिली केली की समजून घ्यायला मला मात्र आवडतं, त्यामुळे पुन्हा एकदा तुला हॅट्स ऑफ म्हणून हात आखडता घेतो...

    ReplyDelete
  2. Rajesh what an excellent blog. Many thanks for doing all this hard work to trace the lyrics. After reading them just now it feels so nice. These words have some real power in them. Once again hats off to your dedication and passion. Jai ho!!! -Atul Bivalkar

    ReplyDelete
  3. कमाल! 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. मीही तिन दिवस शोधत होतो.. तुमच्यामुळेच शोध लवकर लागला. धन्यवाद आणि अभिनंदन.

    ReplyDelete
  5. तुमचे खूप आभार ही माहिती इतक्या चिकाटीने मिळवून इथे पोस्ट केल्या बद्दल!

    धन्यवाद!

    ReplyDelete
  6. Wah....hats off... त्या गाण्याचे शब्द मिळण्यासाठी घेतल्या गेलेल्या परिश्रमांना आणि जिद्दीला... तुमच्या त्याच कष्टांमुळे आज या गाण्याचे शब्द मला सहजरीत्या उपलब्ध झाले . खूप खूप धन्यवाद !!

    ReplyDelete
  7. हा ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार ! तुमच्या या प्रोत्साहनाने माझा लिहिण्याचा उत्साह नक्कीच वाढला आहे.

    ReplyDelete
  8. सहस्र धन्यवाद

    ReplyDelete
  9. फारच छान,धन्यवाद

    ReplyDelete
  10. नमस्कार राजेशजी. या रचनेच्या शब्दांसाठी आपण केलेलें अथक प्रयत्न वाचुन तुमच्या चिकाटीची कमाल वाटते. संत कवी श्री अमृतराय महाराज यांच्या रचनांचे पुस्तक अमृतराय संस्थान पैठण यांनी प्रकाशित केले आहे.
    तुम्हाला अजून काही रचना हव्या असतील तर अवश्य संपर्क साधा.
    rahul.talegaonkar@gmail.com

    ReplyDelete
  11. श्री राजेशजी,

    हि ऑडिओ क्लिप आज माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आज आली. जणू खुप दुर्मिळ असा सांगीतिक ठेवाच गवसला. गुगुलवर शोध घेताच तुमचा ब्लॉग वाचनात आला. तुम्ही घेतलेली मेहनत सुफळ झाली ह्याचा आनंद तर आहेच पण तुम्ही ती ब्लॉगच्या माध्यमातून उपलध केली हे अप्रतिम.
    डॉ अशोक रानडे यांचे संगीत क्षेत्रातील कार्य अफाट आहेच. आपल्या जुन्या दुर्मिळ संगीतातील खजिना आताच्या पिढीला उपलब्ध करून दिला .

    २५ वर्षा पूर्वी असाच एक कार्यक्रम " बैठकीची लावणी " डॉ रानडे सादर करायचे. पु ल निसुद्धा हा कार्यक्रम गौरवला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाची ऑडिओ कॅसेट काढली होती ती आता उपलब्ध नाही. तुमच्या सांगीतिक ग्रुपवर ह्या बैठकींच्या लावणी कार्यक्रमाची माहिती आणि ऑडिओ क्लिप्स कुणाकडे आहेत ह्याची चौकशी करावी.

    धन्यवाद !
    दीपक इरप
    ( फोन : ९८३३०५८५३७ )

    ReplyDelete
  12. @ दीपक इरप माझा ब्लॉग वाचून तो आवडल्याचे मला कळवल्याबद्दल मनापासून आभार ! 'डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज'मध्ये या बैठकीच्या लावणीबद्दल चौकशी करावी असं वाटतंय. कारण तिथे डॉ रानडे यांच्या सी डी पुनर्प्रकाशित करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे असं कळलं होतं...

    ReplyDelete
  13. @राहुल तळेगांवकर जी... नमस्कार! तुमच्या कॉमेन्टला उत्तर द्यायला उशीरच झाला. त्याबद्दल क्षमस्व ! माझा ब्लॉग वाचून त्यावर तुम्ही कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद !
    संत कवी श्री अमृतराय महाराज यांच्या रचनांचे पुस्तक कुठे मिळू शकेल? कृपया याची माहिती दिलीत तर बरं होईल!

    ReplyDelete
    Replies
    1. राजेशजी, तुमचा पत्ता खालील क्रमांकावर पाठवा.
      मी तुम्हाला कुरीअर करतो.
      ९०२८३३९०५९
      - राहुल तळेगांवकर

      Delete
    2. राहुलजी मला ही पाठवाल का?
      7506825067

      Delete
  14. नमस्कार, तुमच्या ब्लॉग मध्ये डॉ. रेवा नातू हा कटाव शिकवत आहेत असा उल्लेख केला आहे. डॉ रेवा नातू आणि त्यांचे शिष्य - शिष्या संगीताचे विविध दुर्मिळ प्रकार जसे की त्रिवट, चतरंग, पंचरंग, रागमाला, धृपद, कटाव, तराणा, लक्षणगीत इत्यादी एका कार्यक्रमात सादर करणार आहेत. त्यामध्ये हा कटाव सादर होईल.

    दिनांक 21 जुलै 2019, वेळ सायं 5-8, स्थळ happy colony सभागृह. प्रवेश विनामूल्य.

    तरी सर्वांनी जरूर यावे.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार .

      या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही परंतु त्यातील प्रकार ऐकण्याची खूप मनापासून इच्छा आहे

      ऑडिओ क्लिप उपलब्ध असल्यास पाठवू शकाल का प्लीज ?

      ९४२२२७४६८९

      Delete
  15. @स्नेहल नाईक - या माहितीबद्दल धन्यवाद! मी या कार्यक्रमाला नक्की येईन...

    ReplyDelete
  16. मला आजच ही ध्वनीफित माझ्या मित्राकडून मिळाली. संपूर्ण ऐकल्यावर मला माझ्या सवयी प्रमाणे या स्तुतीचे गद्य मिळते का म्हणुन गूगल वर पाहिले कारण एवढे दुर्मिळ काव्य गद्य सहित मिळणे तुमच्या ब्लॉग मुळे शक्य झाले. धन्यवाद तुमच्या शोध प्रवृत्तीला. त्यामुळे योग्य माहिती आम्हास प्राप्त झाली.

    ReplyDelete
  17. @Tushar Patil- The pleasure is all mine!

    ReplyDelete
  18. रचना मिळविण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नाला त्रिवार वंदन.
    खूप खूप धन्यवाद!!

    ReplyDelete
  19. पुसाळकर..तुमच्या चिकाटीला सलाम!

    ReplyDelete
  20. नमस्कार राजेशजी ! मला हा कटाव कानसेन या संगीत विषयक whatsapp group वर ऐकायला मिळाला.स्वतः आकाशवाणी मध्ये निवेदिका असल्याने आवाज साधना , श्वासांवर नियंत्रण,एकाग्रता, अशा सगळ्या दृष्टीने याच महत्व जाणवलं.
    साहजिकच याचे शब्द मिळाले तर बर होईल,या दृष्टीने गुगल केलं, आणि तुमचा लेख मिळाला. तुम्ही चिकाटीने केलेला पाठपुरावठा,या प्रवासात तुम्हाला आलेले अनुभव सगळं अफलातून. जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्टही तुमच्याकडे खेचली जाते हेच खरं. मनापासून धन्यवाद.

    अंजली पाटणकर

    ReplyDelete
  21. ऐकलेले सुमधुर शब्द वाचायला ही मिळाले.केवळ तुमच्यामुळे.
    -धन्यवाद.!

    ReplyDelete
  22. नमस्कार राजेशजी.
    एका घरगुती व्हॉट्सप समूहावर कटाव ऐकला. कुतूहलाने कटाव वृत्त गूगळलं तर काय? तुमचा हा आख्खा लेखच खजिन्यासारखा हाती लागला....तुमच्वाया शोधक आणि संशोधक वृत्ततीला प्रणाम
    मुग्धा रिसबूड

    ReplyDelete
    Replies
    1. मुग्धा रिसबुड जी...
      आपला *गुगळलं* हा शब्द आवडला.माझ्या मराठी च्या शब्दसंचयात अगदी चपखलपणे रुजु झाला.धन्यवाद| बाकी राजेश पुसळकरांच्या लेखाला पुढे प्रतिक्रिया! नव्हे प्रतिसाद देत आहे. अवश्य वाचावा. श्रीकांत गुर्जर

      Delete
  23. @ अंजली पाटणकर, मुग्धा रिसबूड - ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल मनापासून आभार !

    ReplyDelete
  24. Rajesh, I found your blog very useful for understanding KATAV. Also, greatly appreciate, your desire to collect information and your efforts to reach your goal.
    I am not good at writing in Marathi, hence posting my comments on English.

    ReplyDelete
  25. नमस्कार राजेसाहेब कटावबद्दल छान माहिती .प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांनी लोकसाहित्य सदृश खूप रचना केल्यात त्यांच्यावर लेख लिहिताना कटावर अडले होते.आपल्यामुळे काम सोपे झाले .धन्यवाद !!!

    ReplyDelete
  26. नमस्कार राजेशजी.


    मी मूळ नाशिकचा. पण पुण्यात येत असतो. 
    श्री अमृतराय महाराज यांच्यावर माझा गायन अभ्यास व एक छोटे कामही सुरू आहे.  योग असल्यास आपण जरूर भेटू.

    संत कवी श्री अमृतराय महाराज यांच्या रचनांचे पुस्तक अमृतराय संस्थान पैठण यांनी प्रकाशित केले आहे. ते माझ्याकडे आहे. तुम्हाला हवे असेल तर अवश्य संपर्क साधा.


    या रचनेच्या शब्दांसाठी आपण केलेलें अथक प्रयत्न  तुमच्या चिकाटीची खरच कमाल आहे.

    ९४२२२७४६८९

    ReplyDelete
    Replies
    1. श्री अमृतराय महाराज यांचा आहे आहे नाही नाही ही या शब्दार्थाची कविता मिळू शकेल का?
      माझे नाव मुकुंद देशपांडे भ्रमणध्वनी ८४५४८४१३८४
      आभारी आहे.

      Delete
    2. नमस्कार मुकुंदजी. अमृतराय महाराज यांची आहे 'आहे नाही नाही' हि गझल तुम्हाला whatsapp वर पाठवतो.

      Delete
  27. Whatsapp var audio aala hota. Shodh ghet ithvar aalo. Sone zale. Faarach bhannat vrutta ani tumchya shodhacha pravaas. Avadya.
    -Kedra P

    ReplyDelete
  28. राजेश जी

    मूळ ध्वनिफीत ऐकल्यानंतर शब्दांबद्दल उत्कंठा होती, आपल्यामुळे ती पूर्ण झाली. आपले मनःपूर्वक धन्यवाद.

    ओंकार बर्वे

    ReplyDelete
  29. Rajesh ji,

    This morning I received the WhatsApp from a friend of my brother and I forwarded it some of my friends trying to find out about the Katav Vrutta, finally I landed on your blog.

    I admire your perseverance. Thanks ton for getting to the bottom of it and finally posting the lyrics. Most of all thank you for correction to the WhatsApp post.

    I am sharing your blog with the friends who shared the recording with me and also those whom I forwarded the post.

    Thanks Once Again,

    Raja Kirkire

    ReplyDelete
  30. @Raja Kirkire ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल मनापासून आभार !

    ReplyDelete
  31. Ashaky apratim . jevdh apratim he katav pady ahe tevdhach apratim tumcha lekh. tumchya sanshodhan vruttila salaaam

    ReplyDelete
  32. After listening audio clip, it is getting realised that it is nothing but "breathless". But then I became curious for the script, which you have made it available.
    Thank you so much from the bottom of my heart. - Vijay Pathak

    ReplyDelete
  33. राजेश पुसळकरजी...
    नमस्कार

    ReplyDelete
  34. राजेशजी नमस्कार मी खूप दिवसांपासून हे शब्द शोधत होतो अचानक तुमच्या ब्लॉगवर पोचलो. मनःपूर्वक धन्यवाद!
    शिरीष जगदाळे

    ReplyDelete
  35. योगेश एकतारे23 August 2020 at 10:42

    खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद

    ReplyDelete
  36. नमस्कार. हे कटाववृत्त साधारण वर्षभरापूर्वी मी ऐकलं होतं. मला ते खूप आवडलं. पण काळाच्या ओघात थोडंसं विस्मरणही झालं. आज पुन्हा आपला लेख, त्याचे शब्द मिळवण्याचे कष्ट वाचनात आले. खरंच आपल्या चिकाटीला त्रिवार नमस्कार... आपल्या सारखे सुजाण या जगात आहेत तोपर्यंत मराठी गानपरंपरेची पताका अशीच मानाने फडकत राहिल. अभिनंदन!!
    मिलिंद सावंत, गोवा

    ReplyDelete
  37. Dear Rajesh ji,

    Namaskar,

    Many thanks for your efforts to present this to all of us. Can you please share the meaning of lyrics.

    ReplyDelete
  38. Gele 2 varsh he katav baryach vela aikat aahe. lekh vachun khup mahiti milali, Aprateem lihile, gayale aahe.
    1998 shankar mahadevan yanche Breathless asech gayan aahe.

    ReplyDelete
  39. अतिशय सुंदर !ह्या माहितीबद्दल मनापासून आभार !

    ReplyDelete
  40. अमृतराय, कटाव वृत्त,अशोकजी रानडे आणि शब्द मिळवण्यासाठी चा तुमचा प्रवास, त्यांचं शब्दांकन हे सगळं खूप भावलं. पद्याचे शब्द स्वररचनेसहित मिळावेत याचा विलक्षण आनंद झाला.. मनापासून आभार..

    ReplyDelete
  41. सलाम आपल्या जिद्द,चिकाटी,प्रयत्न आणि संशोधक वृत्तीला,कटाव रचनेचे शब्द आपणामुळे मिळालेत त्यांचा आनंद,समाधान शब्दातीत आहे 🙏

    ReplyDelete
  42. तुमच्यासारखे कलाकार,आणि जाणकार आहेत म्हणून आम्ही लहान कलाकार बहरत असतो ..खूप धन्यवाद!!!

    ReplyDelete
  43. अतिशय मोलाचे धन उपलब्ध करून तुम्ही देत आहात. शब्दातीत भाव. 🙏

    ReplyDelete
  44. माझा ब्लॉग वाचून त्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार- डॉ प्रतिभा जी, पल्लवी माळगावकर जी, मंजिरी गोखले जी..

    ReplyDelete
  45. आनंद झाला. आज सकाळी हा कटाव परत एकदा माझ्या पर्यंत पोचला. मागच्या वेळीही ते ऐकून खूप प्रभावित झालो होतोच. आज परत एकदा तीच अनुभूती आली. म्हणून ते शब्द लिहून काढण्यासाठी कागद पेन घेऊन समोर बसलो. पण दोन-तीन ओळीच्या पुढे काही समजेना. थोडा हताश झालो.
    पण मग गुगल शरण गेलो आणि तुमच्या या ब्लॉग पर्यंत पोहोचलो. तुम्ही केलेलं संशोधन तपशीलवार वाचलं आणि त्या खालच्या कॉमेंट्स देखील तपशीलवार वाचल्या. खूपच आनंददायी आहे हे सगळं. शोध
    ते शब्द शोधून आमच्यासारख्या पर्यंत पोचवलेत याबद्दल तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.

    ReplyDelete
  46. नमस्कार. मी डॉ.अशोक रानडे यांची यासंबंधातली मुलाखत दूरदर्शनवर पाहिली आणि ऐकली होती. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आणि कटावाचे शब्द तुमच्या ब्लॉगवर मिळाले. धन्यवाद
    आनंद घारे

    ReplyDelete
  47. माझा ब्लॉग वाचून तो आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून आभार !

    ReplyDelete
  48. Hello sir, thank you so much for sharing this valuable details. I am looking for Marathi or Hindi or English translation for 'Katav'.Please guide me if any one of this is available.

    ReplyDelete