Saturday 1 May 2021

एका सच्च्या लेखकाला भेटलो त्याची गोष्ट!

 

                         १                                                

१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. एक अतिशय वेगळा आणि चांगला योगायोग म्हणजे याच दिवशी आणि याच वर्षी सुप्रसिद्ध मराठी लेखक डॉ मिलिंद बोकील यांचाही जन्म झाला. डॉ बोकील हे केवळ लेखकच नाहीत  तर समाजशास्त्राचे, मानवशास्त्राचे, पुरातत्त्वशास्त्राचेही अभ्यासक आहेत आणि त्यांची 'शाळा' या लोकप्रिय कादंबरी व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.  

कुठलाही लेखक/ साहित्यकार  आपल्याला त्याच्या कलाकृतीमधून 'भेटत' असतो. तशी


पहिल्यांदा माझी त्यांची ओळख त्यांच्या ' जनाचे अनुभव पुसतां' या पुस्तकाद्वारे झाली. कुठल्यातरी वृत्तपत्रात त्याचे परीक्षण वाचले होते. त्यानंतर मला  ते पुस्तक वाचायची अक्षरश: ओढच लागली. खरं तर हे पुस्तक नॉन फिक्शन प्रकारातलं ! माणूस, विकास आणि पर्यावरण या घटकांमधल्या नातेसंबंधांबद्दल संशोधनात्मक/अभ्यासपूर्वक लिहिलेल्या सहा लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक ! समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून महाराष्ट्रात  विविध ठिकाणी होत असलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन या पुस्तकात आहे. वरवर पाहता हा विषय अतिशय रुक्ष वाटेल. पण या पुस्तकातून डॉ बोकील यांनी असा विषय देखील त्यांच्या प्रवाही लेखनशैली तसंच अतिशय  शांत, संयत मांडणी यामुळे रोचक केला आहे. पुस्तकामुळे मी इतका प्रभावित झालो की लगेच त्यांना एक सविस्तर पत्र लिहिलं . पण पुस्तकात त्यांचा पत्ता दिलेला नव्हता. मग 'मौज' प्रकाशनगृहाच्या पत्त्यावर पत्र  पाठवलं. मध्ये बरेच दिवस गेले पण त्यांच्या कडून काही उत्तर आलं  नाही. असंही ते येणं अवघडच होतं म्हणा ! 'मौज' ला ते पत्र मिळणं, त्यांना ते पत्र डॉ बोकीलांना पाठवण्या योग्य वाटणं, त्यांनी ते पाठवणं, डॉ बोकीलांनी ते वाचणं आणि मग मला उत्तर देणं !  पण एके दिवशी मला खरंच डॉ बोकीलांचं पोस्टकार्ड आलं आणि माझा विश्वासच बसेना ! सुवाच्य,ठसठशीत अक्षर, कुठेही खाडाखोड नाही पोस्टकार्डाच्या मर्यादित जागेत देखील खूप काही लिहिता येतं याचा ते पत्र म्हणजे एक वस्तुपाठच होतं. माझे पत्र त्यांनी काळजीपूर्वक वाचलं  होतं  आणि त्यावर त्यांनी मुद्देसूद उत्तर दिलं होतं  आणि शेवटी त्यांच्या घरचा पत्ताही दिला होता . 

अशी ही पत्राद्वारे त्यांची झालेली अनोखी भेट!  

                           २                          


मग त्यानंतर मी 'शाळा' ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी वाचली आणि त्यावरही त्यांना एक मोठं पत्र लिहिलं. वयात येतानाच्या काळात विशेषतः मुलांच्या मनातील भावनांचे परिणामकारक चित्रण असलेली 'शाळा' कादंबरी सगळ्यांनाच त्यांच्या शाळेतल्या वयात, त्या आठवणींच्या गावात घेऊन जाते. मीही असाच नॉस्टॅलजिक होऊन ते पत्र लिहिलं.  त्याचंही त्यांनी उत्तर दिलं आणि मला प्रत्यक्ष भेटायलाच बोलावलं ! त्यांचा लँडलाईन नंबर देऊन फोन करून वेळ ठरवू असंही त्यात लिहिलं. हा माझ्यासाठी एक  मोठा आश्चर्याचा धक्का होता ! खरं तर मी एक सर्वसामान्य वाचक यापलीकडे कोणीही नव्हतो. तरीही  त्यांनी मला आपणहून भेटायला बोलावणं म्हणजे खरोखरच कमाल होती. त्यांच्या पुस्तकांमधून, पत्ररूपाने मी त्यांना भेटलो होतोच पण 'कवी दिसतो कसा आननी' या उक्तीप्रमाणे मला त्यांना प्रत्यक्ष भेटायचं होतंच ! 


त्यावेळी ते एका एनजीओ मध्ये काम करत होते आणि मी त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना भेटलो . प्रत्यक्ष भेटीत देखील ते अतिशय साधे, लेखकाचा कुठलाही  तोरा, बडेजाव नसलेले , शांतपणे बोलणारे, दुसऱ्याचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेणारे असे वाटले. त्यावेळी तिथे त्यांना भेटायला पत्रकार आल्हाद गोडबोले आले होते. तेव्हा डॉ बोकीलांनी माझी ओळख- "हे माझे मित्र डॉ पुसाळकर अशी करून दिली !"  

                           ३         

नंतरही आमच्या पत्ररूपी आणि प्रत्यक्ष भेटी झाल्या. प्रत्येक भेटीत ते नेहमी माझी आस्थेने चौकशी करत आणि सविस्तर बोलण्यासाठी भेटायला बोलावत. एकदा तर मी माझ्या बाबांच्या पंचाहत्तरी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रति-आहेर म्हणून मिलिंद बोकीलांची पुस्तकं भेट द्यायचं ठरवलं आणि त्या प्रत्येक पुस्तकावर त्यांची सही घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी पुस्तकांवर सह्या केल्या होत्या. 'समुद्र ', 'रण' 'दुर्ग' यासारखी स्त्री-पुरुष नातेसंबंधांवरची वेगळ्या धाटणीची पुस्तकं लिहिणाऱ्या लेखकाला मी मात्र तेव्हा 'इजाजत' सिनेमाची डिव्हीडी दिली हे मला आता आपण खूपच खुजेपणाने वागलो की काय असं वाटलं!  

                           ४          

कितीतरी कलाकार/लेखक आपलं वैयक्तिक आयुष्य वाचकांपुढे तितक्या सहजतेने मांडत नाहीत. मग यात लेखकाचं कुटुंब असो किंवा लेखकाची राजकीय/सामाजिक विचारसरणी! त्यातून जर त्या लेखक/कलाकाराची मतं थोडी वेगळी असतील तर ती जाहीरपणे मांडली असता त्यामुळे आपला प्रेक्षक/वाचक आपण गमावून बसू की काय या भीतीपोटी लेखक/कलाकार ती मतं मांडत नाहीत. दोन्ही बाबतीत मला डॉ मिलिंद बोकील हे अपवाद वाटतात. फेब्रुवारी २०१६ च्या 'साप्ताहिक साधना' च्या अंकात त्यांनी 'विवेकवाद आणि धर्मचिकित्सा' हा लेख लिहिला होता. त्यात त्यांच्या आईच्या आजारपणाबद्दल आणि तिच्या मृत्यूनंतरच्या काळाबद्दल(त्यांनी कुठलेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार केले आणि नंतरही कुठलेही दिवस केले नाहीत )  लिहिले आहे. २०२०च्या दोन दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या आई-वडिलांविषयी अतिशय स्नेहादरपूर्वक  पण तरीही विलक्षण तटस्थतेने लिहिले आहे. आपल्या आई वडिलांविषयी अशा तटस्थतेने लिहिणे हे खरोखर खूप अवघड आहे. 

एकदा पुणे विद्यापीठात त्यांचं ग्रामसभांच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण या विषयावर व्याख्यान होतं. ते मात्र मला खूप आदर्शवादी वाटलं होतं. भारताच्या एकंदरीत राजकीय व्यवस्थेत गाव हे एकक बनून ते बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण होणं ही दुरापास्त गोष्ट आहे असं मला तेव्हा वाटलं होतं. पण त्यानंतर त्यांचं 'गोष्ट मेंढा गावा ची' या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा नावाच्या छोट्या गावाचं लोकसहभागातून झालेलं परिवर्तन वाचून अचंबित झालो.     



आणीबाणीच्या काळात साहित्यिक दुर्गाबाई भागवत, पु ल देशपांडे, काही पत्रकार यांनी सुस्पष्ट आणि खंबीर भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात कविवर्य वसंत बापट यांनी सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले होते. पण अलीकडच्या काळात इतक्या स्पष्टपणे लेखक आपली राजकीय भूमिका जाहीर कार्यक्रमात व्यक्त करताना मी तरी पाहिले नव्हते. पण २०१९ साली राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात एका साहित्यविषयक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ बोकीलांनी अशीच ठाम आणि अभिनिवेशविरहित भूमिका मांडली होती आणि उपस्थित श्रोत्यांना सुखद धक्काच बसला होता. सध्याच्या काळात असं बोलणं हे किती धाडसाचं आहे हे सूज्ञांस सांगणे न लगे!

एक लेखक म्हणून ते किती श्रेष्ठ आहेत हे मी सांगण्याची गरजच  नाही( 'राजहंस' प्रकाशनचे श्री. दिलीप माजगांवकर एकदा म्हणाले होते की मिलिंद बोकील यांची पुस्तकं राजहंस कडून प्रकाशित झाली नाहीत याची त्यांना खंत वाटते, यातच सर्व काही आले!) त्याच बरोबर एक माणूस म्हणूनही त्यांच्या वागण्यात अंतर्बाह्य खरेपणा, साधेपणा आणि पारदर्शकता याचा अनुभव मला आला. 

आधी पुस्तकांतून भेटलेले, नंतर पत्रांतून दिसलेले आणि मग प्रत्यक्ष भेटींमधून अनुभवलेले डॉ बोकील यांच्या या तिन्ही रूपात मला कुठेही विसंगती दिसली नाही. उलट लेखक आणि व्यक्ती यांच्यात एक सुंदर अद्वैत दिसले आणि म्हणून मला ते आणखी आवडले!

डॉ मिलिंद बोकील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!  

 

5 comments:

Mugdha said...

नेहेमी प्रमाणे सहज छान लिहिलं आहे. Flow चांगला आहे... ब्लॉग द्वारे अगदी personal भेट झाली डॉक्टर मिलिंद बोकीलांची असं वाटलं...

Shruti Chatterjee said...

Thanks for sharing so much information about this great personality. You have excellent command over Marathi & English language. It is always our pleasure

Mrunmayee said...

I really liked your article, Dr! Especially the last line. Such people are becoming rare.

Smruti Pusalkar said...

Commenting in English because your Marathi typing is a prototype which I have yet to match. Although I haven't read his books, don't know much about him personally, you have made me imagine a person who I would want to know more about. That's the power of your writing. Although I don't fully agree that writers are becoming increasingly apolitical or are not expressing their political views. I believe any person in that position needs introspection and gain a level of maturity. But I do believe that this meet-cute must've been both pleasurable and nerve-wracking for you.

Prashant khunte said...

मिलिंद बोकिलांचं 'कातकरी' हे पुस्तक ही तितकंच महत्त्वाचं. गवत्या ही कादंबरी मात्र मला रूचली नाही, कारण माझ्या मते ती कादंबरी त्यांच्या एका कथेचाच विस्तार आहे ती मुळ कथा इतकी सुंदर आहे, की त्या कथेसाठी बोकीलांवर जीव ओवाळून टाकावा अशी माझी भावना झालेली, म्हणून गवत्या वाचून मी काहीसा रूसलो ...तेवढं एकतर्फी प्रेम करावं असे बोकील आहेतच.. मला वाटतं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद घेण्याच्या फंदात न पडता लेखकीय धर्म नि बाणा टिकवून ठेवलेल्या लेखकांतील बोकील हे विलुप्लप्राय लेखक उरले असावेत, मेंढा लेखा पुस्तकाचं प्रकाशन पर भाषण करताना ते म्हणालेले, "मी लोकशाहीचा कारकून आहे" इतकी थोर व विरळा नम्रता असलेल्या माझ्याही अत्यंत प्रिय आवडत्या लेखकास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व तुम्हा आम्हा सर्वांना च शुभेच्छा कारण बोकील लिहिताहेत...लिहितील...