Friday, 13 August 2021

चल मेरे दिल लहराके चल ...

 

माझी मैत्रीण डॉ मंजिरी वैद्य हिने जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेले हे चित्र  



प्रत्येक घराची एक संस्कृती असते. तशी आमच्या घराची साहित्य-वाचन-कला संस्कृती होती. पण आमच्याकडे कधीही क्रीडा संस्कृती नव्हती. म्हणूनच की काय मी कधीच  कुठल्याही खेळ प्रकारात सहभागी झालो नाही. माझी मजल आपली बैठया खेळांपुरतीच ! क्रिकेट हा समस्त भारतीय लोकांचा आवडीचा खेळ आहे, तसाच तो माझाही ! पण त्यासाठी तो खेळ खेळावा थोडाच लागतो ! सोफ्यावर मस्त पहुडत त्याची मजा घ्यायची असते. खेळ हा माझ्यासाठी एक करमणुकीचा विषय आहे. खरं तर 'The Confessions of a born spectator' ही कविता Ogden Nash यांनी माझ्यावरच बेतली आहे की काय असं मला वाटतं. म्हणजे सगळेच जर खेळू लागले तर मग त्यांना खेळताना बघणार कोण? त्यांचं खेळातील प्रावीण्य /कौशल्य याचं कौतुक करणार कोण? ते काम आम्ही इमाने इतबारे करतो ! कारण खेळ म्हटलं की परिश्रम आले, स्पर्धा आली आणि या दोन्ही गोष्टींपासून मी जरासा लांबच असतो ! त्यातल्या त्यात कॉलेजच्या काळात मी थोडंफार सायकलिंग केलं होतं. पण ते काही स्पर्धात्मक नव्हतं. माझं घर ते सिंहगड सायकलने, मग पायी गड  चढणे आणि परत सायकलने घरी असं दोन-तीनदा केलं, एकदा पुणे ते सासवड असाही  सायकल प्रवास केला होता. पण तो काळच वेगळा होता!!

वयाच्या साधारण चाळीशी-पंचेचाळीशी नंतर बहुतांश लोकांना नॉस्टॅलजियाचे अटॅक येऊ लागतात. पूर्वी आपण केलेल्या (किंवा खरं तर न करू शकलेल्या) गोष्टी (पुन्हा) करायची एक खुमखुमी निर्माण होते. 'अजून यौवनात मी' हे सिद्ध करावंसं वाटतं ! कुठलातरी व्यायाम करणं हे या वयात अपरिहार्यपणे स्वीकारावं लागत असतंच. एकच प्रकारचा व्यायाम करून तोचतोपणा येत असतो. असंच काहीसं माझंही झालं. मला  चालणं या व्यायामाचा कंटाळा येऊ लागला. आमच्या घरी माझ्या मुलीसाठी आणलेली सायकल बराच काळ धूळ खात पडून होती. सायकलिंग हा असा व्यायामप्रकार आहे की तो तुम्ही एकट्यानेही करू शकता. शिवाय तुमचे स्पर्धक फक्त तुम्हीच असता ! म्हणून एक दिवस अचानक एक सणक डोक्यात आली आणि मी ती सायकल दुरुस्त करून आणली आणि ठरवलं की आता सायकलिंग करायचं !  ते वाढवत नेत एक दिवस पुन्हा सिंहगड गाठायचा ! ही साधारण मे महिन्यातली गोष्ट असेल. बऱ्याच बाबतीत मी आरंभशूर आहे. त्यामुळे मला वाटलं होतं की दोन चार दिवसांत माझ्या डोक्यातली ही हवा थंड होऊन जाईल. पण माझा मलाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला!  साधारण मे महिन्याच्या मध्यापासून  जवळपास ७०-७५ दिवसांच्या काळात आजपर्यंत मी सुमारे ७५० ( कदाचित थोडी जास्तच!) किलोमीटर सायकल चालवली आहे. 

या सायकल प्रवासादरम्यान माझी काही निरीक्षणं/माझे विचार  पुढीलप्रमाणे -

१) खरं तर माझी गिअरची सायकल आहे. पण मला सांगायला लाज वाटते की ते सायकलचे गिअर प्रकरण मला काही नीटसं झेपत नाही. म्हणून मी सायकल एकाच गिअर मध्ये किंवा गिअर नसल्यासारखीच  चालवतो‌. त्याचा फायदा असा की जो काही व्यायाम होतो तो पूर्णपणे स्वकष्टार्जित असतो. त्यात स्वयंचलित असं काही नसतं. म्हणूनच की काय सायकलिंग नंतर मला अतिशय फ्रेश, उत्साही वाटतं. कधीच दमल्यासारखं वाटत नाही. मोकळ्या हवेत, अंगावर सकाळचा गार वारा घेत, सायकल मारत जाणं याचा आनंद काय वर्णावा! अर्थात याचा तोटा असाही आहे की माझा वेग फारच कमी असतो. साधारण तासाला बारा किलोमीटर!( हल्ली तो सुधारतोय) पण नाहीतरी मला कुठे लगेच टूर डी फ्रान्सला जायचंय! त्यामुळे मी याचा फार विचार करत नाही. सायकल चालवायला लागल्यावर अचानक  माझ्याच वयाचे अनेक सायकलपटू मला झुपकन ओव्हरटेक करून जाताना दिसू लागले आहेत. त्यांच्या फॅन्सी सायकली, त्यांचे सायकलिंगसाठीचे खास पेहराव, हेल्मेटस् सगळं बघून अचंबित व्हायला होतं. कधीतरी असा विचार डोकावतोच- 'भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?' पण हा विचार मी झटकून टाकतो. कारण अशा तुलनेला काही सीमाच नसते. शिवाय प्रत्येकाची प्रकृती निराळी आणि तपश्चर्याही! तशी प्रत्येकाची गतीही निराळी! आपण त्या माणसाच्या स्टॅमिना आणि फिटनेसला सलाम करावा आणि आपले पाय मारत पुढे जावं हे बेहत्तर!

२) अमूक किमी सायकल चालवल्यावर अमूक किलो वजन कमी होईल, अमूक इंच पोट कमी होईल अशी कोणतीच रिटर्न अॉन इन्व्हेसमेन्टची अपेक्षा न ठेवता सायकल चालवावी असं मला वाटतं. हे म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेत श्रीमद् भगवद्गीतेचा कर्माचा सिद्धांत सांगितल्याप्रमाणे झालं! पण खरंच सायकलिंगचा निर्मळ आनंद घ्यायचा असेल तर ती निरपेक्षपणे चालवावी‌. वजन कमी होईल तेव्हा होईल! 

३) रोज त्याच त्याच रस्त्याने जाण्यापेक्षा नवनवीन मार्गावर सायकल चालवण्याचा मी प्रयत्न करतो. यामुळे रूक्षपणा टाळता येतो आणि आता आज कुठल्या मार्गाने जावं हा विचारसुध्दा सायकल चालवण्यासाठी एक नवा उत्साह देतो. अर्थात काही वेळा हा उत्साह अंगाशी येऊ शकतो कारण तुम्ही मारे ठरवता एका मोठ्या चढावर जायचं‌. पण मध्यावर आल्यावर लक्षात येतं की हे काही जमणं शक्य नाही. पण मग आहात तिथून उलटं फिरावं, माघार घेण्यात कोणताही कमीपणा / पराभव वाटायचं कारण नाही. सरावाने पुन्हा तो चढ सर करता येईलच की! 

४) व्यायामात सातत्य राखण्यासाठी काही काळानंतर Motivation ची गरज निर्माण होऊ शकते. प्रत्येकाचा motivator वेगवेगळा असू शकतो. माझा motivator Strava अॅप आहे. आपल्यासाठी अॅप आहे की आपण अॅपसाठी हा तात्विक प्रश्न आपण तात्पुरता बाजूला ठेवून देऊ. पण हे अॅप वापरू लागल्यावर त्यात आपली दररोज एंट्री पडली पाहिजे ही इच्छा होऊ लागली आणि त्यातून मग सातत्य निर्माण झालं. मी काही Strava चा Brand Ambassador नाही पण तरीही हे अॅप जे कोणी सायकलिंग करतात किंवा चालण्याचा व्यायाम करतात त्यांनी जरूर वापरावं. ते अगदी शंभर टक्के अचूक असेल असं नाही पण आपण त्या त्या दिवशी कितपत व्यायाम केला आहे याचा अंदाज यातून नक्कीच येतो.

५) सायकल चालवताना सगळ्यात जास्त अडचण केव्हा जाणवत असेल तर ती चढावरून जाताना! शिवाय जर समोरून वारा येत असेल तर आणखी अडथळा येतो. रोजच्या सरावाने आणि अनुभवाने लक्षात येऊ लागतं की काही वेळा आपण उगाच या चढाची भीती बाळगत असतो. सुरुवातीला वाटतं तेवढा दमछाक करणारा चढ असतोच असं नाही. आणि अगदी लागत असेल दम तर आपण मध्येच थोडावेळ थांबू शकतो आणि पुन्हा पुढे जाऊ  शकतो. कधी ना कधी हा चढ संपून उतार येणार असतो याची आपल्याला खात्री असली की या श्रमाचं वाटेनासं होतं. 

६) सायकल चालवताना जाणवतं की you have all the time in the world! आजूबाजूचे सगळेच वाघ मागे लागल्यासारखे वेगात जात असतात. एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे शेजारून वाहन जातं तेव्हा क्षणभर दचकायला होत असतं. हे सगळे लोक एवढ्या घाईघाईने नेमके कुठे जात असतात असा एक भाबडा प्रश्न आपल्याला पडतो कारण आपण निवांत आणि निश्चिंत असतो.आपल्याला कसलीही घाई नसते.  या ठेहरावाच्या काळातला क्षण अन् क्षण आपण अनुभवावा. प्रसंगी गाणं म्हणत जावं. (असंही सध्याच्या मास्कच्या जमान्यात आपण गाणं म्हणतोय हे कोणाच्या लक्षातही येत नाही!) सर्व कोलाहलात देखील मन:शांती अनुभवता येईल इतकं सायकलिंग meditative वाटतं. 

७) आपल्या हाताशी वेळ असल्याने आपण आजूबाजूला बघत बघत जाऊ शकतो. यामुळे शहराची अक्षरशः नव्याने ओळख झाल्यासारखं वाटतं. कितीतरी रस्त्यांची नावं, कितीतरी गल्ली-बोळ, रस्त्यावर सुशोभीकरण करण्यात आलेले म्युरल, कितीतरी दुकानं, देवळं, पाट्या इ. हे सगळं काही मला सायकलिंग करू लागल्यावर जास्त चांगल्या प्रकारे लक्षात आलं आहे. 

८) कोणे एके काळी पुणे हे सायकलींचं शहर होतं. पण आता ते तसं अजिबात राहिलं नाही. त्यामुळे आपल्याला पुण्यातील गर्दीच्या रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन सायकल चालवावी लागते. एरवी दिवसभरात तुम्ही मारे दुचाकी वा चारचाकी चालवत असाल पण सायकल चालवताना तुम्ही एक य:कश्चित पदार्थच  आहात हे विसरता कामा नये. जंगलात जशी प्राण्यांची एक उतरंड (hierarchy) असते ज्यात वाघ सर्वोच्च स्थानी तर हरिण -ससा- किडे- मुंग्या वगैरे उतरत्या क्रमाने प्राणी असतात. तशी रस्त्यावरील वाहनांची पण एक उतरंड असते. यात ट्रक, बस, चारचाकी, रिक्षा हे सगळेच वाघ असतात. सायकलवाले किडा-मुंग्यांपेक्षाही खालच्या पातळीवर ! जंगलातले प्राणी आपापल्या औकातीत राहतात. कधी हरणाने सश्यावर हल्ला केलाय असं ऐकिवात नाही. पण दुचाकीस्वार मात्र सायकलस्वारावर धावून जातात हे मी स्वानुभवातून सांगू शकतो. रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे वळताना आपण व्यवस्थित मागे बघून, कानोसा घेऊन हात दाखवून जात असतो. तेवढ्यात मागून मोटरसायकलस्वार जोरात येतो आणि करकचून ब्रेक दाबून कसाबसा आपली आणि त्याची धडक टाळतो. वर आपल्याकडे बघून काहीतरी खाणाखुणा करतो. आपल्या अकलेचे वाभाडे काढतो. आपण मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं. सांगायचा प्रयत्न करायचा - चूक तुमची आहे. कधी उपयोग होतो तर कधी नाही! शेवटी -तुम्ही महान..आम्ही लहान..असं म्हणून सोडून द्यायचं !  काही वाहनचालक आपली शाळा घेतात- चालत्या गाडीतून आपल्याला शिकवत जातात- असं नाही, असं वळायचं. आपण पडती बाजू घेऊन त्यांना ठेंगा दाखवून आभार मानायचे. सायकल चालवायला लागल्यावर एक मात्र झालं आहे. मी जेव्हा इतर वाहनं चालवत असतो तेव्हा मी सायकलस्वारांकडे जास्त सजगपणे आणि थोडंसं सहृदयी नजरेने बघू लागलो आहे.

आता इतके दिवस मी सायकल चालवत आहे तर मी सिंहगडपर्यंत जाऊ शकलो आहे का? तर अजून तरी नाही. पण मला कुठे घाई आहे? जाऊ हळूहळू कासवगतीने! पण म्हणतात ना- Make hay while the sun shines! - तसं जोवर जमतंय तोवर सायकल चालवून घ्यावी! ईप्सित ठिकाणी पोचेन, न पोचेन पण प्रवासाचा आनंद तर नक्की घेईन ! 
( दर्दी संगीतप्रेमींच्या या ब्लॉगच्या शीर्षकावरून लक्षात आलं असेलच की 'चल मेरे दिल लहराके चल' हे 'इशारा ' या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं  गाणं आहे. पडद्यावर नायक सायकल चालवताना गाणं म्हणत आहे. केवळ याचसाठी हे गाणं निवडलं आहे. अन्यथा जॉय मुखर्जीचं गाणं निवडणं तसं अवघडच! या गाण्याची लिंक देत आहे-

9 comments:

  1. Congratulations on single handedly making me and aai extremely envious of your health-habits. But well done you!! Can't wait to see more strava patterns and you racing to Sinhagad or even bigger heights!!

    ReplyDelete
  2. खूपच छान लेखन. तुझ्या सायकलसवारीच्या अनुभवाचे लेखन पुन्हा एकदा पुलंची आठवण करुन देते. नाॅस्टॅलजियाचे अटॅक असतात हेही समजले. BTW जाॅय मुखर्जीसारखी सायकल मला पण चालवता येईल.एकाच जागी उभं राहून...��

    ReplyDelete
  3. सायकलस्वारी छानच. पण त्यातून आलेलं हे शहाणपण फारच छान! तेही बरंच काही शिकवून गेलं.

    ReplyDelete
  4. वर्णन नेहेमी प्रमाणे छान! आपणच सायकल चालवत नव्या खाणाखुणा बघतोय किंवा म्युरल बघतोय असं वाटलं! सिंहगडावर लवकरच पोहोचण्यासाठी शुभेच्छा! अंजली नी म्हंटल्याप्रमाणे पू. ल. ची आठवण झाली! Minute observations ची कमाल आहे!
    Happy cycling

    ReplyDelete
  5. नेहेमी प्रमाणे अप्रतिम शब्दांकन. ओघवती भाषा निर्मळ आनंददायी आहे. असेच लिहीत रहा.

    ReplyDelete
  6. Priya Deosthalee14 August 2021 at 11:06

    अप्रतिम लेखन..सातही निरीक्षणातून प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेस. तुझ्या लेखनाची ताकद जबरदस्त आहे.

    ReplyDelete
  7. डॉक्टर, खूप प्रवाही लिहता तुम्ही...अभिनंदन.. उत्तम ब्लॉग साठी😊

    ReplyDelete
  8. Very very lively, jovial & inspiring article. Any common person of our generation & age can relate with it. You have superb, excellent skills of writing in Marathi & English as well. Your minute observations & examples make your writing very interesting for the readers.

    ReplyDelete
  9. नेहमप्रमाणेच छान लिखाण! सातत्य राखले आहे हे ही कौतुकास्पद. एखादी गोष्ट सतत ३ आठवडे केली की सवय लागते आणि नंतर एक दिवस जरी ती गोष्ट करता आली नाही की रुखरुख लागून राहते असे म्हणतात. ७०-७५ दिवस चालवत असल्यामुळे आता सवय झाली आहे असे म्हणता येईल त्यामुळे सिंहगड नक्की गाठशिल यात शंका नाही. सर्व निरीक्षणे मस्त. पुढील सायकल स्वरींन साठी अनेक शुभेचछा.

    ReplyDelete