आपण आपापल्या वाहनांनी खरं तर रोजच कामाच्या ठिकाणी जात असतो किंवा शहरात आणखी काही निमित्तांनी फिरत असतो. या प्रवासांत आपलं आजूबाजूला फारसं लक्ष जातंच असं नाही. कारण आपल्याला इच्छित ठिकाणी पोचायची खूप घाई असते आणि शहरात वाहतूकही एवढी वाढली आहे की आपलं सगळं लक्ष त्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्यात लागतं. शिवाय आपल्या गाडीचा वेगही असल्यामुळे शहर झपकन मागे पडत जातं. त्या तुलनेत आपण जर सायकल चालवत असलो तर मग आपल्याकडे तसा निवांत वेळ असतो आणि मग जेव्हा आपण इकडे तिकडे बघत पाय मारत जातो तेव्हा आपल्याच शहराची आपल्याला नव्याने ओळख होऊ लागते.
सध्या मी नियमितपणे सायकलिंग करत आहे. हा माझ्या सध्याचा छंद आहे असं म्हणा ना ! या सायकलिंगचा छंद आणि माझी सध्या मागे पडलेली आवड म्हणजेच फोटोग्राफी-यांची सांगड घालत मी आमच्या पुण्याचे काही फोटो काढले आहेत. त्याचाच हा फोटो ब्लॉग! अर्थात हे करत असताना मी काही बंधनं स्वतः वर घालून घेतली. ती म्हणजे -
१) फोटो काढण्यासाठी सायकलवरून उतरायचं नाही.
२) सायकलिंग करत असतानाच फोटो काढायचे. म्हणजे सकाळच्याच वेळचे सगळे फोटो असणार. आणि असंही नाही करायचं की दिवसा कधीही त्या त्या ठिकाणचे फोटो दुचाकीवरून जाऊन काढायचे.
३) फोटो फक्त मोबाईलवरील कॅमेऱ्यानेच काढायचे. कुठलाही इतर कॅमेरा वापरायचा नाही.
या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे सायकलिंग करणं/व्यायाम करणं यात फारसा खंड पडू द्यायचा नाही. नाहीतर सायकलिंग बाजूला/मागे पडायचं आणि फोटो काढणंच मुख्य काम होऊन बसायचं !
४) मोबाईल कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंचं फारसं एडिटिंग करायचं नाही. या मुळे कदाचित फोटोंची गुणवत्ता तितकीशी चांगली नसेल.
मला माहित नाही हा उपक्रम कसा स्वीकारला जाऊ शकेल. पण जर अशाच प्रकारे कोणाला सायकलिंगची वा मोबाईल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली वा अशी आवड असलेल्या उत्साही लोकांनी असेच फोटो शेअर केले तर केवळ पुण्याचेच नाही इतरही अनेक शहरांचे आणि गावांचे फोटो डॉक्युमेंटेशन करता येऊ शकेल !
मला वाटतं नमनांचं इतकं तेल पुरे झालं आणि मुख्य विषयाकडे वळतो!
पुण्यात बऱ्याच ठिकाणी भित्तीचित्रं बघायला मिळतात. त्यात काहीवेळा स्वछतेचे संदेश दिलेले असतात. तर काहीवेळा पर्यावरणविषयक करणारे संदेश असतात तर काहीवेळा उपदेशपर संदेशही असतात !
वरील चित्रं ही आमच्या सोसायटीच्या सीमाभिंतींवरील आहेत. या चित्रांच्या जवळून मी शेकडो वेळा गेलो असें. पण माझं या चित्रांकडे लक्षच गेलं नव्हतं. पण आता बघितल्यावर वाटतं की चित्र सुरेख काढली आहेत आणि मुख्य म्हणजे ती पानांच्या पिचकाऱ्यांपासून बऱ्यापैकी सुरक्षित राहिली आहेत !
पुण्यात आता जागोजागी फ्लायओव्हर झाले आहेत आणि त्यांच्या भिंतींवर काही ठिकाणी आकर्षक चित्रं बघायला मिळतात. उदाहरणार्थ लक्ष्मीनारायण थिएटर जवळील फ्लायओव्हर खाली हे चित्र आहे-
पुण्याचा केवळ गौरवशाली इतिहासच नव्हे तर याच ठिकाणी उद्याच्या पुण्याचं चित्रही रंगवण्यात आलं आहे-
पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आहे, पुणे हे भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्यालय आहे. पुण्यात AFMC आहे, ASPT आहे, दापोडी येथे College of Military Engineering आहे. खडकीला Ammunition factory आहे. पुण्यात DRDO आहे. थोडक्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं पुणे हे एक केंद्र आहे. पुण्याचं हे महत्त्व अधोरेखित करणारा गोळीबार मैदानाच्या अलीकडच्या चौकातला हा दिमाखदार
भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केले होते. पुण्यातील एका नगरसेवकाने लगेचच त्याचे सुशोभित चित्र शास्त्री रोडवर लावले जे आजही लक्षवेधक ठरत आहे-
याच शास्त्री रोडवर लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. तिथला चौक सुशोभित करून त्यावर शास्त्रीजींचा सुप्रसिद्ध नारा- 'जय जवान जय किसान' कोरण्यात आला आहे -
सायकलवरून काढलेल्या पुण्याच्या अशाच काही फोटोंवर आधारित आणखी काही ब्लॉग लिहिण्याचा विचार आहे. तेव्हा या ब्लॉगपुरतं आत्ता इथेच थांबतो !
(क्रमश:)
Nice
ReplyDeleteExcellent as usual. Nice pics. Waiting for next Blogs.
ReplyDeleteVery interesting concept! Especially the prerequisites.Looking forward to revisit Pune,in a new way
ReplyDeleteWow khup chan
ReplyDeleteNice concept cycling and photography together
ReplyDeleteLooking forward for many more
Khupach chan
ReplyDelete