आपल्याकडील प्रत्येक ऋतूचं एक वेगळं सौंदर्य आहे. पण तरीही सगळ्यात सुंदर ऋतू कुठला असं मला कोणी विचारलं तर मी वसंत ऋतूचंच नाव घेईन! निसर्ग या ऋतूमध्ये जेवढी मुक्त हस्ते रंगांची उधळण करतो तेवढी इतर ऋतूंमध्ये बघायला मिळत नाही. पूर्वीच्या काळचे सिनेमे ब्लॅक अँड व्हाईट होते. कालांतराने त्यात रंगांचा शिरकाव झाला. काही सिनेमे असेही होते की त्यात एखादंच गाणं रंगीत असे तर बाकीचा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट असायचा. त्या एका रंगीत गाण्याने तो संपूर्ण सिनेमा एक सौंदर्याचं लेणं होऊन जायचा इतकं ते गाणं सिनेमात उठून दिसायचं ! निसर्ग जर क्षणभरापुरता आपण ब्लॅक अँड व्हाईट धरला ( तितकाही तो मोनोक्रोमॅटिक नसतो हे मला मान्यच आहे. पण फरक समजण्यासाठी आपण क्षणभर तसं गृहीत धरू) तर वसंत ऋतू 'मुघल ए आजम' मधल्या त्या 'जब प्यार किया तो डरना क्या' या गाण्यासारखा आहे! फाल्गुन-चैत्र-वैशाख या उन्हाच्या वाढत्या दाहकतेचे चटके बसू लागत असताना निसर्गाची ही रंगांची किमया डोळ्यांना सुखावणारी असते.
खरं तर या झाडं/फुलांचा या ब्लॉगमध्ये समावेश करावा की नाही याबाबत माझी द्विधा मनस्थिती झाली होती. कारण या झाडांचे फोटो समाजमाध्यमांवर आणि वर्तमानपत्रांत सगळीकडेच दिसत होते. पण या झाडांचा समावेश न करणं हे माझ्या अरसिकतेचं लक्षण मानलं गेलं असतं ! म्हणून मग एक छोटा ब्लॉग यासाठी केला आहे-
९) बहावा /अमलताश (Golden Shower tree, Laburnum ) Cassia fistula-
कुठल्याही सणावाराला, विशेषतः दिवाळीला आपल्याकडे इमारती कात टाकतात. त्यांचं रंग-रूप बदलतं. कित्येक इमारतींवर दिव्यांची रोषणाई केली जाते. वसंतऋतू हा बहावासाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतोच! त्यामुळे हे झाड या दिवसांमध्ये नटून-थटून खुलून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभं राहतं. इतकं की या दिवसांत या झाडांना पानं कमी पण सगळीकडे नुसती फुलंच दिसतात. बहाव्याचे सोनेरी पिवळ्या रंगाचे घोस बघून असं वाटत की एकाच झाडावर अनेक आकाशकंदील लटकले आहेत वा फुलांची झुंबरं टांगली आहेत.( आम्ही कान्हाच्या जंगलात ही फुलं पाहिली होती तेव्हा तिथल्या गाईडने या फुलांचं -'अमलताश के झूमर' असं सुरेख वर्णन केलं होतं !) पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा झुंबरांचा महोत्सव भरला होता. मी तो मेहेंदळे गॅरेज ते नळ स्टॉप या दोन चौकांमधल्या रस्ता दुभाजकावर लावलेल्या बहाव्याच्या झाडांवर मनभरून पाहिला. कित्येकदा तो माझा सायकलिंगचा नेहमीचा रस्ता नसला तरीसुद्धा मुद्दाम झाडांची ही दिलखेचक अदा बघायला मी वाकडी वाट करून तिकडे जात असे. असं म्हणतात की बहावा फुलल्यानंतर साधारण पुढील दोन महिन्यांत पावसाचे आगमन होते. मार्चमध्येच फुलून बहावाने हवामान खात्याच्या आधीच पावसाचे शुभ वर्तमान कळवले आणि थोडासा उन्हाळा सुसह्य केला म्हणायचे!
सुरेख लिहिलय. मन प्रसन्न होते रंगांची उधळण बघून.
ReplyDelete