Wednesday, 17 December 2025

मिड लाईफ क्रायसिस: उत्तर:छंद -पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी !

 


(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपॅथीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपॅथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२५ सालच्या दिवाळी अंकाचा विषय ' मिड लाईफ क्रायसिस ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे ) 







मला पक्षी निरीक्षणाची आवड बरीच वर्षे होती. दहावीच्या परीक्षेनंतर मी पक्षी निरीक्षणाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पुढे शिक्षण आणि नंतर व्यवसायामुळे हा छंद मागे पडला वा खूपच कमी झाला. पक्षी  पाहणे, त्यांचे आवाज ऐकणे आणि त्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अतिशय आवडायचे.कितीतरी जंगल सफारींचा आनंद घेतला  होता पण त्याकाळात कधीही पक्ष्यांचे फोटो काढावेत असं मात्र वाटलं नव्हतं. डोळेभरून पक्षी बघणे हीच प्राथमिकता होती. उलट जे लोक पक्ष्यांचे फोटो काढायचे आणि प्रत्येक फोटो मिळवण्यासाठी ते ज्या प्रकारे  जिवाचा आटापिटा करायचे,  त्यांची मी तशी टिंगलच करायचो. त्यांचे ते भले मोठे कॅमेरे...कॅमेरे कसले! तोफाच जणू! बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केल्याप्रमाणे सतत कॅमेरा चालवून फोटो काढणाऱ्यांचे मला तेव्हा नवलच वाटायचे. 'आधी डोळे भरून समोर काय आहे ते बघा आणि मग त्याचा फोटो काढा' असंच मला त्या फोटोग्राफर बद्दल वाटत असे.  नंतर मीही कधी फोटोग्राफर होईन  असं तेव्हा तरी मला वाटलंच नव्हतं. कारण तसं  म्हटलं तर मी खूप काही नवीन तंत्रज्ञान शिकणाऱ्यातला नाही. नवीन यंत्रांशी जुळवून घेणं आणि त्यातील बारकावे समजून घेणं हा काही माझा पिंड नाही. त्यामुळे कॅमेऱ्यासारख्या गुंतागुंतीच्या यंत्राशी आपलं कधी जमेल असं मला वाटलंच नाही. 

साधारण वयाची पंचेचाळीशी उलटल्यानंतर योगायोगाने शाळेच्या व्हॉट्सअँप ग्रुप मधून  काही मित्रांशी पुन्हा मैत्री जुळली आणि त्यातील  काही मित्र(डॉ सुश्रुत बडवे) आणि माझ्यात पक्षी निरीक्षण हा एक समान दुवा होता. मग आम्ही एकत्र पक्षी निरीक्षणाला जाऊ लागलो. तेव्हा लक्षात आलं की फोटो काढणं हा टिंगल किंवा कोणाला हिणवणे यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर विषय आहे. किंबहुना फोटो काढल्याने पक्षी निरीक्षणाच्या छंदाला नवे आणि वेगळे आयाम प्राप्त होऊ शकतात असंही लक्षात आलं. कितीतरी वेळा असं व्हायचं की पक्षी बघे बघे पर्यंत तो उडून गेलेला असायचा व झाडात लपून जायचा. मग तो नेमका कुठला पक्षी होता याची रुखरुख मनाला लागून राहायची. पण जर त्याच  पक्ष्याला कॅमेऱ्यात कैद केलं असतं तर त्याची ओळख नंतर पटवणं शक्य झालं असतं. पक्ष्यांचे फोटो बघून त्या त्या पक्ष्याच्या आकार,रंगसंगती आणि  वैशिष्ट्यपूर्ण खुणांचा विचार करता येतो आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. 

Bluethroat (नीलकंठ)

(उदाहरणार्थ Blue Throat या सुंदर पक्ष्याला त्याच्या गळ्याच्या निळ्या रंगावरून ओळखलं जातं.) 
काही वेळा पक्ष्यांचे रंग त्यांच्या विणीच्या हंगामात वेगळे दिसतात आणि इतर वेळी ते वेगळे असतात ( उदाहरणार्थ Purple Sunbird (शिंजीर) पक्षी विणीच्या हंगामात त्याच्या नावाप्रमाणे जांभळा दिसतो पण इतर वेळी तो पिवळट दिसतो) म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर फोटोग्राफीमुळे पक्षी निरीक्षणाच्या छंदाला बाधा निर्माण तर नसतीच झाली, उलट तो छंद आणखी विकसित व्हायला/वृद्धिंगत व्हायला मदत झाली असती असं वाटलं. आणि मग २०१६ पर्यंत हातात कॅमेराही न धरणारा मी फोटोग्राफी करायला (आधी) मनाने तयार झालो. 

मित्रांबरोबर सहलींना गेल्यामुळे फोटोग्राफीतील काही तांत्रिक शब्द कानावर पडले होते. पण शटर स्पीड म्हणजे काय, ISO हे काय असतं, कुठल्या mode वर कधी फोटो काढायचे, Point & shoot/ DSLR कॅमेऱ्यांमध्ये  नेमके काय फरक असतात  या प्राथमिक गोष्टीदेखील माहीत नव्हत्या. म्हणून कॅमेरा हाताळण्याआधी फोटोग्राफीचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर प्रश्न पडला की कॅमेरा कुठला घ्यायचा. कारण कितीही नाही म्हटलं तरी कॅमेरा घेणं ही आपल्या छंदासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक आहे याचं भान ठेवावं लागलंच! आपल्याला जर हे नीटसं जमलं नाही, नुसताच आरंभशूरपणा झाला तर महागडा कॅमेरा कशाला घ्या! म्हणून निकॉन D 3200 हा एक एन्ट्री लेव्हल DSLR कॅमेरा घेतला. त्यावर हात बऱ्यापैकी साफ केल्यानंतर आणि आपल्याला फोटोग्राफी आवडत आहे (आणि थोडीफार जमत आहे ) असं लक्षात आल्यावर मग पुढे कॅमेरा बदलला. 
सुरुवातीला अर्थातच अनेकदा चुकत माकतच शिकत गेलो. फोटो हलणे (blur होणे), कधी पांढरा फटक तर कधी खूप गडद येणे, मूळ पक्षी केंद्रस्थानी न येता भलतीकडेच फोकस होणे या सारख्या चुका तर झाल्याच पण काही वेळा अनावधानाने फोटो डिलीट होणे वा  संपूर्ण कार्डच डिलीट होणे असेही प्रकार झाले. पण आपल्याला हे येत नाही किंवा आपण अशा चुका केल्या हे नि:संकोचपणे मित्राला वा आमच्या फोटोग्राफीच्या सरांना विचारल्यामुळे या चुका देखील सुधारता आल्या. यातूनच चांगला फोटो काढणे ही एक गोष्ट झाली आणि त्या फोटोवर पुढील संस्कार (post processing) करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे हे समजलं. सध्याच्या user friendly apps मुळे हे शिकणं आणि प्रत्यक्ष करणं देखील सोपं झालं. 

Practice makes man perfect ही उक्ती फोटोग्राफी सारख्या कलेला देखील लागू आहे . डिजिटल फोटोंच्या काळात पूर्वीसारखं 'कॅमेरा रोल वाया गेला' ही भीती आता राहिली नसल्यामुळे सराव करणं खूप सोपं झालं आहे. हातात कॅमेरा घ्या आणि फोटो काढा, बस्स!(पूर्वी हिरो होंडाच्या जाहिरातीची टॅग लाईन होती- fill it..shut it...forget it !तसंच काहीसं !) अर्थात पक्ष्यांचे फोटो काढायला तुम्हांला दर वेळी जंगलातच जायला पाहिजे असंही नाही. पुण्यासारख्या शहरात अजूनही काही नैसर्गिक अधिवास टिकून आहेत जिथे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अनेकविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. अगदी ठरवलं तर रोजच्या अर्ध्या तासात देखील खूप काही बघायला मिळू शकतं. जसा शास्त्रीय संगीताचा रियाज करतात तसा हा देखील एक प्रकारचा रियाजच म्हटला पाहिजे. 
विशेषतः पक्ष्यांचे फोटो काढताना आणि इतरांनी काढलेले  फोटो बघताना काही गोष्टी लक्षात आल्या -
१) प्रकाशाचं भान - प्रकाश नेमका कुठून येत आहे, पक्ष्यावर तो कसा पडत आहे  आणि आपण कुठे आहोत आणि प्रकाश किती आहे(त्याची तीव्रता) यावर फोटो किती चांगला आहे हे ठरतं. त्यामुळे आपल्याला जितक्या लवकर हे भान येईल तेवढं चांगलं. 
२) फोटोची पार्श्वभूमि (background ) विशेषतः पक्ष्यांच्या फोटोसाठी हिरवी पार्श्वभूमि असणं आणि फोटोग्राफीच्या परिभाषेत ज्याला bokeh background म्हणतात ती असणं हे चांगल्या फोटोचं लक्षण समजलं जातं. Bokeh मध्ये  बॅकग्राऊंड blurry असते आणि त्यावर पक्षी उठून दिसतो. 
Pied Kingfisher (खंड्या)

३) पक्ष्याचा डोळा - महाभारतातील अर्जुन जसा माश्याच्या डोळ्याचा वेध घेतो तसा प्रत्येक फोटोग्राफर पक्ष्याचा डोळा सुस्पष्ट येण्यासाठी धडपडत असतो. 
Spotted Owlet (पिंगळा)

अडखळत आणि काहीशा  अनिश्चिततेच्या मानसिकतेमध्ये सुरु केलेल्या या फोटोग्राफीच्या प्रवासात हळूहळू जेव्हा जम बसू लागला तेव्हा एक त्यातून एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद मिळाला. आपल्याला अजून ( म्हणजे या वयात देखील!) एखादी अवघड वाटणारी गोष्ट नव्याने शिकून आत्मसात करता येते याचं खूप समाधान वाटलं. याबरोबरच पक्षी निरीक्षणाचा आनंदही  द्विगुणित झाला. कितीतरी नवीन पक्षी बघायला मिळाले. आधी बघितलेल्या पक्ष्यांचं सौंदर्य नव्याने समजलं. जे पक्षी माहित नव्हते त्यांची Merlin सारख्या मोबाईल app मध्ये त्या पक्ष्याचा फोटो टाकून ओळख करून घेता आली. आपला हा आनंद इतरांमध्ये वाटण्यासाठी फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करणं, फोटोफ्रेम्स करून त्या भेट देणं, पक्ष्यांच्या फोटोंचं कॅलेंडर करून ते भेटस्वरूपात देणं अशाही गोष्टी केल्या. 
या आनंदापलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं की पक्ष्यांचे फोटो काढणं म्हणजे निसर्गात रमणं आहे. आपल्या रोजच्या धकाधकीतून, सर्व प्रकारच्या कोलाहलापासून दूर जाऊन फोटो काढताना निसर्गाशी एकतानता साधली जाते.भरतपूर येथील केवलादेव घन राष्ट्रीय अभयारण्यात गेलं तर संपूर्ण दिवसभर फक्त आणि फक्त पक्ष्यांचेच आवाज  ऐकू येतात. भारावून जायला होईल, भान विसरून जायला होईल इतका तो नाद कानांत घुमतो. हे देखील एक प्रकारे meditation च नव्हे काय!  

(European Roller)

शेवटी फोटो म्हणजे तरी काय आहे! निसटत्या सुंदर क्षणाला पकडून तो गोठवण्याचा एक प्रयत्न आहे! अशा क्षणांना आठवणींचं कोंदण देण्याचा प्रयत्न आहे. कारण फोटो म्हणजे केवळ तो पक्षी व त्याचे रंगरूप नाही तर तो काढण्याच्या प्रसंगाशी निगडित आपल्या भाव भावना देखील असतात. आपल्या आठवणी राहोत ना राहोत, संदर्भ बदलोत,  तो फोटो कालांतराने पुन्हा बघितल्यावर तो प्रसंग, त्यावेळचा आनंद, समाधान या सारख्या भावना निश्चितच ताज्या होऊ शकतात. आपल्या जगण्याचे चार क्षण सार्थकी लागले असं म्हणता येईल असं सामर्थ्य फोटोंमध्ये (माझ्यासाठी पक्ष्यांच्या फोटोंमध्ये) नक्कीच आहे कारण शेवटी आपण या फोटोंमधून सुंदर आठवणीच तर तयार करत असतो! 

Painted Stork (चित्र बलाक)

Gray Heron (राखी बगळा)

Vernal Hanging Parrot (भुंडा पोपट) 


No comments: