१
(माझा हा ब्लॉग सर्व नाट्यप्रेमी, नाट्यकर्मी आणि नाट्यधर्मी लोकांना सादर समर्पित!)
म टा चे संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांच्या 'मधुघट'(साधना प्रकाशन) या पुस्तकात लेखक, नाटककार , कवी विल्यम शेक्सपिअर विषयी त्यांनी उत्कृष्ट लिहिलं आहे. त्यांनी एका प्रसंगाचं सुरेख वर्णनही केलं आहे. शेक्सपिअरच्या मृत्यूला ४०० वर्षं झाली(२३ एप्रिल २०१६), तेव्हा जगभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी त्याच्या जन्मगावी (स्ट्रॅटफर्ड अपॉन ॲव्हन ) एक खास कार्यक्रम झाला होता. यात त्याच्या हॅम्लेट या नाटकातील "to be or not to be, that is the question!" हे स्वगत वेगवेगळ्या नामांकित नट नट्यांनी साभिनय म्हणून दाखवलं. या कार्यक्रमाला (त्यावेळचा) युवराज चार्ल्स उपस्थित होता. त्याने आयोजकांना विचारलं की त्यानेही यात भाग घेतला तर चालेल का. आणि मग त्यानेही हे स्वगत साभिनय म्हटले!यावर आश्चर्यचकित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शेक्सपिअरची मोहिनी राजघराण्यावर देखील किती आहे हे यातून दिसतं !याच लेखात पुढे तळवलकरांनी उद्बोधक माहिती दिली आहे. ते म्हणतात की शेक्सपिअर रशियात देखील अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या नाटकांचे रूपांतरित प्रयोग अठराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले होते. रशियन लोकांना शेक्सपिअरच्या शोकांतिकांनी भुरळ घातली होती. शेक्सपिअर तिथे इतका लोकप्रिय होता (आणि आहेही) की रशियनांना तो रशियनच आहे असं वाटतं! शेक्सपिअरची चारशेवी जयंती १९६४ साली रशियात देखील दिमाखात साजरी झाली. या कार्यक्रमाला तत्कालीन रशियन अध्यक्ष क्रुश्चेव्ह उपस्थित होते. रशियात शेक्सपिअर लोकप्रिय होण्यामागे एक कारण कार्ल मार्क्स देखील आहेत. कारण त्यांना शेक्सपिअर यांच्या नाटकातील उतारेच्या उतारे तोंडपाठ होते! याच लेखात तळवलकरांनी शेक्सपिअरचा जगाचा नागरिक असा गौरव केला आहे. आणि हे बरोबरच आहे. कारण जगभरातील जवळपास सर्वच भाषांमध्ये शेक्सपिअरच्या नाटकांचं भाषांतर/रूपांतर झालं असून त्याचे अजूनही प्रयोग होत असतात. हे वाचल्यावर मला शेक्सपिअरच्या जन्मगावी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. शेक्सपिअरविषयी मी देखील एक ब्लॉग यापूर्वी लिहिला आहे. त्याची लिंक इथे देत आहे-
२
स्ट्रॅटफर्ड अपॉन ॲव्हन : (२८.०७.२०२६)-
ॲव्हन नदीच्या काठी वसलेलं हे छोटंसं गाव-
आम्ही गेलो त्या दिवशी इथे भरपूर गर्दी होती. देशी परदेशी पर्यटकांनी गाव अक्षरश: उत्साहाने ओसंडून वाहत होतं.
Gower Monument
१८८८ साली हे बांधण्यात आलं आहे. मध्यभागी शेक्सपिअरचा बैठा पुतळा (हातात नाटकाचं हस्तलिखित घेतलेला) असून त्याच्या चारी बाजूला शेक्सपिअरच्या नाटकातील व्यक्तिरेखांचे पुतळे आहेत. या फोटोत पुढे दिसत आहे तो Prince Hal (पाचवा हेन्री) चा पुतळा आहे. लॉर्ड रोनाल्ड गॉवर यांनी या पुतळ्याची रचना केली म्हणून त्यांचं नाव या जागेला दिलं आहे.
शेक्सपिअरच्या जन्मस्थळी जाताना वाटेत हा आणखी एक पुतळा दिसला-
आणि हे शेक्सपिअरचं जन्मस्थळ-
दुर्दैवाने हे घर आतून पाहता आले नाही कारण त्यादिवशी तिथे प्रवेशासाठी खूपच मोठी रांग होती आणि तेवढा वेळ तिथे थांबणं शक्य नव्हतं कारण त्यादिवशी पुढे अजूनही बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या.
शेक्सपिअरच्या घराचं हे एका अज्ञात चित्रकाराने काढलेलं चित्र-
मात्र इथे उभं राहून मी विंदा करंदीकरांची 'तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला ही कविता म्हटली-
पुढे गावात शेक्सपिअरची शाळा देखील बघितली -
तसंच Church of the Holy Trinity बघितलं. इथेच शेक्सपिअरचा बाप्तिस्मा झाला आणि इथेच त्याचं दफनही करण्यात आलं-
गावात दोन-तीन ठिकाणी स्ट्रीट म्युझिक ऐकायला मिळालं-
गावात Royal Shakespeare Theatre आहे. त्याच्या बाहेर उभं राहून मी शेक्सपिअर चं 'As you like it' नाटकातलं -'All the World's a stage हे स्वगत म्हटलं -
३
०५.०८.२०२६-
२३ जुलैला सुरू झालेल्या आमच्या इंग्लंड ट्रिपचा ५ ऑगस्ट हा शेवटचा दिवस! एखाद्या सुंदर मोठ्या स्वप्नासारखे आमचे हे पंधरा दिवस होते. इथला प्रत्येक क्षण अन क्षण आनंदाचा होता. हे स्वप्न कधी संपूच नये असं एकीकडे वाटत असताना दुसरीकडे वास्तवाची जाणीव होऊन परतीचे वेधही लागले होते. त्यादिवशी लंडनमध्ये फिरत असताना मनात गेल्या पंधरा दिवसांची उजळणी चालू होती. या काळात बघितलेली ठिकाणं, भेटलेले नातेवाईक, मित्र आणि इतर अनेक अपरिचित माणसं हे सगळं आठवत होतं आणि मनाला एक हुरहूर लागून राहिली होती. ट्रिपचा शेवट गोड व्हावा असं वाटत होतं. I wanted my trip to finish on a high note! आणि योगायोगाने ती संधी चालून आली !
आम्ही टेम्स नदीकाठी असलेल्या शेक्सपिअरच्या ग्लोब थिएटरला गेलो. तिथे आधी केलेल्या लॉर्ड्स, विम्बल्डन सारखीच टूर उपलब्ध होती आणि थोड्याच वेळात ती सुरूही होणार होती. तिकीट दर खूप जास्त होता (२८ पौंड! आपण लगेच याचं रूपयांत रूपांतर करतो. त्यामुळे ते ३५०० रुपयांपेक्षाही जास्त होतात). हो-नाही करत शेवटी मनाचा हिय्या करून आमच्या पाच जणांपैकी मी एकटाच या टूरला गेलो आणि एक अविस्मरणीय अनुभव घेता आला .
४
ग्लोब थिएटर-
आमची गाईड मूळची स्पॅनिश अथवा इटालियन असावी. तसं तिच्या उच्चारावरून लक्षात येत होतं. या टूरमध्ये आम्ही वेगवेगळ्या वयाचे २५-३० लोक होतो. तिच्याकडे माईक होता आणि आमच्याकडे हेडफोन्स देण्यात आले होते. पण ती खूपच हळू आवाजात बोलत होती. त्यामुळे हेडफोन्स असूनही तिचं बोलणं काही वेळा अक्षरश: कान देऊन ऐकावं लागत होतं. तिने आधी ग्लोब थिएटरचा इतिहास सांगितला.
१५९९ साली शेक्सपिअरची नाटक कंपनी Lord Chamberlain's Men ने ग्लोब थिएटर बांधलं. १६१३ साली ते प्रयोगादरम्यान लागलेल्या आगीत भस्मसात झालं. नंतर याची त्याच ठिकाणी वर्षभरात पुनर्बांधणी करण्यात आली आणि ते १६४२ पर्यंत चालू होतं. नंतर ते इंग्लंडमधील यादवी युद्धामुळे बंद पडल. आम्ही जे थिएटर बघत होतो ते खूपच आधुनिक होतं. मूळ थिएटरची ही प्रतिकृती १९९७ साली बांधण्यात आली. नावाप्रमाणेच गोलाकार असलेलं हे थिएटर खुलं आहे (Open air) आणि लाकडी बनावटीचं आहे.
आम्ही इथल्याच गॅलरीत बसलो होतो आणि आमची गाईड तिच्या बोलण्यातून आमच्यापुढे शेक्सपिअरचा काळ जिवंत करत होती. १५६४-१६१६ हा शेक्सपिअरचा काळ! इंग्लंडमध्ये कालखंड राजघराण्यातील सत्ताधीशांप्रमाणे मोजतात. शेक्सपिअरचा काळ हा प्रामुख्याने Elizabethan era समजला जातो. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात धार्मिक स्थैर्य, अंतर्गत शांतता, आर्थिक प्रगती होती. हाच इंग्रजी रेनेसाँचा सुवर्ण काळही होता. याच काळात इंग्रजी साहित्य आणि नाटक यांना राणीचं भक्कम पाठबळ मिळालं. हे सगळं एकीकडे असलं तरी दुसरीकडे त्याकाळच्या सर्वसामान्य माणसांच्या मनोरंजनाच्या कल्पना काहीशा रानटी होत्या असं गाईड म्हणाली. त्याकाळी bear fights (दोन अस्वलांमधली मारामारी) वा कोंबड्या झुंजवणं याला मनोरंजन समजत. लंडनमध्ये कामगार वर्ग बराच होता. त्यांच्या करमणुकीच्या अशाच कल्पना होत्या. त्यांना या नाटकांकडे वळवणं हे किती अवघड काम असेल! गाईडच्या बोलण्यातून त्यावेळच्या वर्गसंघर्षाविषयी देखील माहिती मिळाली. कामगार वर्ग एक पेनी देऊन नाटक बघायला येत. त्यामुळे ते स्टेज समोर उभे राहून नाटक बघत. म्हणून त्यांना Groundlings असं म्हणून हिणवलं जात असे. (पण गाईड म्हणाली की त्यांच्यासाठी नाट्यप्रयोग हा immersive experience असणार कारण ते अगदी जवळून नाटक बघत !) याच लोकांना Stinkards असंही म्हटलं जाई. कारण यांच्या अंगाचा घामाचा वास, भरीतभर तिथे दारू/बिअर प्यायचे तो वास, आजार होऊ नये म्हणून लसूण खात तो वास आणि या सगळ्यावर कडी म्हणजे त्याकाळी प्रेक्षागृहात स्वच्छतागृहं नसायची. प्रेक्षक तिथेच लघुशंका करायचे वा पिशव्या घेऊन त्यात करायचे. त्यामुळे हा वासही तिथे घुमायचा. शिवाय हे प्रेक्षक मोठमोठ्या आवाजात खायचे, बोलायचे आणि नटाचं काम आवडलं नाही तर त्याच्यावर हातात असतील त्या वस्तू फेकायचे. नाटकांना येणाऱ्या अभिजनांना हे वागणं अर्थातच आवडायचं नाही. ते वरच्या गॅलरीत बसायचे,नाकं मुरडायचे आणि दुर्गंध येऊ नये म्हणून जवळ सुगंधी फुलं ठेवायचे.
गाईडच्या या बोलण्यातून शेक्सपिअरच्या काळाचा पट डोळ्यासमोर उभा राहिला. त्या काळाच्या कॅनव्हासवर शेक्सपिअरची नाटकं जन्माला आली, रुजली आणि त्याच काळात काय,४०० वर्षं पार करून आजपर्यंत ती टिकली हे शेक्सपिअर किती सार्वकालिक आहे हे सांगतं !रासवट खेळांनाच मनोरंजन समजणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या उच्च दर्जाच्या कलेने जोडून घेतलं. काळाच्या या परिप्रेक्ष्यात शेक्सपिअरची कामगिरी अजूनच उठून दिसली!
५
वरच्या काही फोटोंमध्ये स्टेजवर काही लोक व्यायाम करताना दिसले असतील. गाईडची माहिती ऐकत असताना आमचं लक्ष स्टेजवर काय चालू आहे यावर होतं. गाईडने सांगितलं की हे सगळे कलाकार ' A Mid Summer Night's Dream' या नाटकाचे कलाकार होते आणि त्याच दिवशी म्हणजे ५ ऑगस्टला दुपारी या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगाआधी हे कलाकार warm-ups करत होते. गाईडने निक्षून सांगितलं की या कलाकारांचे फोटो / व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. त्यामुळे ते जे करत होते ते शूट करता आलं नाही. पण हा warm ups प्रकार अद्भुत होता. यात आधी सर्व कलाकार शारीरिक व्यायाम करत होते आणि त्यानंतर श्वासाचे व्यायाम आणि नंतर चित्र विचित्र आवाज काढून vocal projection करत होते.त्यात जिभेच्या हालचाली आणि ओठांचे व्यायामदेखील होते. नंतर नाटकातील प्रवेश पटापट (run through) करत होते. सर्वच कलाकारांच्या हालचालीत इतकी चपळाई आणि सहजता होती की काही काळ तर माझं गाईड काय बोलत आहे याकडे लक्षच नव्हतं. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन या कलाकारांकडे बघत होतो. Warm-ups म्हणजे नाटकासाठी फक्त शरीर तयार करणं असं नसून मनानेही प्रयोगासाठी तयार होणं यामुळे सोपं जात असावं. सर्वच कलाकारांची थिएटर प्रती असलेली निष्ठा आणि पॅशन बघून मी थक्क झालो. Warms-ups चा युट्यूब वर शोध घेत असताना मला अचानक त्यादिवशीच्या कलाकारांचा हा व्हिडिओ सापडला. यात त्यांनी एका मिनिटांत नाटकाची कथा सांगितली आहे. कलाकार वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे वाटले. काही कृष्णवर्णीय आणि एक तर भारतीय देखील होता.
हे सगळं बघून मला डॉ श्रीराम लागू आठवले. ते Aristotle च्या वाक्याचा संदर्भ द्यायचे- An actor should be an athlete philosopher! तसंच माझ्या परिचयातील सर्व नाट्यकलाकार आणि नाट्यप्रेमी यांची देखील आवर्जून आठवण आली. कदाचित माझ्यापेक्षा त्यांना या अनुभवावर जास्त चांगल्याप्रकारे बोलता आलं असतं.
एकंदरीत नाट्यप्रयोगाआधी होणाऱ्या warm-ups ची कल्पना या व्हिडिओतून येईल-
आमच्या टूर मधील काही वयस्कर बायका या टूरनंतर लगेचच असणाऱ्या नाटकाच्या प्रयोगाला थांबणार होत्या. मला मात्र ते शक्य नव्हतं कारण काही तासांतच आमचं परतीचं विमान होतं. मनोमन या बायकांच्या उत्साहाला सलाम केला. शेक्सपिअर आजही किती लोकांमध्ये खोलवर रुजला आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.
(समाप्त)
काहीही न ठरवता मी आमच्या इंग्लंड ट्रिपबद्दल लिहित गेलो आणि बघता बघता याचे चौदा ब्लॉग झाले. मला हे लिहिताना खूप मजा आली. ट्रिपचा अनुभव पुन्हा घेता आलाच शिवाय लिहिण्यासाठी काही गोष्टींचा खोलवर अभ्यास केला. यातून बरेच संदर्भ मिळत गेले आणि ट्रिपचा आनंद वृद्धिंगत झाला. माझा ब्लॉग वाचून काही जणांनी त्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिली. काहींनी वैयक्तिकरित्या कळवलं. काहींनी काही सूचनाही केल्या ज्याचा खूपच उपयोग झाला. तुम्हां सगळ्यांचे मनापासून आभार ! आमचा केंब्रिजचा गाईड जॉन म्हणाला तसं -फिर मिलेंगे !

















3 comments:
ग्लोब थिएटर मध्ये न येता तिथला अनुभव तुझ्या लेखामुळे घेता आला! Idea of posting those 2 links of Midsummer night's dream in 60 seconds and warm ups for the artists is very nice!
Putting all about Shakespeare in one blog was also a good idea
Awaiting your next trip and the reading thereafter!
सर्व लेख साध्या, सोप्या मातृभाषेत लिहिल्यामुळे आणि त्याला अप्रतिम फोटो ची जोड दिल्यामुळे आपण स्वतः पाहत आहोत असे वाटते. केवळ फिरणे किंवा शॉपिंग असे वर्णन न करता विद्यापीठे, पक्षी निरीक्षण, लायब्ररी असे अभ्यासपूर्ण लिहिले आहेत. त्यामुळे वैविध पूर्ण झाले.
Great! परत एकदा आपली ट्रिप १४ ब्लॉग वाचल्यामुळे एंजॉय करता आली.
Post a Comment