Friday, 22 April 2016

शेक्सपियरच्या निमित्ताने.….

दिनांक २३ एप्रिल …. 

सुप्रसिद्ध कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियर याची जयंती (ज- १५६४)आणि पुण्यतिथीसुद्धा(मृ-१६१६).
यावर्षी त्याची ४०० वी पुण्यतिथी! 
प्रामाणिकपणे सांगतो- मी शेक्सपियरचं कुठलंच साहित्य वाचलेलं नाही. त्याकाळची इंग्रजी भाषा समजणं माझ्यासाठी तरी खूप कठीण! नाही म्हणायला आम्हांला शाळेत 'As you like it' या नाटकातली- 

All world's a stage
And  all the men and women mere players:
they have their exits and their entrances....

ही कविता होती. ती शिक्षकांनी  शिकवलीही छान होती. 
पण त्याचा गहिरा अर्थ तेव्हा तितकासा पोचला नाही. 

तो पोचला हृषिकेश मुखर्जी यांचा 'आनंद' सिनेमा पाहिल्यावर!    
"बाबू मोशाय जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है जहापनाह! उसे ना तो आप बदल सकते है ना मैं! हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है जिनकी डोर उपरवाले की उंगलियो में बंधी है' 
हृषिकेश मुखर्जी


आनंदच्या मृत्युच्यावेळी हा संवाद ज्याप्रकारे वापरला आहे त्यामुळे त्या कवितेचा खरा आणि पूर्ण अर्थ लख्खकन कळला. 
https://youtu.be/W8X1cYD5QAw
हिंदी सिनेमांमुळे शेक्सपियर असा आपसूक आणि उत्कृष्टपणे आमच्यापर्यंत पोचत राहिला. 










गुलजार
गुलजार दिग्दर्शित 'अंगूर' हा एक उत्तम विनोदी चित्रपट  शेक्सपियरच्या  'The Comedy of errors'  या नाटकावर आधारित आहे. जुळ्या भावंडांच्या दोन जोड्यांची कमाल धमाल या सिनेमात आहे. संजीवकुमार आणि देवेन वर्मा यांनी यात अफाट काम केलंय. त्याची ही एक छोटीशी झलक-

संगीतकार आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित चित्रपटांची ट्रिलॉजी केली आहे. 
'मकबूल'(Macbeth वर आधारित), 'ओंकारा'(Othello)आणि 'हैदर'(Hamlet) ही ती ट्रिलॉजी! 'मकबूल' ला अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी होती तर 'ओंकारा' ला उत्तर भारतातल्या रांगड्या राजकारण आणि माफियाची 
आणि 'हैदर'ला काश्मीर प्रश्नाची!

चारशे वर्षांनंतरही शेक्सपियर आजही relevant आहे याचं माझ्या मते कारण त्याच्या नाटकांतल्या गोष्टीपेक्षाही त्याच्या पात्रांच्या characterization मध्ये आहे. पराकोटीचा राग, संशय, सूडभावना, द्वेष,सत्ताकांक्षा,possessive स्वभाव,पश्चाताप,दुःख यासारख्या मर्त्य मानवाच्या भावनांना शरण जाणारी त्याची पात्रं असतात. म्हणून त्यांची शोकांतिकाच होते.या भावना चिरकालीन आणि सार्वत्रिक आहेत. कोणत्याही काळात सगळ्यांनाच identify होऊ शकतील अशा आहेत. यामुळेच शेक्सपियरच्या नाटकांच्या व्यक्तिरेखांचा गाभा कायम ठेवून त्यांची सद्य:स्थितीशी सांगड घालणं शक्य होत असावं.
विशाल भारद्वाज

माझ्या मते विशाल भारद्वाजच्या ट्रिलॉजीपैकी 'हैदर हा सर्वोत्तम सिनेमा असावा. के के मेनन तब्बू साठी गाणं म्हणत असतानाचा प्रसंग सर्व दृष्टीने लाजवाब आहे. या चित्रपटाकडे तुम्ही एक कलाकृती म्हणून बघा. काश्मीर प्रश्नावरचं भाष्य म्हणून बघू नका. चित्रपटात काश्मीर ही केवळ पार्श्वभूमी नाही तर एक व्यक्तिरेखाही आहे. वरून गोठलेलं, शहारलेलं, थिजलेलं पण आतून अस्वस्थ, हताश, धुमसणारं काश्मीर यात आपल्याला दिसतं.
https://youtu.be/2Gc9-Fe2xiA
शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित या सगळ्या चित्रपटांना जोडणारा एक समान धागा आहे ज्याची मुळं बिमल रॉय स्कूल ऑफ सिनेमाशी नकळत जोडली गेलेली आहेत. बिमलदा यांचा वारसा दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांनी पुढे चालवला. मुखर्जींच्या 'आनंद' चे संवादलेखक होते गुलजार, ज्यांनी पुढे 'अंगूर' चं दिग्दर्शन केलं. आणि गुलजारांच्या 'माचिस' सिनेमात संगीतकार म्हणून गाजलेले त्यांचे शिष्य विशाल भारद्वाज यांनी पुढे  ट्रिलॉजी दिग्दर्शित केली.
 म्हणजेच सिनेमाच्या माध्यमातून  गोष्ट सांगणे,चित्रभाषा वापरणे, मध्यम मार्ग(art film न करणे आणि तद्दन व्यावसायिक सिनेमाही न करणे), सिनेमात गाणी असणे यासारख्या बिमल रॉय स्कूल ऑफ सिनेमाचा वारसा आता समर्थपणे विशाल भारद्वाज यांच्याकडे आलाय. शेक्सपियरच्या नाटकांचे शिवधनुष्य त्यांच्याइतके कोणी पेलू शकेल असं वाटत नाही. आमच्यापर्यंत शेक्सपियरची आणखी काही नाटकं पोचण्यासाठी भारद्वाज यांनी ट्रिलॉजी वरच न थांबता आणखीही काही चित्रपट करणे आवश्यक वाटते.

No comments: