Friday, 12 April 2013

शमलेलं वादळ



हल्ली खूप एक-एकटी माणसं दिसतात..
मरण येत नाही म्हणून ती जगताहेत अशी भासतात..

पडक्या, भग्नावस्थेतल्या, आतून पोखरलेल्या 
पण बाहेरून कसेबसे अस्तित्व टिकवलेल्या 
एखाद्या वाड्यासारखी....

ओहोटीच्या पाण्यासारखी संपूर्ण खळबळ 
आत आत खेचून.. वरून शांत, निर्विकार दिसणारी...

विझलेले निखारे..
शमलेलं वादळ..
नेमकं काय झालं असेल ?
आजारपण ? 
जोडीदाराचा हात सुटून गेल्यामुळे आलेले एकटेपण?
का दुरावलेपण .. का नाकारलेपण ?

वाऱ्याच्या साध्या झुळुकीने इतस्तः दिशाहीन भरकटणाऱ्या पानांसारखी 
ही माणसं... कधीकधी मला परिचित वाटतात..
त्यांच्यात कधीकधी मला माझीही माणसे दिसतात..
आणि कधीकधी मी स्वतः ही !

1 comment: