Friday, 12 April 2013

वसंत आला ....


निसर्गचक्राप्रमाणे सर्व गोष्टी होत राहिल्या की मनाला एक आश्वासकता वाटते. 'वसंत आला तरू तरू वर आली नव पालवी' प्रमाणे झाडा झाडांवर वसंतोत्सव सुरू आहे. अगदी आठ दिवसांपूर्वी निष्पर्ण दिसणारी झाडे अचानक 'शालू हिरवा पाचूनी मढवा' लेऊन सजली आहेत. अशोकाच्या एकाच झाडावर हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसत आहेत. नव्या पानांच्या पोपटी रंगावर सकाळची सूर्यकिरणे पडून त्यांना एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. 

क्ष्यांमध्येही लगबग आहे. हल्ली रोज सकाळी बरोबर पावणे सहा वाजता दयाळ ( Mag Pie Robin) पक्ष्याच्या शिट्टीने मला जाग येते. त्यानंतर बुलबुलचा आवाज येऊ लागतो. इकडे कोकीळ सकाळचा रियाज चालू करतो .त्याच्या त्या ' पलट्यांच्या ' आवर्तनात मधून मधून बुलबुल आपली लकेर सोडतो. या पक्ष्यांच्या शिट्टीवरून त्यांच्याबद्दल काही आडाखे बांधता येतात. दयाळ बऱ्याचदा निष्पर्ण झाडाच्या टोकावर, देवळाच्या झेंड्याच्या दांड्यावर, अशोकाच्या झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बसून आपल्या धुंदीत, बेफिकीरीने शीळ घालत असतो. दुधाळ पांढरा आणि चकचकीत काळा अशा सुंदर मिश्रणाचा हा पक्षी आनंदाने व्यक्त होत असतो. आपल्याकडील कला भरभरून वाटणारा हा पक्षी एखाद्या तरुण आशिकासारखा वाटतो. देव आनंदच्या 'हम है राही प्यार के, हम से कुछ न बोलिये' या गाण्याची आणि त्या आधीच्या शिट्टीची आठवण तो करून देतो.
या उलट कोतवाल आणि Fantail Fly-catcher यांची शिट्टी गमतीशीर असते.हे थोडे स्वभावाने चंचल वाटतात. अस्थिर हालचाल करता करता यांची शीळ चालू असते. Fantail बऱ्याचदा आपल्या शिट्टीला प्रतिसाद देतो आणि हा साद-प्रतिसादाचा खेळ खेळायला मजा येते. हे दोन्ही पक्षी मला नटखट ,चंचल लहान मुलांसारखे वाटतात. 
तर हळद्या (Golden Oriole) हा एक बुजरा पक्षी आहे. त्याची सुंदर शिट्टी आसमंतात भरून राहते. पण तो सहज दिसेलच असे नाही. सुप्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी या पक्ष्यावर 'आंब्यावरचा बासरीवाला' असे एक पुस्तक लिहिले आहे. खरोखर याची शिट्टी म्हणजे metallic flute ची धून वाटते. काही वेळा मात्र हा साळुंकी-पोपट यांच्यासारखा आवाजही काढतो. आपण फसतो, पण हा आपण त्या गावचेच नाही याप्रमाणे एकदम शांत होतो. मागे एका राजकारण्याने दुसऱ्या राजकारण्यावर खोचक टीका करताना म्हटले होते: 'अशोकाचे' झाड सावली देत नाही, त्याला फुलेही येत नाहीत वगैरे. आज मात्र एक गम्मत झाली. हा हळद्या अशोकाच्या झाडातून मस्त शीळ घालत होता. दिसत मात्र नव्हता. असे वाटत होते जणू ते झाडच साद घालत आहे. लोकांनी हिणवलेल्या या झाडाचे आज मात्र एक वेगळेच सौंदर्य बघायला मिळाले !


No comments:

Post a Comment