Friday, 12 April 2013

एक 'चैतन्य'मयी दिवाळी ..





खरं तर वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस कसा जाईल या बद्दल मनात थोडी साशंकता होती. पण आद्ल्या दिवसापासूनच तिथे एक वेगळाच उत्साह होता. लगबग होती.प्रसन्न हसणं, मनमोकळ्या गप्पा ..जुन्या आठवणी ...दुसऱ्या दिवशी कोणते कपडे/साड्या घालायच्या यावरही चर्चा झडत होती ! 'चैतन्य'च्या manager मीनाताई आपटे यांच्या विहीणबाई तिथे दिवाळी साजरी करायला खास बंगलोरहून आल्या होत्या . त्या तमिळ! त्यांनी तास-दीड तासात ठिपक्यांची मोठी व सुरेख रांगोळी काढली होती. रोषणाई, अगदी लांबूनही दिसेल एवढा भव्य आकाशकंदील आणि हवेत असलेला गारवा याने दिवाळीची वातावरणनिर्मिती झाली होती.माझे मामा -श्री. यशवंत देवस्थळी आणि मामी -सौ. लीना देवस्थळी -ज्यांनी हे 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' साकारले आहे- ते सगळ्यांशी मिळून-मिसळून गप्पा मारत होते. सगळ्यांची आस्थेने विचारपूस करत होते. त्याचे सगळ्यांना अप्रूप वाटत होते. एक छान कौटुंबिक माहोल होता...
अशातच आमच्या मामाने दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यावर उत्साहात आणखी भरच पडली...

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे अगदी तय्यार होऊन आले. कुणी ठेवणीतली जरीची साडी नेसली होती 
तर चांदवडकर आजोबा- वय वर्षे ८२- सफारी सुटात, सकाळची पूजा आटपून आले होते. दिवाळीचा साग्रसंगीत फराळ झाला.नंतर अनौपचारिक गप्पा घोळक्या- घोळक्याने झाल्या. आणि मग कालच्या सूचनेप्रमाणे कार्यक्रम चालू झाला. मामाने सांगितल्याप्रमाणे पुरुष विरुद्ध स्त्रिया असा अंताक्षरीचा खेळ चालू झाला. नेहमीप्रमाणेच स्त्रिया संख्येने जास्त होत्या. गाण्यात तयारीने होत्या. बिचारे पुरुष.. कोणाचा आवाज बसला होता.. तर कोणाला शब्द आठवत नव्हते हो! आमच्या मामाने मात्र सुरेख आवाजात अनेकोत्तम गाणी गायली. त्याची गाण्यांची निवड लाजवाब होती. अस्मादिकांनीही गळा साफ करून घेतला !

या अंताक्षरीची एक गम्मत असते. तुम्ही त्यात सहभागी होताच! मग तुम्हाला गाणे येवो अगर न येवो! 
या खेळामुळे, गाण्यांमुळे, गाण्यांशी जोडल्या गेलेल्या आठवणींमुळे हळूहळू सगळ्यांचे चेहरे खुलू लागले. जे कालपासून एकदाही  हसले नव्हते, उदास दिसत होते तेही  गुणगुणायला लागले.एका आजींचे पती नुकतेच निर्वतले होते. त्या डिप्रेस्ड होत्या. पण त्यांनी एक गुजराथी गाणे म्हणून त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या मुलीलाही आश्चर्यचकित केले.जसे आम्ही फॉर्मात  होतो तश्याचप्रकारे विरुद्ध पक्षात काही पट्टीचे खेळाडू होतेच. मामी होती, पुण्याहून आलेल्या कुलकर्णी आजी होत्या. त्यामुळे कोणावरही भेंडी चढली नाही! एक सुमंत आजोबा होते. ते आमच्यावर 'म' आल्यावर खणखणीत आवाजात चक्क मनाचे श्लोक म्हणू लागले. त्याच्या शेवटी- जय जय रघुवीर समर्थ! नंतरही असेच २-३ वेळा झाले. 'थ' पासून सुरु होणारी गाणी तशी कमीच. पण या वर एकदा ८० वर्षांच्या भाटवडेकर आज्जीनी एक ओवी म्हणून मात केली. या आजींचा उत्साह दांडगा - त्यांनी 'चैतन्य' वर एक सुरेख कविता केली होतीच, शिवाय 'रानात सांग कानात आपुले नाते' सारखी गाणीही त्या गायल्या. हा 'थ' देण्याचा डाव एकदा आमच्यावरही उलटला. पण आम्ही त्यातून निभावून नेले. 'तू तिथे मी' या सिनेमात अशीच मराठी गाण्यांची अंताक्षरी दाखवली आहे. तेव्हा ती थोडी फिल्मी वाटली होती. मात्र हा प्रत्यक्ष अनुभव बघता आधीचे माझे मत पूर्णपणे बदलले .

शेवटी सामना अनिर्णीत राहिला. पण खूप मजा आली..

No comments:

Post a Comment