Saturday, 21 November 2015

पर्याय २०१२ : छोट्या गोळ्यांची छोट्या बाळांवर मोठी जादू


(पर्याय २०१२ मधला आणखी एक लेख. बीकन फौंडेशन च्या वतीने १९९५ सालापासून मी ससून हॉस्पिटल च्या आवारातील अनाथाश्रम 'श्रीवत्स' येथे नियमितपणे जात आहे. तिथल्या बाळांना होमिओपॅथिक उपचार देण्याचा अनुभव खरोखरच संस्मरणीय आहे. त्या अनुभवाविषयी या लेखात थोडे सविस्तर…)

एका मोठ्या फॅमिलीचा होमिओपॅथिक डॉक्टर

वर्तमानपत्रात बर्‍याच वेळा आपण अमूक अमूक मुलगा/मुलगी अनाथाश्रमात दाखलअशी लहान मुलांची, त्यांच्या फोटोसह बातमी वाचतो. त्यांच्या निष्पाप चेहर्‍याकडे बघून क्षणभर आपण हेलावतो. त्या मुलांची कुठलीही चूक नसताना त्यांना निराधार व्हावं लागतं याचं वाईट वाटण्यापलिकडे आपण काही करूही शकत नसतो. काहीजण मात्र यावर खूपच आदर्शवादी भूमिका मांडतात - अशा प्रकारच्या अनाथाश्रमांची समाजाला गरज नाही. ज्या समाजात अशा संस्था वाढताहेत तो समाज कशाचा निदर्शक आहे? तेव्हा अशा संस्था बंद होणं हेच खरंवगैरे वगैरे. एक भूमिका म्हणून जरी हे बरोबर असलं तरी जन्म देऊन आईने हॉस्पिटलमध्ये सोडून दिलेल्या, काहीवेळा सिनेमात दाखवतात तसं देवळाच्या पायरीवर ठेवलेल्या (दुधाच्या बाटलीसह), काहीवेळा कचरापेटीजवळ अक्षरश: टाकून दिलेल्या, कधी रिक्षात तर कधी रेल्वेत सोडलेल्या, कधी कुमारी मातेने जन्म दिलेल्या, तर कधी नकळत घडलेल्या चुकीतून जन्माला आलेल्या या बाळांचं करायचं तरी काय? यांची जबाबदारी शेवटी समाजालाच घ्यावी लागणार हे सत्य नाकारता येईल का?

श्रीवत्सविषयी थोडंसं:
                                 

अशा मुलांची जबाबदारी घेणारी एक संस्था पुण्यात 1973 पासून कार्यरत आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या आवारात सोफोश (SOFOSH- Society Of Friends Of Sassoon Hospital ) या एनजीओमार्फत श्रीवत्सहे अनाथाश्रम चालविले जाते. श्रीवत्सही शासनमान्य, अधिकृत संस्था 4 वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी आहे. निराधार, निराश्रित, अनाथ मुलांचे संगोपन, त्यांच्या आजारांवर वैद्यकीय उपचार, तसेच त्यांचे पुनर्वसन या संस्थेमार्फत केले जाते. ह्या संस्थेत दाखल होणारी मुले ही कौटुंबिक न्यायालयाच्या देखरेखेखाली असतात. श्रीवत्सया संस्थेतर्फे ही मुले इच्छुक पालकांना दत्तक दिली जातात. यासाठी इच्छुक पालकांची नोंदणी संस्थेत केली जाते. श्रीवत्सच्या समाजसेविकांमार्फत या पालकांच्या मुलाखती घेतल्या जातात, तसेच होम व्हिजिट्सही केल्या जातात. मूल दत्तक घेण्यास पालक पात्र आहेत का यासाठी इच्छुक पालकांची वैद्यकीय तपासणी, त्यांची आर्थिक
क्षमता व अन्य कायदेशीर बाबीही तपासल्या जातात. पालकांना दत्तक प्रक्रिया समजावून सांगितली जाते. 
त्यांच्या एकत्र व वैयक्तिक अशा प्री-अ‍ॅडॉप्शन मीटिंग्ज घेतल्या जातात. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर बाळ - जे कौटुंबिक न्यायालयाच्या जबाबदारीखाली असते-ते दत्तक जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र ठरते. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की -

1) ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाळ संस्थेत राहत असते. या प्रक्रिया होण्यासाठी वेळ लागू शकतो. तितका काळ बाळाचे संगोपन, लसीकरण, वैद्यकीय उपचार श्रीवत्समार्फत केले जातात.
2) हे सर्व करण्यासाठी संस्थेला एक इन्फ्रास्ट्रचर उभे करणे व एक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक ठरते.
3) इच्छुक पालक, कौटुंबिक न्यायालय आणि बाळ या तिन्ही घटकांना जोडणारी, समन्वय साधणारी आणि बाळाच्या हिताचे रक्षण करणारी ही संस्था आहे. न्यायालयाव्यतिरिक्त CARA (Central Adoption Research Agency) ही आणखी एक केंद्र सरकार पुरस्कृत संस्था या दत्तक प्रक्रियेवर देखरेख करत असते.
4) बाळ संस्थेत राहण्याचा काळ हा जरी तात्पुरता असला (पुनर्वसन होईपर्यंत) तरीसुद्धा त्या काळात बाळासाठी जास्तीत जास्त सुखावह वातावरण निर्माण करणे ही संस्थेची जबाबदारी असते. नर्स आणि हेल्पर्सच्या
सहाय्याने आहार, स्वच्छता इत्यादी काळजी घेतली जाते व इतर पूरक उपक्रम (उदा. फिजीओथेरपी इ.) राबविले जातात.
 चार वर्षांपुढील मुलांना दुसर्‍या संस्थेत दाखल केले जाते. तसेच शारीरिक व्यंग, मति/गतिमंदत्व असलेल्या मुलांसाठी श्रीवत्सतर्फे ताराही संस्था पिंपळे गुरव येथे चालविण्यात येते.

बीकन फाऊंडेशन आणि श्रीवत्स’: एक ऋणानुबंध

बीकन फाऊंडेशन आणि श्रीवत्सया दोन्ही संस्था गेली सुमारे 20 वर्षांहून अधिक काळ एकत्र काम करत आहेत. बीकन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. विक्रांत महाजन यांच्या परिचित समाजसेविका श्रीमती पद्मिनी कुमार यांच्यामुळे या एकत्रित उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवात Hepatitis B ची carrier स्टेट असणार्‍या काही बाळांना होमिओपॅथीचे उपचार देण्यापासून झाली. त्यावेळी ही लहान लहान बाळं डॉ. महाजनांच्या दवाखान्यात आणली जात व तिथे त्यांना औषधे दिली जात. डॉ. विक्रांत महाजन व त्यांचे विद्यार्थी डॉ. समीर, डॉ. विवेक त्यानंतर डॉ. नीलेश, डॉ. रूपाली, डॉ. अपर्णा, डॉ. लाजवंती या टीमद्वारे हे काम चालविले जाई. यानंतर जशी पेशंटची संख्या वाढू लागली, तसे सर्व पेशंट संस्थेबाहेर तपासणीसाठी नेणे अवघड होऊ लागले आणि म्हणून मग बीकन फाऊंडेशनचे डॉक्टर 1995 पासून नियमितपणे श्रीवत्समध्ये जाऊ लागले. 1995 पासून बीकन फाऊंडेशनचे डॉ. राजेश पुसाळकर हे काम पाहत आहेत. श्रीवत्सने आम्हांला या संपूर्ण काळात नेहमीच पूर्णपणे सहकार्य दिले आहे. हे
मुद्दाम नमूद करावेसे वाटते. आम्हांला लागणारी माहिती देणे, कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप न करणे, औषधे व इतर साहित्य देणे, तसेच नर्सेसची सेवा देणे इत्यादींद्वारे आम्हाला सातत्याने ही मदत होत आहे.
त्याच्याशिवाय आमचे कार्य येथे चालू शकले नसते. यामुळेच आमचे एक जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. श्रीवत्सपरिवाराचा आम्ही एक भाग झालो आहोत.

गेल्या सुमारे 18 वर्षांच्या आमच्या या उपक्रमाबाबत काही ठळक मुद्दे मांडावेसे वाटतात:
1) आम्ही येथील पेशंटना Constitutional Medicines देतो. सुरुवात जरी Hepatitis-B  च्या पेशंट्ससाठी झाली असली तरी नंतर मग इतर त्रासांसाठीही औषधयोजना चालू झाली. उदा. वरचेवर सर्दी/खोकला/ताप, प्रतिकारशक्ती कमी असणे, वजन न वाढणे, कानाचे विकार (कान फुटणे), त्वचाविकार, Delayed milestones, Hyperactivity(ADHD) इत्यादी.
2) काही इतर आजार असणार्‍या मुलांनाही होमिओपॅथीची औषधे दिली जातात. उदा. एचआयव्ही बाधित
मुले, जन्मजात हृदयविकार, डाऊन सिंड्रोम इत्यादी. यात होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग मूळ आजारासाठी नसून, इतर कुठलेही आजार होऊ न देणे किंवा प्रतिकारशक्ती वाढवणे हा असतो. आपल्या वैयक्तिक practice मध्ये अशा विविध आजारांचे पेशंट्स एकाचवेळी बघायला मिळत नाहीत, म्हणूनच हा अनुभव समृद्ध करणारा आहे.
3)  तसेच मतिमंदत्व अथवा सेरेब्रल पाल्सी सारखा दुर्धर विकार असणार्‍या मुलांसाठीही होमिओपॅथीची औषधे प्रतिबंधात्मक उद्देशाने दिली जातात. या मुलांमध्ये काहीवेळा फीट येण्याचा त्रास असतो.
होमिओपॅथीच्या औषधांनंतर हे प्रमाण कमी करणे शक्य होऊ शकते.
4)  आईचे दूध व त्याद्वारे आजारप्रतिबंधक घटक न मिळू शकलेल्या या मुलांमध्ये वरचेवर आजारी पडण्याची प्रवृत्ती असते. वारंवार ताप येणे, सर्दी/खोकला, न्यूमोनिया, वारंवार कान फुटणे, उलटी-जुलाब इत्यादी त्रास होऊ शकतात. त्यामुळे मुलं कमजोर होतात. त्यांचे वजन वाढत नाही. होमिओपॅथीचीConstitutional  औषधं दिल्यानंतरचा आमचा अनुभव असा आहे की या मुलांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आजाराची तीव्रताही कमी होण्यास मदत होते. दोन आजारांमधला पेशंट बरा असण्याचा काळही वाढतो. पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे पेशंटची प्रकृती सुधारतेच तसेच मर्यादित human resources असलेल्या अनाथाश्रमाच्या व्यवस्थेवरचा ताण कमी करता येतो.
5) होमिओपॅथीच्या औषधांचे परिणाम हे काहीवेळा असे अप्रत्यक्ष  दिसतात. म्हणजेच बाळ सहा-सहा महिने आजारी पडत नाही, त्याचे वजन वाढते, ते व्यवस्थित खाऊ लागते. त्याची वाढ त्या-त्या वयाप्रमाणे होऊ लागते. ते खेळकर बनते, चिडचिड करत नाही. मात्र इतर आजारी, किरकिरी, कृश अशा बाळांच्या तुलनेत हा फरक डोळ्यांत भरण्यासारखा जाणवतो.
6) जुनाट तक्रारींबरोबरच ताप, उलटी-जुलाब अशा तात्पुरत्या पण तीव्र स्वरूपाच्या आजारांसाठीही होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग केला जातो. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्यास त्या पेशंटना अ‍ॅडमिट करणे व अ‍ॅलोपॅथिक उपचार देणे क्रमप्राप्त ठरते.
7) शारीरिक तक्रारींबरोबरच काही मानसिक त्रासांसाठी होमिओपॅथीच्या औषधांचा चांगला उपयोग झालेला दिसून येतो. उदा. काही वर्तन समस्या - Hyperactivity, चावणे, सारखी मान हलवणे, डोके आपटणे, ब्रेथ-होल्डिंग स्पेल्स इ. उदा. : एका लहानग्या पेशंटने त्याच्या आईचा मृत्यू पाहिला आणि तिचे अंत्यविधीही. त्यानंतर तो अबोल झाला. होमिओपॅथीच्या औषधांनंतर त्याच्यात हळूहळू सुधारणा झाली आणि तो पुन्हा बोलू लागला.
8)  होमिओपॅथीच्या औषधांमुळे मुलांचे milestones लवकर सुधारतात असाही आमचा अनुभव आहे. यात औषधांबरोबरच संस्थेत मिळणारा चौरस आहार, फिजीओथेरपी आणि येथे येणार्‍या स्वयंसेवकांमार्फत मुलांना दिले जाणारे स्टिम्युलेशनही महत्त्वाचे ठरते.
9) काही वेळा येथील विशिष्ट परिस्थितीमुळे एकाच वेळी अनेक मुलांना साथीचे आजार होऊ शकतात. अशा मुलांना वेगळे ठेवण्यात येते (isolation). परंतु तरीही असे आजार टाळता येऊ शकत नाही. कांजिण्या, गोवर, खरूज इत्यादींसारखे त्रास होऊ शकतात. अशावेळी होमिओपॅथीच्या Genus Epidemicus या तत्त्वाप्रमाणे औषध दिल्यास अशी साथ आटोयात येण्यास मदत होऊ शकते.

एक नाट्यमय वळण:

श्रीवत्ससंस्थेच्या कार्यकारी मंडळातर्फे कुठल्या पेशंटसाठी होमिओपॅथीचे उपचार द्यायचे हे ठरविले जाते. प्रामुख्याने प्रचलित अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीचा प्रभाव येथेही होता. मात्र अलिकडेच घडलेल्या एका घटनेनंतर हे चित्र पालटले.
एकदा पावसाळ्यामध्ये रूटीन व्हिजिटला गेलो असता, एक बाळ फॉलोअपसाठी आणले नव्हते. हे लक्षात येताच मी त्याची चौकशी सिस्टरकडे केली. तसे त्या म्हणाल्या, की त्याला अ‍ॅडमिट केले आहे. अधिक विचारपूस करता असे कळले की यंदा पावसाळ्यात ह्या एकत्र राहणार्‍या बाळांमध्ये न्यूमोनिया व जुलाबाची साथ खूप तीव्र प्रमाणात आली व त्यात ह्या आमच्या देखरेखीखालील बाळाला जुलाबाची लागण झाली व त्यास अ‍ॅडमिट करावे लागले. एकंदरीत 17-18 बाळं आजारी पडली म्हणजे जवळजवळ एक चतुर्थांश आणि होमिओपॅथीच्या औषधांवरील फक्त एकच म्हणजे... एक वीसांश. म्हणून जरा जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले, की होमिओपॅथीचे औषध घेणाऱ्या बाळांना  एकतर त्या साथीची लागण तरी झाली नाही वा झालीच तर त्यांना अ‍ॅडमिट न करता नुसत्या औषधोपचारानेच बरे वाटले. ही बाब तेथील समाजसेविकांच्या लक्षात आणून द्यावी लागली व त्यांना असेही सुचवावे लागले की मग का नाही सर्वच बाळांना ह्या साथीपुरती  आपण होमिओपॅथीची औषधे सुरू करायची? एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेत संस्थेकडून निदान जुलाबासाठी तरी औषध देण्यास होकार मिळाला.
पूर्वी अशाप्रकारे साथीच्या आजाराचे पेशंट बघण्याचा अनुभव होताच. यावेळी तोच उपयोगी पडला. सिस्टरांकडून बाळांच्या जुलाबाबाबत मिळेल तेवढी माहिती घेतली. जुलाबाला खूप वास येणे (offensive loose motions) आणि पेशंटचे वजन कमी होणे एवढीच माहिती मिळाली. याआधारे ज्या-ज्या पेशंटना जुलाब होत होते त्या सर्वांना Podophyllum 200 हे औषध वारंवार देण्यास सांगितले व त्रास नसणार्‍यांना एकच डोस देण्याचे ठरले.
पुढील साप्ताहिक व्हिजीटच्या वेळी या औषधाचा चांगला उपयोग झाल्याचे लक्षात आले. एवढेच नाही तर दुसर्‍या एका समाजसेविकेने असेही ठामपणे मांडले, की यापुढे श्रीवत्समध्ये दाखल होणार्‍या प्रत्येक पेशंटला होमिओपॅथीचे औषध देण्यात यावे. यामुळे पेशंटची प्रतिकारशक्तीही वाढेल तसेच वारंवार प्रतिजैविके व त्यांचे दुष्परिणाम याचा त्रास बाळांना होणार नाही. जर यातून बाळांना अ‍ॅडमिट करणे टाळता आले तर संस्थेच्या दृष्टिनेही ते चांगलेच, कारण सर्व व्यवस्थेवर येणारा ताण टाळता येईल. आमच्या बाजूने कोणतीही अडचण नव्हती. श्रीवत्सच्या संचालिका सौ. माधुरी अभ्यंकर यांच्याशी याविषयी चर्चा झाली आणि त्यांनतर या कामाला सुरुवात झाली.
आमच्या दृष्टिने हा संस्थेने आमच्या आत्तापर्यंतच्या कामावर दाखवलेला विश्‍वास होता आणि म्हटलं तर एक संधी होती, एका विशिष्टset-up मधल्या पेशंटना एकाचवेळी होमिओपॅथीचे औषध देण्याची! 

अर्थात, यात काही अडचणीही होत्या -
1)  एक तासाच्या ओपीडीत सर्व पेशंट तपासणे व त्यांची माहिती घेणे हे वेळेच्या दृष्टिने तसे घाई-गडबडीचे होते. त्यात human error ला खूप वाव राहतो.
2) ‘श्रीवत्सच्या सिस्टर्सच्या बाजूने विचार करता एवढ्या पेशंटची होमिओपॅथीच्या दृष्टिने माहिती देणं हेही अवघडच! होमिओपॅथीच्या डॉक्टरने स्वत:च्या दवाखान्यात एखाद्या लहान मुलाची त्याच्या पालकांकडून माहिती घेणं ही एक गोष्ट झाली. मात्र इथल्या अनाथाश्रमासारख्या सेट-अपमध्ये हीच माहिती मिळवणे एक कठिण काम असते. एकेका सिस्टरचे कामाचे तास झाले की त्यानंतर वेगळी सिस्टर असते. त्यामुळे माहिती देण्यात तफावत येऊ शकते. त्यात सातत्य असतेच असे नाही. काही वेळा असेही होते की एखाद्या सिस्टरला तिथल्या एखाद्या बाळाचा खूप लळा लागलेला असतो किंवा एखादे कुरकुरणारे बाळ अजिबात आवडत नसते. त्यामुळे माहिती सांगण्यात सिस्टरच्याच भावना अधिक येतात. तर कित्येकदा असेही होते की एखाद्या प्रश्‍नाला जनरल/कॉमन उत्तर दिले जाते. 
ज्याआधारे त्या लक्षणावर आधारित औषध देणे अवघड होऊन बसते.

3) अनाथाश्रम या सेट-अपच्या मर्यादा - येथे सर्व मुलांना एकाच प्रकारचे खाणे दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीच्या औषधाच्या दृष्टिने आवश्यक लक्षण, खाण्या-पिण्याची आवड-निवड हे आपोआपच बाद होते. तीच गोष्ट झोपण्याच्या पद्धतीची! तसेच येथे पांघरूण/स्वेटर/पंखा सगळ्यांना सारखेच दिले जाते. त्यामुळे पेशंट शीत प्रकृतीचा आहे की उष्ण वगैरे ठरवणे अवघड होते. एकूणच होमिओपॅथीच्या लक्षणांची योग्य ती माहिती कमीतकमी वेळात मिळवणे हे skillful काम आहे, त्यातून ह्या परिस्थितीमध्ये ते अति-skillful होऊन बसते.

नवी कार्यप्रणाली:

यासंबंधी डॉ. विक्रांत महाजन यांच्याबरोबर चर्चा केली असता एक कार्यप्रणाली विकसित करता येऊ शकेल असे दिसले. ही प्रणाली संगणकीय/डिजीटल स्वरूपात असेलच असे नाही. परंतु ती user-friendly असावी.
1) ती स्वत: सिस्टरना वापरता यावी; मात्र ती अशाप्रकारे असावी की, तेथील बाळाची माहिती अचूकपणे मिळावी. तसेच यातून सिस्टरची subjectivity आणि ढोबळ generalization  वजा करता यावे.
2) या प्रणालीद्वारे वेळही वाचावा. पण त्याचबरोबर एका विशिष्ट framework मध्ये बाळाच्या औषधासाठी एक totality रूपी firm footing ही निर्माण व्हावं.
3) यात फाफटपसारा नसावा, ती किचकट नसावी. तरीही वैयक्तिक माहिती ठळकपणे उठून दिसावी.
यासाठी आम्ही आमच्या आजपर्यंतच्या येथील अनुभवाचा मागोवा घेतला. यामध्ये जुनाट (chronic) तक्रारींसाठी सर्वसाधारणपणे कोणती औषधे वापरण्यात आली याचा विचार केला. तसेच ही औषधे देण्यामागे डॉक्टरचे thinking व feeling काय होते, याचाही विचार केला. पेशंटच्या कोणत्या लक्षणांचा विचार करून कोणते औषध दिले ज्याचा पेशंटला नक्की फायदा झाला, हे बारकाईने तपासून पाहिले. या सर्व संकल्पना एकत्रित करून आम्ही एक सुटसुटीत प्रश्‍नावली तयार केली. ही प्रश्‍नावली डॉक्टरने भरायची नसून, तेथील सिस्टरने भरणे अपेक्षित आहे. म्हणून आम्ही ती मराठीत तयार केली. प्रत्येक आठवड्यात थोडे-थोडे पेशंट असं करत करत आतापर्यंत सत्तर पेशंट्सची माहिती घेण्यात आली आहे व त्यांना होमिओपॅथीचे औषध सुरू करण्यात आले आहे. या कार्यप्रणालीत सिस्टर्सना होमिओपॅथीच्या या उपचारपद्धतीत जास्त actively समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच होमिओपॅथीच्या संकल्पनाही सोप्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. अनाथाश्रमासारख्या एका वैशिष्ट्यपूर्ण सेट-अपमध्ये आम्ही केलेल्या आजपर्यंतच्या कामाचा हा एकप्रकारे सारांशच आहे. अशाचप्रकारे इतर ठिकाणीही याचा वापर करता यावा, यादृष्टिने ही पथदर्शी कार्यप्रणाली आम्ही उद्धृत करत आहोत -

खालील मुद्यांबाबत पेशंटबद्दलची निरीक्षणे सिस्टरने नोंदविणे अपेक्षित आहे -

अ) Appearance - पेशंटचे दिसणे
(पेशंटचा Body type किंवा बाह्य प्रकृती/Constitution कसे आहे, यानुसार पेशंटला होमिओपॅथीचे औषध देता येऊ शकते. या निरीक्षणांना अशा परिस्थितीत hard facts चे महत्त्व आहे.)

आ) Impression-
(पेशंटच्या बाबतीत निरीक्षकाचे Impression कसे आहे?)
उदा. काही मुलं इतर मुलांच्या तुलनेत आपल्याstimulus ला पटकन respondकरतात. त्यांचे डोळे चमकदार असतात. ती हसरी असतात. आपल्याशी वागताना छान react करतात, involved असतात. अशी मुलं bright म्हणता येऊ शकतील.

इ)  आतापर्यंतच्या मुख्य तक्रारी -
(आतापर्यंत पेशंटला कुठले आजार झाले त्यावरून पेशंटच्या tendencies/वैशिष्ट्यांची/tissue-affinity ची कल्पना येऊ शकते. हा मुद्दाही अचूक औषधाच्या निवडीच्या दृष्टिने उपयुक्त ठरतो.)
1) कान वाहणे - त्या स्त्रावाला वास येतो/येत नाही
2) पोटाचे त्रास - जुलाब- त्याचा वास येतो/येत नाही 
3) पोटाचा त्रास - बद्धकोष्ठता/गॅसेस
4) Respiratory System- सर्दी/घसा/टॉन्सिल्स     
5) Respiratory System-Lower- घरघर/दम/न्यूमोनिया
6) त्वचाविकार - उदा. इसब-Eczema/Dermatitis
7) इतर - उदा. CNS वा इतर systems शी संबंधित आजार

ई) Milestones- 
येथे दाखल होणार्‍या बहुतांश मुलांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढीचा वेग कमीच असतो. हे अध्याहृत धरूनही जर काही ठळक milestones  खूपच delayed आहेत का?

उ) Concomitant लक्षणे - 
ही  पेशंटची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असतात - यात आमच्या अनुभवावर आधारित पुढील लक्षणांचा समावेश होतो -
1) घाम कितपत येतो? येत असल्यास कुठे/त्याचा वास असतो का?
2) वर्तनाबाबत काही निरीक्षणे -
तीव्र चिडचिडेपणा (violence) कितपत?
स्वत:वर राग काढणे (उदा. डोके आपटणे)/इतरांवर
(उदा. चावणे/वस्तू फेकणे इ.)
3) गाणी/संगीत यामुळे वर्तनात काही बदल होतो का?

ऊ) On/ Examination-(हे डॉक्टरांनी तपासणे आवश्यक) -
पेशंटला प्रत्यक्ष तपासले असता -
1) Glands
2) Vasomotor तळ हात-पाय व डोके यांच्या तापमानात काही फरक
3) घाम
4) Orifices 
तसेच आवश्यकतेप्रमाणे Systemic Examination

ए) Concordances (Remedy Relationship) - 
काही वेळा असे होते की एखाद्या पेशंटला कान वाहण्याच्या त्रासासाठी Merc sol हे औषध दिलेले असते व त्यामुळे त्याला बरे वाटलेले असते. अशा पेशंटला constitutional औषध म्हणून Remedy Relationship च्या तत्त्वाप्रमाणे Calcarea carb हे औषध देता येऊ शकते.

आता या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर करून औषध शोधणे कसे शक्य  होते हे पाहू -
उदा. 1 
1) Appearance - बारीक/उंच
2) Impression- Active/social
3) आत्तापर्यंतच्या तक्रारी Respiratory System- Lower-फुप्फुसांचा त्रास/न्यूमोनिया
वरील लक्षणांच्या आधारे - Calcarea Phos हे औषध दिले.

उदा. 2
1) Appearance - बारीक
2) Impression - Active(जरा जास्तच)
3) तक्रारी- Upper Respiratory System
4) On/Examination-Glands 
5) Concomittance - चिडचिडेपणा - Violence
यावरून Calcarea Iod या औषधाचा विचार होऊ शकतो.

उदा. 3
1) Appearance - जाड/गुटगुटीत/गोबरे गाल
2) Impression - Active
3) मुख्य तक्रारी - Respiratory System - घसा/टॉन्सिल्स
4) Concomittance - अति घाम
यावरून Calcarea carb हे औषध दिले जाऊ शकते.

जेथे माहिती मिळण्याला मर्यादा आहेत, अशा परिस्थितीत देखील एक totalityउभी करून एका firm foundation च्या आधारे होमिओपॅथिक औषधे देणं या कार्यप्रणालीमुळे शक्य  आहे. म्हणून याची सविस्तर चर्चा येथे करण्यात आली आहे.


असं म्हणतात, की होमिओपॅथ आणि त्यांच्या पेशंटचं एक वेगळ्या पातळीवरचं नातं असतं, एक rapport असतो. म्हणूनच होमिओपॅथ पेशंटच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातो. येथे अनाथाश्रमात काम केल्यावर असं वाटतं की हे एक विस्तारित कुटुंब आहे आणि आपणही या कुटुंबाचा एक भाग आहोत. येथील पेशंटना उपचार देणं हा एक मोठ्या आनंदाचा आणि समाधानाचा भाग आहे. ज्या पेशंटबरोबर एक नातं निर्माण झालेलं असतं आणि जर तो डॉक्टरकडे येईनासा झाला तर डॉक्टरलाही थोडंसं वाईट वाटतंच! पण येथील पेशंट आपले उपचार घेऊन नंतर आपल्या स्वत:च्या हक्काच्या घरी गेला तर उलट डॉक्टरला आनंदच होतो! येथील पेशंटच्या चेहर्‍यावर निरोगी, निरागस हसू पाहणे आणि त्यामागे आपला खारीचा का होईना, पण एक वाटा आहे याचं समाधान कुठल्याही
फूटपट्टीत न मोजता येण्यासारखं आहे!


No comments:

Post a Comment