Tuesday, 24 November 2015

पर्याय २०१३: वृद्धत्व आणि मन

(२०१३  चा  ' पर्याय '  वृद्धत्व विशेषांक होता. या अंकातील  माझा हा पहिला लेख !

केसांचा रंग हळूहळू पालटू लागला, चाळिशीचा चष्मा वापरल्याशिवाय दिसेनासे झाले आणि स्त्रियांमध्ये पाळीची अनियमितता दिसू लागली की शरीरातल्या स्थित्यंतराची चाहूल जाणवू लागते. अर्थात चाळिशीचा टप्पा ओलांडला म्हणजे काही लगेच वय झाले असे अजिबात नाही. पण त्याच्या काही खुणा नक्कीच दिसू लागतात. सर्वसाधारणपणे प्रवृत्ती हे बदल स्वीकारण्यापेक्षा ते नाकारण्याची असते. मग स्वतःचे वय लपविण्यासाठी केसांना कलप करण्यापासून ते चेहर्‍यावरच्या सुरकुत्या झाकण्यासाठी बाजारात खंडीभर मिळणार्‍या anti-ageing creams लावण्यापर्यंत खटपट चालू होते. 'You are only as old as You think किंवा 'Age is just a number' या सारखी शाळेच्या फलकावर सुविचार लिहितात तशी वाक्ये आपली घोटून पाठ झालेली असतात. काही वेळा आपल्या आजूबाजूला आपण उदाहरणेही  पाहिलेली असतात. तसेच मीडियामधून काही आपल्याला कळलेली असतात- अमका अमका धावपटू- तो वयाच्या इतक्या इतक्या वर्षी शर्यतीत लीलया धावला- किंवा एखाद्याने या वयातही इतके इतके सायकलिंग केले. मग हम भी कुछ कम नहींहे इतरांइतकेच स्वतःलाही सिद्ध करण्यासाठी असे काही साहसी प्रकार करण्याकडे कल होऊ शकतो. त्यात मजा, आनंद, समाधान, थ्रील हे सगळे जरी असले तरी ते सगळ्यांना जमेलच असे नाही. स्वतःच्या शारीरिक क्षमतांबाबत प्रत्येकाला खात्री वाटतेच असे नाही. किंबहुना पूर्वी ज्या गोष्टी आपण ज्या बेधडक सहजतेने करत होतो, आयुष्यात एक प्रकारची जी बेफिकिरी होती, निर्णय घेताना एक घाव दोन तुकडे अशी आपली पद्धत होती ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी हे आपल्याला जमेल ना?’ अशी साशंकता निर्माण झाली, आत्मविश्‍वास कमी पडू लागला तरी समजावे काहीतरी बदल होत आहे. मनात असलेल्या असंख्य आशा-आकांक्षा-इच्छा पण शरीराकडून तेवढी साथ नाही किंवा शरीर साथ देत असतानासुद्धा मनाची या गोष्टी करायची तयारी नाही अशा अवस्था निर्माण होऊ शकतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला आवडो वा न-आवडो, अपरिहार्यपणे हळूहळू वाढत्या वयाकडे प्रवास चालू होतो.

वृद्धत्वाचे जसे शरीरावर परिणाम होतात तसेच ते मनावरही होतात. त्याचा आपण आता थोडा सविस्तर विचार करू. आधी व्यक्तीवर होणारे परिणाम आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेसंबंधांवर होणारे परिणाम अशाप्रकारे आपण हा परिणाम समजून घेऊ.

व्यक्ती -
आतापर्यंतचे आयुष्य नोकरी/व्यवसायात व्यतीत केल्यानंतर निवृत्तीचा काळ सुरू झाला की सर्वसाधारणपणे संमिश्र भावना असतात- प्रापंचिक जबाबदार्‍या पूर्ण झाल्या, नोकरीत/व्यवसायात काही स्थान निर्माण केले याचे समाधान, आता पुढे नोकरी नाही तेव्हा पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करण्यासाठी, स्वतःसाठी वेळ उपलब्ध होणार म्हणून आनंद, मग त्यात काय-काय करायचे याचे प्लॅनिंग, आशावाद वगैरे याबरोबरच एक अनामिक हुरहूर आणि एक पोकळीसुद्धा! कुटुंबाचा कर्ता-कमावता पुरुष किंवा कमावती स्त्री ही ओळख आता पुसली जाणार आणि एक रिटायर्ड माणसाचा शिक्का बसणार, हा एक प्रकारचा धसकाही माणसाला जाणवू शकतो. म्हणजेच आपण आता आपण उपयोगी-मूल्याचे नाही तर उपद्रवी-मूल्याचे होणार की काय असेही वाटू शकते. म्हातारपणाची बेगमी ज्यांनी पूर्व-नियोजनाने करून ठेवलेली असते किंवा ज्यांना पेन्शनचा/आरोग्यविम्याचा भक्कम आधार असतो त्यांना आर्थिक गोष्टींची एवढी चिंता करण्याची वेळ येत नाही. मात्र ज्यांना या गोष्टींचे कवच उपलब्ध नसते, त्यांना वाढत्या दैनंदिन खर्चाची, महागड्या वैद्यकीय सेवेची झळ बसू लागते. आर्थिक गोष्टींसाठी आपल्याला आता मुलांवर अवलंबून राहावे लागणार हा विचार येऊ लागतो आणि या महागाईच्या काळात आता आपण कसे निभावणार याबद्दल असुरक्षितता वाटू शकते. यातच जर या वयात येईपर्यंत वेगवेगळे आजार झाले असतील तर त्याबद्दल किंवा झाले नसतील तर ते इथून पुढे होतील की काय याबद्दल काळजी वाटू शकते. मृत्यूचे भय वाटतेच पण त्याहीपेक्षा भीती असते ती आजारी पडून परावलंबी होण्याची! आपला स्वतःवरचा कंट्रोेल गमावण्याची, आपले स्वातंत्र्य गमावण्याची! आजवर आपण इतरांचे केले पण इतरांना आपले काही करायला लागू नये ही भावना प्रबळ असते. अर्थात हे प्रत्येकालाच कितीही वाटत असले तरी प्रत्यक्षात ते तसे होईलच असे नाही. वय वाढल्यावर माणसामध्ये अलिप्तपणा यावा असं आपल्याकडे म्हटलं जातं. भौतिक गोष्टी, परिवार-नाते संबंध या सगळ्यापासून लांब जाऊन आध्यात्मिक विचार करणे अपेक्षित असते. मात्र नेमके हेच होऊ शकत नाही. नात्यांमध्ये कोणावर तरी अतिशय प्रेम, त्या व्यक्तीबद्दल वाटणारी ओढ, त्यातून निर्माण होणार्‍या अपेक्षा या चक्रात माणूस गुंतून पडतो. वाढत्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास अपेक्षाभंगाचे दु:ख खूपच त्रासदायक ठरू शकते. हा भावनिक गुंता फक्त प्रेम या भावनेशी निगडीत असतो असे नाही. काही वेळा एखाद्या प्रसंगात अढी, मान-अपमान, तीव्र राग, तिरस्कार अशा प्रकारच्या भावना निर्माण झालेल्या असतात. पण या भावनांची तीव्रता वयोपरत्वे कमी होत गेली नाही किंवा त्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत तर अशा unresolved, नकारात्मक भावनांचा व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होऊ शकतो. त्याचे स्वरूप त्या-त्या व्यक्ती प्रमाणे बदलू शकते. काही वेळा त्रास इतका होऊ शकतो की ती व्यक्ती सगळ्या जगाकडे या पूर्वग्रह दूषित नजरेतून बघते आणि हे त्या व्यक्तीला व इतरांनाही  त्रासदायक ठरू शकते.
बदलत्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे कुटुंबाचा आकार लहान झाला आहे. एकत्र कुटुंबे नामशेष झाली असे म्हणता येईल एवढी कमी झाली आहेत. घरात माणसं कमी, जी आहेत त्यांना नोकरीमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे वेळ नाही. त्यामुळे कित्येकदा घरी बोलायला सुद्धा कोणी नाही अशी परिस्थिती असते. टी.व्ही. हा काही वेळा आवड म्हणून किंवा एखादा कार्यक्रम बघायचा असतो म्हणून नाही तर बाकी काही करायला नाही, बोलायला कोणी नाही या अपरिहार्यतेतूनसुद्धा बघितला जातो. या वयात पती-पत्नींना एकमेकांचा सहवास असतो, आधार असतो. पण जर जोडीदाराचा मृत्यू झाला तर एकटेपणा येतो. मित्र परिवारात मन रमते पण ते नसतील तर ही एकटेपणाची भावना आणखी गडद होते आणि व्यक्ती आपल्या कोशात जाते.
अर्थात सर्वांच्या बाबत हे चित्र असे नकारात्मक, निराशाजनक असतेच असे नाही. आता आपले वय झाले म्हणून हात पाय गाळून न बसता शक्य तेवढे कार्यरत राहण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. कॉम्प्युटरसारखी एखादी गोष्ट शिकून तिचा वापर करायला शिकतात. त्यातून अजूनही आपल्याला नवे शिकता येते, काही तरी नवे करता येते याचा आनंद तर मिळतोच; शिवाय आत्मविश्‍वासही वाढू शकतो. जगात जे चालू आहे त्याच्या मी खूप मागे आहे अशी नकारात्मक भावना यामुळे दूर व्हायला मदत होते. काही एखादा छंद जोपासतात, पर्यटन करतात किंवा एखाद्या सामाजिक कामात सहभागी होतात. स्वतःच्या प्रकृतीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन योग्य आहार, आवश्यक तेवढा व्यायाम, पुरेशी झोप याद्वारे आरोग्य जपतात. ज्येष्ठ नागरिक संघासारख्या गटांमध्ये सहभागी होऊन समवयस्क लोकांबरोबर संवाद साधतात. एकमेकांची सुख-दु:खे आपसांत वाटून घेतात. वयामुळे आलेल्या मर्यादांची जाणीव ठेऊन, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. 

नातेसंबंध -
1.पती-पत्नी:

 ‘‘अहो, ऐकलं का? काय म्हणतेय मी? हे काय शोधताय एवढा ड्रॉवर उपसून?’’
 ‘‘माझे बँकेचे पासबुक कुठे गेले? इथेच ठेवले होते कुठेतरी...’’
  ‘‘हे काय... इथेच तर आहे!’’
असे म्हणून सहजपणे ते काढून देणार्‍या पत्नीवर आपण आता प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहू लागलोय हे पतीच्या लक्षातही येत नाही.
संसाराचा गाडा आपापल्या परीने दोघांनी हाकल्यानंतर आणि त्यात बर्‍याच वेळा नवर्‍याने बायकोवर वर्चस्व गाजवल्यानंतर, बायकोला गृहीत धरल्यानंतर जेव्हा त्याच नवर्‍याला बायकोवर अवलंबून राहण्याची वेळ येते तेव्हा नियती समतोल साधते कि काय असे म्हणावे लागते! उशिरा का होईना आपले महत्त्व समजले असे बायकोला वाटू शकते. बायकोशिवाय त्याचे पान हलत नाही. खाण्या-पिण्याच्या वेळा, औषधाच्या गोळ्या घेण्याच्या वेळा इत्यादी सगळं बायकोच सांभाळते. इतक्या वर्षांच्या सहवासामुळे म्हणा किंवा इतकी वर्षं न बोलल्यामुळे सहनशक्तीचा कडेलोट झाल्यामुळे म्हणा बायकोच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवतो. काही वेळा चेष्टा-मस्करी, काही वेळा तिरकस टोमणे तर काही वेळा त्रागा, चिडचिड अशा प्रकारे ती react होते. यातच जर दोघांपैकी एकाला ऐकू कमी येणे किंवा विस्मरण असा त्रास असेल तर परिस्थिती आणखी बिकट होते. मग संवादाऐवजी विसंवादच जास्त होतो! पूर्वी कधीही एकमेकांशी तार-स्वरात न बोललेल्या जोडप्यांमध्ये असे तार सप्तकातील संवाद ऐकून इतरांनाही आश्‍चर्य वाटते. अर्थात हे असे बोलणे असले तरी प्रत्यक्ष छोट्या-छोट्या कृतीतून एकमेकांबद्दलचे प्रेमच व्यक्त होत असते. पूर्वी ज्या गोष्टी व्यक्त होऊ शकल्या नाहीत किंवा एकमेकांना वेळ देत आला नाही तो आता देता येतो. एकमेकांचा आधार वाटतो. एकमेकांसाठी आपण काहीतरी करतो याचे समाधान वाटते. म्हणूनच हे नाते आणखी सुंदर होते.

2. सासू-सून:

एकाच घरात राहात असल्या तरी या सासू-सुनेचा वैशिष्ट्य म्हणजे एकीने देवपूजा केली तरी ते दुसरीला चालत नसे. एकीची पाऊण तास पूजा झाली की मग थोड्यावेळाने दुसरी 45 मिनिटे पूजा करे! दोघींच्या या स्पर्धेत बिचार्‍या देवांचे हाल!
खरं तर सासू-सून ह्या विषयी एक स्वतंत्र लेख व्हावा इतकी त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्याला पैलू देखील आहेत. परंतु थोडक्यात विचार करायचा झाल्यास स्वयंपाकघरातले सहजासहजी न होऊ शकलेले सत्तांतर हे दोघींमधल्या बर्‍याचशा धुसफुशीचे कारण असते. शिवाय स्वयंपाकघराबाहेरचे मुद्दे नकळतपणे स्वयंपाकाच्या विषयात मिसळून जातात. चावून चावून चोथा झालेल्या- आताची सासू ही पूर्वी कधीतरी सून होती- या वाक्यात तथ्यांश आहेच. नात्यामुळे मिळालेल्या वर्चस्वाच्या अधिकाराचा वापर केल्याशिवाय सासू राहत नाही. सुनेच्या बाबत सासूच्या मनात अढी निर्माण होण्याचे आणखी एक कारण असू शकते. आपल्या मुलाला एवढी वर्षे वाढवल्यानंतर त्याच्या लग्नानंतर तो आपले ऐकणार नाही किंवा ऐकत नाही आणि याला ही बाहेरून आलेली स्त्री जबाबदार आहे, अशी भावनाही सासूच्या मनात येऊ शकते. एवढी वर्षे केलेले कष्ट म्हणूनच वाया गेले असे तिला वाटू शकते. मात्र गमतीचा भाग हा आहे की जर तिचा मुलगा तिच्याशी त्याचे लग्न झाल्यानंतर वेगळ्याप्रकारे वागत असेल तरी ती त्याला जबाबदार मानत नाही. शेवटी काहीही झाले तरी ती आईची मायाच असते!

3. मुलं-नातवंडं:

हल्लीच्या धकाधकीच्या काळात आमच्याशी कोणाला बोलायला वेळच नाही ही सध्याच्या आई-वडिलांची आपल्या मुलांबद्दलची नेहमीचीच तक्रार! संवाद कोणाला नको असतो असे नाही पण खरंच वेळेचा अभाव असतो. पण काही वेळा यामुळे समज-गैरसमज होतात. नवीन पिढीचे आचार-विचार वेगळे, त्यांच्या खाण्या-पिण्याची आवड वेगळी, कपडे-लत्ते-entertainment याबद्दलच्या कल्पनाही वेगळ्या. पूर्वीच्या काळापेक्षा पैसा हातात जास्त खेळू लागल्यामुळे ज्या गोष्टी नव्या पिढीला गरजेच्या वाटतात त्या जुन्या पिढीला उधळपट्टी केल्यासारख्या वाटतात. गोष्टी तशा छोट्या असतात पण त्यात मतभिन्नता येते. आईवडिलांनी आपली मतं केवळ मांडली तर ठीक पण त्याबद्दल ते आग्रही राहिले तर मात्र ते वादाला निमंत्रण ठरू शकते. काही वेळा तर आईवडिलांनी मतं मांडणे हा त्यांच्या मुलांना त्यांचा interference वाटतो. आणि नात्यात अकारण एक कटुता येते. पूर्वी मुलगा आपलं ऐकायचा पण आता नाही. नेमके असे काय बदलले आहे? चूक कोणाची आहे? असे प्रश्‍न आईवडिलांना पडतात. खरं तर चूक कोणाचीच नसते. प्रश्‍न असतो एकमेकांनी एकमेकांना समजून घेण्याचा.
काही घरांत मात्र आजी-आजोबा घरातील जबाबदार्‍या निभावत असतात. घरातले वातावरण कसे का असेना त्यांचे नातवंडांना सांभाळण्याचे काम चालूच राहते. नातवंडांना पाळणाघरात ठेवण्यापेक्षा आम्हांला जोवर शक्य  आहे तोवर आम्ही त्यांना सांभाळूअसे म्हणत काही वेळा जिवापलीकडे जाऊ, दमछाक होऊनही ती जबाबदारी पार पाडतात.


खरं तर रोजच्या जगण्यातले प्रसंग तसे छोटे असतात. वयस्कर लोकांच्या अपेक्षाही छोट्या असतात... किंबहुना त्या तशाच असाव्यात! मुलांनी त्यांची विचारपूस करावी, त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलावे, त्यांच्या दिनक्रमाबद्दल जाणून घ्यावे, आपल्या रोजच्या कामातील घडामोडींबद्दल बोलावे... थोडयात थोडासा एकत्र वेळ घालवावा...  त्यांना सन्मानाने वागवावे... तर दुसरीकडे वृद्ध लोकांनीही हे समजून घ्यावे की जर एखाद्यावेळी असे करणे जमले नाही तर त्यामागे खरोखरच काही कारणे असतील... वेळ झाला नसेल... त्यांच्याशी मुद्दाम बोलायचेच नाही या उद्देशाने मुले असे वागतील असे नाही. आपण आता अगदी नकोसे झालो किंवा सगळे आता आपल्याकडे दुर्लक्षच करतात या एकसुरी, एकांगी भावनेतून वृद्धांनी प्रयत्नपूर्वक बाहेर पडले पाहिजे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेतल्यास, एकमेकांना थोडीशी सवलत  दिल्यास या वयातही नात्यांमधली वीण घट्ट राहून ताणरहित वृद्धत्वाचा अनुभव घेता येईल. 

1 comment:

  1. खुप मुद्दे कव्हर केले आहेत! वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समस्या खूपच आहेत... नाते संबंध थोडक्यात पण day-to-day life मधली उदाहरणे देऊन छान explain केले आहेत!
    खरं तर अलिप्त, निर्लेप व्यायला यायला हवं हे जरी खरं असलं तरी सोपं नाहीये. आपल्या पिढीने तो प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्याला कसं वागू नये हे कदाचित जास्त अनुभवायला मिळालं आधीचा पिढी पेक्षा... कारण तेव्हा life expectancy कमी होती...
    असो! सगळ्यांनी आत्ताच हा लेख वाचून विचार करावा...

    ReplyDelete