Tuesday, 23 January 2024

२२ जानेवारी २०२४ च्या निमित्ताने..

 



२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या दिवसानिमित्त पुण्यात काय वातावरण होतं याची निरीक्षणं या ब्लॉग मधून नोंदवली आहेत...

(डिस्क्लेमर : शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे ही निरीक्षणे नोंदवण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. अनावधानाने कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व ! हा केवळ एक  दस्तावेजीकरणाचा प्रयत्न आहे)


१) २१ जानेवारीच्या रात्री १२ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. सुमारे १५-२० मिनिटं फटाक्यांचे आवाज येत होते. यावरून मला वाटलं की २२ जानेवारी जोरात साजरी होणार आणि जागोजागी ट्रॅफिक जॅम होणार, आपण त्यात अडकून पडणार वगैरे... 


२) २२ जानेवारीची सकाळ नेहमीप्रमाणेच होती. फक्त  सगळीकडे उत्साह होता,  लगबग जाणवली. व्हाट्सअँप ग्रुप वर  या दिवसाचं औचित्य साधून कोणी कविता  केली होती तर कोणी रामाचं गाणं म्हणून ते पोस्ट केलं होतं , कोणी रांगोळी काढली त्याचा फोटो पाठवला होता. रामाच्या प्रति असलेला त्यांचा भक्तिभाव त्यातून उत्सफूर्तपणे प्रकट होत होता. 


३) माझं हातावर पोट (!) असल्यामुळे सुट्टी नव्हतीच. ती घ्यायची इच्छाही नव्हती पण वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तर आपण दवाखान्यात पोचूच शकणार नाही असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. सकाळ- संध्याकाळ माझ्या आणि दुपारी गावातील (पेठेतील) दवाखान्यांत मी व्यवस्थित जाऊ शकलो. नाही म्हणायला वाटेत सकाळी एक शोभायात्रा लागली. पण ती रस्त्याच्या एका बाजूने जात होती. त्यात बँड होता.. पण स्पीकरच्या मोठाल्या भिंती नव्हत्या. बरेच लोक त्यात सहभागी झाले होते. कोणीही नाचत नव्हते. फक्त एकाच माणूस गणपतीत नाचतात तसं (पण माफक) नाचत होता. 


४) दवाखान्यात एका माहेश्वरी समाजाच्या पेशंटने मला (मी सांगितले नसताना देखील ) अयोध्या मंदिराचा फोटो व्हॉट्स ॲप वर पाठवला आणि ते म्हणाले - "कोण म्हणतं की मंदिर अपूर्ण आहे? ते पूर्ण झालं आहे. पहा तुम्हांला फोटोही पाठवला आहे" (खरं तर मी असं काहीच बोललो नव्हतो)पुढे ते म्हणाले - "आज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे - साठ देशांमध्ये लाईव्ह रिले होणार आहे. टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले जाणार आहेत" 

तर एका पेशंटने सांगितले की त्यांना आदल्या रात्री अयोध्येत बॉम्ब स्फोट झाल्याचे स्वप्न पडले आणि त्यामुळे त्या  दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी घरातल्या लोकांना टीव्ही लावून तिथे कुठे घातपात तर नाही ना झाला याची खात्री करून घ्यायला सांगितलं ! 


५) प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावेळी (मी त्याचं प्रसारण पाहिलं नाही) वेगळं असं काहीच जाणवलं नाही.( म्हणजे फटाके वगैरे) (हे मी माझ्या भागापुरतं सांगू शकतो) 


६) येता जाता रस्त्यावर सगळीकडे भगवा माहोल होता- भगव्या पताका, भगवे झेंडे(सायकल, रिक्षा, दुचाकी, अपवादात्मक चारचाकी गाड्यांवर झेंडे लावले होते) घराघरांवर झेंडे दिसत होते. भगवे आकाशकंदील होते. काही घरांवर विद्युत रोषणाई केली होती. सोसायट्यांमध्येच  हे जास्त  होतं  असं नाही तर झोपडपट्ट्यांमध्येही भगव्या पताका, आकाशकंदील दिसत होते. आम्ही जैन नसलो तरी जैन समाज बहुल सोसायटीत राहतो. आमच्या सोसायटीत देखील (२० बिल्डिंगची सोसायटी ) सगळीकडे भगव्या पताका लावल्या होत्या. दिवाळीत केली होती तशीच विद्युत रोषणाई केली होती. मुख्य म्हणजे जैन मंदिराबाहेर मोठी रांगोळी काढली होती. सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी महाआरती होती आणि व्हाट्सअँप ग्रुप सांगण्यात आलं होतं की स्त्रियांनी भगव्या साड्या नेसून यावं तर पुरुषांनी पांढरे कपडे घालावेत. त्याप्रमाणे लोकांनी तसं केलं. 


७) एखादा गुढी पाडव्याचा सण असावा तसा उत्साह लोकांमध्ये होता आणि तसा भारतीय पारंपरिक पेहराव घातलेले  लोक रस्त्यात दिसत होते. भगवे झब्बे, भगव्या टोप्या, काहींचे भगवे स्वेटर, एका चारचाकीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर जय श्रीराम असं लिहिलं होतं आणि श्रीरामाचा मोठा फोटो होता. तो गाडी कशी चालवू शकत होता कोणास ठाऊक! 


८) जागोजागी भगव्या  रंगाचे स्टेज उभारण्यात आले होते आणि त्यावर धनुर्धारी श्रीरामाच्या मूर्ती होत्या आणि तो एक प्रकारचा सेल्फी पॉईंट होता. इथे तरुणांची बऱ्यापैकी गर्दी होती. हा सगळा खर्च कोणी केला असा प्रश्न पडला पण अशा ठिकाणी आजी-माजी नगरसेवक, भावी नगरसेवक-आमदार यांचे फोटो दिसले आणि लगेच त्याचे उत्तरही मिळाले. अशा आजी माजी आणि भावी राजकारण्यांकडून प्रसाद वाटप,कार सेवकांचा सत्कार, डीजे, भावगीत गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. 


९) कुटुंबवत्सल श्रीरामाऐवजी सगळीकडे धनुर्धारी श्रीराम दिसत होता- जागोजागच्या फ्लेक्स वर देखील! 

फ्लेक्स वरचे मजकूर वाचण्यासारखे होते-

 ' ५०० वर्षांचा वनवास संपला'

' राजतिलक की करो तैयारी 

आ रहे हैं भगवाधारी'

एका फ्लेक्सवर लिहिलेल्या मजकुराचा मला अर्थ कळला नाही -

' अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार ' 


१०) दिवसभर सगळीकडे रामाची गाणी लावली होती. एखाद्याच ठिकाणी सुधीर फडके-ग दि मा यांच्या गीत रामायणातील गाणी होती. बाकी साकळीकडे तीच तीच गाणी होती. मुख्यतः 'रामजीकी निकाली सवारी' हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'सरगम'  मधील गाणी होतं. एकूण श्रीरामावरील catchy गाण्यांची कमतरता जाणवली. एक गाणं मी काल पहिल्यांदाच ऐकलं - 

'श्रीराम...जानकी बैठे है मेरे सीने में' हे गाणं १९६८ सालच्या 'मेरे हमदम  मेरे दोस्त'  सिनेमातील (पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल !) 'अल्लाह ये अदा कैसी है इन हसीनो में' च्या चालीवर होतं. 

(मूळ गाणं कोणाला ऐकायचं असल्यास-https://youtu.be/Dlaiz7Zp5cQ?si=89C5VU9ixcVPj8y- )


११) सोशल मीडिया वर खूप जणांनी  व्हाट्सअँप स्टेटस वर श्रीराम आणि अयोध्या मंदिर हा विषय ठेवला होता. कदाचित सेल्फी वाले फोटो ही टाकले असतील. (एरवी मी स्टेटस ठेवतो आणि बघतो. पण २२ जानेवारीला मी फारसे कोणाचे स्टेटस बघितले नाही . माझ्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मी पक्ष्यांचे फोटो स्टेटस वर ठेवले होते) कोणीतरी ट्विटर (आताचं एक्स ) वर लिहिलं होतं - 

२२ तारखेच्या 'द इंडियन एक्सप्रेस' च्या २० पैकी १४ पानांवर श्रीराम हाच विषय होता- त्यात काही संपूर्ण पानं जाहिरातींची, तर काही लेख (ज्यात सरसंघचालक मोहन भागवतांचा लेखही होता) बाकीच्या वर्तमानपत्रांविषयी काय बोलणार !


१२) राममंदिरच्या निमित्ताने सोशल मीडियावरील अनेक मुखवटे गळाले त्यात प्रामुख्याने मला 'एक्स' वरील अमित शांडिल्य यांचा उल्लेख करावासा वाटतो. ते खरं तर चांगलं लिहायचे. पण.. 


१३) तरुणांचा सहभाग याविषयी लिहिलं आहेच. पण विशेष म्हणजे बऱ्याच तरुणांनी भगव्या रंगाच्या 'जय श्रीराम' च्या टोप्या घातल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात टोप्या या आधी मी 'मैं भी अन्ना' च्या बघितल्या होत्या.  त्या  पांढऱ्या रंगाच्या गांधी टोप्या होत्या. तेव्हा अशा टोप्या घालून फिरणे आणि मोर्चात सहभागी होणे यातून आपण भ्रष्टाचाराविरोधात काहीतरी करत आहोत अशी भावना लोकांमध्ये झाली होती. आता गांधी टोप्याही भगव्या झाल्या ! त्या घालून आता लोकांना वाटतंय की राम मंदिराच्या पवित्र कार्यात आपणही सहभागी झालो आहोत. तेव्हाच्या आंदोलनाने एक सरकार उलथवून टाकले. ..आताचे  वातावरण/ मूड  बघून हेच  सरकार पुनः स्थापित होईल असं निदान २२ तारखेला तरी दिसतंय. 


१४) संध्याकाळी लोक फटाके वाजवून आजचा दिवस साजरा करत होते. यात लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री- पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. व्हाटस् ॲपवर सांगितले होते म्हणून काही घरांबाहेर पणत्या लावलेल्या दिसल्या. उच्चभ्रू लोकांमध्ये उत्साह तर होताच पण आमच्या झाडूवालीचं बोलणं ऐकलं .ती म्हणाली-"आज जादाचं दूध आणलंय. खीर करून खाणार"


१५) २२ तारखेला  प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर मी २३ जानेवारीला हे सगळं लिहीत आहे. काल  मायापुरीतल्या सदराच्या शीर्षकासारखं - 'मगर हम चूप रहेंगे' हे धोरण ठेवलं होतं. सोशल मीडियावर मी कुठंही प्रतिक्रिया दिली नाही.अगदी राहुल सोलापूरकरांची धादांत खोटी पोस्ट फिरत असून देखील त्यावर मी काहीच भाष्य केलं नाही.  लोकांच्या आनंदावर आपण विरजण का घाला ! कारण हा असा मूडच  होता की इथे कुठलाही प्रतिवाद करणं/ विरोधी मुद्दा मांडणं अवघडच नाही, अशक्य होतं. अगदी प्रतिवाद केलाही असता तर माझ्या सारख्याची मतं अल्पमतातच राहिली असती आणि कालचा दिवस असा होता की माझी मतं wouldn't have mattered at all!यावर कोणाला मी पुचाट/पळपुटा / आपल्या मतांवर ठाम न राहणारा वाटू शकतो. पण आता खरं सांगायचं तर एक प्रकारची दमछाक जाणवत आहे. आपण एकटे विरुद्ध सगळे हे आता झेपत नाही.  असा एक बहुसंख्यवाद रुजला आहे की ज्यात अल्पमताची किंमत नगण्य अथवा शून्यच आहे असं दिसतंय . आपण वा आपली मतं irrelevant आहोत असं लक्षात आल्यावर  आपण बोलूच नये आणि जे जे होत आहे ते मूकपणे पाहत राहावे या निष्कर्षावर मी आलो. 

(ता.क : 

०५.०६.२०२४ -

यंदाच्या एप्रिल मे मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे राममंदिर हा मुद्दाच नव्हता. २-४ महिन्यात झालेला हा बदल अत्यंत आशादायक होता. त्यापुढे जाऊन असं म्हणेन की या निवडणुकीतील अनेक धक्कादायक निकालांपैकी एक मोठा निकाल म्हणजे फैजाबाद (जिथे अयोध्येतील राममंदिर आहे) मतदारसंघातून भाजप उमेदवार लल्लूसिंग सुमारे ५५००० मतांनी पराभूत झाले आणि तिथून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद निवडून आले ! राममंदिरचा मुद्दा हा सर्वसामान्य लोकांचा प्राधान्याचा नव्हता आणि लोकांना गरिबी, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात हे बघून खूप बरं वाटलं )

No comments:

Post a Comment