Monday 15 April 2024

हिमाचल डायरी १ - अमृतसर येथील सुवर्ण मंदिर...

कुठल्याही पर्यटन सहलीला गेल्यानंतर त्यावर लिहिताना  फक्त त्या त्या ठिकाणाचं वर्णन करणं एवढंच अपेक्षित असू नये...अर्थात हे माझं वैयक्तिक मत ! आपण काही फक्त भौगोलिक जागांना बघायला जात नसतो. तिथे गेल्यावर आलेले अनुभव, आपल्या मनात आलेल्या भावना, तिथे दिसलेली/भेटलेली माणसं, त्यांचे विचार, त्यांचे तिथल्या परिस्थितीतले  जगणे यावर  व्यक्त होणं ही तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. माझा अनुभव असा आहे की अशा गोष्टी मांडत गेल्यामुळे आपली सहल अधिक संस्मरणीय होते कारण यात आपण छोटे छोटे प्रसंग, बारकावे यांचा विचार करून त्यावर लिहीत असतो. काश्मीर मध्ये आम्ही २०१४ साली गेलो होतो. परंतु तिथे आमच्याबरोबर असलेला आणि ज्याच्याबरोबर आमचा आझाद काश्मीर या विषयावर वाद झालेला आमचा शब्बीर ड्रायव्हर, उडी येथील सैनिकी पोस्ट वर आम्हांला त्यांच्या मृदू आवाजात माहिती देणारे सुभेदार महेंद्रसिंह, श्रीनगरला भेटलेले नगर जिल्हयातले सैनिक संदीप शिंदे किंवा श्रीनगर मधल्या हॉटेलमधील कडक शिस्तीचा वेटर नझीर..हे सगळेच आज इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवतात! या सगळ्यावर मी काश्मीर डायरी ही मालिका १० भागांत लिहिली आणि मला आजही ती वाचताना त्या आमच्या सहलीला परत घेऊन जाते.. असो. 

नमनाला घडाभर तेल खर्च केलं ! आम्ही ८ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२४ या काळात हिमाचल प्रदेश मधील धरमशाला आणि कसोल (कसौली नव्हे!) या ठिकाणी गेलो होतो. तिथल्या अनुभवांवर आधारित लिहिण्याचा हा ब्लॉगरूपी  प्रयत्न आहे. अर्थात हे लिहिताना मला सांगावंसं वाटतंय की हे माझे अनुभव आहेत. सरसकट सगळ्यांना असेच अनुभव आले असतील असं नाही. माझे अनुभव मांडताना माझी विचारसरणी, माझे पूर्वग्रह इ त्यातून डोकावणार याचीही मला कल्पना आहे. पण लिहिताना माझा हेतू प्रामाणिक आहे...कुठलाही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नाही. तरीही माझ्या कडून नकळतपाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व ! 

८ एप्रिल २०२४- हिमाचल प्रदेशला जाण्याआधी पंजाबमधील सुवर्णमंदिरला भेट.. 

आम्ही पुण्याहून सकाळी १० च्या सुमारास अमृतसरला पोचलो. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती. आम्हांला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत धरमशालाला पोचायचं होतं. अंतर २०० किमी असलं तरी ४-५ सहज लागणार असा अंदाज होता. आम्हांला तिथपर्यंत सोडणाऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की आज सुवर्णमंदिरात गर्दी असणार...अमावस्या...सुट्ट्या, बैसाखी... इ मुळे तुमचे  सहज ५-६ तास मोडतील म्हणाला! मला हे पटलं नाही. इतका कसा वेळ लागेल?! की आम्ही जाऊच नये म्हणून तो हे म्हणत होता का? आता इथवर आलोच होतो तर मंदिरात जाऊन बघणार होतोच. सुवर्णमंदिर परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून, तिथल्या बाजारातून वाट काढत मंदिरात पोचलो तर विश्वासच बसेना ! जिथपर्यंत नजर पोचेल तिथवर माणसंच माणसं ! अक्षरश: जन सैलाब ! मला धार्मिक ठिकाणी जाण्याची सवय नसल्याने हे सगळं दृश्य नवीनच होतं. लाखो भाविक आले होते असं म्हणणं  अतिशयोक्ती वाटलं तरी ते हजारोंच्या संख्येने नक्कीच होते. लोक प्रवेशद्वारापासून आत कुठेही जागा मिळेल तिथे मथा टेकत होते. सुवर्णमंदिर नेत्रसुखद आहे  यात काही शंकाच नाही


पण या अलोट गर्दीमुळे  माझा खरं तर हिरमोडच झाला. दरबार साहिबच्या दर्शनाच्या रांगेत आम्ही बराच वेळ थांबलो पण रांग काही पुढे सरकतच नव्हती. वर ऊन मी म्हणत होतं पण आश्चर्य म्हणजे पायाला चटके बसत नव्हते. सुवर्णमंदिराच्या सर्व बाजूंनी आच्छादित भाग होता. तो सर्व भागही माणसांनी फुलून गेला होता. लोक तिथे बसून प्रार्थना म्हणत होते. काही वृद्ध लोक तर दमून भागून आडवे पडले होते. पिण्याचे पाणी देण्यासाठी तसेच कडा प्रसाद देण्यासाठी बरेच कारसेवक दिसत होते. आजकाल सगळीकडे जे दृश्य बघायला मिळतं ते इथेही बघितलं - अति उत्साही सेल्फी फोटो काढणारे लोक आपल्या पाठीमागे सुवर्णमंदिर दिसेल अशा प्रकारे उभे राहून फोटो काढत होते. या नादात काही लोक अक्षरश: सरोवराच्या जवळ उभे राहिले होते आणि अर्थातच त्यांचं लक्ष केवळ फोटो काढण्याकडे होतं. अशा उत्साही मंडळींना आवरण्याचं काम काही स्वयंसेवक करत होते. कदाचित मी काही वेगळ्या कल्पना मनात ठेऊन इथे आलो होतो पण माझ्यासमोर जे काही दिसत होतं त्याच्याशी दुर्दैवाने मी फारसा relate होऊ शकलो नाही. कदाचित माझ्यात तेवढा भक्तिभाव, ईश्वरशक्ती पुढे नतमस्तक होण्याचा समर्पण भाव नसल्यामुळे असेल...मला या एवढ्या गर्दीत अलिप्तपणा जाणवत होता आणि त्यातून एक अस्वस्थता वाटत होती. इथे कायमच एवढी गर्दी असते की आमचा आजचा दिवस, आजची सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी होती हे माहीत नाही. आम्ही भल्या पहाटे यायला होतं की काय माहित नाही. 

मात्र एकच गोष्ट तिथे होती जिच्याशी मी कनेक्ट होऊ शकलो ती म्हणजे तिथे सगळीकडे ऐकू येणारे शबद कीर्तन! स्वच्छ, भारदस्त आवाजात गाणारे कीर्तनकार अशा दमदार पद्धतीने गात होते की वाटावं एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हे गायले तर  मैफिली जिंकतील! त्यांच्या गाण्यात केवळ गायकी नव्हती तर त्या गायनात भक्ती रस ओथंबून वाहत होता. अशा कीर्तनकारांना रागी म्हणतात असं नुकत्याच वाचलेल्या 'गान गुणगान' या पं सत्यशील देशपांडे यांच्या पुस्तकातून समजलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी सुवर्णमंदिराला भेट देण्याचं हे एक आकर्षण होतं आणि माझे कान ते गायन ऐकून तृप्त झाले. 

दोन अडीच तास रांगेत थांबून देखील आम्ही फारसे पुढे सरकलो नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दर्शन न घेताच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण आम्हांला सहज आणखी चार पाच तास लागले असते आणि आम्हांला त्याच दिवशी धरमशालाला पोचण्याचे वेध लागले होते.  सुवर्णमंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊनच आम्ही निघालो. परतताना सरोवरात अनेक पुरुष स्नान करताना दिसले.




 त्यापैकी  काही पुरुषांचे कपडे घेऊन, डोक्यावर ओढनी घेतलेल्या, अदबीने उभ्या असलेल्या त्यांच्या बायकाही दिसल्या. त्यापैकी काही पुरुष ज्या हक्काने आणि जवळजवळ सरंजामशाही वृत्तीने त्यांच्या बायकांकडून कामं करून घेत होते ते मात्र बघवत नव्हतं. बाहेर पडून अमृतसरची सुप्रसिद्ध लस्सी पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो..      

(सर्व फोटो - स्मृती पुसाळकर)                                                                                                                        (क्रमश:) 

3 comments:

  1. मस्त! स्मृती चे फोटो देखील छान!

    ReplyDelete
  2. मस्त वर्णन नेहेमी प्रमाणे!! सुरुवातीच्या नमनात सांगितल्या प्रमाणे सगळ्यांना अनुभव येत असतीलच पण व्यक्त करता येत नसेल लोकांना! तुझ्या लेखणी मध्ये नेहेमीच आमचाही त्या ठिकाणी आपोआप प्रवास घडतो. Awaiting the next diary

    ReplyDelete
  3. मस्त वर्णन ....नमनाच तेल आवश्यकच...धार्मिक स्थळी गर्दीत किती आऊट ऑफ place वाटू शकतं हे मी अगदी समजू शकतो (स्वानुभवाने)...आणि मग लोकांसाठी सहज रुटीन गोष्टी आपल्याला ठळकपणे खटकतात ...तू म्हटल्याप्रमाणे धार्मिक भावनेचा अभाव म्हणूनच असं काहीतरी दिसतं असं भक्त म्हणतील ..

    ReplyDelete