Sunday, 28 April 2024

हिमाचल डायरी ५ - माझं क्रिकेट प्रेम !

१ 

हा माझा दिडशेवा ब्लॉग आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे . १० एप्रिल २०१३ ला पहिला ब्लॉग प्रकाशित केला होता. गेल्या अकरा वर्षांतील  माझ्या ब्लॉग्सना आजवर एकूण १ लाख आठ हजारापेक्षा जास्त हिट्स मिळालेल्या आहेत. संत अमृतराय  यांच्या कटाववृत्तातील गणेशस्तुती या ब्लॉगला  जवळपास १० हजार हिट्स मिळाल्या आहेत. लिहिणं ही माझ्यासाठी एक आनंददायी प्रक्रिया आहे. जे काही लिहिलं  आहे त्यात बरंचसं आलेल्या/घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे, त्यात स्मरणरंजन आहे, कधी पुस्तकांवर लिहिलं आहे, कधी गाण्यांवर, कधी सिनेमांवर तर कधी काही व्यक्तींवरदेखील ! काही ब्लॉग फॅनफिक्शन या प्रकारावर आधारित आहेत( व्यक्ती खऱ्या असणं परंतु प्रसंग काल्पनिक असणं ) पण आजवर जे लिहिलं ते अगदी न ठरवता उत्स्फूर्त लिहिलं. मनात आलं ते लिहिलं आणि माझ्या ब्लॉग्सच्या वाचकांनीं ते प्रेमाने वाचलं, काहींनी मला मौलिक सूचनाही दिल्या. माझ्यावरील सर्वांच्या या प्रेमांमुळेच मला आणखी लिहित राहण्याचं प्रोत्साहन मिळत गेलं आणि म्हणूनच मी आज या टप्प्यावर  येऊन ठेपलो आहे हे कृतज्ञपणे नमूद करतो. सर्वांचं हे प्रेम असंच यापुढेही राहील अशी खात्रीच बाळगतो आणि परत एकदा हिमाचल डायरीकडे वळतो. 

२ 

दिडशेवा ब्लॉग हा टप्पा गाठत असताना एका नव्या विषयावर मी लिहित आहे याचा मला एक वेगळाच आनंद आहे. आणि यात थोडंफार आश्चर्यसुद्धा वाटतंय -आजवर मी क्रिकेटवर लिहिलंच नव्हतं? शिवाय तुम्हांला वाटेल शीर्षक तर हिमाचल डायरी आहे आणि त्यात मध्येच हे क्रिकेट प्रेम कुठून आलं? आपल्या हिंदी सिनेमात नाही का खूप काही गंभीर प्रसंग झाले की विनोदी अभिनेत्यांची उपकथानकं असत, त्याने कॉमिक रिलीफ मिळत असे. तसं हिमाचल च्या आमच्या ट्रिप वर ४ गंभीर ब्लॉग लिहून झाल्यावर हा पाचवा थोडा हलकाफुलका ब्लॉग तर नाही ना? तुमच्या सर्व शंकांचं निरसन या ब्लॉगच्या शेवटी होईल अशी मला आशा आहे. (म्हणजे या निमित्ताने तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग वाचाल!) 

३ 

आपल्याकडे भारतात राजकारण, क्रिकेट आणि हिंदी सिनेमा हे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांचे प्राधान्यक्रम कदाचित व्यक्तिगणिक वा प्रसंगानुरूप बदलत असतील पण या तीन विषयांत काहीच गम्य नाही असा एकही भारतीय माणूस शोधूनही सापडणार नाही. आणि या प्रत्येक विषयाबद्दल सगळ्यांचीच ठाम मतं, विचार असतात. त्याला मी तरी कसा अपवाद असेन? आपल्याकडे विशेषतः प्रत्येक मुलाने लहानपणी क्रिकेटची बॅट हातात घेतलेली असते. बॉलिंग केलेली असते. हे एवढंसं भांडवल क्रिकेटवर अधिकाराने बोलायला पुरेसं असतं. माझ्या लहानपणी मी एक 'वजनदार' असामी होतो. त्यामुळे चपळाई वगैरे गोष्टी माझ्यापासून चार हात लांबच असत! पण तरीही आजूबाजूच्या मुलांबरोबर क्रिकेट खेळणे असायचे. कोणी खेळायला नसले तरी एकट्याने बिल्डिंगच्या  भिंतीवर  बॉलिंगच्या ऍक्शनने बॉल टाकत बसणे हा उपक्रम असायचा. तर कधी रिकामटेकडे उद्योग म्हणजे बॅटवर लेदरच्या चेंडू टॉकटॉक करत आपटत बसायचं -त्याने बॅटचे स्ट्रोक चांगले होतात ही अंधश्रद्धा! माझ्या अचपळ शरीराच्या मर्यादा मला लवकर लक्षात आल्यामुळे ( किंवा आमच्या मित्रमंडळींनी त्या  वेळेतच लक्षात आणून दिल्यामुळे असेल) मी क्रिकेटमध्ये फार पुढे गेलो नाही! नाहीतर अर्जुना रणतुंगा, इंझमाम उल हक किंवा अगदी गेला बाजार वेस्ट इंडिजचा राहकीम कॉर्नवॉल सारख्या थुलथुलीत क्रिकेटपटूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली असती! 

प्रत्यक्ष खेळणं कमी झालं असलं तरी आमच्याकडे मी ८ वर्षांचा असताना टीव्ही आला आणि नंतर कितीतरी मॅचेस टीव्हीवर बघायला मिळाल्या. शिवाय रेडिओवर कॉमेंट्री सुद्धा ऐकायचो. यातून हळूहळू क्रिकेटचे बारकावे समजू लागले. क्रिकेटपटूंच्या  शैलीइतकीच कॉमेंटेटरची शैली आवडू लागली. खेळाडूंची नक्कल करता येत नसली तर काय झालं -मी कॉमेंटेटरची नक्कल करू लागलो आणि पुन्हा एकदा आमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींमध्ये मला  सन्माननीय प्रवेश मिळाला . गल्लीतल्या त्या क्रिकेटचं मी सुशील दोशींच्या शैलीत वर्णन करू लागलो('लगान' सिनेमात जावेद खानच्या रोलमुळे माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या)  - "रवीने इसे कलाई के सहारे मोड दिया और जब तक फिल्डर पहुच पाते, एक रन आसानी से लिया" किंवा आसमान में बादल और नीचे राजू! ये गेंद ... बिलकुल पटकी हुई !" वगैरे.. या मुळे त्या खेळाडूंना देखील एक भारी फील यायचा - आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्या सुंदर खेळाचं  कोणीतरी वर्णन करतंय.. कॉमेंटेटर चा विषय निघालाच आहे तर माझे आवडते कॉमेंटेटर रिची बेनॉ आणि टोनी कोझियर ( वेस्ट इंडिजचे) आहेत. रिची बेनॉ म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त मांडायची हातोटी! रिची बेनॉ ज्या दिवशी जन्मला(६ ऑक्टोबर)  त्याच दिवशी जन्मलेला टोनी ग्रेग मात्र अगदी या उलट - अति उत्साही आणि लोकांच्या भावनांचा विचार करून कॉमेंट्री करणारा!(तसाच हेन्री ब्लॉफेल्ड देखील)  टोनी कोझियरचा वैशिष्ट्यपूर्ण कॅरिबियन ऍक्सेंट आणि त्याचं निष्पक्ष समालोचन आवडायचं. 

क्रिकेटवर येणारे लेख, सामन्यांची वर्णनं, खेळाडूंचे रेकॉर्ड हे सगळं वाचायची आवड निर्माण झाली. त्यावेळी हे रेकॉर्ड पाठदेखील असायचे. तर दुसरीकडे क्रिकेटपटूंचे फोटो जमा करणे याचाही छंद लागला. पुण्यात फुले मंडईजवळ एक छोटं खोकडं होतं. तिथे हे फोटो मिळायचे. 

मग तिथे चकरा मारून हे फोटो जमा करायचे. वर्तमानपत्रातली कात्रणं जमवायची.. आमच्या शलाका ग्रंथालयात क्रीडाविषयक नियतकालिकं यायची .. ती वाचायचो. नंतर अक्षर प्रकाशनने सुरु केलेलं -एकच षटकार हे पाक्षिक नियमितपणे वाचायचो. द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, दिलीप प्रभावळकर यांचे षटकार आणि इतर ठिकाणी येणारे लेख वाचणे ही पर्वणी असे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये वि वि करमरकर लिहायचे. त्यांची एक वेगळीच शैली असायची. त्यांनी मटा मध्ये क्रिकेटची एक वेगळी परिभाषा रुजवायचा प्रयत्न देखील केला ( उदाहरण- एक दिवसीय सामन्याला झटपट क्रिकेट म्हणणे वगैरे ) 

आताच्या पिढीला सुनील गावस्कर हे समालोचक म्हणून माहित असतील पण आमच्या काळात सुनील गावस्कर म्हणजे आमच्या दैवतासमान होता. हेल्मेट न वापरता वेस्ट इंडिजच्या कर्दनकाळ गोलंदाजांचा यशस्वी सामना करणारा, सलामीचा विश्वासार्ह फलंदाज...ज्याचा स्टान्स अतिशय  कॉम्पॅक्ट आणि स्ट्रोक्स अगदी कॉपीबुक! त्याचा स्ट्रेटड्राइव्ह नेत्रदीपक ! त्याची १९८१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब अपायरिंगच्या विरोधात (की स्लेजिंग विरोधात ) वॉक आऊट करण्याची बाणेदार वृत्ती... त्याची जिगर.. त्याची आश्वासकता ...सगळं सगळंच आवडायचं. लहानपणी माझ्याकडे त्याचं हे असं फ्लिकर बुक होतं - त्याचा स्ट्रेटड्राइव्ह बघत राहणे हा एक आवडता टाईमपास होता -

https://youtu.be/z6tyi17J5mY?si=fgNh7ieNakauid9- 

गावस्कर वर भक्ती होती पण अंधभक्ती नव्हती (त्याने सपाटपणे गायलेले - 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला' कधीही आवडलं नाही. तो सत्यसाईबाबांचा भक्त आहे हेही खटकलं आहे आणि त्याच्यावर  मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे  संशयाचं वलय निर्माण झालं होतं.) अलीकडे व्हाट्सअँप वर एक पोस्ट फिरत होती ज्यात मुंबई दंगलीत सुनील गावस्कर ने एका मुस्लिम माणसाला हिंदू दंगलखोरांपासून वाचवलं होतं असा उल्लेख होता. हे वाचल्यावर तर त्याचे या आधीचे सगळे गुन्हे माफ असं म्हणायला हरकत नाही असं वाटलं. 

गोलंदाजांत कपिलदेवचा उदय होईपर्यंत आमच्याकाळात तरी मला फारसे कोणी आवडत नव्हते   (फिरकीच्या चौकडीचा मी उतरता काळ बघितला आहे ) कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ साली एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड काप जिंकणं हा  भारतीय क्रिकेटमधील एक अजरामर क्षण!  तोपर्यंत भारत कायम also  ran असायचा. पण वेस्ट इंडीजसारख्या विश्वविजेत्या संघाला धूळ चारणं ही एक अपूर्व घटना होती. त्यानंतर भारताने अनेक विजय मिळवले पण हा विजय आणि अर्थातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्स टेस्ट मधला विजय हे दोन सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे विजय! Cricket is a glorious game of uncertainties असं म्हणतात ते खरंच आहे कारण वर्ल्ड कप हरलेला वेस्ट इंडिजचा हाच संघ नंतर भारतात आला होता आणि त्याने भारताला चारी मुंड्या चीत केलं होतं. तो वेस्ट इंडिजचा संघ होताच तसा - आक्रमक आणि रुबाबदार! व्हिव्हियन रिचर्ड्स चा ऍटिट्यूड कमाल होता. मला त्यावेळी मायकेल होल्डींगची गोलंदाजीची शैली फार आवडायची - त्याला whispering death म्हणायचे . मला मात्र तो नेहमीच Poetry in motion वाटायचा.


https://youtu.be/lClwE2NBU_Q?si=elfKqTeNifgb7F-p 

असं असलं तरी आजवर मी फक्त एकदाच क्रिकेटचा सामना बघायला स्टेडियमवर गेलो आहे. तेसुद्धा १९८१ साली कीथ फ्लेचरच्या नेतृत्वाखाली आलेल्या इंग्लंडच्या संघाचा  पुण्यात(नेहरू स्टेडियममध्ये)  भारताच्या युवा संघाविरुद्ध सामना झाला होता त्यातील एक दिवस बघायला आम्ही गेलो होतो. मला तेव्हा कृष्णम्माचारी श्रीकांत, लालचंद राजपूत वगैरेंची फलंदाजी तसंच इयान बोथम, जॉन एम्बुरी, ग्रॅहम डिली यांची गोलंदाजी बघायला मिळाली होती. डिलीची शैली वेगळीच होती. खूप मजा आली होती... पण तसा तो दिवस माझ्यासाठी हुरहूर लावणाराच होता कारण त्यावेळी आमच्या सहामाही परीक्षांचा निकाल लागला होता आणि प्रगतिपुस्तकावर बाबांची सही घेऊन ते शाळेत परत करायची दुसऱ्या दिवशी शेवटची तारीख होती. गणितात अस्मादिकांचा 'निक्काल' लागला होता आणि त्यामुळे बाबांची सही घेणं मी टाळत होतो. पण हा आजचा सामना बघून घरी गेल्यावर जे मी इतके दिवस टाळत होतो ते घडणार होतं .. त्यामुळे सामना बघताना हेच विचार मनात होते! 

नंतर कधी सामना बघायला गेलो नाही कारण टीव्ही वर प्रक्षेपण आणि कॉमेंट्री इतकी सुंदर असते,  कॅमेरा अँगल्स, आधुनिक तंत्रज्ञान वापरून  प्रत्येक बॉल आणि शॉटचं केलेलं विश्लेषण इतकं भारी असतं की कुठे त्या उन्हं तान्हात स्टेडियम मध्ये जा.. ताटकळत उभे राहा.. अलीकडे तर नियमही खूप कडक झाले आहेत त्या जाचक नियमांना पाळा... त्यापेक्षा घरबसल्या सामने बघणे सर्वार्थाने सुखावह असते. मी टेस्ट मॅचप्रेमी असल्याने जगात कुठेही टेस्ट मॅच चालू असेल तर ती बघायचा प्रयत्न करत असतो आणि आजवर माझा समज होता की दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन मधील न्यूलँड्स मधील स्टेडियम हे जगातलं सर्वोत्तम स्टेडियम आहे.

 पण अलिकडे इंग्लंडचा संघ भारतात आला होता तेव्हा ५ कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना धरमशाला येथील स्टेडियम मध्ये झाला होता. ते स्टेडियम बघून वाटलं की हे तर केप टाऊन पेक्षाही भारी आहे आणि इथे तर जायलाच पाहिजे. आणि म्हणून या वेळी धरमशालाला जाण्यामागच्या अनेक कारणांपैकी स्टेडियम  बघणं हेही एक महत्त्वाचं कारण होतं. 

६ 

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने बांधलेल्या या स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं स्टेडियम आहे जिथे टेस्ट मॅच खेळली जाते. अर्थात हिमाचल मधलंच चैल या ठिकाणचं स्टेडियम तर आणखी उंचावर आहे पण तिथे आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. 

धरमशाला मधील दलाई लामा मंदिर बघून खाली उतरू लागलो की लांबूनच या स्टेडियमचे लाल रंगाचे घुमट दिसू लागतात. धौलाधार पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे स्टेडियम बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. मी जर या ग्राउंडवर खेळाडू म्हणून गेलो तर माझं लक्ष खेळाकडे लागणारच नाही. मी दिवसभर त्या पर्वतरांगा, तिथलं ग्लेशियर, त्या डोंगरांवर येणारे ढग, ऊन सावलीचा खेळ.. हेच बघत बसलो असतो. इतकं भान हरपणारं निसर्ग सौंदर्य इथे आहे. मी खेळाडू नसतो पण जर समालोचक म्हणून आलो असतो तर खेळाचं कमी आणि या सौंदर्याचंच वर्णन करत राहिलो असतो. इंग्लंडचा समालोचक ग्रॅएम स्वानची माझ्यामते अशीच अवस्था झाली होती त्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या मॅचच्यावेळी! आम्ही मैदान बघायला गेलो होतो तेव्हा तिथे कुठलाही सामना चालू नव्हता.(अगदी आयपीएलचा सुद्धा नाही!) सामना सुरु असताना हे मैदान बघणं आणखी आवडलं असतं. पण असं सुद्धा  डोळेभरून बघितलं. निवांतपणे फोटो काढले आणि ठरवलं की पुन्हा कधीतरी इथे सामना असताना यायचं. 









                                                                                                                                                        (क्रमश:)

1 comment:

  1. दिडशे आणि ते पण यशस्वी blogs साठी हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete