१
तसं काही न ठरवता सुद्धा आमच्या हिमाचलच्या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं बघण्याचा योग आला. हिंदूंची दोन मंदिरं बघितली -मॅक्लिओडगंज येथे प्राचीन भागसुनाग मंदिर बघितलं -
पुराणातील कथेनुसार भागसु नावाचा राजा होता .त्याच्या राज्यात एकदा दुष्काळ पडला आणि लोक गाव सोडून जाऊ लागले. आणि राहिलेले लोक राजाला विनंती करू लागले की कुठूनतरी त्याने राज्यात पाणी आणावं. राजा फिरत फिरत नाग दल तलावापाशी पोचला आणि त्याने तिथलं पाणी चोरायचा प्रयत्न केला. यामुळे भडकलेल्या नागदेवतांबरोबर राजाचं युद्ध झालं आणि तो पराभूत झाला. नंतर नागदेवतांनी त्याला क्षमा केली आणि प्रसन्न होऊन वर मागितला. राजाने त्याच्या राजासाठी पाणी मागितलं आणि त्याचं नाव प्रसिद्ध होण्याचाही वर मागितला. म्हणून या जागेचं नाव भागसुनाग मंदिर असं आहे. (मंदिर शंकराचं आहे) इथून पुढे १५-२० मिनिटं पायऱ्या चढून गेल्यावर एक धबधबा लागतो. आम्ही गेलो तेव्हा तरी धबधबा अगदी छोटा होता.
दुसरं देऊळ बघितलं ते धरमशाला मध्ये-चहाच्या मळ्यांजवळ - कुणाल पथरी माता मंदिर- इथे सती मातेचं कपाळ पडलं अशी लोकांची श्रद्धा आहे . इथे एक शिवमंदिर देखील आहे. मंदिरात नगारा वाजवणारा माणूस बसला होता आणि त्यालाही भाविक काही दान दक्षिणा देत होते. मंदिर तसं साधं होतं - दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये कोरीवकाम, कारागिरी असते तसं या दोन्ही मंदिरात दिसलं नाही.
(दोन्ही फोटो इंटरनेटवरून साभार)
२
धरमशाला मध्ये आम्ही एका चर्चला देखील भेट दिली. Church of St John in the Wilderness असं या चर्चचं नाव आहे. १८५२ साली या चर्चचं बांधकाम पूर्ण झालं आणि निओ गॉथिक पद्धतीचं हे बांधकाम आहे.
(या चर्चचे सर्व फोटो इंटरनेटवरून साभार)
चर्चला जायचं म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूने खाली उतरून जायचं. संध्याकाळची वेळ होती. आभाळ भरून आलं होतं. हवेत सुरेख गारवा होता. कधीही पावसाला सुरुवात होईल असं वातावरण होतं. थोडंसं गडगडू लागलं होतं. आम्ही चर्चच्या दारापाशी गेलो. फारशी गर्दी नव्हती . नेहमीचेच फोटोत्सुक लोक चर्चच्या पार्श्वभूमीवर स्वत:चे फोटो काढायच्या लगबगीत होते. चर्चच्या दाराबाहेर चपला/बूट काढाव्या असं लिहिलं होतं. शिवाय फोटोग्राफीदेखील निषिद्ध होती . आम्ही आत शिरलो. याआधी आम्ही कोचीचं सेंट फ्रान्सिस चर्च आणि गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिजस बघितलं होतं त्याची आठवण झाली. त्या दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती. पण रचना साधारण सारखीच- मोठ्या दगडी भिंती, उंच छप्पर, दोन्ही बाजूला लाकडी बाक आणि त्यामधून जाणारा रस्ता... एके ठिकाणी मेजावर छोटी छोटी बायबलची पुस्तकं नीट मांडून ठेवलेली... एक पोडियम (प्रवचनसाठी)... समोर क्रूस आणि रंगीत काचेवर काढलेली कोरीव चित्रं.. आमच्या सुदैवाने या चर्चमध्ये एक विदेशी तरुण जोडपं सोडल्यास कोणीही नव्हतं. ते जोडपं मागच्या बाकावर शांतपणे बसलं होतं. त्यातील बाई तर मेजावर डोकं ठेऊन झोपलीच होती. चर्चमध्ये काम करणारा एक कामगार शांतपणे लयबद्ध हालचाली करत काम करत होता. आम्ही पुढच्या बाकावर जाऊन बसलो. हे सगळं वातावरण.. हा अनुभव जमेल तितकं मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. आणि अचानक...
३
...आमच्या मागून एक भसाडा आणि मोठा आवाज ऐकू आला - "फोटा पाड ने ( फोटो काढ ना )"
त्यावर थोड्या दबक्या आवाजात मुलीचं उत्तर आलं -"पप्पा ऐय्या फोटा पाडवानू allowed नथी "(बाबा, इथे फोटो काढायची परवानगी नाही)
चर्चच्या कामगाराने देखील हळू आवाजात हेच सांगितलं.
साधारण पंचेचाळीस-पन्नाशीतले वडील आणि त्यांची आठवी- नववीतील मुलगी मग आमच्या मागून येऊन आमच्या शेजारच्या रांगेतील पहिल्या बाकावर हे दोघे स्थानापन्न झाले. दोघेही 'सुखवस्तू' कुटुंबातून आलेले 'दिसत' होते. मुलगी वडिलांना हळू आवाजात प्रश्न विचारत होती आणि वडील सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात त्याची उत्तरं देत होते. त्यांनी तिला तिथला क्रूस दाखवला. काही क्षण असेच गेले आणि मग वडिलांनी येशू ख्रिस्तासमोर बसल्या बसल्या हात जोडून गुजरातीमध्ये प्रार्थना म्हणायला सुरुवात केली - त्यात श्री आदिनाथ भगवानाला आवाहन करून त्यांनी जैन धर्माचा विजय असो आणि जगात सर्वत्र जैन धर्मच राहो अशा अर्थाची प्रार्थना केली आणि विजयी मुद्रेने ते दोघे तिथून निघून गेले. आम्ही मात्र अक्षरश: स्तब्ध..नि:शब्द झालो होतो. हे सगळं इतकं पटापट झालं की नेमकं काय आणि का झालं हे कळायला देखील वेळ लागला...
४
या प्रसंगाबाबत सांगू इच्छितो की माझी मतं ही त्या प्रसंगाशी संबंधित आहेत. मला सुतावरून स्वर्ग गाठायचा नाही. मी इथे कुठंही जैन धर्मविरोधात बोलत नाही. पण हा प्रसंग जसा घडला तसं त्याचं वर्णन करायचा प्रयत्न मी केला आहे आणि त्यामुळे आमच्यावर त्याचा काय परिणाम झाला हेही मांडत आहे. माझ्या मनात प्रश्नच प्रश्न आहेत -
१) मला असं वाटतं की आपण जिथे जातो तिथल्या डेकोरमचा आपल्याला अंदाज येतो. तिथले नियम आपण आपसूकच पाळतो. या माणसाने फोटोग्राफी निषिद्ध आहे हा नियम का वाचला नसावा? ( मोठ्या फॉन्टमध्ये सगळ्यांना दिसेल अशा प्रकारे फलक लिहिला होता) चर्च मध्ये पूर्ण शांतता होती. मग या माणसाला मोठ्या आवाजात का बोलावेसे वाटले असेल?
२) आपण चर्चमध्ये आलो आहोत .. एका परधर्मीय प्रार्थनास्थळी... हे त्या माणसाला माहित नव्हते का? नक्कीच माहित असणार... मग तिथे मोठ्या आवाजात जैन धर्म श्रेष्ठ आणि पृथ्वीतलावर सर्व लोक जैन धर्माचे पालन करणारे होवोत ही प्रार्थना कशासाठी? या माणसाच्या मानसिकतेचा थांग काही मला लागला नाही... येशू ख्रिस्ता समोर तुम्ही जैन प्रार्थना का करावी? मला त्याची ही कृती एकाच वेळी हास्यास्पद आणि चीड आणणारी वाटली. हा आपल्या धर्माबद्दलचा दुराभिमान म्हणायचा का?
३) ही आक्रमकता माझ्या मनावर खूप ओरखडे उमटवून गेली. सुदैवाने तिथे अन्य ख्रिस्तधर्मीय नव्हते (विदेशी जोडप्याचं यांच्याकडे लक्षच नव्हतं) जर ते असते आणि त्यांच्या हे लक्षात आलं असतं तर? त्या माणसाचं वागणं ही देखील एक प्रकारची हिंसाच नव्हती का ?
४) ही आक्रमकता कुठून आली असावी? श्रेष्ठत्वाच्या भावनेतून की न्यूनगंडाच्या भावनेतून? मला दुसरी शक्यता जास्त वाटते. आपला धर्म चांगला आहे असं वाटणं काही गैर नाही पण आपलाच धर्म श्रेष्ठ आहे आणि सगळ्यांनी तोच धर्म पाळावा ही अपेक्षा अवाजवी आहे. त्या कृतीत कुठेतरी आपल्या धर्माला म्हणावी इतकी प्रतिष्ठा मिळत नाही अशीही भावना असू शकते.
तो माणूस निघून गेला हे चांगलंच झालं कारण आणखी काळ थांबून तो बरळत बसला असता तर त्याने आमच्या सहनशक्तीची त्याने परीक्षाच बघितली असती .मी होमिओपॅथीचा डॉक्टर असल्यामुळे लोकांच्या वर्तणुकीतून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेही असेल कदाचित ...पण माझ्या डोक्यातून हा प्रसंग इतके दिवस होऊन गेल्यावरही काही केल्या जात नाही. काही माणसं आपण कुठल्याही प्रसंगी कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून देत असतात. तर काही माणसं मात्र आपण कसं वागू नये हे सांगून जातात. वरील प्रसंग त्यापैकीच !
(क्रमश:)
Very well written Rajesh. I fully support your feelings and spontaneous reactions at that time..
ReplyDeleteThank you Mehul for reading my blog and commenting on it. It really means a lot.
ReplyDelete