१
लहानपणी संस्कारक्षम वयात, मला माझी मामी-लीना देवस्थळी यांनी -वीणा गवाणकर लिखित 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक भेट दिलं होतं. डॉ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या एका अमेरिकन कृष्णवर्णीय कृषीतज्ज्ञाची कहाणी वीणाताईंनी 'एक होता कार्व्हर' मध्ये मांडली आहे. कार्व्हर यांचा जन्म १८६४ सालचा. ते अनाथ होते, त्यामुळे स्वतःचं नाव देखील त्यांना नव्हतं. त्याकाळी कृष्णवर्णीयांना शिक्षणाची सोया नव्हती. अशा परिस्थितीत १८९४ साली त्यांनी बी. एस ही पदवी प्राप्त केली तर १८९६ साली ते एम एस झाले. १८९६ ते १९४३ या काळात अलाबामा टस्कीगी शिक्षणसंस्थेचे शेती विभागात त्यांनी अध्यापन केले. फिरते कृषी महाविद्यालय सुरु केले. गरीब शेतकऱ्यांना कपाशीऐवजी भुईमूग, रताळे अशी पर्यायी पिकं घ्यायला सांगणाऱ्या कार्व्हर यांनी शेत जमिनीची धूप न होता नैसर्गिकरित्या ती जास्तीत जास्त उत्पादक कशी राहील यावर संशोधन केले. नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषी संस्कृतीचा त्यांनी पुरस्कार केला. गरीब आणि कृष्णवर्णीय लोकांचे जीवनमान सुधारण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही त्यावर सकारात्मक विचार करण्याचा डॉ कार्व्हर यांचा स्वभाव होता. कमी व अपुऱ्या संसाधनांतून त्यांनी कुठलीही सबब पुढे न करता मार्ग शोधून काढले. म्हणूनच ही कहाणी प्रेरणादायी होती आणि आहेही ! 'एक होता कार्व्हर' पुस्तक मला त्या वयातही खूप आवडलं होतं. त्यावर मी माझ्या मामीला पत्र लिहिल्याचेही मला आठवत आहे.
२
२०१२ साली माझे मामा श्री. यशवंत देवस्थळी आणि मामी लीना देवस्थळी यांनी जांभुळपाडा (तालुका सुधागड, जिल्हा रायगड) येथे 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' या नावाने अतिशय सुरेख असा वृद्धाश्रम सुरु केला. या वृद्धाश्रमात विविध कार्यक्रम होत असतात आणि दरवर्षी त्याचा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 'चैतन्य' वर या आधीही मी लिहिलं आहे. त्या ब्लॉग्सची लिंक इथे देत आहे-
तसंच 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' च्या संकेतस्थळाची ही लिंक आहे-
'चैतन्य'ने २०२४ साली १२ वर्षे पूर्ण केली. म्हटलं तर ही माझ्या मामीच्या ध्येयाने प्रेरित ध्यासाची तपपूर्ती आहे. आणि म्हणूनच या वर्धापनदिनाला वीणाताई गवाणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणे हे औचित्याचे होते. कारण वीणाताईंनी केवळ 'एक होता कार्व्हर'च नव्हे तर इतरही अनेक प्रेरणादायी चरित्रं लिहिली आहेत आणि प्रत्येक पुस्तक लिहिणे हा देखील एक प्रकारचा ध्यासच आहे असं म्हटलं पाहिजे.
मुलाखत माझी मामी आणि मी मिळून घेणार असं ठरलं. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून आम्ही वीणाताईंच्या मुलाखतीचे युट्यूब व्हिडिओ बघितले तसंच त्यांची पुस्तकंही वाचली आणि त्यांच्या प्रदीर्घ लेखन कारकिर्दीने अचंबित व्हायला झालं . कार्व्हर (१९८१ साली प्रकाशित) नंतर वीणाताईंनी -
१) भारतात ग्रामीण आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या अमेरिकन डॉ आयडा स्कडर (१९८४)
२) सर्पमित्र आणि अभ्यासक डॉ रेमंड डिटमार्स (१९८७)
३) पक्षीतज्ज्ञ आणि भारतात पक्षीनिरीक्षणशास्त्राचे आद्य प्रवर्तक डॉ सालिम अली (१९९०)
४) कृषितज्ज्ञ आणि क्रांतिकारक डॉ पांडुरंग खानखोजे(१९९७)
५) ऑस्ट्रियन ज्यू महिला भौतिक शास्त्रज्ञ लीझ माईट्नर (२००३)
६) पाणी पंचायत या संकल्पनेचे प्रवर्तक विलासराव साळुंखे (२००५)
७) डीएनएच्या शोधात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रोझलिंड फ्रँकलिन (२००९)
८) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय डिझाइनर रॉबी डिसिल्वा (२०१६)
९) इस्त्रायली पंतप्रधान गोल्डा मायर (२०१९)
१०) वृक्षसंवर्धक डॉ रिचर्ड बेकर (२०२२)
११) बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ डॉ मारिया मॉंटेसरी (२०२३)
अशी चरित्रं लिहिली आहेत तसंच २०१३ साली त्यांनी 'इंटिमेट डेथ' या पुस्तकाचा अनुवाद देखील केला आहे.
चरित्र लेखनाला मराठी साहित्यात एक वेगळा आयाम देणाऱ्या, एवढं विपुल लेखन केलेल्या वीणाताईंची वेळेच्या मर्यादेत मुलाखत घेणं म्हणजेच त्यांच्या कार्याला यथोचित न्याय देणं खरं तर एक आव्हानच होतं आणि म्हणूनच आम्हांला थोडंसं दडपण आलं होतं.
३
मुलाखतीचा हा कार्यक्रम १ डिसेंबर २०२४ रोजी चैतन्य मध्येच पार पडला. मुलाखतीआधी आम्ही वीणाताईंशी थोडी चर्चा केली. कदाचित आम्हांला वाटत असलेल्या दडपणाची त्यांना कल्पना आली असावी. त्या इतक्या सहजपणे आमच्याशी बोलल्या की आमची सगळी धाकधूक पार नाहीशी झाली. त्यांनी आश्वस्त केल्यामुळे मुलाखत ही मुलाखत न राहता त्या अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्या छान रंगल्याही !
गप्पांची सुरुवात अर्थातच 'एक होता कार्व्हर' पुस्तकाने झाली. वीणाताईंनी हे पुस्तक ठरवून लिहिलं नाही. त्यांच्या मुलांना ती लहान असताना कार्व्हरची गोष्ट त्या सांगत असत. रोज थोडी थोडी सांगत कारण त्यांचा लहान मुलगा गोष्ट ऐकता ऐकता झोपून जात असे आणि दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट पहिल्यापासून सांगण्याचा आग्रह करत असे. म्हणून त्यांनी या गोष्टीच्या नोंदी केल्या, ज्या त्यांची मोठी मुलगी(तेव्हा ती तिसरी-चौथीत असेल) धाकट्याला वाचून दाखवत असे. नंतर काही कारणाने या हस्तलिखित नोंदी इतर लोकांनीही वाचल्या आणि त्यापैकी एकांनी त्यांना ही गोष्ट जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे असं सुचवलं. यातून या पुस्तकाचा जन्म झाला. आजवर 'कार्व्हर' च्या तब्बल ४८ आवृत्त्या निघाल्या आहेत आणि जवळपास ३-४ पिढ्यांनी हे पुस्तक वाचलं असावं. आजही लोक वीणाताईंना हे पुस्तक वाचून ते आवडल्याचं आणि ते प्रेरणादायी असल्याचं कळवतात. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉवर्ड ब्लॅक युनिव्हर्सिटी मध्ये या पुस्तकाची ख्याती पसरली. तसंच नासा च्या कार्व्हर सेंटर मध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या एका मराठी तरुणाने वीणाताईंचं कार्व्हर पुस्तक वाचलं होतं आणि ते त्याला तिथली कृष्णवर्णीयांची परिस्थती समजून घ्यायला उपयोगी पडलं असं त्याने आवर्जून सांगितलं.
यानंतर वीणाताई डॉ पांडुरंग खानखोजे या कृषीतज्ज्ञ वरील त्यांच्या 'नाही चिरा..' या पुस्तकाविषयी बोलल्या. योगायोगाची गोष्ट म्हणजे डॉ खानखोजे १९१३ साली डॉ कार्व्हरना भेटले होते. डॉ खानखोजे यांनी गदर चळवळीत भाग घेतला होता. अमेरिकेत शिक्षण घेऊन त्यांनी १९२० ते १९४७ पर्यंत मेक्सिकोत वेगवेगळ्या कृषी सुधारणा केल्या. भारतात मात्र ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत येऊ शकले नाहीत कारण क्रांतिकारक असल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार अटक करू शकली असती. डॉ खानखोजे यांचं इतकं मोठं कार्य असूनदेखील त्यांच्याबद्दल आपल्याकडे कोणालाही फारशी माहितीच नव्हती. त्यामुळे ही माहिती मिळवून त्यांचे अस्सल चरित्र लिहिणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. त्याबद्दल वीणाताईंनी केलेलं वर्णन उद्बोधक होतं. डॉ खानखोजे यांचं चरित्र लिहून त्यांनी एका महान परंतु उपेक्षित व्यक्तीचं कार्य मराठी वाचकांसमोर ठेवलं आहे.
वीणाताईंनी चरित्रं लिहिताना अशा व्यक्तींविषयी लिहिलं ज्यांचं कार्य पथदर्शी आहे. सध्याच्या भाषेत ज्यांना- चेंजमेकर्स म्हणता येईल अशांबद्दल त्यांनी लिहिलं आहे.ज्यांच्या कार्याने समस्त मानवजातीच्या उत्थानासाठी उपयोग झाला अशा लोकोत्तर व्यक्तींचं चरित्र वीणाताईंनी लिहिलं. मग ते 'पाणी ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नसून त्यावर सर्वांचा सामान हक्क आहे . पाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे' हा विचार घेऊन पाणी पंचायत ही चळवळ उभारणारे विलासराव साळुंखे असोत की आपलं संपूर्ण आयुष्य वृक्ष संगोपन, संवर्धन आणि संवर्धनासाठी खर्च करणारे पर्यावरणवादी डॉ रिचर्ड बेकर असोत. वीणाताईंच्या चरित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चरित्र नायक/नायिकांचं कार्य निर्विवाद आणि नि:संशय आहे. आणि याबाबत वीणाताईंनी खातरजमा केली आहे हे निश्चित !
या सर्व चरित्र लेखनातून वीणाताईंनी केवळ त्या त्या व्यक्तीचं कार्यच उभं केलं आहे असं नाही, तर कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कार्य झालं हेही लिहिलं आहे त्यामुळे ते कार्य अधिकच झळाळून उठतं. शिवाय त्यांच्या या सर्व पुस्तकांमधून आपल्याला समाजातील वेगवेगळ्या समस्यांचं आकलन होतं. आणि काही समस्या अशा आहेत ज्यांना स्थळ-काळाचं बंधन असेलच असं नाही. उदाहरणार्थ भौतिकशास्त्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लीझ माईट्नर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाला पंधरा वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. परंतु केवळ एक स्त्री असल्यामुळे त्यांची अवहेलना झाली. तीच गोष्ट डीएनएचा शोध लावण्यात मोलाचं संशोधन करणाऱ्या रोझलिंड फ्रँकलिन यांचीही! त्यांचं मौलिक संशोधन त्यांच्या नकळत पुरुष सहकाऱ्यांनी वापरून नोबेल पुरस्कार मिळवला देखील. मात्र यांचं श्रेय हिरावलं !
वयाची ऐशी वर्षे पूर्ण केल्यानंतर वीणाताईंनी एक मोठं धाडसच केलं ! चंबळ नदीच्या खोऱ्यात २०२३ साली त्या आणि त्यांचे एक सहकारी प्रसाद कुमठेकर फिरले आणि तिथल्या काही मृत नद्या पुन्हा वाहत्या झाल्या हे त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितलं. डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्या तरुण भारत संघ तर्फे राबविण्यात आलेल्या जल बिरादरी उपक्रमाअंतर्गत हे विलक्षण परिवर्तन घडून आलं आहे. या प्रवासादरम्यान त्या कितीतरी लोकंना भेटल्या जे पूर्वी डाकू होते, डकैती , लुटालूट करायचे, खंडणी मागायचे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चरितार्थासाठी दुसरा काही मार्गच नव्हता. पण आता याच लोकांनी बंदुका टाकून हातात नांगर घेतलं आहे. पूर्वी पाण्याअभावी इथल्या लोकांनी पलायन केलं होतं. पण आता नद्या वाहत्या झाल्यावर पुन्हा ते आपल्या गावी परतले आहेत. शेती करू लागले आहेत. वीणाताई अशा लोकांबरोबर राहिल्या, त्यांच्याबरोबर जेवल्या, त्यांच्या कहाण्या समजून घेतल्या. वीणाताईंना नवीन विषयाचं असलेलं कुतूहल आणि तो समजून घेण्याचा आणि त्यासाठी कष्ट घेण्याची याही वयात तयारी बघून सगळेच अक्षरश: भारावून गेले!
वीणाताई त्यांच्या पुस्तक लिहिण्यामागच्या चिकाटी, मेहनत आणि ध्यासाबद्दलही बोलल्या. प्रत्येक पुस्तकाचं हस्तलिखित असतं आणि त्याचं लेखन, पुनर्लेखनही करावं लागतं. अनेक संदर्भ शोधून, तपासून पुस्तकासाठी वापरावे लागतात. लौकिकार्थाने त्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी नाहीत. पण तरीही अनेक वैज्ञानिक संकल्पना त्या समजून घेऊन त्यांचे सोप्या मराठी भाषेत रूपांतर करून त्या वाचकांसमोर मांडतात. पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्या त्या विषयातील तज्ज्ञांना हस्तलिखित प्रत देऊन त्यांच्याकडून त्या सूचना/दुरुस्त्या मागवतात.
आपल्या दिनचर्येविषयी त्या मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या घरातल्या लोकांना सर्व गोष्टी हातात आणून देणं (यालाच त्यांनी Baby sitting हा शब्द वापरला ) त्यांनी खूप लवकर बंद केलं. त्यामुळे घरातल्यांनाही जाणीव झाली की त्यांना लेखन करण्यात व्यत्यय येऊ देता कामा नये.
उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि इतरही श्रोत्यांना त्यांनी आपल्या वयाच्या ८१ व्या वर्षीही असलेल्या उत्साहाचं आणि ऊर्जेचं रहस्य सांगितलं. त्या म्हणाल्या की आपण आपले प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. 'अमकीच्या साडीचा पोत असाच आहे, तिने आधीचीच साडी पुन्हा नेसली आहे' या आणि अशा गोष्टी बोलण्यामध्ये आपला वेळ घालवू नये. आपण सर्वसाधारणपणे आपल्या मेंदूचा त्याच्या क्षमतेच्या १३% च वापर करतो. त्यापेक्षा जास्त वापर करून काही सकारात्मक गोष्टी कराव्यात असं त्यांनी सुचवलं. शेवटी त्यांनी हेही सांगितलं की आजही त्या रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि संध्याकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात.
आमच्या गप्पांचा हा थोडक्यात गोषवारा ! संपूर्ण मुलाखतीविषयी लिहिणं (व्हिडिओ उपलब्ध नसताना ) तसं थोडं अवघडच!
४
आमच्या कार्यक्रमानंतर अपेक्षेप्रमाणे वीणाताईंभोवती अनेक श्रोत्यांचा गराडा पडला. कोणी त्यांची जुनी ओळख काढत होतं, कोणी त्यांना आणखी कोणाशीतरी बोलायला लावत होतं, कोणाला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते, कोणाला त्यांच्याबरोबर सेल्फी हवा होता. तर माझ्यासारख्याला त्यांच्या पुस्तकांवर सह्या हव्या होत्या. खरं तर वीणाताई आदल्यादिवशी वसईहून गोरेगावला एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथून प्रभादेवीला त्या राहिल्या. सकाळी उठून जांभूळपाड्याला आल्या. हा कार्यक्रम झाल्यावर त्या परत वसईला जाणार होत्या. एवढी धावपळ असून देखील त्या प्रत्येकाशी न कंटाळता, हसतमुखाने बोलत होत्या. आस्थेने समोरच्या माणसाच्या बोलण्यात रस घेत होत्या. सेल्फी, फोटो कशालाही त्या नाही म्हणत नव्हत्या. त्यांचा हा उत्साह, वागण्यातली सहजता, साधेपणा आणि उबदारपणा विलक्षण लोभस होता.
मी आणि माझी पत्नी योगिनी, आम्ही दोघे वरील मुलाखत ऐकण्यासाठी उपस्थित होतो. श्री.राजेश पुसाळकर आणि लीना देवस्थळी ह्या दोहोंनी अतिशय उत्तमप्रकारे वीणाताईंना बोलते केले आणि वीणाताई देखील दिलखुलासपणे बोलल्या. जांभुळपाड्यातील आमची विवाहित कन्या डॉ.नेहा आणि जामात सी.ए. ऋषिकेश अभ्यंकर यांच्यामुळे हा सुवर्णयोग जुळून आला.
ReplyDeleteमाझा ब्लॉग वाचून त्यावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार!
Delete