Wednesday, 25 March 2015

अनौपचारिक गप्पा : डॉ. आनंद आणि श्री. अमृत बंग यांच्याशी ….



'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' ला जाणं हा नेहमीच आनंददायक अनुभव असतो. माझी मामी सौ. लीना देवस्थळी हिचा ध्यास असलेला हा वृद्धाश्रम आमच्यासाठीही एक अभिमानाची गोष्ट आहे. खोपोली-पाली रस्त्यावर,पुणे आणि मुंबईपासून  १०० किमी अंतरावर जांभूळपाडा या शांत गावी हा वृद्धाश्रम एका बैठ्या वाडयाच्या स्वरूपात वसला आहे. सर्वसाधारणपणे वृद्धाश्रम म्हटलं की एक नकारात्मक चित्र डोळ्यापुढे येतं. पण इथे तसं नाही. इथल्या निवासी आणि कर्मचारी यांचं एकमेकांशी खेळीमेळीचं नातं आहे.एक छान आपलेपणा आणि उत्साही वातावरण  इथे  नेहमीच जाणवतं. 'चैतन्य' चा तिसरा वर्धापनदिन नुकताच, १५ मार्च २०१५ ला, एका सुंदर समारंभाद्वारे साजरा करण्यात आला. मुंबई येथील दीप्ती ठाकूरदेसाई आणि त्यांच्या शिष्यांचा कथक नृत्याचा बहारदार कार्यक्रम, पुण्याचे (निवृत्त )एअर मार्शल भूषण गोखले यांचे युद्धभूमीवरचे स्वानुभवकथन असा कार्यक्रम होता. तसेच  डॉ.अभय आणि डॉ. राणी बंग यांचे सुपुत्र डॉ.आनंद आणि श्री.अमृत बंग यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम होता. ही मुलाखत सौ. लीना देवस्थळी व मी घेतली. 





डॉ.बंग दाम्पत्याचे कार्य अफाट आहेच पण त्यांच्या दोन्ही मुलांनीही गडचिरोली मध्येच काम करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याची केवळ एक झलक त्यांच्याशी बोलताना मिळाली. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचाही साधेपणा ! कुठलाही बडेजाव नाही, कसलाही इगो नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय हा मोठेपणा मिरवण्याचा प्रयत्न नाही ! त्यांच्या एकूणच वागण्यात सहजता होती. मुलाखातीआधीही  दोघांशी संवाद साधणं सोपं गेलं. आम्ही जणू एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होतो अशाप्रकारे दोघेही बोलले. कार्यक्रम खूप छान झाला याचे श्रेय त्या दोघांचे ! दोघांच्याही बोलण्यात आत्मविश्वास तर होताच पण ते जे काही बोलत होते ते अगदी मनापासून होतं. त्यांचं काम, त्यांचे तिथले अनुभव बोलण्यातून अगदी सहजपणे व्यक्त होत होते. त्यांच्या विचारांत कमालीची  clarity होती. कुठलाही गोंधळ नव्हता. म्हणूनच त्यांचं बोलणं appealing होतं. त्यांनी प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद तर साधलाच पण कार्यक्रमानंतरही  प्रत्येकाशी ते न कंटाळता बोलत होते. माणसं थोडी जरी मोठी झाली तरी आपल्याभोवती ते एक कवच निर्माण करतात, जे  भेदता येत नाही. पण हे दोघेही त्याला नक्कीच अपवाद होते.

मुलाखतीची काही क्षणचित्रे -

गडचिरोलीची दुर्गमता, तिथले हवामान याबद्दलची माहिती असेलच. पण डॉ.आनंद यांनी तिथल्या आरोग्य विषयक समस्यांविषयी सविस्तरपणे सांगितलं. गडचिरोलीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या १% इतकीच आहे. परंतु तिथे मलेरियाचे प्रमाण बघितले तर महाराष्ट्रातल्या २५ टक्के केसेस तिथे सापडतात. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०१४ या एका महिन्यात तिथे मलेरियाचे  तब्बल १२००० रुग्ण सापडले! शिवाय तिथे मलेरियाचा घातक प्रकार (Falciparum) आढळतो, ज्यात मेंदूवर परिणाम होतो. ( हे माझे मत-आणि आपण इथे स्वाइन फ्लू मुळे घाबरून जातो, मीडिया देखील स्वाइन फ्लूचा बाऊ करते. त्यापेक्षा कितीतरी गंभीर आणि प्राणघातक आजार आहेत. पण त्यांचा आपण तेव्हढ्या प्रमाणात विचार करत नाही.) 

डॉ.आनंद बंग

                                                                ******
गडचिरोलीमध्ये बालमृत्यू दर घटवण्याचे महत्त्वपूर्ण काम बंग दाम्पत्याने केले आहे. पूर्वी तिथे हा दर, दर हजारी १२१ इतका होता. त्यापैकी ४०% बाळं न्यूमोनियामुळे दगावत. या परिस्थितीचा बंग दाम्पत्याने अभ्यास केला. आजाराचे योग्य निदान आणि वेळीच उपचार न झाल्यामुळे असे होत होते असा निष्कर्ष त्यांनी काढला. या अभ्यासाला त्यांनी जोड दिली संशोधनाची ! या समस्येवर उत्तर तर शोधणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी तिथल्याच लोकांना प्रशिक्षित केले.त्यांनी तयार केलेले हे आरोग्यदूत घरोघरी जावून आजारी मुलांचा श्वास घेण्याचा वेग एका सोप्या श्वास -मापकाच्या आधारे घेत. जर हा वेग ५०-६० प्रति मिनिट इतका आढळला तर तिथेच त्या बाळाला न्यूमोनिया  आहे असं निदान करून त्यावरची प्रतिजैविके (antibiotics) देत. अशा प्रकारे ५ वर्षे ही पद्धत राबवल्यानंतर न्यूमोनियामुळे बाळं दगावण्याचे प्रमाण फक्त ०.५% इतकेच उरले. ही अतिशय सोपी आणि कमी खर्चाची पद्धत इतर राज्यांत आणि इतर अनेक देशातही राबवली गेली. या संशोधनाला 'Lancet' या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मासिकातही स्थान मिळाले.
आपल्या गडचिरोली आणि इतर मागास भागांकडे बघण्याच्या शहरी मानसिकतेबद्दल(म्हणजे आपल्या अनास्थेबद्दल) डॉ.आनंद यांनी खलील जिब्रानचे एक अतिशय भिडणारे वाक्य सांगितले - संपूर्ण झाडाची  मूक संमती असल्याशिवाय त्याचे एकही पान गळू शकत नाही ! तसंच गडचिरोलीचं आहे- इथे बालमृत्यू किंवा ही कोवळी पानगळ होत आहे कारण त्याला उर्वरित महाराष्ट्राची जणू मूक संमतीच आहे. 

                                                               ******
आपल्या लहानपणाविषयी, त्यावेळेच्या घरातल्या वातावरणाविषयी दोघेही मनमोकळेपणाने बोलले.


डॉ.राणी बंग  दिवसातले १८ तास काम करून घरी आल्यावर घरचेही सगळे बघत आणि रात्री-अपरात्री कोणी बोलवलं तरी जात. काही वेळा पेशंटला रक्त देण्याची गरज भासली तर स्वत: रक्त देउन मग त्या पेशंटची शस्त्रक्रिया करत. गडचिरोली मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिझेरियन ऑपरेशन डॉ. राणी बंग यांनी केले. घरात वातावरण हे असे सेवेचे, दारू मुक्ती आंदोलनातील बंग परिवाराच्या सक्रिय सहभागामुळे चळवळीचे होते. दारू मुक्तीच्या आंदोलनाच्या काळात तर बंग दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 
अशा परिस्थितीतदेखील डॉ. राणी बंग रात्री-अपरात्री पेशंट बघण्यासाठी गावोगावी जात.डॉ. राणी बंग या अतिशय निर्भीड आणि संवेदनशील तर डॉ. अभय बंग हे rational, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, संशोधक मनोवृत्तीचे perfectionist आहेत असे डॉ. आनंद यांनी सांगितले. 
घरात प्रत्येकाला मत स्वातंत्र्य असून आपापले मत मांडणे आणि त्यावर मोकळी चर्चा करणे हे नेहमी होते असे दोघेही म्हणाले. करिअरची निवड आणि आयुष्याच्या जोडीदाराची निवड याही बाबतीत दोघांनाही पूर्ण स्वातंत्र्य होते. 

                                                                    ******

अमृत बंग हे इयत्ता पहिली ते दहावी शाळेत गेलेच नाहीत. म्हणजे त्यांनी शाळेतल्या सर्व परीक्षा दिल्या आणि त्यात नेहमीच ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. पण शाळा न करण्याची सवलत तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. हल्लीच्या काळात केव्हा मूल  दीड वर्षाचं होईल आणि केव्हा शाळेत जावू लागेल याची पालकांना घाई आणि चिंता लागलेली असते. त्या तुलनेत हे शाळेत न जाणं, कुठलाही क्लास न लावणं अगदी उठून दिसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पालकांनी त्यांचा कधीही अभ्यास घेतला नाही की कधी कुठला धडा शिकवला नाही. फक्त कुठे अडलं तर ते सांगत असत. घरात मात्र वाचण्याचं बरंच साहित्य उपलब्ध असे. शिवाय विज्ञानाच्या प्रयोगांसाठी छोटी प्रयोगशाळाही होती. 

                                                                       ******
अमृत पुण्याच्या PICT कॉलेज मधून इंजिनियर झाले. त्या काळात डॉ. अभय बंग यांनी एकदा त्यांना पैशाचे महत्त्व किती हे फार सुंदररीत्या सांगितले होते. ते म्हणाले होते- पैशाचे महत्त्व पायातल्या चपले इतके ! चप्पल पायात नसेल तर पायाला दगड वगैरे टोचतील, पाय भाजतील. म्हणून चप्पल हवी. पण आपण ती कधी गळ्यात घालत नाही. तसंच पैशांचं आहे.कदाचित म्हणूनच असेल की अमृत यांनी सॉफ्टवेअर कंपनीतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि आता ते गडचिरोली मध्ये कार्यरत आहेत. 

श्री. अमृत बंग 

                                                                       ****** 
MKCL (Maharashtra Knowledge Corporation Ltd ) च्या वतीने १८-२८ या वयोगटातील तरुणांना सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी  प्रशिक्षण देण्यासाठी 'निर्माण' हा  एक उपक्रम राबवला जातो. त्याचे समन्वयक म्हणून अमृत काम पाहत आहेत. आजवर सुमारे ६०० तरुणांनी ' निर्माण' मध्ये  प्रशिक्षण घेतले असून सुमारे १०० जण  पूर्णवेळ वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्यात आहेत.हे प्रशिक्षण ३ टप्प्यात असते. जानेवारी, जून आणि डिसेंबर अशा वर्षातील ३ महिन्यांत प्रत्येकी ८ दिवसांचे शिबीर गडचिरोलीमध्ये घेण्यात येतं.ज्यांना आयुष्यात पुढे काय करायचं आहे याचा ठाम निर्णय घेता येत नाहीये, त्यांनी स्वतः लाच स्वतः ची ओळख होण्यासाठी आणि ज्यांना सामजिक  कामात रस आहे अशांनी यात जरूर सहभागी व्हावे असे मी सुचवेन. 

                                                                        ******
कार्यक्रम संपल्यावर मनात वेगवेगळ्या भावना होता. एकीकडे एक विलक्षण भारलेपण, भारावलेपण होते. आपण काहीतरी अद्भुत, अविस्मरणीय अनुभवले आहे आणि एका वेगळ्याच अनुभवाचे आपण एक साक्षीदार झालो याचा आनंद होता. पण तरीही दुसरीकडे कुठेतरी एक बोच होती. म्हणूनच नकळत डोळ्यांत पाणी आले. इंग्रजीत ज्याला आपण 'Missed the bus' म्हणतो तसं काहीसं वाटलं. पहिल्यांदाच असे प्रकर्षानं  जाणवलं की आपण या कामात आता सहभागी होवू शकत नाही. वय उलटून गेल्याची जाणीव या आधी इतकी  कधी झाली  नव्हती  ! 

 ( 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' चे काही फोटो) -

' चैतन्य' चे प्रवेशद्वार 



बैठ्या वाड्याचे स्वरूप 


निवासींची खोली 

भोजनकक्ष 


'चैतन्य' विषयी अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पहावी-
www.chaitanyasahniwas.com

डॉ अभय बंग यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायचे असल्यास इथे पाहावे-
www.searchgadchiroli.org

'निर्माण' संबंधी माहिती इथे मिळेल -
http://nirman.mkcl.org 


4 comments:

amitmoghewrites said...

Mast ...farach chan ani muddesud...I do not fully agree with Missed the bus comment (Hopefully I have understood what you mean by it), as i feel you are contributing in some way or other and will continue to do so as wel...

Sunil said...

सहज व सुंदर लिखाण! परत एकदा मुलाखत ऐकली असं वाटतय. मुख्य म्हणजे तूझ्या स्मरणशक्ती ची दाद देतो. Keep it up!

Rajesh Pusalkar said...

Thanks Amit & Sunil for your encouraging comments.

लीना मामी said...

राजेश अप्रतिम लिहीले आहेस. कार्यक्रमाची मजा पुन्हा अनुभवायला मिळाली. धन्यवाद.