Saturday 25 April 2015

कथा घसरत्या कार्यमूल्याची (जर्मन कथेचा मराठी अनुवाद)


मूळ कथा - Anekdote zur Senkung der Arbeitsmoral
लेखक - हाईनरिश  ब्योल 
मराठी  अनुवाद : राजेश पुसाळकर 

या कथेच्या अनुवादाविषयी थोडेसे. . . 
ही कथा आम्हांला पुणे विद्यापीठाच्या जर्मन भाषेच्या Advance Diploma च्या अभ्यासक्रमात होती. परीक्षेच्या दृष्टीने तिचा अभ्यास करायचा होता तरीही ती आवडली होती. कथेतल्या पर्यटक आणि कोळी या दोन व्यक्तिरेखा त्यांच्यातील परस्परविरोधी वृत्तींमधून  छान मांडण्यात आल्या होत्या. केवळ बाह्य पेहरावच नव्हे तर दोघांचीही देहबोली आणि भाषेचा वापर(कोणाचा जास्त तर कोणाचा कमी) यातूनही ही तफावत दिसून येत होती. यातूनच लेखकाने दोन विचारसरणी अतिशय मार्मिकपणे आणि खुबीने मांडल्या आहेत . म्हटलं तर त्यात विरोधाभास आहे पण  तो फारच subtly दिसून येतो. हा विरोधाभास आहे दोन कार्यसंस्कृतींमधला ! पहिली कार्यसंस्कृती म्हणजे अफाट आणि सतत काम करणे.तर दुसरी म्हणजे कामही करणे आणि जगण्याचा आनंदही घेणे. कशासाठी  जगायचे? फक्त काम एके काम करण्यासाठी ? की आवश्यक तेवढी तजवीज करून ठेवून आयुष्याची मजा लुटण्यासाठी? काम करत करत कुठपर्यंत जायचे? कुठे थांबायचे? 
 म्हणूनच कामगार दिनाचे औचित्य साधून १९६३ साली या कथेचे रेडिओवर पहिल्यांदा प्रसारण करण्यात आले. 
कथा पश्चिम युरोपातल्या कुठल्याशा किनारपट्टीवर घडते असं दाखवलंय. पर्यटक आणि कोळी दोघेही कोणत्या देशाचे आहेत हे संदिग्ध आहे. पण एकूण पर्यटक जे काही बोलतो त्यावरून तो जर्मन असावा असं म्हणता येऊ शकतं तर कोळी स्पेन अथवा पोर्तुगालचा असू शकतो. हे समजणं आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी पूर्णत: बेचिराख झाला होता. त्यानंतरच्या पुन:बांधणी आणि निर्माणासाठी जर्मन लोक आणि तिथे आलेले परदेशातले स्थलांतरित कामगार यांनी अक्षरश: झोकून काम केले होते.संपूर्ण पिढ्यांनी ध्यास घेतल्यासारखे  काम केले होते. हे करत असताना त्यांनी त्यांच्या वर्तमानातला विरंगुळा, आनंद नक्कीच गमावला असणार. पर्यटक आणि कोळी यांच्यातल्या या सूक्ष्म द्वंद्वातून लेखकाला हा मुद्दाही सुचवायचा आहे. 
पण म्हणून ही गोष्ट फक्त जर्मन संस्कृती पुरती मर्यादित ठरते का? उलट ती आजच्या गतिमान काळातही चपखल बसते इतकी ती कालातीत वाटते . सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये किंवा सगळ्याच क्षेत्रातल्या स्पर्धेच्या वातावरणामुळे कथेतून सुचवले गेलेले सगळे प्रश्न आजही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. 
अनुवाद करताना खूप मजा आली. ही कथा जास्त खोलवर समजली . शिवाय जाणवलं की या कथेतील भाषेला एक छान दृश्यात्मकता आहे. अख्खी कथा डोळ्यासमोर घडते आहे असं वाटलं. अनुवाद करताना मराठीतही हा बाज आणणं जमलंय का हे मला माहित नाही. 
चला, नमनालाच  आणखी किती बोलणार ? आपण ही कथा वाचून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा… 
( विशेष आभार - नंदिता निरगुडकर- अनुवाद बारकाईने तपासून त्यातल्या चुका सुधारल्याबद्दल )
(आभार - सदानंद चावरे आणि विवेक गोवंडे हे माझे मित्र आणि पल्लवी पाठक - तिघेही adv diploma चे माझे सहाध्यायी . . . मला प्रोत्साहन दिल्याबद्दल ! )

कथा घसरत्या कार्यमूल्याची 

पश्चिम युरोपच्या किनारपट्टीवरील कुठल्याशा एका बंदरावर मासेमारीच्या एका बोटीत एक साध्यासुध्या कपड्यातला कोळी डुलक्या घेत असतो . त्याचवेळी तिथे एक आधुनिक पेहराव केलेला पर्यटक येतो. तो त्याच्या कॅमेऱ्यात नवी फिल्म घालतो. त्याला त्याच्या समोर दिसणारे  सुंदर दृश्य कॅमेऱ्यात साठवायचे असते . निळेभोर आकाश, हिरवागार समुद्र आणि त्याच्या त्या शांत, स्फटिकासारख्या लाटा, काळसर रंगाची ती बोट आणि त्यात लाल टोपी घालून झोपलेला तो कोळी ! 
क्लिक. . . पुन्हा एकदा क्लिक. . .एकतर  सगळ्या  चांगल्या गोष्टी तिनाच्या पटीत असतात. शिवाय फोटो चांगले आले आहेत याची खबरदारी म्हणून  तिसऱ्यांदा क्लिक … कॅमेऱ्याच्या या खरखरीत, जवळजवळ उद्वेगी गोंगाटामुळे आतापर्यंत शांत डुलक्या घेणारा कोळी जागा होतो. आळस देत उठतो. पेंगत पेंगतच त्याचे सिगरेटचे पाकीट शोधतो. ते त्याला मिळण्याआधीच उत्साही पर्यटक आपले पाकीट कोळ्याच्या नाकासमोर धरतो. सिगरेट जरी  अगदी तोंडात ठेवली नसली तरी अगदी त्याच्या हातात देतो. आणि आता चौथ्यांदा क्लिक… पण हा आवाज लायटरचा ! या सगळ्यातून सौजन्याची एक कृती घाईघाईत पूर्ण होते. या फुटकळ, अगदीच माफक सौजन्यातून एक चमत्कारिक आणि काहीसे अवघडलेलं  वातावरण तयार होते. हे अवघडलेपण दूर करण्यासाठी, तिथल्या स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणारा तो पर्यटक  कोळ्याशी संवाद साधायला लागतो. 
" आज तुम्हांला भरपूर मासे  मिळणार ! "
काही न बोलताच कोळी फक्त मानेने  नाही म्हणतो. 
"अहो . . . पण मला  तर कुणीतरी सांगितलंय की आज हवा खूप चांगली आहे. . "
कोळी पुन्हा एकदा मान डोलावतो. पण आता हो म्हणण्यासाठी !
" मासे पकडायला तुम्ही समुद्रात जाणार नाही का?" 
पुन्हा एकदा नाही. . . तेही खुणेनेच !
इथे पर्यटकाची अस्वस्थता वाढतच जाते. या सर्वसामान्य कपडे घातलेल्या माणसाचं भलं व्हावं असंच त्याला मनापासून वाटत असतं. आणि तो कोळी मात्र हातची चांगली संधी सोडून देतोय याबद्दल पर्यटकाला मनापासून वाईट वाटत असतं. 
"तुम्हांला बरं वाटत नाहीये का?" 
शेवटी एकदाची ती खाणाखुणांची भाषा बंद करून कोळी बोलू लागतो- 
"मी अगदी ठणठणीत आहे."" इतका बरा तर मी आजपर्यंत कधीच नव्हतो." 
तो उठून बसतो , आळस  देतो आणि जणू  त्या पर्यटकाला आपली कमावलेली पीळदार शरीरयष्टी दाखवतो. 
"मी एकदम मस्त आहे." 
पर्यटकाचा चेहरा पडतो. त्याला राहवत  नाही. मनात आलेला प्रश्न तो विचारतोच. 
"पण मग तुम्ही मासे पकडायला समुद्रात जात का नाही?"
उत्तर अगदी लगेच आणि त्रोटक येतं -" कारण मी आज सकाळीच जावून आलोय." 
" मग? काही चांगलं मिळालं का ?" 
"इतकं  चांगलं मिळालंय की आता मला परत जायची गरजच नाहीये. ४ लॉबस्टर आणि चांगले डझनभर बांगडे मिळाले आहेत !" 
कोळी आता पूर्ण जागा होतो, थोडे आळोखे पिळोखे देतो आणि पर्यटकाच्या जवळ येवून त्याच्या खांद्यावर हलकेच मारतो. 
पर्यटकाच्या चेहऱ्यावर मात्र काळजीचे भाव असतात, जे त्या कोळ्यापर्यंत पोचतात. 
"माझ्याकडे आज आणि उद्यापर्यंत पुरेल एवढा माल आहे." कोळी त्या परदेशी पाहुण्याला सांत्वनपर म्हणतो. 
"एक सिगरेट ओढाल … माझ्याकडची?" 
" हो. . द्या ना  . . ." 
मग सिगरेटी तोंडात ठेवल्या जातात आणि पुन्हा क्लिक...एकूण पाचव्यांदा ! पर्यटक मान हलवत बोटीच्या काठावर बसतो. आपल्या हातातला कॅमेरा काढून बाजूला ठेवून देतो. कारण आपलं म्हणणं ठासून मांडण्यासाठी त्याला आता  दोन्ही हातांचा वापर करावा लागणार  असतो. 
"खरं तर मी तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं बरोबर नाही." पर्यटक म्हणतो. " पण तुम्ही कल्पना करा. . . आजच्या दिवसात तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, कदाचित चार वेळा समुद्रात मासेमारीसाठी गेलात तर? . . . . तर तुम्हांला कदाचित तीन, चार, पाच किंवा अगदी सहज दहा डझन बांगडे मिळतील. विचार तर  करून बघा !"
कोळी खुणेनेच नाही म्हणतो. 
"अहो फक्त आजच नाही…" पर्यटकाचे बोलणे चालूच असते. 
"उद्या, परवा आणि प्रत्येक वेळी जेव्हा हवा चांगली असते तेव्हा तुम्ही दर दिवशी दोनदा, तीनदा , कदाचित चार वेळा गेलात तर? 
अहो तुम्हांला माहित तरी आहे आहे का काय होईल?" 
कोळी पुन्हा मान डोलावतो. 
" एका वर्षात तुम्ही स्वत:ची मोटर बोट घेऊ शकाल. दोन वर्षांत दोन बोटी ! तीन ते चार वर्षांत कदाचित तुमची स्वत:ची एक छोटी कटर बोट सुद्धा असेल! दोन बोटी किंवा कटर बोट असल्यावर मग काय तुम्ही नक्कीच जास्त मासे पकडू शकाल. एक दिवस तुमच्याकडे दोन कटर बोटी असतील. तुम्ही. . ." उत्साहाने बोलण्याच्या नादात पर्यटकाला धाप लागते  आणि काही क्षण त्याचा आवाजही फुटत नाही. 
". . तुम्ही एक छोटंसं शीतगृह बांधाल. .  मग माश्यांवर प्रक्रिया करण्यासाठी एक इमारत उभी कराल . . . त्यानंतर एक कडबा कारखाना. . . तुमचं स्वत:चं एक हेलीकॉप्टर असेल. .  त्यातून तुम्हांला जास्त मासे कुठे आहेत हे शोधता येईल. मग तुमच्या बोटींना बिनतारी संदेश जाईल  आणि मग तुम्हांला आणखी मोठया प्रमाणावर मासे पकडता येतील. या उद्योगाचे कायदेशीर हक्क तुम्हांला विकत घेता येतील. . . एक खास मत्स्य पदार्थांचे हॉटेल काढता येईल. . . कुठल्याही दलाल किंवा मध्यस्थाशिवाय तुमचे लॉबस्टर पार पँरिसला  पाठवता येतील. . . आणि. . "
उत्साहाच्या भरात एका दमात बोलल्यामुळे  पर्यटकाच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत . मात्र कोळी काहीच बोलत नसल्यामुळे अतिशय हताशपणे पर्यटक मान डोलावतो. त्याच्या सुट्टीचा सगळा आनंद तो जवळजवळ हरवूनच बसलेला असतो . 
पर्यटक समुद्राच्या शांत लाटा बघत बसतो, ज्यात त्याला न पकडले गेलेले मासे उडया  मारताना दिसत असतात. श्वास अडकलेल्या एखाद्या लहान मुलाच्या पाठीवर थोपटावं  तसा तो कोळी पर्यटकाच्या पाठीवरून हात फिरवतो. 
". . . आणि मग ?" कोळी अगदी हळुवारपणे विचारतो. 
"आणि मग . . " पर्यटक  उसनं अवसान  परत आणून म्हणतो. 
". . तुम्ही इथे या बंदरावर शांतपणे बसू शकाल. . इथल्या उन्हांत छान डुलक्या घेऊ शकाल. . . आणि या सुंदर समुद्राकडे निवांतपणे पाहू शकाल."
" पण हे तर मी आतासुद्धा करतोय की !" कोळी म्हणतो. 
" मी इथे शांतपणे डुलक्या घेत बसलोय. तुमच्या त्या फोटो काढण्याच्या आवाजानेच माझी झोपमोड झालीये ." 
निरुत्तर झालेला  पर्यटक  तिथून अक्षरश: निघून जातो. खरंतर पूर्वी  त्याचीही अशी धारणा होती की तो इतकं काम करतोय , केवळ त्याला पुढे कधीतरी काम करण्याची गरज पडू नये म्हणून !. पण आता त्याच्या मनात त्या साध्यासुध्या  कपडे घातलेल्या कोळ्याबद्दल जरासुद्धा सहानुभूती वाटत नाही. वाटत असलीच तर थोडी फार असूयाच वाटत असते  !