Sunday, 20 September 2026

आमची इंग्लंडवारी :भाग १४ : शेक्सपिअरच्या देशा !

१ 

(माझा हा ब्लॉग सर्व  नाट्यप्रेमी, नाट्यकर्मी आणि नाट्यधर्मी लोकांना सादर समर्पित!)

 
म टा चे संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांच्या 'मधुघट'(साधना प्रकाशन) या पुस्तकात लेखक, नाटककार , कवी  विल्यम शेक्सपिअर विषयी त्यांनी उत्कृष्ट लिहिलं आहे. त्यांनी एका प्रसंगाचं सुरेख वर्णनही केलं आहे. शेक्सपिअरच्या मृत्यूला ४०० वर्षं झाली(२३ एप्रिल २०१६), तेव्हा जगभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी त्याच्या जन्मगावी (स्ट्रॅटफर्ड अपॉन ॲव्हन ) एक खास कार्यक्रम झाला होता. यात त्याच्या हॅम्लेट या नाटकातील "to be or not to be, that is the question!" हे स्वगत वेगवेगळ्या नामांकित नट नट्यांनी साभिनय म्हणून दाखवलं. या कार्यक्रमाला (त्यावेळचा) युवराज चार्ल्स उपस्थित होता. त्याने आयोजकांना विचारलं की त्यानेही यात भाग घेतला तर चालेल का. आणि मग त्यानेही हे स्वगत साभिनय म्हटले!यावर आश्चर्यचकित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शेक्सपिअरची मोहिनी राजघराण्यावर देखील किती आहे हे यातून दिसतं !याच लेखात पुढे तळवलकरांनी उद्बोधक माहिती दिली आहे. ते म्हणतात की शेक्सपिअर रशियात देखील अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या नाटकांचे रूपांतरित प्रयोग अठराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले होते. रशियन लोकांना शेक्सपिअरच्या शोकांतिकांनी  भुरळ  घातली होती. शेक्सपिअर तिथे इतका लोकप्रिय होता (आणि आहेही) की रशियनांना तो रशियनच आहे असं  वाटतं!  शेक्सपिअरची चारशेवी जयंती १९६४ साली रशियात देखील दिमाखात साजरी झाली. या कार्यक्रमाला तत्कालीन रशियन अध्यक्ष क्रुश्चेव्ह उपस्थित होते. रशियात शेक्सपिअर लोकप्रिय होण्यामागे एक कारण कार्ल मार्क्स देखील आहेत. कारण त्यांना शेक्सपिअर यांच्या नाटकातील उतारेच्या उतारे तोंडपाठ होते! याच लेखात तळवलकरांनी शेक्सपिअरचा जगाचा नागरिक असा गौरव केला आहे. आणि हे बरोबरच आहे. कारण जगभरातील जवळपास सर्वच भाषांमध्ये शेक्सपिअरच्या नाटकांचं भाषांतर/रूपांतर झालं असून त्याचे अजूनही प्रयोग होत असतात.  हे वाचल्यावर मला शेक्सपिअरच्या जन्मगावी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. शेक्सपिअरविषयी मी देखील एक ब्लॉग यापूर्वी लिहिला आहे. त्याची लिंक इथे देत आहे-

२ 

स्ट्रॅटफर्ड अपॉन ॲव्हन : (२८.०७.२०२६)-

ॲव्हन नदीच्या काठी वसलेलं हे छोटंसं गाव-

 
आम्ही गेलो त्या दिवशी इथे भरपूर गर्दी होती. देशी परदेशी पर्यटकांनी गाव अक्षरश: उत्साहाने ओसंडून वाहत होतं. 
 
Gower Monument 
१८८८ साली हे बांधण्यात आलं आहे. मध्यभागी शेक्सपिअरचा बैठा पुतळा (हातात नाटकाचं हस्तलिखित घेतलेला) असून त्याच्या चारी बाजूला शेक्सपिअरच्या नाटकातील व्यक्तिरेखांचे पुतळे आहेत. या फोटोत पुढे दिसत आहे तो Prince Hal (पाचवा हेन्री) चा पुतळा आहे. लॉर्ड रोनाल्ड गॉवर यांनी या पुतळ्याची रचना केली म्हणून त्यांचं नाव या जागेला दिलं आहे. 
शेक्सपिअरच्या जन्मस्थळी जाताना वाटेत हा आणखी एक पुतळा दिसला-
 
आणि हे शेक्सपिअरचं जन्मस्थळ-
  
 
 
दुर्दैवाने हे घर आतून पाहता आले नाही कारण त्यादिवशी तिथे प्रवेशासाठी खूपच मोठी रांग होती आणि तेवढा वेळ तिथे थांबणं शक्य नव्हतं कारण त्यादिवशी पुढे अजूनही बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या. 
शेक्सपिअरच्या घराचं हे एका अज्ञात चित्रकाराने काढलेलं चित्र-
 
मात्र इथे उभं राहून मी विंदा करंदीकरांची 'तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला ही कविता म्हटली-

पुढे गावात शेक्सपिअरची शाळा देखील बघितली -
 
तसंच Church of  the Holy Trinity बघितलं. इथेच शेक्सपिअरचा बाप्तिस्मा झाला आणि इथेच त्याचं दफनही करण्यात आलं-

 

 

गावात दोन-तीन ठिकाणी स्ट्रीट म्युझिक ऐकायला मिळालं-
 

गावात Royal Shakespeare Theatre आहे. त्याच्या बाहेर उभं राहून मी शेक्सपिअर चं 'As you like it' नाटकातलं -'All the World's a stage हे स्वगत म्हटलं -

३ 

०५.०८.२०२६-
२३ जुलैला सुरू झालेल्या आमच्या इंग्लंड ट्रिपचा ५ ऑगस्ट हा शेवटचा दिवस! एखाद्या सुंदर मोठ्या स्वप्नासारखे आमचे हे पंधरा दिवस होते. इथला प्रत्येक क्षण अन क्षण आनंदाचा होता. हे स्वप्न कधी संपूच नये असं एकीकडे वाटत असताना दुसरीकडे वास्तवाची जाणीव होऊन परतीचे वेधही लागले होते. त्यादिवशी लंडनमध्ये फिरत असताना मनात गेल्या पंधरा दिवसांची उजळणी चालू होती. या काळात बघितलेली ठिकाणं, भेटलेले नातेवाईक, मित्र आणि इतर अनेक अपरिचित माणसं हे सगळं आठवत होतं आणि मनाला एक हुरहूर लागून राहिली होती. ट्रिपचा शेवट गोड व्हावा असं वाटत होतं. I wanted my trip to finish on a high note! आणि योगायोगाने ती संधी चालून आली ! 
आम्ही टेम्स नदीकाठी असलेल्या शेक्सपिअरच्या ग्लोब थिएटरला गेलो. तिथे आधी केलेल्या लॉर्ड्स, विम्बल्डन सारखीच टूर उपलब्ध होती आणि थोड्याच वेळात ती सुरूही होणार होती. तिकीट दर खूप जास्त होता (२८ पौंड! आपण लगेच याचं रूपयांत रूपांतर करतो. त्यामुळे ते ३५०० रुपयांपेक्षाही जास्त होतात). हो-नाही करत शेवटी मनाचा हिय्या करून आमच्या पाच जणांपैकी मी एकटाच या टूरला गेलो आणि एक अविस्मरणीय अनुभव घेता आला  . 

४ 
ग्लोब थिएटर- 

 
आमची गाईड मूळची स्पॅनिश अथवा इटालियन असावी. तसं तिच्या उच्चारावरून लक्षात येत होतं. या टूरमध्ये आम्ही वेगवेगळ्या वयाचे २५-३० लोक होतो. तिच्याकडे माईक होता आणि आमच्याकडे हेडफोन्स देण्यात आले होते. पण ती खूपच हळू आवाजात बोलत होती. त्यामुळे हेडफोन्स असूनही तिचं बोलणं काही वेळा अक्षरश: कान देऊन ऐकावं लागत होतं. तिने आधी ग्लोब थिएटरचा इतिहास सांगितला.
१५९९ साली शेक्सपिअरची नाटक कंपनी Lord Chamberlain's Men ने ग्लोब थिएटर बांधलं. १६१३ साली ते प्रयोगादरम्यान लागलेल्या आगीत भस्मसात झालं. नंतर याची त्याच ठिकाणी वर्षभरात पुनर्बांधणी करण्यात आली आणि ते १६४२ पर्यंत चालू होतं. नंतर ते इंग्लंडमधील यादवी युद्धामुळे बंद पडल. आम्ही जे थिएटर बघत होतो ते खूपच आधुनिक होतं. मूळ थिएटरची ही प्रतिकृती १९९७ साली बांधण्यात आली. नावाप्रमाणेच गोलाकार असलेलं हे थिएटर खुलं आहे (Open air) आणि लाकडी बनावटीचं आहे. 
 
मध्यभागी हे स्टेज आणि समोरच्या बाजूला असं त्याचं स्वरूप आहे. 



 
 
 
मुख्य म्हणजे इथे माईक नाहीत. परंतु ध्वनिव्यवस्था उत्कृष्ट आहे. 

 
आम्ही इथल्याच गॅलरीत बसलो होतो आणि आमची गाईड तिच्या बोलण्यातून आमच्यापुढे शेक्सपिअरचा काळ जिवंत करत होती. १५६४-१६१६ हा शेक्सपिअरचा काळ! इंग्लंडमध्ये कालखंड राजघराण्यातील सत्ताधीशांप्रमाणे मोजतात. शेक्सपिअरचा काळ हा  प्रामुख्याने  Elizabethan era समजला जातो. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळात धार्मिक स्थैर्य, अंतर्गत शांतता, आर्थिक प्रगती होती. हाच इंग्रजी रेनेसाँचा सुवर्ण काळही होता. याच काळात इंग्रजी साहित्य आणि नाटक यांना राणीचं भक्कम पाठबळ मिळालं. हे सगळं एकीकडे असलं तरी दुसरीकडे त्याकाळच्या सर्वसामान्य माणसांच्या मनोरंजनाच्या कल्पना काहीशा रानटी होत्या असं गाईड म्हणाली. त्याकाळी bear fights (दोन अस्वलांमधली मारामारी) वा कोंबड्या झुंजवणं याला मनोरंजन समजत. लंडनमध्ये कामगार वर्ग बराच होता. त्यांच्या करमणुकीच्या अशाच कल्पना होत्या. त्यांना  या नाटकांकडे वळवणं हे किती अवघड काम असेल! गाईडच्या बोलण्यातून त्यावेळच्या वर्गसंघर्षाविषयी देखील माहिती मिळाली. कामगार वर्ग एक पेनी देऊन नाटक बघायला येत. त्यामुळे ते स्टेज समोर उभे राहून नाटक बघत. म्हणून त्यांना Groundlings असं म्हणून हिणवलं जात असे. (पण गाईड म्हणाली की त्यांच्यासाठी नाट्यप्रयोग हा immersive experience असणार कारण ते अगदी जवळून नाटक बघत !) याच लोकांना Stinkards असंही म्हटलं जाई. कारण यांच्या अंगाचा घामाचा वास, भरीतभर तिथे दारू/बिअर प्यायचे तो वास, आजार होऊ नये म्हणून लसूण खात तो वास आणि या सगळ्यावर कडी म्हणजे त्याकाळी प्रेक्षागृहात स्वच्छतागृहं नसायची. प्रेक्षक तिथेच लघुशंका करायचे वा पिशव्या घेऊन त्यात करायचे. त्यामुळे हा वासही तिथे घुमायचा. शिवाय हे प्रेक्षक मोठमोठ्या आवाजात खायचे, बोलायचे आणि नटाचं काम आवडलं नाही तर त्याच्यावर हातात असतील त्या वस्तू फेकायचे. नाटकांना येणाऱ्या अभिजनांना हे वागणं अर्थातच आवडायचं नाही. ते वरच्या गॅलरीत बसायचे,नाकं मुरडायचे आणि दुर्गंध येऊ नये म्हणून  जवळ सुगंधी फुलं ठेवायचे. 
गाईडच्या या बोलण्यातून शेक्सपिअरच्या काळाचा पट डोळ्यासमोर उभा राहिला. त्या काळाच्या कॅनव्हासवर शेक्सपिअरची नाटकं जन्माला आली, रुजली आणि त्याच काळात काय,४०० वर्षं पार करून आजपर्यंत ती टिकली हे शेक्सपिअर किती सार्वकालिक आहे हे सांगतं !रासवट खेळांनाच मनोरंजन समजणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या उच्च दर्जाच्या कलेने जोडून घेतलं.  काळाच्या या परिप्रेक्ष्यात शेक्सपिअरची कामगिरी अजूनच उठून दिसली! 
५ 

वरच्या काही फोटोंमध्ये स्टेजवर काही लोक व्यायाम करताना दिसले असतील. गाईडची माहिती ऐकत असताना आमचं लक्ष स्टेजवर काय चालू आहे यावर होतं. गाईडने सांगितलं की हे सगळे कलाकार ' A Mid Summer Night's Dream' या नाटकाचे कलाकार होते आणि त्याच दिवशी म्हणजे ५ ऑगस्टला दुपारी या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगाआधी हे कलाकार warm-ups करत होते. गाईडने निक्षून सांगितलं की या कलाकारांचे फोटो / व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. त्यामुळे ते जे करत होते ते शूट करता आलं नाही. पण हा warm ups प्रकार अद्भुत होता. यात आधी सर्व कलाकार शारीरिक व्यायाम करत होते आणि त्यानंतर श्वासाचे व्यायाम आणि नंतर चित्र विचित्र आवाज काढून vocal projection करत होते.त्यात जिभेच्या हालचाली आणि ओठांचे व्यायामदेखील होते.  नंतर नाटकातील प्रवेश पटापट (run through) करत होते. सर्वच कलाकारांच्या हालचालीत इतकी चपळाई आणि सहजता होती की काही काळ तर माझं गाईड काय बोलत आहे याकडे लक्षच नव्हतं. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन या कलाकारांकडे बघत होतो. Warm-ups म्हणजे नाटकासाठी फक्त शरीर तयार करणं असं नसून मनानेही प्रयोगासाठी तयार होणं यामुळे सोपं जात असावं. सर्वच कलाकारांची थिएटर प्रती असलेली निष्ठा आणि पॅशन बघून मी थक्क झालो. Warms-ups चा युट्यूब वर शोध घेत असताना मला अचानक त्यादिवशीच्या कलाकारांचा हा व्हिडिओ सापडला. यात त्यांनी एका मिनिटांत नाटकाची कथा सांगितली आहे. कलाकार वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे वाटले. काही कृष्णवर्णीय आणि एक तर भारतीय देखील होता. 
हे सगळं बघून मला डॉ श्रीराम लागू आठवले. ते Aristotle च्या वाक्याचा संदर्भ द्यायचे- An actor should be an athlete philosopher! तसंच माझ्या परिचयातील सर्व नाट्यकलाकार आणि नाट्यप्रेमी यांची देखील आवर्जून आठवण आली. कदाचित माझ्यापेक्षा त्यांना या अनुभवावर जास्त चांगल्याप्रकारे बोलता आलं असतं. 
एकंदरीत नाट्यप्रयोगाआधी होणाऱ्या warm-ups ची कल्पना या व्हिडिओतून येईल-

आमच्या टूर मधील काही वयस्कर बायका या टूरनंतर लगेचच असणाऱ्या नाटकाच्या प्रयोगाला थांबणार होत्या. मला मात्र ते शक्य नव्हतं कारण काही तासांतच आमचं परतीचं विमान होतं. मनोमन या बायकांच्या उत्साहाला सलाम केला. शेक्सपिअर आजही किती लोकांमध्ये खोलवर रुजला आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. 

                                                                                                                                                         (समाप्त) 



ता. क. : 
काहीही न ठरवता मी आमच्या इंग्लंड ट्रिपबद्दल लिहित गेलो आणि बघता बघता याचे चौदा ब्लॉग झाले. मला हे लिहिताना खूप मजा आली. ट्रिपचा अनुभव पुन्हा घेता आलाच शिवाय लिहिण्यासाठी काही गोष्टींचा खोलवर अभ्यास केला. यातून बरेच संदर्भ मिळत गेले आणि ट्रिपचा आनंद वृद्धिंगत झाला. माझा ब्लॉग वाचून काही जणांनी त्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिली. काहींनी वैयक्तिकरित्या कळवलं. काहींनी काही सूचनाही केल्या ज्याचा खूपच उपयोग झाला.  तुम्हां सगळ्यांचे मनापासून आभार ! आमचा केंब्रिजचा गाईड जॉन म्हणाला तसं -फिर मिलेंगे ! 












Saturday, 19 September 2026

आमची इंग्लंडवारी: भाग १३ : लॉर्ड्स!

(हा ब्लॉग सर्व क्रिकेटप्रेमींना स्नेहपूर्वक समर्पित!)

१ 

माझं क्रिकेट प्रेम याविषयी मी आधी लिहिलं असल्याने त्याची इथे मी पुनरावृत्ती करत नाही.(म्हणजे यात जास्त फूटेज खात नाही!) फक्त त्या ब्लॉगची लिंक इथे देतो-

https://rajeshpusalkar.blogspot.com/2024/04/blog-post_28.html 

क्रिकेटप्रेमींना क्रिकेटमध्ये असलेलं लॉर्ड्स मैदानाचं माहात्म्य वेगळं सांगायला नकोच! लंडनमध्ये जाऊन (आणि राहून) लॉर्ड्स ला न जाणं म्हणजे पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिर न बघण्यासारखंच आहे! त्यामुळे आमच्या ट्रिपमध्ये आम्ही ४ ऑगस्टची सकाळ लॉर्ड्स मैदानाच्या टूर साठी आधीच राखून ठेवली होती आणि तसं बुकिंगही केलं होतं. ही टूर एका बाजूच्या गेट (Grace Gate) पासून सुरू  होते(म्हणजेच Pavilion End पासून सुरू होऊन Nursery End ला संपते.) Pavilion end च्या बाजूला  लॉर्ड्सचं संग्रहालय आहे. ते टूर सुरू व्हायच्या आधीही बघता येतं. पण एकदा Nursery end ला गेलं की पुन्हा या बाजूला येता येत नाही. हे आमच्या बहिणीकडून आम्हांला आधीच कळलं असल्याने आम्ही टूरच्या वेळेच्या आधीच तिथे जाऊन पोचलो. टूर सकाळी ९ ला चालू होणार असल्याने त्याआधी आम्हांला आत प्रवेश मिळणं शक्यच नव्हतं ! म्हणून आम्ही प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या एका बाकावर बसलो होतो. तितक्यात एक साधारण ६५-७० वर्ष वयाची बाई धावपळ करत  जवळून गेली. जाताना तिने आम्हांला हसत हसत गुड मॉर्निंग केलंच शिवाय आम्हांला विचारलंही की आम्ही लॉर्ड्सच्या टूर साठी थांबलो आहोत का. आमच्या उत्तराची वाट न बघता ती पुढे निघूनही गेली! नंतर आम्हांला कळलं की आमच्या टूरची हीच गाईड कॅथी होती! यानंतरचा पुढचा दीड तास तिने आमचा अक्षरश: ताबाच घेतला! 

२ 

कॅथी नाजूक बांध्याची आणि नाजूक चेहरेपट्टी असलेली.. तिने पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळा स्कर्ट घातला होता. बोलायला मृदू असली तरी काही बाबतीत तिच्या बोलण्याला धार असायची- तिथे कुठेही व्हिडिओ शूटिंगला परवानगी नव्हती. तिने हा नियम ज्या No Nonsense प्रकारे सांगितला की कोणाची काय बिशाद तो तोडायची! पण बाकी ती हसतमुखाने बोलत होती.टूर साठी आलेल्या सगळ्यांची मायभूमी तिने विचारली. हे सांगायला नकोच की आमच्या टूर मध्ये आपले भारतीय लोक संख्येने जास्त होते. आम्ही धरून तिथे ९ भारतीय होते. दक्षिण आफ्रिकेहून  आलेली १ महिला होती तर एक आयर्लंडचा आणि एक ऑस्ट्रेलियन माणूस होता. याचवेळी तिने सांगितलं की ती जन्माने ऑस्ट्रेलियन आहे पण आता इथेच राहते. यामुळेच की काय तिच्या बोलण्यात कुठेही ऑस्ट्रेलियन लहजा अजिबात जाणवला नाही.  आमची ओळख आणि प्राथमिक माहिती घेणं हा भाग लॉर्ड्स (MCC Museum) संग्रहालयाच्या बाहेर असलेल्या कोरोनेशन गार्डन जवळ झाला. तिथे हा इंग्लंडचे सुप्रसिद्ध खेळाडू W. G. Grace यांचा ब्रॉन्झचा पुतळा आहे-

 

नंतर कॅथीने आम्हांला संग्रहालय बघून या आणि मग आपण पुढे जाऊ असं सांगितलं. 
संग्रहालयात क्रिकेटचा इतिहास आणि खेळात होत गेलेले बदल फोटोंसहित मांडण्यात आले आहेत. तसंच सुप्रसिद्ध खेळाडूंचे फोटो, त्यांनी वापरलेल्या बॅट्स इ. साहित्य इथे ठेवण्यात आलाय आहेत. या संग्रहालयाची एक छोटीशी झलक-
 ही सर डॉन ब्रॅडमन यांची बॅट-
 

इथे काही भारतीय लोकांना मिळालेलं मानाचं स्थान पाहून खूप बरं वाटलं-
हा रणजितसिंहजी(१८७२-१९३३)  यांचा फोटो आहे. हे टेस्ट मॅच खेळणारे पहिले भारतीय! अर्थात यांनी इंग्लंड संघाकडून टेस्ट मॅच खेळली. यांच्याच स्मरणार्थ भारतात रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा  १९३५ सालापासून घेण्यात येते. 
 
सुनील गावस्कर यांचं पोर्ट्रेट आणि त्यांनी खूपच कमी वेळा वापरलेली स्कल कॅप ! जिगरबाज गावस्कर ने खरं तर वेस्ट इंडिजच्या कर्दनकाळ गोलंदाजीचा सामना साधी टोपी वापरून किंवा कधी कधी तर कोणतीही टोपी न वापरता केला होता.
 

खालील फोटोतील उजवीकडची  दिलीप वेंगसरकर यांची बॅट-(डावीकडची विनोद कांबळीची आहे!) 
 
 

दिलीप वेंगसरकर आणि लॉर्ड्स यांचं वेगळं नातं आहे. त्यामुळे पुढेही त्याविषयी येईलच! याच फोटोत सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेला आणि त्याने २०१२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना वापरलेला शर्टही आहे. त्याचं पोर्ट्रेटही आहे-
 
काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे फोटो देखील आहेत. त्यापैकी मला आवडलेला हा सर गारफिल्ड सोबर्स आणि बॉक्सर मोहम्मद अली (कॅशियस क्ले) यांचा हा फोटो-

सोबर्सची वेस्ट इंडिजची टोपी देखील आहे. (पण हा फोटो नीट आलेला नाही!)-

 

पुढील फोटो सर्वार्थाने चांगला आहे- एक फोटो म्हणून तो आहेच कारण यात ॲक्शन फोटोग्राफी आहे. शिवाय यात या खेळाडूचं व्यक्तित्व दिसून येतं - इंग्लंडच्या मायकल ॲथरटन ने १९९४ साली जमैका इथे वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीचा धीराने आणि धैर्याने सामना केला होता तेव्हाचा हा फोटो आहे-
 
यानेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९५ साली खेळपट्टीवर साडे दहा तास टिच्चून फलंदाजी करत ४९२ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या होत्या. 
इथे एक गमतीशीर फोटो देखील बघितला. क्रिकेट सामन्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येतो. पण काही वेळा आपण कल्पना देखील करू शकणार नाही अशा गोष्टीमुळे सामना थांबवावा लागतो. २००९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यातील केंट येथील सामन्यात एका सीगल पक्ष्याने चक्क स्टंपची बेल चोचीत पकडली आणि तो उडून गेला. त्यावेळचा हा फोटो-
 

यानंतर आम्ही परत कॅथी ने सांगितलं तिथे गेलो तर तिने पुन्हा आम्हांला त्याच संग्रहालयात असलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे नेलं... 


इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी! या दोन देशांतील क्रिकेट द्वंद्वाला देखील मोठा इतिहास आहे. आणि यांच्यातील कसोटी मालिकेला ॲशेस हे नाव आहे. या मागेदेखील एक मनोरंजक कहाणी आहे. हे बऱ्याच क्रिकेटप्रेमींना माहितही असतं.  कॅथीने हीच कथा इतकी सुरेख रंगवून सांगितली की काही विचारता सोय नाही!त्यातले तपशील, बारकावे आणि त्यातील मजेशीर नाट्य तिने खुलवून सांगितलं. मात्र हे सांगताना तिला तिचं जन्माने ऑस्ट्रेलियन असणं वरचढ ठरलं असावं असं मला वाटलं. कारण ती इंग्लंडच्या विरोधात बोलत होती. तिने अलीकडच्या काळातील इंग्लंडच्या खराब कामगिरीचाही हसत हसत उल्लेख केला. तर मूळ ॲशेसची ट्रॉफी इथल्या संग्रहालयात आहे. सध्याच्या मालिकांमध्ये याच ट्रॉफीची प्रतिकृती विजेत्या संघाला दिली जाते. 
 
कोणाला या ॲशेस चा इतिहास माहित नसेल आणि तो जाणून घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी इथे देत आहे-

भारताच्या दृष्टीने लॉर्ड्स मैदानाला विशेष महत्त्व आहे. कारण याच मैदानावर १९८३ साली आपण एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. आपला विजय अत्यंत अनपेक्षित होता. कारण वेस्ट इंडिजने या आधीच्या (१९७५ आणि १९७९) दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या आणि भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोचला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज सहज जिंकणार असंच सगळ्यांना वाटलं होतं. David vs Goliath असाच हा सामना होता. पण हा विजय आपण खेचत आणला आणि एक इतिहास रचला आणि क्रिकेट विश्व कायमचं बदलून गेलं. अंतिम सामन्याचा तेव्हाचा तो थरार आणि विजय अविस्मरणीय आहे. 
कॅथीने आम्हांला १९७५ आणि १९७९ चे विजेते कोण होते...१९८३ साली कोण जिंकलं हे विचारलं. आमच्या टूर मध्ये भारतीय लोक जास्त असल्याने सगळ्यांनाच उत्तर माहित होतं. 
 
(फोटो इंटरनेटवरून साभार )
पण पुढे एकदम नाट्यमय रीतीने ती म्हणाली- "Hold your horses, Sir !" आम्हांला वाटलं की आता ही काय सांगणार! ती म्हणाली- पहिल्या तीन स्पर्धांना प्रुडेन्शिअल कंपनीने स्पॉन्सर केलं होतं. पण नंतर त्यांनी ते बंद केलं. पण या तिन्ही स्पर्धांमधील मूळ करंडक इथे विराजमान आहे. वेस्ट इंडिज आणि भारताकडे याची प्रतिकृती देण्यात आली आहे. तर या मूळ करंडकाचा हा फोटो-

यानंतर आम्ही प्रत्यक्ष पॅव्हिलियन आणि ग्राऊंड बघायला गेलो.

४ 


जे दृश्य आम्ही कितीतरी वेळा टीव्हीवर बघितलं होतं, ते आता आम्ही प्रत्यक्ष बघत होतो. आधी आम्ही तळ मजल्यावर असलेल्या Long Room मध्ये गेलो. नावाप्रमाणेच ही एक लांबुळकी मोठी खोली आहे. इथे MCC(The Marylebone Cricket Club) च्या सभासदांची बसायची जागा आहे. जेव्हा खेळ चालू असतो तेव्हा खेळाडू वरच्या 
(MCC चा लोगो) 


मजल्यावर असलेल्या ड्रेसिंग रूममधून खाली येतात आणि याच खोलीतून पुढे मैदानात जातात. परत जातानाही हाच उलटा क्रम ! भरीत भर कोणी कमी रन करून बाद झालं  तर इथून जाताना खेळाडूंवर नक्कीच त्याचे दडपण येत असणार. MCC ची स्थापना १७८७ साली उद्योगपती थॉमस लॉर्ड यांनी केली(म्हणूनच स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे) 

Long Room अशी दिसते-
 

इथे अनेक क्रिकेटपटूंचे पोर्ट्रेट्स आहेत. त्यापैकी काही -
 
व्हिव्हियन रिचर्ड्स 

रिचर्ड्स च्या पोर्ट्रेट बरोबर माझा फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही-
 

श्रीलंकेचा शैलीदार फलंदाज आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा. हा पहिला ब्रिटिश नसलेला MCC चा अध्यक्ष होता. सुमारे २०० वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या या संस्थेत हे असं प्रथमच घडलं -इति कॅथी! 

 
बिशनसिंग बेदी 

कपिलदेव 


ब्रायन लारा 
 
ग्लेन मॅकग्रा 

सध्याच्या काळातील माझे दोन अत्यंत आवडते क्रिकेट समालोचक -
 
मायकेल ॲथरटन

 
नासिर हुसेन 
दोघेही इंग्लंडकडून प्रत्येकी १०० कसोटी सामने खेळले म्हणून त्यांचे पोर्ट्रेट इथे आहेत. (तसंच अगदी अलीकडेच जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचेही एकत्रित पोर्ट्रेट लावण्यात आले आहे) 

या सर्व खेळाडूंच्या भाऊगर्दीत एका पोर्ट्रेटकडे आमचं कोणाचंही लक्ष गेलं नाही आणि म्हणूनच की काय कॅथीने अगदी आवर्जून आणि अत्यंत अभिमानाने या खेळाडूच्या पोर्ट्रेट बद्दल आम्हांला सविस्तर माहिती दिली. ती खेळाडू म्हणजे इंग्लंडची महिला क्रिकेटपटू रेचल हेहो फ्लिंट ! १९६०-१९८२ या काळात ती इंग्लंडकडून खेळली. ती १९६६-७८ या काळात कर्णधार होती आणि सहा कसोटी मालिकांमध्ये अपराजित राहिली होती. १९७३ साली झालेल्या पहिल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या इंग्लंड संघाची ती कर्णधार होती. आणखी एक विश्वविक्रम तिच्या नावावर आहे- ती पहिली महिला क्रिकेटर आहे जिने महिलांच्या कसोटी सामन्यात षटकार मारला होता. MCC या क्लबमध्ये या आधी केवळ पुरुष सभासदच होते. पण रेचल पहिल्या १० महिला सभासदांपैकी एक होती जिला MCC ने आजीवन सभासदत्व बहाल केलं. तिच्या उत्तुंग कारकिर्दीच्या सन्मानार्थ MCC ने लॉर्ड्स च्या पूर्व बाजूच्या गेटला तिचं नाव दिलं आहे. तर हीच ती रेचल हेहो फ्लिंट-

कॅथीच्या बोलण्याच्या ओघात आमच्या लक्षात आलं नाही म्हणून तिनेच परत सांगितलं -महिलांची विश्वचषक स्पर्धा(१९७३) पुरुषांच्या स्पर्धेआधी(१९७५) सुरू झाली. एकंदरीत कॅथीचा महिला क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये केला जाणारा भेदभाव हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. काही वेळा यावर बोलताना तर ती आक्रमक होत असे. 
MCC सभासदांना लॉर्ड्स मैदानाचा असा नजारा दिसतो-
 


५ 

नंतर आम्ही ड्रेसिंग रूम बघायला गेलो. या पहिल्या मजल्यावर आहेत. यजमान संघाची आणि पाहुण्या संघाची अशा दोन ड्रेसिंग रूम्स आहेत. वाटेत जातानाही काही पोर्ट्रेट्स आहेत. त्यापैकी एक- 
 
दिलीप वेंगसरकर 

दिलीप वेंगसरकरचं आणि लॉर्ड्सचं एक खास नातं आहे याचा मी आधी उल्लेख केला आहेच. १९७९, १९८२ आणि १९८६ अशा सलग तीन दौऱ्यांमध्ये त्याने लॉर्ड्स वर शतक ठोकलं आणि असा विक्रम करणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू होता. आणि आजपर्यंत त्याचा हा विक्रम अबाधित आहे. (त्याची ३ शतकं हा देखील एक विक्रमच आहे. कारण कोणत्याही परदेशी खेळाडूला इथे ३ शतकं करता आलेली नाहीत) मात्र या पोर्ट्रेट बद्दल बोलताना कॅथीने वेगळंच सांगितलं. कदाचित हे चित्र काढलं जात असताना वेंगसरकरची चिडचिड झाली असावी. तो राग त्याने त्या चित्रकारावर काढला असावा. पण चित्रकाराने देखील त्याच्यावर चित्राद्वारे 'सूड उगवला'. आणि म्हणूनच या चित्रात आकाशात काळे ढग जमलेले दाखवले आहेत, त्याचे  पॅड्स देखील अत्यंत मळलेले दिसत आहेत, त्याची चर्या एकदम गंभीर आणि रागीट  आहे. मुख्य म्हणजे चित्रात त्याच्या स्टंपची बेल निघून आलेली दाखवली आहे. 

दोन्ही ड्रेसिंग रूम मध्ये Honour Boards आहेत. बॅटिंग विभागात  एका डावात शतक आणि बॉलिंग विभागात  एका डावात कमीत कमी पाच विकेट अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं इथे लावण्यात आली आहेत. यजमानांकडून सर्वाधिक ९ शतकं (८ कसोटी आणि १ एक दिवसीय) जो रूट च्या नावावर आहेत. 

 


आणि हा परदेशी खेळाडूंचा बोर्ड. यात बऱ्याच दिग्गजांची नावं नाहीत. म्हणजेच त्यांना लॉर्ड्स वर शतक झळकावता आलं नाही. यामध्ये- सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रिकी पॉंटिंग, ब्रायन लारा,जॅक कॅलिस ही नावं घेता येतील. सुनील गावस्कर यांचं नाव बोर्डावर आहे. पण त्यांनी शतक MCC विरुद्ध शेष विश्व या सामन्यात शेष विश्व संघाकडून खेळताना केलं होतं. गंमत म्हणजे यात अजित आगरकरचं नाव आहे (२००२) तर २०२६ साली भारताच्याच यास्तिका भाटिया या महिला खेळाडूचंही शतकवीरांमध्ये नाव आहे. याबद्दल बोलताना कॅथीने पुन्हा एकदा महिला क्रिकेटला दिली जाणारी सापत्न वागणूक अधोरेखित केली. लॉर्ड्स च्या कसोटी सामन्यांच्या तब्बल १४२ वर्षांच्या इतिहासात २०२६ साली पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना झाला. त्यात भारताने विजय मिळवला. यात यास्तिका भाटिया आणि क्रांती गौड या दोघी महिला चमकल्या. 

 

आम्ही पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधून तिथल्या गॅलरी कडे जाऊ लागलो तर कॅथीने चेहऱ्यावरची रेषही न हलवता सांगितलं -"While standing in the gallery, you are requested not to remove your shirts!" हा तिचा अगदी dead-pan humour होता. त्याला संदर्भ होता २००२ साली भारताने Natwest Trophy जिंकल्यावर सौरव गांगुलीने आपला शर्ट काढून आनंद साजरा केला होता याचा! 
 

आम्ही गॅलरीत गेलो..अर्थातच शर्ट काढला नाही..आमचा फोटो मात्र काढला!
 

इथून दिसणारं मैदान-
 


नंतर आम्ही प्रेक्षक स्टँड मध्ये गेलो. तिथून दिसलेलं पॅव्हिलियन -
 

आणि ही ती सुप्रसिद्ध घंटा ! ही वाजवून कसोटी सामन्याची सुरुवात करतात. 



 
आम्ही या बाजूने समोरच्या बाजूला(Nursery end)  असलेली लॉर्ड्स ची  बहुचर्चित Media Centre ची वैशिष्ट्यपूर्ण इमारत बघत होतो. वाटेत आम्ही कॅथी ला प्रश्नही विचारत होतो. मी तिला लॉर्ड्स वरील उताराविषयी (slope ) विचारलं. पण माझ्या प्रश्नाला का कोण जाणे तिने उत्तर दिलं नाही. मीडिया सेंटरला जाताना ती म्हणाली -इथे ८४ पायऱ्या आहेत. पण लिफ्टही आहे. ज्यांना लिफ्टने जायचं आहे ते खुशाल जाऊ शकतात. मी मात्र पायऱ्या चढून जाणार आहे. आणि खरंच आजीबाई तरातरा सर्व पायऱ्या चढत गेल्या देखील! हे पाहून कोणीही लिफ्ट वापरली नाही! वर चढून गेल्यावरदेखील तिला अजिबात दम लागला नव्हता. ती तेवढ्याच उत्साहाने बोलत होती. 
सगळ्यात पहिल्यांदा दिसलेलं मीडिया सेंटर! 
१९९९ साली याचं उदघाटन झालं. एखाद्या स्पेसशिप सारखी दिसणारी ही इमारत असून ती संपूर्णतः: ऍल्युमिनिअमने बनवलेली आहे. इथे सुमारे २५० पत्रकार बसू शकतील एवढी जागा आहे. इथून ग्राउंड असं दिसतं -
 
 
इथे कॅथीने मला सांगितलं की "आता तुम्हांला उताराचा अंदाज येईल. याआधी मी मुद्दाम बोलले नव्हते कारण इथल्यासारखा दुसरीकडे कुठेच उतार कसा आहे हे तुमच्या लक्षात आलं नसतं." आणि खरंच उजवीकडून डावीकडे उतार स्पष्टपणे दिसत आहे.  

मीडिया सेंटर वरून खाली उतरलो आणि कॅथीने टूर च्या  समारोपाचं भाषण केलं. यात पुन्हा एकदा चेहरा सरळ ठेवत ती म्हणाली "इथून बाहेर पडताना एक souvenir shop आहे. दुकान आहे हे सांगणं माझं काम आहे. खरेदी करायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा!"
म्हटलं तर कॅथी आमची फक्त टूर गाईड होती. ती पाट्या टाकून देखील तिचं काम करू शकली असती. पण तिची कामाबद्दलची निष्ठा, पॅशन, तिचं क्रिकेटचं अफाट ज्ञान, तिची काही बाबतीतील आग्रही मतं, तिची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा या सगळ्यातून तिचं ठसठशीत व्यक्तिमत्त्व आमच्यासमोर उभं राहिलं. हळहळ एवढीच वाटली की तिचा फोटो काढू शकलो नाही. गोडी अपूर्णतेची!

                                                                                                                                                          (क्रमश:)