Tuesday 13 February 2018

Two: गुलजारांची फाळणीवरील कादंबरी

दोन महायुद्धांमुळे प्रामुख्याने जर्मनीमध्ये लाखोंच्या संख्येने लोकं मारली गेली. लाखोंच्या संख्येत जखमी झाली. कितीतरी मुलं अनाथ आणि बेघर झाली. संपूर्ण देश अक्षरश: बेचिराख झाला. सर्वार्थाने देश कोसळला मुख्यतः पुरुष सैनिक मारले गेले अथवा जखमी झाले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात देशात स्त्रिया आणि लहान मुलेच उरली. त्यांच्या दुःखाच्या कहाण्या काळाच्या ओघात विरून गेल्या नाहीत.अशा भीषण परिस्थितीत देखील तिथे साहित्यनिर्मिती होत राहिली. अशा साहित्याला तिथे Nachkriegsliteratur(युद्धोत्तरसाहित्य) म्हटलं जातं. तसंच दुसऱ्या महायुद्धानंतरच्या त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन  करणाऱ्या साहित्याला Trümmerliteratur (Trümmer चा अर्थ पडझड  आहे) त्या साहित्याची एक वेगळीच धाटणी आहे. भाषाशैलीही वेगळी आहे. अशा साहित्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीचंच नव्हे तर लोकांच्या मन:स्थितीचं चित्रण आणि त्या संपूर्ण काळाचं एक प्रकारे दस्तावेजीकरण झालं. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्याच वेळी देशाची फाळणीही  झाली. असं म्हटलं जातं की या फाळणीमुळे झालेल्या दंगलींमध्ये सुमारे वीस लाख लोकं  मारली गेली.(मृतांच्या नक्की आकड्याबद्दल दुमत असू शकतं) लाखो लोक विस्थापित झाले. एका राजकीय अपरिहार्यतेमुळे झालेल्या या अभूतपूर्व घटनेची किंमत सर्वसामान्य लोकांना चुकवावी लागली. युद्धात होणाऱ्या मानवी नुकसानाइतकीच या फाळणीमुळे देखील वाताहत झाली. भारतातून मुसलमान आणि पाकिस्तानातून हिंदू आणि शिखांना स्थलांतर करावं लागलं. या स्थलांतरादरम्यान अनेकांना प्राण गमवावे लागले, हाल-अपेष्टा-यातना भोगाव्या लागल्या. एका काल्पनिक रेषेच्या निर्मितीमुळे लोकांच्या आयुष्यावर कायमच्या जखमा करणारे दाहक ओरखडे उठले. कित्येकांच्या जखमा आजतागायत तशाच भळाळत्या राहिल्या. 

या सर्व परिस्थितीचं चित्रण करणारं साहित्य हिंदी, उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषांमध्ये झालं. भीष्म सहानी (तमस), सादत हसन मंटो(टोबा टेक सिंग),अमृता प्रीतम( आज आखा वारिस शाह नून ही सुप्रसिद्ध कविता तसेच पिंजर ही कादंबरी), गुलजार यांच्या 'रावीपार' या कथासंग्रहातील काही कथा, बापसी सिध्वा यांचं 'The Ice Candy Man' ही कादंबरी, 'Freedom at midnight' हे लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपिएर यांनी लिहिलेलं पुस्तक किंवा खुशवंतसिंग यांची 'Train to Pakistan' ही कादंबरी... ही या साहित्यप्रकाराची काही ठळक उदाहरणे ! 'Train to Pakistan' ची माझ्याकडे जी आवृत्ती आहे त्यात Margaret Bourke White यांनी त्यावेळी काढलेले फोटो समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यावरूनही त्यावेळच्या भीषण परिस्थितीची थोडीशी कल्पना येते. 



यापैकी बऱ्याच कलाकृतींवर सिनेमेही आले.'तमस'ची दूरदर्शन मालिकाही निघाली आणि चित्रपटही ! 'पिंजर' वरही सिनेमा आला. 'The Ice Candy Man' वर आधारित दीपा मेहता यांचा 'Earth' (आमिर खान-नंदिता दास-राहुल खन्ना) हा चित्रपट आला. या कलाकृतींव्यतिरिक्त इस्मत चुगताई यांच्या एका कथेवर 'गरम हवा' हा एम एस सथ्यू दिग्दर्शित अप्रतिम चित्रपट फाळणीच्या नंतर उद्भवलेल्या परिस्थतीवर होता. तर अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेमकथा' किंवा अलीकडेच आलेल्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटांना देखील फाळणीची पार्श्वभूमी किंवा संदर्भ होते. 

याच परंपरेत मोलाची भर घालणारी एक नवी कलाकृती वाचनात आली- गुलजार यांची कादंबरी - 'Two'! मूळ उर्दूतल्या या कादंबरीचा त्यांनीच इंग्रजीत अनुवाद केला आहे. गुलजारांचा जन्म पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातल्या दीना या गावातला. फाळणीच्या वेळी त्यांचं वय १३ होतं. त्यामुळे तशी कळत्या वयात त्यांनी फाळणीची दाहकता अनुभवली होती. 'Two' मध्ये त्याचं प्रतिबिंब छोट्या छोट्या प्रसंगांमधून, कादंबरीतल्या व्यक्तिचित्रांमधून मधून उमटतं. शब्दप्रभू आणि दृश्य माध्यमाची जाण असल्यामुळे गुलजार यांच्या लिखाणात मुळातच एक दृश्यात्मकता आहे. एखादा प्रसंग आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांना त्याचं शब्दबंबाळ वर्णन करावं लागत नाही. कादंबरी मध्ये खूप मोठं अवकाश सामावलेलं आहे. म्हणजे १९४६ च्या सुमारास कादंबरीची सुरुवात होते कॅम्पबेलपूर(म्हणजेच अटक -हो तेच रघुनाथराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा नेलेलं अटक!) या गावापासून आणि अगदी १९८४ च्या दिल्लीतल्या शीख दंगलीपर्यंत तिचा कालखंड आहे. १९४६ साली फाळणी झालेली नसली तरी त्याची चाहूल गावात लागलेली आहे. गावात एक प्रकारे अशांत, तणावाचं, अविश्वासाचं, अस्थिर आणि असुरक्षित वातावरण आहे. याने सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे. पूर्वी गुण्यागोविंदाने एकत्र राहिलेल्या लोकांमध्ये एक अनामिक भीती आणि दरी निर्माण झालेली आहे. यातल्या फौजी, लखबीरा, मास्टर करमसिंग, फजल, रायबहादूर देस राज, पन्ना, सोनी-मोनी या बहिणी, तिवारी आणि काही अनाम लोकांसारख्या वेगवेगळ्या स्तरांतल्या परंतु फाळणी या एकाच घटनेला सामोऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वभाव वैशिष्टयांची  आपल्याला ओळख होते.  या व्यक्तींमधल्या आपसातल्या संवादातून लेखकाचा फाळणीबद्दलचा  दृष्टिकोन समजतो. कालांतराने त्या गावात राहणे सुरक्षित नाही असं लक्षात आल्यावर फौजीच्या ट्रक मधून लखबीरा, देस राज आणि परिवार,पन्ना
इ. सगळे भारताच्या दिशेने निघतात. या प्रवासाचं  आणि वाटेत भेटत जाणाऱ्या लोकांचं आणि तिथल्या प्रसंगांचं गुलजारांनी एवढं प्रभावी वर्णन केलंय की काही क्षण आपणही त्या प्रवासात, त्या ट्रकमध्ये आहोत की काय असं वाटू लागतं. फाळणीची निरर्थकता आणि तरीही अपरिहार्यता, एखादे झाड मुळापासून उखडून दुसरीकडे रुजवण्यासारखी परिस्थिती या सगळ्या गोष्टी गुलजार आपल्यासमोर उभ्या करतात. सिनेदिग्दर्शक गुलजारांची एक खास शैली आहे. त्यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात त्यांनी फ्लॅशबॅक या तंत्राचा खुबीने वापर केला आहे. त्यांची ती प्रतिमा मनात ठेऊन ही कादंबरी वाचायला घेतली तर कदाचित निराशा होईल. कारण इथे ते गोष्ट एकसंधपणे सांगतात. सरळ रेषेत जाणारी ही गोष्ट मनाला आणखी भिडते.
कादंबरीच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात की त्यांना फक्त फाळणी या काळापुरतंच लिहायचं नव्हतं तर त्यावेळच्या रेफ्युजींची(इकडे आले ते शरणार्थी आणि तिकडे गेले ते मुहाजिर!) नंतर काय स्थिती झाली हे ही सांगायचं होतं. गुलजार हे सिनेदिग्दर्शक आहेत. त्यामुळे कुठल्याही व्यक्तिचित्राचा आलेख ते संपूर्णपणे मांडतात. फाळणीच्या वेळेच्या  जवळपास प्रत्येक व्यक्तिचित्राचं  पुढे काय झालं हे सांगून ते त्या व्यक्तिचित्राला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेतात. एकही धागा अर्धवट सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट अधांतरी ठेवत नाहीत. फाळणीच्या जखमा मनाच्या एका खोल कोपऱ्यात दडवून आयुष्य पुढे रेटत नेणाऱ्या काही लोकांना त्या जखमांवरची खपली ओरबाडून टाकणारी घटना १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर घडली. त्यावेळी उसळलेल्या भीषण दंगलीत वेचून वेचून शिखांना मारण्यात आलं. अगदी तसंच जसं फाळणीच्या वेळी 'तिकडे' मारण्यात आलं. फरक इतकाच की तेव्हा मारणारे 'ते' परधर्मी होते आणि यावेळी आपलेच ! 
कादंबरी मधला हा संदर्भ अस्वस्थ करतो आणि मन हेलावून टाकतो. 
महाराष्ट्राला फाळणीची झळ सोसावी लागली नाही. म्हणून कदाचित मराठीत या विषयावर साहित्य नाही. अनुवादित साहित्य मात्र आहे. 'तमस' चा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. गुलजारांच्या या नव्या कादंबरीचाही मराठीत अनुवाद व्हावा आणि ही उत्तम साहित्यकृती मराठीत वाचायला मिळावी असं वाटतं.