Thursday 3 January 2019

आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि मेलडी....

( ४ जानेवारी २०१९... संगीतकार आर डी बर्मन यांना जाऊन २५ वर्षे झाली. त्यानिमित्त लिहिलेला हा ब्लॉग)

आर डी बर्मन 

लता मंगेशकर 



असं म्हणतात की आशा भोसले यांनी कधीतरी आर डी बर्मन यांना
लटक्या रागात / तक्रारीच्या सुरात सांगितलं होतं की ते नेहमी चांगली गाणी लता मंगेशकर यांनाच देत. ही त्यांची तक्रार खरीच होती की काय असं वाटावं इतकी सुंदर गाणी आर डी साठी लता मंगेशकर यांनी म्हटली आहेत. त्यापैकीच काही गाण्यांवर आधारित हा ब्लॉग-
(इथे विस्तारभयापोटी फक्त सोलो गाण्यांचाच विचार करण्यात आला आहे !)

 १) पहिलं गाणं अर्थातच आर डी च्या पहिल्याच चित्रपटातलं- छोटे नवाब(१९६१) मधलं ! या सिनेमात लता मंगेशकर यांची २ सोलो आणि २ डुएटस आहेत. मोहम्मद रफी यांची २ सोलो आणि शिवाय एक डुएट शमशाद
बेगम बरोबर आहे. 
तरीही या सिनेमातलं एकच  गाणं अजूनही त्या सिनेमाची ओळख बनून राहिलं आहे. ते म्हणजे - 'घर आजा घिर आई बदरा सावरिया'. गंमत म्हणजे इतकं नितांतसुंदर गाणं सिनेमात नायिकेच्या (अमिता) तोंडी नाही. तर ते शीला वाझ या नर्तकीवर चित्रित करण्यात आलं आहे.

                                                                           
अर्थात या गाण्यातून नायिकेच्या मनातील काहूर आणि हुरहूर या भावना  पुरेपूर व्यक्त होतात. अतिशय गोड अशा मालगुंजी रागावर आधारित ही रचना. रूपक तालात बांधलेली. गाण्यात जयराम आचार्य यांनी सतार वाजवली आहे. त्याचबरोबर गाण्यात सारंगी आणि घुंगरांचा आवाज येतो- ज्यावरून लक्षात यावं की  हे गाणं म्हणजे मुजरा आहे. बाहेर पाऊस भरला आहे.. रात्रीची वेळ... विजा चमकत आहेत. नायिका घरी एकटीच आहे... तिला एकटीला घर खायला उठतंय !खिडकीपाशी ती पावसाचा आवाज ऐकत उभी आहे आणि तिच्या डोळयांतून देखील अश्रूंचा पाऊसच वाहत आहे... नायकाचा  विरह तिला सहन होत नाही. तो येईल याची वाट बघणंदेखील तिला असह्य होतंय. आणि नायक मात्र...
या गाण्यात 'टप टिप' या जागेवर एक नाजूकसा ठेहराव आहे जो गाण्याला एका वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवतो.
साधारणपणे आपल्याला या गाण्याची दोनच कडवी माहित आहेत. पण आणखी एक कडवं आहे (जे खरं तर पहिलं कडवं आहे)  इथे या गाण्याची लिंक देतोय त्यात ही तिन्ही कडवी समाविष्ट आहेत -
https://www.youtube.com/watch?v=_kH3dseWuAU

२) 'ओ मेरे प्यार आजा'- भूत बंगला(१९६५)
नावावरून हा सिनेमा भयपट वाटतो. तसाच तो एक विनोदी चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. यात मेहमूद बरोबर आर डी नेही काम केलं होतं. सिनेमातली 'आओ ट्विस्ट करें' (मन्ना डे ) आणि 'जागो सोनेवालों' (किशोरकुमार ) ही अतिशय गाजलेली गाणी ! पण यात लता मंगेशकरांचं हे एकमेव सोलो गाणं देखील उठून दिसतं. गाणं तनुजावर चित्रित करण्यात आलं आहे. गाणं सुरु होताना थोडासा एको इफेक्ट आहे. नंतर लताबरोबर गिटारची संगत सुरु होते ती अगदी शेवटपर्यंत ! अंतऱ्यात सूर वरच्या पट्टीत असल्यामुळे तसं हे गाणं गायला अवघडच ! ओ... मेरे... प्यार... आजा या शब्दांशी केलेला नजाकतदार खेळ खूपच छान आहे. गाण्याच्या चित्रीकरणातली   एक गोष्ट मात्र खटकते. गाण्यात तबला व्यवस्थित ऐकू येतो. मात्र पडद्यावर तबला/ तबला वादक कुठेही दिसत नाहीत ! सगळे पाश्चात्य वादक दिसतात ! गाण्याची लिंक - यात सुरुवातीला सुप्रसिद्ध निवेदक आमीन सयानी यांचं गमतीशीर निवेदनही आहे-
https://www.youtube.com/watch?v=RaPA2TLobQk


३) 'किस लिये मैंने प्यार किया'-दि ट्रेन (१९७०)

या गाण्यातही पुन्हा विरह... वाट बघणं  आहे. नायिका (नंदा) नायक (राजेश खन्ना) च्या भेटीसाठी आतुर...अधीर आहे. ती त्यासाठी साज शृंगार करून तयार आहे. कोणत्याही क्षणी तो येईल आणि ठरलेल्या भेटीचा वादा पूर्ण करेल  अशी तिला आशा आहे. पण तिचा तिलाच असाही प्रश्न पडतो -खरंच येईल ना तो? की भेट होणारच नाही ? अशा त्या काळच्या स्त्रीसुलभ भावनांवर आधारित हे गाणं. नंदासारख्या सोज्वळ नायिकेसाठी एकदम चपखल! गाण्यात दोन्ही कडव्यात दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत कोमल स्वरांच्या वापरामुळे नायिकेच्या अस्वस्थ अवस्थेचं यथार्थ दर्शन घडतं.
खरं तर 'दि ट्रेन' मध्ये 'गुलाबी आँखे जो तेरी देखी'हे रफीचं लोकप्रिय गाणं, 'मैंने दिल अभी  दिया नहीं 'हा आशा भोसले यांच्या आवाजातला कॅब्रे, 'ओ मेरी जा मैंने कहा' हे आर डी- आशा यांचं जबरदस्त गाणं, 'सैय्या रे सैय्या 'हे अरुणा इराणीवर चित्रित गाणं तसंच रफी लता यांचं डुएट असूनदेखील हे सॉफ्ट, सोज्वळ, शांत गाणं मनात घर करून राहतं.
https://www.youtube.com/watch?v=Z1nYnTWP5TY

४) 'जिया लागे मोरा ना जा'-बुढ्ढा मिल गया (१९७१)

आर डी बर्मन यांच्या मेलडीबद्दल  विचार करत असताना खमाज रागाचा उल्लेख न करणं हे अगदीच अशक्य !  हे गाणं खमाज रागावर आहे. याच सिनेमात 'आयो कहा से घनश्याम' हे मन्ना डे यांच्या आवाजातलं खमाज रागावर आधारित आणखी एक गाणं आहे. शिवाय सिनेमातली ' भली भली सी एक सूरत' (किशोर-आशा) आणि 'रातकली एक ख्वाब में' (किशोरकुमार) ही गाणी देखील सुप्रसिद्ध आहेतच ! पण या गाण्यांमध्ये देखील लताचं हे सोलो गाणं लक्षात राहतं. थोडीशी ठुमरी किंवा उपशास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारी चाल... त्यातही 'ना' या शब्दाशी केलेल्या लडिवाळ हरकती... गाण्यातले आलाप आणि पुन्हा एकदा सूक्ष्मसा ठेहराव ! सगळंच मोहक !
गाण्याची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=9zxjUNb56ZI

लता मंगेशकर आणि आर डी बर्मन 


५) 'रैना बीती जाये' -अमर प्रेम (१९७२)
तथाकथित बदनाम वस्तीतून दारू पिऊन अडखळत पावलं टाकत जाणारा नायक(राजेश खन्ना) ... आणि अशा ठिकाणी  त्याला अचानक आर्त आवाजातली जीवघेणी तान ऐकू येते. त्या आवाजाचा मागोवा घेत नकळत तो नायिकेसमोर(शर्मिला टागोर) जाऊन पोचतो आणि त्याच्या येण्यामुळे बंद झालेलं गाणं परत सुरु करण्याची तिला विनंती करतो. नायक आणि नायिकेची ही पहिलीच भेट! तिच्या आवाजातली शुद्धता, पावित्र्य त्याला भुरळ घालते आणि इथेच त्या दोघांच्या वेगळ्या प्रेमकथेची सुरुवात होते. सिनेमातल्या अशा प्रसंगासाठी आर डी ने दिलेलं 'रैना बीती जाये' हे अजरामर गाणं ! गाण्याची पहिली ओळ तोडी रागात आणि दुसरी ओळ खमाज रागात( आणि पुढे अंतऱ्यात पुन्हा खमाज) अशी ही रचना ! तबला, संतूर, गिटार, तार शहनाई आणि अर्थातच बासरी अशा मोजक्या वाद्यांचा वापर या गाण्यात आहे. गाण्यात 'निंदिया ना आये' किंवा 'शाम ना आये' मधल्या 'आये' वर लता मंगेशकरांनी घेतलेल्या जागा अफाट आहेत. 'अमर प्रेम' सिनेमात किशोरकुमार यांची ३ सोलो गाणी आहेत. (यातही 'कुछ तो लोग कहेंगे' हे खमाज रागावर आधारित गाणं आहेच !) एस. डी. बर्मन यांचंही एक सोलो गाणं आहे. लता मंगेशकर यांचं आणखी एक सोलो (बडा नटखट है रे- पुन्हा खमाज !) आहे. पण 'रैना बीती जाये' हे गाणं एका वेगळ्याच पातळीवरचं ! देवघरात शांतपणे तेवणाऱ्या समईसारखं!
गाण्याची लिंक -
( तीन कडवी असलेल्या गाण्याचा मूळ व्हिडिओ युट्यूबवर सापडला नाही त्यामुळे या lyrical video वर समाधान मानावे लागत आहे)

६) 'शर्म आती है मगर'- पडोसन(१९६८)
'पडोसन' हा आऊट अँड आऊट कॉमेडी सिनेमा ! फुल्ल टू धमाल ! या सिनेमातल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे किस्सेही तसे सुप्रसिद्ध! किशोरकुमार यांच्या नेतृत्वाखाली मेहमूद, आर डी आणि गीतकार राजिंदर कृष्ण यांनी सेटवरच improvisation करून 'मेरी प्यारी बिंदू' हे गाणं तयार केलं. किशोरकुमार आणि मन्ना डे यांची जुगलबंदी असलेलं 'एक चतुर नार' हे गाणं काय ... एकूण सिनेमाचा मूडच वेगळा ! या मूडला साजेशी हलकीफुलकी, खट्याळ गाणी सिनेमात आहेतच. 'शर्म आती है'शिवाय लता मंगेशकर यांनी गायलेली आणखी  दोन गाणी सिनेमात आहेत. 'मैं चली मैं चली'(आशा भोसले यांच्यासह) आणि 'भाई बत्तूर  अब जायेंगे कितनी दूर' ही ती  दोन गाणी. या दोन्ही गाण्यांमध्ये एक अल्लडपणा आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीच्या भावविश्वाचं वर्णन यात आहे. त्या मूडप्रमाणे लता मंगेशकरांनी ही गायली आहेत (आठवून पाहा - 'मैं चली' मधला 'ली' म्हणतानाचा त्यांचा आवाज किंवा 'भाई बत्तूर' मधले आलाप!)  पण 'शर्म आती है' हे गाणं लता मंगेशकरांनी वेगळ्या प्रकारे म्हटलं आहे. हे गाणं  एखाद्या कोरीव लेण्याइतकं सुंदर आहे. अभोगी कानडा रागावर आधारित! या गाण्यात एक स्त्रीसुलभ लज्जा आहे, एक शालीनता आहे, एक अदब आहे. सुरुवातीलाच त्यात एक सॉफ्टनेस आहे. प्रेमात आकंठ बुडलेल्या मुलीमध्ये झालेला बदल... तिच्यातला समजुतदारपणा हा या गझल मधून व्यक्त होतो. अवखळ अल्लडपणा ते 
समजुतदारपणा हा नायिकेचा प्रवास या तीन गाण्यांमधून लता  मंगेशकर यांनी सुंदररीत्या सादर केला आहे. म्हणूनच हे गाणं सिनेमात मिसफिट वाटत नाही. तसंच संगीतकार म्हणून आर डी बर्मन कथानकावर किती विचार करत असे याचं हा सिनेमा एक उत्तम उदाहरण आहे.. 

या गाण्याची जादू बराच काळ रेंगाळत राहते. माझ्यामते आर डी बर्मनच्या सर्वोत्तम दहा गाण्यात याचा समावेश नक्कीच करता येईल. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. बकुळीच्या फुलांच्या मंद सुवासाप्रमाणे या गाण्याचा दरवळ तुम्हांला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचत घेऊन जातो... आणि हा दरवळ मनात कायम राहतो.
गाण्याची लिंक -
https://www.youtube.com/watch?v=qqzrRjKksmA 

आर डी आणि लता मंगेशकर यांची  १९६१ ते १९७२ या कालावधीमधली ही काही मधुर गाणी ! याच काळातली आणि कदाचित नंतरचीही काही गाणी असतील. त्यावर पुन्हा कधीतरी ! 

( याचा पुढचा भाग मी लिहिला आहे. त्याची लिंक इथे पोस्ट करत आहे-

6 comments:

Anonymous said...

चांगला अभ्यास करून लिहीला आहे...

Mugdha said...

Very well studied and articulated. Awaiting the next one where we'll get to read more about the combination of RD and Lata Mangeshkarji.... There are very good and melodious ones...

Amit Medhekar said...

अप्रतिम डॉक्टर!
तुमचे लिखाण अत्यंत अचूक असते...तुम्ही बॉलिवूड मधील अनेक स्तंभलिखाण सहज करू शकाल!

Shreepad SM Gandhi said...

अप्रतिम!!!
पंचमबद्दल अजून काही माहिती मिळाली...
आता आपल्याला पंचमची ब-यापैकी माहिती आहे असं वाटलं की असा काहीतरी लेख वाचनात येऊन धाडकन् जमिनीवर आल्याची वस्तुस्थिती ज्ञात होते, त्यामुळेच गेली तीन साडेतीन वर्षे असा विचार करणं पूर्णपणे सोडून दिलं आहे...असो...
सज्जाद हुसेन हा समाधान करण्यासाठी किती कठीण होता हे ज्यांना हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाबद्दल माहितीये किंवा ज्यांनी वाचलंय त्यांना पूर्णपणे माहिती असेल. अशा फटकळ तोंडाच्या पण अद्वितीय फनकाराला पण रैना बीती जाए ऐकून म्हणावसं वाटलं "रैना बीती जाए आणि मेघा छाए आधी रात या गाण्यांसाठी लताचा आवाज जसा वापरला गेलाय तसा या आधी कुणीच वापरला नाहीये..."
सज्जाद यांच्या या मताबद्दल नक्कीच चर्चा होऊ शकते...पण या "सर्टिफिकेट" ला पण महत्त्व आहे हे सज्जाद यांच्या प्रतिभेमुळे नाकारलं जाऊ शकत नाही...
राजेश, तुझ्या या लेखात लता पंचम यांचा संयुक्त उल्लेख असल्यामुळेच अजून एक टिप्पणी करू इच्छितो.
१९४२-अ लव्ह स्टोरी यांतल्या लताबाईंच्या आवाजातल्या "कुछ ना कहो" पेक्षा अलिकडेच प्रसिद्धीला आलेल्या कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातील "कुछ ना कहो" जास्त हॉंटिंग आहे.
लताबाईंबद्दल मला किती आदर आहे हे तू जाणतोसच.
बाई आज असं म्हणाल्याचं रेडीफवर वाचलं की "मला परत गायची इच्छा आहे."
ईश्वराने त्यांची ही मनीषा पूर्ण करावी अशीच प्रार्थना मी पण करेन...धन्यवाद.

Hrishikesh Badve said...

खूप छान आणि अभ्यासपूर्ण लिखाण. ज्याप्रमाणे एकाच संगीतकाराची अनेक गाणी इथे विस्तीर्ण केली आहेत, त्याप्रमाणे एकच गाणं घेऊन त्यावर लिखाण तुमच्याकडून वाचायला मिळाले तर ... एक नम्र फर्माईश...

Unknown said...

काही दिवसांपूर्वी 12 string guitar (मी याला फक्त माझ्या पुरतं म्हणून 'बारतारी' असं नांव ठेवलं आहे...:):) 😇
तर हे गिटार हाताळायचा योग आला. बारा तारांचं हे गिटार जशा पद्धतीने ट्यून करतात ते अगदी समजून घेण्यासारखं आहे. असो. तर यासाठी उत्सुकता होती की पंचमच्या गाण्यात हे अप्रतिम वापरलं आहे. चुरा लियाचा इंट्रो, सागर जैसी आँखोवालीचा इंट्रो, तेरे बिना जिया जाएना चा इंट्रो आणि पहिल्या कडव्यातल्या ...बदनसे खुशबू आए या शब्दांनंतर वाजलेला एक छोटा तुकडा ही आत्ता आठवलेली उदाहरणे... मला इतर कोणाही संगीतकाराने 12 string गिटार वापरलेले ऐकण्यात आले नाही. कुठल्या गाण्यात असल्यास मला माहिती करून घ्यायला नक्की खरंच आवडेल.
शंकर महादेवन आणि इलया राजा हे दोघे माझा पोपट करतील अशी आशा आहे. त्यांनी वापरले असावे अशी अपेक्षा आहे. पण आज तरी मला माहिती नाही.
फारच वेगळा साऊंड येतो या वाद्याचा.
तसं ट्यूनिंग मध्ये नेहमीच्या गिटार पेक्षा कुठलेही वेगळे सूर नाहीत. पण तरीही भन्नाट आहे खरं.
इंग्रजी गाणी मात्र भ...र...पू...र आहेत. सगळ्यांना माहिती असलेलं Hotel California हे उत्तम उदाहरण आहे. त्याचा इंट्रो हा जवळजवळ संपूर्ण पणे 12 string guitar वरच आहे.
अजून एक पंचम वैशिष्ट्य... असं मी २०२४ च्या ४ जानेवारीची आठवण ठेवणार यापुढे...
.
From Shreepad Gandhi