Saturday 25 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे !(भाग ३)

 

पुण्यात क्रीडा संस्कृती चांगली रुळली आहे. क्रिकेट सोडून बाकीच्या खेळांसाठी देखील सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पुण्याची हवा अजून तरी तशी बरी असल्यामुळे सर्वसाधारण पुणेकर सकाळच्या वेळी व्यायामासाठी टेकड्या, बागा, जिम गाठतो. उत्साही लोक मॅरेथॉन सारख्या क्रीडाप्रकारात सहभागी होतात. पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे तिथे नियमितपणे जाणारे हजारो लोक आहेत. पुण्यात २०१० साली कॉमनवेल्थ युथ गेम्स भरवण्यात आल्या. त्या नंतर वेगळ्याच कारणाने गाजल्या. परंतु पुण्यात या आणि आधीदेखील  स्पर्धा झाल्यामुळे खेळांसाठीचे इन्फ्रास्टक्चर चांगलं उभं राहिलं आहे. आता यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे किती खेळाडू निर्माण झाले हा एक वेगळा विषय आहे. पण पुणेकरांना खेळात रुची आहे एवढं नक्की! म्हणूनच जागोजागी खेळांविषयक भित्तीचित्रं. बोर्ड्स, पुतळे दिसून येतात. उदाहरणार्थ हे नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ आहे-

 
यातला संदेश विचार करायला लावणारा आहे हे नक्की!
 

 
वरील भित्तीचित्रं अप्सरा टॉकीज ते मार्केटयार्ड या नव्याने बांधलेल्या फ्लायओव्हर खाली बघायला मिळतात. 



 

तर हे आणि असेच लक्षवेधक बोर्ड राजाराम पुलावर पाहायला मिळतात. सॅलिसबरी पार्क येथील गुल पूनावाला उद्यानाबाहेर तर सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांचे पुतळे नुकतेच बसवण्यात आले आहेत. तसंच त्या पुतळ्यांखाली त्या त्या आसनाची माहितीही देण्यात आली आहे-


 

 


आपण सायकलिंग करत असताना एक रस्ता पकडतो पण ऐनवेळी आपल्याला दुसराच कुठलातरी रस्ता खुणावतो आणि आपण आपली ठरवलेली वाट सोडून देतो. मात्र हा नवीन रस्ताही तेवढाच इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग असतो. असंच काहीसं माझं या सध्याच्या ब्लॉग्स विषयी झालं आहे. आत्तापर्यंत जे काही फोटो पोस्ट करून झाले आहेत त्यापेक्षा आता  काहीतरी वेगळं सुचतंय. आणि जे सुचतंय ते सगळं फोटोंमधून व्यक्त होईल का नाही याबद्दल मला थोडीशी शंका आहे. त्यामुळे यापुढे  कदाचित थोडे कमी फोटो आणि जास्त लिखाण असं होईल असं दिसतंय ! 
कारण मला पुण्यातील फक्त सुशोभित चौक किंवा जागोजागीचे म्युरल यांचे फोटो दाखवून थांबायचं नाही. 
आपण असं म्हणू शकतो की यापुढे मला सायकलिंग करताना पुण्याबद्दल आलेले विचार शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणार आहे. 
 

ही आमच्या पुण्याची सुप्रसिद्ध मुठा नदी ! हा फोटो मी भिडे पुलावरून काढला आहे. कोणाला हे डबकं वाटेल म्हणून मी म्हात्रे पुलावरून आणखी एक फोटो काढला आहे ज्यात नदीचं खळाळतं(!) पाणी दिसतंय-
 

खरं तर कुठलीही नदी ही निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक असते जिच्यात एक स्वतंत्र परिसंस्था सामावलेली असते आणि तिचा प्रवाहही नैसर्गिक असतो. पण अलीकडच्या अनेक नद्यांप्रमाणे आमच्या या नदीला स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यात पाणी कधी आणि किती 'सोडायचं' हे वरून ठरतं. वरून म्हणजे खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाण्याच्या साठ्यावरून ! म्हणजे पर्यायाने तिचं नियंत्रण वा तिची सूत्रं पाटबंधारे विभागाकडे असतात. पुण्यात नदी अशीच असायची हे आता पुणेकरांनी नाईलाजाने का असेना पण स्वीकारलं आहे. पुणेकरांसाठी या नदीचे महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे -
१) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन ( तेही पाटबंधारे खात्याने पाणी सोडल्यावर !) 
२) जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा - राजापूरची गंगा हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो आणि म्हणून ती जेव्हा अवतरते तेव्हा तिचं लोकांना काय ते अप्रूप असतं ! आम्हां पुणेकरांसाठी तितकाच कौतुकाचा भाग म्हणजे वर्षातले ३-४ दिवस जेव्हा आमच्या या नदीला पूर येतो ! सगळ्यात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि या पुराच्या अलौकिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि हे विहंगम दृश्य कॅमेराबंद करण्यासाठी उत्साही पुणेकर लकडी पुलावर गर्दी करतात !
३) वरील दोन्ही फायदे हे सीझनल झाले. पण बारमाही फायदा एकच - नदीत  निर्माल्य टाकणे ! पुणेकर बहुदा क्राईम पॅट्रोल कार्यक्रम जास्त बघत नसावेत. नाहीतर हेच बघाना -
 

 

-हे असे पुरावे मागे ठेवले असते का पुणेकरांनी? की  आपण असं म्हणू या - पुणेकर किती पर्यावरणप्रेमी आहेत ! निर्माल्य (bio degradable!) नदीत टाकतात पण चुकूनसुद्धा प्लास्टिक नदीत टाकत नाहीत ! 

आमच्या या नदीमुळेच पुण्याचं एक unsaid विभाजन झालं आहे-  नदीच्या अलीकडंच आणि नदीच्या पलीकडचं पुणे ! या दोन पुण्यांना जोडणारे अनेक पूल आहेत- लकडी, म्हात्रे, संगम, गाडगीळ, भिडे, झेड ब्रिज इ. पण आम्हां नदीच्या अलीकडे राहणाऱ्यांना उगीचच वाटतं की पलीकडच्यांना नदी ओलांडून इथे यायला फारसं आवडत नाही. अर्थात याला अपवाद आहेत- सणासुदीच्या काळात, विशेषतः गौरी-गणपती, नवरात्र-दसरा आणि दिवाळीत  मात्र सगळं पुणं, ज्याला आम्ही गावात म्हणतो, तिथे खरेदीसाठी लोटतं. आणि हे नदीच्या पलीकडचं पुणं म्हणजे तरी काय- बहुतांश शनिवार, बुधवार,  नारायण, सदाशिव, नवी  या पेठांमधल्या लोकांनी स्थानिक स्थलांतर करून कोथरूड नावाचं उपनगर वसवलं ते! पूर्वी नदीकाठालगत मनुष्य वस्ती होते आणि त्यातूनच संस्कृती उगम पावते असं म्हटलं जायचं. पुण्यात औद्योगिकरणानंतर टाटा- बजाज आणि अम्युनिशन फॅक्टरीमुले एक श्रमिक संस्कृती निर्माण झाली. नंतर आय टी क्षेत्रातही पुण्याने आघाडी घेतल्यावर नदीच्या पलीकडे हिंजवडी आणि या बाजूला खराडी -मगरपट्टा सिटी हे भाग विकसित झाले आणि त्यांच्या आजूबाजूला पुणे विकसित होत गेले आणि शहराचा चौफेर विस्तार झाला. आता पुण्याच्या सीमा इतक्या दूरवर गेल्या आहेत की पुणे आणि मुंबई मिळून एक शहर होईल की काय असं वाटतंय ! पेठांमधून स्थानिक स्थलांतर केलेल्यांच्या पुढच्या पिढीने तर देशाच्या सीमा ओलांडल्या आणि बहुतांश उच्चभ्रू घरांमधली मुलं अमेरिका-कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड, मध्य-पूर्वेतील देश इत्यादी ठिकाणी  greener pasture साठी गेली. आणि इथे मागे राहिले आधीच्या पिढीतले ! पुणे पुन्हा एकदा पेन्शनरांचे शहर ओळखले जाऊ लागले असं म्हणत असतानाच दुसरीकडे विदर्भ-मराठवाडा आणि परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण पिढी शिक्षण आणि नॊकरीच्या शोधार्थ इथे आली. पुणेकरांच्या हेकेखोर स्वभावाबद्दल खूपदा बोललं जातं. पण पुण्यात आलेल्या या सर्वांना  पुणेकरांनी संपूर्णपणे सामावून घेतलं आहे. इतकं की हे सगळेच पुण्यात चांगलेच मिसळून गेले आहेत. त्यामुळे पुणे एक तरुण, उत्साही शहर बनले आहे. तसंच चांगल्या संधीसाठी जे  पुण्याबाहेर गेले आहेत त्यांनादेखील पुणे मनातल्या कप्प्यातून आपल्याबरोबर त्या त्या ठिकाणी नेलं आहे. अशाप्रकारेदेखील पुण्याचा विस्तारच झाला आहे असं म्हणता येईल! 
                                                                                                                                                    (क्रमश:)









Thursday 23 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे!(भाग २)

 व्हॉट्सॲपवर नियमितपणे पुणेकरांवर विनोद फिरत असतात. बाकीच्यांचं माहित नाही पण मी हे विनोद अगदी मनापासून एन्जॉय करतो. असे विनोद तयार करणाऱ्यांची विनोदबुद्धी आणि कल्पनाशक्तीला दाद दिलीच पाहिजे! हे विनोद सारखे येत राहतात यावरूनच लक्षात येतं की अशा गोष्टींमुळे आम्हां पुणेकरांची अस्मिता वगैरे काही दुखावली बिखावली जात नाही. नाहीत केवळ हे विनोद बंद करण्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले असते. पुणेकरांच्या स्वभावात तो थोडासा quirkiness आहेच आणि तोच विनोदाचा विषय होतो. आमच्या शहराची काही वैशिष्ट्यं आहेत (जी आता सर्वज्ञात आहेत!)  आणि पुणेकरांचा एक गुणधर्म  आहे. या सगळ्याच्या मिश्रणातून आमच्या पुण्याचा एक स्वभाव झाला आहे. पुण्यावर प्रेम करणं (अंगभूत गुण -दोषांसकट) हा याच स्वभावातला महत्त्वाचा भाग! हे पुणे प्रेम आम्हांला मिरवायला आवडतं. हाही आमच्या अॅटिट्यूडचा भाग आहे म्हणा ना! याच पुणे प्रेमाच्या खुणा पुण्यात ठळकपणे दिसतात. 

 
हे महर्षीनगर येथील एका नाल्यावर बघायला मिळालं.  
तर हे सातारा रोडवर आमच्या अगदी घराजवळ -
 

याचं लोण  इतकं पसरलं आहे की I love Taljai असंही आहे.( त्याचा फोटो नाही कारण तिथे मी सायकलवर गेलेलो नाही ) इथपर्यंत ठीक आहे कारण तळजाई टेकडी खरोखरच आवडण्यासारखी आहे. 
पण -
 

आता स्वारगेट मध्ये आवडण्यासारखं काय आहे? 
इतकंच काय -
 

-हे असं सुद्धा आहे! 

काही चौकांमधल्या सुशोभीकरणावरून लगेच लक्षात येतं की या भागाचं वैशिष्ट्य काय आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे-
 

नाना पेठ या भागात दुचाकी वाहनांच्या स्पेअर पार्ट्सची दुकानं आहेत हे यावरून सहज ओळखू येतं. 

सार्वजनिक गणेशोत्सव आणि पुणे याचं एक अतूट नातं आहे. पुण्यातील गणेशोत्सव आणि सार्वजनिक मंडळांचा एक वैभवशाली इतिहास आहे. गणेशोत्सव आणि अलीकडच्या काळात नवरात्रोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेतले महत्त्वाचे मानबिंदू ! हेच अधोरेखित करणारी ही चित्र सारसबागेसमोर-
 

 

गुडलक चौक, डेक्कन जिमखाना येथील काही पुतळे अगदी नजरेत भरणारे आहेत. पण मला माहित नाही किती जणांनी ते निरखून पाहिले आहेत-
 




 

याच गुडलक चौकात गुडलक हॉटेलच्या डावीकडे हे सुंदर म्युरल आहे- 
 

या फोटोकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की या म्युरल पुढे कुठल्यातरी वायरी लटकत आहेत. त्यामुळे रंगाचा अगदी बेरंग झाला आहे. मला या म्यूरलचं नाव कलाकार कट्टा का ठेवलं आहे हे कळलं नाही. म्हणजे इथे काही कलाकृती सादर होणं अपेक्षित आहे का? तसं ते अवघडच आहे म्हणा कारण इतक्या वाहत्या रस्त्यावर कुठलाही लाईव्ह परफॉर्मन्स सादर होणं मुश्किलच ! 
पुण्यातल्या अशाच आणखी काही वेधक गोष्टींचा सायकलवर जाता येता फोटोंद्वारे घेतलेला मागोवा पुढील ब्लॉगमध्ये...                                                                                                                          (क्रमश:)


















Tuesday 21 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे ! (भाग १)


आपण आपापल्या वाहनांनी खरं तर रोजच कामाच्या ठिकाणी जात असतो किंवा शहरात आणखी काही निमित्तांनी फिरत असतो. या प्रवासांत आपलं आजूबाजूला फारसं लक्ष जातंच असं नाही. कारण आपल्याला इच्छित ठिकाणी पोचायची खूप घाई असते आणि शहरात वाहतूकही एवढी वाढली आहे की आपलं सगळं लक्ष त्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्यात लागतं. शिवाय आपल्या गाडीचा वेगही असल्यामुळे शहर झपकन मागे पडत जातं. त्या तुलनेत आपण जर सायकल चालवत असलो तर मग आपल्याकडे तसा निवांत वेळ असतो आणि मग जेव्हा आपण इकडे तिकडे बघत पाय मारत जातो तेव्हा आपल्याच शहराची आपल्याला नव्याने ओळख होऊ लागते. 
सध्या मी नियमितपणे सायकलिंग करत आहे. हा माझ्या सध्याचा छंद आहे असं म्हणा ना ! या सायकलिंगचा छंद आणि माझी सध्या मागे पडलेली आवड म्हणजेच फोटोग्राफी-यांची सांगड घालत मी आमच्या पुण्याचे काही फोटो काढले आहेत. त्याचाच हा फोटो ब्लॉग! अर्थात हे करत असताना मी काही बंधनं स्वतः वर घालून घेतली. ती म्हणजे -
१) फोटो काढण्यासाठी सायकलवरून उतरायचं नाही. 
२) सायकलिंग करत असतानाच फोटो काढायचे. म्हणजे सकाळच्याच  वेळचे सगळे फोटो असणार. आणि असंही नाही करायचं की दिवसा कधीही त्या त्या ठिकाणचे फोटो दुचाकीवरून जाऊन काढायचे. 
३) फोटो फक्त मोबाईलवरील कॅमेऱ्यानेच काढायचे. कुठलाही इतर कॅमेरा वापरायचा नाही. 
या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे सायकलिंग करणं/व्यायाम करणं यात फारसा खंड पडू द्यायचा नाही. नाहीतर सायकलिंग बाजूला/मागे पडायचं आणि फोटो काढणंच मुख्य काम होऊन बसायचं !
४) मोबाईल कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंचं फारसं एडिटिंग करायचं नाही. या मुळे कदाचित फोटोंची गुणवत्ता तितकीशी चांगली नसेल. 
मला माहित नाही हा उपक्रम कसा स्वीकारला जाऊ शकेल. पण जर अशाच प्रकारे कोणाला सायकलिंगची वा  मोबाईल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली वा अशी आवड असलेल्या उत्साही लोकांनी असेच फोटो शेअर केले तर केवळ पुण्याचेच नाही इतरही अनेक शहरांचे आणि गावांचे फोटो डॉक्युमेंटेशन करता येऊ शकेल ! 
मला वाटतं  नमनांचं इतकं तेल पुरे झालं आणि मुख्य विषयाकडे वळतो! 
पुण्यात बऱ्याच ठिकाणी भित्तीचित्रं बघायला मिळतात. त्यात काहीवेळा स्वछतेचे संदेश  दिलेले असतात. तर काहीवेळा पर्यावरणविषयक  करणारे संदेश असतात तर काहीवेळा उपदेशपर संदेशही असतात !


वरील  चित्रं ही आमच्या सोसायटीच्या सीमाभिंतींवरील आहेत. या चित्रांच्या जवळून मी शेकडो वेळा गेलो असें. पण माझं या चित्रांकडे लक्षच गेलं नव्हतं. पण आता बघितल्यावर वाटतं की चित्र सुरेख काढली आहेत आणि मुख्य म्हणजे ती पानांच्या पिचकाऱ्यांपासून बऱ्यापैकी सुरक्षित राहिली आहेत !
पुण्यात आता जागोजागी फ्लायओव्हर झाले आहेत आणि त्यांच्या भिंतींवर काही ठिकाणी आकर्षक चित्रं बघायला मिळतात. उदाहरणार्थ लक्ष्मीनारायण थिएटर जवळील फ्लायओव्हर खाली हे चित्र आहे-

पुण्याचा केवळ गौरवशाली इतिहासच नव्हे तर याच ठिकाणी उद्याच्या पुण्याचं चित्रही रंगवण्यात आलं आहे-
 

पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आहे, पुणे हे भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्यालय आहे. पुण्यात AFMC आहे, ASPT आहे, दापोडी येथे College of Military Engineering आहे. खडकीला Ammunition factory आहे. पुण्यात DRDO आहे. थोडक्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं पुणे हे एक केंद्र आहे.  पुण्याचं हे महत्त्व अधोरेखित करणारा  गोळीबार मैदानाच्या अलीकडच्या चौकातला हा दिमाखदार 
T-55 रणगाडा -

 
 

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केले होते. पुण्यातील एका  नगरसेवकाने लगेचच त्याचे सुशोभित चित्र शास्त्री रोडवर लावले जे आजही लक्षवेधक ठरत आहे-
 

याच शास्त्री रोडवर लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. तिथला चौक सुशोभित करून त्यावर शास्त्रीजींचा सुप्रसिद्ध नारा- 'जय जवान जय किसान' कोरण्यात आला आहे -


सायकलवरून काढलेल्या पुण्याच्या अशाच काही फोटोंवर आधारित आणखी काही ब्लॉग लिहिण्याचा विचार आहे. तेव्हा या ब्लॉगपुरतं आत्ता इथेच थांबतो ! 
                                                                                                                                                        (क्रमश:)