Saturday 21 December 2013

मोहम्मद रफी २ : हुई शाम उनका खयाल आ गया . . .













संध्याकाळची वेळ . .  हुरहूर लावणारी . . . दिवस कसातरी कामाच्या व्यापात गेल्यावर येते ती संध्याकाळ ! गुलाम अली-आशा भोसले यांच्या गझल मधले काही शब्द उसने घेतले तर-  
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा 
 जब दीवारो से धूप ढली . . . 
 तुम याद आये . . तुम याद आये । 
तर अशा व्याकूळ आठवणींची ती संध्याकाळ ! विरह, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्य, नात्यांमधले गैरसमज या सगळ्यामुळे विचारात बुडायला लावणाऱ्या संध्याकाळी साथ देते मदिरा आणि मग त्या दु :खाला आणखी गहिरेपण प्राप्त होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग अनेक वेळा दाखवण्यात येतात. अनेक गायकांनी अशी गाणी गायली आहेत. पण यातच आणखी थोडी वर्गवारी केली तर? मोहम्मद रफी यांनी गायलेली, संध्याकाळ -रात्र या समयातील,  तिची आठवण आणि त्याने होणारा त्रास हा विषय असलेली ही तीन गाणी आहेत. या गाण्यात आणखी एक सांगीतिक समान धागा आहे-जो तुम्ही ओळखायचा आहे! माझ्या आवडीप्रमाणे मी यांचा क्रम लावला आहे. तो तुम्हाला मान्य असेलच असे नाही.

१) हुई शाम उनका खयाल आ गया- चित्रपट मेरे हमदम मेरे दोस्त 
संगीतकार लक्ष्मीकांत -प्यारेलाल जोडीच्या कुठल्याही १० सर्वोत्तम गाण्यांमध्ये हे गाणे यावं  अशा पात्रतेचं हे गाणं. मी तर पुढे जाउन म्हणेन की त्यांनी जर फक्त हे एकच गाणे केले असते तरी ते महान संगीतकार ठरले असते. या गाण्यात 'सवाल'  ''मलाल' 'चाल' या शब्दांवर मोहम्मद रफींनी अशी काही करामत केली आहे की बस्स! मजरूह सुलतानपुरी यांची ही गझल मनाला खोल जाउन भिडते. त्यामुळे या गाण्यातला तो तकलुपी सेट, फर्निचरची भीषण रंगसंगती काही खटकत नाही.



२) है दुनिया उसीकी जमाना उसीका -चित्रपट काश्मीर की कली 
या सिनेमातल्या इतर हलक्याफुलक्या,उडत्या ठेक्याच्या गाण्यांमध्ये देखील हे गाणे आपली वेगळी छाप पाडून जातं. ओ. पी. नय्यर यांच्या टिपिकल टांगा ह्रिदम पेक्षा संपूर्णपणे वेगळं असं हे  गाणं. शम्मीकपूरला रफीचा आवाज का suit व्हायचा याच्या कितीतरी खुणा या गाण्यात दिसतील.

https://youtu.be/WO_aMRsEIIY

३) दिन ढाल जाये रात न जाये- चित्रपट गाईड 
या  एस डी च्या गाण्यातील पहिले काही शब्द त्याच चालीत त्यांचा सुपुत्र आर डी यांना 'किनारा' चित्रपटातील 'अब के ना सावन बरसे' यात वापरावेसे वाटले म्हणजे या मूळ गाण्याचे माहात्म्य लक्षात यावे. यात interlude मधल्या काही तुकड्यांमध्ये वीणा वापरलंय की ती गिटार आहे ?
https://youtu.be/HrbzfLFj6Es

(Disclaimer : एक डॉक्टर या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की ही गाणी पोस्ट करून किंवा त्याबद्दल लिहून मी कुठल्याही प्रकारे दारू पिण्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण करू इच्छित नाही !)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)

Friday 20 December 2013

मोहम्मद रफी

हिंदी सिनेमांत असा प्रसंग अनेक वेळा बघायला मिळतो . अर्थात मी आमच्या वेळच्या सिनेमांबद्दल बोलतोय.(म्हणजे अगदी इसवीसनापूर्वी नव्हे पण तरीही त्या मानाने जुन्याच!)  सध्याच्या नाही. म्हणजे असं असतं की कोणाच्या (हिरोईन किंवा तिची मैत्रीण) तरी घरी पार्टी असते .छान वातावरण असतं. अर्थातच पार्टीला साजेसे कपडे असतात. उंची खाणं/पिणं . . . हसणं-खिदळणं . . . कधीकधी नाचणं देखील ! मग अचानक सगळ्यांना शांत बसण्याची सूचना दिली जाते आणि कोणीतरी हिरोला गाणं म्हणण्याची विनंती करतं.हिरो महाशयांना या पार्टीच्या निमित्ताने एक नामी संधी मिळते - जिच्यावर मी (म्हणजे हिरोने!) एवढं नि:स्वार्थी, निस्सीम, निरतिशय वगैरे प्रेम केलं, ती कशी 'बेवफा' निघाली! हिरो गाणं सुरू करतो आणि सगळे एकदम चिडीचूप ! आधीचा सगळा तो मूड . . . तो माहोल . .  सगळं गायब. . .  हिरो आपल्या शब्दांच्या करामतीतून सूचकपणे किंवा कधी कधी उघडपणे जी कैफियत मांडतो  ती सगळे अगदी मनोभावे तल्लीन होऊन ऐकू लागतात.कोणीही त्याला थांबवत नाही- " अरे आम्ही कशासाठी आलो आणि तू हे काय रडगाणं गातोयस?"  असं विचारतही  नाही . क्वचित दोघांची एखादी कॉमन मैत्रीण सूचक हसते किंवा ती जर 'खल-प्रवृत्तीची ' असेल तर तिला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटतात! हिरोला मिळवण्याच्या तिच्या मार्गातला हिरोईन नामक काटा दूर झाल्याचा तो आनंद  असतो. पण हिरोचं गाणं चालू राहतं. माझ्या (म्हणजे हिरोच्या !) 'अशा प्रेमाचा तू स्वीकार का केला नाहीस ? आता या प्रेमभंगामुळे मी 'गम' मध्ये बुडून जाईन' वगैरे वगैरे . . . . 

अशा सुरुवातीला आनंदी वातावरण पण नंतर सॅड प्रसंगातील गाणी मात्र खूप छान असतात. कित्येकदा ही गाणी या पार्श्वभूमीचा विचार न करता ऐकली किंवा ती जर माहीतच नसताना ऐकली तर ती रत्नजडित खजिन्यासारखी वाटतात. अशी गाणी आधी ऐकली आणि नंतर त्याचे दृश्य स्वरूप पाहिले की केवढी निराशा होते ! याचे एक अस्सल उदाहरण तुम्हांला सांगतो - कोणे एके काळी 'हवस' नावाचा सिनेमा आला होता. अनिल धवन आणि नीतू सिंग यांचा. सध्याच्या पिढीला हे अभिनेते ओळखण्याची/लक्षात ठेवण्यासाठी एक क्लू म्हणजे- वरूण धवनचे काका आणि RK ची आई ! तर त्यात एक अप्रतिम गाणं होतं - 'तेरी गलियो में ना रखेंगे कदम आज के बाद.. . '  संगीतकार उषा खन्ना, गायक मोहम्मद रफी ! साधे सोपे शब्द, दर्दभरी चाल. . .  interlude संगीतही छान. .  तेरी गलियो में या पहिल्या ओळीच्या ( आणि नंतर कडव्याच्या शेवटीही ) मागे मागे जे व्हिसल ऐकू येतं ते खूप छान वाटतं . रफीच्या आवाजाने या गाण्याचे सोने केले आहे. या गाण्याची लिंक देत आहे. मात्र मी सल्ला देईन की आधी ते फक्त ऐका आणि मग व्हिडीओ पाहा. . .
व्हिडीओ विनोदी आहे आणि हे मी फारच सौम्यपणे म्हणतोय. या सिनेमाच्या ड्रेस डिझायनर, हेअर डिझायनर, मेकअप मन यांना अजूनपर्यंत कोणी विशेष पुरस्कार दिला नसेल तर तो जरूर द्यावा असं मला वाटतं. पण सगळ्यात मोठं बक्षीस कास्टिंग विभागाला द्यावं  -त्यांनी या गाण्यात नीतूसिंगच्या डाव्या बाजूला बसलेला हिरा शोधून काढल्याबद्दल ! असा नग आहे की त्यापुढे अनिल धवनही ग्रीक देव वाटावा ! थोडक्यात गाणं आणि त्याचं चित्रीकरण यात प्रचंड तफावत असलेलं आणि तरीही संस्मरणीय असलेलं हे गाणं !