Saturday 25 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे !(भाग ३)

 

पुण्यात क्रीडा संस्कृती चांगली रुळली आहे. क्रिकेट सोडून बाकीच्या खेळांसाठी देखील सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पुण्याची हवा अजून तरी तशी बरी असल्यामुळे सर्वसाधारण पुणेकर सकाळच्या वेळी व्यायामासाठी टेकड्या, बागा, जिम गाठतो. उत्साही लोक मॅरेथॉन सारख्या क्रीडाप्रकारात सहभागी होतात. पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे तिथे नियमितपणे जाणारे हजारो लोक आहेत. पुण्यात २०१० साली कॉमनवेल्थ युथ गेम्स भरवण्यात आल्या. त्या नंतर वेगळ्याच कारणाने गाजल्या. परंतु पुण्यात या आणि आधीदेखील  स्पर्धा झाल्यामुळे खेळांसाठीचे इन्फ्रास्टक्चर चांगलं उभं राहिलं आहे. आता यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे किती खेळाडू निर्माण झाले हा एक वेगळा विषय आहे. पण पुणेकरांना खेळात रुची आहे एवढं नक्की! म्हणूनच जागोजागी खेळांविषयक भित्तीचित्रं. बोर्ड्स, पुतळे दिसून येतात. उदाहरणार्थ हे नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ आहे-

 
यातला संदेश विचार करायला लावणारा आहे हे नक्की!
 

 
वरील भित्तीचित्रं अप्सरा टॉकीज ते मार्केटयार्ड या नव्याने बांधलेल्या फ्लायओव्हर खाली बघायला मिळतात. 



 

तर हे आणि असेच लक्षवेधक बोर्ड राजाराम पुलावर पाहायला मिळतात. सॅलिसबरी पार्क येथील गुल पूनावाला उद्यानाबाहेर तर सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांचे पुतळे नुकतेच बसवण्यात आले आहेत. तसंच त्या पुतळ्यांखाली त्या त्या आसनाची माहितीही देण्यात आली आहे-


 

 


आपण सायकलिंग करत असताना एक रस्ता पकडतो पण ऐनवेळी आपल्याला दुसराच कुठलातरी रस्ता खुणावतो आणि आपण आपली ठरवलेली वाट सोडून देतो. मात्र हा नवीन रस्ताही तेवढाच इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग असतो. असंच काहीसं माझं या सध्याच्या ब्लॉग्स विषयी झालं आहे. आत्तापर्यंत जे काही फोटो पोस्ट करून झाले आहेत त्यापेक्षा आता  काहीतरी वेगळं सुचतंय. आणि जे सुचतंय ते सगळं फोटोंमधून व्यक्त होईल का नाही याबद्दल मला थोडीशी शंका आहे. त्यामुळे यापुढे  कदाचित थोडे कमी फोटो आणि जास्त लिखाण असं होईल असं दिसतंय ! 
कारण मला पुण्यातील फक्त सुशोभित चौक किंवा जागोजागीचे म्युरल यांचे फोटो दाखवून थांबायचं नाही. 
आपण असं म्हणू शकतो की यापुढे मला सायकलिंग करताना पुण्याबद्दल आलेले विचार शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणार आहे. 
 

ही आमच्या पुण्याची सुप्रसिद्ध मुठा नदी ! हा फोटो मी भिडे पुलावरून काढला आहे. कोणाला हे डबकं वाटेल म्हणून मी म्हात्रे पुलावरून आणखी एक फोटो काढला आहे ज्यात नदीचं खळाळतं(!) पाणी दिसतंय-
 

खरं तर कुठलीही नदी ही निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक असते जिच्यात एक स्वतंत्र परिसंस्था सामावलेली असते आणि तिचा प्रवाहही नैसर्गिक असतो. पण अलीकडच्या अनेक नद्यांप्रमाणे आमच्या या नदीला स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यात पाणी कधी आणि किती 'सोडायचं' हे वरून ठरतं. वरून म्हणजे खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाण्याच्या साठ्यावरून ! म्हणजे पर्यायाने तिचं नियंत्रण वा तिची सूत्रं पाटबंधारे विभागाकडे असतात. पुण्यात नदी अशीच असायची हे आता पुणेकरांनी नाईलाजाने का असेना पण स्वीकारलं आहे. पुणेकरांसाठी या नदीचे महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे -
१) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन ( तेही पाटबंधारे खात्याने पाणी सोडल्यावर !) 
२) जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा - राजापूरची गंगा हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो आणि म्हणून ती जेव्हा अवतरते तेव्हा तिचं लोकांना काय ते अप्रूप असतं ! आम्हां पुणेकरांसाठी तितकाच कौतुकाचा भाग म्हणजे वर्षातले ३-४ दिवस जेव्हा आमच्या या नदीला पूर येतो ! सगळ्यात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि या पुराच्या अलौकिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि हे विहंगम दृश्य कॅमेराबंद करण्यासाठी उत्साही पुणेकर लकडी पुलावर गर्दी करतात !
३) वरील दोन्ही फायदे हे सीझनल झाले. पण बारमाही फायदा एकच - नदीत  निर्माल्य टाकणे ! पुणेकर बहुदा क्राईम पॅट्रोल कार्यक्रम जास्त बघत नसावेत. नाहीतर हेच बघाना -
 

 

-हे असे पुरावे मागे ठेवले असते का पुणेकरांनी? की  आपण असं म्हणू या - पुणेकर किती पर्यावरणप्रेमी आहेत ! निर्माल्य (bio degradable!) नदीत टाकतात पण चुकूनसुद्धा प्लास्टिक नदीत टाकत नाहीत ! 

आमच्या या नदीमुळेच पुण्याचं एक unsaid विभाजन झालं आहे-  नदीच्या अलीकडंच आणि नदीच्या पलीकडचं पुणे ! या दोन पुण्यांना जोडणारे अनेक पूल आहेत- लकडी, म्हात्रे, संगम, गाडगीळ, भिडे, झेड ब्रिज इ. पण आम्हां नदीच्या अलीकडे राहणाऱ्यांना उगीचच वाटतं की पलीकडच्यांना नदी ओलांडून इथे यायला फारसं आवडत नाही. अर्थात याला अपवाद आहेत- सणासुदीच्या काळात, विशेषतः गौरी-गणपती, नवरात्र-दसरा आणि दिवाळीत  मात्र सगळं पुणं, ज्याला आम्ही गावात म्हणतो, तिथे खरेदीसाठी लोटतं. आणि हे नदीच्या पलीकडचं पुणं म्हणजे तरी काय- बहुतांश शनिवार, बुधवार,  नारायण, सदाशिव, नवी  या पेठांमधल्या लोकांनी स्थानिक स्थलांतर करून कोथरूड नावाचं उपनगर वसवलं ते! पूर्वी नदीकाठालगत मनुष्य वस्ती होते आणि त्यातूनच संस्कृती उगम पावते असं म्हटलं जायचं. पुण्यात औद्योगिकरणानंतर टाटा- बजाज आणि अम्युनिशन फॅक्टरीमुले एक श्रमिक संस्कृती निर्माण झाली. नंतर आय टी क्षेत्रातही पुण्याने आघाडी घेतल्यावर नदीच्या पलीकडे हिंजवडी आणि या बाजूला खराडी -मगरपट्टा सिटी हे भाग विकसित झाले आणि त्यांच्या आजूबाजूला पुणे विकसित होत गेले आणि शहराचा चौफेर विस्तार झाला. आता पुण्याच्या सीमा इतक्या दूरवर गेल्या आहेत की पुणे आणि मुंबई मिळून एक शहर होईल की काय असं वाटतंय ! पेठांमधून स्थानिक स्थलांतर केलेल्यांच्या पुढच्या पिढीने तर देशाच्या सीमा ओलांडल्या आणि बहुतांश उच्चभ्रू घरांमधली मुलं अमेरिका-कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड, मध्य-पूर्वेतील देश इत्यादी ठिकाणी  greener pasture साठी गेली. आणि इथे मागे राहिले आधीच्या पिढीतले ! पुणे पुन्हा एकदा पेन्शनरांचे शहर ओळखले जाऊ लागले असं म्हणत असतानाच दुसरीकडे विदर्भ-मराठवाडा आणि परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण पिढी शिक्षण आणि नॊकरीच्या शोधार्थ इथे आली. पुणेकरांच्या हेकेखोर स्वभावाबद्दल खूपदा बोललं जातं. पण पुण्यात आलेल्या या सर्वांना  पुणेकरांनी संपूर्णपणे सामावून घेतलं आहे. इतकं की हे सगळेच पुण्यात चांगलेच मिसळून गेले आहेत. त्यामुळे पुणे एक तरुण, उत्साही शहर बनले आहे. तसंच चांगल्या संधीसाठी जे  पुण्याबाहेर गेले आहेत त्यांनादेखील पुणे मनातल्या कप्प्यातून आपल्याबरोबर त्या त्या ठिकाणी नेलं आहे. अशाप्रकारेदेखील पुण्याचा विस्तारच झाला आहे असं म्हणता येईल! 
                                                                                                                                                    (क्रमश:)









Thursday 23 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे!(भाग २)

 व्हॉट्सॲपवर नियमितपणे पुणेकरांवर विनोद फिरत असतात. बाकीच्यांचं माहित नाही पण मी हे विनोद अगदी मनापासून एन्जॉय करतो. असे विनोद तयार करणाऱ्यांची विनोदबुद्धी आणि कल्पनाशक्तीला दाद दिलीच पाहिजे! हे विनोद सारखे येत राहतात यावरूनच लक्षात येतं की अशा गोष्टींमुळे आम्हां पुणेकरांची अस्मिता वगैरे काही दुखावली बिखावली जात नाही. नाहीत केवळ हे विनोद बंद करण्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले असते. पुणेकरांच्या स्वभावात तो थोडासा quirkiness आहेच आणि तोच विनोदाचा विषय होतो. आमच्या शहराची काही वैशिष्ट्यं आहेत (जी आता सर्वज्ञात आहेत!)  आणि पुणेकरांचा एक गुणधर्म  आहे. या सगळ्याच्या मिश्रणातून आमच्या पुण्याचा एक स्वभाव झाला आहे. पुण्यावर प्रेम करणं (अंगभूत गुण -दोषांसकट) हा याच स्वभावातला महत्त्वाचा भाग! हे पुणे प्रेम आम्हांला मिरवायला आवडतं. हाही आमच्या अॅटिट्यूडचा भाग आहे म्हणा ना! याच पुणे प्रेमाच्या खुणा पुण्यात ठळकपणे दिसतात. 

 
हे महर्षीनगर येथील एका नाल्यावर बघायला मिळालं.  
तर हे सातारा रोडवर आमच्या अगदी घराजवळ -
 

याचं लोण  इतकं पसरलं आहे की I love Taljai असंही आहे.( त्याचा फोटो नाही कारण तिथे मी सायकलवर गेलेलो नाही ) इथपर्यंत ठीक आहे कारण तळजाई टेकडी खरोखरच आवडण्यासारखी आहे. 
पण -
 

आता स्वारगेट मध्ये आवडण्यासारखं काय आहे? 
इतकंच काय -
 

-हे असं सुद्धा आहे! 

काही चौकांमधल्या सुशोभीकरणावरून लगेच लक्षात येतं की या भागाचं वैशिष्ट्य काय आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे-
 

नाना पेठ या भागात दुचाकी वाहनांच्या स्पेअर पार्ट्सची दुकानं आहेत हे यावरून सहज ओळखू येतं. 

सार्वजनिक गणेशोत्सव आणि पुणे याचं एक अतूट नातं आहे. पुण्यातील गणेशोत्सव आणि सार्वजनिक मंडळांचा एक वैभवशाली इतिहास आहे. गणेशोत्सव आणि अलीकडच्या काळात नवरात्रोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेतले महत्त्वाचे मानबिंदू ! हेच अधोरेखित करणारी ही चित्र सारसबागेसमोर-
 

 

गुडलक चौक, डेक्कन जिमखाना येथील काही पुतळे अगदी नजरेत भरणारे आहेत. पण मला माहित नाही किती जणांनी ते निरखून पाहिले आहेत-
 




 

याच गुडलक चौकात गुडलक हॉटेलच्या डावीकडे हे सुंदर म्युरल आहे- 
 

या फोटोकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की या म्युरल पुढे कुठल्यातरी वायरी लटकत आहेत. त्यामुळे रंगाचा अगदी बेरंग झाला आहे. मला या म्यूरलचं नाव कलाकार कट्टा का ठेवलं आहे हे कळलं नाही. म्हणजे इथे काही कलाकृती सादर होणं अपेक्षित आहे का? तसं ते अवघडच आहे म्हणा कारण इतक्या वाहत्या रस्त्यावर कुठलाही लाईव्ह परफॉर्मन्स सादर होणं मुश्किलच ! 
पुण्यातल्या अशाच आणखी काही वेधक गोष्टींचा सायकलवर जाता येता फोटोंद्वारे घेतलेला मागोवा पुढील ब्लॉगमध्ये...                                                                                                                          (क्रमश:)


















Tuesday 21 December 2021

सायकलवरून दिसलेले पुणे ! (भाग १)


आपण आपापल्या वाहनांनी खरं तर रोजच कामाच्या ठिकाणी जात असतो किंवा शहरात आणखी काही निमित्तांनी फिरत असतो. या प्रवासांत आपलं आजूबाजूला फारसं लक्ष जातंच असं नाही. कारण आपल्याला इच्छित ठिकाणी पोचायची खूप घाई असते आणि शहरात वाहतूकही एवढी वाढली आहे की आपलं सगळं लक्ष त्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्यात लागतं. शिवाय आपल्या गाडीचा वेगही असल्यामुळे शहर झपकन मागे पडत जातं. त्या तुलनेत आपण जर सायकल चालवत असलो तर मग आपल्याकडे तसा निवांत वेळ असतो आणि मग जेव्हा आपण इकडे तिकडे बघत पाय मारत जातो तेव्हा आपल्याच शहराची आपल्याला नव्याने ओळख होऊ लागते. 
सध्या मी नियमितपणे सायकलिंग करत आहे. हा माझ्या सध्याचा छंद आहे असं म्हणा ना ! या सायकलिंगचा छंद आणि माझी सध्या मागे पडलेली आवड म्हणजेच फोटोग्राफी-यांची सांगड घालत मी आमच्या पुण्याचे काही फोटो काढले आहेत. त्याचाच हा फोटो ब्लॉग! अर्थात हे करत असताना मी काही बंधनं स्वतः वर घालून घेतली. ती म्हणजे -
१) फोटो काढण्यासाठी सायकलवरून उतरायचं नाही. 
२) सायकलिंग करत असतानाच फोटो काढायचे. म्हणजे सकाळच्याच  वेळचे सगळे फोटो असणार. आणि असंही नाही करायचं की दिवसा कधीही त्या त्या ठिकाणचे फोटो दुचाकीवरून जाऊन काढायचे. 
३) फोटो फक्त मोबाईलवरील कॅमेऱ्यानेच काढायचे. कुठलाही इतर कॅमेरा वापरायचा नाही. 
या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे सायकलिंग करणं/व्यायाम करणं यात फारसा खंड पडू द्यायचा नाही. नाहीतर सायकलिंग बाजूला/मागे पडायचं आणि फोटो काढणंच मुख्य काम होऊन बसायचं !
४) मोबाईल कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंचं फारसं एडिटिंग करायचं नाही. या मुळे कदाचित फोटोंची गुणवत्ता तितकीशी चांगली नसेल. 
मला माहित नाही हा उपक्रम कसा स्वीकारला जाऊ शकेल. पण जर अशाच प्रकारे कोणाला सायकलिंगची वा  मोबाईल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली वा अशी आवड असलेल्या उत्साही लोकांनी असेच फोटो शेअर केले तर केवळ पुण्याचेच नाही इतरही अनेक शहरांचे आणि गावांचे फोटो डॉक्युमेंटेशन करता येऊ शकेल ! 
मला वाटतं  नमनांचं इतकं तेल पुरे झालं आणि मुख्य विषयाकडे वळतो! 
पुण्यात बऱ्याच ठिकाणी भित्तीचित्रं बघायला मिळतात. त्यात काहीवेळा स्वछतेचे संदेश  दिलेले असतात. तर काहीवेळा पर्यावरणविषयक  करणारे संदेश असतात तर काहीवेळा उपदेशपर संदेशही असतात !


वरील  चित्रं ही आमच्या सोसायटीच्या सीमाभिंतींवरील आहेत. या चित्रांच्या जवळून मी शेकडो वेळा गेलो असें. पण माझं या चित्रांकडे लक्षच गेलं नव्हतं. पण आता बघितल्यावर वाटतं की चित्र सुरेख काढली आहेत आणि मुख्य म्हणजे ती पानांच्या पिचकाऱ्यांपासून बऱ्यापैकी सुरक्षित राहिली आहेत !
पुण्यात आता जागोजागी फ्लायओव्हर झाले आहेत आणि त्यांच्या भिंतींवर काही ठिकाणी आकर्षक चित्रं बघायला मिळतात. उदाहरणार्थ लक्ष्मीनारायण थिएटर जवळील फ्लायओव्हर खाली हे चित्र आहे-

पुण्याचा केवळ गौरवशाली इतिहासच नव्हे तर याच ठिकाणी उद्याच्या पुण्याचं चित्रही रंगवण्यात आलं आहे-
 

पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आहे, पुणे हे भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्यालय आहे. पुण्यात AFMC आहे, ASPT आहे, दापोडी येथे College of Military Engineering आहे. खडकीला Ammunition factory आहे. पुण्यात DRDO आहे. थोडक्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं पुणे हे एक केंद्र आहे.  पुण्याचं हे महत्त्व अधोरेखित करणारा  गोळीबार मैदानाच्या अलीकडच्या चौकातला हा दिमाखदार 
T-55 रणगाडा -

 
 

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केले होते. पुण्यातील एका  नगरसेवकाने लगेचच त्याचे सुशोभित चित्र शास्त्री रोडवर लावले जे आजही लक्षवेधक ठरत आहे-
 

याच शास्त्री रोडवर लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. तिथला चौक सुशोभित करून त्यावर शास्त्रीजींचा सुप्रसिद्ध नारा- 'जय जवान जय किसान' कोरण्यात आला आहे -


सायकलवरून काढलेल्या पुण्याच्या अशाच काही फोटोंवर आधारित आणखी काही ब्लॉग लिहिण्याचा विचार आहे. तेव्हा या ब्लॉगपुरतं आत्ता इथेच थांबतो ! 
                                                                                                                                                        (क्रमश:)









Wednesday 18 August 2021

A photo blog on birds or (ओळख पक्ष्यांची २ )

The strength is in numbers!                 


Small Green Bee-eaters

 The day is spent in fending for food. For a bird like the   beautiful Small green bee-eater, it's especially a tough   ask as it often catches insects,wasps in the mid air   doing acrobatics. ( That's why it's called वेडा राघू in Marathi). So it needs to spend energy to gain energy ( like पैसा कमाने के लिये भी पैसा चाहिए!) But as the sun goes down, it's a different world altogether! The wings need to rest to regain energy. So sleep is essential. Also absence of light weakens the sense of vision. That makes the bird vulnerable for predators who hunt in the darkness of night! Therefore there's not just a warmth, but a security in sleeping in a huddle. The bird's community behaviour is thus useful for its survival... 


Indian Nightjar (रातवा)                        

Indian Nightjar


I have purposely not cropped the image so that you would appreciate how this bird merges with the surroundings. This bird is primarily an insectivore and active during dusk and dawn. It prefers to rest on the ground as the camouflage offers security. This is a day time photo of the bird. I have also shot the bird near Bhigwan at night and at ground level. The difference in its eyes is clear between the two photos. For the photo from Bhigwan, I had to literally lie down on the floor to get a better view of the bird. The bird was so still and unfazed by the light falling on it, that it was as if it was used all the light, camera and action!

Indian Nightjar 


 Mottled Wood Owl in camouflage-

We were in a moving gypsy in Ranthambore and suddenly when I saw the tree above, I saw this bird, perfectly camouflaged. I don't know if that is true or not, but I was told that you don't so commonly get to see Mottled Wood Owl in Ranthambore. That made the sighting all the more memorable.


Mottled Wood Owl 


We had seen the same bird in Tadoba as well. This time we saw an entire family. Here is the young one -


 

Friday 13 August 2021

चल मेरे दिल लहराके चल ...

 

माझी मैत्रीण डॉ मंजिरी वैद्य हिने जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेले हे चित्र  



प्रत्येक घराची एक संस्कृती असते. तशी आमच्या घराची साहित्य-वाचन-कला संस्कृती होती. पण आमच्याकडे कधीही क्रीडा संस्कृती नव्हती. म्हणूनच की काय मी कधीच  कुठल्याही खेळ प्रकारात सहभागी झालो नाही. माझी मजल आपली बैठया खेळांपुरतीच ! क्रिकेट हा समस्त भारतीय लोकांचा आवडीचा खेळ आहे, तसाच तो माझाही ! पण त्यासाठी तो खेळ खेळावा थोडाच लागतो ! सोफ्यावर मस्त पहुडत त्याची मजा घ्यायची असते. खेळ हा माझ्यासाठी एक करमणुकीचा विषय आहे. खरं तर 'The Confessions of a born spectator' ही कविता Ogden Nash यांनी माझ्यावरच बेतली आहे की काय असं मला वाटतं. म्हणजे सगळेच जर खेळू लागले तर मग त्यांना खेळताना बघणार कोण? त्यांचं खेळातील प्रावीण्य /कौशल्य याचं कौतुक करणार कोण? ते काम आम्ही इमाने इतबारे करतो ! कारण खेळ म्हटलं की परिश्रम आले, स्पर्धा आली आणि या दोन्ही गोष्टींपासून मी जरासा लांबच असतो ! त्यातल्या त्यात कॉलेजच्या काळात मी थोडंफार सायकलिंग केलं होतं. पण ते काही स्पर्धात्मक नव्हतं. माझं घर ते सिंहगड सायकलने, मग पायी गड  चढणे आणि परत सायकलने घरी असं दोन-तीनदा केलं, एकदा पुणे ते सासवड असाही  सायकल प्रवास केला होता. पण तो काळच वेगळा होता!!

वयाच्या साधारण चाळीशी-पंचेचाळीशी नंतर बहुतांश लोकांना नॉस्टॅलजियाचे अटॅक येऊ लागतात. पूर्वी आपण केलेल्या (किंवा खरं तर न करू शकलेल्या) गोष्टी (पुन्हा) करायची एक खुमखुमी निर्माण होते. 'अजून यौवनात मी' हे सिद्ध करावंसं वाटतं ! कुठलातरी व्यायाम करणं हे या वयात अपरिहार्यपणे स्वीकारावं लागत असतंच. एकच प्रकारचा व्यायाम करून तोचतोपणा येत असतो. असंच काहीसं माझंही झालं. मला  चालणं या व्यायामाचा कंटाळा येऊ लागला. आमच्या घरी माझ्या मुलीसाठी आणलेली सायकल बराच काळ धूळ खात पडून होती. सायकलिंग हा असा व्यायामप्रकार आहे की तो तुम्ही एकट्यानेही करू शकता. शिवाय तुमचे स्पर्धक फक्त तुम्हीच असता ! म्हणून एक दिवस अचानक एक सणक डोक्यात आली आणि मी ती सायकल दुरुस्त करून आणली आणि ठरवलं की आता सायकलिंग करायचं !  ते वाढवत नेत एक दिवस पुन्हा सिंहगड गाठायचा ! ही साधारण मे महिन्यातली गोष्ट असेल. बऱ्याच बाबतीत मी आरंभशूर आहे. त्यामुळे मला वाटलं होतं की दोन चार दिवसांत माझ्या डोक्यातली ही हवा थंड होऊन जाईल. पण माझा मलाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला!  साधारण मे महिन्याच्या मध्यापासून  जवळपास ७०-७५ दिवसांच्या काळात आजपर्यंत मी सुमारे ७५० ( कदाचित थोडी जास्तच!) किलोमीटर सायकल चालवली आहे. 

या सायकल प्रवासादरम्यान माझी काही निरीक्षणं/माझे विचार  पुढीलप्रमाणे -

१) खरं तर माझी गिअरची सायकल आहे. पण मला सांगायला लाज वाटते की ते सायकलचे गिअर प्रकरण मला काही नीटसं झेपत नाही. म्हणून मी सायकल एकाच गिअर मध्ये किंवा गिअर नसल्यासारखीच  चालवतो‌. त्याचा फायदा असा की जो काही व्यायाम होतो तो पूर्णपणे स्वकष्टार्जित असतो. त्यात स्वयंचलित असं काही नसतं. म्हणूनच की काय सायकलिंग नंतर मला अतिशय फ्रेश, उत्साही वाटतं. कधीच दमल्यासारखं वाटत नाही. मोकळ्या हवेत, अंगावर सकाळचा गार वारा घेत, सायकल मारत जाणं याचा आनंद काय वर्णावा! अर्थात याचा तोटा असाही आहे की माझा वेग फारच कमी असतो. साधारण तासाला बारा किलोमीटर!( हल्ली तो सुधारतोय) पण नाहीतरी मला कुठे लगेच टूर डी फ्रान्सला जायचंय! त्यामुळे मी याचा फार विचार करत नाही. सायकल चालवायला लागल्यावर अचानक  माझ्याच वयाचे अनेक सायकलपटू मला झुपकन ओव्हरटेक करून जाताना दिसू लागले आहेत. त्यांच्या फॅन्सी सायकली, त्यांचे सायकलिंगसाठीचे खास पेहराव, हेल्मेटस् सगळं बघून अचंबित व्हायला होतं. कधीतरी असा विचार डोकावतोच- 'भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?' पण हा विचार मी झटकून टाकतो. कारण अशा तुलनेला काही सीमाच नसते. शिवाय प्रत्येकाची प्रकृती निराळी आणि तपश्चर्याही! तशी प्रत्येकाची गतीही निराळी! आपण त्या माणसाच्या स्टॅमिना आणि फिटनेसला सलाम करावा आणि आपले पाय मारत पुढे जावं हे बेहत्तर!

२) अमूक किमी सायकल चालवल्यावर अमूक किलो वजन कमी होईल, अमूक इंच पोट कमी होईल अशी कोणतीच रिटर्न अॉन इन्व्हेसमेन्टची अपेक्षा न ठेवता सायकल चालवावी असं मला वाटतं. हे म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेत श्रीमद् भगवद्गीतेचा कर्माचा सिद्धांत सांगितल्याप्रमाणे झालं! पण खरंच सायकलिंगचा निर्मळ आनंद घ्यायचा असेल तर ती निरपेक्षपणे चालवावी‌. वजन कमी होईल तेव्हा होईल! 

३) रोज त्याच त्याच रस्त्याने जाण्यापेक्षा नवनवीन मार्गावर सायकल चालवण्याचा मी प्रयत्न करतो. यामुळे रूक्षपणा टाळता येतो आणि आता आज कुठल्या मार्गाने जावं हा विचारसुध्दा सायकल चालवण्यासाठी एक नवा उत्साह देतो. अर्थात काही वेळा हा उत्साह अंगाशी येऊ शकतो कारण तुम्ही मारे ठरवता एका मोठ्या चढावर जायचं‌. पण मध्यावर आल्यावर लक्षात येतं की हे काही जमणं शक्य नाही. पण मग आहात तिथून उलटं फिरावं, माघार घेण्यात कोणताही कमीपणा / पराभव वाटायचं कारण नाही. सरावाने पुन्हा तो चढ सर करता येईलच की! 

४) व्यायामात सातत्य राखण्यासाठी काही काळानंतर Motivation ची गरज निर्माण होऊ शकते. प्रत्येकाचा motivator वेगवेगळा असू शकतो. माझा motivator Strava अॅप आहे. आपल्यासाठी अॅप आहे की आपण अॅपसाठी हा तात्विक प्रश्न आपण तात्पुरता बाजूला ठेवून देऊ. पण हे अॅप वापरू लागल्यावर त्यात आपली दररोज एंट्री पडली पाहिजे ही इच्छा होऊ लागली आणि त्यातून मग सातत्य निर्माण झालं. मी काही Strava चा Brand Ambassador नाही पण तरीही हे अॅप जे कोणी सायकलिंग करतात किंवा चालण्याचा व्यायाम करतात त्यांनी जरूर वापरावं. ते अगदी शंभर टक्के अचूक असेल असं नाही पण आपण त्या त्या दिवशी कितपत व्यायाम केला आहे याचा अंदाज यातून नक्कीच येतो.

५) सायकल चालवताना सगळ्यात जास्त अडचण केव्हा जाणवत असेल तर ती चढावरून जाताना! शिवाय जर समोरून वारा येत असेल तर आणखी अडथळा येतो. रोजच्या सरावाने आणि अनुभवाने लक्षात येऊ लागतं की काही वेळा आपण उगाच या चढाची भीती बाळगत असतो. सुरुवातीला वाटतं तेवढा दमछाक करणारा चढ असतोच असं नाही. आणि अगदी लागत असेल दम तर आपण मध्येच थोडावेळ थांबू शकतो आणि पुन्हा पुढे जाऊ  शकतो. कधी ना कधी हा चढ संपून उतार येणार असतो याची आपल्याला खात्री असली की या श्रमाचं वाटेनासं होतं. 

६) सायकल चालवताना जाणवतं की you have all the time in the world! आजूबाजूचे सगळेच वाघ मागे लागल्यासारखे वेगात जात असतात. एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे शेजारून वाहन जातं तेव्हा क्षणभर दचकायला होत असतं. हे सगळे लोक एवढ्या घाईघाईने नेमके कुठे जात असतात असा एक भाबडा प्रश्न आपल्याला पडतो कारण आपण निवांत आणि निश्चिंत असतो.आपल्याला कसलीही घाई नसते.  या ठेहरावाच्या काळातला क्षण अन् क्षण आपण अनुभवावा. प्रसंगी गाणं म्हणत जावं. (असंही सध्याच्या मास्कच्या जमान्यात आपण गाणं म्हणतोय हे कोणाच्या लक्षातही येत नाही!) सर्व कोलाहलात देखील मन:शांती अनुभवता येईल इतकं सायकलिंग meditative वाटतं. 

७) आपल्या हाताशी वेळ असल्याने आपण आजूबाजूला बघत बघत जाऊ शकतो. यामुळे शहराची अक्षरशः नव्याने ओळख झाल्यासारखं वाटतं. कितीतरी रस्त्यांची नावं, कितीतरी गल्ली-बोळ, रस्त्यावर सुशोभीकरण करण्यात आलेले म्युरल, कितीतरी दुकानं, देवळं, पाट्या इ. हे सगळं काही मला सायकलिंग करू लागल्यावर जास्त चांगल्या प्रकारे लक्षात आलं आहे. 

८) कोणे एके काळी पुणे हे सायकलींचं शहर होतं. पण आता ते तसं अजिबात राहिलं नाही. त्यामुळे आपल्याला पुण्यातील गर्दीच्या रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन सायकल चालवावी लागते. एरवी दिवसभरात तुम्ही मारे दुचाकी वा चारचाकी चालवत असाल पण सायकल चालवताना तुम्ही एक य:कश्चित पदार्थच  आहात हे विसरता कामा नये. जंगलात जशी प्राण्यांची एक उतरंड (hierarchy) असते ज्यात वाघ सर्वोच्च स्थानी तर हरिण -ससा- किडे- मुंग्या वगैरे उतरत्या क्रमाने प्राणी असतात. तशी रस्त्यावरील वाहनांची पण एक उतरंड असते. यात ट्रक, बस, चारचाकी, रिक्षा हे सगळेच वाघ असतात. सायकलवाले किडा-मुंग्यांपेक्षाही खालच्या पातळीवर ! जंगलातले प्राणी आपापल्या औकातीत राहतात. कधी हरणाने सश्यावर हल्ला केलाय असं ऐकिवात नाही. पण दुचाकीस्वार मात्र सायकलस्वारावर धावून जातात हे मी स्वानुभवातून सांगू शकतो. रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे वळताना आपण व्यवस्थित मागे बघून, कानोसा घेऊन हात दाखवून जात असतो. तेवढ्यात मागून मोटरसायकलस्वार जोरात येतो आणि करकचून ब्रेक दाबून कसाबसा आपली आणि त्याची धडक टाळतो. वर आपल्याकडे बघून काहीतरी खाणाखुणा करतो. आपल्या अकलेचे वाभाडे काढतो. आपण मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं. सांगायचा प्रयत्न करायचा - चूक तुमची आहे. कधी उपयोग होतो तर कधी नाही! शेवटी -तुम्ही महान..आम्ही लहान..असं म्हणून सोडून द्यायचं !  काही वाहनचालक आपली शाळा घेतात- चालत्या गाडीतून आपल्याला शिकवत जातात- असं नाही, असं वळायचं. आपण पडती बाजू घेऊन त्यांना ठेंगा दाखवून आभार मानायचे. सायकल चालवायला लागल्यावर एक मात्र झालं आहे. मी जेव्हा इतर वाहनं चालवत असतो तेव्हा मी सायकलस्वारांकडे जास्त सजगपणे आणि थोडंसं सहृदयी नजरेने बघू लागलो आहे.

आता इतके दिवस मी सायकल चालवत आहे तर मी सिंहगडपर्यंत जाऊ शकलो आहे का? तर अजून तरी नाही. पण मला कुठे घाई आहे? जाऊ हळूहळू कासवगतीने! पण म्हणतात ना- Make hay while the sun shines! - तसं जोवर जमतंय तोवर सायकल चालवून घ्यावी! ईप्सित ठिकाणी पोचेन, न पोचेन पण प्रवासाचा आनंद तर नक्की घेईन ! 
( दर्दी संगीतप्रेमींच्या या ब्लॉगच्या शीर्षकावरून लक्षात आलं असेलच की 'चल मेरे दिल लहराके चल' हे 'इशारा ' या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं  गाणं आहे. पडद्यावर नायक सायकल चालवताना गाणं म्हणत आहे. केवळ याचसाठी हे गाणं निवडलं आहे. अन्यथा जॉय मुखर्जीचं गाणं निवडणं तसं अवघडच! या गाण्याची लिंक देत आहे-

Wednesday 14 July 2021

एका कलाकाराची व्हर्चुअल भेट!

 (२२ मे रोजी ज्येष्ठ नाट्य-चित्रपट- मालिका अभिनेते  श्री. श्रीराम पेंडसे यांचा वाढदिवस !. त्यानिमित्त हे लिखाण... )

घाशीराम कोतवाल नाटकात डावीकडून दुसरे श्रीराम पेंडसे 
मध्यंतरी आमच्या एका व्हॉट्सअँप  समूहात ज्येष्ठ अभिनेते श्री. श्रीराम पेंडसे यांनी एक छोटीशीच कॉमेंट केली होती ज्यात 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा उल्लेख होता . पण त्यावरून माझ्या लक्षात आलं  की या सुप्रसिद्ध नाटकाच्या मूळ संचातल्या कलाकारांपैकी ते एक असावेत. समूहात तो विषय नंतर मागे पडला. पण मला राहवेना म्हणून मी त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवून त्याबद्दल विचारलं. माझी आणि त्यांची काहीच ओळख नसल्यामुळे ते उत्तर देतील की नाही इथपासून ते कसं उत्तर देतील याबद्दल माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊन गेले. पण अर्ध्या तासाच्या आत त्यांचं  उत्तर आलं  आणि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला ! उत्तरात त्यांनी लिहिलं  होतं की नाटकाच्या विसाव्या प्रयोगापासून(थिएटर अकॅडेमीने प्रयोग चालू केल्यापासून)  ते या नाटकात काम करत होते! 


केवळ मराठी नाटकच नव्हे तर संपूर्ण आधुनिक मराठी संस्कृतीचा इतिहास लिहायचा  किंवा त्याचा अभ्यास करायचा विचार कोणी केला तरी त्यात 'घाशीराम कोतवाल' ( लेखक- विजय तेंडुलकर दिग्दर्शक- डॉ जब्बार पटेल) या  नाटकाचा स्वाभाविक समावेश करावाच लागेल असं माझं मत आहे. आपले पूर्वग्रह थोडेसे बाजूला ठेऊन एक स्वतंत्र कलाकृती म्हणून या नाटकाकडे बघितलं तर लक्षात येईल की खरं तर हे नाटक एक लयबद्ध कविताच आहे ! मराठी लोककलेतील खेळे हा फॉर्म नाटकासाठी वापरण्यात आला आहे. नाटकातील संवादातही गेयता आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारे गाणी वापरण्यात आली आहेत. 'श्री गणराय नर्तन करी' या पारंपरिक गणापासून ते लावणी  पासून ते अगदी शास्त्रीय संगीतावर आधारित रचना हे सगळं काही नाटकात आहे. मी हे नाटक माझ्या वयाच्या १७-१८ व्या वर्षी बघितलं पण आजही माझ्या लक्षात आहेत त्यातल्या कलाकारांच्या सिन्क्रोनाईज्ड आणि विलोभनीय हालचाली ! नाटकातील कलाकारांची एनर्जीही अव्दितीय ! मला आणखी एक गोष्ट चांगली लक्षात राहिली आहे ती म्हणजे रंगमंचावर प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला गायक रवींद्र साठे( रवींद्र साठे यांनी या नाटकात काम केलं आहे) यांच्यावर स्पॉट लाईट आहे आणि ते सकाळचा राग गात आहेत आणि डावीकडे त्यानुरूप प्रसंग दर्शवण्यात येत आहे! आणि साठे यांचे गायन अगदी तब्येतीत चालू राहतं ! अतिशय रोमांचित करणारा हा अनुभव! 


मी 'घाशीराम कोतवाल' बघितल्याच्या आठवणींना उजाळा श्री. पेंडसे यांच्या पोस्टमुळे मिळाल्याचं मेसेजवर मी त्यांना कळवलं  तसं त्यांनी मला आपण याविषयी फोनवर बोलू असं उत्तर दिलं आणि ३-४ दिवसांनी चक्क त्यांनीच मला फोन केला! फोनवर सुरवातीचा विषय अर्थात 'घाशीराम कोतवाल' हाच होता! या नाटकामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला, ज्यात मला जायची इच्छा नाही. पण हे नाटक एक सार्वकालिक सत्य सांगतं - आपल्याला उपयोग असेपर्यंत एखाद्याचा वापर करून उपयोग संपला की त्याकडे दुर्लक्ष करणे! श्री.पेंडसे यांनी सांगितलं की 'घाशीराम'चे युरोपातल्या जवळपास प्रत्येक देशात प्रयोग झाले, तसंच अमेरिकेतही झाले. पण प्रेक्षकांना भाषेची अडचण कुठेही जाणवली नाही. कारण तेही त्यांच्या देशांतील राज्यकर्त्यांच्या अशाच  अनुभवांशी नाटकाचं नातं जोडू शकले. प्रेक्षक नाटक संपल्यावर यावर भरभरून चर्चा करत. यावरून कलाकारांना आपलं नाटक परक्या संस्कृतीतील लोकांपर्यंतही पोचलं याचा वेगळा आनंद आणि समाधान देऊन गेलं असणार! 

'घाशीराम' नंतर श्री. पेंडसे हे 'थिएटर अकॅडेमी' या नाट्यसंस्थेचा अविभाज्य भागच बनून गेले. पु ल देशपांडे लिखित जब्बार पटेल दिग्दर्शित 'तीन पैशांचा तमाशा' , सतीश आळेकरांचे 'महानिर्वाण' अरुण साधूंचे ' पडघम' यासारख्य दर्जेदार आणि वेगळ्या  धाटणीच्या नाटकांतून त्यांनी काम केलं . 'तीन पैशांचा तमाशा' या नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने त्यांना पु ल देशपांडे यांचा तीन महिने सहवास लाभला! काय मंतरलेले दिवस असतील ते ! 
महानिर्वाण नाटकात डावीकडून दुसरे श्रीराम पेंडसे 


डॉ जब्बार पटेल यांच्या वेगळ्या वाटेवरच्या 'जैत रे जैत' 'सिंहासन' 'एक होता विदूषक' या सिनेमांतही श्री. पेंडसे यांनी भूमिका केल्या. त्यानंतर अर्थात त्यांनी इतर अनेक  मालिका आणि चित्रपटांत काम केलं . 
जैत रे जैत चित्रपटात श्रीराम पेंडसे 

यात विशेष उल्लेख करायचा झाला तर 'अवंतिका', 'वादळवाट' तसंच अलीकडच्या नितीन देसाई निर्मित 'छत्रपती शिवाजी' आणि 'बाजीराव मस्तानी' शिवाय  'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिका तसंच महेश मांजरेकर दिग्दर्शित 'काकस्पर्श' 'कोकणस्थ' या चित्रपटांचा करावा लागेल. श्री. पेंडसे यांनी खऱ्या कलाकाराला आनंद  नाटकात काम करून मिळतो असं सांगितलं. नाट्य-सिने-मालिका या क्षेत्रातली ही सगळी मुशाफिरी श्री. पेंडसे यांनी 'बँक ऑफ महाराष्ट्र' मधील नोकरी सांभाळून केली आणि सर्व मॅनेजर आणि बँकेतील सहकारी यांनी त्यांना संपूर्णपणे सहकार्य केलं याचा ते आवर्जून उल्लेख करतात. 

मला श्री.पेंडसे यांच्याशी  किती बोलू आणि काय काय बोलू असं झालं होतं. तेही बोलता बोलता म्हणाले आपण एकदा भेटूया. इतक्या सगळ्या गप्पा फोनवर मारणे शक्य नाही ! त्यांच्या या अनौपचारिकपणामुळे मला  आता खरंच वाटू लागलंय की आमची प्रत्यक्ष भेट होईलही आणि मला त्यांना माझ्या मनातले 'घाशीराम' आणि इतर काही कलाकृतींबद्दलचे प्रश्न विचारता येतील. 

Friday 9 July 2021

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री.विवेक पाध्ये

(डिस्क्लेमर : या लिखाणातील  व्यक्ती अर्थातच खऱ्या आहेत पण प्रसंग मात्र काल्पनिक आहे. या लिखाणाचा  कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पण नकळत/अनवधानाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व ! तसंच या लिखाणात जर तुमचा उल्लेख आला नसल्यास ती मर्यादा माझ्या कल्पनाशक्तीची आहे असे समजावे)

तारीख: ९ जुलै २०२१

स्थळ: आपल्या 'प्रतिभा आणि प्रतिमा' व्हॉट्स अँप  समूहाची भिंत

वेळ सकाळचे साडे सहा-

भल्या पहाटेपासून आज समूहावर लगबग सुरू आहे. आणि का नसावी? आज आपले ऍडमिन श्री. विवेकजी पाध्ये यांचा वाढदिवस आहे ना! आपसूकच सगळे उत्साहाने समूहावर व्यक्त होत आहेत. सुरवातीला सुकन्या जोशी यांनी सुंदर निसर्गचित्राचा एक फोटो पाठवला आहे. शिवाय त्याला जोडून स्वरचित कविता सुद्धा आहे.त्यामागोमाग इंद्रनील बर्वे यांनी पावसाच्या थेंबाचा फोटो आणि त्याबरोबर- 

'Behind every atom of this World hides an infinite Universe' - हा रूमी यांचा quote शिवाय त्यांच्याकडील instrumental music मधल्या मोठ्या ठेवणीतून पं रवीशंकर यांच्या सतारवादनात राग बैरागी भैरव पोस्ट केला आहे. 

मग श्री. प्रकाश पिटकर यांनी सह्याद्री कड्याचा पावसाळ्यातला हिरवा शालू ल्यालेला फोटो आणि त्याखाली नलेश पाटील यांची निसर्ग कविता पाठवली आहे-

'ह्या हिरव्या वस्तीमध्ये

हे प्राणवायूचे घर,

मज इथे निवारा मिळतो

अन् इथेच हिरवा सूर'...

त्यावर श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आणखी एक निसर्गकवी द. भा. धामणस्कर यांची एक कविता पोस्ट केली आहे.-

परिपक्व झाडे-

रात्री सुचलेली गाणी झाडांना

सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून

पाखरांनी एकच धरलंय :

झाडांना जाग येण्यापूर्वीच

आकाशवाटांनी निघून जायचं आणि

दिवस मिटल्यानंतरही झाडांत

लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे

पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज

त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे

वाट पाहावयास तयार आहेत…

तर श्री. चंद्रशेखर पुसाळकर यांनी माऊथ ऑर्गनवर त्यांनी वाजवलेल्या ' आती रहेंगी बहारे' या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

असा सगळा साद-प्रतिसादाचा उत्स्फूर्त उत्सव सुरू आहे. प्रत्येक जण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने शुभेच्छा देत आहे. 

पण श्री. विवेक पाध्ये मात्र आज समूहावर गैरहजर आहेत. 

वेळ सकाळचे दहा-

यावेळेपर्यंत समूहावर दररोज-

रोज सकाळी एक गाणे

करी मनास ताजेतवाने 

या सदरातील गाणं पोस्टविवेकजींनी पोस्ट करून झालेलं  असतं.पण आज आत्तापर्यंत तरी त्याचा पत्ता नाही. इतक्यात सुकन्या जोशी, लायबेरियामधून सुधांशू नाईक आणि पुण्यातून श्री विश्वास नायडू यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या 'मनात रूजलेली गाणी' या सदरातील पुढचं गाणं पोस्ट होत आहे- श्री विवेकजी यांचं आर डी बर्मन यांचं ऑल  टाइम फेवरेट- 

' नाम गुम जायेगा

चेहरा ये बदल जायेगा

मेरी आवाज ही पहचान है

गर याद रहें...'

या गाण्याच्या बरोबरच तिघांचे विवेकजींबद्दलचं मनोगत सादर होत आहे. विवेकजींच्या baritone आवाजाचा उल्लेख या निमित्ताने समूहावर होत आहे.त्यावर बोलताना ज्येष्ठ अभिनेते श्रीराम पेंडसे म्हणत आहेत - "आमच्या नाटकाच्या परिभाषेत बोलायचं तर विवेकच्या आवाजाचा थ्रो असा आहे की हा आवाज माईक शिवाय रंगमंचावरून थेट प्रेक्षकांच्या शेवटच्या रांगेपर्यंत सहज पोचेल ! "

श्री पेंडसे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कैवल्य रिसॉर्ट ट्रिपचे अनुभव आणि विवेकजी यांच्या अगत्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. 

विवेकजींनी चालू केलेला शिरस्ता मोडणार कसा आणि तेही त्यांच्या वाढदिवशी? म्हणून श्री. शेखर वगळ यांनी आशा भोसले यांचं वक्त सिनेमातलं ' आगे भी जाने न तू' हे गाणं पोस्ट केलंय. मग या गाण्यावर धनंजय कुरणे, उस्मान शेख, वंदना कुलकर्णी, कौस्तुभ आजगांवकर आणि स्वतः श्री वगळ यांच्यात एक माहितीपूर्ण, उद्बोधक आणि रंजक चर्चा होत आहे. यातून या गाण्याची सौंदर्यस्थळं उलगडून दाखवली जात आहेत. यात श्री कुरणे यांचा focus संगीतकार रवीवर, वंदना कुलकर्णी यांचा साहिरवर, श्री शेख यांचा साहिरने गाण्यातून सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर, कौस्तुभजी यांचा या गाण्याच्या ताल-लय-सुरावर आणि श्री वगळ यांचा या सिनेमाच्या आणि त्या अनुषंगाने त्या वर्षीच्या सिनेमांच्या इतिहासावर आहे. तसंच उमेश सोनटक्के यांचीही एक्सपर्ट कॉमेंट आलेली आहे. 

या चर्चेतही विवेकजी यांचा सहभाग नाही. मग कोणीतरी त्यांना मेसेज पाठवला आहे, कोणी फोन केला आहे. पण दोन्हीला उत्तर नाही! 

दरम्यान समूहावर शुभेच्छांचा खच सुरूच आहे. विवेकजींच्या बहिणी, शाळेपासूनचे मित्र(प्रसाद टिळक यांच्यासारखे) यांनी विवेकजींचे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्या फोटोबरोबर जोडल्या गेलेल्या रम्य आठवणीदेखील! सर्व शुभेच्छांबरोबर विवेकजींबद्दल जे काही लिहिलं जातंय त्यात एक विलक्षण सातत्य आहे- प्रत्येक जण विवेकजींचा अफाट लोकसंग्रह, त्यांचं माणसं जोडण्याचं कौशल्य, दुसऱ्यांमधले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची हातोटी तसंच व्हॉट्सअँप समूह व्यवस्थित चालण्यासाठी केलेली पद्धतशीर नियमावली आणि नियम पाळण्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे पण संयमितपणे सगळ्यांना समजावून सांगणं  वगैरेंबद्दल भरभरून बोलत आहे. तर श्री शेख आणि वंदना कुलकर्णी राजलक्ष्मी सभागृहात झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमांबद्दलच्या आठवणी सांगत आहेत. राजलक्ष्मी सभागृह हे समूहातील अनेकांचं भेटीचं आणि अनौपचारिक गप्पा रंगवण्याचं हक्काचं ठिकाण आहे याबद्दल सगळ्यांचं एकमत होत आहे. तिथल्या चविष्ट, रुचकर जेवणाचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांना तिथे पुन्हा पुन्हा जायचंय आणि सध्या अजूनही लॉक डाऊन असल्यामुळे तिथे जात येत नसल्याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

वेळ दुपारचा एक-

अर्चना बापट यांनी विवेकजींचे आवडते लेखक जयवंत दळवी यांच्या 'निवडक ठणठणपाळ' या पुस्तकाचे सुंदर रसग्रहण त्यांच्या 'पुस्तक परिचय' या सदरात केलंय. तर श्री. कौस्तुभ आजगांवकर यांनी सकाळच्या निसर्ग कवितांचा धागा पकडत इंदिरा संत आणि कवी बाकीबाब बोरकर यांच्या कविता यावर त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या शैलीत वर्णन केलंय. 

समूहातील ज्येष्ठ सदस्य श्री. दिवाकर बुरसे यांनी विवेकजींचे आवडते जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या एका खाजगी मुशायऱ्याचे रसभरीत आणि जिवंत वर्णन करणारा लेख पोस्ट केला आहे. 

विवेकजी सगळ्यांचे मेसेज बघत आहेत पण कुठल्याही चर्चेत सहभागी होत नाहीत, शुभेच्छांना उत्तरं येत नाहीत हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलंय. ते आपल्या सगळ्यांची मजा तर करत नाही ना? असं कोणालातरी वाटलंय.  यातून म्हणा किंवा एका विचित्र  अस्वस्थतेतून म्हणा कोणाकडून तरी एक आगळीक घडलीय. आता कोणाकडून तरी असं मोघम कशाला म्हणू? आगळीक माझ्याकडूनच घडलीय. मी 'प्रतिभा आणि प्रतिमा' समूहाचं प्रोफाइल पिक बदललं आहे आणि तिथे विवेकजींचा फोटो लावलाय ! थोडी वाट बघितली. काहीच प्रतिक्रिया आली नाही म्हणून समूहाचं नाव बदलून-वाढदिवसाच्या शुभेच्छा विवेक पाध्ये असं नामकरण केलंय ! तरीही विवेकजींचा काही प्रतिसाद येईना म्हणून एक कुठलं तरी फुटकळ फॉरवर्ड टाकलंय  ! शाळेतल्या वर्गावर शिक्षक आले नाहीत  तर वर्गात जसं वातावरण होईल तसंच काहीसं वातावरण समूहावर आहे.  त्यामुळे मी जे काही केलं त्याला फारसा कोणी आक्षेपही  घेतलेला नाही. 

पण आता हद्द झाली ! इतकं होऊनही विवेकजी मात्र शांत!

काही काळ समूहावर देखील एक नि:शब्द शांतता पसरली आहे ! 

वेळ: संध्याकाळचे पाच-

समूहावर आज जसे विवेकजी गैरहजर होते तशा ज्येष्ठ सदस्य सुलभाताई तेरणीकर देखील अनुपस्थित आहेत . समूहावर कोणीतरी ही बाब बोलून दाखवली आहे. इतक्यात सुलभाताई समूहावर अवतीर्ण झाल्या  आहेत - 

'मी इथेच आहे. एक महत्त्वाचं काम करत होते. त्यातून आत्ता मोकळी झाली आहे. आज विवेकजींच्या वाढदिवसानिमित्त विवेकजींना आणि समूहातील आपल्या सर्वांसाठी एक अनोखी भेट मी घेऊन आले आहे.'

असं म्हणत त्यांनी एक ऑडिओ फाईल पोस्ट केली आहे. सगळ्यांनी ती लगेच डाउनलोड केली आहे. सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोचली आहे. आणि अहो आश्चर्यम! क्षणभर कोणाचाही आपल्या कानांवर विश्वासच बसत  नाही ! आपण स्वप्न तर बघत नाही ना? कारण ती ऑडिओ फाईल म्हणजे साक्षात लता मंगेशकर यांचा व्हॉइस मेसेज आहे! त्या मेसेजचा प्रत्येक शब्द अन शब्द सगळेच भान हरपून ऐकत आहेत- 

" नमस्कार! माझ्या मैत्रीण आणि ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि हिंदी चित्रपट संगीताच्या जाणकार अभ्यासक सुलभाताई तेरणीकर यांनी मला सांगितलं की आज आमच्या समूहाचे ऍडमिन विवेकजी यांचा वाढदिवस आहे.खरं  तर मी विवेकजींना प्रत्यक्ष भेटलेली नाही. पण असं का कोण जाणे मला वाटतं की आमची खूप जुनी जान-पहचान आहे. कारण तिकडे विवेकजी तुमच्या समूहावर माझी हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातली गाणी पाठवायचे आणि इकडे लगेच ती गाणी सुलभाताई मला पाठवत असत.सगळी गाणी मी मनापासून ऐकली आहेत.  मला असं वाटायचं की माझी स्मरणशक्ती चांगली आहे आणि मी गायलेली सगळीच गाणी मला आठवतात. पण विवेकजींच्या गाणी पाठवण्याच्या सिलसिल्यानंतर काही वेळा मला वाटलं -हे गाणं आपण गायलंय? कधी गायलंय? काही वेळा माझी गाणी मला आकाशातल्या ताऱ्यांसारखी वाटतात. त्या ताऱ्यांचा प्रकाश खूप लांबून आल्यासारखा वाटतो. पण अशी कोणी गाणी पाठवली की अचानक एकेका  गाण्याचा तारा चमकतो आणि माझा संपूर्ण दिवस उजळून टाकतो.  मग  त्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगशी  जोडल्या गेलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . तेव्हाचे दिवस आठवतात -ते कष्ट आणि ती मजा तो आनंद मी पुन्हा अनुभवते ! यासाठी विवेकजी मी तुमची आभारी आहे ! तुमच्यासारखे दर्दी, रसिक आहेत म्हणून आम्हां कलाकारांचं गाणं अजूनही टिकून आहे ! विवेकजी तुम्हांला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! तुमचं काम असंच चालू ठेवा!" 

समूहावर पुन्हा एकदा शांतता! एका अविस्मरणीय क्षणाचे आपण साक्षीदार आहोत अशी प्रत्येकाची भावना! ही शांतता सुलभाताईंनी विवेकजींना समूहावर आमंत्रित करून भेदली आहे. "विवेकजी...या आता समूहावर! इतकं काय संकोचून जायचं ते !" 

विवेकजी ऑनलाईन आहेतच! एकदम भारावलेले!

विवेकजी: काय बोलू ?इतके दिवस एवढे परिश्रम घेऊन लताजींची गाणी मी टपालत  

होतो. कधी कोणी प्रतिसाद द्यायचे. कधी अपेक्षेइतका प्रतिसाद मिळायचा नाही. पण व्रतस्थाप्रमाणे मी माझं काम चालू ठेवलं. त्याचं इतकं चीज होईल याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती! साक्षात लता मंगेशकर यांच्याकडून शाबासकीची थाप! आणखी काय पाहिजे! एखाद्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापेक्षा याचं मोल जास्त आहे. सुलभाताई तुमचे आभार कसे मानू? मी या ऋणात राहणेच पसंत करेन. 

खरं तर मी समूहावर आज अजिबात यायचं नाही असंच ठरवलं होतं. आजच्या दिवशी माझे आवडते तीन रेगे- सदानंद, पु शि आणि मे पुं यांचं वाचावं, तसंच समूहात परीक्षण करण्यात आलेलं  'नदीष्ट' पुस्तक आणून वाचावं असं ठरवलं. तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छांचे मेसेज मी वाचतही होतो. डॉ पुसाळकरांनी जे काही केलंय ते काही माझ्या नजरेतून सुटलेलं नाही. मी रागाने काहीतरी लिहणारही  होतो एवढ्यात सुलभाताईंची पोस्ट समूहावर येऊन पडली. त्यामुळे डॉ पुसाळकरांना खरं तर लता मंगेशकरांनीच वाचवलं आहे!

समूहातील सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार ! या निमित्ताने बरेचजण समूहावर व्यक्त झाले हे चांगलं झालंय. असेच सगळे व्यक्त होत राहा आणि हो.. फक्त आजच्या दिवशी मी डॉ पुसाळकरांसारख्यांचं नियम मोडणं खपवून घेतलंय. इथून पुढे असं पुन्हा करू नका! का परत समूहाची नियमावली सर्वांसाठी देऊ? 





Thursday 1 July 2021

कोव्हिड आणि हिंदी सिनेमा: एक फॅंटसी

 (आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. पर्याय २०२० च्या ऑनलाईन अंकातील माझा हा लेख ब्लॉग  स्वरूपात देत आहे )

सिनेमा हा समाजात घडणाऱ्या इष्ट/अनिष्ट गोष्टींचं  प्रतिबिंब असतो की सिनेमा समाजाला  एवढा प्रभावित करतो की त्यामुळे समाजात इष्ट/अनिष्ट गोष्टी घडत राहतात हा एक चिरकालीन वाद आहे. यात दोन्ही बाजूंनी बोलायला बराच वाव आहे. यातली कुठलीही एकच बाजू वरचढ ठरेल असं नाहीअगदी जसं लता मंगेशकर श्रेष्ठ की आशा भोसले हा वाद अनिर्णित राहण्याचीच  शक्यता जास्त तसंच याही विषयाच्या बाबतीत म्हणता  येईल

 

सध्या सगळं जग कोव्हिड आजाराच्या वैश्विक साथीमधून संक्रमण करत आहे. या साथीचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वच आघाड्यांवर झाला आहे. कोव्हिडचा काळ ही काळाची एक घुसळण आहे. त्यातून गेल्या महिन्यांत आपण कधीही कल्पनासुद्धा केलेले वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील अनुभव गाठीशी बांधत आहोत. या अनुभवांना वाचा फोडणारं माध्यम हे केवळ समाज-माध्यम यापुरतंच सीमित राहणार नाही. कोव्हिडची साथ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन त्याभोवती गुंफलेले कथा-कविता-नाटक-सिनेमा हेही हळूहळू पण निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतील

ते आपसूक होईलच.. पण तोवर आपण थोडा कल्पनाशक्तीला ताण देवू या ...थोडं टाइम मशीन वापरून मागे जाऊ या ... म्हणजे कोव्हिडचा हाच काळ जर ५०-६० वर्षांपूर्वी असता तर आपले हिंदी सिनेमे कसे बनले असते? सिनेमावर कोव्हिडची सावली कशी पडली असती? कोव्हिडच्या कॅनव्हासवर त्या त्या कालानुरूप कोणता विचार करून सिनेमे तयार झाले असते?शिवाय जे सिनेमे त्या काळाचा लँडमार्क ठरले ते सिनेमे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर कसे वेगळे झाले असते?  हे थोडंसं आत्याबाईला जर मिशा असत्या तर... असं वाटेल पण विचार केला तर हा प्रवास मनोरंजकही होईल... 

तर मग सुरु करूया  हा प्रवासआपले सगळ्यांचे परिचित सिनेमे कोव्हिडमुळे कसे प्रभावित झाले असते ते बघूया ... अर्थातच यात लेखाला जागेच्या मर्यादा असल्यामुळे सगळ्या सिनेमांचा आढावा घेणं शक्य नाही तसंच यात मला आवडणाऱ्या सिनेमांचा विचार प्रामुख्याने होणार हेही खरंच! जर हा लेख वाचून तुम्हांला आवडलेल्या सिनेमांचा यादृष्टीने विचार तुम्ही करू लागला तरी हा लेख लिहिण्याचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल

आपला पहिला सिनेमा हा मूकपट होता 'राजा हरिश्चंद्रजो १९१३ साली प्रदर्शित झाला तर पहिला बोलपट, 'आलम आरा१९३१ साली आला. सुरुवातीच्या काळातील सिनेमांवर पौराणिक कथांचा प्रभाव होता. तेव्हा त्या काळात कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सिनेमा काढायचा असता तर नक्कीच तशा कथानकांचा आधार घेतला गेला असता. कदाचित कोव्हिड आजार ही एका राक्षसाची मायावी जादू आहे ज्यामुळे अचानक लोक मरून पडत आहेत असंही  दाखवण्यात आलं असतं. अशा दुष्ट प्रवृत्तींवर सुष्ट शक्तींचा विजय अशा काहीशा त्या कालानुरूप भोळ्याभाबड्या कथा सिनेमांतून दाखवण्यात आल्या असत्या. याच काळात प्रभात फिल्म कंपनीच्या वतीने दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी काही सामाजिक आशयाचे आणि समाजात सकारात्मकता रुजवणारे चित्रपट निर्माण केले होते. त्या काळात कोव्हिडची साथ असती तर व्ही शांताराम यांनी कोव्हिडच्या आजारातून मृत्यूच्या दाढेपर्यंत जाऊन सुखरूप बाहेर आलेल्या एखाद्या पेशंटचा प्रवास दाखवून समाजातली साथीबद्दलची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांचा 'पडोसी'(मराठीत 'शेजारी')(१९४१हा सिनेमा हिंदू-मुस्लिम शेजाऱ्यांवर बनता कोव्हिडच्या साथीतही एकमेकांची साथ सोडणाऱ्या शेजाऱ्यांची कथा मांडून गेला असता

तर सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांनी गायलेलं

दुख के अब दिन बितत नाही

सुख के दिन एक स्वप्न था 

अब दिन बितत नाही-

'देवदास'(१९३५या चित्रपटातलं हे गाणं कोव्हिडच्या काळात एक वेगळाच अर्थ घेऊन आलं असतं

१९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि देशभर एक नवी उमेद, नवा उत्साह, आदर्शवाद आणि ध्येयवाद यांचं वातावरण तयार झालं. याच काळात हिंदी सिनेमात तीन नायकांचा उदय झाला- चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळताजुळता अभिनय आणि प्रेमकथांना थोडीशी सामाजिक पार्श्वभूमी असणारे चित्रपट देणारा राज कपूर, रोमँटिक चॉकलेट बॉय देव आनंद आणि ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.या तिन्ही दिग्गज कलाकारांच्या ऐन बहराच्या काळात कोव्हिड सारख्या साथीने थैमान घातलं असतं तर तिघांचेही या पार्श्वभूमीवरचे सिनेमे नक्कीच आले असते आणि तेही त्यांच्या त्यांच्या प्रकृतीला अनुसरून! म्हणजे राज कपूरने त्याच्या 'आवारा' (१९५१) किंवा 'श्री ४२०' (१९५५) या सिनेमात कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी आणि त्यात नायक बेरोजगार होणे आणि त्यानंतर  त्याने पाकिटमारी किंवा फसवाफसवीच्या उद्योगांना लागणे असं कथानक घेतलं असतं. तर तिकडे देव आनंदने कोव्हिडच्या साथीच्या काळात नायक नायिकेमध्ये निर्माण होणारं, फुलत जाणारं प्रेम दाखवणारा,  त्यात काही अनपेक्षित वळणं येऊनही and they lived happily ever after असा सुखान्त दाखवणारा सिनेमा काढला असता. दिलीपकुमार अभिनित 'नया दौर'(१९५७) या चित्रपटात शहरीकरणामुळे मानव विरुद्ध मशीन असं द्वंद्व निर्माण होणं आणि त्यात त्या गावातल्या सर्वांच्या एकत्रित सहभागामुळे आलेल्या संकटावर मात करणं असं कथानक होतं. तर कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने गाव कसा सामना करतं असं हा सिनेमा दाखवून गेला असता आणि 

 


                       



'नया दौर'

साथी हाथ बढाना 

एक अकेला थक जायेगा 

मिलकर बोझ उठाना 

 

असं गावकरी श्रमदानाने कोव्हिड हॉस्पिटल उभारताना गाणं गात आहेत असं दाखवण्यात आलं असतं

१९५०-६० आणि त्यानंतरची काही वर्षे या काळात भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण, कृषिप्रधान देशाच्या समस्या, शहर-गाव यातील संघर्ष यावर प्रकाश टाकणारे अभिजात सिनेमे जेवढे निघाले तेवढे त्यानंतर क्वचितच बघायला मिळाले. त्याची काही ठळक उदाहरणे म्हणजे -'दो बिघा जमीन',(१९५३) 'मदर इंडिया'(१९५७) 'गंगा जमुना'(१९६१), 'जिस देश में गंगा बहती है' (१९६०)  आणि 'तीसरी कसम' (१९६६). या सर्वच सिनेमांमधून आपल्याला खेडेगावांत  या

कोव्हिडच्या साथीमुळे  तिथल्या नातेसंबंधांवर होणाऱ्या   परिणामांचं तसंच  शहरांतल्या नोकऱ्या गमावल्यामुळे  आपल्या मूळ गावी परत चाललेल्या स्थलांतरित मजुरांच्या समस्येचं संवेदनशीलतेने चित्रण करण्यात आलेलं बघायला मिळालं असतं.भूक, बेरोजगारी, डोक्यावर सततची अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ताण-तणावांचं चित्रण अशा सिनेमांमधून  झालं असतं.  कोव्हिडमुळे झालेल्या आपल्या पतीच्या निधनानंतर तीन मुलांना शहरातून गावी  घेऊन जाताना येणारे विदारक अनुभव आणि सुखीलालासारख्या  सावकाराकडून होणारं शोषण पचवून प्राप्त परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन मुलांना वाढवणारी राधा(नर्गिस) असं 'मदर इंडिया' चं कथानक आणखी गहिरं आणि मनाला भिडणारं झालं असतं.

१९५०-६०  दशकाचा विचार करत असताना 'प्यासा' या १९५७ सालच्या क्लासिक आणि लँडमार्क सिनेमाचा ठळक उल्लेख करावाच लागेल. 'प्यासा' ही लौकिक अर्थाने अयशस्वी पण मनाने संवदेनशील असलेल्या एका कवीची तरल भावकथा आहे

बदनाम वेश्यावस्तीतून जात असताना तिथलं चित्र बघून ज्या कवीला-

ये सदियों से बेखौफ सहमीसी गलियां 

ये मसली हुई अधखिली जर्द कलियां 

ये बिकती हुई खोखली रंगरलियां 

जिन्हें नाराज है हिंद पर वो कहां हैं 

असं मर्मभेदक काव्य(मूळ काव्य- साहिर लुधियानवी) सुचतं, त्याला तर कोव्हिड आजार आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर तेवढंच हृदयद्रावक काव्य सुचलं असतं यात काहीच शंका नाही !

या कालखंडातून पुढे जाता जाता 'वक्त'(१९६५) या सिनेमाचा उल्लेख करावा लागेल. हिंदी सिनेमात लॉस्ट अँड फाऊंड या थीमला प्रतिष्ठा किंवा राजमान्यता देणारा हा सिनेमा! मूळ सिनेमात भूकंप झाल्यामुळे परिवाराची ताटातूट होते आणि सगळ्यांची बऱ्याच  काळानंतर भेट होते त्यामुळे शेवट अर्थातच गोड होतो. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर भूकंपाऐवजी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सगळ्यांची ताटातूट होते असंही कदाचित दाखवण्यात आलं असतं

पुढच्या काळात कथानकाइतकंच महत्त्व अभिनेत्यांना मिळू लागलं. तसंच  या अभिनेत्यांचे संवादही गाजू लागलेएक सुपरस्टार पद्धतही  रुजली. त्याचे पहिले मानकरी होते राजेश खन्ना! त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जर कोव्हिडची साथ असती तर त्यांच्या  'आनंद' या  सिनेमात नायक आनंद याला Lymphosarcoma of the intestine हा भलं मोठं नाव असलेला कॅन्सर होता आधी कोव्हिड आणि कोव्हिड पश्चात एखादी गुंतागुंत होऊन त्याचा मृत्यू असं दाखवलं असतं. आनंदचं हसतखेळत मृत्यूला सामोरं जाणं आणि शिवाय त्याचा अचानक होणारा मृत्यू आणखी चटका लावून गेलं असतं.



 'आनंद' सिनेमातले - "बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये...लम्बी नहीं " किंवा "बाबूमोशाय... जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है... उसे ना तो आप बदल सकते हैं  ना मैं.. हम सब रंगमंच की  कठपुतलिया हैं जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है !" हे संवाद किंवा 

जिंदगी कैसी है पहेली हाय 

कभी तो हसाये 

कभी ये रुलाये 

हे गाणं कोव्हिडच्या संदर्भातही अगदी चपखल बसलं असतं

राजेश खन्ना यांचा काळ संपून त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं. साधारण 'आनंद' सिनेमापासूनच त्यांची कारकीर्द बहराला आली आणि पुढे कितीतरी सिनेमे केवळ अमिताभ बच्चन या नावावरच चालले. त्यामुळेच कितीही अकल्पित गोष्टी असल्या तरी त्या अमिताभ बच्चन सिनेमात  आहे म्हणून त्या खपून जात. उदाहरणच द्यायचं झालं तर मनमोहन देसाई यांचा १९७७ साली आलेला एक मसाला सिनेमा- अमर अकबर अँथोनी. या आधी वक्त सिनेमाच्या निमित्ताने लॉस्ट अँड फाऊंड या थीमचा उल्लेख केला होता. मनमोहन देसाई यांनी अमर अकबर अँथोनी मध्येही याच थीमचा उपयोग केला आहे

 




अमर अकबर अँथोनी : आद्य प्लाज्मा थेरपी 

आपण सध्या कोव्हिडच्या उपचारांमध्ये प्लाज्मा थेरपीचा वापर होतो हे ऐकलं आहे. पण त्या सिनेमाच्या वेळी कोव्हिड असता तर मनमोहन देसाईंनी  नक्की निरुपा रॉय (तिघा हिरोंची आई ) यांना हे तिघे भाऊ कोव्हीड मधून बरे होऊन प्लाज्मा देत असल्याचं दाखवलं असतं ! म्हणजे मनमोहन देसाई हे काळाच्या किती पुढे होते पहा

असं म्हणतात की अमिताभ बच्चन यांच्या १९७५ सालच्या 'शोले' या सुप्रसिद्ध सिनेमात गब्बरसिंग या खलनायकाच्या भूमिकेसाठी अमजदखान यांच्या आधी अभिनेते डॅनी डेंगझोपा यांचा विचार झाला होता. कोव्हिड आजाराचं मूळ चीनमध्ये आहे आणि हा आजार कोणीतरी मुद्दाम पसरवला आहे असा एक मोठा मतप्रवाह आहे. हा आजार म्हणजे थोतांड किंवा एक षडयंत्र आहे असं मानणारे आजही आहेत. जर 'शोले' च्या काळात याच षड्यंत्राची थेअरी प्रचलित असती तर अमजदखानऐवजी डॅनी यांचीच वर्णी 'शोले'मध्ये लागली असती आणि सिनेमाचा  बाज पूर्ण बदलून गेला असता. गब्बरसिंग हा रांगडा, राकट, गावठी  दरोडेखोर नसता तर एक पाताळयंत्री, आधुनिक आणि धूर्त व्हिलन दाखवला गेला  असता ज्याने  भारतात हा विषाणू पसरवून देशाचं नुकसान केलं असतं

१९७०-८० च्या दशकात बऱ्याच सिनेमांमध्ये खलनायकाच्या अवैध कामांमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे तस्करी (स्मगलिंग) हे असे. त्यातही सोन्याची तस्करी हा मुख्य धंदा कारण वैध मार्गांनी तेव्हा सोनं आणायला परवानगी नव्हती ! कोव्हिडचा तेव्हा प्रभाव असता तर सोन्याऐवजी कोव्हिडच्या औषधांचा


                        



"मेरे पास ….”

काळाबाजार, तस्करी असं काहीतरी दाखवलं गेलं असतं. असाच काहीशा गैरमार्गांनी श्रीमंत झालेला विजय (चित्रपट- दीवार,१९७५) मग त्याच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणाऱ्या रवी या भावाला चिडून म्हणाला असता - "आज मेरे पास रेमडेसेव्हिर है, अझिथ्रोमायसिन है, डेक्सा है आयव्हरमेक्टीन है टोसिलीझूमब है ... क्या है तुम्हारे पास?" आणि मग रवीने शांतपणे उत्तर दिले असते- "मेरे पास व्हॅक्सिन है" किंवा "मेरे पास मास्क है !" 

याच प्रकारे 'शान' (१९८०) मधला शाकाल(कुलभूषण खरबंदा )  किंवा १९८६ सालच्या कर्मा चित्रपटातला 'डॉ डांग'(अनुपम खेर) आणि १९८७ सालच्या 'मिस्टर इंडिया' मधला मोगॅम्बो ( अमरीश पुरी) या सिनेमांमधले खलनायक हे कोव्हिडचा विषाणू भारतात सोडणे, मुलांपर्यंत कोव्हिडची लस पोचू देणे वा लसीच्या नावाखाली नकली औषध देणे यासारखी क्रूरकर्मे करून देशावर संकटांची मालिका लावून वर परत "मोगॅम्बो खुश हुआ" या सारखे संवाद विकट हास्य करत म्हणते झाले असते. आणि अर्थात सिनेमातले सर्व नायक या दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून देशाचे तारणहार झाले असते. म्हणजे जो  दुष्ट-सुष्ट प्रवृत्तींमधला सिनेमाच्या सुरवातीच्या काळातला दाखवला गेलेला लढा याही काळात दाखवला गेला असता. फक्त तो एका भव्य स्वरूपात आणि प्रेम-विरह-नाच-गाणी-मारामारी-हिंसा या सर्व मालमसाल्यासह !

१९९०-२००० या दशकातले दोन प्रमुख सिनेमे कोव्हिडची साथ त्याकाळात असती तर खरोखरंच निर्माण तरी झाले असते का असा प्रश्न आहे. १९९५ साली आलेल्या  'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात नायक नायिका राज आणि सिमरन हे लंडनहून युरोप प्रवास करतात, तिथे प्रेमात पडतात, नंतर परत लंडन आणि त्यानंतर डायरेक्ट एकदम पंजाबमधली मोहरीची शेतं.. तिथली भाषा.. वगैरे वगैरे... जिथे कोव्हिडसाठी निर्बंध घातलेल्या लॉकडाऊनमुळे साधा पुणे-मुंबई प्रवाससुद्धा दुरापास्त झाला आहे तिथे हा सगळा जगप्रवास करणं केवळ अशक्यच

एकवेळ 'दिलवाले..' कालानुरूप  बदल करून बनवता येईल, पण १९९४ सालचा 'हम आपके हैं कौन’ हा सिनेमा कोव्हिडच्या प्रभावामुळे किती बदलावा लागला असता  याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. अहो इथे यांच्या सध्या घरगुती क्रिकेटच्या डावातसुद्धा आयपीएल पेक्षा जास्त प्रेक्षक असतात..

'हम आपके हैं कौन": अबबएवढी माणसं !

 


 

कुठलीतरी  फुटकळ नटी शिरा करते(तोही फ़सलेलाच !)  तो खायला घरात गावजेवणाला असते त्यापेक्षा जास्त गर्दी असते.. साखरपुड्यापासून बारश्यापर्यंत (व्हाया लग्न -डोहाळजेवण) सगळ्या समारंभांना हजारोंची उपस्थिती असते... सोशल डिस्टंसिंग वगैरे पाळून  हे कसं काय करता आलं असतं? उलट यातला प्रत्येक समारंभ एक सुपर स्प्रेडर इव्हेन्ट झाला असता! सरकारकडून प्रत्येक समारंभाची परवानगी काढायला मामाजींना(अजित वाच्छानी) जावं लागलं असतं तेव्हा सरकारने उदार अंतःकरणाने यांच्या घराबाहेर परवानगीसाठीचा  एक कायमस्वरूपी काऊंटरच उघडला असता ! कोव्हिडचे दोन फायदे या सिनेमासाठी झाले असते. यातला एक फायदा समस्त भारतीयांसाठी झाला असता असं गृहीत धरायला हरकत नाही! पहिला सिनेमापुरता फायदा म्हणजे जेठानी पूजा (रेणुका शहाणे) पायऱ्यांवरून पडून मरते असं दाखवण्याऐवजी ती कोव्हिडमुळे दगावते असं दाखवलं असतं तर ते जास्त पटलं असतं. दुसरा जगभरातील समस्त भारतीयांसाठीचा फायदा म्हणजे कोव्हिडमुळे गर्दीवर नियंत्रण आलं असतं तर या लग्नाआधीचा नवरदेवाचे बूट लपवण्याचा विधी होऊच शकला नसता आणि पुढे प्रत्येक लग्नात होणारा बूट पळवापळवीचा अगदी रग्बीच्या तोडीसतोड होणारा खेळ तरी वाचला असता

अलीकडच्या काळात हिंदी सिनेमांमधून राष्ट्रवादाची लाट बघायला मिळते. पूर्वी तशी ती मनोजकुमार यांच्या सिनेमांमधून बघायला मिळाली होतीच. पण आता मनोजकुमार यांच्यकडून हा वारसा मिळवून सनी देओलअक्षयकुमार, अजय देवगण, विकी कौशल, जॉन अब्राहम या सारख्या नटांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या प्रकारच्या सिनेमांवर कोव्हिडचा कसा परिणाम झाला असता? यातल्या कोणीतरी कोरोना योद्धे म्हणून गौरवलेल्या डॉक्टरांवर सिनेमा काढला असता का? जरा शंकाच वाटते. कारण डॉक्टरांच्या या फ्रंटलाईन कामगिरीला काही ग्लॅमर नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिस  नाणं खाणखाणेल याची शाश्वती नाही. शिवाय डॉक्टरांच्या  त्या कामगिरीमुळे तुमचं रक्त उसळेलच, तुमच्यात वीरश्री संचारेल असं नाही

कदाचित डॉक्टरांवर याआधी आलेल्या सिनेमांतून कोव्हिडच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची  वेगळ्या प्रकारे दखल घेतली गेली असती. मग तो १९६० सालचा 'अनुराधा' असेल अथवा अलीकडचा(२००३ सालचा)  'मुन्नाभाई एमबीबीएस' असेल

तसंच 'नायक' (२००१) या सिनेमाचा उल्लेख करावासा वाटतो. यात  पत्रकार शिवाजी (अनिल कपूर) च्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून मुख्यमंत्री बलबीर चौहान (अमरीश पुरी ) त्याला आव्हान देतो की तू एक दिवस मुख्यमंत्री होऊन दाखव मग तुला कळेल की सरकार चालवणं किती अवघड गोष्ट आहे. पत्रकार हे आव्हान स्वीकारतो आणि एका दिवसात कामाचा झपाटा लावून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतो. कोव्हिडच्या काळात याच मुख्यमंत्र्याने( किंवा हाच मुद्दा पुढे नेऊन औटघटकेच्या पंतप्रधानाने)  लोकांच्या समस्यांकडे सहृदयतेने बघितलं असतं.. तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले असते. आज भारतात दर १०,००० लोकसंख्येमागे हॉस्पिटलच्या फक्त खाटा उपलब्ध आहेत आणि फक्त डॉक्टर्स आहेत. हे चित्र बदलण्यासाठी देशाने आरोग्यसेवेवर सध्यापेक्षा (जीडीपीच्या सुमारे .२९ % ) कितीतरी जास्त पटीने गुंतवणूक करणं अत्यावश्यक आहे. कोव्हिडमुळे आपल्या आरोग्यव्यवस्थेमधल्या त्रुटी प्रकर्षाने दिसून आल्या. त्या दूर करण्याचा प्रयत्न सिनेमात का होईना बघणे आश्वासक ठरले असते !

आपण  इतका वेळ टाइम मशीन वापरून पूर्वीच्या सिनेमांवर कोव्हिडचा कसा प्रभाव झाला असता याचा धावता आढावा घेतला असता. पण हेच टाइम मशीन वापरून आपण भविष्यात किंबहुना कोव्हीडोत्तर काळात सिनेमांवर काय परिणाम बघितलं तर ते चित्र कसं असेल? कोव्हिडमुळे आपलं आयुष्य कायमचंच बदललं आहे आणि आणखी बदलत  जाणार आहे. मग आपले सिनेमे देखील त्याला कसे अपवाद ठरतील? त्यामुळे सिनेमाच्या कथानकापासून ते कलाकारांपर्यंत, वेशभूषेपासून ते गाण्यांपर्यंत सर्व काही बदलणार आहे. पूर्वीच्या सिनेमांत डोळे, चेहरा, केशसंभार, भुवया, पापण्या, ओठ सौंदर्याची वर्णनं करणारी गाणी असायची. आतापासून हे सगळं बादच होणार! संपूर्ण चेहरा मास्कने झाकला गेल्यावर गाण्यांमधून कुठल्या सौंदर्याचं वर्णन केलं जाणार? की हिरो म्हणणार- " हाय तुम्हारे लाल मास्कने मेरा दिल ले लिया"? हल्लीच्या प्रत्येक सिनेमात आयटम सॉन्ग असतंच. या कोव्हिडमुळे त्यात असे काही बदल होतील -

"क्यों करते हो covid  covid 

मेरा heart beat करे है rapid rapid 

आजा जल्दी बुलेटपे होके सवार 

सोशल डिस्टंसिंग को धक्का मार

 किंवा 

"इश्क का व्हायरस 

है फैला इस जहाँ में 

दिल की इकॉनॉमी है डाऊन 

ना दवासे  ना vaccine से 

इसका ट्रीटमेंट तू कर सिर्फ प्यार सेवगैरे... 

 

आजपर्यंत सिनेमांमध्ये सत्य-असत्याचा, चांगल्या विरुद्ध वाईटाचा सामना होत असे. आणि दोन्ही प्रवृत्ती तुम्हांला प्रत्यक्ष बघायला मिळत. पण यात येणाऱ्या सिनेमांमध्ये शत्रू जास्त चलाख/धूर्त झालेला बघायला मिळेल. तो अदृश्य असेल आणि तरीही  लोकांना मारेल/नामोहरम करेल आणि हिरो, नव्हे अशा शत्रूचा नाश करायला सुपरहिरोच लागेल, वेगवेगळ्या युक्त्या/क्लुप्त्या वापरून शेवटी या शत्रूवर विजय मिळवेल. हा हिरो कदाचित डॉक्टरही असेल जो आधी सर्वसामान्यांसाठी काम करणारा असेल पण अशा व्हायरसचं संकट आल्यावर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी तो हे आव्हान स्वीकारेल. त्याची लढाई रक्तरंजित नसेल. म्हणून अशा हिरोची हत्यारं पिस्तूल/रॉकेट लॉन्चर,बॉम्ब वगैरे नसतील तर ती असतील गोळ्या/इंजेक्शन, व्हेंटिलेटर . सध्याच्या राष्ट्रवादाच्या सिनेमांच्या काळात शत्रूराष्ट्र म्हणून पाकिस्तान दाखवलं जातं. पण आता ते बदलून शत्रूराष्ट्र चीन होईल तसेच तिथल्या हायटेक लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ व्हिलन असतील जे असे प्राणघातक व्हायरस निर्माण करतील आणि लोकांमध्ये सोडतील. पूर्वी आपल्या पृथ्वीला धोका अणुयुद्धाचा होता. पण कोव्हीडोत्तर काळात हा धोका जैविक युद्धांचा असेल असं सिनेमांमधूनही दाखवलं जाईल.  म्हणजेच येणाऱ्या काळातले सिनेमे हे युद्धपट किंवा साय-फाय (Science fiction) या प्रकारचे असतील. सिनेमांमध्ये साहस दृश्यं तर असतीलच.. अगदी चीनपर्यंत जाऊन तिथल्या लॅबोरेटरीमधल्या शास्त्रज्ञांना पकडणे  आणि त्यांचा कट  उघडकीस आणणे वगैरे हेही दाखवण्यात येईल. . फक्त या साहसपटांमध्ये हिरोईनचं स्थान आक्रसलेलंच असेल की काय अशी शंका येते. संपूर्ण सिनेमात हिरोईनचं काम हे फक्त कथानकातील ताण सैल करण्यासाठीच की काय असंही वाटतं. मग त्यासाठी एखाद्या स्त्रीवादी दिग्दर्शिकेनं सिनेमा बनवला तर हिरोईनला हिरोच्या बरोबरीने स्थान मिळेल. ती त्याला भक्कम साथ देईल... कदाचित ती  डॉक्टर असेल किंवा समाजासाठी झटणारी एक प्रामाणिक कार्यकर्ती अथवा एखादी कमांडो देखील

कोव्हिडोत्तर काळात भय आणि असुरक्षिततेचं वातावरण कायम राहणार आहे. एक अनिश्चितता असणार आहे. निदान सिनेमांमधून या प्रश्नावर काल्पनिक उत्तर, शत्रूवर मात आणि एक सकारात्मकता निर्माण होईल जी आपलं वास्तवातलं आयुष्य थोडा काळ का असेना सुसह्य करेल! सिनेमांकडून नाहीतरी आपल्याला आणखी काय हवं असतं ?!