Sunday 27 December 2020

हरिणीचे पाडस..

 

फोटोग्राफीच्या नियमांप्रमाणे बघितलं तर हा काही खूप चांगला फोटो आहे असं नाही. पण तरीही हा फोटो मनात रूतून बसला आहे आणि आज जवळपास दहा वर्षांनी जरी त्या फोटोकडे पाहिलं तरी तो फोटो काढला होता तेव्हाची आठवण ताजी होते. हा फोटो आहे चितळ जातीच्या हरणाच्या पाडसाचा आणि हा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मधला आहे. 
प्रत्येक जंगलाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचंही आहे. उत्तराखंडमध्ये नैनीताल जवळ हिमालयाच्या कुशीत असलेलं, छोटे-मोठे डोंगर, विस्तीर्ण पठार आणि त्यावरील गवताची कुरणे, प्रामुख्याने साल या पानगळीच्या झाडाचं जंगल आणि मुख्य म्हणजे मोठा तलाव आणि जंगलातून जाणारी प्रवाह बदलणारी मोठी रामगंगा ही नदी! 


या फोटोमधल्या पाडसाचा ड्रोनने फोटो काढला असता तर तो पाडसाच्या भोवतीचं वातावरण अधिक गडद करून गेला असता. फोटो थोडासा जवळून पाहिला असता त्या पाडसाच्या आगे मागे दगड गोटे दिसतील. नदीच्या कोरड्या ठाक पात्रात हे असे लहान मोठे दगड होते. ते पाडस किनाऱ्यावर झाडाझुडुपांमध्ये लपून होते. नदीपात्रावरून जाणारया रस्त्यावरून जाताना आम्हांला हे पाडस दिसलं आणि आम्हांला बघताच आधीच घाबरलेला तो कोवळा जीव आणखी भेदरला, त्याचवेळी काढलेला हा फोटो! जवळपास वीस पंचवीस मिनिटं आम्ही तिथे थांबलो होतो. तिथल्या त्या नीरव शांततेत त्या पाडसाकडे बघत होतो. एवढ्या भव्य, भयावह वातावरणातही सगळ्यात जास्त कशाने लक्ष वेधून घेतलं असेल तर त्या पाडसाच्या निरागस, असुरक्षित भाव असलेल्या डोळ्यांनी!  ते पाडस एकटंच होतं. आम्हांला आजूबाजूला कुठेही त्याची आई किंवा चितळाचा कळप दिसला नाही. आणि त्या पाडसाच्या देहबोलीवरून असं वाटत नव्हतं की याची नुकतीच त्याच्या कळपापासून फारकत झाली आहे. आदल्याच दिवशी आम्ही एक हत्तीण आणि तिचं पिल्लू स्वछंदपणे चरताना आम्ही बघितले होते. 













त्या पार्श्वभूमीवर हे असं एकटं, एकाकी पाडस बघून कसंसं वाटलं. 
हे कशामुळे झालं असेल यावर आमची सफारी मधल्या गाईड आणि ड्रायव्हर बरोबर चर्चा चालू होती. त्यांच्या मते आदल्या दिवशी एका वाघाने या पाडसाच्या आईला मारून फस्त केलं होतं. खरं खोटं कोणाला माहित होतं? आणि त्याची खातरजमा करणंही केवळ अशक्य होतं‌. स्वसंरक्षणासाठी पळायची वेळ आली तर तेवढं पळण्यासाठी पायांत बळही नसलेल्या या प्राण्याचं भवितव्य तसं कठिणच वाटत होतं. आईवर सर्वस्वी अवलंबून असलेल्या वयाचा पण आता आईविना पोरका झालेला हा जीव या जंगलाच्या एकंदर उतरंडीत टिकणं अवघडच होतं. अशा कमकुवत, परावलंबी, कमजोर प्राण्यांवर शिकारी श्वापदांची नजर जाते आणि ते त्यांचं खाद्य होतात. हा आपल्याला माणूस म्हणून कितीही क्रूर वा निष्ठुरपणा वाटला तरी तो एक निसर्ग नियमच आहे. 

साधारण अर्धा तास तिथे थांबल्यावर तिथून पुढे जाणे आम्हांला भाग होते. त्या पाडसाचे पुढे काय झाले हे अर्थातच कळलं नाही. कदाचित ते एकटं जगायला शिकलंही असेल का? अशक्य कोटीतील ती गोष्ट होती पण तसं व्हावं अशी मनोमन इच्छा मात्र होती. या पाडसाच्या  गोष्टीने अपूर्णतेची हुरहूर लावली एवढं मात्र नक्की! जंगलाच्या उदरात अशा अनेक कथा रोज जन्माला येत असतात. आपण जंगल सफारीला गेल्यावर फक्त वाघ बघण्याचाच हट्ट ठेवला तर आपण तो वाघ दिसेपर्यंत गाड्या सुसाट पळवत राहू पण त्याचवेळी वाटेत येणारे हे छोटे अनुभव मात्र आपल्या हातून निसटून जातील. 

जाता जाता एवढंच सांगेन की जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या आमच्या सहा सफारींमध्ये आम्हांला एकदाही वाघ दिसला नाही पण तरीही या पाडसामुळे आमची ट्रिप संस्मरणीय ठरली!

Thursday 24 December 2020

उचलली जीभ...

कुठल्याही आजारी व्यक्तीला पेशंट म्हटलं जातं यामागे ती व्यक्ती त्या आजाराच्या (किंवा काहीवेळा उपचारांच्या देखील!) वेदना भोगत असते हे कारण तर आहेच, पण माझ्या मते याबरोबरच ती व्यक्ती आजारपणामुळे भेटीला आलेल्या स्वघोषित हितचिंतकांचा अतिशय धीराने आणि संयमाने सामना करत असते हे सुद्धा आहे ! कित्येकदा तर पेशंटला असंही वाटून जात असावं की एकवेळ हे आजारपण परवडलं पण भेटायला येणारे तऱ्हेवाईक लोक नकोत ! इतकं नको नको करून सोडतात हे लोक! आजारपणात सगळ्यात कुठली गरज असते तर ती विश्रांती आणि मन:शांतीची ! पण भेटायला येणाऱ्या लोकांना नेमक्या याच गोष्टींचा विसर पडतो आणि ते भेटायला येऊन पेशंटचं हित कितपत साध्य करू शकतात असा विचार मनात येऊन जातो. 

सर्वसाधारणपणे अशा लोकांचे काही प्रकार असतात. माझ्या निरीक्षणात पुढील प्रकार दिसून आले आहेत. आणखीही काही नक्कीच असतील-

१) सर्वज्ञ - या प्रकारच्या लोकांना सगळ्या विषयांमधलं सगळंच कळतं आणि आपल्याला किती कळतं हे इतरांना दाखवून देण्यात यांची बरीच शक्ती खर्च होत असते. बहुतांशी गुगल वरून वा व्हॉट्सअँप विद्यापीठातून प्राप्त झालेले ज्ञानकण उधळायची यांना खुमखुमी फार ! बद्धकोष्ठता असो की त्यामुळे उद्भवणारं अवघड जागेचं दुखणं, हृदयविकार असो वा संधिवात ! सर्व आजारांचं निदान आणि त्यावरील उपचार यांच्याकडे उपलब्ध असतात !

२) फिरतं मोफत सल्ला केंद्र - प्रकार क्रमांक १ ची ही पुढची पायरी ! कोणी यांचं मत/सल्ला मागो अथवा न मागो, हे सल्ला दिल्याशिवाय राहणारच नाहीत ! आणि हा सल्लाही इतका आत्मविश्वासपूर्वक देतात की एखादा पेशंट गांगरून जायचा - 'मी उगाच हॉस्पिटलमध्ये येऊन पडलो की काय! यांनाच आधी भेटायला हवं होतं! ' कारण हे अगदी छातीठोकपणे सांगत असतात - "तुम्ही फक्त  माझं ऐका ! बाकी काही करू नका - रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस घ्या! बस्स !सगळे आजार पळून जातील की नाही बघाच!" 

३) प्रश्नांचा भडीमार करणारे वार्ताहर/उलट तपासणी करणारे पोलीस - या प्रकारच्या लोकांना अगदी सगळ्या गोष्टी 'क्रोनॉलॉजी' ने समजल्याच पाहिजेत असं वाटत असतं. जणू काही या लोकांना  या पेशंटच्या आजाराची एखाद्या ऐतिहासिक बखरीत नोंद करायची जबाबदारी देण्यात आली आहे  अशा थाटात  प्रश्न एकामागोमाग विचारून ते अगदी पेशंटला भंडावून सोडतात- "नेमकं काय झालं? कसं झालं?किती वाजता? म्हणजे तुमचा अपघात तुम्ही  मार्केटला जाताना झाला की येताना? कुठल्या गाडीची धडक बसली? ज्युपिटर होती की ऍक्टिवा?" वगैरे वगैरे... काही वेळाने हेच लोक टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टर प्रमाणे असंही विचारतील असं वाटतं - "अपघात झाला त्यावेळी तुम्हांला नेमकं काय वाटलं होतं ?" यावरून मला आमच्या कॉलेजच्या काळातला एक किस्सा आठवला. माझ्या एका सिनिअरचा अपघात होऊन त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता आणि त्याला कॉलेजच्याच आवारातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तो सिनिअर कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय होता त्यामुळे त्याला भेटायला येणाऱ्यांची (आणि येणारींची !) संख्या खूपच होती आणि आलेला प्रत्येक जण त्याला 'काय झालं? कसं झालं' हेच विचारत होता. या प्रश्नांची  उत्तरं देऊन देऊन वैतागलेल्या त्या सिनिअरने शेवटी फ्रॅक्चर झालेल्या हाताच्या प्लास्टरवर मार्कर पेनाने त्याच्या अपघाताचा इतिहास मुद्देसूद लिहून काढला. त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला तो फक्त डावा हात पुढे करून दाखवे ! 

४) पेशंटची शाळा घेणारे - प्रकार क्रमांक २ आणि या प्रकारच्या लोकांमध्ये थोडा फरक आहे. या प्रकारचे लोक पेशंट म्हणजे किती निष्काळजी, बावळट, वेंधळा, अज्ञानी इ आहे हे दाखवून देतात ! "त्रास होतोय हे तुम्हांला आधी कळलं कसं नाही? एवढं दुर्लक्ष कसं केलं तुम्ही? आधी कुठे दाखवलं का नाही? इतके दिवस  अंगावर काढलं ना दुखणं म्हणून आता इतका त्रास होतोय !" आधीच बिचारा पेशंट दुखण्यामुळे त्रस्त असतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याची त्याला जाणीव होऊन तो संकोचलेलाही असतो. त्यात अशा बोलण्याने पेशंटला आपण आजारी पडून कुठलातरी मोठा गुन्हाच केला आहे की काय असं वाटू शकतं. 

५) निराशावादी/ नको ते बोलणारे - याबाबतीतले माझे दोन वैयक्तिक अनुभव सांगतो आणि योगायोगाने दोन्ही अनुभव भेटायला आलेल्या दोन डॉक्टरांचे आहेत. माझ्या बाबांना १९९७ साली हार्ट अटॅक आला होता. त्याकाळच्या प्रोटोकॉलप्रमाणे आधी काही दिवस आयसीयू त्यानंतर अँजिओग्राफी आणि मग अँजिओप्लास्टी असं सगळं महिनाभराच्या काळात करण्यात आलं. सुरुवातीला आयसीयूमध्ये असतानाच बाबांना भेटायला आमचे एक परिचित डॉक्टर गेले होते. बाबांचं हार्ट डॅमेज बऱ्यापैकी होतं. त्या डॉक्टरांनी बाबांच्या देखत फाईल बघितली आणि मान हलवत एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाले - "अवघड आहे !" 

अँजिओप्लास्टी करायच्या आधी बाबा घरी असताना आणखी  एक परिचित डॉक्टर आले होते. त्यांनी वेगळ्या प्रकारे बाबांना घाबरवलं. ते म्हणाले -"अहो तुम्ही एक टाइम बॉम्ब घेऊन जगत आहात. कधी काय होईल सांगता येणार नाही. तेव्हा तुम्ही सतत तुमच्या जवळ सॉर्बिट्रेटची गोळी ठेवा. अगदी संडासला जाल तिथेसुद्धा गोळी बरोबर ठेवा !" दोघा डॉक्टरांचं म्हणणं कदाचित बरोबरही होतं पण ते सांगण्याची पद्धत जरा विचित्रच होती ! 

६) थोर(!) समीक्षक - यांच्यासारख्या सिनिकल  लोकांना चांगलं काही दिसतच नाही.  म्हणून मग ते संधी मिळेल तशी हॉस्पिटल, डॉक्टर, हॉस्पिटल-स्टाफ, बिलिंगला लागणारा वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटल बिल आणि सध्या सगळीकडे कशी लूट चालू आहे हे सांगतात. 

७) अवाजवी अपेक्षा बाळगणारे - हे अनुभव एक डॉक्टर म्हणून मला काही वेळा आले आहेत. पेशंटबरोबर असे स्वघोषित हितचिंतक /नातेवाईक भेटायला येतात आणि ते आपल्याशी  जे बोलतात त्यावरून वाटतं - पेशंट यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्यावर गोळीबार तर करत नाही ना? एखाद्या लहानपणापासून दमा असलेल्या पेशंटला औषध घेऊन महिनाही झालेला नसतो. तरी बरोबर आलेली व्यक्ती तुम्हांला प्रश्न विचारते - ह्यांचा त्रास अजून कमी कसा होत नाही ? अजून किती दिवस लागतील बरे व्हायला? किंवा एखादा त्रास कमी झाला तर दुसरा कमी का नाही झाला असाही प्रश्न विचारतात. अशावेळी मग त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली की त्यांना ते पटतं देखील आणि मग तेच बाजू पालटतात आणि म्हणतात-मीही याला हेच म्हणत  होतो! 

इथपर्यंत वाचून कोणालाही प्रश्न पडेल की या माणसाला चांगलं कधी काही दिसतच नाही का? कोणी चांगली माणसं याच्या नजरेस दिसून आलीच नाहीत का? तर तसं काही नाही. काही चांगले अनुभव देखील आले. 

८ ) आश्वासक बोलणारे -  पुन्हा एकदा बाबांच्या आजारपणाचा संदर्भ देतो. बाबांच्या त्या आजारपणाच्या काळात त्यांना खास भेटायला  मुंबईहून माझ्या मावशीचे मिस्टर (म्हणजे बाबांचे साडू) आले होते. त्यांनी बाबांना खूप धीर दिला होता. कारण ते स्वत:सुद्धा या अनुभवातून गेले होते आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांची तब्येत चांगली झाली होती. तसंच माझ्या एका मानलेल्या बहिणीचे मामा सुद्धा आले होते ज्यांची सुद्धा अँजिओप्लास्टी झाली होती. या आजाराचा आणि त्यावरील उपचारांचा अनुभव घेतलेल्या  लोकांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे बाबांच्या शंका दूर झाल्या आणि त्यांचं टेन्शनही  कमी झालं होतं. 

एकूण विचार करता असं का होत असावं की पेशंटला भेटायला आलेले लोक आवश्यक ते आणि तेवढंच म्हणजेच प्रसंगानुरूप बोलू शकत नाहीत? म्हणजे तसं पाहता मुद्दाम कोणी असं वागत असेल असं नाही. लोकांचा हेतू चांगलाच असतो पण प्रत्यक्ष घडतं वेगळंच असं का होत असावं?  मला असं वाटतं की पेशंटला भेटायला जाणं  बऱ्याचदा एक केवळ सामाजिक जबाबदारी समजून त्यात एक केवळ औपचारिकता पाळली जाते. जिथे फक्त कर्तव्य भावनेने गोष्टी केल्या जातात तिथे असे प्रकार घडायची शक्यता जास्त! दुसरं म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपला 'मी' घेऊन वावरत असतो. 'मला कसं सगळं माहित ! मी कसे उपचार घेतो! (आणि जर कोणाच्या आजारपणाबद्दल कळलं नाही तर-) मला कसं सांगितलं नाही ?' खरी गरज असते अशावेळी हा 'मी' सोडून समोरच्या माणसाच्या (म्हणजेच पेशंटच्या) बाजूने विचार करण्याची ! हे खूप काही अवघड आहे असं नाही. त्यासाठी हवी थोडी संवेदनशीलता आणि सहृदयता !  कधीकधी काय बोलावं हे जर सुचत नसेल तर कमी बोलावं/ प्रसंगी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन द्वारे पेशंटला त्याच्या या कठीण काळात आपण त्याच्याबरोबर आहोत हे फक्त जाणवून द्यावं. तसंच आपला या सगळ्यात कितपत उपयोग आहे किंवा होणार आहे याचंही भान असणं आवश्यक आहे.आणि उपयोग होणार नसेल तर आपला निदान उपद्रव तरी होऊ नये याची मात्र  काळजी घ्यावी. 

 

Tuesday 1 December 2020

नूरी: रणथंबोरची देखणी वाघीण !

  

ही नूरी ! २०१९ च्या मे महिन्यात आम्हांला रणथंबोरच्या जंगलात ही दिसली होती. आपल्याला जसा आधार नंबर असतो तसा वन खात्याच्या सरकार दरबारी हिची नोंद फक्त एका आकड्याने झालेली आहे !तो आकडा आहे T-105! हे किती रुक्ष वाटतं.  पण आपल्याकडील बऱ्याच जंगलांत वाघांचं बारसं करण्याची पद्धत आहे. जंगलांमधले गाईड किंवा वाहनचालक तो वाघ ओळखण्यासाठी ती नावं देतात. बहुदा नूर या वाघिणीपासून जन्मलेली म्हणून नूरी असं या वाघिणीच्या नावामागचं कारण असावं. नूरी हे नाव ऐकल्यावर नितीन मुकेशच्या आवाजातलं  'ओ  नू..... री!' हेच गाणं आठवतं. पण हिला प्रत्यक्ष बघितल्यावर हे नाव अगदी चपखल वाटतं. 

मे महिन्याच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात पालापाचोळ्यात निवांत बसलेली नूरी एका गाईडला लांबून दिसली आणि मग सगळ्या गाड्यांचा तिथे गराडा पडला. आम्ही तिच्यापासून साधारण ६०-७० फुटांवर होतो. सगळ्यांचे कॅमेरे सज्ज झाले. वर्गात विद्यार्थ्यांना शांत बसवण्यासाठी जसा शिक्षकांना मोठ्या आवाजात ओरडावं लागतं तसं इथे कोणीतरी सगळ्यांना गप्प केलं. हे सगळं होईपर्यंत ही मात्र शांतपणे जिभेने आपलं अंग चाटत होती. या सर्व कलकलाटाचा, गर्दीचा, गाड्यांच्या आवाजाचा तिला काहीच फरक पडत नव्हता. तिच्या मनासारखं अंग स्वच्छ करून झाल्यावर यथावकाश ती उठली आणि हळूहळू चालू लागली. ती कुठल्या दिशेने जाणार याचा अदमास वाहनचालक बांधू  लागले आणि गाडीत बसलेल्या पर्यटकांना सर्वोत्तम अँगलने फोटो काढण्यासाठी गाडी कुठे नेली पाहिजे यासाठी त्यांची लगबग सुरु झाली. ती जशी चालू लागली तशी कॅमेऱ्यांमधून बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे खटखट खटखट असा आवाज येऊ लागला. एखाद्या सौंदर्यवती प्रमाणे ती डौलदार ऐटबाज चालत होती.ऐन भरात असलेलं ते देखणं रूप नेत्रसुखद होतं. तिच्यातला तो बेफिकीर अटीट्युड तिला शोभून दिसत होता. ती एखादी सिनेतारका आणि आम्ही तिचे फोटो काढण्यासाठी आसुसलेले पापराझी असंच जणू ते दृश्य होतं. 

सुदैवाने आमची गाडी अगदी योग्य ठिकाणी होती. म्हणूनच आम्हांला तिचा समोरून फोटो घेता आला. फोटोग्राफर्सच्या परिभाषेत याला Head On shot असं म्हणतात. काही वेळा वाघाचा फोटो side view मध्ये मिळतो पण त्यात काही मजा नाही. आमच्या गाड्यांना वळसा घालत, अगदी जवळून तोऱ्यात जाऊन ती निघून गेली. आधी डोळ्यांत आणि मग कॅमेऱ्यात तिचं सौंदर्य टिपून आम्ही अगदी धन्य झालो. आमच्यापासून ती आता १००-१५० फुटांवर बसली असेल. तिची नजर अचानक स्थिर झाली. श्वासाचा वेग वाढला. आम्ही बघितलं तर सांबर हरणांचा एक कळप तिच्या नजरेच्या टप्प्यात होता. ती एकटक त्यांच्याकडे बघत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कमी कमी श्रमात सावज हेरून त्याला बेसावध गाठायचं कसं याच गणित ती करत असावी.  मात्र  त्यांनीही तिला पाहिलं असावं आणि म्हणूनच तो कळप एकदम सतर्क झाला आणि तिच्या दिशेने बघू लागला. काही वेळाने नूरीला हा नाद सोडून द्यावा लागला. सांबरांचा कळपही  निर्धास्त झाला पण आम्हां फोटोग्राफर्सचा खटखटाट आणि क्लिकक्लिकाट मात्र चालूच राहिला !  

Friday 21 August 2020

ती. बाबा...



(आज तिथीप्रमाणे आमच्या बाबांना जाऊन २ वर्षे झाली.(हरतालिका २०१८) तारखेनुसार १२.९.२०१८.. 
परवा सहज खण आवरत असताना बाबांच्या पंचाहत्तरीनिमित्त मी लिहिलेलं टिपण सापडलं. आजचा ब्लॉग म्हणजे हेच टिपण ! आज परत सगळं वाचताना बऱ्याच आठवणी मनात गोळा झाल्या. पण एक समाधानही वाटलं. आपल्या मनातल्या भावना बाबांपर्यंत पोचवता आल्या याचं ! अर्थात सगळंच काही फक्त शब्दांत ( आणि शब्दानेच)  व्यक्त करता येत नाही हेही तितकंच खरं !)

१४.०२. २००९

कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाचं नेमक्या शब्दांत वर्णन करणं हे सोपं काम नाही. त्यातही आपल्या वडिलांबद्दल बोलायचं तर अजूनच अवघड ! कारण आपल्याला त्यांचा खूप वर्षांचा सहवास असतो, असंख्य घटना घडून गेलेल्या असतात. त्यामध्ये कळत-नकळत,प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपलाही सहभाग असतो. म्हणून वस्तुनिष्ठपणे बघणं थोडं अवघडच जातं. तरीही आज आमच्या बाबांच्याविषयी काही ठळक गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात-

आमच्या बाबांच्या दिवसभरात करायच्या प्रत्येक गोष्टींमध्ये, कृतींमध्ये एक प्रकारचा क्रम आहे, ठराविकता  आहे, सातत्य आहे , नियमितता आहे. अमुक एक गोष्ट झाली की त्यानंतर पुढची करायची गोष्ट ठरलेली! एक प्रकारच्या  rhythm आणि पॅटर्नप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात. अगदी सकाळी दात घासताना होणाऱ्या आवाजापासून ते एकामागोमाग करत जाणाऱ्या प्रत्येक कामांमधून हे दिसून येतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि टापटीप आहे. घरी घालायच्या कपड्यांनासुद्धा ते स्वतः इस्त्री करतात आणि मगच घालतात. आणि या सर्व गोष्टी करायचा  त्यांना आळस अजिबात नाही. अतिशय meticulously ते या गोष्टी करत असतात. "Everything in its proper place" हे त्यांचं आवडतं वाक्य आहे. आणि ते तसं व्हावं यासाठी ते स्वतः खूप झटतात. पण इतरांनीही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागावं असा मात्र त्यांचा आग्रह नसतो. त्यांचं अक्षरही इतकं छान ठसठशीत आणि स्पष्ट आहे की अगदी बघत राहावं! संपूर्ण कागदावर कुठंही खाडाखोड नाही. कुठलंही काम करण्याची त्यांची एक पद्धत आहे, त्यांनी त्यासाठी एक व्यवस्था तयार केली आहे. (आमच्याकडे अगदी वर्तमानपत्राच्या बिलांसाठी फाईल केलेली आहे आणि अजूनही वर्षानुवर्षांची बिलं त्यात सहज सापडतील !)
या सगळ्यातून एक शिस्तबद्ध आयुष्य त्यांनी घडवलं आहे. अशा कामांचा त्यांना कधी कंटाळा आलेला मी तरी पाहिलेला नाही. या disciplined आयुष्याचा त्यांना डायबेटिसशी लढा देताना खूप उपयोग झाला आहे असं मला वाटतं. १९६० च्या दशकात त्यांच्या या आजाराचं निदान झालं. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं-"Consider Diabetes as your friend!It is going to stay with you for a lifetime!" त्यानंतर आमचे बाबा डायबेटिसशी कधी झगडले नाहीत, त्याला कधी deny केलं नाही, इतर कुठल्या पावडरी-चूर्ण-अर्क यांच्या आहारी कधी ते गेले नाहीत. तेव्हापासून निमूटपणे, विनातक्रार न चुकता दररोज दोनदा इन्शुलिन घेत आहेत. आणि इन्शुलिनच्या वेळा काटेकोरपणे सांभाळत प्रमाणबद्ध आहार घेत आहेत. यालाही आता ४०-४५ वर्षं होऊन गेली ! या शिस्तीमुळेच डायबेटिसला त्यांनी बऱ्यापैकी आटोक्यात ठेवलं आहे. मधूनमधून त्याने डोकं वर काढलेलं आहे पण त्यावरही बाबांनी यशस्वी मात केली आहे.

आमच्या बाबांना त्यांच्या लहानपणापासूनच खूपच स्ट्रगल करावा लागला आहे. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यानंतर ते आणि इतर भावंडे देखील त्यांच्या आत्यांकडे राहून शिकली. बाबांना तिथे शारीरिक कष्टाची बरीच कामं करावी लागली. तिथंही परिवार मोठा त्यामुळे खाण्यापिण्याची तशी आबाळच झाली ! या सर्व परिस्थितीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा परिणाम झाला आहे. ते तसे अबोल आणि संकोची स्वभावाचे आहेत. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांना सन्मानाची/बरोबरीची वागणूक मिळाली नाही तरीही ते तिथे निष्ठेने काम करत राहिले. त्यांच्या या खासगी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आता कुठे ते थोडेसे निवांत झाले आहेत.

आजच्यासारखे  'सुजाण पालकत्व' किंवा 'Parenting' हे शब्दही ज्यावेळी फारसे प्रचलित नव्हते त्या काळापासून आम्ही त्याप्रकारच्या Parenting मुळे समृद्ध झालो. नोकरीच्या  किंवा इतर कुठलाही ताणाचा बाबांनी आमच्यासमोर कधीही उल्लेख केला नाही किंवा कधीही चिडचिड केली नाही. आम्हांला कधीही (आई-बाबा दोघांनीही) मारलं नाही. माझे कमी मार्क पाहून कधी माझी शाळा घेतली नाही! आम्हांला जे शिक्षण घेण्याची आवड होती ते त्यांनी आम्हांला घेऊ दिलं. करिअर बद्दलच्या त्यांच्या इच्छा-अपेक्षा आमच्यावर लादल्या नाहीत. शिक्षणाव्यतिरिक्त इतर छंद जोपासण्यासाठीही प्रोत्साहन दिलं.
याच अनुषंगाने असं सांगता येईल की आई-बाबांना मी कधीही तार स्वरात एकमेकांशी बोलताना ऐकलेलं नाही. मतभेद असले तरी ते आमच्यादेखत कधी त्यांनी व्यक्त केले नाहीत. तसंच त्यांनी त्यांची मतं (राजकीय/सामाजिक इ ) आमच्यावर कधीच लादली नाहीत. म्हणूनच बाबा जरी सश्रद्ध असले तरी मी माझी नास्तिकता जपू शकलो. माझ्या या मतांबद्दल त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही किंवा मला माझी मतं जबरदस्तीने, वादविवादाने  बदलायला लावली नाहीत. घरातल्या या स्वातंत्र्याचा, मोकळ्या वातावरणाचा आम्हांला खूपच फायदा झाला. आमची मतं स्वतंत्रपणे बनवण्याची सवय यातून आम्हांला लागली.
या आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. खरं तर आपल्या आई-वडिलांबद्दलच्या या गोष्टी इतक्या औपचारिकपणे लिहाव्या का? काही गोष्टी न बोलता/न लिहिता समजून घेण्याच्या/फील करण्याच्या असतात असं मलाही वाटत होतं. पण बाबांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचं निमित्त साधून एका बैठकीत जे मनात आलं ते लिहून काढलं इतकंच !


Wednesday 12 August 2020

आठवण आईची !



मागच्या आठवड्यात सकाळीच सोनचाफ्याचा मंद सुवास घरातच आला. त्या वासाचा माग काढत गेलो तर आमच्या समोरच्या बिल्डिंगच्या मागे एक मोठं झाड दिसलं. तिथून आमच्या घरापर्यंत वास येत होता. आम्ही पण आमच्या बिल्डिंगच्या मागे सोनचाफ्याचं एक झाड लावलंय. त्याला मात्र फुलं आलेली दिसली नाहीत. 

आमच्या या चाफ्याच्या झाडाचा किस्सा सांगण्यासारखा आहे. साधारण १२-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या आणि समोरच्या बिल्डिंगच्या मागे मधोमध महापालिकेने ठेवलेली एक मोठी कचराकुंडी होती. आठवड्यातून एकदा कधीतरी महापालिकेचा ट्रक येऊन त्या कुंडीतला कचरा घेऊन जाई. तोपर्यंत कचऱ्याने ती कुंडी ओसंडून वाहत असे. भरीतभर त्यात भटके कुत्रे येऊन कचरा उचकटून टाकत. लोकसुद्धा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. त्या कचऱ्याचा एरवीही आणि विशेषतः पावसाळ्यात घाण वास येई. आम्ही तळ मजल्यात राहत असल्यामुळे या सगळ्याचा त्रास आम्हांलाच जास्त होई. आम्ही याबद्दल सोसायटीत तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 

यावर एक उपाय म्हणून आमच्या आईने सुचवलं की या कचराकुंडीजवळ आपण एक चाफ्याचं झाड लावू. पुढेमागे फुलं आली कि निदान त्या कचऱ्याची दुर्गंधी तरी कमी होईल. खरं तर सुरवातीला आईच्या या कल्पनेला आम्ही फारसं गांभीर्यानं घेतलंच नाही. पण मग तिनेच जवळच्या नर्सरीमधून चाफ्याचं रोप आणून आमच्या सोसायटीच्या माळ्याकरवी  ते रोप आमच्या घरामागे लावलं. ते तिथे रुजलं. हळूहळू मोठं होऊ लागलं. साधारण पुरुषभर उंचीचं झाल्यानंतर त्याची वाढ खुंटल्यासारखी झाली. मग आईनेच पुन्हा सोसायटीच्या माळ्याला बोलवून झाडाच्या फांद्या कापल्या. नंतर झाड वाढलं पण त्याला फुलं काही आली नाहीत. 

कालांतराने महापालिकेने कचरा विल्हेवाटाची वेगळी पद्धत काढल्यामुळे  आमच्यामागची कचराकुंडी हटली. ज्या कारणासाठी चाफ्याचं झाड लावलं होतं ते कारण हटलं तरी ते झाड रेलेव्हंट राहिलं. मागची कचराकुंडी गेल्यानंतर उपलब्ध झालेली मोकळी जागा गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरली जाऊ लागली. गाड्या वळवताना हे चाफ्याचं झाड मध्ये येतं या सबबीखाली सोसायटी ते तोडते की काय असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं झालं नाही. नंतर 'आले सोसायटीच्या मना' म्हणून आमच्या मागच्या मोकळ्या जागेत शहाबादी फरश्या बसवण्यात आल्या. त्याही अशा 'एन्ड टू एन्ड' की झाडाभोवती थोडीसुद्धा माती ठेवली गेली नाही. पावसाचं पाणी मातीत झिरपण्याची सोयही ठेवली गेली नाही. 

पण एखाद्याची जगण्याची उर्मी, तग धरण्याची चिकाटी खूप तीव्र असते तशी या झाडाची असावी. या सर्व प्रतिकूलतेवर मात करत एके दिवशी हे झाड फुलांनी बहरलं. ती फुलं बघताना आईला झालेला आनंद, तिचा हसरा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. 

चाफ्याच्या फुलांचा दिखावा/बडेजाव नसतो. बऱ्याचदा त्यांचा तुम्हांला आधी वास येतो आणि मग तुम्हांला ती हिरव्या पानांच्या आड लपलेली सापडतात. कित्येकदा झाडावर फळं दिसल्यावर मग लक्षात येतं की झाडाला फुलं आली होती ! सोनचाफ्याचा फुलांचा रंग सुंदर असला तरी बहाव्यासारखा तुमचं लांबूनही लक्ष वेधून घेणारा पिवळा धमक नसतो. या चाफ्याच्या फुलांच्या वासांवर आधारित मी एक 'कविता' केली होती. कविता कसली ! नुसतं ट ला ट जोडणं ते ! पण आईला त्याचं केवढं कौतुक! मला त्या कवितेच्या प्रिंट आऊट घ्यायला सांगितल्या आणि आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना ती कौतुकाने कविता वाचून दाखवत असे ! 

आजच आईला जाऊन दोन महिने झाले. आणि आज सकाळी आमचं चाफ्याचं झाड फुलांनी बहरलेलं दिसलं. त्या फुलांमध्ये आज एक वेगळीच शांतता, कृतकृत्यता  मला दिसून आली !

Wednesday 22 July 2020

कोरोना डायरी २ (अर्थात) : लॉक डाऊन काळातील आवाज !

मला पक्षीनिरीक्षणाची थोडीफार आवड आहे. पक्षी दिसण्यापूर्वी बर्‍याचदा त्याचा आवाज आधी ऐकू येतो. यामुळे मला आवाजाचा वेध घेण्याची सवय लागली आहे. सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान याचा मला खूप उपयोग झाला आहे. तसंही सध्या(माझ्यासह)प्रत्येकाकडे वेळ आहे. बरेचजण घरून काम करत आहेत. त्यामुळे आजूबाजूचा आवाज अचानक वाढला आहे. आम्हांला आवडो अथवा नाही,हवे असो की नाही, आमच्या घरात वेगवेगळ्या दिशेने आवाज आदळत आहेत! त्या आवाजांचीच ही काही निरीक्षणे!माझ्यावर विश्वास ठेवा,यापैकी कोणतेही निरीक्षण काल्पनिक नाही! जर आपण विचार करत असाल की मलाच इतके सगळे आवाज कसे ऐकू येतात... तर या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेले आहे!


 लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत  सर्वप्रथम आसमंतात 'थाली बजाओ'चा आवाज घुमला.आजही मला तो दिवस आठवत आहे .. लोकांमध्ये किती उत्साह होता! अगदी  उत्सवाचे रूप आले होते त्या दिवसाला!लोक जोरजोरात थाळ्या वाजवत होते ..आणि टाळ्या देखील! अर्थात मी यात भाग घेतला नाही. फक्त हे सर्व कोण करत आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो तेव्हा मला आमच्या  शेजारच्यांनी पाहिले. आधी मला वाटलं की माझी बायको आणि मी, आम्ही दोघेही आरोग्य सेवेत आहोत म्हणून आमच्या आदरार्थ ते आमच्याकडे पहात  टाळ्या वाजवत होते! पण तसे नव्हते. आम्ही या महान राष्ट्रीय कार्यात सहभागी का झालो नाही आणि त्यांच्यासाठी तरी आम्ही सहभागी  व्हावे म्हणून ते जोरात टाळ्यांचा कडकडाट करीत होते! कोणीतरी माझ्या राजकीय विचारांबद्दल मला छेडले देखील आणि त्याने मी बधतो की  काय हे पहाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्याचा काही उपयोग झाला नाही. 'थाली बजाओ' किंवा 'दिया जलाओ' असो, हे उपक्रम  सोशल मीडियावर लगेचच्या लगेच त्याचे फोटो/ व्हिडिओ  टाकून साजरे करण्यासाठीच होते असं आपलं माझं झालं.या उपक्रमांचं कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे यशापयश  सर्वांसमोर आहेच!

 लॉक डाऊनच्या नव्या नवलाईचे पहिले काही दिवस होते,त्यात बाबा लोक्स घरी होते. म्हणून त्यांना घरातील कामात मदत करावी लागली. आमच्या वरच्या घरात अशा एका प्रेमळ वडिलांवर त्यांच्या गोड लहान मुलासाठी नाश्ता देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी. ते दररोज प्रेमाने आर्जवं करतानाचा आवाज ऐकू येई -"लाडू फिनिश कर ...". मला आश्चर्य वाटायचं की त्यांचा मुलगा इतका आज्ञाधारक कसा की तो नाश्त्याला दररोज गपगुमान फक्त लाडूच खातो ?! नंतर मला कळलं की लाडू हा नाश्त्याचा  प्रकार नसून ते आपल्या मुलाला लाडाने लाडू म्हणत असे! कारण एकदा ते  म्हणाल्याचं ऐकू आलं - "ए लाडू .... असं नको करू... ती मॅगी संपव ना बाळा!"

 या पहिल्या काही दिवसांतच घराघरातून भांडी पडण्याचा आवाज आला. म्हणजे असं  नाही की कोणी वाद घालत होतं. घरी कामवाल्या बायका येऊ न शकल्यामुळे नवऱ्यांना भांडी घासण्याचं काम पडल्यामुळे हे आवाज येत होते.  आता त्यांना हे  काम करण्याची सवय नव्हती की काम अनिच्छेने केले जात होते म्हणून भांडी पडण्याचाआवाज खूप जास्त येत होता हे कळायला मार्ग नव्हता!

 लॉक डाऊन च्या काळात घरी बसून काय करायचे हा प्रश्न आमच्या शेजार्‍यांनी आमच्यासाठी सोडवून टाकला  - ते टीव्हीवर सतत मोठ्या आवाजात बातम्यांचे चॅनेल लावून त्यांच्या घराचं दार उघडं ठेऊन महान सामाजिक कार्य करीत होते! बातम्यांमध्ये तरी नावीन्य असावे ना! त्याच त्या बातमी वेगवेगळ्या वाहिन्यांवर (कधीकधी फक्त भाषा बदलून)ऐकू येत होत्या."अमक्या शहरात कोरोनाचा कहर" "अमक्या ठिकाणी अनेक संशयास्पद रुग्ण सापडले"(जणू काही ते  रुग्ण गुन्हेगारच आहेत!)

 लोकांना  लॉक डाऊनची थोडीशी सवय होताच भांड्याला भांडं लागण्याचेही आवाज ऐकू येऊ लागले! छोट्या छोट्या कारणांमुळेही धुसफूस वाढून त्याचे पर्यावसन भांडणात होऊ लागलं.आता हेच बघा ना! आमच्या पुण्यासह इतर शहरांमध्येही बहुतेक घरांमध्ये रविवारी(विशेषतः संध्याकाळी) चूल  पेटत नाही! हा  एक अलिखित नियमच आहे म्हणा ना ! आमचे एक शेजारी देखील पिढ्यानपिढ्या दर रविवारी पाव भाजी खायला हॉटेलात जातात. लॉकडाऊन दरम्यान हॉटेल्स पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या शेजाऱ्यांसारख्या अनेक लोकांची पूर्णपणे गळचेपीच झाली ना ! करावं तरी काय!नंतर सरकारने घरी पार्सलने बाहेरचे खाणे आणण्याची मुभा देण्याचे एक चांगले काम केलं. पण जर असं पार्सल मागवण्यातून कोरोनाचा धोका निर्माण झाला तर? ज्याने तो आणला त्याला कोरोना असेल तर? एकीकडे हॉटेलमध्ये जाऊ न शकल्याने गंभीर पेच आणि दुसरीकडे हा धोका! आमच्या या शेजाऱ्याने हा धोका पत्करला.त्याची आई मात्र तार सप्तकात त्याला सतत सूचना देऊन त्याला बाहेर जाऊ नको असं  सांगत होती.आईच्या त्या सूचनांना अव्हेरून मुलाने पावभाजीच्या पार्सलची ऑर्डर दिलीच. मुलगा गाडीवरून पावभाजी आणायला निघेपर्यंत आईचे प्रयत्न चालूच होते. मुलगा एक इंच मागे हटायला तयार नव्हता. कारण त्याला सबळ पाठिंबा त्याच्या बायकोचा होता. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुनेचा थोडासुद्धा आवाज येत नव्हता. ती फक्त गॅलरीत  येऊन उभी राहिली होती. प्रतिष्ठेचा प्रश्न मुलाच्या आईसाठी होता. शेवटी गाडीला किक मारून तो मुलगा पाव भाजी आणायला गेला की नाही is anybody's guess!

 या लॉक डाऊनच्या काळात बीएसएनएल आणि इतर खासगी कंपन्या तसेच महावितरणचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! इंटरनेट आणि विजेची मागणी अफाट वाढून देखील त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी समाधानकारक सेवा दिली आहे. लोक फक्त WFH च करत आहेत म्हणून ही मागणी वाढली आहे असं नाही. मध्यंतरी अचानक सगळीकडे एक वेबीनारचं पेव फुटलं. वेगवेगळ्या विषयांवर हे वेबिनार झाले. मी सुद्धा असे काही अटेंड केले. ऐन दुपारच्या वेळी एखाद्या कंटाळवाण्या विषयावर एखादा वक्ता जीव तोडून बोलत असला तर झोप टाळणे ही एक कसरतच असते. वेबिनार बरोबरच आणखी एक प्रकार सध्या दिसून येतो- Google Duo, Zoom किंवा Whatsapp कॉल द्वारे मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी! सध्या प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे या आधुनिक टेक्नॉलॉजी च्या आधारे ती कसर भरून निघत आहे! मग  "हा........ य ...... हॅ...... .... लो ... किती दिवसांनी भेटतोय ना आपण ..... हा हा हि ही ....."  हे आवाज येऊ लागले! या भेटींतून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताची सामरिक व्यूहरचना, देशाची आर्थिक परिस्थिती इथपासून ते अगदी नुकताच केलेल्या आणि सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या एखाद्या नावीन्यपूर्ण पदार्थाची पाककृती अशा अनेक विषयांवर चर्चा रंगल्या! सध्या मात्र शाळा चालू झाल्यापासून आमच्या समोरच्या घरी ऑनलाईन शाळा चालू आहे. हा मुलगा त्याच्या शिक्षिकेचं लक्ष वेधून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे - "मॅम... मॅम .... which colour book? yellow colour?" हे एकच वाक्य निदान १५-२० वेळा त्याने म्हटलं असेल...

 जसे जसे दिवस सरकू लागले तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कोरोना काही मागे हटत नाही. दिवस-रात्र, वेळी-अवेळी ऍम्ब्युलन्सचे आवाज मात्र वाढू लागले. ठिकठिकाणी पेशंटची संख्या वाढू लागली. बाहेर काहीही झालं तरी इथे आपण सुरक्षित आहोत ही भावना हळू हळू लोप पावत चालली. दबक्या पावलांनी कोरोनाने आमच्या सोसायटीत प्रवेश केला आणि दबक्या आवाजात लोकांचं बोलणं सुरु झालं - "तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो ना तो ... तो पॉझिटिव्ह निघाला! (जसं  काही यांनी रिपोर्ट पाहिलाच आहे !)तुला कळलं नाही? जपून राहा जरा !" आणि मग घरोघरी देवाची गाणी ऐकू येऊ लागली. बायका स्वयंपाक करताना देखील मोबाईल समोर ठेवून त्यावर देवाचे स्तोत्र -मंत्र ऐकू लागल्या. सध्या देवळं बंद असल्यामुळे आमच्या समोरच्यांनी (जे देवळाचे विश्वस्त आहेत) देवाची छोटी मूर्ती घरी आणली. मग सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला साग्रसंगीत(आणि अर्थातच मोठ्या आवाजात)आरती सुरु झाली. हळूहळू आता त्या आरतीच्या वेळी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली आहे.

 या सगळ्या कोलाहलात मला काही चांगले आवाज ऐकू आले हे आवर्जून सांगितलं पाहिजे. शिक्रा, Fantail Flycatcher, Tickel's blue Flycatcher, Spotted Owlet या सारख्या कितीतरी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मला ऐकायला मिळाले. दयाळ (Magpie Robin), खंड्या (White throated Kingfisher) आणि कोकीळ यांचे तर कॉल ऐकून मीच कंटाळून गेलो! कितीतरी पक्षी जे या आधी मी आमच्या भागात बघितले नव्हते ते बघायला मिळाले(उदा - Scaly breasted Munia).

मी संध्याकाळी फिरायला जात असताना नेहमी मला एक चौकोनी कुटुंब दिसतं. आई-वडील आणि त्यांची शाळकरी मुलं असे चौघेजण मिळून बॅडमिंटन खेळतात. बॅडमिंटन खेळापेक्षा त्यांचं हसणं-खिदळणं, दंगा -मस्ती, रुसवे-फुगवे हे बघायला मजा येते. हे family bonding खूप छान वाटतं.

 असाच फिरत असताना आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका घरातून कोणीतरी गिटार वाजवत असल्याचा आवाज ऐकून मी थबकलोच! गिटारबरोबरच एक तरुण मुलगा गातही होता. त्याला मी आवाजावरून ओळखलं. हा तर एक टग्या मुलगा होता. पण तोच आता गिटार वाजवतो आणि गातोसुद्धा? नंतर लक्षात आलं की तो नवविवाहित होता आणि त्याची बायको गिटार वाजवत होती. सध्याच्या या अनिश्चित काळात या नवपरिणीत जोडप्याचं स्थळ काळाचं भान विसरून Live as if there is no tomorrow अशा प्रकारे  गाणं बजावणं मला मनापासून आवडलं !

Thursday 9 April 2020

कोरोना डायरी १

                                                                             १

कोरोनाची पार्श्वभूमि :

कोरोना विषाणू 
भारतात ३० जानेवारी २०२० ला CoVid-19 पहिला पेशंट  सापडला. त्याआधी चीनमध्ये या साथीची केव्हाच सुरुवात झाली होती. साधारणपणे २०-२२ जानेवारीला आमच्या शाळेतील एक मित्र चीनहून त्याचे काम आटपून परतला. तेव्हा दिल्ली विमानतळावर त्याचे स्क्रीनिंग झाले होते. त्यावेळी हा एक केवळ खबरदारीचा उपाय असेल आणि भारतात काही हा आजार इतका पसरणार नाही ( भारताचे उष्ण हवामान आणि पाश्चिमात्य देशांतील लोकांपेक्षा आपल्या लोकांची अशा आजारांना परतवू शकणारी चांगली प्रतिकारशक्ती ही काही कारणं असतील) असं तेव्हा वाटलं होतं. पूर्वी २००९ साली स्वाईन फ्लू ची देखील साथ आपल्याकडे होती. त्यामुळे त्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील परिणाम झाला होता. पण त्याचे खूप काही गंभीर परिणाम न होता ती साथ तशी लवकर आटोक्यात आली. तो अनुभव विचारात घेता यावेळी देखील भारत यातून सहज बाहेर येईल असं वाटलं होतं.
२००९ साली समाजमाध्यमं आजच्या तुलनेत एवढ्या प्रमाणात नव्हती. तेव्हा माहितीचा स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स  हेच  होते . आता मात्र जगभरातील स्थिती वेगवेगळ्या माध्यमांमधून अक्षरश: लाईव्ह कळते. तशाच प्रकारे  CoVid-19 चा जगभरात जाणवणारा परिणाम अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागला आहे हे विविध बातम्या, लेख आणि जगभरातील लोकांचे आजाराचे अनुभव यातून दिसू लागलं आणि खडबडून जाग आल्यासारखं झालं. चीनमधून साथीचं वास्तविक चित्र समोर येत नव्हतं पण हळूहळू इटली, इराण इथले या आजाराच्या रुग्णांचे आकडे आणि आजारामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या भयावह वाटू लागली. ट्विटर वर लंडन स्थित अली नावाच्या मूळच्या इराणी माणसाने तिथले काही व्हिडिओ देखील टाकले. त्यातून रस्त्यात चालता चालता अचानक कोसळणारी माणसं, तिथल्या हॉस्पिटल्स मधले गंभीर पेशंट आणि त्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या पेशंटच्या संख्येला तुटपुंजी ठरणारी तिथली आरोग्य व्यवस्था हे तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करत होतं. त्याही परिस्थितीमध्ये तिथले डॉक्टर्स, नर्सेस पेशंटना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते आणि त्यात काही डॉक्टरांना प्राणही  गमवावे लागले. अशा नकारात्मक वातावरणाबरोबरच आय सी यू मधील नर्सेस आपला ताण हलका करण्यासाठी PPE घालून चक्क नाचत आहेत असाही व्हिडिओ पाहण्यात आला.
 मात्र तरीही चीन, इटली-स्पेन सारखे युरोपिअन देश किंवा अमेरिका हे भारतापासून लांब आहेत आणि तिथे हा आजार वेगाने पसरला असला तरीही भारतात तो इतका धुमाकूळ घालणार नाही अशी एक भाबडी आशा मनात होती. स्वत: बद्दलची माझी अशी समजूत होती की माझी मतं शक्यतो काही वाचन, त्यातून मिळणारे संदर्भ, पुरावे यावर आधारित असतात. या साथीच्या अनुषंगाने नेमका त्याचवेळी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा २००९ च्या स्वाईन फ्लूच्या साठी मागच्या खऱ्या कारणांचा वेध घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध हे देखील या साथी मागे आहे की काय अशी वाचनात आलं. अशाप्रकारच्या Conspiracy theories मुळेही  या साथीचं गांभीर्य कमी वाटू लागलं.
जानेवारी-फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या एक-दोन आठवड्यांपर्यंत रोजचे सर्व व्यवहार सुरळित चालू होते. ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची जागतिक साथ(pandemic) असल्याची घोषणा केली आणि महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेज १६ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसंच गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सिनेमा थिएटर- नाट्यगृहं बंद असे जेव्हा आदेश आले तेव्हा लक्षात आलं की संकट अगदी दाराशी येऊन ठेपलं आहे. हे म्हणजे अगदी ऑफ गार्ड पकडल्यासारखं झालं. एखादा चेंडू फ्लिक करायला जावं आणि तो इन-स्विनगिंग यॉर्कर ठरून दांडी गुल करेल की काय असं वाटू लागलं.

                                                                         २
कोरोनाबद्दलची शास्त्रीय माहिती, त्या आजाराची लक्षणं, त्याचे निदान आणि उपलब्ध उपचार, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय हे सगळं सांगायचा या ब्लॉगचा हेतू नाही. आणि तशीही या सर्व बाबतीत माहिती सर्व माध्यमांवर उपलब्ध आहेच (अगदी प्रत्येक फोनवरच्या त्या कंटाळवाण्या रिंगटोन सह!) पण तरीही कोणाला ही माहिती हवी असल्यास या व्हिडिओ मधून ती मिळू शकेल -
https://www.youtube.com/watch?v=AFLTC842qY4


                                                                           ३
कोरोनाची साथ आणि माझं क्लिनिक -
वर उल्लेख  केल्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. पेशंट WhatsApp वर फिरत असलेल्या कोरोना साथीच्या तथाकथित प्रतिबंधासाठी होमिओपॅथीच्या  एका औषधाविषयी (आर्सेनिक अल्बम) विचारत होते. त्यांना त्याबद्दलचे सत्य सांगणे आणि आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सांगणे असं चालू होतं.मी हून कोणालाही असं जेनेरिक औषध दिलं नाही. पण एका पेशंटकडून कळलं की पुण्याजवळील एका गावात एका होमिओपॅथिक डॉक्टरने असे प्रतिबंधात्मक औषध देण्यासाठी एक शिबिर घेऊन त्यातून बक्कळ पैसा कमावला. होमिओपँथीच्या दुकानांमध्ये या औषधाचा तुटवडा निर्माण झाला.
२२ मार्चला केंद्र सरकारने एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' लागू केला आणि महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर  मात्र  अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. २३ मार्च पासून क्लिनिकला जायचं की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे जरी आम्ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असलो तरीही कित्येक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवायला सुरुवात केली. संपूर्णपणे केवळ होमिओपॅथीचीच उपचारपद्धती वापरणारा माझ्यासारखा डॉक्टर त्यामुळे थोडा संभ्रमित झाला. अशा साथीच्या आजाराच्या काळात होमिओपॅथीचे नेमके स्थान काय? या प्रश्नाचे उत्तर कितीही नाही म्हटलं तरी -फारसे काही नाही !- हेच होतं. मी स्वतः ला कुठल्याहीप्रकारे कोरोनाच्या युद्धभूमीवरील एक योद्धा म्हणून बघू शकत नव्हतो (आणि अजूनही त्यात काही बदल झालेला नाही) मग अशा स्थितीत क्लिनिक चालू ठेवावं का? पण मग इतर जुनाट आजारांच्या पेशंटचं काय? त्यांच्या मनांतील शंकांचं निरसन करणारा, त्यांना आश्वस्त करणारा किंवा दिलासा देणारा डॉक्टर म्हणून माझी भूमिका असू शकते की नाही? या सगळ्या पलिकडे जाऊन क्लिनिक बंद ठेऊन माझ्या व्यवसायाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्या प्रति माझी निष्ठा कमी पडते की काय ? असे काही तात्विक/नैतिक प्रश्न उपस्थित झाले. अशा प्रश्नांना आपल्याला कधी सामोरं जावं लागेल असं वाटलंही नाही. पण ही परिस्थितीच इतकी विचित्र होती कि तुम्ही कुठलीही बाजू बघा ती योग्यच वाटेल. म्हणजे दवाखाने चालू ठेवले तर डॉक्टर त्याच्याकडून अपेक्षित सर्व जबाबदारी पाडत आहे आणि समजा दवाखाने बंद ठेवले तरीही त्यात गैर काहीच नाही - कारण दवाखाने हा देखील आजार पसरण्याचा एक स्रोत होऊ शकतो. एकमेकांच्या संपर्कात आलेले पेशंट, क्लिनिकमध्ये जिथे पेशंट बसतात त्या खुर्च्या, दरवाज्याच्या कड्या इ सगळ्यामुळे आजार पसरू शकतो. आणि (माझ्या) क्लिनिकमध्ये बसल्यामुळे पेशंटला हा आजार झाला हे guilt घेणं मला जड गेलं असतं. शिवाय सगळीकडे Social Distancing हा परवलीचा शब्द झाला होता. त्यामुळे दवाखाना बंद ठेऊन एक प्रकारे आपण या सामाजिक अंतर राखण्याला मदतच करत नाही का ?
या सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणून मी २३ मार्च पासून माझं क्लिनिक फक्त थोडा वेळ चालू ठेवू लागलो. म्हणजे पेशंटनी आदल्या दिवशी फोनवर त्यांची लक्षणं सांगायची आणि घरीच त्यांची औषधं मी करून त्यांना क्लिनिकमधून ती फक्त घेऊन जायला सांगायचो. काही पेशंट घरी येऊन औषध घेऊन जात होते. अशाप्रकारे सेवा देऊन (आत्मप्रौढीचा धोका पत्करून )कुठल्याही पेशंटला मी नाकारले नाही. फोनवर तर मी संपर्कात होतोच. पण या साथीमुळे एक झालं की येणारा प्रत्येक पेशंट हा 'त्याच' आजाराचा आहे की काय अशी शंका डोक्यात यायची. मग त्यातूनच Hand sanitizer वापर, तोंडाला मास्क लाव, वेटिंग एरिया सारखा पुसून काढ असे पॅरानॉईड उपाय करायला लागलो. शिवाय पेशंटला तपासण्यासाठी हात लावताना देखील विचार करावा लागला. पूर्वी माझा मामा एकदा मुंबई येथील एका नामांकित डॉक्टरांकडे गेला होता. तिथून आल्यावर तो म्हणाला -"आज डॉक्टरांनी माझे काही लाड पुरवले नाहीत. त्यांनी मला हातसुद्धा लावला नाही!" तसं मी देखील पेशंटना लांबूनच तपासत होतो.
या साथीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याच्याशी जोडला गेलेला social stigma ! या आजाराचे पेशंट म्हणजे कोणी गुन्हेगारच आहेत आणि ते इतरांना मुद्दामच हा आजार 'देत' आहेत असं वातावरण निर्माण झालं. एका डॉक्टरला हा आजार झाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पेशंटचा नंतर माग घेण्यात आला आणि त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले. या उदाहरणावरून असं वाटलं की असा प्रकार आपल्याकडे झाला असता तर? सरकारी यंत्रणा कामाला लागून त्यांनी contact tracing केलं असतं आणि मीडियामध्ये या सगळ्याची बातमी येऊन आपलं नाव त्यात खराब झालं असतं. त्यापेक्षा क्लिनिक कमी वेळ चालू ठेवणंच श्रेयस्कर असा विचार मी केला.
विचार करता करता मी या प्रश्नाकडे येऊन थांबलो की मला नेमकी भीती कशाची वाटते? आजाराची की या सर्वव्यापी/ सर्वाधिकार असणाऱ्या सरकारी यंत्रणेची ? की आणखी काही?....                            
                                                                                                                                   (क्रमश:)

Wednesday 4 March 2020

परीक्षा दहावीची...



सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वातावरण आहे . म्हणून असेल कदाचित पण काल खूप दिवसांनी मला दहावीच्या परीक्षेचं स्वप्न पडलं -

स्वप्नात माझी बहीण मला परीक्षेला सोडायला आली होती. आम्ही  आमच्या घरापासून चालत चालत जात होतो. माझं परीक्षेचं सेन्टर बाजीराव रोड वरील घारपुरे प्रशाला हे होतं. सारसबागेपर्यंत चालत आल्यावर भर रस्त्यात कुठलीतरी सभा आयोजित करण्यात आल्यामुळे चालतसुद्धा पुढे जाणं शक्य नव्हतं.आता परीक्षेला पोचायला उशीर  होणार आणि पेपर बुडणार असं वाटू लागल्यामुळे मग आम्ही रिक्षा शोधू लागलो. सारसबाग ते घारपुरे प्रशाला हे खूप जवळचं अंतर असल्यामुळे अर्थातच २-३ रिक्षावाल्यांनी नकार दिला. मग एका रिक्षावाल्याच्या हाती पायी पडलो आणि कसातरी पोचलो... 

हे स्वप्नच होतं आणि त्याला काही वास्तवाचे फारसे संदर्भ नव्हते हे सांगायला नकोच !स्वप्नांचं विश्लेषण करू नये हे ही ठीकच!  म्हणजे प्रत्यक्षात (मला मनातून कितीही वेळा वाटून गेलं असलं तरी) असा कोणताही अडथळा माझ्या परीक्षेच्या वेळी आला नव्हता. परीक्षेचं माझं सेन्टर आमचीच शाळा होती. घारपुरे प्रशाला नव्हे ! 'नाही म्हणायला' रिक्षावाल्यांचं वास्तवातलं वागणं स्वप्नातसुद्धा अगदी तंतोतंत खरं दिसून आलं ! 

पण आता विचार केला तर आठवतं की एक अडथळा  माझ्या दहावीच्या परीक्षेआधी नक्कीच  आला होता. मला जेव्हा हॉल तिकीट मिळालं होतं त्यावर माझ्या मराठी -संस्कृत या (प्रत्येकी पन्नास मार्कांच्या) विषयां ऐवजी फक्त मराठी (१०० मार्क ) असं छापून आलं होतं. साधारण जानेवारीतली ही गोष्ट असेल. आत्तापर्यंत दहावीत  मी मराठीचे ६ धडे आणि ४ कविता एवढाच अभ्यास केला होता आणि आता अचानक एकदम जास्त कठीण आणि एकदम वेगळंच मराठी शिकून त्याचा पेपर द्यावा लागेल की काय असा एक पेच निर्माण झाला होता . बरं तसा हाती वेळही कमीच होता आणि माझ्यासाठी कर्दनकाळ गणित होता ज्याचा अभ्यास/सराव कितीही केला तरी माझ्या मार्कांवर त्याचा प्रभाव पडत नव्हता. तरीही कुठल्या तरी भरवश्यावर किंवा (फाजील) आत्मविश्वासावर मी घरी सांगून टाकलं- "काही काळजी करू नका. मी हायर मराठीचा अभ्यास आरामात करेन." (खरं तर पुस्तक आणण्यापासून सगळीच तयारी करायची होती !) सुदैवाने माझ्या आई वडिलांनी माझं पाणी ओळखलं होतं आणि मी म्हणालो असलो तरी मी ते करू शकेन की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. मग आमच्या बाबांनी SSC बोर्डात जाऊन(तेव्हाचं बोर्ड हे तसं पक्कं सरकारी खाक्या असलेलं होतं), कुणाचीतरी ओळख काढून हॉल तिकिटावर झालेली चूक दुरुस्त करून आणली आणि माझा एक नवीन विषय आयत्या वेळी शिकायचा त्रास वाचला.(आणि गणितात कमी मार्क का मिळाले यासाठी एक सबब पुढे करायची माझी आयती संधी हुकली!)

आता अर्थातच हे सगळं आठवलं की गंमत वाटते. शालाबाह्य संस्थेने परीक्षा घेऊन मार्क देणे या दहावीच्या वेगळेपणा व्यतिरिक्त या परीक्षेत असं काय आहे की ज्याचा बाऊ केला जातो? दहावीचे टक्के ही आपली ओळख होऊ शकत नाहीत हे जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तेवढं बरं! मला तर आता दहावीचे मार्कही आठवत नाहीत. नंतरच्या आयुष्यात एकदाच दहावीच्या मार्कांची गरज पडली होती आणि तेव्हा मार्कलिस्ट अक्षरश: उत्खननातून शोधून काढली होती.
(हे मी माझ्या '(जर्मन) भाषा पाहावी शिकून' या ब्लॉग मध्ये लिहिलं आहेच!
https://draft.blogger.com/blogger.g?tab=mj1&blogID=2409820389244950539#editor/target=post;postID=3228604851072649879;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=43;src=postname )

हे जरी खरं असलं तरी मला अजूनही कधीकधी दहावीच्या परीक्षेची आणि त्यातही गणिताच्या पेपरची स्वप्नं पडतात. उद्या पेपर आहे आणि आज माझा काहीही अभ्यास झालेला नाही किंवा आज मी गणिताचं पुस्तक आणायला जातोय अशा प्रकारची स्वप्नं पडतात. स्वप्न आणि वास्तव यांचा खरंच फारसा संबंध नसतो हेच खरं!