Sunday 27 December 2020

हरिणीचे पाडस..

 

फोटोग्राफीच्या नियमांप्रमाणे बघितलं तर हा काही खूप चांगला फोटो आहे असं नाही. पण तरीही हा फोटो मनात रूतून बसला आहे आणि आज जवळपास दहा वर्षांनी जरी त्या फोटोकडे पाहिलं तरी तो फोटो काढला होता तेव्हाची आठवण ताजी होते. हा फोटो आहे चितळ जातीच्या हरणाच्या पाडसाचा आणि हा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मधला आहे. 
प्रत्येक जंगलाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचंही आहे. उत्तराखंडमध्ये नैनीताल जवळ हिमालयाच्या कुशीत असलेलं, छोटे-मोठे डोंगर, विस्तीर्ण पठार आणि त्यावरील गवताची कुरणे, प्रामुख्याने साल या पानगळीच्या झाडाचं जंगल आणि मुख्य म्हणजे मोठा तलाव आणि जंगलातून जाणारी प्रवाह बदलणारी मोठी रामगंगा ही नदी! 


या फोटोमधल्या पाडसाचा ड्रोनने फोटो काढला असता तर तो पाडसाच्या भोवतीचं वातावरण अधिक गडद करून गेला असता. फोटो थोडासा जवळून पाहिला असता त्या पाडसाच्या आगे मागे दगड गोटे दिसतील. नदीच्या कोरड्या ठाक पात्रात हे असे लहान मोठे दगड होते. ते पाडस किनाऱ्यावर झाडाझुडुपांमध्ये लपून होते. नदीपात्रावरून जाणारया रस्त्यावरून जाताना आम्हांला हे पाडस दिसलं आणि आम्हांला बघताच आधीच घाबरलेला तो कोवळा जीव आणखी भेदरला, त्याचवेळी काढलेला हा फोटो! जवळपास वीस पंचवीस मिनिटं आम्ही तिथे थांबलो होतो. तिथल्या त्या नीरव शांततेत त्या पाडसाकडे बघत होतो. एवढ्या भव्य, भयावह वातावरणातही सगळ्यात जास्त कशाने लक्ष वेधून घेतलं असेल तर त्या पाडसाच्या निरागस, असुरक्षित भाव असलेल्या डोळ्यांनी!  ते पाडस एकटंच होतं. आम्हांला आजूबाजूला कुठेही त्याची आई किंवा चितळाचा कळप दिसला नाही. आणि त्या पाडसाच्या देहबोलीवरून असं वाटत नव्हतं की याची नुकतीच त्याच्या कळपापासून फारकत झाली आहे. आदल्याच दिवशी आम्ही एक हत्तीण आणि तिचं पिल्लू स्वछंदपणे चरताना आम्ही बघितले होते. 













त्या पार्श्वभूमीवर हे असं एकटं, एकाकी पाडस बघून कसंसं वाटलं. 
हे कशामुळे झालं असेल यावर आमची सफारी मधल्या गाईड आणि ड्रायव्हर बरोबर चर्चा चालू होती. त्यांच्या मते आदल्या दिवशी एका वाघाने या पाडसाच्या आईला मारून फस्त केलं होतं. खरं खोटं कोणाला माहित होतं? आणि त्याची खातरजमा करणंही केवळ अशक्य होतं‌. स्वसंरक्षणासाठी पळायची वेळ आली तर तेवढं पळण्यासाठी पायांत बळही नसलेल्या या प्राण्याचं भवितव्य तसं कठिणच वाटत होतं. आईवर सर्वस्वी अवलंबून असलेल्या वयाचा पण आता आईविना पोरका झालेला हा जीव या जंगलाच्या एकंदर उतरंडीत टिकणं अवघडच होतं. अशा कमकुवत, परावलंबी, कमजोर प्राण्यांवर शिकारी श्वापदांची नजर जाते आणि ते त्यांचं खाद्य होतात. हा आपल्याला माणूस म्हणून कितीही क्रूर वा निष्ठुरपणा वाटला तरी तो एक निसर्ग नियमच आहे. 

साधारण अर्धा तास तिथे थांबल्यावर तिथून पुढे जाणे आम्हांला भाग होते. त्या पाडसाचे पुढे काय झाले हे अर्थातच कळलं नाही. कदाचित ते एकटं जगायला शिकलंही असेल का? अशक्य कोटीतील ती गोष्ट होती पण तसं व्हावं अशी मनोमन इच्छा मात्र होती. या पाडसाच्या  गोष्टीने अपूर्णतेची हुरहूर लावली एवढं मात्र नक्की! जंगलाच्या उदरात अशा अनेक कथा रोज जन्माला येत असतात. आपण जंगल सफारीला गेल्यावर फक्त वाघ बघण्याचाच हट्ट ठेवला तर आपण तो वाघ दिसेपर्यंत गाड्या सुसाट पळवत राहू पण त्याचवेळी वाटेत येणारे हे छोटे अनुभव मात्र आपल्या हातून निसटून जातील. 

जाता जाता एवढंच सांगेन की जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या आमच्या सहा सफारींमध्ये आम्हांला एकदाही वाघ दिसला नाही पण तरीही या पाडसामुळे आमची ट्रिप संस्मरणीय ठरली!

Thursday 24 December 2020

उचलली जीभ...

कुठल्याही आजारी व्यक्तीला पेशंट म्हटलं जातं यामागे ती व्यक्ती त्या आजाराच्या (किंवा काहीवेळा उपचारांच्या देखील!) वेदना भोगत असते हे कारण तर आहेच, पण माझ्या मते याबरोबरच ती व्यक्ती आजारपणामुळे भेटीला आलेल्या स्वघोषित हितचिंतकांचा अतिशय धीराने आणि संयमाने सामना करत असते हे सुद्धा आहे ! कित्येकदा तर पेशंटला असंही वाटून जात असावं की एकवेळ हे आजारपण परवडलं पण भेटायला येणारे तऱ्हेवाईक लोक नकोत ! इतकं नको नको करून सोडतात हे लोक! आजारपणात सगळ्यात कुठली गरज असते तर ती विश्रांती आणि मन:शांतीची ! पण भेटायला येणाऱ्या लोकांना नेमक्या याच गोष्टींचा विसर पडतो आणि ते भेटायला येऊन पेशंटचं हित कितपत साध्य करू शकतात असा विचार मनात येऊन जातो. 

सर्वसाधारणपणे अशा लोकांचे काही प्रकार असतात. माझ्या निरीक्षणात पुढील प्रकार दिसून आले आहेत. आणखीही काही नक्कीच असतील-

१) सर्वज्ञ - या प्रकारच्या लोकांना सगळ्या विषयांमधलं सगळंच कळतं आणि आपल्याला किती कळतं हे इतरांना दाखवून देण्यात यांची बरीच शक्ती खर्च होत असते. बहुतांशी गुगल वरून वा व्हॉट्सअँप विद्यापीठातून प्राप्त झालेले ज्ञानकण उधळायची यांना खुमखुमी फार ! बद्धकोष्ठता असो की त्यामुळे उद्भवणारं अवघड जागेचं दुखणं, हृदयविकार असो वा संधिवात ! सर्व आजारांचं निदान आणि त्यावरील उपचार यांच्याकडे उपलब्ध असतात !

२) फिरतं मोफत सल्ला केंद्र - प्रकार क्रमांक १ ची ही पुढची पायरी ! कोणी यांचं मत/सल्ला मागो अथवा न मागो, हे सल्ला दिल्याशिवाय राहणारच नाहीत ! आणि हा सल्लाही इतका आत्मविश्वासपूर्वक देतात की एखादा पेशंट गांगरून जायचा - 'मी उगाच हॉस्पिटलमध्ये येऊन पडलो की काय! यांनाच आधी भेटायला हवं होतं! ' कारण हे अगदी छातीठोकपणे सांगत असतात - "तुम्ही फक्त  माझं ऐका ! बाकी काही करू नका - रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस घ्या! बस्स !सगळे आजार पळून जातील की नाही बघाच!" 

३) प्रश्नांचा भडीमार करणारे वार्ताहर/उलट तपासणी करणारे पोलीस - या प्रकारच्या लोकांना अगदी सगळ्या गोष्टी 'क्रोनॉलॉजी' ने समजल्याच पाहिजेत असं वाटत असतं. जणू काही या लोकांना  या पेशंटच्या आजाराची एखाद्या ऐतिहासिक बखरीत नोंद करायची जबाबदारी देण्यात आली आहे  अशा थाटात  प्रश्न एकामागोमाग विचारून ते अगदी पेशंटला भंडावून सोडतात- "नेमकं काय झालं? कसं झालं?किती वाजता? म्हणजे तुमचा अपघात तुम्ही  मार्केटला जाताना झाला की येताना? कुठल्या गाडीची धडक बसली? ज्युपिटर होती की ऍक्टिवा?" वगैरे वगैरे... काही वेळाने हेच लोक टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टर प्रमाणे असंही विचारतील असं वाटतं - "अपघात झाला त्यावेळी तुम्हांला नेमकं काय वाटलं होतं ?" यावरून मला आमच्या कॉलेजच्या काळातला एक किस्सा आठवला. माझ्या एका सिनिअरचा अपघात होऊन त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता आणि त्याला कॉलेजच्याच आवारातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तो सिनिअर कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय होता त्यामुळे त्याला भेटायला येणाऱ्यांची (आणि येणारींची !) संख्या खूपच होती आणि आलेला प्रत्येक जण त्याला 'काय झालं? कसं झालं' हेच विचारत होता. या प्रश्नांची  उत्तरं देऊन देऊन वैतागलेल्या त्या सिनिअरने शेवटी फ्रॅक्चर झालेल्या हाताच्या प्लास्टरवर मार्कर पेनाने त्याच्या अपघाताचा इतिहास मुद्देसूद लिहून काढला. त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला तो फक्त डावा हात पुढे करून दाखवे ! 

४) पेशंटची शाळा घेणारे - प्रकार क्रमांक २ आणि या प्रकारच्या लोकांमध्ये थोडा फरक आहे. या प्रकारचे लोक पेशंट म्हणजे किती निष्काळजी, बावळट, वेंधळा, अज्ञानी इ आहे हे दाखवून देतात ! "त्रास होतोय हे तुम्हांला आधी कळलं कसं नाही? एवढं दुर्लक्ष कसं केलं तुम्ही? आधी कुठे दाखवलं का नाही? इतके दिवस  अंगावर काढलं ना दुखणं म्हणून आता इतका त्रास होतोय !" आधीच बिचारा पेशंट दुखण्यामुळे त्रस्त असतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याची त्याला जाणीव होऊन तो संकोचलेलाही असतो. त्यात अशा बोलण्याने पेशंटला आपण आजारी पडून कुठलातरी मोठा गुन्हाच केला आहे की काय असं वाटू शकतं. 

५) निराशावादी/ नको ते बोलणारे - याबाबतीतले माझे दोन वैयक्तिक अनुभव सांगतो आणि योगायोगाने दोन्ही अनुभव भेटायला आलेल्या दोन डॉक्टरांचे आहेत. माझ्या बाबांना १९९७ साली हार्ट अटॅक आला होता. त्याकाळच्या प्रोटोकॉलप्रमाणे आधी काही दिवस आयसीयू त्यानंतर अँजिओग्राफी आणि मग अँजिओप्लास्टी असं सगळं महिनाभराच्या काळात करण्यात आलं. सुरुवातीला आयसीयूमध्ये असतानाच बाबांना भेटायला आमचे एक परिचित डॉक्टर गेले होते. बाबांचं हार्ट डॅमेज बऱ्यापैकी होतं. त्या डॉक्टरांनी बाबांच्या देखत फाईल बघितली आणि मान हलवत एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाले - "अवघड आहे !" 

अँजिओप्लास्टी करायच्या आधी बाबा घरी असताना आणखी  एक परिचित डॉक्टर आले होते. त्यांनी वेगळ्या प्रकारे बाबांना घाबरवलं. ते म्हणाले -"अहो तुम्ही एक टाइम बॉम्ब घेऊन जगत आहात. कधी काय होईल सांगता येणार नाही. तेव्हा तुम्ही सतत तुमच्या जवळ सॉर्बिट्रेटची गोळी ठेवा. अगदी संडासला जाल तिथेसुद्धा गोळी बरोबर ठेवा !" दोघा डॉक्टरांचं म्हणणं कदाचित बरोबरही होतं पण ते सांगण्याची पद्धत जरा विचित्रच होती ! 

६) थोर(!) समीक्षक - यांच्यासारख्या सिनिकल  लोकांना चांगलं काही दिसतच नाही.  म्हणून मग ते संधी मिळेल तशी हॉस्पिटल, डॉक्टर, हॉस्पिटल-स्टाफ, बिलिंगला लागणारा वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटल बिल आणि सध्या सगळीकडे कशी लूट चालू आहे हे सांगतात. 

७) अवाजवी अपेक्षा बाळगणारे - हे अनुभव एक डॉक्टर म्हणून मला काही वेळा आले आहेत. पेशंटबरोबर असे स्वघोषित हितचिंतक /नातेवाईक भेटायला येतात आणि ते आपल्याशी  जे बोलतात त्यावरून वाटतं - पेशंट यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्यावर गोळीबार तर करत नाही ना? एखाद्या लहानपणापासून दमा असलेल्या पेशंटला औषध घेऊन महिनाही झालेला नसतो. तरी बरोबर आलेली व्यक्ती तुम्हांला प्रश्न विचारते - ह्यांचा त्रास अजून कमी कसा होत नाही ? अजून किती दिवस लागतील बरे व्हायला? किंवा एखादा त्रास कमी झाला तर दुसरा कमी का नाही झाला असाही प्रश्न विचारतात. अशावेळी मग त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली की त्यांना ते पटतं देखील आणि मग तेच बाजू पालटतात आणि म्हणतात-मीही याला हेच म्हणत  होतो! 

इथपर्यंत वाचून कोणालाही प्रश्न पडेल की या माणसाला चांगलं कधी काही दिसतच नाही का? कोणी चांगली माणसं याच्या नजरेस दिसून आलीच नाहीत का? तर तसं काही नाही. काही चांगले अनुभव देखील आले. 

८ ) आश्वासक बोलणारे -  पुन्हा एकदा बाबांच्या आजारपणाचा संदर्भ देतो. बाबांच्या त्या आजारपणाच्या काळात त्यांना खास भेटायला  मुंबईहून माझ्या मावशीचे मिस्टर (म्हणजे बाबांचे साडू) आले होते. त्यांनी बाबांना खूप धीर दिला होता. कारण ते स्वत:सुद्धा या अनुभवातून गेले होते आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांची तब्येत चांगली झाली होती. तसंच माझ्या एका मानलेल्या बहिणीचे मामा सुद्धा आले होते ज्यांची सुद्धा अँजिओप्लास्टी झाली होती. या आजाराचा आणि त्यावरील उपचारांचा अनुभव घेतलेल्या  लोकांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे बाबांच्या शंका दूर झाल्या आणि त्यांचं टेन्शनही  कमी झालं होतं. 

एकूण विचार करता असं का होत असावं की पेशंटला भेटायला आलेले लोक आवश्यक ते आणि तेवढंच म्हणजेच प्रसंगानुरूप बोलू शकत नाहीत? म्हणजे तसं पाहता मुद्दाम कोणी असं वागत असेल असं नाही. लोकांचा हेतू चांगलाच असतो पण प्रत्यक्ष घडतं वेगळंच असं का होत असावं?  मला असं वाटतं की पेशंटला भेटायला जाणं  बऱ्याचदा एक केवळ सामाजिक जबाबदारी समजून त्यात एक केवळ औपचारिकता पाळली जाते. जिथे फक्त कर्तव्य भावनेने गोष्टी केल्या जातात तिथे असे प्रकार घडायची शक्यता जास्त! दुसरं म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपला 'मी' घेऊन वावरत असतो. 'मला कसं सगळं माहित ! मी कसे उपचार घेतो! (आणि जर कोणाच्या आजारपणाबद्दल कळलं नाही तर-) मला कसं सांगितलं नाही ?' खरी गरज असते अशावेळी हा 'मी' सोडून समोरच्या माणसाच्या (म्हणजेच पेशंटच्या) बाजूने विचार करण्याची ! हे खूप काही अवघड आहे असं नाही. त्यासाठी हवी थोडी संवेदनशीलता आणि सहृदयता !  कधीकधी काय बोलावं हे जर सुचत नसेल तर कमी बोलावं/ प्रसंगी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन द्वारे पेशंटला त्याच्या या कठीण काळात आपण त्याच्याबरोबर आहोत हे फक्त जाणवून द्यावं. तसंच आपला या सगळ्यात कितपत उपयोग आहे किंवा होणार आहे याचंही भान असणं आवश्यक आहे.आणि उपयोग होणार नसेल तर आपला निदान उपद्रव तरी होऊ नये याची मात्र  काळजी घ्यावी. 

 

Tuesday 1 December 2020

नूरी: रणथंबोरची देखणी वाघीण !

  

ही नूरी ! २०१९ च्या मे महिन्यात आम्हांला रणथंबोरच्या जंगलात ही दिसली होती. आपल्याला जसा आधार नंबर असतो तसा वन खात्याच्या सरकार दरबारी हिची नोंद फक्त एका आकड्याने झालेली आहे !तो आकडा आहे T-105! हे किती रुक्ष वाटतं.  पण आपल्याकडील बऱ्याच जंगलांत वाघांचं बारसं करण्याची पद्धत आहे. जंगलांमधले गाईड किंवा वाहनचालक तो वाघ ओळखण्यासाठी ती नावं देतात. बहुदा नूर या वाघिणीपासून जन्मलेली म्हणून नूरी असं या वाघिणीच्या नावामागचं कारण असावं. नूरी हे नाव ऐकल्यावर नितीन मुकेशच्या आवाजातलं  'ओ  नू..... री!' हेच गाणं आठवतं. पण हिला प्रत्यक्ष बघितल्यावर हे नाव अगदी चपखल वाटतं. 

मे महिन्याच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात पालापाचोळ्यात निवांत बसलेली नूरी एका गाईडला लांबून दिसली आणि मग सगळ्या गाड्यांचा तिथे गराडा पडला. आम्ही तिच्यापासून साधारण ६०-७० फुटांवर होतो. सगळ्यांचे कॅमेरे सज्ज झाले. वर्गात विद्यार्थ्यांना शांत बसवण्यासाठी जसा शिक्षकांना मोठ्या आवाजात ओरडावं लागतं तसं इथे कोणीतरी सगळ्यांना गप्प केलं. हे सगळं होईपर्यंत ही मात्र शांतपणे जिभेने आपलं अंग चाटत होती. या सर्व कलकलाटाचा, गर्दीचा, गाड्यांच्या आवाजाचा तिला काहीच फरक पडत नव्हता. तिच्या मनासारखं अंग स्वच्छ करून झाल्यावर यथावकाश ती उठली आणि हळूहळू चालू लागली. ती कुठल्या दिशेने जाणार याचा अदमास वाहनचालक बांधू  लागले आणि गाडीत बसलेल्या पर्यटकांना सर्वोत्तम अँगलने फोटो काढण्यासाठी गाडी कुठे नेली पाहिजे यासाठी त्यांची लगबग सुरु झाली. ती जशी चालू लागली तशी कॅमेऱ्यांमधून बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे खटखट खटखट असा आवाज येऊ लागला. एखाद्या सौंदर्यवती प्रमाणे ती डौलदार ऐटबाज चालत होती.ऐन भरात असलेलं ते देखणं रूप नेत्रसुखद होतं. तिच्यातला तो बेफिकीर अटीट्युड तिला शोभून दिसत होता. ती एखादी सिनेतारका आणि आम्ही तिचे फोटो काढण्यासाठी आसुसलेले पापराझी असंच जणू ते दृश्य होतं. 

सुदैवाने आमची गाडी अगदी योग्य ठिकाणी होती. म्हणूनच आम्हांला तिचा समोरून फोटो घेता आला. फोटोग्राफर्सच्या परिभाषेत याला Head On shot असं म्हणतात. काही वेळा वाघाचा फोटो side view मध्ये मिळतो पण त्यात काही मजा नाही. आमच्या गाड्यांना वळसा घालत, अगदी जवळून तोऱ्यात जाऊन ती निघून गेली. आधी डोळ्यांत आणि मग कॅमेऱ्यात तिचं सौंदर्य टिपून आम्ही अगदी धन्य झालो. आमच्यापासून ती आता १००-१५० फुटांवर बसली असेल. तिची नजर अचानक स्थिर झाली. श्वासाचा वेग वाढला. आम्ही बघितलं तर सांबर हरणांचा एक कळप तिच्या नजरेच्या टप्प्यात होता. ती एकटक त्यांच्याकडे बघत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कमी कमी श्रमात सावज हेरून त्याला बेसावध गाठायचं कसं याच गणित ती करत असावी.  मात्र  त्यांनीही तिला पाहिलं असावं आणि म्हणूनच तो कळप एकदम सतर्क झाला आणि तिच्या दिशेने बघू लागला. काही वेळाने नूरीला हा नाद सोडून द्यावा लागला. सांबरांचा कळपही  निर्धास्त झाला पण आम्हां फोटोग्राफर्सचा खटखटाट आणि क्लिकक्लिकाट मात्र चालूच राहिला !