Saturday 9 March 2019

अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास ! भाग १


२३ फेब्रुवारीला २०१९ आमच्या शाळेच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर सिंगापूर येथे राहणाऱ्या माझ्या अतुल बिवलकर या मित्राने संत अमृतराय यांच्या कटाव वृत्तामधील 'आनंदे वंदावा गणनायक' ही गणेश स्तुतीची ऑडिओ क्लिप पोस्ट केली. या आधीही ही क्लिप ऐकली होती. सुप्रसिद्ध संगीत अभ्यासक डॉ अशोक रानडे यांचं या कटाव वृत्ताबद्दलचं निवेदन आणि प्रत्यक्ष संगीतरचना अशी ती क्लिप आहे.निवेदनात डॉ रानडे यांनी त्यांच्या खास शैलीत अमृतराय यांच्याबद्दल नेमक्या शब्दात माहिती दिली आहे. तसेच कटाव वृत्त म्हणजे अलीकडच्या रॅप संगीताच्या जवळ जाणारा प्रकार आहे आणि ते गाण्यासाठी अतिशय अवघड आहे हे देखील सांगितलं आहे. कारण त्यातले शब्द भराभर उच्चारले पाहिजेत आणि ते बरोबर उच्चारले पाहिजेत. ही गणेश स्तुती म्हणण्यासाठी एकाग्र व्हावंच लागतं आणि त्याची लय अशी आहे की दम श्वासाची परीक्षाच आहे ! म्हणूनच ही संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं संगीत डॉ अशोक रानडे यांचंच आहे. 
डॉ अशोक रानडे 

ती ऐकणं हा खूप छान अनुभव होता. पण या गणेश वर्णनाचे शब्द फारसे काही कळले नाहीत कारण ते जुन्या काळचे अवघड शब्द आणि एका विशिष्ट लयीत केलेलं उच्चारण असल्यामुळे माझ्यासारख्याला समजायला आणि लक्षात ठेवायला अवघडच गेलं. पण हीच अडचण इतरही काही जणांना जाणवली असावी. कारण शाळेच्या ग्रुपवर त्या रचनेच्या शब्दांविषयी विचारणा झाली. पण कुणालाच त्याची माहिती नव्हती. इथून एका मनोरंजक प्रवासाची सुरुवात झाली आणि त्याचा शेवट आज होऊन ते शब्द मला मिळाले त्याचीच ही कथा !

 शब्द मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्थातच गुगल शरण गेलो ! विकिपीडियावर अमृतराय यांची माहिती
संत अमृतराय 
मिळाली(जन्म- १७ मार्च  १६९८ - मृत्यू १७५३). त्यांच्या जीवनकार्याचा माहिती मिळाली. पण या गणेश वर्णनाबद्दल काहीच हाती लागलं नाही. दुसऱ्या एका लिंकद्वारे 'केतकर ज्ञानकोश' मधील अमृतराय यांच्या साहित्यविषयक बऱ्यापैकी सविस्तर वाचायला मिळालं. त्यात त्यांनी अमृतराय यांच्या भाषेविषयी उदाहरण देताना 'सुदामचरित्रांतील जेवण' मधला एक भाग दिला आहे. अतिशय वेगळ्या प्रकारची नादमय भाषा आहे ती ! पण जे हवं होतं ते नाहीच मिळालं. असंच शोधता शोधता अमृतराय यांच्या 'अजि मी ब्रम्ह पाहिले' चे शब्द गवसले ! मला ही रचना त्यांची आहे हे देखील माहित नव्हतं ! जयजयवंती रागातली आशा भोसले यांनी गायलेली आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदर रचना या नवीन संदर्भासह ऐकताना आणखी आवडली.
https://www.youtube.com/watch?v=qQTxZx5sF1I

२३ फेब्रुवारीलाच योगायोगाने माझ्या संगीताच्या एका व्हॉट्सअँप ग्रुपवर हीच ऑडिओ क्लिप कोणीतरी पोस्ट केली. पण तिथेही त्याच्या शब्दांविषयी कोणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थोडं निराश झाल्यासारखं झालं. पण त्याच ग्रुपवर हे कळलं की ही गणेश स्तुती 'कला गणेश' या २ सीडीच्या संचातली आहे आणि गायक कलाकार आहेत- सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, प्राची दुबळे, समीर दुबळे, हर्षा बोडस इ. मग पुन्हा एकदा त्या गणेश वर्णनाचे शब्द मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या. कारण या गायक कलाकारांपैकी प्राची दुबळे आणि समीर दुबळे माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि त्यांच्या फेसबुक पोस्टवर माझा क्वचित प्रसंगी त्यांच्याशी संवादही झालेला आहे. अर्थात ही अगदीच जुजबी ओळख आहे याची कल्पना होतीच. पण मनात आलं की त्यांना विचारायला काय हरकत आहे? फार फार तर ते उत्तर देणार नाहीत किंवा माहित नाही असं सांगतील. म्हणून दोघांना इनबॉक्स मध्ये या रचनेविषयी विचारलं. आश्चर्य म्हणजे दोघांनीही तत्परतेने उत्तर दिलं. समीर दुबळे यांनी ते शब्द मिळवायचा प्रयत्न करतो असं सांगितलं तर प्राची दुबळे या तेलंगण मध्ये होत्या तरीही तिथून त्यांनी या जुन्या रेकॉर्डिंगच्या वेळच्या सह-कलाकारांना विचारून सांगते असं कळवलं.
यानंतर मध्ये एक आठवडा गेला. माझ्या मनातून हा विषय मागे पडू लागला. पुन्हा पुन्हा या मोठ्या कलाकारांना विचारून त्रास देणे मला प्रशस्त वाटले नाही. आणि सुखद धक्का म्हणजे अचानक ३ मार्चला प्राची दुबळे यांचा मेसेंजरवर मेसेज आला. त्यात त्यांनी डॉ चैतन्य कुंटे यांच्याकडे ते शब्द असतील आणि ते हिराबागजवळ असलेल्या डॉ अशोक रानडे आर्काइव्ज या केंद्रात मिळतील असं सांगितलं. तसंच या रचनेबद्दल डॉ कुंटे यांचा एक मेसेज ही दिला.तो मेसेज असा होता-
'सध्या व्हॉट्सअँपवर 'गणेश जन्माचे जुने दुर्मिळ रेकॉर्डिंग' म्हणून एका कटावाचे ध्वनिमुद्रण खूप फिरवले जातेय. मात्र त्याविषयी योग्य माहिती वा तपशील सोबत दिले जात नाहीयेत. म्हणून हे टिपण देत आहे -
१) हा कटाव 'गणेश जन्मा'चा नसून श्रीगणेशाच्या रूपलावण्याचे वर्णन करणारा आहे.
२) ज्येष्ठ संगीतज्ज्ञ, गायक व संगीतकार स्व. डॉ. अशोक दा. रानडे यांची संकल्पना, संगीतदिग्दर्शन व निरूपण असलेल्या 'कलागणेश' ह्या कार्यक्रमात हा कटाव सादर झाला होता.
३) १७व्या शतकातील मराठी कीर्तनकार कवी अमृतराय यांचे हे काव्य डॉ. अशोक दा. रानडे ह्यांनीच संगीतबद्ध केले आहे. ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना १४ मात्रांच्या आडाचौतालात निबद्ध आहे.
४) सदर ध्वनिमुद्रण श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित 'कलागणेश' ह्या २ सीडीजच्या संचातील आहे.
५) 'आनंदे वंदावा' ह्या चरणापूर्वी जे सुंदर निरूपण आहे, ते स्वतः डॉ. रानडे यांचे आहे.
६) रचनेचे गायन त्यांचे शिष्य सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, समीर व प्राची दुबळे, हर्षा भावे इ. गायकांनी केले आहे.
मकरंद कुंडले, नीला सोहोनी, राजेंद्र भावे, कृष्णा मुसळे, हरी बागडे आणि शेखर खांबेटे ह्या वादक कलाकारांची पोषक साथसंगत आहे.
- डॉ. चैतन्य कुंटे
(डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज, पुणे) '
आता हे शब्द मिळवणं आणखी सोपं झालं असं मला वाटलं कारण हे केंद्र माझ्या रोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर होते. 
शेवटी आज(८ मार्च २०१९)  मी तिथे संध्याकाळी गेलो. तिथे 'कला गणेश'  सीडींबद्दल विचारलं. तिथे अतिशय छान आणि व्यवस्थित माहिती मिळाली. पण कळलं की त्या सीडी सध्या उपलब्ध नाहीत आणि इतक्यात मिळतील असंही नाही. पुढे मागे डॉ रानडे यांच्या नावाने असलेल्या वेब साईटवर त्यातल्या रचना ऐकता येतील. पुन्हा एकदा पदरी निराशा पडणार असं वाटलं. तरी मी तिथल्या स्टाफना विचारलं- "मला त्या कटाव वृत्ताचे शब्द हवे आहेत. ते मिळतील का?" त्यांना वाटलं की मला ती क्लिप हवी आहे.
तिथल्या बाजूच्याच एका टेबलावर १-२ मुली आणि एक बाई काहीतरी वाचत बसले होते. त्यातलीच एक तरुण मुलगी माझं सगळं बोलणं ऐकत होती. तिने मग आपणहून मला विचारलं- "तुम्हांला काय हवंय?" मी म्हणालो- "ती क्लिप आहे माझ्याकडे... मला त्याचे शब्द हवे आहेत". आणि त्या मुलीने तिच्या पर्स मधून एक कागद काढून मला हसत हसत सहजपणे दिला आणि म्हणाली- "हे घ्या त्याचे शब्द !" माझा विश्वासच बसेना ! मी लगेच त्याचा फोटो काढून घेतला. तिथल्या बाकीच्यांना पण या मुलीकडे कसे काय शब्द याचं आश्चर्य वाटलं. तेव्हा तिने सांगितलं- 'मी रेवा नातूंकडे गाणं शिकतेय आणि सध्या त्यांच्याकडे हेच शिकवत आहेत आणि डॉ कुंटे सरांकडून याच रचनेचे शब्द मिळाले !"
यात आणखी एक गंमत म्हणजे डॉ रेवा नातू या माझ्या शाळेतल्या आणखी एका मित्राची (डॉ अभिजित नातू) ची बायको ! म्हणजे मी जर अभिजितलाच विचारलं असतं तर मला हे शब्द मिळालेेही असते कदाचित! पण हा उत्कंठावर्धक प्रवास झाला नसता!
गणेश वर्णनाचे शब्द मिळाल्यामुळे मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता ! त्या आनंदात त्या मुलीचे आभार मानले. पण गोडी अपूर्णतेची थोडीशी राहिलीच ! मला चुटपुट लागून राहिली की त्या मुलीचं नाव विचारायचं राहूनच गेलं !  खरं तर ते विचारायचं कसं याचा मला खूप संकोचही वाटला.
मात्र एक छोटीशी गोष्ट खूप छान अनुभव आणि समाधान देऊन गेली.जगात खूप  चांगली माणसं असतात याचा पुन्हा प्रत्यय आला ! .. 


तर आता या गणेश स्तुतीचे शब्द देत आहे -

ओम . . . . . 
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक 

सा - 
रुंड मथन करि जननी जनक निज रुंड मालधर 
       अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय विनय 
       विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि शुंड सरळ मुनी 
       धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु विकट तुंड गण 
       पुंडरीक मणी हार प्रलंबित 

रे -    कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल 
        श्रुतीयुगी गंडस्थळी अळी  चंद्रखंडरघर गुणगण मंडित 
        किर्ती अखंडित खंड दुरित चय पंडित गामिनी 
        तांडव करि जो पदमभवांडी मंडलाकृती चंड पराक्रम 

रे -    विदण्ड खंडन विपक्ष दंडन स्वभक्त मंडन सुखात मुनिवर 
        सकल चराचर पावन करीनिज प्रसाद देवून पुरवी मनोरथ 
         विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. 

 -    परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती 
         कलीकाल कापती परनिर्दाळण करित समरी जो 

ग -    पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ 
         कटन कर वाल स्मरण ते सप्तताल करि 
म-     नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ 
         वाले वाकी पदी फुंफुंफु करि नागबंध कटि 

म'-   लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले 
          किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र घंटिका दणदणदणदण 

प -     उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती 
          धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु 

 -     धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ 
          थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा 
          सप्तस्वर मुखी भेद आलापित 

ध-      स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती 
          गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि 

नि-     प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी 
          सादर समुदायसवे आयकतो.... 

आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक.....    

माझ्याकडे या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक होता. त्याचा व्हिडिओ माझा मित्र श्रीधर अय्यर याने करून दिला आहे. त्यामुळे हे गणेश वर्णन आता इथे ऐकणं शक्य आहे.. 
https://www.youtube.com/watch?v=PAruU5DrF48