Thursday 9 April 2020

कोरोना डायरी १

                                                                             १

कोरोनाची पार्श्वभूमि :

कोरोना विषाणू 
भारतात ३० जानेवारी २०२० ला CoVid-19 पहिला पेशंट  सापडला. त्याआधी चीनमध्ये या साथीची केव्हाच सुरुवात झाली होती. साधारणपणे २०-२२ जानेवारीला आमच्या शाळेतील एक मित्र चीनहून त्याचे काम आटपून परतला. तेव्हा दिल्ली विमानतळावर त्याचे स्क्रीनिंग झाले होते. त्यावेळी हा एक केवळ खबरदारीचा उपाय असेल आणि भारतात काही हा आजार इतका पसरणार नाही ( भारताचे उष्ण हवामान आणि पाश्चिमात्य देशांतील लोकांपेक्षा आपल्या लोकांची अशा आजारांना परतवू शकणारी चांगली प्रतिकारशक्ती ही काही कारणं असतील) असं तेव्हा वाटलं होतं. पूर्वी २००९ साली स्वाईन फ्लू ची देखील साथ आपल्याकडे होती. त्यामुळे त्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील परिणाम झाला होता. पण त्याचे खूप काही गंभीर परिणाम न होता ती साथ तशी लवकर आटोक्यात आली. तो अनुभव विचारात घेता यावेळी देखील भारत यातून सहज बाहेर येईल असं वाटलं होतं.
२००९ साली समाजमाध्यमं आजच्या तुलनेत एवढ्या प्रमाणात नव्हती. तेव्हा माहितीचा स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स  हेच  होते . आता मात्र जगभरातील स्थिती वेगवेगळ्या माध्यमांमधून अक्षरश: लाईव्ह कळते. तशाच प्रकारे  CoVid-19 चा जगभरात जाणवणारा परिणाम अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागला आहे हे विविध बातम्या, लेख आणि जगभरातील लोकांचे आजाराचे अनुभव यातून दिसू लागलं आणि खडबडून जाग आल्यासारखं झालं. चीनमधून साथीचं वास्तविक चित्र समोर येत नव्हतं पण हळूहळू इटली, इराण इथले या आजाराच्या रुग्णांचे आकडे आणि आजारामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या भयावह वाटू लागली. ट्विटर वर लंडन स्थित अली नावाच्या मूळच्या इराणी माणसाने तिथले काही व्हिडिओ देखील टाकले. त्यातून रस्त्यात चालता चालता अचानक कोसळणारी माणसं, तिथल्या हॉस्पिटल्स मधले गंभीर पेशंट आणि त्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या पेशंटच्या संख्येला तुटपुंजी ठरणारी तिथली आरोग्य व्यवस्था हे तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करत होतं. त्याही परिस्थितीमध्ये तिथले डॉक्टर्स, नर्सेस पेशंटना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते आणि त्यात काही डॉक्टरांना प्राणही  गमवावे लागले. अशा नकारात्मक वातावरणाबरोबरच आय सी यू मधील नर्सेस आपला ताण हलका करण्यासाठी PPE घालून चक्क नाचत आहेत असाही व्हिडिओ पाहण्यात आला.
 मात्र तरीही चीन, इटली-स्पेन सारखे युरोपिअन देश किंवा अमेरिका हे भारतापासून लांब आहेत आणि तिथे हा आजार वेगाने पसरला असला तरीही भारतात तो इतका धुमाकूळ घालणार नाही अशी एक भाबडी आशा मनात होती. स्वत: बद्दलची माझी अशी समजूत होती की माझी मतं शक्यतो काही वाचन, त्यातून मिळणारे संदर्भ, पुरावे यावर आधारित असतात. या साथीच्या अनुषंगाने नेमका त्याचवेळी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा २००९ च्या स्वाईन फ्लूच्या साठी मागच्या खऱ्या कारणांचा वेध घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध हे देखील या साथी मागे आहे की काय अशी वाचनात आलं. अशाप्रकारच्या Conspiracy theories मुळेही  या साथीचं गांभीर्य कमी वाटू लागलं.
जानेवारी-फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या एक-दोन आठवड्यांपर्यंत रोजचे सर्व व्यवहार सुरळित चालू होते. ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची जागतिक साथ(pandemic) असल्याची घोषणा केली आणि महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेज १६ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसंच गर्दी न करणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सिनेमा थिएटर- नाट्यगृहं बंद असे जेव्हा आदेश आले तेव्हा लक्षात आलं की संकट अगदी दाराशी येऊन ठेपलं आहे. हे म्हणजे अगदी ऑफ गार्ड पकडल्यासारखं झालं. एखादा चेंडू फ्लिक करायला जावं आणि तो इन-स्विनगिंग यॉर्कर ठरून दांडी गुल करेल की काय असं वाटू लागलं.

                                                                         २
कोरोनाबद्दलची शास्त्रीय माहिती, त्या आजाराची लक्षणं, त्याचे निदान आणि उपलब्ध उपचार, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय हे सगळं सांगायचा या ब्लॉगचा हेतू नाही. आणि तशीही या सर्व बाबतीत माहिती सर्व माध्यमांवर उपलब्ध आहेच (अगदी प्रत्येक फोनवरच्या त्या कंटाळवाण्या रिंगटोन सह!) पण तरीही कोणाला ही माहिती हवी असल्यास या व्हिडिओ मधून ती मिळू शकेल -
https://www.youtube.com/watch?v=AFLTC842qY4


                                                                           ३
कोरोनाची साथ आणि माझं क्लिनिक -
वर उल्लेख  केल्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. पेशंट WhatsApp वर फिरत असलेल्या कोरोना साथीच्या तथाकथित प्रतिबंधासाठी होमिओपॅथीच्या  एका औषधाविषयी (आर्सेनिक अल्बम) विचारत होते. त्यांना त्याबद्दलचे सत्य सांगणे आणि आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सांगणे असं चालू होतं.मी हून कोणालाही असं जेनेरिक औषध दिलं नाही. पण एका पेशंटकडून कळलं की पुण्याजवळील एका गावात एका होमिओपॅथिक डॉक्टरने असे प्रतिबंधात्मक औषध देण्यासाठी एक शिबिर घेऊन त्यातून बक्कळ पैसा कमावला. होमिओपँथीच्या दुकानांमध्ये या औषधाचा तुटवडा निर्माण झाला.
२२ मार्चला केंद्र सरकारने एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' लागू केला आणि महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत वाढवल्यानंतर  मात्र  अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. २३ मार्च पासून क्लिनिकला जायचं की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे जरी आम्ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असलो तरीही कित्येक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवायला सुरुवात केली. संपूर्णपणे केवळ होमिओपॅथीचीच उपचारपद्धती वापरणारा माझ्यासारखा डॉक्टर त्यामुळे थोडा संभ्रमित झाला. अशा साथीच्या आजाराच्या काळात होमिओपॅथीचे नेमके स्थान काय? या प्रश्नाचे उत्तर कितीही नाही म्हटलं तरी -फारसे काही नाही !- हेच होतं. मी स्वतः ला कुठल्याहीप्रकारे कोरोनाच्या युद्धभूमीवरील एक योद्धा म्हणून बघू शकत नव्हतो (आणि अजूनही त्यात काही बदल झालेला नाही) मग अशा स्थितीत क्लिनिक चालू ठेवावं का? पण मग इतर जुनाट आजारांच्या पेशंटचं काय? त्यांच्या मनांतील शंकांचं निरसन करणारा, त्यांना आश्वस्त करणारा किंवा दिलासा देणारा डॉक्टर म्हणून माझी भूमिका असू शकते की नाही? या सगळ्या पलिकडे जाऊन क्लिनिक बंद ठेऊन माझ्या व्यवसायाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्या प्रति माझी निष्ठा कमी पडते की काय ? असे काही तात्विक/नैतिक प्रश्न उपस्थित झाले. अशा प्रश्नांना आपल्याला कधी सामोरं जावं लागेल असं वाटलंही नाही. पण ही परिस्थितीच इतकी विचित्र होती कि तुम्ही कुठलीही बाजू बघा ती योग्यच वाटेल. म्हणजे दवाखाने चालू ठेवले तर डॉक्टर त्याच्याकडून अपेक्षित सर्व जबाबदारी पाडत आहे आणि समजा दवाखाने बंद ठेवले तरीही त्यात गैर काहीच नाही - कारण दवाखाने हा देखील आजार पसरण्याचा एक स्रोत होऊ शकतो. एकमेकांच्या संपर्कात आलेले पेशंट, क्लिनिकमध्ये जिथे पेशंट बसतात त्या खुर्च्या, दरवाज्याच्या कड्या इ सगळ्यामुळे आजार पसरू शकतो. आणि (माझ्या) क्लिनिकमध्ये बसल्यामुळे पेशंटला हा आजार झाला हे guilt घेणं मला जड गेलं असतं. शिवाय सगळीकडे Social Distancing हा परवलीचा शब्द झाला होता. त्यामुळे दवाखाना बंद ठेऊन एक प्रकारे आपण या सामाजिक अंतर राखण्याला मदतच करत नाही का ?
या सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणून मी २३ मार्च पासून माझं क्लिनिक फक्त थोडा वेळ चालू ठेवू लागलो. म्हणजे पेशंटनी आदल्या दिवशी फोनवर त्यांची लक्षणं सांगायची आणि घरीच त्यांची औषधं मी करून त्यांना क्लिनिकमधून ती फक्त घेऊन जायला सांगायचो. काही पेशंट घरी येऊन औषध घेऊन जात होते. अशाप्रकारे सेवा देऊन (आत्मप्रौढीचा धोका पत्करून )कुठल्याही पेशंटला मी नाकारले नाही. फोनवर तर मी संपर्कात होतोच. पण या साथीमुळे एक झालं की येणारा प्रत्येक पेशंट हा 'त्याच' आजाराचा आहे की काय अशी शंका डोक्यात यायची. मग त्यातूनच Hand sanitizer वापर, तोंडाला मास्क लाव, वेटिंग एरिया सारखा पुसून काढ असे पॅरानॉईड उपाय करायला लागलो. शिवाय पेशंटला तपासण्यासाठी हात लावताना देखील विचार करावा लागला. पूर्वी माझा मामा एकदा मुंबई येथील एका नामांकित डॉक्टरांकडे गेला होता. तिथून आल्यावर तो म्हणाला -"आज डॉक्टरांनी माझे काही लाड पुरवले नाहीत. त्यांनी मला हातसुद्धा लावला नाही!" तसं मी देखील पेशंटना लांबूनच तपासत होतो.
या साथीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे याच्याशी जोडला गेलेला social stigma ! या आजाराचे पेशंट म्हणजे कोणी गुन्हेगारच आहेत आणि ते इतरांना मुद्दामच हा आजार 'देत' आहेत असं वातावरण निर्माण झालं. एका डॉक्टरला हा आजार झाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व पेशंटचा नंतर माग घेण्यात आला आणि त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले. या उदाहरणावरून असं वाटलं की असा प्रकार आपल्याकडे झाला असता तर? सरकारी यंत्रणा कामाला लागून त्यांनी contact tracing केलं असतं आणि मीडियामध्ये या सगळ्याची बातमी येऊन आपलं नाव त्यात खराब झालं असतं. त्यापेक्षा क्लिनिक कमी वेळ चालू ठेवणंच श्रेयस्कर असा विचार मी केला.
विचार करता करता मी या प्रश्नाकडे येऊन थांबलो की मला नेमकी भीती कशाची वाटते? आजाराची की या सर्वव्यापी/ सर्वाधिकार असणाऱ्या सरकारी यंत्रणेची ? की आणखी काही?....                            
                                                                                                                                   (क्रमश:)