Sunday 28 April 2024

हिमाचल डायरी ५ - माझं क्रिकेट प्रेम !

१ 

हा माझा दिडशेवा ब्लॉग आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे . १० एप्रिल २०१३ ला पहिला ब्लॉग प्रकाशित केला होता. गेल्या अकरा वर्षांतील  माझ्या ब्लॉग्सना आजवर एकूण १ लाख आठ हजारापेक्षा जास्त हिट्स मिळालेल्या आहेत. संत अमृतराय  यांच्या कटाववृत्तातील गणेशस्तुती या ब्लॉगला  जवळपास १० हजार हिट्स मिळाल्या आहेत. लिहिणं ही माझ्यासाठी एक आनंददायी प्रक्रिया आहे. जे काही लिहिलं  आहे त्यात बरंचसं आलेल्या/घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे, त्यात स्मरणरंजन आहे, कधी पुस्तकांवर लिहिलं आहे, कधी गाण्यांवर, कधी सिनेमांवर तर कधी काही व्यक्तींवरदेखील ! काही ब्लॉग फॅनफिक्शन या प्रकारावर आधारित आहेत( व्यक्ती खऱ्या असणं परंतु प्रसंग काल्पनिक असणं ) पण आजवर जे लिहिलं ते अगदी न ठरवता उत्स्फूर्त लिहिलं. मनात आलं ते लिहिलं आणि माझ्या ब्लॉग्सच्या वाचकांनीं ते प्रेमाने वाचलं, काहींनी मला मौलिक सूचनाही दिल्या. माझ्यावरील सर्वांच्या या प्रेमांमुळेच मला आणखी लिहित राहण्याचं प्रोत्साहन मिळत गेलं आणि म्हणूनच मी आज या टप्प्यावर  येऊन ठेपलो आहे हे कृतज्ञपणे नमूद करतो. सर्वांचं हे प्रेम असंच यापुढेही राहील अशी खात्रीच बाळगतो आणि परत एकदा हिमाचल डायरीकडे वळतो. 

२ 

दिडशेवा ब्लॉग हा टप्पा गाठत असताना एका नव्या विषयावर मी लिहित आहे याचा मला एक वेगळाच आनंद आहे. आणि यात थोडंफार आश्चर्यसुद्धा वाटतंय -आजवर मी क्रिकेटवर लिहिलंच नव्हतं? शिवाय तुम्हांला वाटेल शीर्षक तर हिमाचल डायरी आहे आणि त्यात मध्येच हे क्रिकेट प्रेम कुठून आलं? आपल्या हिंदी सिनेमात नाही का खूप काही गंभीर प्रसंग झाले की विनोदी अभिनेत्यांची उपकथानकं असत, त्याने कॉमिक रिलीफ मिळत असे. तसं हिमाचल च्या आमच्या ट्रिप वर ४ गंभीर ब्लॉग लिहून झाल्यावर हा पाचवा थोडा हलकाफुलका ब्लॉग तर नाही ना? तुमच्या सर्व शंकांचं निरसन या ब्लॉगच्या शेवटी होईल अशी मला आशा आहे. (म्हणजे या निमित्ताने तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग वाचाल!) 

३ 

आपल्याकडे भारतात राजकारण, क्रिकेट आणि हिंदी सिनेमा हे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांचे प्राधान्यक्रम कदाचित व्यक्तिगणिक वा प्रसंगानुरूप बदलत असतील पण या तीन विषयांत काहीच गम्य नाही असा एकही भारतीय माणूस शोधूनही सापडणार नाही. आणि या प्रत्येक विषयाबद्दल सगळ्यांचीच ठाम मतं, विचार असतात. त्याला मी तरी कसा अपवाद असेन? आपल्याकडे विशेषतः प्रत्येक मुलाने लहानपणी क्रिकेटची बॅट हातात घेतलेली असते. बॉलिंग केलेली असते. हे एवढंसं भांडवल क्रिकेटवर अधिकाराने बोलायला पुरेसं असतं. माझ्या लहानपणी मी एक 'वजनदार' असामी होतो. त्यामुळे चपळाई वगैरे गोष्टी माझ्यापासून चार हात लांबच असत! पण तरीही आजूबाजूच्या मुलांबरोबर क्रिकेट खेळणे असायचे. कोणी खेळायला नसले तरी एकट्याने बिल्डिंगच्या  भिंतीवर  बॉलिंगच्या ऍक्शनने बॉल टाकत बसणे हा उपक्रम असायचा. तर कधी रिकामटेकडे उद्योग म्हणजे बॅटवर लेदरच्या चेंडू टॉकटॉक करत आपटत बसायचं -त्याने बॅटचे स्ट्रोक चांगले होतात ही अंधश्रद्धा! माझ्या अचपळ शरीराच्या मर्यादा मला लवकर लक्षात आल्यामुळे ( किंवा आमच्या मित्रमंडळींनी त्या  वेळेतच लक्षात आणून दिल्यामुळे असेल) मी क्रिकेटमध्ये फार पुढे गेलो नाही! नाहीतर अर्जुना रणतुंगा, इंझमाम उल हक किंवा अगदी गेला बाजार वेस्ट इंडिजचा राहकीम कॉर्नवॉल सारख्या थुलथुलीत क्रिकेटपटूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली असती! 

प्रत्यक्ष खेळणं कमी झालं असलं तरी आमच्याकडे मी ८ वर्षांचा असताना टीव्ही आला आणि नंतर कितीतरी मॅचेस टीव्हीवर बघायला मिळाल्या. शिवाय रेडिओवर कॉमेंट्री सुद्धा ऐकायचो. यातून हळूहळू क्रिकेटचे बारकावे समजू लागले. क्रिकेटपटूंच्या  शैलीइतकीच कॉमेंटेटरची शैली आवडू लागली. खेळाडूंची नक्कल करता येत नसली तर काय झालं -मी कॉमेंटेटरची नक्कल करू लागलो आणि पुन्हा एकदा आमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींमध्ये मला  सन्माननीय प्रवेश मिळाला . गल्लीतल्या त्या क्रिकेटचं मी सुशील दोशींच्या शैलीत वर्णन करू लागलो('लगान' सिनेमात जावेद खानच्या रोलमुळे माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या)  - "रवीने इसे कलाई के सहारे मोड दिया और जब तक फिल्डर पहुच पाते, एक रन आसानी से लिया" किंवा आसमान में बादल और नीचे राजू! ये गेंद ... बिलकुल पटकी हुई !" वगैरे.. या मुळे त्या खेळाडूंना देखील एक भारी फील यायचा - आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्या सुंदर खेळाचं  कोणीतरी वर्णन करतंय.. कॉमेंटेटर चा विषय निघालाच आहे तर माझे आवडते कॉमेंटेटर रिची बेनॉ आणि टोनी कोझियर ( वेस्ट इंडिजचे) आहेत. रिची बेनॉ म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त मांडायची हातोटी! रिची बेनॉ ज्या दिवशी जन्मला(६ ऑक्टोबर)  त्याच दिवशी जन्मलेला टोनी ग्रेग मात्र अगदी या उलट - अति उत्साही आणि लोकांच्या भावनांचा विचार करून कॉमेंट्री करणारा!(तसाच हेन्री ब्लॉफेल्ड देखील)  टोनी कोझियरचा वैशिष्ट्यपूर्ण कॅरिबियन ऍक्सेंट आणि त्याचं निष्पक्ष समालोचन आवडायचं. 

क्रिकेटवर येणारे लेख, सामन्यांची वर्णनं, खेळाडूंचे रेकॉर्ड हे सगळं वाचायची आवड निर्माण झाली. त्यावेळी हे रेकॉर्ड पाठदेखील असायचे. तर दुसरीकडे क्रिकेटपटूंचे फोटो जमा करणे याचाही छंद लागला. पुण्यात फुले मंडईजवळ एक छोटं खोकडं होतं. तिथे हे फोटो मिळायचे. 

मग तिथे चकरा मारून हे फोटो जमा करायचे. वर्तमानपत्रातली कात्रणं जमवायची.. आमच्या शलाका ग्रंथालयात क्रीडाविषयक नियतकालिकं यायची .. ती वाचायचो. नंतर अक्षर प्रकाशनने सुरु केलेलं -एकच षटकार हे पाक्षिक नियमितपणे वाचायचो. द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, दिलीप प्रभावळकर यांचे षटकार आणि इतर ठिकाणी येणारे लेख वाचणे ही पर्वणी असे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये वि वि करमरकर लिहायचे. त्यांची एक वेगळीच शैली असायची. त्यांनी मटा मध्ये क्रिकेटची एक वेगळी परिभाषा रुजवायचा प्रयत्न देखील केला ( उदाहरण- एक दिवसीय सामन्याला झटपट क्रिकेट म्हणणे वगैरे ) 

आताच्या पिढीला सुनील गावस्कर हे समालोचक म्हणून माहित असतील पण आमच्या काळात सुनील गावस्कर म्हणजे आमच्या दैवतासमान होता. हेल्मेट न वापरता वेस्ट इंडिजच्या कर्दनकाळ गोलंदाजांचा यशस्वी सामना करणारा, सलामीचा विश्वासार्ह फलंदाज...ज्याचा स्टान्स अतिशय  कॉम्पॅक्ट आणि स्ट्रोक्स अगदी कॉपीबुक! त्याचा स्ट्रेटड्राइव्ह नेत्रदीपक ! त्याची १९८१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब अपायरिंगच्या विरोधात (की स्लेजिंग विरोधात ) वॉक आऊट करण्याची बाणेदार वृत्ती... त्याची जिगर.. त्याची आश्वासकता ...सगळं सगळंच आवडायचं. लहानपणी माझ्याकडे त्याचं हे असं फ्लिकर बुक होतं - त्याचा स्ट्रेटड्राइव्ह बघत राहणे हा एक आवडता टाईमपास होता -

https://youtu.be/z6tyi17J5mY?si=fgNh7ieNakauid9- 

गावस्कर वर भक्ती होती पण अंधभक्ती नव्हती (त्याने सपाटपणे गायलेले - 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला' कधीही आवडलं नाही. तो सत्यसाईबाबांचा भक्त आहे हेही खटकलं आहे आणि त्याच्यावर  मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे  संशयाचं वलय निर्माण झालं होतं.) अलीकडे व्हाट्सअँप वर एक पोस्ट फिरत होती ज्यात मुंबई दंगलीत सुनील गावस्कर ने एका मुस्लिम माणसाला हिंदू दंगलखोरांपासून वाचवलं होतं असा उल्लेख होता. हे वाचल्यावर तर त्याचे या आधीचे सगळे गुन्हे माफ असं म्हणायला हरकत नाही असं वाटलं. 

गोलंदाजांत कपिलदेवचा उदय होईपर्यंत आमच्याकाळात तरी मला फारसे कोणी आवडत नव्हते   (फिरकीच्या चौकडीचा मी उतरता काळ बघितला आहे ) कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ साली एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड काप जिंकणं हा  भारतीय क्रिकेटमधील एक अजरामर क्षण!  तोपर्यंत भारत कायम also  ran असायचा. पण वेस्ट इंडीजसारख्या विश्वविजेत्या संघाला धूळ चारणं ही एक अपूर्व घटना होती. त्यानंतर भारताने अनेक विजय मिळवले पण हा विजय आणि अर्थातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्स टेस्ट मधला विजय हे दोन सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे विजय! Cricket is a glorious game of uncertainties असं म्हणतात ते खरंच आहे कारण वर्ल्ड कप हरलेला वेस्ट इंडिजचा हाच संघ नंतर भारतात आला होता आणि त्याने भारताला चारी मुंड्या चीत केलं होतं. तो वेस्ट इंडिजचा संघ होताच तसा - आक्रमक आणि रुबाबदार! व्हिव्हियन रिचर्ड्स चा ऍटिट्यूड कमाल होता. मला त्यावेळी मायकेल होल्डींगची गोलंदाजीची शैली फार आवडायची - त्याला whispering death म्हणायचे . मला मात्र तो नेहमीच Poetry in motion वाटायचा.


https://youtu.be/lClwE2NBU_Q?si=elfKqTeNifgb7F-p 

असं असलं तरी आजवर मी फक्त एकदाच क्रिकेटचा सामना बघायला स्टेडियमवर गेलो आहे. तेसुद्धा १९८१ साली कीथ फ्लेचरच्या नेतृत्वाखाली आलेल्या इंग्लंडच्या संघाचा  पुण्यात(नेहरू स्टेडियममध्ये)  भारताच्या युवा संघाविरुद्ध सामना झाला होता त्यातील एक दिवस बघायला आम्ही गेलो होतो. मला तेव्हा कृष्णम्माचारी श्रीकांत, लालचंद राजपूत वगैरेंची फलंदाजी तसंच इयान बोथम, जॉन एम्बुरी, ग्रॅहम डिली यांची गोलंदाजी बघायला मिळाली होती. डिलीची शैली वेगळीच होती. खूप मजा आली होती... पण तसा तो दिवस माझ्यासाठी हुरहूर लावणाराच होता कारण त्यावेळी आमच्या सहामाही परीक्षांचा निकाल लागला होता आणि प्रगतिपुस्तकावर बाबांची सही घेऊन ते शाळेत परत करायची दुसऱ्या दिवशी शेवटची तारीख होती. गणितात अस्मादिकांचा 'निक्काल' लागला होता आणि त्यामुळे बाबांची सही घेणं मी टाळत होतो. पण हा आजचा सामना बघून घरी गेल्यावर जे मी इतके दिवस टाळत होतो ते घडणार होतं .. त्यामुळे सामना बघताना हेच विचार मनात होते! 

नंतर कधी सामना बघायला गेलो नाही कारण टीव्ही वर प्रक्षेपण आणि कॉमेंट्री इतकी सुंदर असते,  कॅमेरा अँगल्स, आधुनिक तंत्रज्ञान वापरून  प्रत्येक बॉल आणि शॉटचं केलेलं विश्लेषण इतकं भारी असतं की कुठे त्या उन्हं तान्हात स्टेडियम मध्ये जा.. ताटकळत उभे राहा.. अलीकडे तर नियमही खूप कडक झाले आहेत त्या जाचक नियमांना पाळा... त्यापेक्षा घरबसल्या सामने बघणे सर्वार्थाने सुखावह असते. मी टेस्ट मॅचप्रेमी असल्याने जगात कुठेही टेस्ट मॅच चालू असेल तर ती बघायचा प्रयत्न करत असतो आणि आजवर माझा समज होता की दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन मधील न्यूलँड्स मधील स्टेडियम हे जगातलं सर्वोत्तम स्टेडियम आहे.

 पण अलिकडे इंग्लंडचा संघ भारतात आला होता तेव्हा ५ कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना धरमशाला येथील स्टेडियम मध्ये झाला होता. ते स्टेडियम बघून वाटलं की हे तर केप टाऊन पेक्षाही भारी आहे आणि इथे तर जायलाच पाहिजे. आणि म्हणून या वेळी धरमशालाला जाण्यामागच्या अनेक कारणांपैकी स्टेडियम  बघणं हेही एक महत्त्वाचं कारण होतं. 

६ 

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने बांधलेल्या या स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं स्टेडियम आहे जिथे टेस्ट मॅच खेळली जाते. अर्थात हिमाचल मधलंच चैल या ठिकाणचं स्टेडियम तर आणखी उंचावर आहे पण तिथे आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. 

धरमशाला मधील दलाई लामा मंदिर बघून खाली उतरू लागलो की लांबूनच या स्टेडियमचे लाल रंगाचे घुमट दिसू लागतात. धौलाधार पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं हे स्टेडियम बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. मी जर या ग्राउंडवर खेळाडू म्हणून गेलो तर माझं लक्ष खेळाकडे लागणारच नाही. मी दिवसभर त्या पर्वतरांगा, तिथलं ग्लेशियर, त्या डोंगरांवर येणारे ढग, ऊन सावलीचा खेळ.. हेच बघत बसलो असतो. इतकं भान हरपणारं निसर्ग सौंदर्य इथे आहे. मी खेळाडू नसतो पण जर समालोचक म्हणून आलो असतो तर खेळाचं कमी आणि या सौंदर्याचंच वर्णन करत राहिलो असतो. इंग्लंडचा समालोचक ग्रॅएम स्वानची माझ्यामते अशीच अवस्था झाली होती त्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या मॅचच्यावेळी! आम्ही मैदान बघायला गेलो होतो तेव्हा तिथे कुठलाही सामना चालू नव्हता.(अगदी आयपीएलचा सुद्धा नाही!) सामना सुरु असताना हे मैदान बघणं आणखी आवडलं असतं. पण असं सुद्धा  डोळेभरून बघितलं. निवांतपणे फोटो काढले आणि ठरवलं की पुन्हा कधीतरी इथे सामना असताना यायचं. 









                                                                                                                                                        (क्रमश:)

Thursday 25 April 2024

हिमाचल डायरी ४- आमचं 'धार्मिक' पर्यटन !

१ 

तसं काही न ठरवता सुद्धा आमच्या हिमाचलच्या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं बघण्याचा योग आला. हिंदूंची दोन मंदिरं बघितली -मॅक्लिओडगंज येथे प्राचीन भागसुनाग  मंदिर बघितलं -



 

पुराणातील कथेनुसार भागसु नावाचा राजा होता .त्याच्या राज्यात एकदा  दुष्काळ पडला आणि लोक गाव सोडून जाऊ लागले. आणि राहिलेले लोक राजाला विनंती करू लागले की कुठूनतरी त्याने राज्यात पाणी आणावं. राजा फिरत फिरत नाग दल तलावापाशी पोचला आणि त्याने  तिथलं पाणी चोरायचा प्रयत्न केला. यामुळे भडकलेल्या नागदेवतांबरोबर राजाचं युद्ध झालं आणि तो पराभूत झाला.  नंतर नागदेवतांनी त्याला क्षमा केली आणि प्रसन्न होऊन वर मागितला. राजाने त्याच्या राजासाठी पाणी मागितलं आणि त्याचं नाव प्रसिद्ध होण्याचाही वर मागितला. म्हणून या जागेचं नाव भागसुनाग मंदिर असं आहे. (मंदिर शंकराचं आहे)  इथून पुढे १५-२० मिनिटं पायऱ्या चढून  गेल्यावर एक धबधबा  लागतो. आम्ही  गेलो तेव्हा तरी  धबधबा अगदी छोटा होता. 
 

दुसरं देऊळ बघितलं ते धरमशाला मध्ये-चहाच्या मळ्यांजवळ - कुणाल पथरी माता मंदिर- इथे सती मातेचं कपाळ पडलं अशी लोकांची श्रद्धा आहे . इथे एक शिवमंदिर देखील आहे. मंदिरात नगारा  वाजवणारा माणूस बसला होता आणि त्यालाही भाविक काही दान दक्षिणा  देत होते.  मंदिर तसं साधं होतं - दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये कोरीवकाम, कारागिरी असते तसं या दोन्ही मंदिरात दिसलं नाही. 
 
 
(दोन्ही फोटो इंटरनेटवरून साभार)

आम्ही दोन बौद्ध मंदिरं बघितली-दलाई लामा मंदिर आणि कर्मापा मंदिर (याविषयी आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहेच). आम्ही दोन गुरुद्वारांमध्ये देखील गेलो - सुवर्णमंदिराविषयी एका ब्लॉगमध्ये लिहिलं आहेच. तिथल्या अलोट गर्दीमुळे मंदिराच्या गाभ्यापर्यंत आम्ही पोचू शकलो नव्हतो. पण अशी अडचण  कसोल जवळील मनीकरण या दुसऱ्या गुरुद्वारात आम्ही गेलो तेव्हा काही आली नाही. म्हणजे गर्दी होती पण तरीही तिथे एक शांतपणा अनुभवला. मुख्य गाभ्यात गुरुग्रंथसाहिबचं पठण अखंडपणे चालू होतं. शब्द कळत नव्हते पण वातावरणात एक धीरगंभीर भारलेपणा होतं. लोक शांतपणे येऊन दर्शन घेऊन पुढे जात होते. तिथे थोडावेळ बसतही होते. आम्हीही थोडावेळ तिथली शांतता अनुभवण्यासाठी बसलो. मनीकरण गुरुद्वाराच्या लंगरमध्ये आम्ही जेवलोदेखील. इथे गरम पाण्याचे झरे आणि कुंड आहेत. एके ठिकाणी पायाखालची फारशीइतकी गरम आहे की अक्षरश: पाय भाजतात! या फोटोत वाफा दिसत आहेत त्या गरम पाण्याच्या आहेत आणि शेजारून पार्वती नदीचं थंड पाणी वाहतं. हा निसर्गाचा एक  अद्भुत चमत्कारच म्हटला पाहिजे. 
 

धरमशाला मध्ये आम्ही एका चर्चला देखील भेट दिली. Church of St John in the Wilderness असं या चर्चचं नाव आहे. १८५२ साली या चर्चचं बांधकाम पूर्ण झालं आणि निओ गॉथिक पद्धतीचं हे बांधकाम आहे. 




 

(या चर्चचे सर्व फोटो इंटरनेटवरून साभार) 

चर्चला जायचं म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूने खाली उतरून जायचं. संध्याकाळची वेळ होती. आभाळ भरून आलं होतं. हवेत सुरेख गारवा होता. कधीही पावसाला सुरुवात होईल असं वातावरण होतं. थोडंसं गडगडू लागलं होतं. आम्ही चर्चच्या दारापाशी गेलो. फारशी गर्दी नव्हती . नेहमीचेच फोटोत्सुक लोक चर्चच्या पार्श्वभूमीवर स्वत:चे फोटो काढायच्या लगबगीत होते. चर्चच्या दाराबाहेर चपला/बूट  काढाव्या असं लिहिलं होतं. शिवाय फोटोग्राफीदेखील निषिद्ध होती . आम्ही आत शिरलो. याआधी आम्ही कोचीचं  सेंट फ्रान्सिस चर्च आणि गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिजस बघितलं  होतं  त्याची आठवण झाली. त्या दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती. पण रचना साधारण सारखीच- मोठ्या दगडी भिंती,  उंच छप्पर, दोन्ही बाजूला लाकडी बाक आणि त्यामधून जाणारा रस्ता... एके ठिकाणी मेजावर छोटी छोटी बायबलची पुस्तकं नीट मांडून ठेवलेली... एक पोडियम (प्रवचनसाठी)... समोर क्रूस आणि रंगीत काचेवर काढलेली कोरीव चित्रं.. आमच्या सुदैवाने या चर्चमध्ये एक विदेशी तरुण जोडपं सोडल्यास कोणीही नव्हतं. ते जोडपं मागच्या बाकावर शांतपणे बसलं होतं. त्यातील बाई तर मेजावर डोकं ठेऊन झोपलीच होती. चर्चमध्ये काम करणारा एक कामगार शांतपणे लयबद्ध हालचाली करत काम करत होता. आम्ही पुढच्या बाकावर जाऊन बसलो. हे सगळं वातावरण.. हा अनुभव  जमेल तितकं मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. आणि अचानक... 

३ 
...आमच्या मागून एक भसाडा आणि मोठा आवाज ऐकू आला - "फोटा पाड ने ( फोटो काढ ना )" 
त्यावर थोड्या दबक्या आवाजात मुलीचं  उत्तर आलं -"पप्पा ऐय्या फोटा पाडवानू  allowed नथी "(बाबा, इथे फोटो काढायची परवानगी नाही)
चर्चच्या कामगाराने देखील हळू आवाजात हेच सांगितलं. 
 साधारण पंचेचाळीस-पन्नाशीतले वडील आणि त्यांची आठवी- नववीतील मुलगी  मग आमच्या मागून येऊन आमच्या शेजारच्या रांगेतील पहिल्या बाकावर हे दोघे स्थानापन्न झाले. दोघेही 'सुखवस्तू' कुटुंबातून आलेले 'दिसत' होते. मुलगी वडिलांना हळू आवाजात प्रश्न विचारत होती आणि वडील सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात त्याची उत्तरं देत होते. त्यांनी तिला तिथला क्रूस दाखवला. काही क्षण असेच गेले आणि मग वडिलांनी येशू ख्रिस्तासमोर बसल्या बसल्या हात जोडून गुजरातीमध्ये प्रार्थना म्हणायला सुरुवात केली - त्यात श्री आदिनाथ भगवानाला आवाहन करून त्यांनी जैन धर्माचा विजय असो आणि जगात सर्वत्र जैन धर्मच राहो अशा अर्थाची प्रार्थना केली आणि विजयी मुद्रेने ते दोघे तिथून निघून गेले. आम्ही मात्र अक्षरश: स्तब्ध..नि:शब्द झालो होतो. हे सगळं इतकं पटापट झालं की नेमकं काय आणि का झालं हे कळायला देखील वेळ लागला... 

४ 

या प्रसंगाबाबत सांगू इच्छितो की माझी मतं ही त्या प्रसंगाशी संबंधित आहेत. मला सुतावरून स्वर्ग गाठायचा नाही. मी इथे कुठंही जैन धर्मविरोधात बोलत नाही. पण हा प्रसंग जसा घडला तसं त्याचं  वर्णन करायचा प्रयत्न मी केला आहे आणि त्यामुळे आमच्यावर त्याचा काय परिणाम झाला हेही मांडत आहे. माझ्या मनात प्रश्नच प्रश्न आहेत -
१) मला असं वाटतं की आपण जिथे जातो तिथल्या डेकोरमचा आपल्याला अंदाज येतो. तिथले नियम आपण आपसूकच पाळतो. या माणसाने फोटोग्राफी निषिद्ध आहे हा नियम का वाचला नसावा? ( मोठ्या फॉन्टमध्ये सगळ्यांना दिसेल अशा प्रकारे फलक लिहिला होता) चर्च मध्ये पूर्ण शांतता होती. मग या माणसाला मोठ्या आवाजात का बोलावेसे वाटले असेल? 
२) आपण चर्चमध्ये आलो आहोत .. एका परधर्मीय प्रार्थनास्थळी... हे त्या माणसाला माहित नव्हते का? नक्कीच माहित असणार... मग तिथे मोठ्या आवाजात जैन धर्म श्रेष्ठ आणि पृथ्वीतलावर सर्व लोक जैन धर्माचे पालन करणारे होवोत ही प्रार्थना कशासाठी? या माणसाच्या मानसिकतेचा थांग काही मला लागला नाही... येशू ख्रिस्ता समोर तुम्ही जैन प्रार्थना का करावी? मला त्याची ही कृती एकाच वेळी हास्यास्पद आणि चीड आणणारी वाटली. हा आपल्या धर्माबद्दलचा दुराभिमान म्हणायचा का? 
३) ही आक्रमकता माझ्या मनावर खूप ओरखडे उमटवून गेली. सुदैवाने तिथे अन्य ख्रिस्तधर्मीय नव्हते (विदेशी जोडप्याचं यांच्याकडे लक्षच नव्हतं) जर ते असते आणि त्यांच्या हे लक्षात आलं असतं तर? त्या माणसाचं वागणं ही देखील एक प्रकारची हिंसाच नव्हती  का ?
४) ही आक्रमकता कुठून आली असावी? श्रेष्ठत्वाच्या भावनेतून की न्यूनगंडाच्या भावनेतून? मला दुसरी शक्यता जास्त वाटते. आपला धर्म चांगला आहे असं वाटणं काही गैर नाही पण आपलाच धर्म श्रेष्ठ आहे आणि सगळ्यांनी तोच धर्म पाळावा ही अपेक्षा अवाजवी आहे. त्या कृतीत  कुठेतरी आपल्या धर्माला म्हणावी इतकी प्रतिष्ठा मिळत नाही अशीही भावना असू  शकते. 

तो माणूस निघून गेला हे चांगलंच झालं कारण आणखी काळ थांबून तो बरळत बसला असता तर त्याने आमच्या सहनशक्तीची त्याने परीक्षाच बघितली असती .मी होमिओपॅथीचा डॉक्टर असल्यामुळे लोकांच्या वर्तणुकीतून त्यांच्या स्वभावाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेही असेल कदाचित ...पण माझ्या डोक्यातून हा प्रसंग इतके दिवस होऊन गेल्यावरही काही केल्या जात नाही.  काही माणसं आपण कुठल्याही प्रसंगी कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून देत असतात. तर काही माणसं मात्र आपण कसं वागू नये हे सांगून जातात. वरील प्रसंग त्यापैकीच ! 
                                                                                                                                                       (क्रमश:) 






 






Thursday 18 April 2024

हिमाचल डायरी ३- स्थलांतर.. लादलेले/सक्तीचे..

 १ 

आमची धरमशालाला जाण्यासाठीची जी प्रमुख आकर्षणं होती त्यापैकी एक म्हणजे मॅक्लिओडगंज येथील दलाई लामा मंदिर (नामग्याल मॉनेस्ट्री) बघणे ! याआधी २०१० साली कूर्गजवळील बायलाकुप्पा येथील तिबेटी गोल्डन टेम्पल बघितलं होतं आणि मला ते खूपच आवडलं होतं. तिथे अनुभवलेली शांतता वेगळीच होती. म्हणूनच कधीतरी तिबेटी बौद्ध लोकांचे मुख्य देऊळही मला बघायचं होतं. याच देऊळ परिसरात तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा राहतात. चीनने तिबेटवर १९५९ साली ताबा मिळवल्यावर दलाई लामा परागंदा होऊन भारतात आश्रयासाठी आले.  या परागंदा अवस्थेत काय काय होत असेल? self preservation चा विचार न करता देशाच्या नागरिकांचा विचार करून एवढा लढा देणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. भारताने त्यांना आधी मसुरी आणि नंतर धरमशाला येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून ते भारतातच निर्वासित म्हणून राहत आहेत. चीनने तिबेटवरील ताबा सोडण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने ते इतका प्रदीर्घ काळ आंदोलन करत आहेत. त्यांचा  दुर्दम्य आशावाद, चिकाटी आणि चीन सारख्या महाकाय राक्षसासमोर न झुकण्याची दृढता मला अचंबित करते. या अहिंसात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या लढ्यात मला महात्मा गांधी दिसतात (साध्याइतकंच साधनशुचितेला महत्त्व !) आणि म्हणूनही दलाई लामा यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. खरं तर त्यांना प्रत्यक्ष भेटायलाही आवडलं असतं पण त्याबाबतची प्रक्रिया काय असते हे माहित नसल्याने ते शक्य झालं नाही. परंतु त्यांचं निवासस्थान बाहेरून बघितलं आणि मॉनेस्ट्रीमधील कालचक्र मंदिर आणि बुद्धाच्या देखण्या मूर्ती बघितल्या. 

 


दलाई लामा मंदिरात प्रवेश करण्याआधी एक म्युरल आहे. यात तिबेटी लढा दर्शवण्यात आला  आहे. 

 

मॉनेस्ट्री मध्ये वेगवेगळ्या वयातले बौद्ध भिख्खू दिसले. अगदी लहान मुलांपासून ते ६० च्या पुढच्या वयापर्यंत! एक भिख्खू हातात अँपल वॉच घालून शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. आजूबाजूला खूप आवाज नसला तरीही लोकांची गर्दी होती, लगबग होती. या सगळ्यांत त्यांचं शांत चालणं सुद्धा मेडिटेटिव्ह वाटलं! मॅक्लिओडगंजमध्येच आणखी एक मॉनेस्ट्री पाहिली जिचं नाव कर्मापा मॉनेस्ट्री होतं. 

तिथे तर मोठी सभा भरल्यासारखे भिख्खू जमले होते आणि एक ज्येष्ठ गुरु त्या सभेत हळू आवाजात काहीतरी सांगत होता. सर्व भिख्खूंपुढे एक धार्मिक पुस्तकासारखं काहीतरी होतं ज्यात ते सगळे बघत होते. दलाई लामा मंदिरात लहान मुलांचं काहीतरी पाठांतर चालू होतं. त्यांची ते करायची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती. एक मुलगा खाली बसून तर त्याच्यासमोर एक मुलगा उभा राहून काहीतरी म्हणायचा आणि मध्येच टाळ्या वाजवायचा. 
 
हे सगळं कर्मकांड काय असतं हे माहित नाही आणि त्याबद्दल जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. पण ही बौद्ध भिख्खूंची दृश्यं आधी कुठेतरी पाहिल्यासारखं मला वाटत होतं. मग आठवलं - Phörpa (The Cup ) या भूतानची  निर्मिती असलेला  याच पार्श्वभूमीवरचा  एक नितांतसुंदर सिनेमा होता. अगदी कोणीही चुकवू नये असा. सिनेमा आता कुठे उपलब्ध आहे माहित नाही. पण त्याच्या ट्रेलरची लिंक देत आहे -https://youtu.be/o6qDpRbIM7o?si=rlf_EiV68cSOQRPH 

२ 

हा किस्सा आमच्या सहलीच्या शेवटच्या दोन तासांत घडलेला- आमच्या दिल्ली -पुणे विमान प्रवासातला. पण स्थलांतराचा धागा इथेही आहे म्हणून त्यावर लिहीत आहे. 
तर विमानप्रवासात माझ्याशेजारी एक २६-२७ वर्षांचा तरुण टेक ऑफ च्या वेळी व्हिडिओ काढत होता आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होता. मला नंतर ऐकू आलं - तो बिस्मिल्ला उर रहमान उर रहीम असं सारखं म्हणत होता. मला वाटलं की  विमान निर्विघ्नपणे उडावं यासाठी असेल त्यांच्यात असं म्हणायची पद्धत! नंतर लगेच खराब हवेमुळे थोडा turbulence जाणवून विमान हलू लागलं. तर हा घाबरला आणि मला विचारलं - "Is this normal? क्या हवाइजहाज ऐसे हिलता है?"  माझ्यासारख्या माणसाला त्याने विचारावं याची मलाच गंमत वाटली. तरीही मी उसनं अवसान आणून त्याला शांत केलं. थोड्या वेळाने तो परत माझ्याशी बोलू लागला - "this is my first air travel. That is why I am a bit worried. I hope you won't mind if I keep talking to you. I just want to distract myself and divert my attention" असं म्हणून त्याने माझा ताबाच घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याचं पुण्यात एका नवीन नोकरीत जॉइनिंग होतं. चांगली मोठी MNC बँकेची नोकरी होती. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे युट्यूबवर विमान कसं चालवतात याचा सगळा अभ्यास करून आला होता. विमान वळताना कुठलं बटन वापरतात हेही त्याला माहित होतं. जणू काही त्याच्यावर ती वेळ आज येणारच होती! शादीशुदा होता. अचानक त्याने मला विचारलं - शादी का motto क्या होता है? शादी successful कैसे करने चाहिये?" ४०००० फूट उंचावर आम्ही असताना त्याने मला असा हा प्रश्न विचारून प्रवचन करा असंच जणू सुचवलं! आता काय उत्तर देणार याचं ? मी म्हटलं की तुम्ही खूप विचार करता आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसता. एवढा विचार करत जाऊ नका तुमचं ते वय पण नाही." पण माणूस well read होता. कुराणातले प्रसंग तर त्याने सांगितलेच शिवाय रामायणातील उदाहरणं पण त्याने दिली. तो काळ किती चांगला होता- "लक्ष्मणजी  तर  सीताभाभीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नव्हते आणि आता देवर आणि भाभी एकाच मोटोरसायकलवर बसून फिरत असतात !" मला हसावं की रडावं कळेना! विषय बदलायला मीच विचारलं -तुम्ही दिल्लीचेच का.. आणि इथून आमच्या चर्चेला एक नवं वळण मिळालं. तो म्हणाला - अगदी दिल्लीचा नाही पण मुझफ्फरनगरचा ! सधन कुटुंबातला. बरीच शेतजमीन बाळगून असलेला. वडिल कडक शिस्तीचे. बाहेरचं काही खायचं नाही. जे काही करायचं ते घरीच. असा त्यांचा आग्रह . 
मला म्हणाला -"आपको मुझफ्फरनगर मालूम होगा ना ? वहां २०१३ में दंगे हुए थे." मी या प्रश्नावर क्लीन बोल्ड! मला दंगे झाल्याचे आठवत होते पण त्यापलीकडे काहीही आठवत नव्हतं. एवढ्या लांब उत्तर प्रदेशमधल्या एका ठिकाणी काही घडलं तर त्याचा माझा काय संबंध? मी कशाला त्याचा विचार करू? अशीच माझी स्वार्थी मनोवृत्ती! ' "जब दंगे  हुए तो मैं १४-१५ साल का था. ज्यादा कुछ समझता नहीं था. लेकिन एक महिने के लिये कर्फ्यू लगाया गया था और हम सबको एक स्कूल में रेफ्युजी कॅम्प में रखा गया था. हमारी इतनी जमीन थी लेकिन वो सब छोडके हमें स्कूल में रहना पडा. बाहर का खाना हम कम दर्जे का समझते थे लेकिन वोही खाना पडा. एक तरह से डर का माहोल था. हमने तो कुछ किया भी नही था . जब कर्फ्यू उठाया गया तब मुझे याद है मैं यूही जाकर धूप में खडा रहा." मी अक्षरश: निःशब्द झालो होतो. निवडणुकीच्या राजकारणात ध्रुवीकरणासाठी दोन समूहात तेढ उत्पन्न करणाऱ्या राजकीय पक्षांना यात सर्वसामान्य माणूस किती भरडला जाऊ शकतो याचं काही भान नसतं याची त्याच्या बोलण्यावरून पुन्हा प्रचिती आली. दंगलीत सापडलेल्या माणसाची परिस्थिती कशी असते याची थोडीशी कल्पना त्याने त्याच्या बोलण्यातून दिली. एक महिन्यासाठी का असेना पण सगळं काही सोडून त्यांना दुसरीकडे जाऊन राहावं लागलं. ते निर्वासित म्हणून शाळेत राहत असताना त्यांच्या घरात लुटालूट कशावरून नसेल झाली? मुख्य म्हणजे आपली काही चूक नसताना हे असं सक्तीचं स्थलांतर करताना त्यांना कोण यातना झाल्या असतील! त्याच्या बोलण्यात चीड वगैरे नव्हती पण तरीही त्या अनुभवांचे कायमस्वरूपी ओरखडे नक्कीच जाणवत होते. मला क्षणभर वाटलं - त्याचा विमानात घाबरण्याच्या , पॅनिक होण्याच्या स्वभावाची मुळं त्याच्या या लहानपणीच्या असुरक्षित वातावरणाच्या अनुभवात तर नसतील? दुर्दैवाने हे कळणं अवघड होतं आणि आमचा विमान प्रवास संपतही आला. विमान सुरक्षितपणे लँड झाल्यावर त्याने लगेच त्याच्या बायकोला तसं कळवलं आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या दिशांना पांगलो. 
(मुझफ्फरनगर दंगलीविषयी सविस्तर माहिती -
                         )                                                                                                                           (क्रमश:)


Wednesday 17 April 2024

हिमाचल डायरी २ - स्थलांतर.. माणसांचं !

१ 

आमच्या या आधीच्या बऱ्याच सहली कुठल्यातरी ट्रॅव्हल एजंट अथवा जंगल सफारी आयोजित करणाऱ्या व्यक्ती/कंपनी या मार्फत झाल्या आहेत. ही हिमाचलची सहल मात्र अथ पासून इतिपर्यंत आमची आम्हीच प्लॅन केली. यात विशेष असं काही नाही कारण आजकाल बरेच जण असंच करतात. आमचा हा पहिलाच अनुभव! आम्हांला हे करणं सोपं गेलं कारण माझ्या एक पेशंट हिमाचल प्रदेश मध्येच राहतात. म्हणजे त्या मराठीच आहेत. मूळच्या पुण्याच्याच... अविवाहित..त्यांनी निर्मलादेवींच्या सहजयोग कार्याला वाहून घेतलं आहे. धरमशाला जवळील नद्दी या ठिकाणी (इथे सनसेट पॉईंट आहे ) सहजयोग केंद्र आहे. तिथे त्या राहतात. तिथली हवा खूपच थंड झाली, बर्फ पडू लागला की त्या पुण्याला येतात. इथे काही महिने राहून मग परत तिथे जातात. त्यांच्या इथल्या वास्तव्यात त्या माझ्याकडे औषध घेऊ लागल्या. माझी मुलगी या आधी मनाली आणि कसोलला जाऊन आली आहे आणि तिचा  आग्रह होता की आम्ही सुद्धा कसोल बघावं. या माझ्या पेशंटशी मी सहज बोललो की आम्ही हिमाचलला जायचा विचार करत आहोत तर त्यांना इतका आनंद झाला की काही विचारायची सोय नाही ! त्यांनी मग तिथली बघायची ठिकाणं, तिथले काही फोटो/व्हिडिओ , इतकंच काय धरमशाला ते कसोलला जाण्यासाठी बसचे पर्याय, त्यांच्या तिकीट बुकिंगच्या वेबसाईटच्या लिंक्स हे आपणहून  शेअर केलं ! एवढं कोण करतं आजकाल ! तेही एका परक्या माणसासाठी ! मी हे असं कोणासाठी केलं असतं का असा विचार माझ्या मनात येऊन गेला आणि खोटं कशाला बोला- त्याचं उत्तर नाही हेच आलं  ! या पेशंटच्या निर्मलादेवींच्या परिवारातील एक सदस्य श्री अमितकुमार यांचा नंबरही पेशंटने दिला. त्यांचं धरमशाला जवळ दल लेक (हो...इथेही दल लेक नावाचा...पण अतिशय छोटा आणि हिरवं पाणी असलेला तलाव आहे) येथे एक हॉटेल आहे. तिथे तुम्ही राहू शकता असं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही अमितकुमारांशी बोलून, हॉटेलचे फोटो वगैरे पाहून ८ आणि ९ एप्रिल ला तिथे राहायचं ठरवलं. माझ्या पेशंटने मनापासून आणि निरपेक्ष मदत केली म्हणून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात त्यांना भेटायला त्या सहजयोग केंद्रात गेलो. एकंदरीत आमचा कोणाचाच निर्मलादेवी/सहजयोग/कुंडलिनी या गोष्टींवर विश्वास नाही. तरीही तिथे गेलो.. पेशंटला आम्ही गेल्याचा खूप आनंद झाला. तिथलं निर्मलादेवींचं फोटो प्रदर्शन पेशंटच्या आग्रहाखातर (पण खरं  तर उडत उडत ) बघितलं. तिथल्या आणखी काही स्वयंसेवक आम्हांला तिथेच ध्यान धारणेला बसा असा आग्रह करत होत्या.. बोलण्याच्या शैलीवरून त्या दाक्षिणात्य वाटल्या. माझ्या मुलीशी बोलताना त्या अक्षरश: गळेपडूपणा करत होत्या. पण आम्ही  काही बधलो  नाही आणि तिथून काढता पाय घेतला ! 

२ 

  


तर माझ्याबरोबर उभे असलेले हे अमितकुमार ! फोनवरच्या आवाजावरून त्या माणसाच्या दिसण्याचा वा त्याच्या प्रकृतीचा अंदाज बांधू नये हे अमितकुमारांच्या बाबतीत तरी खरं आहे. फोन वर अतिशय मृदू, विनम्र आवाजात, सर्व कॉर्पोरेट शिष्टाचार पाळून बोलणारे अमितकुमार, प्रत्यक्षात दिसायला अगदी बॉडी बिल्डर सारखे वाटले. फोटोत दिसत नाही पण त्यांच्या केसांना त्यांनी एक छोटी पोनी टेलही ठेवली होती. बोलणं मात्र तसंच नम्र- "येस सर...राईट सर... मैं कर दूंगा सर.." वगैरे. यांनीच आमच्यासाठी अमृतसर ते धरमशाला तसंच धरमशाला मधील ठिकाणं बघण्यासाठी आणि एक दिवस डलहौसी-खज्जियार साठी गाड्या बुक करून दिल्या. आमच्या सहलीसंबंधी सर्व शंका-कुशंकांना त्यांनी अतिशय नेमक्या शब्दांत आणि शांतपणे उत्तरे दिली. ते आमचे तिथले bankable resource person होते. पण आधी आम्हांला वाटलं होतं की ते आम्ही जिथे राहणार होतो त्या हॉटेलचे मॅनेजर वगैरे असतील. आम्ही पोचलो तेव्हा ते आमची वाट बघत खालीच उभे होते. हॉटेल रस्त्यालगत असलं तरी डोंगरावर असल्यामुळे २५-३० खड्या पायऱ्या चढून तिथपर्यंत पोचता येत होतं. आमच्याकडच्या २ मोठ्या बॅगा घेऊन ते झपझप वरती गेलेसुद्धा ! हॉटेलमध्ये आमच्याखेरीज कोणीच नव्हतं आणि कोणी कामगारही दिसले नाहीत. तेव्हा अमितकुमारांच्या  बोलण्यातून समजलं की तेच या हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांनी अगदी नुकतंच हे हॉटेल विकत घेतलं आहे. सध्या हॉटेलचं पुनर्बांधणीचं काम चालू होतं. हॉटेलमध्ये कामावर असलेल्या दोन कामगारांपैकी एक आजारी होता आणि दुसरा गावी गेला होता. त्यामुळे स्वयंपाकापासून ते आमची रूम साफ करण्यापर्यंत सर्व कामं म्हणजे अमितकुमारांचा वन मॅन शो होता. पण त्यात कुठल्याही प्रकारची तक्रार/ कुरकुर/ गाऱ्हाणी मांडणे असा प्रकार नव्हता. सर्व काही सहजतेने आणि हसतमुखाने चालू होतं. 
अमितकुमार  dynamic वाटले. फक्त त्यांची वाटचाल एकरेषीय पद्धतीने न होता त्यात चढ-उतार/ स्थित्यंतरं झाल्याचे दिसत होते. हॉटेल व्यावसायिक असलेले अमितकुमार यांनी मुंबईतील ताज हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम केलं होतं. नंतर एमबीए करून काही काळ पुणे आणि नंतर स्वित्झरलँड, अमेरिका येथे नोकरी आणि मग आता पुन्हा हॉटेल व्यवसाय.. आत्ता हे हॉटेल आहेच शिवाय  खाली कांगडा विमानतळाजवळ १०५ खोल्यांचं मोठं हॉटेल देखील लवकरच सुरु  होणार आहे. पुण्यात ते काही काळ राहिले असल्याने त्यांना चांदणी चौक, बाणेर परिसर, चितळ्यांची बाकरवडी माहित होती. शिवाय आपल्याकडच्या हाय वे वर जागोजागी 'जेवण तयार आहे' चे फलक त्यांना गंमतशीर वाटले होते. योगायोगाने त्यांच्यासाठी मी चितळ्यांचीच बाकरवडी नेली होती. काही तासांनी जेवायच्या वेळी बाकरवडीचं पाकीट त्यांच्या बायकोच्या हातात दिसलं. तेव्हा त्यांनी आमची तिच्याशी ओळख करून दिली- "ये मेरी wife है. She is from China." याविषयी माझ्या पेशंटने मला सांगितलं होतं - त्या दोघांचा  सहजयोगामुळे परिचय झाला आणि त्याचे प्रेमात रूपांतर होऊन लग्नही झाले. निर्मलादेवींच्या अनुयायींनमध्ये अशा प्रकारचे विवाह होत असतात आणि त्यांना एक कायदेशीर स्वरूपही देण्याची पद्धत आहे. ही चिनी बायको अमेरिकेतल्या एका कंपनीत बॅक ऑफिस मध्ये कामाला असून वर्क फ्रॉम होम करते. दोघांना एक ६ वर्षांचा  मुलगा आहे आणि त्याला तालवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी काही काळ त्यांनी चीनला पाठवलं होतं. त्यांच्या बायकोला बाकरवडी  आवडली - मोडक्या तोडक्या  इंग्रजीत, बाकरवडीला खुणेने  दाखवत आणि अकारण मोठ्या आवाजात हसत - तिने its good असं सांगितलं. 
अमितकुमारांशी झालेल्या बोलण्यातील एक गोष्ट जात जात का असेना पण मला सांगाविशी  वाटते.. ती म्हणजे कलम ३७० हे अजूनही हिमाचल प्रदेश मध्ये लागू आहे. म्हणजेच हिमाचल बाहेरील लोकांना येथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. काश्मीर मधील हे कलम काढलं पण इथलं नाही आणि यात काही गैर आहे असंही कोणाला वाटत नाही असे दिवस सध्या आहेत. त्यामुळे फक्त आमचं असं बोलणं झालं एवढंच  नमूद करतो.. 
अमितकुमारांच्या बोलण्यात हेही आलं की ते वर्षातले १० महिने खूप काम करतात आणि थंडीच्या दिवसांत २-२ महिन्यांसाठी दक्षिणेकडे जातात. कधी पुणे, मुंबई वा गोवा इथे राहतात. थंडी ओसरली की हिमाचलला परततात. 

३ 
आम्ही कसोलला असताना आम्हांला  २५-३० च्या दरम्यान वय असलेली रेश्मा नावाची एक सोलो ट्रॅव्हलर भेटली. मूळची केरळची, मुंबईत वाढलेली आणि आता नोकरीनिमित्त बंगलोरला राहणारी. यावर्षी बंगलोरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने तिच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या २ महिन्यांकरता आपापल्या घरी जायला सांगितलं. हिने घरी जाण्याऐवजी हिमाचलला येण्याचा पर्याय स्वीकारला. सोम-शुक्रवार काम आणि वीकेंडला फिरणे असा तिचा सध्याचा कार्यक्रम आहे. मग आमचं थोडं MAC (Mutual Admiration Club) झालं. म्हणजे मी तिच्या सोलो प्रवासाबद्दल तिचं कौतुक केलं तर तिने आम्ही तिघे एकत्र प्रवास करतोय, पक्ष्यांचे फोटो काढतोय या बद्दल आमचं कौतुक केलं! (कारण तिच्या आई-वडिलांना प्रवासाची अजिबात आवड नाही) 
हवामान/वातावरण प्रतिकूल झाल्यावर पक्षी स्थलांतर करतात तशी माझ्या पेशंट, अमितकुमार आणि रेश्मा देखील करतात. पण ही एलिट उदाहरणं झाली. त्या सगळ्यांकडेच आर्थिक सुबत्ता आहे म्हणून ते हवा थंड झाली की दुसरीकडे जाऊ शकतात व बंगलोरला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला म्हणून दुसरीकडे जाण्याची व्यवस्था कंपनीच करून देते. पण काही स्थलांतरं ही दुसरा पर्याय नसल्यामुळे किंवा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे देखील करायची वेळ येऊ शकते. 

४ 
 कसोल ते मनीकरण गुरुद्वारापर्यंत आम्हांला टॅक्सीने सोडणारा अशोककुमार हा मूळचा चंबा जिल्ह्यातला. म्हणजे कसोलपासून कमीतकमी २०० किमी दूरवर असलेलं ठिकाण! इथे पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवणारा. त्यादिवशी तिथे दिवसा  ७-८ डिग्री तपमान होतं तरी आमचा थंडीने कुडकुडून जीव चालला होता. याला विचारलं की इथे कुठे राहतोस. तर म्हणाला- गाडीतच झोपतो. मला कल्पनाही करवेना. मग थंडी नाही का वाजत? अब क्या करे साहब ... अब इसकी भी आदत सी हो गयी है ! 

५ 
आम्ही मॅक्लिओडगंज जवळील भागसुनाग मंदिर आणि तिथल्या धबधब्यला भेट दिली. तिथल्या पायऱ्या उतरत असताना अचानक समोर हे राजस्थानी जोडपं दिसलं. 

या व्हिडिओ मध्ये नीट दिसतंय की नाही माहित नाही पण यातील बाई आपल्या तान्ह्या बाळाला अंगावर पाजत होती. चेहऱ्यावर मात्र हसू होते. म्हटलं तर हे भीक मागणारेच पण अंगी थोडीफार कलागुण बाळगून असलेले. पोटापाण्यासाठीच एवढ्या लांब आलेले असणार! त्याठिकाणी अवचित हे दृश्य बघून मला भरूनच आलं. शिवाय काय गंमत होती पहा- हिमाचल प्रदेश मध्ये एका ठिकाणी, मी म्हणजेच  एका  मराठी माणसाने, एका राजस्थानी माणसाला गाण्याची फर्माईश केली आणि त्याने पारंपरिक राजस्थानी मांड मधील सुप्रसिद्ध गाणं म्हणून दाखवलं. आपली सांस्कृतिक विविधता समृद्ध आहे यात शंकाच नाही. 

यापेक्षाही आणखी काही स्थलांतराचे प्रकार असू शकतात का? या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये... 
                                                
( फोटो आणि व्हिडिओ - स्मृती पुसाळकर ) 
                                                                                            क्रमश:)


Monday 15 April 2024

हिमाचल डायरी १ - अमृतसर येथील सुवर्ण मंदिर...

कुठल्याही पर्यटन सहलीला गेल्यानंतर त्यावर लिहिताना  फक्त त्या त्या ठिकाणाचं वर्णन करणं एवढंच अपेक्षित असू नये...अर्थात हे माझं वैयक्तिक मत ! आपण काही फक्त भौगोलिक जागांना बघायला जात नसतो. तिथे गेल्यावर आलेले अनुभव, आपल्या मनात आलेल्या भावना, तिथे दिसलेली/भेटलेली माणसं, त्यांचे विचार, त्यांचे तिथल्या परिस्थितीतले  जगणे यावर  व्यक्त होणं ही तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. माझा अनुभव असा आहे की अशा गोष्टी मांडत गेल्यामुळे आपली सहल अधिक संस्मरणीय होते कारण यात आपण छोटे छोटे प्रसंग, बारकावे यांचा विचार करून त्यावर लिहीत असतो. काश्मीर मध्ये आम्ही २०१४ साली गेलो होतो. परंतु तिथे आमच्याबरोबर असलेला आणि ज्याच्याबरोबर आमचा आझाद काश्मीर या विषयावर वाद झालेला आमचा शब्बीर ड्रायव्हर, उडी येथील सैनिकी पोस्ट वर आम्हांला त्यांच्या मृदू आवाजात माहिती देणारे सुभेदार महेंद्रसिंह, श्रीनगरला भेटलेले नगर जिल्हयातले सैनिक संदीप शिंदे किंवा श्रीनगर मधल्या हॉटेलमधील कडक शिस्तीचा वेटर नझीर..हे सगळेच आज इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवतात! या सगळ्यावर मी काश्मीर डायरी ही मालिका १० भागांत लिहिली आणि मला आजही ती वाचताना त्या आमच्या सहलीला परत घेऊन जाते.. असो. 

नमनाला घडाभर तेल खर्च केलं ! आम्ही ८ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२४ या काळात हिमाचल प्रदेश मधील धरमशाला आणि कसोल (कसौली नव्हे!) या ठिकाणी गेलो होतो. तिथल्या अनुभवांवर आधारित लिहिण्याचा हा ब्लॉगरूपी  प्रयत्न आहे. अर्थात हे लिहिताना मला सांगावंसं वाटतंय की हे माझे अनुभव आहेत. सरसकट सगळ्यांना असेच अनुभव आले असतील असं नाही. माझे अनुभव मांडताना माझी विचारसरणी, माझे पूर्वग्रह इ त्यातून डोकावणार याचीही मला कल्पना आहे. पण लिहिताना माझा हेतू प्रामाणिक आहे...कुठलाही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नाही. तरीही माझ्या कडून नकळतपाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व ! 

८ एप्रिल २०२४- हिमाचल प्रदेशला जाण्याआधी पंजाबमधील सुवर्णमंदिरला भेट.. 

आम्ही पुण्याहून सकाळी १० च्या सुमारास अमृतसरला पोचलो. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती. आम्हांला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत धरमशालाला पोचायचं होतं. अंतर २०० किमी असलं तरी ४-५ सहज लागणार असा अंदाज होता. आम्हांला तिथपर्यंत सोडणाऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की आज सुवर्णमंदिरात गर्दी असणार...अमावस्या...सुट्ट्या, बैसाखी... इ मुळे तुमचे  सहज ५-६ तास मोडतील म्हणाला! मला हे पटलं नाही. इतका कसा वेळ लागेल?! की आम्ही जाऊच नये म्हणून तो हे म्हणत होता का? आता इथवर आलोच होतो तर मंदिरात जाऊन बघणार होतोच. सुवर्णमंदिर परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून, तिथल्या बाजारातून वाट काढत मंदिरात पोचलो तर विश्वासच बसेना ! जिथपर्यंत नजर पोचेल तिथवर माणसंच माणसं ! अक्षरश: जन सैलाब ! मला धार्मिक ठिकाणी जाण्याची सवय नसल्याने हे सगळं दृश्य नवीनच होतं. लाखो भाविक आले होते असं म्हणणं  अतिशयोक्ती वाटलं तरी ते हजारोंच्या संख्येने नक्कीच होते. लोक प्रवेशद्वारापासून आत कुठेही जागा मिळेल तिथे मथा टेकत होते. सुवर्णमंदिर नेत्रसुखद आहे  यात काही शंकाच नाही


पण या अलोट गर्दीमुळे  माझा खरं तर हिरमोडच झाला. दरबार साहिबच्या दर्शनाच्या रांगेत आम्ही बराच वेळ थांबलो पण रांग काही पुढे सरकतच नव्हती. वर ऊन मी म्हणत होतं पण आश्चर्य म्हणजे पायाला चटके बसत नव्हते. सुवर्णमंदिराच्या सर्व बाजूंनी आच्छादित भाग होता. तो सर्व भागही माणसांनी फुलून गेला होता. लोक तिथे बसून प्रार्थना म्हणत होते. काही वृद्ध लोक तर दमून भागून आडवे पडले होते. पिण्याचे पाणी देण्यासाठी तसेच कडा प्रसाद देण्यासाठी बरेच कारसेवक दिसत होते. आजकाल सगळीकडे जे दृश्य बघायला मिळतं ते इथेही बघितलं - अति उत्साही सेल्फी फोटो काढणारे लोक आपल्या पाठीमागे सुवर्णमंदिर दिसेल अशा प्रकारे उभे राहून फोटो काढत होते. या नादात काही लोक अक्षरश: सरोवराच्या जवळ उभे राहिले होते आणि अर्थातच त्यांचं लक्ष केवळ फोटो काढण्याकडे होतं. अशा उत्साही मंडळींना आवरण्याचं काम काही स्वयंसेवक करत होते. कदाचित मी काही वेगळ्या कल्पना मनात ठेऊन इथे आलो होतो पण माझ्यासमोर जे काही दिसत होतं त्याच्याशी दुर्दैवाने मी फारसा relate होऊ शकलो नाही. कदाचित माझ्यात तेवढा भक्तिभाव, ईश्वरशक्ती पुढे नतमस्तक होण्याचा समर्पण भाव नसल्यामुळे असेल...मला या एवढ्या गर्दीत अलिप्तपणा जाणवत होता आणि त्यातून एक अस्वस्थता वाटत होती. इथे कायमच एवढी गर्दी असते की आमचा आजचा दिवस, आजची सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी होती हे माहीत नाही. आम्ही भल्या पहाटे यायला होतं की काय माहित नाही. 

मात्र एकच गोष्ट तिथे होती जिच्याशी मी कनेक्ट होऊ शकलो ती म्हणजे तिथे सगळीकडे ऐकू येणारे शबद कीर्तन! स्वच्छ, भारदस्त आवाजात गाणारे कीर्तनकार अशा दमदार पद्धतीने गात होते की वाटावं एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हे गायले तर  मैफिली जिंकतील! त्यांच्या गाण्यात केवळ गायकी नव्हती तर त्या गायनात भक्ती रस ओथंबून वाहत होता. अशा कीर्तनकारांना रागी म्हणतात असं नुकत्याच वाचलेल्या 'गान गुणगान' या पं सत्यशील देशपांडे यांच्या पुस्तकातून समजलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी सुवर्णमंदिराला भेट देण्याचं हे एक आकर्षण होतं आणि माझे कान ते गायन ऐकून तृप्त झाले. 

दोन अडीच तास रांगेत थांबून देखील आम्ही फारसे पुढे सरकलो नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दर्शन न घेताच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण आम्हांला सहज आणखी चार पाच तास लागले असते आणि आम्हांला त्याच दिवशी धरमशालाला पोचण्याचे वेध लागले होते.  सुवर्णमंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊनच आम्ही निघालो. परतताना सरोवरात अनेक पुरुष स्नान करताना दिसले.




 त्यापैकी  काही पुरुषांचे कपडे घेऊन, डोक्यावर ओढनी घेतलेल्या, अदबीने उभ्या असलेल्या त्यांच्या बायकाही दिसल्या. त्यापैकी काही पुरुष ज्या हक्काने आणि जवळजवळ सरंजामशाही वृत्तीने त्यांच्या बायकांकडून कामं करून घेत होते ते मात्र बघवत नव्हतं. बाहेर पडून अमृतसरची सुप्रसिद्ध लस्सी पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो..      

(सर्व फोटो - स्मृती पुसाळकर)                                                                                                                        (क्रमश:)