Wednesday 4 March 2020

परीक्षा दहावीची...



सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वातावरण आहे . म्हणून असेल कदाचित पण काल खूप दिवसांनी मला दहावीच्या परीक्षेचं स्वप्न पडलं -

स्वप्नात माझी बहीण मला परीक्षेला सोडायला आली होती. आम्ही  आमच्या घरापासून चालत चालत जात होतो. माझं परीक्षेचं सेन्टर बाजीराव रोड वरील घारपुरे प्रशाला हे होतं. सारसबागेपर्यंत चालत आल्यावर भर रस्त्यात कुठलीतरी सभा आयोजित करण्यात आल्यामुळे चालतसुद्धा पुढे जाणं शक्य नव्हतं.आता परीक्षेला पोचायला उशीर  होणार आणि पेपर बुडणार असं वाटू लागल्यामुळे मग आम्ही रिक्षा शोधू लागलो. सारसबाग ते घारपुरे प्रशाला हे खूप जवळचं अंतर असल्यामुळे अर्थातच २-३ रिक्षावाल्यांनी नकार दिला. मग एका रिक्षावाल्याच्या हाती पायी पडलो आणि कसातरी पोचलो... 

हे स्वप्नच होतं आणि त्याला काही वास्तवाचे फारसे संदर्भ नव्हते हे सांगायला नकोच !स्वप्नांचं विश्लेषण करू नये हे ही ठीकच!  म्हणजे प्रत्यक्षात (मला मनातून कितीही वेळा वाटून गेलं असलं तरी) असा कोणताही अडथळा माझ्या परीक्षेच्या वेळी आला नव्हता. परीक्षेचं माझं सेन्टर आमचीच शाळा होती. घारपुरे प्रशाला नव्हे ! 'नाही म्हणायला' रिक्षावाल्यांचं वास्तवातलं वागणं स्वप्नातसुद्धा अगदी तंतोतंत खरं दिसून आलं ! 

पण आता विचार केला तर आठवतं की एक अडथळा  माझ्या दहावीच्या परीक्षेआधी नक्कीच  आला होता. मला जेव्हा हॉल तिकीट मिळालं होतं त्यावर माझ्या मराठी -संस्कृत या (प्रत्येकी पन्नास मार्कांच्या) विषयां ऐवजी फक्त मराठी (१०० मार्क ) असं छापून आलं होतं. साधारण जानेवारीतली ही गोष्ट असेल. आत्तापर्यंत दहावीत  मी मराठीचे ६ धडे आणि ४ कविता एवढाच अभ्यास केला होता आणि आता अचानक एकदम जास्त कठीण आणि एकदम वेगळंच मराठी शिकून त्याचा पेपर द्यावा लागेल की काय असा एक पेच निर्माण झाला होता . बरं तसा हाती वेळही कमीच होता आणि माझ्यासाठी कर्दनकाळ गणित होता ज्याचा अभ्यास/सराव कितीही केला तरी माझ्या मार्कांवर त्याचा प्रभाव पडत नव्हता. तरीही कुठल्या तरी भरवश्यावर किंवा (फाजील) आत्मविश्वासावर मी घरी सांगून टाकलं- "काही काळजी करू नका. मी हायर मराठीचा अभ्यास आरामात करेन." (खरं तर पुस्तक आणण्यापासून सगळीच तयारी करायची होती !) सुदैवाने माझ्या आई वडिलांनी माझं पाणी ओळखलं होतं आणि मी म्हणालो असलो तरी मी ते करू शकेन की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. मग आमच्या बाबांनी SSC बोर्डात जाऊन(तेव्हाचं बोर्ड हे तसं पक्कं सरकारी खाक्या असलेलं होतं), कुणाचीतरी ओळख काढून हॉल तिकिटावर झालेली चूक दुरुस्त करून आणली आणि माझा एक नवीन विषय आयत्या वेळी शिकायचा त्रास वाचला.(आणि गणितात कमी मार्क का मिळाले यासाठी एक सबब पुढे करायची माझी आयती संधी हुकली!)

आता अर्थातच हे सगळं आठवलं की गंमत वाटते. शालाबाह्य संस्थेने परीक्षा घेऊन मार्क देणे या दहावीच्या वेगळेपणा व्यतिरिक्त या परीक्षेत असं काय आहे की ज्याचा बाऊ केला जातो? दहावीचे टक्के ही आपली ओळख होऊ शकत नाहीत हे जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तेवढं बरं! मला तर आता दहावीचे मार्कही आठवत नाहीत. नंतरच्या आयुष्यात एकदाच दहावीच्या मार्कांची गरज पडली होती आणि तेव्हा मार्कलिस्ट अक्षरश: उत्खननातून शोधून काढली होती.
(हे मी माझ्या '(जर्मन) भाषा पाहावी शिकून' या ब्लॉग मध्ये लिहिलं आहेच!
https://draft.blogger.com/blogger.g?tab=mj1&blogID=2409820389244950539#editor/target=post;postID=3228604851072649879;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=43;src=postname )

हे जरी खरं असलं तरी मला अजूनही कधीकधी दहावीच्या परीक्षेची आणि त्यातही गणिताच्या पेपरची स्वप्नं पडतात. उद्या पेपर आहे आणि आज माझा काहीही अभ्यास झालेला नाही किंवा आज मी गणिताचं पुस्तक आणायला जातोय अशा प्रकारची स्वप्नं पडतात. स्वप्न आणि वास्तव यांचा खरंच फारसा संबंध नसतो हेच खरं!