Wednesday 2 December 2015

पर्याय २०१५ : होमिओपॅथच्या ‘कॅमेर्‍या’तून : नाट्य-सिनेमातील व्यक्तिरेखा

(पर्यायचा  या वर्षीचा विषय आहे -' नाती-गोती आणि होमिओपॅथी'. या अंकातला हा माझा एक लेख)

होमिओपॅथी ही केवळ एक उपचार पद्धतीच नाही, तर ती एक जीवनशैलीही आहे. आणि तिचा अंगीकार पेशंट आणि होमिओपॅथीचे डॉक्टर दैनंदिन आयुष्यात करत असतात. होमिओपॅथीच्या डॉक्टरांबद्दल तर असं म्हणता येईल की दवाखान्यात पेशंट बघणं झाल्यावरही होमिओपॅथी त्यांची साथ करतच असते, अगदी सगळीकडे! मग डॉक्टर कुठे सणा-समारंभांना गेले तर तिथेही भेटणार्‍या आणि केवळ दिसणार्‍याही लोकांचं निरीक्षण करणं आणि त्यांच्या डॉक्टरांना वाटणार्‍या स्वभाव-वैशिष्ट्यांचा विचार करणंही चालू राहतं. आजूबाजूच्या लोकांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यातील बारकावे, जे बोललं जातं त्याचा मतितार्थ, शब्दांच्या पलीकडले शब्द या सगळ्यांबद्दल डॉक्टर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कालांतराने या गोष्टी आपसूक होत असतात. मुद्दाम बेअरिंग घेऊन काही करावं लागतं नाही. होमिओपॅथी हे पुष्कळसं माणसं वाचण्याचं आणि समजण्याचं शास्त्र आहे. माणूस (पेशंट) कसा आहे, त्याच्या आयुष्यात कुठे ताण-तणाव आहेत, त्यांतून जात असताना त्याच्या काय reactions येतात? यामधून त्याचा स्वभाव कसा दिसतो? अशा स्वभावाची एक totality उभी करून तसेच त्या व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म, त्याच्या तक्रारींचा एकत्रित विचार करून पेशंटला एक constitutional औषध देण्यात येते. जशा व्यक्ती तितक्या  प्रकृती असतात, त्याप्रमाणेच होमिओपॅथीच्या औषधांच्याही प्रकृती असतात. म्हणजेच पेशंटच्या स्वभाव गुणधर्माशी साधर्म्य असणारी औषधंही असतात. या दोन्हीमधली समानता शोधणे हे होमिओपॅथीच्या डॉक्टरचं मुख्य काम असतं. दोन्हीमधली समानता जेवढी जास्त, तेवढं औषध जास्त अचूक! म्हणूनच डॉक्टरसाठी होमिओपॅथीच्या औषधांची लक्षणं, त्यातील बारीक बारीक माहिती हे तर आवश्यक असतंच, पण त्याबरोबरच लोक जगत असलेल्या आयुष्याबद्दल, त्यातील प्रसंग आणि त्यामधून दिसणार्‍या लोकांच्या स्वभावाबद्दलही आस्था असणं, त्यावर त्याने विचार करणं हेही महत्त्वाचं असतं. त्यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरने संवेदनशील असणं, निरीक्षक असणं आणि खुल्या मनानं विचार करणं अपेक्षित असतं.
या सगळ्याचं प्रशिक्षण डॉक्टरला होमिओपॅथिक कॉलेजमध्ये मिळणं दुरापास्त असतं. त्याची स्वत:ची जडणघडण, त्याचे संस्कार, त्याची विचारसरणी आणि त्यावर होमिओपॅथीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने केलेले पुनरावलोकन म्हणूनच महत्त्वाचे ठरते. नाटक-कथा-कादंबर्‍या-चित्रपट इत्यादी विविध कलाकृतींही संवेदनशीलतेला पूरक ठरू शकतात. कारण शेवटी या प्रत्येकात व्यक्तिरेखांचं आणि त्यांच्या नातेसंबंधांचं चित्रण असतं. ते समजून त्यातील अनुभवांवर विचार करून होमिओपॅथीच्या डॉक्टरला स्वत:ची विचारसरणी समृद्ध करण्याची संधी मिळते.
प्रस्तुत लेखात अशाच काही कलाकृतींचा होमिओपॅथीच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. यात रंजनाचा भाग आहेच पण त्यातून होमिओपॅथीच्या औषधांचा विचार कसा केला जाऊ शकतो हेही सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या कलाकृतींचा इथे विचार करण्यात आला आहे त्या सर्व तुमच्या-आमच्या परिचयाच्या आहेत. बहुतांश लोकांनी त्या पाहिल्याही असतील आणि त्या त्यांच्या लक्षातही असतील. मात्र त्यावर होमिओपॅथीच्या दृष्टीने कसा विचार केला जाऊ शकतो, त्या व्यक्तिरेखा होमिओपॅथीच्या कुठल्या औषधांशी मिळत्या-जुळत्या असू शकतात हे एक वेगळे परिमाण त्या कलाकृतींना लावल्यामुळे अशी आशा आहे की सर्वसामान्य वाचकांच्या आस्वादात भरच पडेल आणि त्यामुळे या कलाकृतींचा ते नव्याने विचार करू लागतील.

सर्वप्रथम विचार करावासा वाटतो एका नाटकाचा! महेश एलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदीचा! या नाटकाचा पहिला प्रयोग 1985 साली झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील विदर्भातल्या एका गावातल्या देशपांडे कुटुंबाची गोष्ट हा नाटकाचा विषय आहे. जसं बडा घर पोकळ वासेअसं म्हणतात तसंच या देशपांडे कुटुंबाचंही आहे. वाडा मोठा आहे पण renovation करण्याची गरज असली तरी ते करण्याजोगी आर्थिक परिस्थिती देशपांडे कुटुंबाची नाही. शेतजमीन कुळ कायद्यात गेलेली आहे. कुटुंबप्रमुख तात्या यांचं निधन झालं आहे आणि तिथून नाटकाची सुरुवात होते. कुटुंबाने कोणे एके काळी वैभव अनुभवलेलं आहे. आता त्या प्रतिष्ठेला काळ बदलला आणि आर्थिक दुरवस्था झाली तरी, जगण्याचा, जपण्याचा पोकळ प्रयत्न थोरला मुलगा भास्कर करतोय. नाटक वरवर पाहता या कुटुंबाभोवती फिरत असलं तर त्यात इतर अनेक पैलू आहेत. काही पात्रांच्या बोलण्यातून ते थेट येतात, काही त्यांच्या कृतीतून दिसतात तर काही अप्रत्यक्षपणे सूचित केलेले आहेत. तात्यांचा दुसरा मुलगा (सुधीर) मुंबईत नोकरी करतोय. विदर्भातल्या लोकांना मुंबईबद्दल वाटणारी असूया आणि तरीही मुंबई या मायानगरीचे आकर्षण, शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतील फरक, नोकरी करणार्‍यांना आर्थिक तणाव नसतात हा ग्रामीण लोकांचा (गैर)समज, टी.व्ही./सिनेमा या माध्यमांचा खेडोपाड्यांतील लोकांवरही असणारा प्रभाव असे अनेक पदर नाटकातून उलगडताना दिसतात. लेखकाने 70-80च्या दशकातल्या बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्थितीवर  उत्तम भाष्य नाटकातून केले आहे.

देशपांड्यांचा वाडा हा जसं गतवैभवाचा साक्षीदार आहेतसंच तो आता कालानुरूप बदल न केलेल्या आणि जुन्यामूल्यांना कवटाळून बसणार्‍या देशपांडे कुटुंबाच्या स्वभावाचंही प्रतीक आहे. देशपांडे कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये असतात तसेच वाद-विवाद आहेतपितृसत्ताक पद्धती आहे आणि त्यामुळेच पुरुषी वर्चस्वही आहे. तात्या गेल्यानंतर सत्तांतर होऊन भास्करकडे सत्ता आणि घराच्या तिजोरीच्या चाव्याही येतात. वडील गेल्यानंतर मुलांमध्ये संपत्तीच्या वाटण्या होणं आणि त्याची चर्चा होणं हे तसं स्वाभाविकच. यात काही वेळा एकमेकांची उणीदुणीही काढली जातात. तसं ते इथेही होतं. हे सगळं जरी असलं तरी जेव्हा कुटुंबावर कठीण प्रसंग येतो तेव्हा हे सगळं कुटुंब एकत्र होतंहेही तितकच खरं. अशावेळी वैयक्तिक त्रासस्वार्थ बाजूला ठेऊन प्रसंगोचित वागणारी ही माणसं एकत्र कुटुंबाची पडझड होत असतानाही एकमेकांना धरून ठेवणारी वाटतात.
देशपांड्यांच्या या वाड्याचं आणखी एक वैशिष्टय आहे. इथल्या अंधार्‍या खोल्यांमध्ये स्त्रियांची दु:खं  कोंडलेली आहेत. नाटकात स्त्रियांच्या चार पिढ्या आहेत. तात्यांची आई-दादी! यांना स्थळ-काळाचं भानच नाही. दुसरी स्त्री म्हणजे तात्यांची बायको - आई. तात्या जोवर होते तोवर आईचं एक वेगळ स्थान असतं. पण ते गेल्याक्षणी तिची रवानगी माजघरात होते. तिच्या हातून घराची सत्ता निघून जाते आणि ती एकदम परावलंबी होते. तात्यांची सून-वहिनी या बरंच काळ तात्या-आई यांच्या सत्तेपुढे नमतं घेत राहिल्या आहेत. पण आता अचानक तिजोरीच्या चाव्या हाती आल्यामुळे त्यांचं स्थान वधारलं आहे. पण इतका काळ त्यांच्या स्वत:च्या इच्छा-आकांक्षा मनातच राहिल्या आहेत. तशीच काहीशी गत भास्करचीही आहे. म्हणूनच तो त्याच्या बायकोला म्हणजेच वहिनीला सुतक असूनही दागिने घालायला सांगतो. ती एक-एक दागिना घालत असताना त्याचं वजन आणि वर्णनही करत जातो. मात्र वहिनी दागिन्यांत मढल्यानंतरही काहीशा अलिप्त, गंभीर आहेत. त्यांना आनंदापेक्षा जास्त आहे तो एक प्रकारचा भारावलेपणा! कारण त्यांच्या सासूबाईनी त्यांना त्या घरात आल्यानंतर या पिढ्यानपिढ्या  वैभवाबद्दल सांगितलं होतं आणि ते आज त्या स्वत: ल्यालेल्या आहेत. आई आणि वहिनी यांच्या स्वला घुसमटून, मन मारून जगण्याच्या स्वभावावरून त्यांचं होमिओपॅथीमधलं मॅग्नेशियम ग्रुपच्या औषधांशी साम्य वाटतं. इथं जाणवतं ते भावनांचं दमन आणि वहिनींना एक संधी मिळताच त्यांचा भावनावेगच सांगतो की त्यांनी किती भावना दाबून टाकल्या आहेत.
वहिनींच्याच पिढीतली, तात्यांची मुलगी प्रभा ही नाटकातील आणखी एक व्यक्तिरेखा आहे. भावंडामधली ती एकटी मुलगी असली तरी तिच्यावर अन्याय झाला आहे. मॅट्रिकनंतर तिला पुढे डॉक्टर व्हायचं होतं पण तात्यांनी परवानगी न दिल्यामुळे ते राहून गेलेलं आहे. शिवाय तिचं लग्नही होत नाही. तिच्या या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. पण त्याचा राग ती वेळोवेळी अगदी फणकार्‍याने व्यक्त करते. तिच्या स्थितीला ती वडिलांइतकीच भावांनाही दोष देते. वडील गेल्यामुळे तिला फारसं काही दु:ख झालेलं नाही, हे ती स्वत:च सांगते. एवढंच नव्हे तर मुंबईहून सुधीरने तिने सांगितलेली पुस्तके आणली की नाही हेही विचारते. तिचे वहिनीबरोबरही खटके उडतात. तिला जे वाटतं ते ती बोलून मोकळी होते. शिवाय प्रभाच्या मनात तिच्या आईबद्दल खूप ओढ आणि हळवेपणा आहे. तिच्या वाटचं सोनं मिळाल्यावर ते विकून तिला अमरावतीला शिकायला जायचंय. तिथे आईलाही न्यायची तिची इच्छा आहे. वडिलांच्या पश्‍चात भास्कर आईला नीट सांभाळणार नाही असं तिला वाटतं. प्रभाचा हा मोकळा-ढाकळा स्वभाव, मनात आणि त्याचबरोबर एखाद्या नात्याबद्दल अतीव ओढ वाटणं हे होमिओपॅथीमधल्या काली ग्रुपशी मिळतजुळतं चित्र आहे.
नाटकात आणखी एक व्यक्तिरेखा आहे, जी म्हणजे भास्कर आणि वहिनी यांची मुलगी रंजू! अभ्यासात यथातथाच आहे. दहावीची परीक्षा दोनदा देऊनही उत्तीर्ण झालेली नाही. तिच्यासाठी एका मास्तरांची शिकवणी लावण्यात आली आहे. पण रंजूचं लक्ष अभ्यासाऐवजी रेडिओ, सिनेमा असल्या गोष्टीत आहे. तिला सिनेमात कामही करायचं आहे जे अर्थातच देशपांडे कुटुंबाला साजेसं नाही. या रंजूमुळे नाटकात नाट्य निर्माण होतं. देशपांडे कुटुंबाचे सर्व दागिने वहिनींनी एका डब्यात ठेवलेले असतात. तो डबा देवापुढे ठेवलेला असतो. दुसर्‍या दिवशी त्यांची वाटणी होणार असते. पण दुसर्‍या दिवशी हेच दागिने घेऊन रंजू त्या मास्तरांबरोबर पळून जाते. ती सुधीरला मुंबईला सापडते पण दागिने आणि तो मास्तर हाती लागत नाहीत. रंजूच्या आधीच्या पिढ्यांमधील सर्वच स्त्रियांनी आपलं मन मोडून इच्छा मारून आयुष्य काढलेलं आहे. पण रंजू तशी नाही. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती घरातील दागिने पळवते. घरातल्यांची कोणत्याच बाबतीत फिकीर करत नाही. आपल्या मनातील सणकेवर स्वार होऊन, मागचा पुढचा विचार न करता ती कृती करते. मास्तर आणि तिचे प्रेम असते हेही नाटकात सूचित करण्यात आलेले आहे. अल्लड वयातल्या या प्रेमाचं भवितव्य तसं काहीच नाही. तरीही ती बंडखोरी करून हे सर्व करते. एकप्रकारे ती घरच्या वर्चस्वाला, प्रस्थापित कुटुंब व्यवस्थेला आव्हानच देते. तर अशी भावनाप्रधान, सणकी, बंडखोर व्यक्तिरेखा होमिओपॅथीमधल्या नॅट्रम मूर या औषधाशी साम्य असणारी आहे.

मनातल्या भावना मनातच राहणं, त्या कुठेही व्यक्त करता न येणं आणि त्यामुळे मनाचा कोंडमारा होणं हे पुष्कळ हिंदी सिनेमातील व्यक्तीरेखांमध्येही दिसतं. यातूनच मॅग्नेशियम आणि नॅट्रम या दोन ग्रुपमधील होमिओपॅथीच्या औषधांत अक्षरश: स्पर्धा असल्याचं जाणवत. काहीवेळा या दोन औषधांमधल्या सीमारेषा धूसर वाटतात तर काहीवेळा असं वाटतं की जणू एखाद्या कसलेल्या होमिओपॅथनेच एखादा सिनेमा काढून त्या औषधांची totality व्यक्तिरेखांमार्फत उभी केली आहे. आठवायला गेलं तर कितीतरी सिनेमे आणि व्यक्तिरेखा आठवता येतील. आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे (आणि होमिओपॅथीच्या अभ्यासाप्रमाणे देखील!) हे बदलू शकेल. त्यामुळे हे सगळं व्यक्तीसापेक्ष आहे हे मान्य करूनच पुढे जाणं श्रेयस्कर!

सर्वप्रथम विचार करावासा वाटतो हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट अनुराधाचा! 1960 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची गोष्ट आहे अनुराधा राय (अभिनेत्री लीला नायडू) व तिचे पती डॉ. निर्मल चौधरी (अभिनेता बलराज साहनी) यांची! अनुराधा एक सुप्रसिद्ध गायिका आहे आणि नृत्यांगनाही! कर्मधर्मसंयोगाने तिची निर्मलबरोबर भेट होते, तो तिच्या भावाचा मित्र असतो हेही कळतं आणि तिच्या नृत्याच्या कार्यक्रमानंतर पाय मुरगळल्यावर उपचार करायला निर्मलच येतो. यातून दोघांचं प्रेम जुळतं. तो तिच्या आवाजावर फिदा असतो. अनुराधाचं लग्न तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी, दीपकशी ठरवायचा घाट तिचे वडील घालतात. ही गोष्ट ती निर्मलला सांगते. तेव्हा निर्मल त्याची पार्श्‍वभूमी तिला सांगतो. तो डॉक्टर होण्यामागे कारण असते त्याच्या आईच्या मृत्यूच्या वेळेची परिस्थिती! खेडेगावात असल्यामुळे उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू होतो. म्हणून निर्मल डॉक्टर होऊन खेड्यात राहून प्रॅटिस करण्याचं ध्येय बाळगून असतो. तर अनुराधा एका श्रीमंत घरची मुलगी! निर्मलशी लग्न केलं तर शहरातून खेड्यात आणि तेही कष्टाचं जीवन जगावं लागणार याची तिला कल्पना असते. शिवाय गाण्याचं करिअरही मागे पडणार हेही तिला माहित असतं. दीपकही तिच्या आवाजाचा फॅन असतो. दीपकशी लग्न केलं असतं तर ती संगीताला प्राधान्य देऊ शकली असती. पण अनुराधा असं करत नाही कारण तीही निर्मलच्या प्रेमात बुडालेली असते. याच प्रेमापायी ती वडिलांशी वाद घालते आणि त्यांना तिचा निर्णय न पटल्यामुळे बंड करून वडिलांच्या इच्छेविरूद्ध निर्मलशी लग्न करते. स्वत:च करिअर बाजूला सारून भावनेला प्राधान्य देते.
लग्नानंतर मात्र चित्र बदलतं. अनुराधाची भूमिका फक्त घर सांभाळणं, त्यांच्या मुलीकडे बघणं आणि निर्मलची सेवा करणं एवढीच उरते. कारण निर्मल संपूर्णपणे झोकून देऊन गावात practice करतो. त्याचा आदर्शवादी दृष्टिकोन असल्यामुळे पेशंटच्या घरी जाणे, वेळी-अवेळी काम करणे, घरी आल्यावर देखील अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम असतो. या सगळ्यांत त्याला अनुराधाकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. तिच्या साध्या साध्या इच्छाही तो पुर्‍या करू शकत नाही. अर्थात जाणूनबुजून नाही तर कामात बुडाल्यामुळे. या सगळ्यांत अनुराधाचं संगीतही मागे पडतं. किंबहुना ती संगीताची ऊर्मी जवळजवळ दाबून टाकते. परंतु खर्‍या कलाकाराची ऊर्मी, कलेप्रतीची ओढ पूर्ण दाबणं केवळ अशय! योगायोगानं अनुराधाची भेट दीपकबरोबर होते आणि त्याच्यासमोर ती गाणं म्हणते -
अनुराधा

कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया, पिया जाने ना...
आणि त्यातच पुढे
ऋत मतवाली आके चली जाए, मन में ही मेरे मन की रही जाए, खिलने को तरसे नन्हीं नन्हीं कलियाँ...
https://www.youtube.com/watch?v=OzNcKTcZoHw
या सगळ्यांतून दीपकला तिच्या मन:स्थितीचा अंदाज येतो. तो तिच्यातील संगीताविषयीचं सुप्त प्रेम जागं करतो. ती त्याच्याबरोबर जायला तयारही होते. पण नंतरच्या प्रसंगातून तिला आपल्या नवर्‍याच्या कर्तृत्वाची आणि निर्मलला आपल्या पत्नीच्या त्याग, साधना आणि तपस्येची जाणीव होते. शेवट अर्थातच गोड होतो. या सिनेमात एकीकडे भावनाप्रधान, भावनेच्या भरात प्रसंगी बंडही करणारी आणि प्रवाहात वाहून जाणारी, सर्वस्व अर्पण करणारी अनुराधा दुसरीकडे आपलं स्वत्व किंवा प्राण असलेल्या संगीताला जाणूनबुजून suppress करते. तिचं हे व्यक्तिमत्व होमिओपॅथीमधल्या नॅट्रम मूर या औषधाच्या जवळ जाणारं आहे. तर डॉ. निर्मल हा मूल्यांना जपणारा, तत्त्वनिष्ठ, आदर्शवादी आहे. त्याचं बायकोवर प्रेम आहे पण त्याचं प्राधान्य त्याचं काम हेच आहे. या त्याच्या स्वभावाशी होमिओपॅथीमध्ये मिळतंजुळती औषधं म्हणजे सिलिशिया किंवा लायकोपोडियम!

एखाद्या कलाकारातल्या कलेची घुसमट झाली तर काही काळाने तो कलाकार अस्वस्थ होतो. ती कलाच त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. अशीच तगमग दाखवणारा आणखी एक चित्रपट होता 1965 चा विजय आनंद दिग्दर्शित गाईड’. यात रोझी (वहिदा रहमान) ही नृत्यांगना आहे. पण तिचा archaeologist पती मार्को (किशोर साहू) हा सतत त्या गुहा-गुफांच्या संशोधनात दंग आहे. त्याला रोझीने नृत्य केलेले आवडतही नाही. ते अशीच कुठली गुहा बघायला एका गावी येतात जिथे राजू (देव आनंद) त्यांचा गाईड असतो. या गाईडच्या सहवासात रोझीला तिचं हरवलेलं नृत्य परत मिळतं. राजू आधी तिचा फक्त पर्यटनातला गाईड बनतो. 
गाईड
नंतर तिला सखा/मित्र बनतो. त्या भावनिक सामर्थ्याच्या जोरावर रोझीला तिचं हरवलेलं नृत्य पुन्हा सापडतं आणि यातून आलेल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर ती  पतीचं घर सोडून राजूकडे राहायला येते. हा रोझीचा सर्व प्रवास पुन्हा एकदा नॅट्रम या होमिओपॅथीच्या औषधाच्या जवळ जाणारा वाटतो.

खरं तर काही वेळा असं वाटतं की हिंदी सिनेमात नॅट्रम गु्रुपचा विचार वेगवेगळ्या बाजूंनी करण्यात आला आहे. पराकोटीची भावनाशीलता, कोणतेही निर्णय भावनेच्या भरात घेणं हे नॅट्रमच्या व्यक्तिमत्त्वात असू शकतं तसंच धुमसत राहणारं, मनात धग, अंगार बाळगणारं! प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंड करणारं किंवा कुटुंबातील सत्ताकेंद्राशी (बहुतांशी वडील) न पटणारं! त्या व्यक्तीबद्दल पराकोटीचा राग बाळगणं आणि काही वेळा या रागाचं रूपांतर सूड घेण्यात करणं! या सगळ्यांत कारणीभूत असते ती लहानपणीची परिस्थिती. नाजूक वयात कोवळ्या मनावर उमटलेले ओरखडे तसेच राहतात. हे unresolved childhood पुढे या व्यक्तिच्या नातेसंबंधात बाधा आणतं. नॅट्रमचा हाही एक पैलू आहे. अमिताभ बच्चन यांनी दीवार’, ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’, ‘शक्तीया चारही सिनेमांमध्ये विजय नावाचं कॅरेक्टर केलं आहे. ही सगळी वेगवेगळ्या अर्थाने नॅट्रमचीच रूपं! दीवारमध्ये विजय स्मगलर होण्याला कारणीभूत असते त्याची लहानपणीची परिस्थिती! कामगारांच्या न्याय्य हकांसाठी लढणार्‍या त्याच्या वडिलांवर बालंट आल्यामुळे शरमेपोटी शहर सोडून जायची वेळ येते. संतप्त कामगार आणि त्यांची मुलं विजयच्या हातावर मेरा बाप चोर हैहे गोंदतात. वडील निघून गेल्यामुळे अचानक आलेल्या गरिबीशी सामना करत करत विजय वाईट मार्गाला लागतो. तर त्रिशूलमध्ये वडिलांच्या विरूद्ध सूड घेण्याची बीजं विजयची आईच त्याच्यामध्ये पेरते. वडिलांनी तिच्याशी केलेल्या प्रतारणेचा सूड तिचा मुलगा विजय पुरेपूर घेतो. इथे सूड घेण्याची भावनाही रागाचा परमोच्च बिंदू गाठते. दीवारआणि त्रिशूलया दोन्ही सिनेमांमध्ये विजयला लौकिक अर्थाने वडिलांचा फारसा सहवास नाही; अनुभवही नाही. पण तरीही राग आहे आणि त्याचवेळी त्याच्या मनात आईबद्दल प्रचंड हळवेपणा आहे. दीवारमध्ये आई आजारी आहे असं समजल्यावर आपला जीव धोक्यात घालूनही तो तिला भेटायला जातो.
शक्ती’ (दिग्दर्शक रमेश सिप्पी) या सिनेमात याच रागाचा, दबलेल्या अंगाराचा थेट सामना होतो तो कर्तव्यनिष्ठेशी! एकीकडे लहानपणी घडलेल्या एक प्रसंगामुळे पूर्ण आयुष्य डोयात राग घेऊन जगणारा विजय तर दुसरीकडे त्याचप्रसंगी एक पोलिस ऑफिसर म्हणून आपले कर्तव्य पार पाडणारे त्याचे वडील अश्‍विनीकुमार (दिलीप कुमार). लहानपणी विजयचे अपहरण करण्यात आलेले असते. एका गुंडाला सोडण्याच्या बदल्यात विजयला सोडले जाईल असा सौदा जे.के. (अमरीश पुरी) अश्‍विनीकुमारला सांगतो. पण तो आपला प्रामाणिकपणा सोडत नाही. मुलाचे प्राण गेले तरी गुंडाला सोडणार नाही असे तो जे.के.ला ठणकावून सांगतो. हा प्रसंग असा आहे की दोन्ही बाजूंनी बघितलं तरी दोघंही (विजय आणि त्याचे वडील) आपापल्या जागी बरोबरच आहेत असं वाटतं. विजयला हे सगळं संभाषण ऐकवण्यात येतं आणि त्याला पळून जायला मदत करतो तो आणखी एक स्मगलर! या प्रसंगातून विजयच्या मनात वडिलांबद्दल तीव्र नफरत निर्माण होते. इतकी की जे जे वडिलांना आवडत नाही ते-ते तो मुद्दाम करतो. वाईट मार्गाला लागतो. सूडाच्या आगीत विजय उत्तरोत्तर जळत जातो आणि वडिलांनाही त्यात ओढतो. कर्तव्य श्रेष्ठ की भावना असा प्रश्‍न अश्‍विनीकुमारसमोर पुन्हा एकदा उभा राहतो आणि यात तो त्याचा मुलगा गमावतो. तो स्वत:च बंदुकीने विजयला मारतो. या दोघांच्या भिन्न स्वभावाचा, संघर्षाचा अंत शोकात्मक होणे हे तसे अपरिहार्य! विजयच्या मनात वडिलांबद्दल तीव्र सूडाची भावना आहे तर दुसरीकडे त्याच्या वडिलांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे पण प्राधान्यक्रमात कर्तव्य वरचढ आहे. या दोघांमधला दुवा विजयची आई (राखी). पण या सूडनाट्यात तिचाही अंत होतो. 
 
शक्ती
दिलीपकुमारने या सिनेमात आपल्या देहबोलीतून, नजरेतून, संवादफेकीतून वडिलांची तगमग उत्कृष्टपणे मांडली आहे. विजय मागे म्हटल्याप्रमाणे नॅट्रम ग्रुप या होमिओपॅथीच्या औषधाजवळ जाणारी व्यक्तिरेखा आहे तर अश्‍विनीकुमार ही लायकोपोडियम/सिलिशिया या औषधांशी मिळतीजुळती आहे.

नाती-गोती या विषयावरील सिनेमांवर आधारित लेख आणि त्यात गुलजार यांचा उल्लेख होणार नाही, हे केवळ अशक्य ! आपल्या जवळपास प्रत्येक सिनेमांमधून गुलजार यांनी वेगवेगळ्या नात्यांचा शोध घेतला आहे, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुलजार टच मुळे त्याच्या सिनेमातील माणसे आणि प्रसंग तसे तुमच्या-आमच्यासारखे आणि म्हणूनच जवळचे वाटतात. आपण पटकन त्या प्रसंगांशी relate करू शकतो.
असाच एक गुलजार यांचा एक सिनेमा म्हणजे किनारा’. कुठल्याही नात्याचा पाया Guilt(अपराधीपणाची भावना) असू शकतो का? असल्यास त्याचे त्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतात? त्याने नाते कितपत प्रभावित होऊ शकते? ‘किनारासिनेमाचा खरं तर हा विषय आहे. 


किनारा

एखाद्या माणसाला पश्‍चात्तापाने घेरले असता त्या पश्‍चात्तापातून सुटका मिळवण्यासाठी तो over compensate करू शकतो आणि त्यातून नात्यातले पेच वाढत जातात. त्याचा हेतू चांगला असला तरी घडते त्याच्या अगदी विपरीत! हा पश्‍चात्तापाचा प्रवास आहे इंदरचा (जितेंद्र) आणि जिच्यासाठी तो सगळं करतो ती आरती (हेमामालिनी) त्याच्या या compensate करण्यामुळे उत्तरोत्तर वेगळ्याच समस्यांमध्ये गुंतत जाते. इंदरच्या या  conscientious किंवा सद्सद्विवेकबुद्धिवादी स्वभावाला अनुसरून होमिओपॅथीमध्ये काही औषधे आहेत. त्यापैकी काही म्हणजे Carcinosin, नॅट्रम मूर, सिलिशिया इत्यादी.
गुलजारांचा आणखी एक सिनेमा म्हणजे सर्वपरिचित इजाजत’! ‘इजाजतही एक तरल भावकविताच आहे. माया, महेंद्र, सुधा आणि सुधाचा दुसरा नवरा (शशी कपूर) यांची ही कथा. या कथेतून गुलजारांनी स्त्री-पुरुष नात्याचा एक उत्कट, संवेदनशील प्रवास मांडला आहे. त्यांच्या नेहमीच्या फ्लॅशबॅक तंत्राने वर्तमान आणि भूतकाळात फिरणारी ही कथा सुरू होते रेल्वे प्लॅटफॉर्मवर, वेटिंगरूममध्ये आणि संपतेही तिथेच! सिनेमाची गोष्ट शब्दबद्ध करणं केवळ अशक्य आहे कारण या सिनेमाला सुंदर दृश्यात्मकता आहे आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीताची अजोड साथही! 
या दोन्ही गोष्टींशिवाय इजाजतचा विचार होऊच शकत नाही. म्हणून गोष्ट न सांगता त्यातील व्यक्तिरेखांबद्दल लिहिणं जास्त श्रेयस्कर!
माया(अनुराधा पटेल)

माया (अनुराधा पटेल) ने लहानपणीच आपल्या आई-वडिलांची भांडणं अनुभवली आहेत. म्हणूनच तिचा लग्न या संस्थेवर विश्‍वास नाही. ती बंडखोर आहे पण तिच्यात आक्रस्ताळेपणा नाही की व्यवस्थेबद्दल चीड नाही. ती संवेदनशील आहे, कवी आहे, रोमँटिक आहे आणि म्हणूनच अतिशय हळवीही! ती अतिशय unpredictable आहे. भावनेच्या भरात, impulsively ती काय करेल हे सांगता येत नाही. ती अशी मनस्वी आहे आणि तरीही vulnerable ही! म्हणूनच महेंद्र तिच्याशी असलेले नाते तोडू शकत नाही. सुधाशी लग्न होऊनही मायाला विसरू शकत नाही. माया कधी एके ठिकाणी राहत नाही. अचानक दुसरीकडे निघून जाते. कोणाच्याही नकळत. हा तिचा flight response आहे असे म्हणता येऊ शकते. मायाची व्यक्तिरेखा पुन्हा एकदा होमिओपॅथीच्या नॅट्रम व मॅग्नेशिअम ग्रुपशी साधर्म्य बाळगणारी वाटते.


सुधा (रेखा)
सुधा (रेखा) ही एक पारंपरिक विचारसरणीची, मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली स्त्री आहे. महेंद्रशी तिचं लग्न ठरलंय. पण त्याच्या आयुष्यात आधीच माया आहे हे तो तिला सांगतो आणि सुधाच्या पुढाकारामुळे लग्न रद्दच व्हावे असे तिला सुचवतो. पण सुधा तिच्यावरच्या संस्कारांमुळे हे करू शकत नाही. दोघांचं लग्न होतं. ती महेंद्रचं गतआयुष्य स्वीकारून संसार समजुतदारपणे करू लागते. पण महेंद्रच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा माया वेगवेगळ्या प्रकारे येतच राहते. सुधासारख्या/कोणत्याही स्त्रीला हे स्वीकारणे जडच जाणार! शेवटी सुधा स्वतंत्ररीत्या निर्णय घेऊन महेंद्रचे घर सोडून जाते आणि नंतर आयुष्यात स्थिरावते देखील! हा सुधाचा परंपरेला/संस्कराला धरून राहणारा, त्यामुळे एकप्रकारे rigidity येणारा स्वभाव होमिओपॅथीच्या सिलिशिया औषधाशी मिळताजुळता आहे.
महेंद्र (नसीरूद्दीन शहा) हा अत्यंत भावनाप्रधान आहे. 
महेंद्रने माया आणि सुधा या दोन्ही नात्यांत त्याच्या भावना गुंतवल्या आहेत. म्हणून तो मायालाही विसरू शकत नाही आणि सुधाला जपायचा, तिचं मन राखायचाही तो पूर्ण प्रयत्न करतो. या गुंत्यामुळे दोन्ही नात्यांमध्ये त्याच्या पदरी निराशा येते. या निराशेचे शारीरिक परिणामही त्याला भोगावे लागतात (हृदयविकार, डायबेटिस) अशी व्यक्ती होमिओपॅथीच्या नॅट्रम ग्रुपशी (पुन्हा एकदा पण वेगळ्याप्रकारे!) मिळतीजुळती वाटते.
महेंद्र (नसीरूद्दीन शहा)
सुधाचा दुसरा नवरा (शशी कपूर) - खरं तर सिनेमात या व्यक्तिरेखेला फार काम नाही. संवादही नाहीत. त्या व्यक्तिरेखेचं नावही आपल्याला कळत नाही. तरीही ही व्यक्तिरेखा सिनेमाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची आहे.

शशी कपूर
या लेखात आधी उल्लेख केलेल्या इतर चित्रपटांतील व्यक्तिरेखा असोत किंवा एकूण विचार करता बहुतांश नाते-संबंधात प्रामुख्याने असतो तो एक झगडा - काहीवेळा व्यवस्थेशी, काही वेळ व्यक्तीशी, पण पुष्कळदा स्वत:शीच! आपल्या गतआयुष्याशी! हा झगडा/तिढा न सुटल्यामुळे नात्यांमधला तणाव वाढत जातो. इजाजतमधल्या सुधाच्या दुसर्‍या नवर्‍याचं मात्र तसं नाही. त्याला सुधाचं आणि महेंद्रचं आधीचं नातं, त्यांचा भूतकाळ माहित आहे. पण त्याच्याशी त्याचा झगडा नाही. त्याच्याकडे आहे त्या नात्याकडे बघण्याचा समजुतदारपणा, एक खुलेपणा! म्हणूनच तो महेंद्रकडे बघतो, समंजसपणे हसतो आणि सुधाला मागे ठेवून बाहेर जातो. त्याच्या मनात सुधाबद्दल असते एक आश्‍वस्तता, तिच्याबद्दल वाटणारी खात्री, एक विश्‍वास! अगदी दोनच क्षणांसाठी अनपेक्षितपणे येणारी ही शशीकपूरची व्यक्तिरेखा एकूणच नात्यांविषयी खूप काही सांगून जाते!