Saturday 26 October 2013

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा -पं. हृदयनाथ मंगेशकर !






एखाद्या कलाकाराबद्दल बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, अधिकार तर त्याहून नाही. मला आपले सगळेच कलाकार आवडतात . मग ते अभिनय क्षेत्रातले असोत वा संगीत ! एखाद्या सर्वसामान्य श्रोत्याप्रमाणे मला आपलं वाटतं की ज्या कलाकाराचं गाणं रेकॉर्ड झालं आहे त्याची काहीतरी पात्रता नक्कीच असणार ! शिवाय कुठल्याही गायकाला टाकाऊ समजलं  तर त्याने गायलेले चांगले गाणे देखील आपल्या पूर्वग्रहामुळे आपल्याला आवडत नाही. महेंद्र कपूर हा देखील असाच एक गायक ! पूर्वी मोहमद रफीची नक्कल करतो म्हणून हिणवला गेलेला. नंतर बी ग्रेड सिनेमातील सी ग्रेड गाणारा असा उगाचच लौकिक झालेला. तरीही त्याची आणि संगीतकार रवि या जोडीची गाणी केवळ अप्रतिम ! ' गुमराह' असो की ' हमराज'. 'वक़्त' असो की 'जिंदगी और मौत'! 'हमराज' मधलं 'न मुह छुपाके जियो' या एका गाण्यासाठी सुद्धा मी महेंद्र कपूरला महान गायक मानायला तयार आहे. त्यातलं तार सप्तकात गायलेलं कडवं हे अजिबात सोपं नाही आणि विशेषत: त्याकाळी, जेव्हा रेकॉर्डिंगचं  तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. म्हणजे टेक्नोलॉजी मुळे करामत न करता आवाजाच्या नैसर्गिक देणगीच्या जोरावर त्याने हे गाणे गायलंय. खूपच मोकळेपणाने गाणारा कुठलाही गायक काही वेळा लाउड गातो. तसा महेंद्र कपूरही गायलाय. पण मधूनच तो ' प्यार जिंदगी है' या 'मुक़द्दर का सिकंदर' या गाण्यात सुखद धक्का देऊन जातो तर त्या आधीचीही त्याची काही सुरेख गाणी आहेतच- 'तेरे प्यार का आसरा चाहता हू '(धूल का फूल) किंवा नवरंग मधली गाणी किंवा- 'रफ्ता रफ्ता वो हमारे दिल के अरमान हो गये' (आशा भोसले सह 'हम कहा जा रहे है' मधलं ) 
मराठीतही महेंद्र कपूर उत्कृष्ठ गायले आहेत. हिंदी गाण्यात काही वेळा त्यांचा पंजाबी लहजा डोकावतो. पण मराठीत असं अजिबात वाटत नाही . मी तर म्हणेन की मन्ना डे यांच्या इतकंच सुंदर काम महेंद्र कपूर यांनी मराठीत केले आहे. संख्येने तर जास्त केलंच आहे पण गुणवत्तेने ही तोडीस तोड ! आणि या एका बाबतीत तरी मला हा शिष्य त्यांचे गुरु मोहमद रफी यांच्यापेक्षा वरचढ वाटतो. रफी यांनी गायलेली मराठी गाणी ही वेगळं बेअरिंग घेऊन गायल्यासारखी वाटतात असं माझं मत आहे . परंतु दादा कोंडके यांच्या सिनेमातला दादांचा आवाज असा काहीसा नकारात्मक शिक्का बसला असेल किंवा काही गाणी खरंच अनुल्लेखाने मारावी अशा टाकावू प्रकारची असतील. पण महेंद्र  कपूर हे also ran प्रकारात मोडले गेले. 

पण आज महेंद्र कपूर यांच्याविषयी का लिहितोय? ना आज त्यांचा जन्मदिवस ना पुण्यतिथी !

खरं तर आजचे(२६ ऑक्टोबर) ' बर्थ डे बॉय' आहेत पं. हृदयनाथ मंगेशकर ! मराठीत या दोन कलाकारांनी ३ अतिशय सुंदर गाणी केली आहेत. मुळात महेंद्र कपूर यांच्या बरोबर गाणी करावीत हा योग कसा जुळून आला असेल याच्या बद्दल मला कुतूहल आहे. म्हणजे ही तीन गाणी एका अल्बम साठी केली आहेत असं वाटत नाही. यातलं एक चित्रपट गीत आहे आणि दोन भावगीतं ! एखाद्या गाण्यासाठी अमुक अमुक गायक(किंवा गायिका) ही निवड कशी ठरत असावी? कदाचित हा माझा पूर्वग्रह असू शकेल पण हृदयनाथ मंगेशकर आणि महेंद्र कपूर हे मला अगदी भिन्न प्रकृतीचे कलाकार वाटतात. ते एकत्र  काम करू शकतील असं वाटत नाही. ही गाणी इतर कोणालाही ते देऊ शकले असते. इतकंच कशाला ही गाणी ते स्वत: सुद्धा गाऊ शकले असते.ही गाणी गाऊन  महेंद्र कपूर यांनी मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे असं वाटतं. तीनही गाणी नामांकित कवींची आणि त्यामुळे शब्दांमध्ये फेरफार करायला, अमराठी गायकाला सोपं जाईल असे बदल करायला फारसा काही वाव मिळाला नसावा. शब्दांच्या अचूक उच्चारांसह  भावही तितक्याच समर्थपणे पोचवण्याचे काम महेंद्र कपूर यांनी या गाण्यांतून केलं आहे.

यातलं पहिलं गाणं आहे सुरेश भटांचं -' पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी'
https://www.youtube.com/watch?v=wbpdlwaFSjA
हृदयनाथ मंगेशकरांची नेहमीची अवघड, अनवट चाल आणि शब्द-सुरांतून उत्तरोत्तर गहिरे होत जाणारे घनगंभीर, वेदनामय नैराश्य ! 

दुसरं गाणं काशिनाथ घाणेकर यांच्यावर चित्रित झालेलं -'रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा' हे 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातलं !
एखाद्या चांगल्या गाण्याची ढिसाळ चित्रीकरणामुळे वाट कशी लावावी याचे (वसंत जोगळेकरांची क्षमा मागून) हे गाणे उत्तम उदाहरण असावे ! गाण्याचा ह्रिदम आणि saxophone चा भरपूर वापर  यावरून हे टिपिकल हृदयनाथ शैलीचं गाणं वाटत नाही. पण सिनेमाच्या गूढ कथानकाला हे गाणं साजेसं वाटतं.

या ३ पैकी माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे-आरती प्रभू लिखित-'ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते' हे गाणे !  
खरंच सांगतो, मागे एका ' सा रे ग म प' च्या कार्यक्रमात स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी सांगेपर्यंत मला हे माहित नव्हते की हे गाणे कवी/लेखकाच्या प्रतिभेला उद्देशून आहे! या गाण्यात माझ्या आवडत्या accordionचा मस्त वापर आहे. तसेच ' ती येते'  हे म्हणतानाचे हेलकावे ऐकायला फार छान वाटतात. एके ठिकाणी अंतऱ्याकडून मुखडयाकडे  येताना 'ती ' वर जो जोर दिलाय ना ते ही मस्तच! 
ही तीन गाणी गाऊन  मासेसचा गायक क्लासेसचा ही कसा होऊ शकतो याचा पुरावाच महेंद्र कपूर यांनी दिला आहे.

2 comments:

ShreepadG said...

राजेश,
अगदी नेटकं लिखाण आहे महेंद्र कपूर यांच्याबद्दल...त्यांचं मूल्यमापन करायची अजिबात इच्छा नाहीये कारण कुठलाच नैतिक अधिकार नसलेला माझ्यासारखा एक सामान्य कानसेन इतक्या मेहेनती कलाकाराचं मूल्यमापन कसं करणार?...तरी तुझ्याशी असलेल्या मैत्रीच्या नात्याने थोडक्यात वाफ घालवायचा प्रमाद करतो ...
त्यांच्या आवाजाची 'चव' नाही आवडली विशेष मला पण पण पण...
काही काही पदार्थ आपल्याला आवडत नसले तरी त्याचं वैशिष्ट्य आपण मान्य केल्याशिवाय राहू शकत नाही...तसंच या महान गायकाबद्दल म्हणू शकेन...अभूतपूर्व 'आवाका' (range) हे त्यांच्या आवाजाचं एक ठळक परिमाण म्हणता येईल. निसर्गदत्त देणगी असलेला सहजपणे खूप उंच चढणारा आवाज त्यांनी शास्त्रीय गायन शिकून अतिशय मेहेनतीने जतन आणि संवर्धन केला. दुर्दैवाने म्हणा किंवा योगायोगाने महंमद रफी यांचे समकालीन असणं त्यांच्यासाठी wrong man at wrong place ठरलं त्यामुळे म्हणावा तसा त्यांना वाव मिळू शकला नाही...अर्थात त्यांच्या आवाजाची ताकद त्यांना जी काही गाणी मिळाली त्यातून दिसल्याशिवाय रहाणं शक्यच नव्हतं. त्यातील काही गाण्यांचा उल्लेख तू यथोचित केला आहेसच. जसं राजकपूर = मुकेश, देव / राजेशखन्ना = किशोर, तसं मनोजकुमार आणि दादा कोंडके म्हणजे महेंद्र कपूरच...No second thought about it.
एकदा विविध भारती वर त्यांनी सादर केलेला विशेष गीतगंगा कार्यक्रम ऐकल्याचं आठवतंय. तेव्हा समजलं की ते मराठी भाषा खूपच नीटसपणे बोलू शकायचे. त्यांचे एकंदर सादरीकरण आणि विनम्र-मृदू प्रतिपादन यामुळे ते अगदी चांगल्या कारणासाठी माझ्या 'डोक्यात गेले'...
हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांना त्यांनी दिलेला स्वर-साज चांगला शब्दांकित झालाय....ती येते आणिक जाते हे गायकाचा घाम काढणारं गाणं आहे ... गाऊन बघ म्हणजे समजेल पण त्यांनी ज्या सहजतेने त्यातले चढ उतार पेलले आहेत त्याला तोड नाही ... अकोर्डीअन सोबतच या गाण्यात मेंडोलिन सुद्धा अतिशय प्रभावीपणे वापरलं गेलंय ... कुणी वाजवलंय माहित नाही ... पण सवडीने काढेन माहिती ... कदाचित प्रदीप्तो सेनगुप्ता किंवा कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत काम करणारे कोणी गुजराथी कलाकार आहेत देसाई किंवा दोशी आडनावाचे ... त्यांनीच तुम बिन जाऊ कहाँ मध्ये मेंडोलिन वाजवलंय...असो...
"हा खेळ सावल्यांचा" सुद्धा महेंद्र कपूरच्याच आवाजात सुंदर जमून आलंय.
मला अगदी अंधुक अंधुक वाटतंय की बाळ मंगेशकर आणि महेंद्र कपूर या जोडीचं अजून एक गाणं आहे ज्यांचा वर उल्लेख नाहीये ... देशभक्तीपर गाणं आहे बहुतेक ... नक्की आठवत नाहीये ... "अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत जा रे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" या समूहगीतात महेंद्र आहेत का? माहित नाही ...
पुन्हा एकदा धन्यवाद राजेश

Shreepad M Gandhi said...

मध्यंतरी एकदा साजतरंग (मिथिलेश पाटणकर) प्रस्तुत यूट्युबवर पियानो एपिसोड (अतुल रणिंगा) बघताना अतुल यांनी सूर तेच छेडिता हे महेंद्र कपूर यांचं गाणं सादर केल्यावर या गाण्याबद्दल उत्सुकता वाढली...महेंद्रांनी खूपच छान गायलंय हे गाणं...प्रसिद्ध आहे पण सुपरहिट होण्यासाठी सगळे घटक असूनही थोडी प्रसिद्धी कमी मिळाली याची चुटपुट लाडली थोडी...ही वस्तुस्थिती ध्यानात आल्यावर सचिनदेव बर्मन यांचा एक किस्सा आठवला...कुठलंतरी गाणं एकदा पंचमने रेडिओ वर ऐकलं आणि तो उडालाच कारण ती चाल त्याची होती पण श्रेयनामावलीमध्ये पिताश्रींचं नांव होतं...त्याने लगेच दादांकडे जाऊन तक्रार केली...दादा
बर्मन खरंच 'दादा' "होता"...त्यांनी उत्तर दिलं..."हो...तुझीच चाल आहे ती...तू गुणगुणत होतास एकदा तेव्हा ऐकून मी वापरली कारण मला बघायचं होतं की तुझी चाल लोकांमधे 'चालते' का नाही ते...मला आनंद झालांय...
.
याला दैवयोग याव्यतिरिक्त दुसरे स्पष्टीकरण नाही...
कदाचित महेंद्र कपूर यांच्या भाग्यांत ही थोडी कमी असावी...कोण जाणे...
बाजीराव रस्त्यावरच्या चितळे लोणी चक्का विभागासमोर Shahaji Paratha यांनी एक शाखा चालवली होती साधारण दहा वर्षांपूर्वी... त्यांचं लक्ष्मी रस्त्यावरच्या आणि आपटे रस्त्यावरच्या ठिकाणी आम्ही बर्याचदा जायचो...म्हणून इथेही बिनदिक्कत गेलो...आणि खरंच त्यांच्या दोन शाखांना साजेशा लौकिकाचा पुन:प्रत्यय आला...Ambience, service, taste अशा सगळ्याच बाबतीत... पण प्रत्येकवेळी दिसलं की फक्त आम्ही आणि एखाददुसरं अजून एक टेबल ... एवढंच फक्त गिर्हाईक होतं...
जागेला यश नाही म्हणतात असं काहीतरी ऐकलं होतं...ते आठवलं...तीन महिन्यात ही शाखा बंद झाली...असो...
.