Monday 21 November 2022

पुस्तक परीक्षण : 'चिद्गगनाचे भुवनदिवे'


अलीकडच्या काळात  'चिद्गगनाचे भुवनदिवे' हे पुस्तक वाचलं. यातील काही लेख मी याआधी 'मौज'  वा 'दीपावली' च्या दिवाळी अंकांमध्ये  वाचलेही होते. काही मात्र प्रथमच वाचले. पुस्तकात डॉ बोकीलांनी त्यांच्या आयुष्यातल्या आठ व्यक्तींच्या सहवासातून जुळलेल्या ऋणानुबंधाविषयी लिहिलं आहे. जितकं ते त्या आठ व्यक्तींबद्दल सांगतात तेवढंच त्यातून त्यांच्याविषयीही कळत जातं आणि या प्रांजळ लिखाणामुळे त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो. त्या आठ लेखांपैकी काही लेखांचा मी इथे सविस्तरपणे उल्लेख करेन -


१) श्री. पु. भागवतांवरील 'साहित्याचा भूमिपुत्र' हा लेख अतिशय उत्कृष्ट आहे. लेखक आणि प्रकाशक यांच्यातील पुस्तकांविषयी होणारा संवाद यातून वाचकांसमोर लेखकाने छान मांडला आहे. यातून त्यांनी श्री. पुं चे चित्र उभे केले आहे ते विलोभनीय आहे. त्यांची आमच्या मनात जी प्रतिमा होती (म्हणजे ते शिस्तप्रिय आहेत, त्यांची उच्च अभिरुची वगैरे) या पलीकडे जाऊन लेखक आणि प्रकाशक या पुस्तक निर्मितीमधल्या दोन घटकांमधील चर्चा, वाद -संवाद यामधून त्यांची पुस्तक प्रकाशन या व्यवसायावरची निष्ठा आणि चांगल्या साहित्याचा दर्जा राखण्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण त्याबाबत कोणतीही तडजोड करायची नाही या गोष्टीदेखील प्रकर्षाने कळल्या. श्री पुंची चांगल्या साहित्यकृतीच्या निर्मितीबद्दलची तळमळ या लेखातून पुन्हा अधोरेखित झाली. कोणत्याही लेखकाने पुस्तकाची हस्तलिखित(वा टंकलिखित ) प्रत प्रकाशकाकडे सोपवल्यानंतर ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंतचा प्रवास याविषयी इतक्या सविस्तरपणे लिहिलेलं माझ्या वाचनात तरी आलेला नाही. हा प्रवास म्हणूनच वाचकांना समृद्ध करणारा आहे. मुळात चांगले साहित्य कशाला म्हणायचे याबाबत या दोघांमध्ये विस्तृत चर्चा झालेल्या दिसतात. 'आठवणीतले मर्ढेकर' या लेखातील श्री पुंचं  वाक्य खरं तर प्रत्येक लेखकानेच नव्हे तर आपण वाचकांनी सुद्धा कायम स्मरणात ठेवावं असं आहे-'अनुभवाच्या संमिश्रतेची प्रगल्भ जाणीव आणि त्याच्या वर्णनापेक्षा चित्रणाची कलात्मक दृष्टी' यात केवढा गहन- गंभीर अर्थ सामावलेला आहे ! हा एकच मापदंड वाचकाने प्रत्येक पुस्तकाला लावला तरी त्याच्यात नीर क्षीर विवेकबुद्धीचा विकास होईल असं मला वाटतं. पण अर्थात हे वाक्य पूर्णपणे आत्मसात करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. पण वाचकाला चांगल्या साहित्याचे निकष कळले तर त्याचा प्रवास निश्चितच त्या दिशेने होईल यात शंका नाही. आणि हाच मापदंड डॉ मिलिंद बोकीलांच्या सर्व साहित्यकृतींना लावला तर त्या कसोट्यांवर ते साहित्य पूर्णपणे उतरतं हेही तितकंच खरं !

डॉ बोकील आणि श्री पु भागवत यांच्यामधील प्रगल्भ नातं आणि ते नातं घडत जाताना निर्माण होणारे  समज-गैरसमज, आणि मतभेद याबद्दल लेखकाने अतिशय मोकळेपणाने आणि वस्तुनिष्ठपणे लिहिलं आहे. यातून हेही लक्षात येतं की लेखक म्हणून कलाकृतीनिर्मितीच्या मागे असलेली भूमिका किंवा अगदी कादंबरी लेखन असली तरी, त्या कथानक वा त्यातील व्यक्तिरेखांबद्दल असलेली त्यांची भूमिका ठाम होती आणि प्रसंगी वाद झाला तरी चालेल पण त्या भूमिकेपासून ते मागे हटले नाहीत हे विशेष! एक व्यक्ती म्हणूनही श्री पुंच्या स्वभावाचे कंगोरे छान रंगवले आहेत.यावर्षीच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात मोनिका गजेंद्रगडकर यांनी श्री पु भागवत यांच्यावर एक भावस्पर्शी लेख लिहिला आहे. त्यांच्या आणि डॉ बोकीलांच्या श्री पुं विषयीच्या अनुभवांत विलक्षण सातत्य आहे. 

पुस्तकातील बाकी व्यक्तिचित्रं पण सुरेख आणि हृद्य देखील आहेत. उदाहरणार्थ -कमल रणदिवे यांच्यावरील 'सायंटिस्ट आजी' हा लेख किंवा 'समाजकार्याचे अशोकवन' हा अशोक सासवडकर यांच्यावरील लेख!
पुस्तकात अशा लोकांची व्यक्तिचित्रे आहेत ज्यांना मी कधीच भेटलेलो नाही. पण तरीही यातील काही लेख हे मला माझ्या अनुभवांच्या खूप जवळ जाणारे वाटले आणि म्हणून ते जास्त आवडले. त्या लेखांविषयी थोडंसं -

२) 'समाजअर्थाचा 'सह'योग'- हा साहित्यिक, उजव्या विचारसरणीचे विचारवंत श्री स हे देशपांडे यांच्या वरील लेख आहे. स ह देशपांडे हे महाराष्ट्राच्या स्वयंसेवी चळवळींचे ज्येष्ठ अभ्यासक होते. तसंच अर्थशास्त्राचे देखील अभ्यासक होते.  बोकीलांनी समाजशास्त्र विषयात पी.एच डी केली त्यावेळी त्यांना श्री. स ह देशपांडे यांची मदत झाली. व्यावसायिक कारणांनी सुरु झालेलं दोघांचं नातं हळूहळू घरगुती स्वरूपाचं झालं. श्री. स ह देशपांडे हे हिंदुत्वविचाराचे पुरस्कर्ते तर डॉ बोकील हे डाव्या विचारसरणीकडे झुकणारे! परंतु या वैचारिक मतभेदांमुळे दोघांच्या नात्यात काहीही फरक पडला नाही. उलट ते उत्तरोत्तर प्रगल्भच होत गेले. 
गेली आठ वर्षे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाचे देशावर राज्य आहे. मी या धर्माधिष्ठित राजकारणाचा अजिबात समर्थक नाही. व्हाट्सअँप, फेसबुक  या सारख्या समाजमाध्यमांवर मी माझे विचार मांडत असतो. विशेषतः व्हाट्सअँप समूहांमध्ये आणि तेही शाळा कॉलेज मधील समूहांमधला माझा याबाबतीतला अनुभव मात्र फारसा चांगला नाही. समूहांमध्ये वेगवेगळ्या वेळी राजकीय विषयांवरील चर्चेत मी माझी मतं हिरिरीने मांडायचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासारखी मतं असणारे फार थोडे लोक आहेत आणि त्यातसुद्धा स्वत:ची  मतं मांडणारे आणखीनच कमी ! यामुळे मी एकटा विरुद्ध उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते अशा चर्चा/वाद समूहांमध्ये झाले. काहीवेळा ते इतक्या टोकाला गेले की ते वैयक्तिक पातळीवर जाऊन त्याला  टिंगलटवाळी/ शेरेबाजी असं स्वरूप आलं. आणि मग मी अशा समूहांमधून बाहेरही पडलो.(कॉलेजच्या एका समूहाने मात्र मला मी कितीही वेळा बाहेर पडलो तरी तितक्या वेळा प्रेमाने मला परत घेतले!) 
स ह देशपांडेंवरील  लेख वाचल्यावर जेव्हा मी माझ्या या अनुभवांचा विचार करू लागलो तेव्हा मला वाटलं की यात माझीही चूक झाली असली पाहिजे. त्या त्या व्यक्तीचे राजकीय विचार कुठल्याही बाजूचे असले तरीही केवळ त्यावरूनच आपण त्या व्यक्तीची परीक्षा करू नये, जी मी करत होतो. अर्थात इथे मला हे मान्यच आहे की माझे शालेय मित्र काही स ह देशपांडे यांच्या इतके उदारमतवादी,विवेकी, व्यासंगी, ज्ञानी नव्हेत आणि मी देखील  लेखक डॉ मिलिंद बोकीलां इतका  वस्तुनिष्ठ आणि व्यक्तीचा तिच्या राजकीय विचारांपलीकडे जाऊन विचार करणारा नव्हे ! पण जर मी तसं केलं असतं तर काही नाती मला निश्चितच सांधता आली असती असं आता मला वाटतं. 

डॉ मिलिंद बोकील 


३) 'वाघिणीचे दूध' आणि 'स्थितप्रज्ञस्य का भाषा..' हे लेखकाच्या आई वडिलांविषयीचे लेखही खूप भिडले. एकाच वेळी ते भावनिक ओलावा असलेलेही आहेत, पारदर्शी आहेत आणि वस्तुनिष्ठही! आपल्या आई-वडिलांविषयी लिहिताना समतोल राखून लिहिणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण डॉ बोकीलांनी तो समतोल राखला आहे. मला हे लेख विशेष आवडले कारण मी देखील अलीकडेच आई-वडीलांच्या वियोगाच्या दु:खातून गेलो आहे. त्यातही आई नसण्याच्या दु:खातून दोन-अडीच वर्षे झाली तरी पूर्णपणे सावरू शकलेलो नाही. पण हे दोन्ही  लेख वाचून मला खूप उभारी आली. आईबद्दल एक प्रकारच्या टोचणीच्या भावनेपलीकडे जाऊन मी तिच्याबद्दल तितकासा विचार करू शकत नव्हतो जो मी हे लेख वाचल्यावर करू लागलो. काही एक काळ लोटल्यानंतर आपण आपल्या पालकांकडे तटस्थपणे बघितलं पाहिजे हे या लेखांमधून जाणवलं. डॉ बोकीलांच्या  आई वडिलांवरील लेखात मला आणखी एक गोष्ट आवडली म्हणजे त्या लेखांमध्ये त्यांनी त्यांची लेखक ही भूमिका आणि प्रतिमा यांचा विचार न करता खुलेपणाने त्यांच्याविषयी लिहिले आहे. 
विचारांच्या कक्षा रूंदावणारं आणि प्रत्येकाला आपापल्या अनुभवांकडे घेऊन जाणारं हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावं.

Sunday 20 November 2022

सायकलिंग करता करता...(भाग ५ )

 (हा ब्लॉग वाचायच्या आधी माझे याच विषयांवरील आधीचे ४ ब्लॉग वाचले तर तुम्हांला जास्त मजा येईल म्हणून त्या ब्लॉग्स ची लिंक मी इथे देत आहे -

भाग १-https://rajeshpusalkar.blogspot.com/2022/05/blog-post.html      

भाग २ - https://rajeshpusalkar.blogspot.com/2022/05/blog-post_28.html      

भाग ३- https://rajeshpusalkar.blogspot.com/2022/06/blog-post.html       

भाग ४- https://rajeshpusalkar.blogspot.com/2022/06/blog-post_2.html  )


                                                                                   १ 

सायकलिंग या विषयाला वाहिलेला हा माझा दहावा ब्लॉग आहे. यावरून गेल्या वर्षभरातला  हा माझा आवडता छंद आहे असं  म्हणायला हरकत नसावी ! पहिल्या ब्लॉग मध्ये सायकलिंग करतानाचे सर्वसाधारण अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच्या चार ब्लॉग मध्ये सायकलिंग करता करता दिसलेल्या पुणे शहराविषयी लिहिलं होतं. जोडीला अर्थातच फोटो होते. यावर्षीचा वसंत ऋतू चालू झाल्यावर वेगवेगळ्या झाड-फुलांचे सायकलिंग करता करता काढून त्यावर आणखी चार ब्लॉग लिहिले होते. खरं तर हे तसं सगळं चांगलं चालू होतं. फुलांचा बहर... काहीवेळा अचानक , न ठरवता दिसलेली झाडं.. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या सदराचा संदर्भ घेऊन शोधलेली झाडं आणि ती त्याच जागी अजूनही आहेत याचा झालेला आनंद...झाडांविषयी माहिती वाचून ज्ञानात भर पडत होती... या निमित्ताने लोकांशीही संवाद होत होता... माझा उपक्रम बघून काही लोकांमध्ये झाडं बघण्याची उत्सुकताही  निर्माण  झाली होती...

आणि अचानक ... 

६ एप्रिल ला गाडीवरून पडल्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि पुढचे ६ आठवडे मला घरीच विश्रांती घ्यावी लागली. होती.  दृष्ट लागणं वगैरे प्रकारावर खरं म्हणजे माझा अजिबातच विश्वास नाही . पण इतक्या चांगल्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या छंदाला अशाप्रकारे खीळ बसली याची मला खूपच रुखरुख लागून राहिली. मी पुन्हा जून महिन्यापासून सायकलिंग चालू केलं पण तोवर फुलांचा बहर कमी होत चालला होता आणि नंतर अर्थातच पावसाळा चालू झाला आणि आता आपल्याला पुन्हा फुलं बघण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट बघावी लागणार या विचाराने मन खिन्न झालं ! कारण मागेही लिहिल्याप्रमाणे झाडं बघणं, त्यांचा पत्ता शोधणं आणि त्यासाठी नवनवीन ठिकाणी जाणं हे सायकलिंगसाठी उत्साहवर्धक झालं होतं कारण त्यानिमित्ताने सायकलिंग नियमितपणे चालू होतं. पण आता ते होणे नाही किंवा असंच नवीन काहीतरी शोधून काढावं लागेल असं वाटत असतानाच ....  

                                                                               २

अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबरला मी विमाननगरच्या रस्त्यावर सायकलिंग असताना, पूर्वी जिथे (रस्ता दुभाजकावर ) मला शिंदीची(Phoenix sylvestaris) झाडं शेकड्याने दिसली होती (आणि ज्या विषयी मी या आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे ), तिथेच त्या झाड्यांच्या मध्ये मला अशीच शेकड्याने सूर्यफुलांची झाडं दिसली .  इंग्रजी कवी विल्यम वर्डस्वर्थच्या सुप्रसिद्ध I wandered as a lonely cloud या कवितेतील ओळींची आठवण व्हावी इतक्या संख्येने ती फुलं दिसली(अर्थातच ती daffodils ऐवजी सूर्यफुलं होती इतकंच !). गावाकडे सूर्यफुलांची शेतं दिसणं काही दुर्मिळ नाही..पण ऐन शहरात ती मी पहिल्यांदाच  बघत होतो. 

I wandered lonely as a cloud
That floats on high o'er vales and hills,
When all at once I saw a crowd,
A host, of golden daffodils; 
Beside the lake, beneath the trees,
Fluttering and dancing in the breeze. 

गंमत म्हणजे सकाळची गडबडीची  वेळ होती म्हणून की माहित नाही- एवढा सुंदर नजारा होता तरी येणाऱ्या  जाणाऱ्या  कोणाचंही या विहंगम दृश्याकडे लक्ष नव्हतं. मी मात्र आधी ते दृश्य डोळ्यात साठवलं आणि नंतर मोबाईल कॅमेऱ्यात!

 

 

 
 

नंतर ८-१० दिवसांनी पुन्हा इथे गेलो तर सगळा बहर ओसरला होता आणि वाळलेली फुलं रस्त्यावर इतस्ततः: पडली होती आणि त्यावरून वाहनं, बेदरकारपणे म्हणावं की निर्विकारपणे  हे कळत नाही, जात होती !
(कोणाला सूर्यफुलाविषयी आणखी माहिती हवी असल्यास - https://en.wikipedia.org/wiki/Helianthus ) 

                                                                                 ३ 

सायकलिंग करता करता विशेषतः पुण्याच्या संतनगर ते मित्रमंडळ रस्त्यावर फुलांचा मंद, नाजूक वास नाकात घुमत होता पण आसपास फुलं काही दिसली नाहीत आणि सहज खाली बघितलं तर लांबलचक दांडी असलेल्या फुलांचा सडा पडलेला दिसला आणि लक्षात आलं की ही तर बुचाची(Indian Cork Tree ) फुलं ! आणि फुलांतून झाडाचा माग काढला तर उंचच उंच झाड आणि त्यावर अक्षरश: लगडलेली फुलं दिसली. लांबून बघितल्यावर मला तर हिमालयातील एखाद्या मनाली वगैरे सारख्या शहरातील उंच डोंगराळ वस्ती जशी दिसते तशी ती दिसली. नंतर बुचाची झाडं आणखीही काही ठिकाणी दिसली- अगदी आमच्या मार्केटयार्ड सिग्नलला सातारा रस्त्याकडून उजवीकडे वळलं की लगेच वळणाला हे झाड दिसलं. 

 
 
 

(बुचाच्या झाडाविषयी अधिक माहिती- https://en.wikipedia.org/wiki/Millingtonia)

                          ४

मार्च महिन्यात बहरलेली पिचकारी ( African Tulip tree) ची फुलं पावसाळ्यानंतरही पुन्हा फुललेली  बघायला मिळाली. आणि आधीपेक्षा जास्त बहर बघायला मिळाला. या फुलाविषयी मी आधीच्या ब्लॉग मध्ये लिहिलं आहे. त्यामुळे इथे फक्त अलिकडेच काढलेले फोटो डकवतो.

 
                         
                       ५

संतनगर भागातून जवळपास रोजच सायकलिंग करत जातो. त्यामुळे इथली झाडं माहित झाली आहेत, त्यांची नावं माहित नसली तरीही! म्हणूनच झाड/फुलांचे फोटो काढून expert opinion घ्यायचं हा आता शिरस्ताच झाला आहे! आता हेच बघा ना - कांचन या झाडाचं फूल असं असतं हे माहित होतं- 


(हे फोटो गोखले इन्स्टिट्यूट च्या बाहेरच्या फूटपाथवरून काढले आहेत. )
पण ही फुलं सुध्दा कांचनचीच आहेत हे नव्हतं माहित. मी यालाच तामण समजत होतो -



(कांचन या झाडाविषयी अधिक माहिती -https://en.m.wikipedia.org/wiki/Bauhinia_variegata )

                       ६

वनस्पतीशास्त्राची तोंडओळखही नसली की अशा गफलती होतात. जसं कांचन ला मी तामण समजत होतो तसंच या फुलांना मी बुचाची फुलं समजत होतो. वाळवेकरनगर च्या आसपास रात्रीच्या वेळी गेलं असता रातराणीच्या फुलांसारखा वास येत असे. पण रातराणीचं झुडूप असतं. तिथे मात्र सगळी उंच झाडं आहेत. मग वाटलं की ते नक्कीच बुचाचं असेल पण वर जशी बुचाची फुलं आणि पानं दिसतात तशीही  तिथे नव्हती. पण तो फुलांचा वास मात्र दिलखेचक आणि arresting होता. तो काही स्वस्थ बसू देईना! मग शेवटी शोधल्यावर कळलं की हा वास Alstonia scholaris किंवा Devil's tree या फुलांचा आहे. मराठीतही याला सटवीण म्हणतात. थोड्या वेळाकरता हा वास चांगला वाटला तरी या झाडाखाली बराच वेळ थांबलं तर त्याच वासाने अक्षरशः डोकं दुखायला लागतं म्हणून असं नाव दिलं आहे की काय! झाडामध्ये विषारी गुणधर्म आहे. म्हणूनही कदाचित हे नाव दिलं असेल. पण काहीही म्हणा वासाला तोड नाही! 



झाडाच्या पानांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंतर ही झाडं मला मार्केट यार्ड रस्त्यावर दुभाजकावर ओळीने लावलेली दिसली! बऱ्यापैकी मोठी असलेली ही झाडं मला आधी कशी दिसली नाहीत याचं मला आश्चर्यच वाटलं! 
                       ‌‌‌‌
                         ७ 

मात्र सगळ्यात आश्चर्य मला हे झाड आधी कसं नाही याचं वाटलं आहे. कारण हा माझा अगदी रोजचा रस्ता आहे आणि या फुलांचा flamboyance लक्षात न येणं तसं अवघडच! पण माझी नातेवाईक सौ. मंजू आपटे हिने तिच्या WhatsApp status update वर हे ठेवलं आणि तेव्हा तिच्या कडून मला कळलं की असं झाड पुण्याच्या इतक्या मध्यवर्ती भागात आहे!( बघा..WhatsApp status update बघण्याचे काही फायदे पण असतात!) मग काय लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन फोटो काढले -




हे माडीवाले कॉलनीमध्ये झाड आहे. बाजीराव रोड वरील अत्रे सभागृहाच्या समोरच्या बाजूला डावीकडच्या पहिल्याच गल्लीत शेवटाला हे सुंदर झाड दिसतं. उन्हाळ्यात टॅबेबुइयाची झाडं बघितली होती- पिवळ्या, पांढऱ्या, फिकट गुलाबी. पण अशा गुलाबी रंगाचं नव्हतं पाहिलं. हेही टॅबेबुइया आहे! 
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो...पण आपण मात्र सतत कोणत्या ना कोणत्या विवंचनेत आणि घाईत असतो त्यामुळे आपल्याला डोळ्यासमोर असलेल्या गोष्टही दिसत नाहीत. आपली पंचेंद्रिये जागृत ठेवून निसर्गाची ही सौंदर्याची उधळण आपण अनुभवली पाहिजे. जगण्यातील आनंदाचे क्षण हेच तर असतात ना? 

( आधीच्या या विषयावरील ब्लॉग प्रमाणे याही ब्लॉग मधील झाडांची ओळख पटवून देण्यासाठी वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापक धनश्री बर्वे यांची बहुमोल मदत झाली) 









Tuesday 8 November 2022

अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास ! -भाग २

                                                                              १

९ मार्च २०१९ रोजी मी 'संत अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती' वर आधारित एक ब्लॉग लिहिला होता . त्यावेळी व्हॉट्स अँपवर फिरत असलेल्या गणेश स्तुतीचे शब्द मिळवण्याच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन करणारा तो ब्लॉग होता. ब्लॉग मध्ये मी त्या गणेशस्तुतीचे लिखित शब्द आणि त्या स्तुतीचा व्हिडीओ( म्हणजे त्याचा खरं तर ऑडिओ ट्रॅक) ही पोस्ट केला होता.
सर्वसाधारणपणे माझं ब्लॉगचं लिखाण हे मला आलेले अनुभव(बहुतांशी चांगले!) व्यक्त करून ते पोस्ट करणं या स्वरूपाचं असतं. ब्लॉग लिहिणं ही माझ्यासाठी खरं तर एक आनंददायी प्रक्रिया असते. त्या त्या वेळचे अनुभव ब्लॉग लिहीत असताना मी ते पुन्हा जगत असतो आणि या अनुभवांचे  नवे कंगोरे मला लिखाण करताना दिसतात.(शिवाय ब्लॉगर हे माझे विचार मांडायचं आयतं आणि फुकटचं माध्यम उपलब्ध आहे तेव्हा लिहायला मोकाट रानच आहे !)  
संत अमृतराय यांच्यावरील ब्लॉग देखील याला अपवाद नव्हता. पण कसं कोण जाणे माझा हा ब्लॉग खूप लोकांपर्यंत पोचला. कदाचित माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांना त्या गणेश स्तुतीच्या शब्दांनी भुरळ घातली असावी आणि ते शब्द शोधायला ते गुगल शरण गेल्यावर माझा ब्लॉग वाचायला मिळाला असावा. थोडासा आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगावंसं वाटतं की आजपर्यंतचा हा माझा सर्वाधिक वाचला गेलेला ब्लॉग आहे आणि आजच्या तारखेपर्यंत त्याला सुमारे ७४०० जणांनी भेट दिली आहे. (ज्यांनी या आधी हा ब्लॉग वाचलेला नाही त्यांच्यासाठी मी त्याची लिंक आहे -https://rajeshpusalkar.blogspot.com/2019/03/blog-post_8.html 
आधीचा ब्लॉग वाचला तर हे पुढचं लिखाण जास्त सुसंगत वाटेल.) 

जसा हा माझा सर्वाधिक वाचला गेलेला ब्लॉग आहे, तसंच याच ब्लॉगवर मला सर्वाधिक कॉमेंट्स देखील आल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांना ब्लॉगवर उत्तर देणं याबाबत जरा माझ्याकडून ढिलाईच होते. पण तरीही प्रयत्नपूर्वक मी त्या कॉमेंट्स ना उत्तरं देत होतो. ९ मार्च २०१९ ला ब्लॉग लिहिल्यानंतर मला २७  जून २०१९ ला श्री राहुल तळेगांवकर यांची पुढील कॉमेंट आली -
नमस्कार राजेशजी.या रचनेच्या शब्दांसाठी आपण केलेलें अथक प्रयत्न वाचुन तुमच्या चिकाटीची कमाल वाटते. संत कवी श्री अमृतराय महाराज यांच्या रचनांचे पुस्तक अमृतराय संस्थान पैठण यांनी प्रकाशित केले आहे. तुम्हाला अजून काही रचना हव्या असतील तर अवश्य संपर्क साधा."शिवाय संपर्कासाठी त्यांचा  इ मेल आयडी दिला होता. मी मात्र या कॉमेन्टला माझ्या ब्लॉगवरच ६ जुलैला उत्तर दिलं आणि त्यांच्याकडे संत अमृतराय यांच्या इतर रचनांचं पुस्तक कुठे मिळू शकेल अशी विचारणा केली होती. यानंतर मध्ये बराच काळ लोटला .खरं तर एक वर्ष उलटलं. मी  हे  सगळं विसरूनही गेलो होतो आणि एके दिवशी अचानक मला  श्री. तळेगांवकर यांची त्याच ब्लॉग वर पुन्हा एक कॉमेंट आली-
"राजेशजी, तुमचा पत्ता खालील क्रमांकावर पाठवा.
मी तुम्हाला (पुस्तक) कुरीअर करतो." आणि पुढे त्यांचा मोबाईल नंबर दिला होता. त्या नंबरवर मी माझा पत्ता  पाठवल्यावर दोन तीन दिवसांत एक पुस्तक मला कुरिअर द्वारे आलं सुध्दा ! -

 

 

आतल्या पहिल्याच पानावर हे लिहिलं  होतं -  

 


हा सगळाच अद्भुत प्रकार होता . मग मी  त्यांना फोन  करून त्यांचे आभार मानले. मी पण इतका असंवेदनशील ! त्यांनी पुस्तक 'सप्रेम भेट' असं लिहून पाठवलं तरी मी त्यांना पुस्तकाची किंमत विचारली! ती अर्थातच ते घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलंच शिवाय कुरिअरचे पैसेसुद्धा घेणार नाही असं म्हणाले! ते म्हणाले- "तुमच्याकडून संत अमृतराय यांची सेवा घडली आहे. त्यामुळे तुमच्याकडून पैसे कुठले घ्यायचे !" माझ्या एका साध्या फुटकळ ब्लॉग लिहिण्याला सेवा करणे हे नाव देऊन त्यांनी त्या ब्लॉगला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीला नेऊन ठेवलं जे मला ब्लॉग लिहिताना अजिबात अभिप्रेत नव्हतं आणि म्हणूनच मला ते अनपेक्षित वाटलं. 
पुस्तकात  संत अमृतराय यांचं जीवनचरित्र, त्यांच्या त्या काळच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेतल्या वैविध्यपूर्ण रचना देण्यात आल्या आहेत. कटाव वृत्ताव्यतिरिक्त इतर अनेक छंद त्यांनी  हाताळले आहेत. इतकंच काय पुस्तकात त्यांना आद्य गझलकार असं संबोधण्यात आलं आहे. श्रीकृष्णाच्या राजप्रासादात सुदामा जेवायला गेला त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना संत अमृतराय यांची शब्दसंपदा आपल्याला अचंबित करते! 
पुस्तक असंच पुढे वाचत गेलो तर त्यात संत अमृतराय यांची वंशावळ मांडलेली दिसली. आणि अहो आश्चर्य! त्यात सर्वात खाली श्री राहुल तळेगांवकर यांचं नाव होतं! म्हणजे माझा ब्लॉग संत अमृतराय यांच्या वंशजांनी वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली होती! शिवाय ब्लॉग लिहिल्याबद्दल संत अमृतराय यांच्या रचनांचं पुस्तकही भेट दिलं! कुठलीही गोष्ट न ठरवता करून देखील असे विलक्षण अनुभव आल्यामुळे मला एक वेगळंच आंतरिक समाधान मिळालं! 

                        २

जेव्हा नवीन ब्लॉग लिहिले जात नाहीत तेव्हा मध्ये मध्ये जुनेच ब्लॉग मी विविध समाज माध्यमांवर पुन्हा पुन्हा पोस्ट करत असतो. अर्थात हे काही भूषणावह आहे असं नाही पण काही वेळा नवीन सुचत नाही हे तितकंच खरं! असाच यंदाच्या (२०२२) गणेश चतुर्थीला मी हा माझा ब्लॉग फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट केला. तो किती लोकांपर्यंत पोचला हे माहित नाही परंतु एके दिवशी मला दस्तुरखुद्द डॉ चैतन्य कुंटे यांचा फेसबुक मेसेंजर वर मेसेज आला. त्यांनी केवळ माझा ब्लॉगच नाही तर त्याखाली आलेल्या सर्व कॉमेंटही वाचल्या होत्या. डॉ. कुंटे ज्या डॉ अशोक रानडे मेमोरियल ट्रस्टचे संचालक आहेत तिथेच आधी मी  कटाववृत्ताचे शब्द मिळवायला गेलो होतो. तिथेच 'कला गणेश' या सीडीचा उल्लेख झाला होता. मी हे सगळं लिहिलेलं डॉ कुंटे यांनी वाचलं होतं आणि त्यांनी आपणहून मला 'कला गणेश' या सीडीतील रचनांची युट्यूब लिंक मेसेज मध्ये पाठवली! काहीशा अनवट रागांवर आधारित या रचनांमागे किती खोल विचार केला आहे हे दिसतं.
जगात माणसं किती चांगली असतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तीच लिंक मी आता इथे देत आहे- - https://www.youtube.com/watch?v=j0gqdZ5IfG4&list=PLzzpU2Nok7Zd2-OGn3pjcHA5SndVb3pJ- 

इतकंच नव्हे तर माझ्या ब्लॉगवरील एका कॉमेंट मध्ये डॉ अशोक रानडे यांच्या बैठकीची लावणी या कार्यक्रमाविषयी श्री दीपक इरप यांनी विचारलं होतं. तर त्या दोन कार्यक्रमांची युट्यूब लिंक देखील डॉ कुंटे यांनी मला पाठवली. ती देखील मी इथे शेअर करत आहे - 
१) 

२) 

अशा प्रकारे एक मोठा खजिनाच या ब्लॉगच्या निमित्ताने माझ्या हाती लागला आहे. या ब्लॉगने मला सर्वाधिक आनंद दिला आहे. खरं तर मी एक छोटासा हौशी ब्लॉगर.. माझं लिखाण हे अशाप्रकारे वाचलं काय जातं आणि त्यातून असे उत्कट अनुभव काय मिळतात.. सगळंच अकल्पित आहे!  आणि  तुमच्यापुढे हे सगळं मांडून माझा आनंद द्विगुणितच काय...शतगुणित झाला आहे यात शंकाच नाही!