Thursday 8 November 2018

ऋण गाईन आवडी !(पु. ल. देशपांडे जन्मशताब्दीच्या निमित्ताने )


पु ल देशपांडे (जन्म -०८. ११. १९१९)
आजपासून  पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पु. ल. लेखक होते, नाटककार होते, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, गायकही होते. कथाकथन करणारे,  अग्रगण्य स्टॅन्ड अप कॉमेडियन होते. पु. ल. परफॉर्मर होते. ते बहुरूपी, बहुआयामी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा या सगळ्याहून  अधिक मोठा पैलू म्हणजे त्यांचं दातृत्व ! पु. ल. महाराष्ट्राचे लाडके दैवत होते. तेव्हा या सर्व पैलूंवर या कार्यक्रमांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशझोत पडेल. आपण एखाद्या व्यक्तीला दैवताचा दर्जा दिला की तिची फारशी चिकित्सा करत नाही. सुनीताबाई देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' हे आत्मचरित्र येईपर्यंत पु. लंच्या बाबतीतही हेच झालं. त्यानंतर मात्र पु. लंच्या  साहित्याबद्दल  वेगवेगळे मतप्रवाहही चर्चेत येऊ लागले. २००० साली त्यांचं निधन झालं. त्यांनतर त्यांचं साहित्य कालातीत आहे का, त्यांनी फक्त मराठी मध्यमवर्गाबद्दलच लिहिलं, त्यांच्या विनोदाची जातकुळी वगैरे बद्दल टीकात्म बोललं  जाऊ लागलं. सचिन कुंडलकर यांच्या एका सिनेमात तर पु. ल. देशपांडे आवडण्याबद्दल एक टिंगलीचा सूरही होता.  अशी चिकित्सा जरूर व्हावी. कारण चिकित्सा करण्याएवढे रेलेव्हंट ते आजही वाटतात असा त्याचा अर्थ मी घेतो. आमच्या सारख्या आज ४०-५० वर्ष वय असणाऱ्या लोकांची अख्खी पिढी पु. लं नी समृद्ध केली. आम्हांला हसवलं. आमच्या आणि आमच्या आधीच्या काळातील जगण्यातल्या विसंगती दाखवल्या. हसता हसता अंतर्मुखही  केलं. त्यांच्या विविध क्षेत्रातील मुशाफिरीचे अनुभव आमच्यासमोर मांडले. तेव्हा आजचा दिवस त्यांचं हे ऋण मानण्याचा ! स्मरण रंजनाचा! चिकित्सा वगैरे नंतर होतच राहील !

पु. लं बद्दल इतकं लिहिलं गेलं आहे की त्यात मी आणखी नवी भर काय  घालणार? 
पु. लं चं दातृत्व खूप वाखाणण्याजोगं आहे. अवघ्या महाराष्ट्राने त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाची परतफेड पु. लं नी अशाप्रकारे केली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र  बाबा आमटे यांचं आनंदवन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासारख्या सामाजिक संस्थांना त्यांनी दिलेलं दान आजही त्यांच्या कार्याला बळ देत आहे. 
एवढं दैवत बनलेली व्यक्ती सहसा  राजकीय भूमिका घेत नाही. कोणती ही एक भूमिका घेतली तर त्याविरोधी विचारसरणी असलेले वाचक/श्रोते दुखावतील/दुरावतील असे हिशेब त्यामागे असतात. पण पु. लं नी असं केलं नाही. आणीबाणी विरोधी आंदोलनात ते बिनीचे शिलेदार होते. विचार स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात दुर्गा भागवत यांच्या बरोबरीने त्यांनी आंदोलन केलं. 

मला वाटतं की पु. ल. एक रसिक गुणग्राहक होते. पारखी होते. आता हेच बघा ना... पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. वसंतराव देशपांडे हे कोणी मोठे गायक होण्याआधीपासून पु. लं नी त्यांचे गुण हेरले होते. त्यांच्या घरी या सर्व गायकांचं येणं-जाणं होतं. त्यांच्या घरी या सगळ्यांच्या मैफिलीचे किस्सेही आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या गायनातून मिळणारा स्वर्गीय आनंद पु. लं. नी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवला आणि मग rest, as they say is History! या सर्व गायकांबरोबरची त्यांची मैत्रीही विलोभनीय होती. पु. लं मध्ये एक सहजता होती. या गायक कलाकारांना अशा मैफिलींमध्ये हार्मोनियमची साथ ते सहज करत. आपण स्वतः लेखक, कलाकार असल्याचा कुठलाही बडेजाव त्यात नसे. किंवा फक्त हार्मोनियम वादनाची दुय्यम भूमिका घेण्यात त्यांना कमीपणाही वाटत नसे. 
हीच गुणग्राहकता मला आणखी एका बाबतीत दिसते. पु. लं नी रवींद्रनाथ टागोर यांचं साहित्य शांतीनिकेतन मध्ये राहून, अभ्यास करून मराठी लोकांपुढे मांडलं. बंगाली साहित्य-संस्कृतीचं एक वेगळंच विश्व त्यामुळे आपल्यापुढे खुलं झालं. एका आनंदयात्रीने दुसऱ्या आनंदयात्रीला केलेला तो सलामच म्हटला पाहिजे !  
१९७८ साली मराठी साहित्यविश्वात 'बलुतं' या दया पवारांच्या आत्मचरित्राने खळबळ निर्माण झाली. पण साहित्यातल्या या नवा प्रकाराला, दलितांच्या अभिव्यक्तीला पु. लं नी मात्र पाठबळ दिलं. तीच गोष्ट आनंद यादव यांच्या 'झोंबी' ची आणि एका वेगळ्या शैलीतल्या 'कोसला' ची ! पु. लं च्या एन्डॉर्समेंट मुळे या साहित्यकृतींकडे लक्ष वेधलं गेलं. 

मला पु. लं ना प्रत्यक्ष परफॉर्म करताना बघण्याचं भाग्य लाभलं नाही. बटाटयाची चाळ, वाऱ्यावरची वरात  किंवा त्यांचं कथाकथन हे सर्व मी दूरदर्शनवर पाहिलं आहे. त्यांचा 'देवबाप्पा'हा चित्रपट आमच्या लहानपणी पुण्यातल्या अलका टॉकीज ला लागला होता. १९५२-५३ च्या चित्रपटाला ७० च्या दशकातही भरपूर मोठी रांग होती. इतकी की आम्हांला त्याची तिकिटं मिळालीच नव्हती! १९९३ साली आलेला 'एक होता विदूषक' हा पु लं चा पटकथा आणि संवाद असलेला चित्रपट पाहिला होता. लक्ष्मीकांत बेर्डेची कदाचित एकमेव गंभीर भूमिका असलेला चित्रपट ! त्यांची सुप्रसिद्ध नाटकंही बघता आली नाहीत. मात्र त्यांनी रूपांतर केलेलं रशियन नाटक(द लास्ट अपॉइंटमेंट ) 'एक झुंज वाऱ्याशी' हे बघितलं होतं. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, सयाजी शिंदे, गौरी केंद्रे असे कलाकार होते. एका सर्वसामान्य माणसाचा अन्यायाविरोधातला राजकीय व्यवस्थेविरोधातला संघर्ष असं नाटकाचं कथानक होतं. तत्त्वनिष्ठ सर्वसामान्य माणूस आणि स्खलनशील राजकारणी या दोन वृत्तींमधला संघर्ष छान मांडण्यात आला होता. 

पु. लं ना काही कार्यक्रमांत प्रत्यक्ष बघण्याचा योग मात्र जुळून आला . चतुरंग प्रतिष्ठान तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी रुपारेल कॉलेजच्या भव्य प्रांगणात कार्यक्रम झाला होता. पुरस्कार प्रदान करण्याआधी पं. बिरजू महाराज यांचे कथक नृत्य आणि त्याला झाकीर हुसेन यांची तबला साथ असा कार्यक्रम होता. त्यावेळी पु. ल. दोघांनाही अगदी भरभरून दाद देत होते. प्रसंगी अगदी स्वतः उभे राहून !हे चित्र माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं आहे. 
बऱ्याच वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात अचानक पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे भेटले होते. खरं तर माझ्याकडे ऑटोग्राफ बुक वर दोघांचीही सही होती.
तरीही असं वाटलं की त्यांच्या एखाद्या पुस्तकावर त्यांची सही घ्यावी. म्हणून मी 'अपूर्वाई' पुस्तक घेऊन त्यांच्याकडे गेलो. तर आश्चर्य म्हणजे त्यांनी सही द्यायला थोडीशी नाख़ुशी व्यक्त केली. म्हणाले -" माझा हात आता कापतो. त्यामुळे अक्षर नीट येणार नाही." तरीही मी त्यांना पुन्हा विनंती केली. आणि थरथरत्या हाताने त्यांनी सही केली जी खरंच त्यांच्या नेहमीच्या सहीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. मला खूपच वाईट वाटलं. आपण उगीच त्यांना सहीचा आग्रह केला असं वाटून गेलं. पण कसं कोण जाणे नंतर हे पुस्तक माझ्याकडे राहिलंच नाही. कोणीतरी ते नेलं आणि परत आणून दिलंच नाही!
माझ्या मनात कायमचा कोरला गेलेला एक प्रसंग आहे. तो म्हणजे सुनीताबाई देशपांडे यांना कोठावळे पुरस्काराच्या समारोहाचा ! 'आहे मनोहर तरी' या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात मे  महिन्यात देण्यात आला होता. नारायण पेठेतल्या मॅजेस्टिक दुकानाच्या गच्चीवर हा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमाला वसंत कानेटकरांचं सुंदर अध्यक्षीय भाषण झालं होतं. आणि विशेष म्हणजे संपूर्ण भरलेल्या त्या गच्चीत पु. ल. प्रेक्षकांमध्ये खाली बसून होते. सगळ्यांनी त्यांना कितीतरी वेळा आग्रह केला. पण ते म्हणत राहिले- आजचा दिवस सुनीताचा ! कायम प्रकाशझोत मिळाला तरीही त्याची हाव कमी न होणाऱ्या काही कलाकारांच्या तुलनेत पु. लं चं हे वागणं अगदी उठून दिसलं ! 




Wednesday 31 October 2018

'चि. सौ. कां रंगभूमी: एक अविस्मरणीय नाट्यानुभव !



(माझे मामा श्री यशवंत देवस्थळी हे लार्सन अँड ट्युबरो या नामांकित कंपनीचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी तसेच कॉर्पोरेट जगतातले एक सन्माननीय नाव ! त्यांना गाण्याची अतिशय आवड आणि कला क्षेत्रांत विशेष रस!  २०१५ साली ते सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'राजवाडे अँड सन्स' या एका  मोठी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचे निर्माते होते. आणि आता १९ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईत झालेल्या ''चि. सौ. कां रंगभूमी' या नाटकाद्वारे त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पुण्यात या नाटकाचा १० ऑक्टोबर ला प्रयोग झाला. त्याचाच हा अनुभव!).... 

दिनांक १० ऑक्टोबर रोजी मराठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या 'चि. सौ. कां रंगभूमी' या नाटयरूपी 'लग्नाला' हजर राहण्याचा योग आला. लेखिका- दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांची शालीन, मार्दव असलेली शब्द 'संपदा', तिला लाभलेली श्री. अनंत पणशीकरांची नाट्य 'संपदा' आणि चोखंदळ श्री. यशवंत देवस्थळी यांची अर्थ 'संपदा' असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला! मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा धावता आढावा घेणारं हे नाटक उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेलं आहे. ही परंपरा सादर करण्यासाठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या लग्नाच्या गोष्टीची सुंदर गुंफण लेखिका-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी केली आहे . अनुभवी आणि कसलेले राहुल मेहेंदळे आणि स्वतः संपदा जोगळेकर कुळकर्णी सोडल्यास यात तसे नवोदित कलाकार आहेत. पण प्रत्येकानेच आपआपला ठसा सुंदररीत्या उमटवला. 
विशेष उल्लेख करावासा वाटतो सर्व गायक कलाकारांचा ! नचिकेत लेले, अवधूत गांधी, शमिका भिडे आणि केतकी चैतन्य या सगळ्यांनीच गाणी छान म्हटली. बालगंधर्व रंगमंदिरात 'प्रत्यक्ष' बालगंधर्व अवतरले आणि त्यांनी अप्रतिम नाट्यगीते गायली हे फार भारी वाटलं. 

अवधूत गांधी यांच्या आवाजाची फेक जबरदस्त आहे. जरी माईक नसता तरीही त्यांचा आवाज शेवटच्या रांगेत सहज पोचला असता! त्यांचा मुद्राभिनय ही मस्त! या गायकांचं वैशिष्ट्य म्हणजे गाणी सादर करतानाचा अभिनय आणि त्याच वेळी गाण्यांतून व्यक्त होणारे भाव या दोन्ही बाबतीत ते सरस ठरले. याची दोन उदाहरणे देता येतील. संगीत स्वरसम्राज्ञी मधील 'कशी केलीस माझी दैना' हे गाणं सादर करतानाचा शमिका भिडे यांचा अभिनय आणि त्या गाण्यातून व्यक्त होणारी expressions छानच होती. तसंच संगीत शारदा मधलं 'मूर्तिमंत भीती उभी' हे गाणं आर्ततेने सादर करणाऱ्या केतकी चैतन्य यांनी नंतर लगेचच 'म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान' हे एकदम वेगळ्याच मूडचं गाणं सादर केलं. केतकी चैतन्य यांनी ज्योत्स्ना भोळे यांचं 'बोला अमृत बोला' हे गाणं सुंदर म्हटलं . खरं तर ते गाणं खूप अवघड आहे. त्यात खूप हरकती, मुरकी, ताना आहेत. पण ज्योत्स्ना भोळे यांची आठवण येईल एवढ्या सहजतेने त्यांनी ती म्हटली. सुहास चितळे (तबला) आणि केदार भागवत (ऑर्गन) यांची साथसंगतही गाण्यांमध्ये रंग भरणारी होती. 
अमोल कुलकर्णी यांचा तळीरामाचा प्रवेश, तसेच मोरूची मावशीही उत्तम! शर्वरी कुळकर्णी यांची ही पदार्पणाची भूमिका आहे असं अजिबात वाटत नाही इतका त्यांचा अभिनय सहज आणि आत्मविश्वासपूर्वक होता . तसंच अनिरुद्ध देवधर यांचा लोकनाट्याला साजेसा अभिनय होता. 

या नाटकाचा मला आणखी आवडलेला एक भाग म्हणजे ज्या नाटकांमधली गाणी अथवा प्रवेश सादर करण्यात आले आहेत त्या सर्व नाटककार आणि दिग्दर्शक, गीतकार संगीतकार यांना श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कोणाला ती नावं माहीत नसतील त्यांना ती समजू शकतात. नाटकासारख्या माध्यमात इतर कुठल्याही डिजिटल दृश्य माध्यमाचा उपयोग करू नये असं मला वाटतं.(उदा. चित्रफीत, LCD प्रोजेक्टर वगैरे) या नाटकातदेखील या माध्यमाचा वापर टाळून ही श्रेयनामावली आपल्यासमोर अनोख्या पद्धतीने सादर होते. या श्रेयनामावलीमुळे हे नाटक फक्त स्मरणरंजन न राहता रंगभूमीचा इतिहास आपल्यापर्यंत पोचवतं. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने हे नाटक आवर्जून बघावं असं वाटतं. 
सध्याच्या एकूणच मराठी रंगभूमीची स्थिती कशी आहे याचा माझा अभ्यास नाही. पण मला वाटतं मुंबई-पुण्याबाहेरचं चित्र फारसं आशादायक नसावं. आणि पुण्या-मुंबईतही सगळं काही आलबेल असावं असं वाटत नाही. त्याला कारणं वेगवेगळी असतील. अर्थात ही काही आजचीच परिस्थिती आहे असंही नाही. 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातदेखील रंगभूमी आणि रसिक यांच्यातील बेबनावावर सविस्तर भाष्य आहे. ग्रामोफोन, रेडिओ, चित्रपट यासारखी अनेक प्रलोभनं( किंवा पर्याय म्हणू या) उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षकांचा ओढा रंगभूमीकडे कमी होऊ लागला असं नाटकात सूचित करण्यात आलंय .त्यात आता भरीला टीव्ही मालिका, क्रिकेटच्या सामान्यांचं टीव्हीवर प्रक्षेपण हेही आहेच! खरं तर नाटक हे एक अतिशय सशक्त माध्यम आहे. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशात देखील अनेक शक्यता दडलेल्या असतात आणि लेखक त्या अवकाशाचा उपयोग वैविध्यपूर्णरीत्या करू शकतो. कालानुरूप मराठी रंगभूमीने देखील बाह्य स्वरूपापासून ते कथा-संकल्पनेपर्यंत बदल करून अक्षरश: कात टाकलेली आहे. मराठी रंगभूमीची गौरवशाली वाटचाल पुढेही चालू राहण्यासाठी लोकाश्रयाची गरज कधी नव्हे इतकी आता आहे आणि 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातून मिळालेला हा संदेश मला खूप महत्त्वपूर्ण वाटतो .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉ कौस्तुभ दिंडोरकर !




( १) खालील वर्णनातल्या व्यक्ती खऱ्या आहेत परंतु हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. 
  २) पण एक आहे- असा प्रसंग पूर्वी कधी झालाच नसेल असं नाही. कदाचित झालाही असेल पण कौस्तुभने आपल्याला कधी तो सांगितला नसेल. आणि जर झाला  नसेल तर पुढे कधीही तो घडणारच नाही असं नाही !
३) या लिखाणात कोणालाही दुखवायचा हेतू अजिबात नाही. अजाणतेपणी कोणी दुखावले गेल्यास मी आधीच माफी मागतो )

स्थळ: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय. असं म्हणतात की इथल्या जुन्या बिल्डिंगमध्ये  आठव्या मजल्यावर काही सुइट्स कायम मंगेशकर परिवारासाठी राखीव ठेवण्यात येतात. तर तिथल्या अशाच एका सुइटमध्ये.. 

तारीख : २६ ऑक्टोबर वेळ : दुपार 

सुइट प्रशस्त आहे. एका भिंतीवर मा. दीनानाथ यांची मोठी तसबीर फर कॅप घातलेली... तर दुसरीकडे संगीत मानापमान नाटकातल्या त्यांचा धैर्यधराच्या पोशाखातला मोठा फेटा बांधलेला फोटो. दोन्ही फोटोंना मोठाले हार! भिंतींवर एके ठिकाणी विठ्ठलाचं पेंटिंग( बहुदा उषा मंगेशकरांनी काढलेलं ) तर काही ठिकाणी पक्षी -प्राणी यांचे सुंदर फोटो. त्यात एक फोटो 'मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता' असा ... (हे सर्व फोटो बहुदा लता मंगेशकरांनी काढलेले !) अतिशय रसिकतेने सजवलेलं सुइट ! नवरात्रीचा पांढरा रंग नसताना देखील सगळीकडे पांढऱ्या रंगाची रेलचेल! एका मोठ्या पांढऱ्या सोफ्यावर पांढऱ्या रंगाची, नाजूक गुलाबी काठाची साडी नेसलेल्या साक्षात लतादीदी बसल्या आहेत ! प्रसन्न मुद्रा ! चेहऱ्यावर छान हसू! त्यांच्या उजव्या बाजूला थोडंसं मागे अदबीनं त्यांची धाकटी बहीण-उषा मंगेशकर- बसल्या आहेत.त्यांचीही पांढरीच साडी ! तर दीदींच्या डाव्या बाजूला सोफ्याच्या वेगळ्या खुर्चीवर पंडित हृदयनाथ मंगेशकर( उर्फ बाळ किंवा बाळासाहेब)  बसले आहेत. त्यांचाही पांढरा  झब्बा, त्यावर काळं जॅकेट,  पांढरा शुभ्र पायजमा आणि मोठा जाड भिंगाचा काळा चष्मा! बाळासाहेबांच्या डाव्या बाजूला कौस्तुभ आणि त्याच्या परिवारातली जवळची माणसं बसली आहेत. इतरही काही निमंत्रित आहेत. यांच्या मध्ये एक नटून थटून आलेली निवेदिका खेटून उभी आहे. तिच्या हातात कॉर्डलेस माईक आहे. पण ती अजून तरी काही बोलत नाही. फोटोंसमोर लावलेल्या उदबत्त्यांचा सुगंध, अत्तराचा परिमळ आणि त्यात पार्श्वभूमीवर दीदींच्या आवाजतल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या रेकॉर्डचा मंद दरवळ ! एकंदरीत माहोल अगदी संमोहक आहे! 

सगळेच कोणाचीतरी वाट बघताहेत. हळू आवाजात एकमेकांशी बोलतायत. कोणी दीदींना येऊन नमस्कार करतायत. त्याही त्यांचा स्वीकार करता करता नमस्कार करताहेत. 

अचानक निवेदिका गडबडून जाते... हातातला माईक सावरते.. म्हणते " डॉक्टर धनंजय केळकर आले आहेत. तेव्हा आता आजचा कार्यक्रम सुरु करूया.." सगळ्यांचं लक्ष आपोआप दरवाज्याकडे जातं. दीनानाथ रुग्णालयाचे सर्वेसर्वा, सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ धनंजय केळकर झपझप चालत सुइट मध्ये प्रवेश करतात. बहुदा नुकतेच एक ऑपरेशन करून ते आले असावेत. त्यांचा पेहराव ओ.टी. मधल्या डॉक्टरचा असतो तसाच! निळ्या रंगाचा ड्रेस आणि पायात काळ्या सॅंडल वजा सपाता ! ऑपरेशन करून आले असले तरीही डॉ केळकर अजिबात दमलेले दिसत नाहीत. निवेदिका पुढे काही बोलायच्या आत डॉ केळकर तिला खुणेने माईक त्यांच्याकडे द्यायला सांगतात आणि बोलायला सुरुवात करतात. 

डॉ. केळकर :
 कार्यक्रमाला थोडा उशीर झाला ... पण काय करणार?एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती... असो ! (लता दीदींकडे बघून) .. तर दीदी... आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय... दीदी... आज आपल्याला दोन पुरस्कारांचं वितरण करायचं आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळणार आहेत. ती व्यक्ती म्हणजे आपल्या हॉस्पिटल मधले ब्रेन आणि न्यूरोसर्जन डॉ कौस्तुभ दिंडोरकर ! (सगळे टाळ्या वाजवतात)

डॉ केळकर :(कौस्तुभ कडे बघत... अगदी बारीकसं हास्य करून )- ए अरे कौस्तुभ... मला आता तुला अहो- जाहो म्हणायची सवय करून घेतली पाहिजे! दीदी हा कौस्तुभ आपल्याकडे २० वर्षांपेक्षा जास्त काळ आहे. त्याच्यात आणि तुमच्यात एक साम्य आहे ... 

लतादीदी: (प्रश्नार्थक चेहरा).. 

डॉ केळकर : तुमच्याप्रमाणेच यालाही फोटोग्राफीची खूप आवड आहे. उत्तम फोटो काढतो. इथल्या कामातून सवड  मिळाली की तो फोटो काढायला फिरत असतो देशोदेशी! आजचा दुसरा योगायोग म्हणजे  ज्याला पुरस्कार मिळणार आहे तो... म्हणजे कौस्तुभ... आणि पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळणार आहे.. ते म्हणजे बाळासाहेब... या दोघांचाही आज, २६ ऑक्टोबरला वाढदिवस आहे! 

लतादीदी (कौतुकाने आधी बाळासाहेबांकडे आणि नंतर कौस्तुभकडे बघतात): अरे वा ! 
आणि त्यांच्या या मंजुळ स्वरातील साध्या बोलण्याचंसुद्धा गाणं होतं ! 

डॉ केळकर : तर आता पहिल्या पुरस्काराबद्दल बोललं पाहिजे... दीनानाथ हॉस्पिटलमधल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांसाठी हा पुरस्कार आहे... म्हणजे आम्ही एक निष्पक्ष परीक्षक मंडळ नेमलं होतं- ज्यात इथले काही डॉक्टर, डॉ व्ही जी कुलकर्णी,  इथल्या सोशल वर्कर शिल्पा बर्वे यासारखे परीक्षक होते. त्यांनी काही निकष ठरवले होते. त्यात मागच्या वर्षात केवळ पेशंटची संख्या हा एकाच निकष नव्हता. तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या, त्यात कॉम्प्लिकेटेड केसेस किती होत्या, त्या शस्त्रक्रियांनंतर आता पेशंट किती आणि कितपत बरे आहेत, एकंदरीत डॉक्टरांचा पेशंटबरोबरचा conduct, एथिकल प्रॅक्टिस इ सगळे निकष होते. आणि मला सांगायला आनंद होतो की सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार कौस्तुभने मिळवला आहे( टाळ्यांचा गजर ) तर हा पुरस्कार दीदींनी कौस्तुभला द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. 

(लतादीदी कौस्तुभला एक मोठा चांदीचा गणपती, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि उषा मंगेशकरांनी काढलेलं मा. दीनानाथ यांचं पोर्ट्रेट प्रदान करतात. त्यावेळी त्या म्हणतात - तुम्हांला यापुढेही असेच मान सन्मान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळोत, तुमच्या कामाची कीर्ती देशोदेशी पोहचो यासाठी माझ्याकडून शुभेच्छा! पुरस्कार स्वीकारताना कौस्तुभ दीदींना अगदी खाली वाकून नमस्कार करतो. डॉ केळकरांनाही तो नमस्कार करण्यासाठी वाकतो पण ते त्याला नमस्कार पूर्ण होण्याआधीच पाठीवर मैत्रीची थाप मारतात!) 
आता निवेदिका पुढे सरसावते.. 

निवेदिका : यानंतरचा पुरस्कार आहे मित्र फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा मैत्री पुरस्कार ! डॉक्टरांना हा पुरस्कार आम्ही का देतोय याची कारणं  मी थोडक्यात सांगते... 
१) मित्रांबरोबर असताना डॉ कौस्तुभ हे नेहमीच फक्त कौस्तुभ असतात. त्यांच्या डॉक्टरकीला बाजूला ठेऊन ते मित्रांमध्ये मनमोकळेपणाने मिसळतात. 
२) मित्रांच्या छोट्यात छोट्या वैद्यकीय शंकांचं निरसन ते तत्परतेने करतात. 
३) त्यांच्या सर्व मित्रांना डॉक्टर म्हणून ते एक आधार वाटतात. म्हणूनच मित्रांचे आई-वडील, इतर नातेवाईक यांच्या ब्रेन-न्यूरोसर्जरी संबंधी कुठल्याही आजारासाठी डॉक्टरांना कन्सल्ट केलं जातं. 
४) हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या वावरण्यात एक सहजता आहे. कुठलाही बडेजाव नाही. मागे एका गाण्याच्या कार्यक्रमात डॉक्टरांच्या एका मित्राला निवेदक अंबरीश मिश्र यांची  सही हवी होती( तो मित्र मिश्रांचा खूप मोठा फॅन आहे म्हणे!) तर डॉक्टर कौस्तुभ यांनी कार्यक्रम संपल्यावर त्या मित्राला बॅकस्टेजला नेले आणि अगदी सहजरीत्या अंबरीश मिश्रांची सही मिळवून दिली! 
५) मित्रांनी मिळवलेल्या यशाचं, त्यांच्या सफलतेचं ते मनापासून भरभरून कौतुक करतात.हे करत असताना त्यांच्या मनात कुठेही असुरक्षितता किंवा हेवा अशा कुठल्याच नकारात्मक भावना नसतात. असतो फक्त जिव्हाळा आणि आपुलकी ! 

निवेदिका: तर आता 'मित्र फाऊंडेशन'चा मैत्री पुरस्कार डॉ कौस्तुभ दिंडोरकर यांना प्रदान करावा अशी विनंती मी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना करते. 

(पंडितजी सन्मानचिन्ह आणि सूर्याचं एम्बॉसिंग केलेलं एक मोठं चित्र कौस्तुभला प्रदान करतात. त्यावेळी ते कौस्तुभला म्हणतात: मित्र हे सूर्याचं दुसरं नाव आहे. डॉक्टरसाहेब आपण इतरांच्या आयुष्यात कायम असे सूर्यासारखे प्रकाशमान राहा... त्यांच्या आयुष्यातल्या आजाररूपी अंधाराला दूर  करा हीच शुभेच्छा ! धन्यवाद!) 

निवेदिका: धन्यवाद पंडितजी! आता मी डॉ कौस्तुभ यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं... 

कौस्तुभ: (पूर्णपणे भारावलेला)... (मोठा श्वास घेतो...) काय बोलू? M.S. किंवा M. Ch. च्यावेळी आलं नसेल इतकं टेन्शन मला आत्ता आलंय! माझी दैवतं असलेल्या प्रत्यक्ष लतादीदी आणि पंडितजींच्या हस्ते पुरस्कार... आमच्या केळकर सरांची कौतुकाची थाप... मला तर आपण एखादं स्वप्न बघतोय असंच वाटतंय! पण खरंच विचार केला तर मला असं वाटतं की हे दोन्ही पुरस्कार हे माझ्या एकट्याचे नाहीत. वैद्यकीय क्षेत्राविषयी म्हटलं तर ऑपरेशन करणारा मी सर्जन असलो तरी माझ्या मागे आणि माझ्या बरोबर अक्षरश: एक मोठी टीम काम करत असते. त्यात ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ओ.टी. मधला सगळा स्टाफ हे सगळे आलेच. शिवाय या श्रेयाचा वाटा माझ्या पेशंटचाही नक्कीच आहे आणि माझ्यामागे उभी राहणारी दीनानाथ हॉस्पिटल ही संस्था देखील आहेच! 
तसंच मैत्री पुरस्काराबद्दल म्हणता येईल... मी माणूस म्हणून कसा घडलो यामध्ये माझ्यावर घरच्यांचे संस्कार यांचा खूप मोठा वाटा आहे. तसंच माझी दगडूराम कटारिया ही शाळा, तिथले शिक्षक यांनीदेखील मला घडवलंय. माझी बायको डॉ गौरी, माझ्या मुली यांचं देखील मोठं श्रेय माझ्या या वाटचालीत आहे. मित्रांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. माझ्या शाळेतल्या मित्रांशी माझं छान नातं आहे. त्यांच्यामुळेच मी जमिनीवर असतो. अशा पुरस्कारांमुळे हुरळून जात नाही. तेव्हा हे दोन्ही पुरस्कार सर्वांच्या वतीने मी नम्रपणे स्वीकारतो! 

इतका वेळ कौस्तुभचं सगळं मनोगत मन लावून ऐकणाऱ्या लतादीदी उत्स्फूर्तपणे म्हणून जातात: अरे वा !
आणि त्यांच्या या मंजुळ स्वरातील साध्या बोलण्याचंसुद्धा गाणं होतं !   








Monday 23 April 2018

माझा वाचन प्रवास...

आज सुप्रसिद्ध इंग्रजी कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस ( २३.४.१५६४) आणि मृत्यु् दिनही!(२३ एप्रिल १६१६). म्हणून १९९५ पासून आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन  म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आज माझ्या वाचन प्रवासाविषयी थोडेसे-

माझी वाचनाची आवड वयाप्रमाणे बदलत गेली. म्हणजे हे तर झालंच की सुरुवातीला ऐतिहासिक कादंबऱ्या( ना.सं.इनामदार ते शिवाजी सावंत व्हाया गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे) त्यानंतर युद्धस्य कथा रम्या( वि. स. वाळिंबे, वि.ग.कानिटकर इ) असा चालू झालेला प्रवास, नंतर पु. ल., व. पु. काळे या मार्गावरून होत होत एक वेगळे वळण घेऊन गेला- दलित आत्मचरित्र -'उपरा', 'बलुतं' आनंद यादव यांचं 'झोंबी' हे ही वाचलं. तर दुसरीकडे जयंत नारळीकर यांची पुस्तकेही वाचली. प्रभाकर पेंढारकरांची 'रारंगढांग' ही कादंबरीही खूप संस्मरणीय व प्रभावी वाटली.माणूस आणि निसर्ग यांच्यातीलच नव्हे तर माणसा-माणसातील संघर्षाचे छान चित्रण यात आहे. पुस्तक वाचल्यावर मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि विशेष म्हणजे त्यावर त्यांचं कौतुक आणि प्रोत्साहनपर उत्तरही आलं होतं. नारळीकरांनाही एक पात्र पाठवलं होतं ज्यात त्यांना मी विचारलं होतं(त्यासुमारास  त्यांचा म. टा. मध्ये 'पुराणातली वांगी' हा लेख आला होता) की आपले पूर्वज खरंच एवढे प्रगत होते का. गंमत म्हणजे माझ्याच पत्रातल्या मोकळ्या जागेत त्यांचं छोटेखानी उत्तर आलं होतं ज्यात माझ्या प्रश्नाला त्यांनी अगदी त्रोटक उत्तर दिलं होतं.  

एकीकडे इंग्लिश वाचनही चालू होतं. जेफ्री आर्चर, आयर्विंग वॉलेस, सिडनी शेल्डन, एरिक सेगल, आर्थर हेली, रॉबिन कूक पासून जॉन ग्रिशमपर्यंत माझा प्रवास झाला. त्याकाळी वाचलेले 'Jonathan Livingston Seagull' हे Richard Bach यांचे
पुस्तक नंतरच्या काळात वाचल्यावर जास्त आवडले. आपल्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जावून Higher Purpose of Existence शोधणाऱ्या  एका समुद्रपक्ष्याची ही प्रतीकात्मक छोटेखानी गोष्ट! प्रत्येकवेळी एक नवी स्फूर्ती देणारी! अशा काही इंग्रजी पुस्तकांचा खूप प्रभाव त्याकाळी होता- Daphne du Maurier यांचे 'Rebecca', हार्पर ली यांचे 'To kill a Mocking bird'  अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं 'The Old Man & the Sea' इ.

महाभारत हा माझा आवडीचा विषय आहे. पण बी आर चोप्रांच्या ढोबळ, भडक आणि साचेबद्ध शैलीतल्या महाभारताच्या सादरीकरणाचा मला तिटकाराच आहे ! इरावती कर्व्यांनी लिहिलेलं 'युगान्त' दुर्गाबाई भागवतांचं 'व्यासपर्व' आणि भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित 'पर्व' या तीन पुस्तकांमधून महाभारताचा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून अप्रतिम वेध घेण्यात आला आहे.

खरं तर भाग्य/योग या गोष्टींवर माझा फारसा विश्वास नाही. पण एखादे पुस्तक किंवा लेखक 'भेटण्याचा' योग यावा लागतो असं मला वाटतं. अशाच प्रकारे गौरी देशपांडे('एकेक पण गळावया'), सुनीता देशपांडे ('आहे मनोहर तरी') भेटल्या आणि खूप समृद्ध करून गेल्या. अंबरीश मिश्र त्यांच्या सुरेख, प्रवाही लिखाणातून दिसले. त्यांचं 'शुभ्र काही जीवघेणे' हे पुस्तक वाचलं आणि असं वाटलं की आपण अगदी वेगळ्या आणि समृद्ध शैलीचं पुस्तक वाचत आहोत. मग त्यानंतर त्यांची सगळीच पुस्तकं (स्वतः लिहिलेली वा त्यांनी अनुवाद केलेली) एकामागोमाग करत वाचली. त्यांचे निवेदनाचे कार्यक्रम आवर्जून पाहिले आणि लक्षात आलं मिश्रांना वाचण्याइतकंच त्यांना ऐकणं हा एक अपूर्व आनंद आहे !  

मिलिंद बोकील 'शाळा' च्या आधी 'जनाचे अनुभव पुसता' मधून भेटले. पौगंडावस्थेमधल्या मुला -मुलींचं विश्व त्यांच्या भाषेत मांडणारी एक कालातीत कादंबरी असं 'शाळा' चं वर्णन करता येईल. त्यानंतर पत्ररूपाने भेटले.( मी त्यांनाही त्यांची काही पुस्तकं वाचल्यावर पत्रं पाठवली होती आणि माझ्या प्रत्येक पत्राला त्यांनी मनापासून उत्तरं दिली होती) त्यानंतर ते २-३ वेळा प्रत्यक्षही भेटले. एकदा तर मी त्यांच्या घरीही गेलो होतो. आमच्या कडच्या एका कार्यक्रमाला लोकांना भेट म्हणून मी त्यांची काही पुस्तकं निवडली होती. त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी ती दिली होती. अतिशय मृदू स्वभावाचे, शांत व्यक्तिमत्व ! एक लेखक म्हणून तर ते आवडलेच पण एक माणूस म्हणूनही! 

अशाच एका  बेसावध क्षणी महेश एलकुंचवार 'मौनराग' मधून भेटले. योगायोग पहा- आमच्या जर्मन शिकवणाऱ्या टीचरांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी मौनराग मधील 'देणं आणि घेणं' या विषयावरील उतारे आम्हाला वाचून दाखवले. शेवटच्या दिवसाची ती हुरहूर, भावनिकता- यातच हा विषय! छोट्या अनुभवातून खूप गहिरे अर्थ सांगणारी, एलकुंचवारांची शैली मनाला भिडली. जर्मनची परीक्षा झाल्यावर सर्वप्रथम 'मौनराग' आणून वाचले. एखादा अनुभव, त्या अनुभवाचे आपल्या मनावर उमटणारे पडसाद आणि त्याच अनुभवातून प्रतीत होणारा लेखक अशी त्रिमितीद्वारे हे पुस्तक मनात घर करून राहिले आहे. अर्थात त्यातले सगळेच अनुभव घेण्याएवढी संवेदनशीलता माझ्यात आहे असं वाटत नाही. ती कधीतरी येईल अशी आशा आहे. 











मग त्यांचं 'वाडा चिरेबंदी' वाचलं. मी ते नाटक पाहिलेलं नाही पण पुस्तक वाचूनही ते माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे उभं राहिलं. इतकं की आता मला प्रत्यक्ष नाटक बघून माझ्या डोळ्यासमोरचं

चित्र भंग पावेल किंवा काय अशी भीती वाटते !
अशा योगांमुळे एक झालं आहे की पूर्वग्रहांमुळे अनेक पुस्तकांना आणि लेखकांना मी option ला टाकले होते. ते आता होणार नाही. कधीतरी जी.ए. कुलकर्णी ही वाचीन असं म्हणतो! अजून पुस्तकं वाचायची यादी खूपच मोठी आहे- नव्या पिढीतल्या मराठी लेखकांची पुस्तकं फारशी वाचलेली नाहीत. ती वाचायची आहेत. युवाल नोआ हरारीची दोन्ही पुस्तकं वाचायची आहेत. शिवाय हारुकी मुराकामी आहेच ! अलीकडे मोबाईल फोनमुळे मात्र वाचन मागे पडत चाललं आहे. ते प्रयत्नपूर्वक सुरु करायचं आहे. त्यासाठी आजच्या पुस्तक दिनासारखा योग्य दिवस दुसरा कुठला असणार? फक्त आता रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था आहे!

ता. क. १ : वरील लेख पुन्हा वाचला असता आणखी काही पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो. यात प्रामुख्याने Deborah Ellis लिखित 'The Breadwinner' या पुस्तकाचा समावेश होईल. म्हटलं तर कादंबरी आणि म्हटलं तर सत्य घटनांवर आधारित असं हे पुस्तक! अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीमुळे निर्माण झालेल्या अशांत अस्थिर आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून झुंज देणार्‍या परवाना या लहानग्या मुलीची प्रेरणादायी कथा म्हणजे 'The Breadwinner'! प्रत्येकाने आवर्जून अशासाठी वाचावी की आपण आपल्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल इतकं रडगाणं गात असतो की आपल्याला जगात काय प्रसंगांतून लोक जात असतात आणि तरीही ते हार मानत नाहीत याचा अंदाज यावा!
भारत-पाकिस्तान फाळणी वर आधारित 'A train to Pakistan' हे खुशवंत सिंग लिखित पुस्तक तर याच विषयावर गुलजार यांची 'Two' ही कादंबरी यांचा इथे फक्त उल्लेख करतो कारण यावर मी एक स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहेच! 

ता.क. २- 
युवाल नोआ हरारी यांची 'Sapiens' आणि ' Homo Deus' ही दोन्ही पुस्तकं वाचून झाली आहेत. मानवी इतिहासातील घटना आणि संकल्पनांचा रंजक, उद्बोधक आणि विचारप्रवर्तक आढावा या पुस्तकांमधून घेण्यात आला आहे. तसंच भविष्यकाळाचा वेध आणि त्यातील समस्यांच्या दाहकतेबद्दल देखील हरारी विवेचन करतात. 
या शतकातील ही महत्त्वाची पुस्तकं प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहेत. या पुस्तकांचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे.

हारूकी मुराकामी यांची Norwegian Wood ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते ज्यात Pathos आहे. कादंबरी मनात खूप काळ घर करून राहते.

माझा मित्र डॉ श्रीरंग ओक याला कसं कळलं माहित नाही पण मला त्याने मला  जी ए कुलकर्णी  यांच्या पुस्तकांचा संच भेट दिला आहे आणि आता त्यातील पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. त्यांची व्यक्ती चित्रण करण्याची हातोटी विलक्षण आहे. व्यक्ती, तिची परिस्थिती आणि या दोहोंमधील द्वंद्व आणि पुष्कळदा परिस्थितीचाच होणारा विजय या गोष्टी वाचल्यानंतर एक अस्वस्थता निर्माण होते.

ता.क.३ - सध्याच्या नवीन लेखकांपैकी गणेश मोरसे लिखित 'झुंड', बालाजी सुतार लिखित 'दोन शतकांच्या सांध्यांवरील नोंदी'  आणि मनोज बोरगावकर लिखित 'नदीष्ट' या पुस्तकांचा इथे फक्त उल्लेख करतो. आवर्जून वाचावी अशी ही पुस्तकं आहेत. कदाचित यांवर एक स्वतंत्र ब्लॉग पुढे मागे लिहीन. तूर्त इथेच थांबतो!

Friday 16 March 2018

चव रेंगाळत राहील असा 'गुलाबजाम'....

हे म्हणजे खरं तर वरातीमागून घोडे होतंय.. पण काय करणार? आमच्या घरी बारावीच्या परीक्षेमुळे कर्फ्यु ऑर्डर होती... बारावीच्या परीक्षेचं ग्रहण सुटल्यावर दुसऱ्याच दिवशी आम्ही 'गुलाबजाम' पाहिला.. एव्हाना सगळ्यांनी तो पाहिला असेलच ! पण तरीही सिनेमा बघून त्याबद्दल मला काय वाटलं ते लिहावंसं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच !  

सचिन कुंडलकरांचे याआधी मी 'निरोप', 'हॅपी जर्नी' आणि 'राजवाडे अँड सन्स' हे तीनच सिनेमे पाहिले आहेत. तिन्ही सिनेमी मला आवडले होते . मला ते look wise पण खूप आवडले होते. 'गुलाबजाम' हा खाद्य पदार्थ हा प्रमुख धागा असलेला सिनेमा कसा दिसेल याची म्हणूनच मला खूप उत्सुकता होती. पाककलेच्या पुस्तकातच बेमालूम मिश्रण केलेल्या  आगळ्या श्रेयनामावलीपासूनच सिनेमाने पकड घ्यायला सुरुवात केली. सिनेमा दृक-श्राव्य माध्यम आहे पण कुठल्याही खाद्यपदार्थाचा परिपूर्ण अनुभव आपण आपल्या पंचेंद्रियांनी घेत असतो. म्हणूनच त्याचा वास आणि स्वादही तेवढाच महत्त्वाचा ! 'गुलाबजाम'च्या दिग्दर्शक(अर्थातच सचिन कुंडलकर), फूड डिझायनर (सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट) आणि सिनेमॅटोग्राफर (मिलिंद जोग) यांचं यश म्हटलं पाहिजे की त्यांनी सर्व पदार्थ इतके सुंदर पेश केले आहेत की ते बघूनसुद्धा आपल्याला त्यांचा दरवळ यावा आणि ते  खात असल्याचा अनुभव यावा ! अहो साधी ढोबळी मिरचीची पीठ पेरलेली भाजी असो वा शेवग्याची आमटी, शेवई यंत्रातून बाहेर येणारी शेवई, कांदा भजी, सुरळीची वडी असो वा साग्रसंगीत पारंपरिक मराठी जेवण वा अगदी मासेसुद्धा ...  सगळं इतकं छान दिसतं की बस्स ! सिनेमाचं नावच 'गुलाबजाम' असल्यामुळे ते तर मस्तच दिसतात. विशेषतः  गुलाबजाम पाकात पडत असताना त्याचा नाजूक रव आणि त्या पाकात त्याचा तरंग उमटणं हे तर केवळ अप्रतिम ! माझ्यामते बऱ्याच वेळा खाद्यपदार्थ करताना आणि ते झालेले दाखवताना वर कॅमेरा ठेवून चित्रण करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचं छान सादरीकरण झालंय. 

संपूर्ण सिनेमात खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. पण म्हणून त्याच्यातच फक्त फील-गुड फॅक्टर आहे असं नाही. सिनेमात आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) राधा( सोनाली कुलकर्णी)ने बनवलेले गुलाबजाम खाऊन नॉस्टॅलजिक होतो. त्याला थेट त्याचं लहानपण आणि त्याची आई आठवते. 'गुलाबजाम' बघून आपणही अशा खाद्यपदार्थ आणि त्यांच्याशी जोडले गेलेले अनुभव यांच्या आठवणींमध्ये रमू लागतो आणि आपला हा प्रवास सिनेमा संपल्यावरसुद्धा सुरूच राहतो. माझ्याही खाण्याशी संबंधित असंख्य आठवणी आहेत. त्या सांगत बसणं म्हणजे अगदीच विषयांतर होईल . पण एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. एकदा लहानपणी मी माझे काका-काकू आणि चुलत भावंडांबरोबर नगर-शिर्डी असे फिरायला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस... दिवसभर वेळी अवेळी खाणं, उन्हात प्रवास आणि वणवण झाली होती. संध्याकाळी बाभूळगाव मध्ये काकांच्या ओळखीच्यांकडे रात्रीचं राहायला उतरलो होतो. आम्ही जिथे राहिलो नावही आता आठवत नाही पण त्या माऊलीने केलेल्या गरम गरम वरण भाताची चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. असा वरण भात मी आजपर्यंत कधीच खाल्लेला नाही. तर या सिनेमामुळे अशा आठवणींना उजाळा मिळाला. 

सिनेमा जरी राधा आणि आदित्य यांच्या नात्याबद्दलचा असला तरी त्यांना जोडणारा धागा स्वयंपाकाचा आहे. आणि या स्वयंपाकाबद्दल खुसखुशीत संवादातून लेखक-संवादलेखक(सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक) खूप काही सांगून जातात. म्हणजे अगदी स्वयंपाक करणे म्हणजे किराणा भुसार आणण्यापासून ते भांडी घासणे इथपर्यंत सगळं आलं पाहिजे ते  स्वयंपाक करताना हात स्वच्छ धुतले पाहिजेत इथपासून ते स्वयंपाक करताना आपण आपला अंश त्यात मिसळा पाहिजे म्हणजे त्या पदार्थाला चव येते यासारखे संवाद स्वयंपाक या कलेबद्दल भाष्य करतात. 

सिनेमाचा गाभा हा राधा आणि आदित्य यांचं नातं आहे. गुरु-शिष्य अशा प्रकारे सुरु झालेलं नातं नंतर खुलत जातं, बहरत जातं आणि दोघांनाही त्यांच्यातल्या स्व ची जाणीव करून समृद्ध करतं. या नात्यात मैत्री आहे, निखळ प्रेम आहे आणि आहे care ही  ! कुठल्याही नात्याचं लेबल लावता न येणारं हे नातं छान उलगडत जातं. म्हणूनच शेवटच्या प्रसंगात आदित्यने राधासाठी गुलाबजाम करणं ही गुरु कडून शिकलेली कला गुरूला गुरुदक्षिणा स्वरूपात परत देणं इतकाच मर्यादित अर्थ वाटत नाही. तर विशुद्ध प्रेमापोटी एका सर्जक मनाने गुलाबजामच्या रूपात मागे ठेवलेली ती एक आठवण वाटते. 

सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही सुरेख काम केलंय. आदित्य आणि राधा या व्यक्तिरेखा या दोघांना डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या होत्या की काय माहित नाही इतकं चपखल काम केलंय त्यांनी! दोघांनीही त्या व्यक्तिरेखांचे वेगवेगळे कंगोरे छान सादर केले आहेत. रेणुका शहाणे, रोहित हळदीकर,समर नखाते आणि चिन्मय उदगीरकर यांचे कॅमिओही छान! रुक्मिणीबाईचं काम करणाऱ्या शमीम पठाण मजा आणतात. 

मी  पुणेकर आहे. त्यामुळे सगळंच कसं चांगलं म्हणणार? सिनेमातल्या काही गोष्टी मला खटकल्या. मुख्य म्हणजे त्याची लांबी- उत्तरार्ध लांबल्यासारखा वाटतो. डायल अ शेफ चे काही प्रसंग कमी करता आले असते असं मला वाटलं . शिवाय प्रत्येक व्यक्तिरेखेला( वाड्यातल्या घराबाहेर बसलेल्या म्हाताऱ्या माणसासकट) तिच्या लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेण्याची खरोखरच गरज होती का?तसंच खासकरून रोहित हळदीकरांबरोबरच्या संवादांवेळी जाणवलं- त्यात काही वेळा प्रेक्षकाला त्यांची फक्त पाठ दिसते आणि संवाद ऐकू येतात. हे थोडंसं बरोबर नाही वाटलं. 

पण एकूण चव बराच काळ रेंगाळत राहील असा 'गुलाबजाम' खूप छान आहे आणि अजूनपर्यंत ज्यांनी तो पहिला नाही त्यांनी तो जरूर बघावा...  

Tuesday 13 February 2018

Two: गुलजारांची फाळणीवरील कादंबरी

दोन महायुद्धांमुळे प्रामुख्याने जर्मनीमध्ये लाखोंच्या संख्येने लोकं मारली गेली. लाखोंच्या संख्येत जखमी झाली. कितीतरी मुलं अनाथ आणि बेघर झाली. संपूर्ण देश अक्षरश: बेचिराख झाला. सर्वार्थाने देश कोसळला मुख्यतः पुरुष सैनिक मारले गेले अथवा जखमी झाले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात देशात स्त्रिया आणि लहान मुलेच उरली. त्यांच्या दुःखाच्या कहाण्या काळाच्या ओघात विरून गेल्या नाहीत.अशा भीषण परिस्थितीत देखील तिथे साहित्यनिर्मिती होत राहिली. अशा साहित्याला तिथे Nachkriegsliteratur(युद्धोत्तरसाहित्य) म्हटलं जातं. तसंच दुसऱ्या महायुद्धानंतरच्या त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन  करणाऱ्या साहित्याला Trümmerliteratur (Trümmer चा अर्थ पडझड  आहे) त्या साहित्याची एक वेगळीच धाटणी आहे. भाषाशैलीही वेगळी आहे. अशा साहित्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीचंच नव्हे तर लोकांच्या मन:स्थितीचं चित्रण आणि त्या संपूर्ण काळाचं एक प्रकारे दस्तावेजीकरण झालं. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्याच वेळी देशाची फाळणीही  झाली. असं म्हटलं जातं की या फाळणीमुळे झालेल्या दंगलींमध्ये सुमारे वीस लाख लोकं  मारली गेली.(मृतांच्या नक्की आकड्याबद्दल दुमत असू शकतं) लाखो लोक विस्थापित झाले. एका राजकीय अपरिहार्यतेमुळे झालेल्या या अभूतपूर्व घटनेची किंमत सर्वसामान्य लोकांना चुकवावी लागली. युद्धात होणाऱ्या मानवी नुकसानाइतकीच या फाळणीमुळे देखील वाताहत झाली. भारतातून मुसलमान आणि पाकिस्तानातून हिंदू आणि शिखांना स्थलांतर करावं लागलं. या स्थलांतरादरम्यान अनेकांना प्राण गमवावे लागले, हाल-अपेष्टा-यातना भोगाव्या लागल्या. एका काल्पनिक रेषेच्या निर्मितीमुळे लोकांच्या आयुष्यावर कायमच्या जखमा करणारे दाहक ओरखडे उठले. कित्येकांच्या जखमा आजतागायत तशाच भळाळत्या राहिल्या. 

या सर्व परिस्थितीचं चित्रण करणारं साहित्य हिंदी, उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषांमध्ये झालं. भीष्म सहानी (तमस), सादत हसन मंटो(टोबा टेक सिंग),अमृता प्रीतम( आज आखा वारिस शाह नून ही सुप्रसिद्ध कविता तसेच पिंजर ही कादंबरी), गुलजार यांच्या 'रावीपार' या कथासंग्रहातील काही कथा, बापसी सिध्वा यांचं 'The Ice Candy Man' ही कादंबरी, 'Freedom at midnight' हे लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपिएर यांनी लिहिलेलं पुस्तक किंवा खुशवंतसिंग यांची 'Train to Pakistan' ही कादंबरी... ही या साहित्यप्रकाराची काही ठळक उदाहरणे ! 'Train to Pakistan' ची माझ्याकडे जी आवृत्ती आहे त्यात Margaret Bourke White यांनी त्यावेळी काढलेले फोटो समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यावरूनही त्यावेळच्या भीषण परिस्थितीची थोडीशी कल्पना येते. 



यापैकी बऱ्याच कलाकृतींवर सिनेमेही आले.'तमस'ची दूरदर्शन मालिकाही निघाली आणि चित्रपटही ! 'पिंजर' वरही सिनेमा आला. 'The Ice Candy Man' वर आधारित दीपा मेहता यांचा 'Earth' (आमिर खान-नंदिता दास-राहुल खन्ना) हा चित्रपट आला. या कलाकृतींव्यतिरिक्त इस्मत चुगताई यांच्या एका कथेवर 'गरम हवा' हा एम एस सथ्यू दिग्दर्शित अप्रतिम चित्रपट फाळणीच्या नंतर उद्भवलेल्या परिस्थतीवर होता. तर अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेमकथा' किंवा अलीकडेच आलेल्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटांना देखील फाळणीची पार्श्वभूमी किंवा संदर्भ होते. 

याच परंपरेत मोलाची भर घालणारी एक नवी कलाकृती वाचनात आली- गुलजार यांची कादंबरी - 'Two'! मूळ उर्दूतल्या या कादंबरीचा त्यांनीच इंग्रजीत अनुवाद केला आहे. गुलजारांचा जन्म पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातल्या दीना या गावातला. फाळणीच्या वेळी त्यांचं वय १३ होतं. त्यामुळे तशी कळत्या वयात त्यांनी फाळणीची दाहकता अनुभवली होती. 'Two' मध्ये त्याचं प्रतिबिंब छोट्या छोट्या प्रसंगांमधून, कादंबरीतल्या व्यक्तिचित्रांमधून मधून उमटतं. शब्दप्रभू आणि दृश्य माध्यमाची जाण असल्यामुळे गुलजार यांच्या लिखाणात मुळातच एक दृश्यात्मकता आहे. एखादा प्रसंग आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांना त्याचं शब्दबंबाळ वर्णन करावं लागत नाही. कादंबरी मध्ये खूप मोठं अवकाश सामावलेलं आहे. म्हणजे १९४६ च्या सुमारास कादंबरीची सुरुवात होते कॅम्पबेलपूर(म्हणजेच अटक -हो तेच रघुनाथराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा नेलेलं अटक!) या गावापासून आणि अगदी १९८४ च्या दिल्लीतल्या शीख दंगलीपर्यंत तिचा कालखंड आहे. १९४६ साली फाळणी झालेली नसली तरी त्याची चाहूल गावात लागलेली आहे. गावात एक प्रकारे अशांत, तणावाचं, अविश्वासाचं, अस्थिर आणि असुरक्षित वातावरण आहे. याने सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे. पूर्वी गुण्यागोविंदाने एकत्र राहिलेल्या लोकांमध्ये एक अनामिक भीती आणि दरी निर्माण झालेली आहे. यातल्या फौजी, लखबीरा, मास्टर करमसिंग, फजल, रायबहादूर देस राज, पन्ना, सोनी-मोनी या बहिणी, तिवारी आणि काही अनाम लोकांसारख्या वेगवेगळ्या स्तरांतल्या परंतु फाळणी या एकाच घटनेला सामोऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वभाव वैशिष्टयांची  आपल्याला ओळख होते.  या व्यक्तींमधल्या आपसातल्या संवादातून लेखकाचा फाळणीबद्दलचा  दृष्टिकोन समजतो. कालांतराने त्या गावात राहणे सुरक्षित नाही असं लक्षात आल्यावर फौजीच्या ट्रक मधून लखबीरा, देस राज आणि परिवार,पन्ना
इ. सगळे भारताच्या दिशेने निघतात. या प्रवासाचं  आणि वाटेत भेटत जाणाऱ्या लोकांचं आणि तिथल्या प्रसंगांचं गुलजारांनी एवढं प्रभावी वर्णन केलंय की काही क्षण आपणही त्या प्रवासात, त्या ट्रकमध्ये आहोत की काय असं वाटू लागतं. फाळणीची निरर्थकता आणि तरीही अपरिहार्यता, एखादे झाड मुळापासून उखडून दुसरीकडे रुजवण्यासारखी परिस्थिती या सगळ्या गोष्टी गुलजार आपल्यासमोर उभ्या करतात. सिनेदिग्दर्शक गुलजारांची एक खास शैली आहे. त्यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात त्यांनी फ्लॅशबॅक या तंत्राचा खुबीने वापर केला आहे. त्यांची ती प्रतिमा मनात ठेऊन ही कादंबरी वाचायला घेतली तर कदाचित निराशा होईल. कारण इथे ते गोष्ट एकसंधपणे सांगतात. सरळ रेषेत जाणारी ही गोष्ट मनाला आणखी भिडते.
कादंबरीच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात की त्यांना फक्त फाळणी या काळापुरतंच लिहायचं नव्हतं तर त्यावेळच्या रेफ्युजींची(इकडे आले ते शरणार्थी आणि तिकडे गेले ते मुहाजिर!) नंतर काय स्थिती झाली हे ही सांगायचं होतं. गुलजार हे सिनेदिग्दर्शक आहेत. त्यामुळे कुठल्याही व्यक्तिचित्राचा आलेख ते संपूर्णपणे मांडतात. फाळणीच्या वेळेच्या  जवळपास प्रत्येक व्यक्तिचित्राचं  पुढे काय झालं हे सांगून ते त्या व्यक्तिचित्राला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेतात. एकही धागा अर्धवट सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट अधांतरी ठेवत नाहीत. फाळणीच्या जखमा मनाच्या एका खोल कोपऱ्यात दडवून आयुष्य पुढे रेटत नेणाऱ्या काही लोकांना त्या जखमांवरची खपली ओरबाडून टाकणारी घटना १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर घडली. त्यावेळी उसळलेल्या भीषण दंगलीत वेचून वेचून शिखांना मारण्यात आलं. अगदी तसंच जसं फाळणीच्या वेळी 'तिकडे' मारण्यात आलं. फरक इतकाच की तेव्हा मारणारे 'ते' परधर्मी होते आणि यावेळी आपलेच ! 
कादंबरी मधला हा संदर्भ अस्वस्थ करतो आणि मन हेलावून टाकतो. 
महाराष्ट्राला फाळणीची झळ सोसावी लागली नाही. म्हणून कदाचित मराठीत या विषयावर साहित्य नाही. अनुवादित साहित्य मात्र आहे. 'तमस' चा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. गुलजारांच्या या नव्या कादंबरीचाही मराठीत अनुवाद व्हावा आणि ही उत्तम साहित्यकृती मराठीत वाचायला मिळावी असं वाटतं.